मोडाच्या उसळी चांगल्या असल्या तरी प्रमाणातच खाव्यात का ?

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

मोडाच्या उसळी चांगल्या असल्या तरी प्रमाणातच खाव्यात…. का?

मोड आलेली कडधान्यं रोज खाण्याची सवय हेल्थी फॅशन म्हणून रूढ होते आहे, पण कोणतीही गोष्ट फक्त आरोग्यदायी आहे म्हणून ती कितीही आणि केव्हाही खाऊन चालत नाही.

पौष्टिक पदार्थांचा अतिरेक केल्यास त्यातली पौष्टिकता राहते बाजूला आणि अपायच जास्त होतात. मोड आलेल्या कडधान्यांच्या बाबतीतही असंच होतं. खरं तर मोड आणणं ही प्रक्रिया म्हणजे धान्य अथवा कडधान्यांमधून पुन्हा नव्यानं जिवंत रोप निर्माण करण्याची प्रक्रिया आहे. ज्यात अधिक पोषणमूल्यं आहेत.

मोड आलेल्या कडधान्यांचे फायदे.

कडधान्यं ही खूप पौष्टिक समजली जातात कारण त्यातून कमी उष्मांकात (कॅलरीचं उच्च प्रतीचं पोषण मिळतं. भरपूर जीवनसत्त्व, चांगल्या दर्जाची प्रथिनं आणि जीवनावश्यक खनिजं आणि क्षार मिळतात. कोणत्याही डाळी नुसत्या खाण्यापेक्षा मोड आणून खाल्ल्या तर अधिक पोषक ठरतात. या प्रक्रियेत त्यातील तंतुमय पदार्थांचं प्रमाण वाढतं. यामध्ये असणा-या अँण्टि ऑक्सिडण्ट गुणधर्मामुळे आजार दूर ठेवण्यासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खूप उपयोग होतो.

ज्यांना गहू किंवा इतर धान्यांमधील ग्लुटेनची अँलर्जी असते त्यांना मोड आलेल्या उसळी हे एक वरदान आहे.

मोड येणे ही एक प्रकारची पानं फुटण्याची प्रक्रिया असल्यानं त्या दरम्यान कडधान्यामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण वाढतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूप उपकारक असतं. कारण त्यांच्या सेवनानं शरीरातील साठलेले विषार बाहेर टाकण्यास मदत होते.

*मोड आणण्याच्या क्रियेमुळे चांगल्या प्रतीची प्रथिनं शरीराला उपलब्ध होतात.

शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं.

विशेष करून व्हिटॅमिन ए चा पुरवठा सुधारल्यानं दृष्टी सुधारते, डोळ्यांचं स्वास्थ्य उत्तम राहतं.

रक्ताभिसरण संस्थेवरील अतिरिक्त ताण कमी केला जातो.

म्हातारपण दूर राखण्यासाठी, वार्धक्याची प्रक्रिया पुढे लोटण्यासाठी मोड आलेली कडधान्यं अतिशय उपयुक्त आहेत. अकाली केस पांढरे होणं, केस गळणं अशा तक्रारींवरही उपयोगी ठरतात.

वंध्यत्वाच्या रुग्णांमध्ये स्त्रीबीज किंवा शुक्र जंतूंचे स्वास्थ्य सुधारून चांगल्या प्रतीची बीजनिर्मिती व्हावी यासाठी सकाळी उपाशीपोटी मोड आलेले हिरवे मूग खाणं हा एक चांगला अनुभूत योग आहे.

कडधान्य कसं वापराल ?

कडधान्य दोन तीन वेळा स्वच्छ पाण्यानं धुवून किमान सात ते आठ तास भरपूर पाण्यात भिजत ठेवावं. कठीण कवच असणारी कडधान्यं भिजायला वेळ लागतो. छोले, वाल, पावटे, राजमा यांना भिजायला वेळ लागतो. कडधान्यं उन्हाळ्यात भिजविताना जरा काळजी घ्यावी लागते. कारण अति भिजून धान्य फसफसू शकतं आणि त्याचा खराब वास येतो. योग्य पाणी, तापमान आणि ऊब मिळाली की मोड छान येतात. त्यामुळे मोड येण्यासाठी भिजविलेले कडधान्य उपसून थोडे निथळून घ्यावे आणि पातळ कपड्यात घट्ट बांधून थोड्या उबदार ठिकाणी ठेवावे. म्हणजे छान लांबलचक मोड येतात. ही कडधान्यं कच्ची, किंचित वाफवून किंवा व्यवस्थित शिजवून वापरू शकतो. भाताबरोबर शिजवून खिचडी करून, सूपमध्ये, बर्गर पॅटीमध्ये अशा विविध प्रकारे वापरता येतात.

अनेक प्रकारच्या पाककृतींमध्ये मोडाची कडधान्यं मिसळल्यास त्या पदार्थाचं पोषणमूल्यं तर वाढतंच पण जीभ आणि डोळे दोन्ही तृप्त होतात.

तरीही काळजी घेणं गरजेचं !

कच्ची कडधान्यं खाणं ब-याच जणांना सहन होत नाही. पोट दुखतं, फुगते किंवा गॅसेस होतात त्यांनी ती शिजवूनच खावीत.

ज्यांना आधीच मलावष्टंभाचा त्रास आहे त्यांनी वारंवार कडधान्यं खाऊ नयेत, क्वचितच खावीत, त्यातही हिरव्या मुगाचा वापर अधिक करावा.

म्हातारपणी आधीच शरीरातील वात वाढलेला असतो, सांधे दुखत असतात, पचन मंदावलेलं असतं. त्यामुळे वृद्ध व्यक्तींना उसळी फारशा देऊ नयेत. दिल्यास जरा जास्त तेलाची भरपूर लसूण आणि हिंग घातलेली फोडणी दिल्याशिवाय खाऊ नये.

मोड आणण्यासाठी कडधान्यं शक्यतो घरीच भिजवावीत कारण विकतच्या उसळी मोड आणताना स्वच्छतेची किती काळजी घेतली असेल याची खात्री नसते.

बरेचदा मोड येताना निर्माण झालेल्या उष्णतेमुळे त्यात सालमोनेला किंवा इ कोलाय सारखी भयंकर संसर्ग करणारे जंतू निर्माण होतात आणि पोट बिघडणं, जुलाब होणं असा त्रास होऊ शकतो.

एकदा मोड आले की ती उसळ शक्यतो लवकर संपवावी, खूप दिवस फ्रीजमध्ये वगैरे ठेवून ते वापरू नये. जर उसळीला खराब वास येत असेल, रंग आणि चव बदलली असेल, चिकटपणा वाटत असेल तर ती उसळ सरळ फेकून द्यावी, खाऊ नये अन्यथा फायदा होण्याऐवजी नुकसानच होईल.

घरी मोड आणलेली, चांगल्या प्रतीची आणि आपली प्रकृती सांभाळून कमी प्रमाणात, अधूनमधून कडधान्यं खाणं उपयुक्तच ठरतं.

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )