मृत्यू नंतर आत्म्याचा प्रवास (Mrutu Nantar Aatmyacha Pravas)

गरुडपुराण

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास

1) जेव्हा शरिर सोङून जातो तेव्हा त्याला कळत असते काय की आपण शरिर सोङले आहे म्हणजे मृत्यू मिळाला आहे, त्याला आपल्या माणसांची आठवण येत असते काय ?असे म्हणतात त्यांना खुप वेगवेगळे प्रवास असतात, त्यामधे आपण सारखे आठवण काढत राहीलो तर त्यांना त्या प्रवासात त्रास होतो ?

उत्तर :-
प्रथम आपला स्थूल देह म्हणजे अन्नमय कोश गळुन पडतो पक्व झालेले झाडाचे फळ आपोआप जमिनीवर पडावे तसे.यावेळेस देहातील दहा प्राण क्रमाक्रमाने शरिरातुन बाहेर पडताच आत्मा चार कोषासह सूक्ष्म देह धारण करुन बाहेर पडतो तेंव्हा या देहाला मरण येते. आत्मा अजरामर आहे. देहा भोवतीच हा आत्मा घुटमळत असतो, घरात रडारड सुरु होते, शेवटी स्मशानभूमित या देहावर अग्नी संस्कार करतात, आपल्या जीवनातला तो शेवटचा यज्ञ असतो म्हणून याला अंतेष्टी म्हणतात. अंत म्हणजे शेवटचा आणि इष्टी म्हणजे यज्ञ.अंतेष्टीच्या वेळेस जे मंत्र म्हंटले जातात त्याचा अर्थ असा आहे की , मेलेल्या व्यक्तिला संबोधुन मंत्र आहेत, कारण आत्मा तिथे हजर असतो व तो हे सर्व पहात असतो. तेंव्हा त्या मंत्राचा आशय असा आहे की आता तुमचा या देहाशी काहीही संबंध राहीलेला नाही, तुम्ही आता पुढच्या मार्गाला जा. याला गती प्राप्त होणे म्हणतात.

आता आम्ही तुमचा हा देहसुद्धा जाळुन टाकणार आहोत असे म्हणून त्या प्रेतावर संस्कार करतात, जो संस्कार करणारा असतो तो आपल्या डाव्या खांद्यावर पाण्याने भरलेला माठ घेवुन प्रेताला अपसव्य म्हणजे डावि प्रदक्षिणा घालतो , यावेळेस एका दगडाने खांद्यावरिल मडक्याला एक भोक पाडतात, अशा तिन प्रदक्षिणा करुन प्रेताच्या मस्तकाजवळ उभे राहून ज्या दगडाने माठाला छिद्र पाडले गेले तो दगड खांद्यावर माठ असणाऱ्याच्या मागे ठेवतात, मग त्या दगडावर खांद्यावरील माठ मागे सोडून देतात, तेव्हा त्या माठाचा फ sss ट् असा आवाज होवुन तो फुटतो यालाच घटस्फोट असे म्हणतात. (आता नवरा जिवंत किवा बायको असतानाच घटस्फोट घेतला जातो) या ठिकाणी डाव्या मनगटाने बोंब मारली जाते आणि सांगितले जाते की तुमचा आमचा संबंध संपला आता तुम्ही इथुन जा.

मग तो दगड गळ्यात घातलेल्या वस्त्रामधे बांधतात याला अश्मा असे म्हणतात. त्या नंतर प्रेताला जाळले जाते. आत्मा हे सगळं पहात असतो , त्याला आपला देह जळताना पाहुन वाईट वाटते, त्याला रडायला येते , (येथे अशी कुणी शंका घेवु नये की आत्मा रडतो का ? तर आत्मा अजुनही चार कोषामधे बद्ध आहे व यात मनोमय कोष असल्यामुळे वासना, भावना असतात) प्रेताला अग्नी दिल्यावर आपण घरी येतो, तो आत्माही आपल्या सोबत घरी येतो, मात्र तो फडक्यात बांधलेल्या अश्म्यावर बसतो म्हणून फडक्यात बांधलेला अश्मा दाराच्या बाहेर ठेवतात, दहा दिवस हा आत्मा तिथे बसलेला असतो.

घरात दक्षिणेकडे कडे तोंड करुन दिवा लावला जातो याला नमस्कार करुन आलेली मंडळी निघुन जातात. घरातिल माणसं अंघोळ करुन पिठलं भात खायला मोकळी होतात.अश्मा घराबाहेर ठेवतात, आलेली मंडळी दिव्याला नमस्कार करून निघुन जातात व घरातील मंडळी पिठलं भात खावुन दुःख करित बसतात.

पुढे अशी अंधश्रद्धा आहे की मेलेल्या व्यक्तीला पुढील मार्ग दिसावा म्हणून दिवा लावतात व त्या दिव्याखाली राख किंवा पीठ पसरून ठेवतात, कारण त्या दिव्याखालील पिठावर किंवा राखेवर, गेलेल्या माणसाला कोणता जन्म मिळाला त्याची पावलं उमटतात असा सर्वदूर समज आहे, पण हा समज पूर्णतः चुकीचा आहे. लगेच त्याला दुसरा जन्म मिळत नाही त्याचि प्रक्रिया आहे, ती आपण पुढे पहाणार आहोत.

आता हा जो दिवा लावला जातो तो दिवा म्हणजे मृत व्यक्तीचे प्रतिक आहे, आत्ता फोटो काढण्याची व्यवस्था आहे, म्हणून गेलेल्या व्यक्तीचा फोटो लावला जातो पण पुरातन काळी फोटो काढायची सोय नव्हती म्हणून त्या आत्म्याचे प्रतीक, आत्मज्योत म्हणून पणती मधे ती ज्योत दहा दिवस तेवत ठेवतात, कारण दहा दिवस आत्मा घराबाहेच्या अश्म्यावर असतो आणि दहा दिवसा नंतरच त्याचा पुढचा प्रवास सुरू होतो.

त्या दहा दिवसांत अनेक नातेवाईक, मित्र मैत्रीणी, परिवार भेटायला येतात, घरातील मंडळी रडत असतात, आलेली मंडळी गेलेल्या व्यक्ती बद्दल घरात चांगलं बोलतात बाहेर पडले की नको ते बोलतात, हे सगळं तो आत्मा पहात असतो, ऐकत असतो. आपल्या बद्दल कोण खरंखोटं बोलतो, कोण खरंखोटं रडतो हे सगळं त्याला कळत आसतं त्यामुळे त्याला खुप दुःख होतं व रडायला येतं. या दहा दिवसाच्या आत प्रेताची रक्षा व अस्थीचं विसर्जन वहात्या पाण्यात मातीच्या किंवा तांब्याच्या कलशातुन कलशासकट करावं .

दहाव्या दिवशी त्या अश्म्याला घेवुन घाटावर जातात तेथे अग्नी देणाऱ्याने क्षौर करावे म्हणजे दाढी, मिशा व डोक्यावरील केस काढावेत, या घाटावर जो विधि केला जातो तो म्हणजे काय असतो ? दहाव्या दिवशी ज्या अश्म्यावर आत्म्याचा वास असतो तो अश्मा घेवुन घाटावर येतात, क्षौर करतात आणि त्या आत्म्याला सद् गती मिळण्यासाठी संस्कार करतात

2) क्षौर का करतात ?

जेव्हा आपण एखादे पुण्य कर्म करतो, एखादे व्रत करतो, अनुष्ठाण करतो तेंव्हा क्षौर करावे, कारण आपला देह शुद्ध करूनच अशी कर्मे करावीत.

आपण कळत नकळत दररोज अनेक प्रकारची पापं करत असतो आणि आपण केलेली पापे आपल्या देहात आपल्या केसाला धरून घट्ट बसतात म्हणून दर पौर्णिमेला व अमावास्येला प्रत्येकाने क्षौर करावे. अजुनही संन्यासी दर अमावस्या व पौर्णिमेला क्षौर करतात. पण आता केस वाढवायची फँशन आहे,

एखाद्या प्रसिद्ध हिरोने डोक्याचा गोटा केला आणि दाढिमिशा भादरल्या की आमचे सगळे हिंदू तरूण आपलं डोकं भादरून मिशी काढून टाकतिल, बाप जिवंत असताना सुद्धा. थोडक्यात एका जीवाला सद् गती देणं हे सुद्धा पुण्य कर्मच आहे. त्या मागचा दुसरा हेतु हा असतो की, गेलेल्या माणसा बद्दलची कृतज्ञता, भावना, प्रेम मुंडण करून व्यक्त करण्याची प्रथा आहे.

दहाव्या दिवशी तीन पिंड करून त्याच्या शेजारी हा अश्मा ठेवतात व मंत्रयुक्त त्या आत्म्याला पिंडामधे विलीन करतात आणि त्याना असे सांगितले जाते की तुमचा दैह जाळुन टाकला आहे, तुमच्या नावाने क्षौर केले आहे आता तुमचे येथे काहीही शिल्लक राहिलेले नाही आता तुम्ही पुढच्या मार्गाने सद् गतीला जा अशा आशयाचा तो विधी केल्यानंतर तो पिंड एका बाजुला नेवुन ठेवतात.

जर त्या आत्म्याची वासना कशातच राहिली नसेल तर पटकन् कावळा त्या पिंडाला शिवतो अन्यथा तासंतास गेले तरी शिवत नाही. कारण आत्मा त्या पिंडावर बसलेला असतो व तो कावळ्याला जवळ येवु देत नाही. कावळा आणि कुत्रा हे दोनच प्राणी असे आहेत की त्याना मृत्यू व आत्मा दिसतो, म्हणून कुणी मरणार असेल तर तिथले कुत्री भेसुर रडतात. कावळा शिवल्या नंतर मग सगळे त्या अश्म्याला म्हणजे दगडाला अंगठ्या वरून पाणी देतात याला तर्पण असे म्हणतात……

3) अंगठ्या वरूनच पाणी का देतात ?

त्याचे उत्तर असे आहे की, देवाला, ऋषी, आणि पितर यांना जे पाणी दिले जाते त्याला तर्पण असे म्हणतात. आपल्या हाताची पाच बोटं आहेत त्यातील अंगठा आणि अंगठ्या शेजारील पहिले बोट ज्याला तर्जनी म्हणतात, ही दोन बोटे पितरांकरता वापरावीत, मधले बोट स्वतःच्या कपाळाला गंध किंवा कुंकू लावण्या करता वापरावे, करंगळीच्या शेजारचे बोट आनामिका याने देवाला, गुरुंना, साधुसंताना गंध लावावे. म्हणून देवाला तर्पण करताना सरळ हातावरून पाणी द्यावे, ऋषींना तर्पण करताना करंगळी च्या बाजुने तिरकी ओंजळ करून पाणी द्यावे, आणि पितरांना अंगठ्याच्या बाजुने तिरपा हात करून पाणी द्यावे.

4) हल्लीच्या धावपळीच्या जिवनात समजा जर आपल्या अगदी जवळचे कोणी निवर्तले व सुतक असेल तर, सुतक असलेल्या व्यक्तिने सुतकात त्याचे व्यवसाय अथवा कार्यालयात जाऊन त्याचे कर्तव्य करणे जरूरीचे असेल तर त्याने करावे का ?

सुतकामधे घरातील देवपूजा व कोणतेही मंगल कार्य करू नये अथवा कुठल्याही मंगल कार्यास जावु नये, कुठल्याही देवळात जावु नये मात्र देवतेचे बाहेरून दर्शन घ्यायला हरकत नाही. आपला जो नित्यनियम आहे तो करावा, उदाहरणार्थ हरिपाठ वाचन, गायत्री मंत्र सोडुन ईतर नामजप, कीर्तन, प्रवचन करण्यास हरकत नाही. नित्याची नोकरी, कामधंद्यास जायला हरकत नाही मात्र जाने अग्नी दिला आहे त्याने वरील कोणत्याही गोष्टी करू नये व दहा दिवस घराबाहेर पण जावु नये. सुतकामधे पलंग, गादीवर झोपु नये, चहा सोडुन कुठलेही गोड पदार्थ खावु नये, दररोज अंघोळ करावी मात्र कपाळाला तिलक लावु नये, अत्तर अथवा स्प्रे पर्फ्युम वापरू नये, नवीन वस्त्र परिधान करू नये, बाकी नित्याचे व्यवहार चालु ठेवावेत.

दहाव्या व अकराव्या दिवशी घरातील सर्वांनी डोक्यावरून अंघोळ करावी, सुतकातील सर्व कपडे धुवावेत, आणि घरात सगळीकडे गोमूत्र शिंपडावे. अकराव्या दिवशी कपाळाला कुंकू, टिकली गंध लावावे. या आत्म्याला पुढील गतीकरता अकरावा, बारावा, व तेराव्या दिवशीचे विधी करावेत.

चवदाव्या दिवशी घरात निधनशांत व उदकशांत करावी आणि मगच घरातील देवपूजा करावी. त्या दिवशी खांदेकर्यांना नातेवाईकांना गोडाचे भोजन द्यावे. संध्याकाळी अग्नी देणाऱ्याने डोक्यावर नविन टोपी घालावी, खांद्यावर टॉवेल किंवा उपरणे घ्यावे व शंकराच्या मंदिरात जावुन गाभार्यात तुपाचे निरांजन लावुन ठेवावे, शंकर ही मृत्यूची देवता आहे, आत्म्यास सद्गती प्राप्त व्हावी व कुटुंबातील सर्वांचे रक्षण करावे अशी प्रार्थना करून डोक्यावरील टोपी व खांद्यावरील उपरणे तेथेच काढुन ठेवावे, लावलेले निरांजन घरी आणु नये.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )