जाणून घ्या मोगरावर्गीय पिकाची लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Mogravargiy Lagwad Mahiti Mogravargiy Sheti) – Mogravargiy Farming

मोगरावर्गीय लागवड । Mogravargiy pikachi Lagwad | Mogravargiy Sheti | मोगरावर्गीय पिक लागवड महत्त्व ।मोगरावर्गीय लागवडी खालील क्षेत्र । मोगरावर्गीय पिकाचे उत्पादन ।मोगरावर्गीय पिकास योग्य हवामान । मोगरावर्गीय पिकास योग्य जमीन । मोगरावर्गीय पिकाच्या उन्नत जाती ।मोगरावर्गीय पिकाची अभिवृद्धी आणि लागवड पद्धती । मोगरावर्गीय पिकास योग्य हंगाम । मोगरावर्गीय पिकास योग्य लागवडीचे अंतर । मोगरावर्गीय पिकास वळण । मोगरावर्गीय पिकास छाटणीच्या पद्धती ।मोगरावर्गीय पिकास खत व्यवस्थापन । मोगरावर्गीय पिकास पाणी व्यवस्थापन । मोगरावर्गीय पिकातील आंतरपिके । मोगरावर्गीय पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।मोगरावर्गीय पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । मोगरावर्गीय पिकामधील तणांचे नियंत्रण । मोगरावर्गीय फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

मोगरावर्गीय लागवड । Mogravargiy pikachi Lagwad | Mogravargiy Sheti |

प्राचीन काळापासून मोगरावर्गीय फुलझाडांची लागवड केली जाते. मोगरावर्गीय फुलांना देवपूजेसाठी आणि गजरे तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. घराभोवती, सार्वजनिक उद्यानांमध्ये शोभा वाढविण्यासाठी या फुलझाडांची लागवड केली जाते. मंदिराभोवती मोगरावर्गीय फुलझाडे लावण्याची प्रथा बरीच जुनी आहे.
मोगरावर्गीय फुलांना परदेशात प्रामुख्याने आखाती देशांत भरपूर मागणी आहे. फ्रान्समध्ये या फुलांपासून मोठ्या प्रमाणावर सुगंधी द्रव्ये तयार करतात. या सुगंधी द्रव्यांचा उपयोग अत्तरे सुवासिक तेले, सौंदर्य प्रसाधने, साबण, लिपस्टिक, इत्यादी बनविण्यासाठी होतो. काही मोगरावर्गीय फुलांचा उपयोग कटफ्लॉवर म्हणूनही केला जातो.

मोगरावर्गीय पिक लागवड महत्त्व ।

मोगरावर्गीय फुलझाडांमध्ये मोगरा, जाई, जुई, चमेली, सायली, नेवाळी, कागडा, इत्यादी फुलांचा समावेश होतो. मोगरावर्गीय फुलझाडांच्या कळयांना गजरा, हार, गुच्छ यासाठी भरपूर मागणी आहे. या वर्गातील फुलझाडांचे दुसरे वैशिष्ट्ये असे की, यातील कोणता ना कोणता प्रकार वर्षाच्या बाराही महिने फुलत असतो. उन्हाळयात मोगरा चांगला बहरतो तर पावसाळ्यात जाई-जुई व हिवाळयात कागडा, नेवाळी, सायली यांना बहर येत असतात. या प्रकारातील फुलांचा अर्क काढून त्यापासून वेगवेगळी सुगंधी तेले आणि अत्तरे बनवितात. ही अत्तरे महाग असतात आणि त्यांना परदेशात भरपूर मागणी असते. पद्धतशीर नियोजन करूम या वर्गातील फुलझाडांची लागवड केल्यास वर्षभर नियमितपणे फुलांचे उत्पादन मिळविण्याचे हे एक चांगले साधन आहे.

मोगरावर्गीय लागवडी खालील क्षेत्र । मोगरावर्गीय पिकाचे उत्पादन ।

मोगरावर्गीय फुलांचे विविध प्रकार असून त्यांच्यापैकी मोगरा, जाई, जुई, चमेली यांची लागवड व्यापारी तत्वावर तामीळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांत प्रामुख्याने केली जाते. याशिवाय आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या राज्यांत मोगरा लागवडीचे बरेच क्षेत्र आहे. भारतात अंदाजे 7,000 हेक्टर क्षेत्रावर मोगरावर्गीय फुलांचे उत्पादन घेण्यात येते.

मोगरावर्गीय पिकास योग्य हवामान । मोगरावर्गीय पिकास योग्य जमीन ।

मोगरा, जुई, कुंदा चमेली, इत्यादी फुलांच्या लागवडीच्या पद्धतीत बरेच साम्य आहे. ज्या प्रदेशात उन्हाळा उबदार आणि हिवाळा सौम्य असतो अशा प्रदेशात मोगरावर्गीय फुलझाडे चांगली बहरतात. या प्रकारातील काही वेलींना उष्ण आणि दमट हवामान आवश्यक असते तर काही वेलींना समशीतोष्ण हवामान मानवते. सर्वसाधारणपणे मोगरावर्गीय फुलझाडे हवामानाच्या दृष्टीने अत्यंत काटक आहेत. उष्ण कोरडे हवामान, स्वच्छ सूर्यप्रकाश, मध्यम स्वरूपाचा पाऊस या पिकाला अतिशय अनुकूल आहे.

दिवसाचे तापमान किमान 25 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस आणि रात्रीचे तापमान किमान 16 अंश सेल्सिअस आणि कमाल 25 अंश सेल्सिअस तसेच आर्द्रता 55 ते 65% आणि कमीत कमी 8 तास स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास मोगरावर्गीय झाडांची वाढ वेगाने होते. अती थंडी, धुके आणि दव यांमुळे पिकाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. फुले येण्याच्या काळात पाऊस पडल्यास फुले खराब होतात आणि फुलांतील सुगंधी अर्काचे प्रमाण कमी होते. म्हणून सुगंधी अर्कासाठी फुलझाडांची लागवड करताना फुलांचा बहर मध्यम हिवाळा आणि सौम्य उन्हाळा असताना म्हणजेच साधारणपणे फेब्रुवारी- मार्च महिन्यांत येईल अशा प्रकारे करावी.
मोगरावर्गीय फुलझाडांच्या लागवडीसाठी हलकी ते मध्यम काळी, सामू 6.5 ते 7.0 असलेली, पाण्याचा उत्तम निचरा होणारी भारी जमीन योग्य आहे. चिकण जमिनीत झाडाची पालेवाढ जास्त होते आणि फुलांचे उत्पादन कमी मिळते. खडकाळ जमिनीत झाडे खुरटी वाढतात. दलदलीची किंवा पाणथळ, भरपूर खोलीची, चुनखडीयुक्त जमीन लागवडीसाठी निवडू नये.

मोगरावर्गीय पिकाच्या उन्नत जाती ।

मोगरा :

मोगरा हे फुलझाड झुडपाप्रमाणे वाढणारे असून ते 90 ते 100 सेंटिमीटर उंच वाढते. मोगऱ्याला उन्हाळी व पावसाळी अशा दोन्ही हंगामांत फुलांचा बहर येतो. उन्हाळयात मार्च – एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत फुलांचा मुख्य हंगाम असतो. मोगऱ्याची फुले पांढऱ्याशुभ्र रंगाची, एकेरी किंवा दुहेरी पाकळीची असतात. सिंगल मोगरा, डबल मोगरा, मदनबाण, रामबाण, गुंडूमल्ली, ओसीमल्ली, सुजीमल्ली, कस्तुरीमल्ली, मोतिया, खेली, खोया या मोगऱ्याच्या विविध जाती आहेत.

जाई :

जाईची झाडे वेलीप्रमाणे वाढतात. झाडाच्या फांद्या मुख्य खोडापासून निघून शेंड्याकडील भाग लोंबकळत राहतो. वेलींची पाने गर्द हिरव्या रंगाची असून 5-7 पानांचा समूह एका देठावर असतो. जाईची फुले पांढऱ्याशुभ्र रंगाची, चांदणीच्या आकाराची आणि पाच पाकळ्यांची असतात. फुलांच्या पाकळया इतर प्रकारातील फुलांच्या तुलनेत मोठ्या असतात. या प्रकारातील फुलांचा देठ जांभळट रंगाचा आणि पाकळ्या पांढऱ्या रंगाच्या असणारी जात सुगंधी द्रव्य काढण्यासाठी उत्तम समजली जाते.
महाराष्ट्रात या प्रकारातील रानजाई नावाची तीन पाकळ्या असणारी पांढऱ्याशुभ्र रंगाच्या फुलांची वेल अनेक ठिकाणी आढळते. या वेलीची फुले घोसामध्ये येतात. फुलांचे दांडे फुलदाणीत 1-2 दिवस चांगल्या अवस्थेत टिकतात.

जुई :

या प्रकारातील झाडे वेलीसारखी वाढतात. मुख्य खोडाभोवती अनेक धुमारे येत राहतात. जुईची पाने लहान असून एका देठावर तीन-तीन पानांचा समूह असतो. जुईची फुले लहान आकाराची, पांढऱ्याशुभ्र रंगाच्या नाजूक पाकळ्यांची असून ती झुपक्यात येतात. जुईच्या फुलांचा उपयोग गजरे करण्यासाठी आणि सुगंधी द्रव्ये बनविण्यासाठी केला जातो. जुईच्या लॉंग पॉइंट, लॉंग राउंड, मेडियम पॉइंट, शॉर्ट पॉइंट आणि शॉर्ट राउंड या विविध जाती आहेत. भारतीय बागवानी संशोधन संस्था, बंगलोर येथे कोळी कीटकास प्रतिकारक असणारी ‘परिमली’ ही जुईची जात शोधून काढण्यात आली आहे.

पिवळी जाई :

या वेलीला सुवर्ण चमेली असेही म्हणतात. या वेलीच्या एका देठावर 1 ते 3 पानांचा समूह असतो. या वेलींची फुले लहान आकाराची, पाच पाकळयांची आणि सोनेरी पिवळया रंगाची असून त्यांना मंद वास असतो. वेलींना एका झुपक्यात 3 ते 5 फुले येतात. वेलींना हिवाळी हंगामात फुले येतात.

कुंद :

कुंदाचे झाड लहान झुडपांच्या स्वरूपात वाढते. पानाच्या खालच्या बाजूस केसाळ लव असते. कुंदाच्या झाडाला वर्षभर फुले येतात. मात्र फुलांचा मुख्य हंगाम हिवाळयात असतो. कळी अवस्थेत फुले लालसर, जांभळट रंगाची असतात. पूर्ण उमललेल्या फुलांच्या पाकळ्या वरच्या बाजूस पांढऱ्या रंगाच्या तर खालच्या बाजूस जांभळट गुलाबी रंगाच्या असतात. 8 ते 12 फुले झुपक्याने येतात.

कागडा :

कागड्याची झाडे झुडपासारखी अथवा वेलीसारखी वाढतात. फुलांचा मुख्य बहर हिवाळयात येतो. फुले पांढऱ्या रंगाची असून ती झुपक्याने येतात. फुलांच्या कळया लांबट असतात. फुलांना मंद सुगंध असतो.

सायली :

सायलीची झाडे वेलीसारखी वाढतात. वेलींना हिवाळयात फुले येतात. फुले चांदणीच्या आकाराची आणि पांढऱ्याशुभ्र रंगाची असतात.

मोगरावर्गीय पिकाची अभिवृद्धी आणि लागवड पद्धती ।

मोगरावर्गीय फुलझाडांची अभिवृद्धी फाटे कलमाने करतात. फाटे कलमासाठी निवडलेली फांदी जोमदार वाढीची, पूर्ण पक्व आणि पेन्सिलीच्या जाडीची असावी. फांदी रोगट, कमकुवत आणि अतिजून अथवा अतिकोवळी नसावी. निवडलेल्या फांदीवरील मध्यभागातील 4 ते 5 डोळे असलेले 18 ते 20 सेंटिमीटर लांबीचे तुकडे फाटे कलमासाठी वापरावेत. फांदीवर छाट कलमासाठी काप घेताना बुडख्याकडील काप डोळयापासून 4 ते 5 मिलीमीटर अंतरावर घ्यावा तर शेंड्याकडील काप डोळयापासून 2 ते 2.5 सेंटिमीटर अंतरावर घ्यावा. फांदीपासून फाटे कलमे वेगळी केल्यानंतर पानांचे देठ तसेच ठेवून पाने काढून टाकावीत. फाटे कलमे तयार करून ती पाण्यात भिजत ठेवावीत. या कलमांना मुळया लवकर फुटण्यासाठी 5,000 पीपीएम तीव्रतेच्या आय. बी. ए. या संजीवकाच्या द्रावणात कलमांचे बुडखे 5 सेकंद बुडवून नंतर लागवड केल्यास मुळे लवकर व भरपूर फुटतात. फाटे कलमांची लागवड गादीवाफ्यावर किंवा पॉलिथीन पिशवीत करावी. लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी कलमांना मुळे फुटतात

आणि 60 ते 65 दिवसांनी मुळे फुटलेली ही कलमे मुख्य शेतात लागवडीसाठी योग्य होतात.
मोगरावर्गीय फुलझाडे बहुवर्षायु असून एकदा लागवड केल्यानंतर त्याच जागी 8 ते 10 वर्षे राहतात. लागवडीपूर्वी जमीन 2-3 वेळा उभी – आडवी नांगरून घ्यावी. पूर्वमशागत पूर्ण झाल्यानंतर जमिनीत हेक्टरी 15 ते 20 टन चांगले कुजलेले शेणखत आणि 25 ते 30 किलो फॉलीडॉल भुकटी मिसळावी. नंतर योग्य अंतरावर खड्डे घेऊन अथवा सपाट वाफे तयार करून रोपांची लागवड करावी. मोगऱ्यासाठी 60 x 60 x 60 सेंटिमीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. जाई, जुई, इत्यादी फुलझाडांसाठी 1X 1X 1 मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत.

मोगरावर्गीय पिकास योग्य हंगाम । मोगरावर्गीय पिकास योग्य लागवडीचे अंतर ।

मोगरावर्गीय फुलझाडांची लागवड उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा तिन्ही हंगामांत करता येते. मात्र कडक उन्हाळयात लागवड करू नये.

फुलझाडेलागवडीचे अंतरदर हेक्टरी
झाडांची संख्या
मोगराभारी जमीन 1.20 x 1.20 मीटर
मध्यम जमीन 1 x 1 मीटर
हलकी जमीन : 0.75 x 0.75 मीटर
6,944
10,000
17,777
जाई , जुईभारी जमीन : 2.5 x 2.5 मीटर
मध्यम जमीन 2 x 1.5 मीटर
हलकी जमीन : 1.8 x 1.8 मीटर
1,600
3,333
3,086
चमेली2 x 2 मीटर2,500
कुंदा1.8×1.8 मीटर3,086
मोगरावर्गीय फुलझाडांच्या लागवडीचे अंतर आणि हेक्टरी झाडांची संख्या

मोगरावर्गीय पिकास वळण । मोगरावर्गीय पिकास छाटणीच्या पद्धती ।

मोगरावर्गीय फुलझाडांची व्यापारी लागवड जास्त फायदेशीर होण्यासाठी वेलींवर नवीन फुटींचे प्रमाण जास्त असणे आवश्यक आहे. नवीन फुटींचे प्रमाण जास्त असल्यास फुले जास्त मिळतात. नवीन फुटी घेण्यासाठी वेलींच्या झुडपांची हलकी ते मध्यम प्रमाणात छाटणी

करणे आवश्यक असते. छाटणीची वेळ प्रत्येक जातीत वेगवेगळी असते. चमेलीच्या झाडाची छाटणी डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत करून झाडावर 9 ते 11 फांद्या ठेवाव्यात. प्रत्येक फांदी जमिनीच्या पातळीपासून 90 सेंटिमीटर उंचीवर पाठीमागे छाटावी. मोगरा, जुई व कुंदा या झाडांची छाटणी नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून जमिनीपासून 50 सेंटिमीटर उंचीवर करावी. रोगट किंवा वाळलेल्या फांद्या संपूर्णपणे काढून टाकाव्यात. नवीन येणाऱ्या फुटीवर भरपूर फुले येतात. छाटणी वेगवेगळया वेळी केल्यास फुलांच्या बहाराचा काळ लांबविता येतो. उशिरा छाटणी केल्यास फुलांचे उत्पादन घटते. नवीन फुटींची वाढ करून घेण्यासाठी आणि फांद्यांवरील पानगळ करून घेण्यासाठी काही संजीवकांचा वापर करता येतो.
लागवडीनंतर पहिल्या 4-5 वर्षांनी चमेलीच्या झाडावर 3,000 पीपीएम पेंटाक्लोरोफिनाल आणि 4,000 पीपीएम पोटॅशियम आयोडाईडची फवारणी करावी म्हणजे पाने गळतात आणि नवीन फुटी लवकर येतात. जुईच्या झाडावर 0.3 % पेंटाक्लोरोफिनाल व 0.8 % सोडियम क्लोराईडच्या (मीठ) द्रावणाची फवारणी करावी.
काही वेलींच्या फांद्या झपाट्याने वाढतात; परंतु या फांद्या कमकुवत असल्यामुळे त्या मुख्य खोडापासून खाली लोंबकळतात. अशा फांद्यांना बांबूचा आधार देऊन त्या मांडवावर चढवणे आवश्यक असते. त्यासाठी झाडाशेजारी बांबू अथवा मांडव बांधून त्यावर जमिनीवर पसरलेल्या फांद्या चढवाव्यात.

मोगरावर्गीय पिकास खत व्यवस्थापन । मोगरावर्गीय पिकास पाणी व्यवस्थापन ।

खते आणि पाणी देण्याच्या बाबतीत मोगरावर्गीय फुलझाडे दुर्लक्षित आहेत. निरनिराळ्या मोगरावर्गीय फुलझाडांच्या वाढीची व फुले येण्याची पद्धत व कालावधी वेगवेगळा आहे. काही मोगरावर्गीय फुलझाडे सदाहरित आहेत तर काहींची पानगळ होते. काही फुलझाडांना एक वेळा किंवा दोन वेळा तर काहींना वर्षभर फुले येतात. तसेच फुलझाडांना किती प्रमाणात खत द्यावयाचे हे जमिनीच्या मगदुरावर अवलंबून असते.
तीन वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या चमेलीच्या प्रत्येक झाडाला दरवर्षी 10 किलो शेणखत, 100 ग्रॅम नत्र, 150 ग्रॅम स्फुरद, 100 ग्रॅम पालाश द्यावे. नत्र, स्फुरद आणि पालाश तीन समान हप्त्यांत विभागून जानेवारी, एप्रिल आणि ऑगस्ट महिन्यांत द्यावे.

जुईच्या प्रत्येक झाडाला दर वर्षी 10 किलो शेणखत, 120 ग्रॅम नत्र, 240 ग्रॅम स्फुरद 240 ग्रॅम पालाश द्यावे. नत्रखत डिसेंबर आणि जून या महिन्यांत दोन समान हप्त्यांत विभागून द्यावे.
मोगऱ्याच्या प्रत्येक झाडाला 10 किलो शेणखत, 100 ग्रॅम नत्र, 150 ग्रॅम स्फुरद आणि 150 ग्रॅम पालाश द्यावे. नत्र, स्फुरद आणि पालाश या खतांच्या मात्रा दोन समान हप्त्यांत विभागून द्याव्यात. रासायनिक खते दिल्यानंतर झाडांना लगेच पाणी द्यावे.
फुलांचा हंगाम संपल्यानंतर मोगरावर्गीय फुलझाडांना पाणी देऊ नये. जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापासून पिकाला नियमित पाणी द्यावे.
जमिनीच्या मगदुराप्रमाणे हिवाळ्यात 12 ते 15 दिवसांनी तर उन्हाळयात 5 ते 8 दिवसांनी पाण्याच्या पाळया द्याव्यात. छाटणी करण्याच्या 20 ते 25 दिवस आधी बागेस पाणी देणे बंद करावे. त्यामुळे वेलींना विश्रांती मिळून पुढील हंगामात फुले येण्याच्या दृष्टीने त्यांची अंतर्गत वाढ होते. छाटणीनंतर पुन्हा पाण्याच्या नियमित पाळचा देणे सुरू करावे. जाई, जुई या फुलझाडांच्या तुलनेत मोगऱ्याला कमी पाणी लागते.

मोगरावर्गीय पिकातील आंतरपिके ।

मोगरावर्गीय फुलझाडांची लागवड केल्यानंतर त्यामध्ये भुईमूग, श्रावण घेवडा, पानकोबी, फुलकोबी यांसारखी कमी कालावधीत येणारी भाजीपिके घेता येतात.

मोगरावर्गीय पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।

मोगरावर्गीय फुलझाडांवर कळया पोखरणारी अळी, शेंडे पोखरणारी अळी, मावा, गॉलमाईट, इत्यादी किडींचा प्रादुर्भाव होतो.
कळया पोखरणारी अळी मोगऱ्याच्या कळया पोखरून त्यावर उपजीविका करते. त्यामुळे कळया उमलत नाहीत. उमललेल्या कळ्यांच्या पाकळ्या अर्धवट कुरतडलेल्या अवस्थेत राहतात. शेंडे पोखरणारी अळी झाडांचे कोवळे शेंडे पोखरते. त्यामुळे फांद्या वाळतात. मावा ही कीड पानांच्या मागील बाजूस राहून कोवळी पाने, देठ आणि कळयांमधील रस शोषून घेते. या किडींच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर एंडोसल्फॉन अथवा 10 मिलिलीटर डायमेथोएट या प्रमाणात फुलझाडांवर फवारावे. पिकावर कोळी कीटकांचा प्रादुर्भाव आढळल्यास 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर केलथेन (डिकोफॉल) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

मोगरावर्गीय पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।

मोगरावर्गीय फुलझाडांवर करपा, भुरी, मर रोग, तांबेरा, इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव होतो.
करपा रोगामुळे पानांवर लालसर तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके पडतात. रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास संपूर्ण वेलीवरील पाने गळून पडतात आणि फुलांचे उत्पादन 50 टक्क्यांनी कमी होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम ster एम-45 या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
तांबेरा रोगामुळे पानांच्या वरच्या बाजूस असंख्य फोड तयार होतात. त्यामुळे पाने पिवळसर रंगाची होऊन चुरगळतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी फुलझाडांवर 1% बोर्डो मिश्रण फवारावे. काही वेळा पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी पिकावर हेक्टरी 20 किलो गंधकाची भुकटी फवारावी.

मोगरावर्गीय पिकामधील तणांचे नियंत्रण ।

शेतातील तणे, अन्न, पाणी आणि सूर्यप्रकाश यांसाठी मुख्य पिकाशी स्पर्धा करतात. फुले काढणीच्या कामातही तणांचा अडथळा होतो. तणांमुळे रोग आणि किडींचाही मोठ्या प्रमाणात प्रसार होतो. म्हणून तणांचे नियंत्रण करण्यासाठी वर्षातून 3-4 वेळा खुरपणी आणि कोळपणी करावी. खुरपणीसाठी मजूर न मिळाल्यास तणांच्या नियंत्रणासाठी ग्रामोक्झोन (पॅराक्वॉट) हे तणनाशक 10 लीटर पाण्यात 50 मिलिलीटर या प्रमाणात मिसळून तणावर फवारावे.

मोगरावर्गीय फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

मोगरावर्गीय फुलझाडांना लागवडीच्या पहिल्या वर्षीच काही प्रमाणात फुले येतात. त्यानंतर पुढील वर्षी फुलांचे उत्पादन वाढते. तिसऱ्या वर्षापासून फुलांचे भरपूर उत्पादन मिळते. मोगरावर्गीय फुलझाडांना साधारणतः मार्च ते ऑक्टोबर या कालावधीत फुले येतात. जाईला वर्षभर फुले येतात. फुलांची काढणी हातानेच केली जाते. काढणी करताना फुलांची लागवड कोणत्या उद्देशाने केली आहे, याचा विचार करून फुलांची काढणी केव्हा करावी हे ठरवावे. वेणी, गजरा यांसाठी फुले उमलण्यापूर्वी म्हणजेच पूर्ण वाढ झालेल्या कळीच्या अवस्थेत फुलांची तोडणी करावी. पूजेसाठी, हारांसाठी किंवा सुगंधी अर्क काढण्यासाठी पूर्ण उमललेली फुले काढावीत. फुले वेचणीचे काम सकाळीच करावे. त्यामुळे फुले काढणीनंतर जास्त काळ टिकतात. तसेच फुलांपासून सुगंधी द्रव्य जास्त प्रमाणात मिळते. फुले येण्याच्या काळात आवश्यकतेनुसार दररोज किंवा एक दिवसाआड फुलांची काढणी करावी.
मोगऱ्याची लागवड केल्यानंतर पहिल्या वर्षापासून फुले येऊ लागतात. पीक 3 वर्षांचे झाल्यानंतर उत्पादन वाढते. मोगऱ्याचे झाड 10 ते 12 वर्षे चांगली फुले देते. मोगऱ्याचे दरवर्षी हेक्टरी सुमारे 8 ते 10 टन उत्पादन मिळते. तर जाई-जुईचे एका हंगामात हेक्टरी 3 ते 4 टन फुलांचे उत्पादन मिळू शकते. एक टन फुलांपासून सरासरी 2.8 ते 3 किलो सुगंधी द्रव्याचा उतारा मिळतो.
फुलांची प्रतवारी करून फुले बाजारपेठेत विक्रीसाठी पाठविली तरच पूर्णपणे मोबदला मिळविता येतो. फुले ताज्या टवटवीत स्थितीत बाजारात विक्रीसाठी पाठविणे अत्यंत महत्त्वाचे आहे. फुले नेहमी सकाळी लवकर बाजारपेठेत पाठवावीत.

मोगरावर्गीय फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण ।

मोगरावर्गीय फुले बाजारपेठेत पाठविताना प्रामुख्याने बांबूच्या करंड्या किंवा वेताच्या टोपल्या वापरतात. एकाच प्रकारची फुले शक्यतो एकाच टोपलीत भरावीत. वेताची टोपली घेऊन त्यात तळाशी केळीची अथवा कर्दळीची पाने अंथरावीत. मग फुले भरावीत. वर पुन्हा पाने ठेवून करंडी अथवा टोपली सुतळीने बांधावी. अशी व्यवस्थित पॅक केलेली फुले लगेच बाजारात पाठवावीत.
मोगरावर्गीय फुले काढणीनंतर 2-3 दिवसांपेक्षा जास्त दिवस टिकू शकत नाहीत. कळया काढणीनंतर जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी बहाराच्या वेळी झाडावर 25 पीपीएम जीए-3 ची फवारणी करावी. त्यामुळे फुलांचा सुगंधही दीर्घ काळ टिकून राहतो.

सारांश ।

मोगरावर्गीय फुलपिकांचे मोगरा, जाई, जुई, चमेली, सायली असे विविध प्रकार असून या फुलांना देशात तसेच परदेशात प्रामुख्याने आखाती देशांत मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मोगरावर्गीय फुलांतील अर्काचा उपयोग अत्तरे, सुवासिक तेले, सौंदर्यप्रसाधने, लिपस्टिक, साबण, इत्यादी बनविण्यासाठी केला जातो. त्यामुळेच मोगरावर्गीय फुलांच्या व्यापारी लागवडीस भरपूर वाव आहे.
मोगरावर्गीय फुलपिकांना प्रकारानुसार उष्ण, समशीतोष्ण, दमट, कोरडे असे निरनिराळ्या प्रकारचे हवामान लागते. सर्वसाधारणपणे दिवसाचे तापमान 25 ते 35 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 55 ते 65% असलेल्या भागात मोगरावर्गीय फुलझाडांची वाढ चांगली होते. भरपूर फुले येण्यासाठी मोगरावर्गीय झाडांची छाटणी करणे आवश्यक असते. फुलपिकाच्या प्रकारानुसार झाडांची छाटणी नोव्हेंबर – जानेवारी या काळात करावी.
मोगरावर्गीय फुलांची काढणी हातानेच केली जाते. वेणी, गजरा यांसाठी फुले उमलण्या- पूर्वी म्हणजेच पूर्ण वाढ झालेल्या कळीच्या अवस्थेत फुलांची तोडणी करावी. पूजेसाठी, हारासाठी अथवा सुगंधी अर्कासाठी पूर्ण उमललेल्या फुलांची काढणी करावी. मोगऱ्याच्या फुलपिकापासून दरवर्षी हेक्टरी 8 ते 10 टन फुले मिळतात. तर जाई-जुईच्या पिकापासून हेक्टरी 3 ते 4 टन फुले मिळतात. एक टन फुलापासून सरासरी 2.8 ते 3 किलो सुगंधी द्रव्याचा उतारा मिळतो.

जाणून घ्या गेलार्डिया लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Gaillardia Lagwad Mahiti Gaillardia Sheti) – Gaillardia Farming (Blanket Flowers)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )