निशिगंध लागवड | Nishigandh Lagwad | Nishigandh Sheti | निशिगंध लागवडीचे महत्त्व ।निशिगंध लागवडीखालील क्षेत्र । निशीगंधाचे उत्पादन ।निशिगंध पिकास योग्य हवामान । निशिगंध पिकास योग्य जमीन । निशिगंधाच्या जाती ।निशिगंध पिकाची अभिवृद्धी । निशिगंध पिकाची लागवड पद्धती ।निशिगंध लागवड हंगाम । निशिगंध लागवडीचे अंतर ।निशिगंध खत व्यवस्थापन । निशिगंध पाणी व्यवस्थापन ।निशिगंध पिकातील आंतरपिके । निशिगंध पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।निशिगंध पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । निशिगंध पिकातील तण आणि त्यांचे नियंत्रण ।निशिगंधाच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।निशिगंधाच्या कंदांची काढणी आणि साठवण ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
निशिगंध लागवड | गुलछडी लागवड । Nishigandh Lagwad | Nishigandh Sheti |
भारतात बहुतेक राज्यांतून मर्यादित स्वरूपात फुलशेती केली जाते. यात प्रामुख्याने बिनदांड्याच्या फुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. निशिगंध हेसुद्धा अशाच गटातील फुलपीक असले तरी त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे, सुवासिकपणामुळे आणि लांब दांड्यावर उमलणाऱ्या पांढऱ्याशुभ्र फुलांमुळे ह्या फुलपिकाला भारतात तसेच परदेशी बाजारपेठांतही चांगली मागणी आहे. याशिवाय बागेतील शोभा वाढविण्यासाठी तसेच बागेतील, परिसरातील, घराभोवतालचे वातावरण सुगंधी आणि प्रसन्न राखण्यासाठी या फुलझाडाची लागवड केली जाते. निशिगंधाच्या फुलांत नैसर्गिक सुवास असल्यामुळे या फुलांतून सुवासिक तेल काढता येते. त्यामुळे औद्योगिक दृष्टीनेही हे महत्त्वाचे फुलपीक आहे. या सुगंधी द्रव्यांचा उपयोग औषधे, सुवासिक तेले, अत्तरे, साबण, इत्यादींसाठी करतात. परदेशात या तेलाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
निशिगंध लागवडीचे महत्त्व । Importance of Nisigandha Cultivation।
निशिगंध हे बहुवर्षीय फुलझाड आहे. निशिगंधाच्या पिकाला रजनीगंधा अथवा गुलछडी असेही म्हणतात. भारतात निशिगंधाचे फूल फार महत्त्वाचे मानले जाते. कारण एकदा लागवड केल्यानंतर त्याच लागवडीपासून 3 ते 4 वर्षांपर्यंत फुले मिळतात. निशिगंध हे कंदवर्गीय फुलझाड आहे. निशिगंधाच्या लावलेल्या कंदापासून असंख्य फुटवे फुटून एका वर्षातच अनेक रोपे मिळतात. निशिगंधाचे फुलपीक 17 व्या शतकात मेक्सिको या देशातून युरोपमार्गे भारतात आले. भारतातील उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. भारतात बहुतेक सर्व राज्यांत निशिगंधाची लागवड केली जाते. निशिगंधाच्या झाडाला 20-25 पाने फुटून आल्यानंतर त्यांच्या मध्यातून लांब फुलदांडा निघतो. फुलदांडा 50 ते 100 सेंटिमीटर उंचीचा असतो. या फुलदांड्यावर 25 ते 30 जोडफुले येतात व ती क्रमाक्रमाने खालून वर उमलत जातात. उमललेली फुले पांढऱ्या रंगाची आणि अत्यंत सुवासिक असतात. म्हणून या फुलांचा उपयोग प्रामुख्याने वेणी, गजरा, पुष्पहार, गुच्छ, लग्नमंडपावरील सुशोभित आरास आणि मुकुटांवर खोवण्यासाठी केला जातो. लांब दांड्याची फुले फुलदाणीत पुष्परचना करण्यासाठी वापरतात.
यामुळे निशिगंधाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. फुले वर्षभर येतात व त्यांना चांगला बाजारही मिळतो. असे असले तरी निशिगंधाची बिनदांड्याची फुले काढणीनंतर अतिशय कमी काळ टिकतात. म्हणून निशिगंधाची लागवड साधारणपणे मोठ्या शहरांच्या जवळपास, वाहतुकीच्या सोईने शहरांशी जोडलेल्या रस्त्यांच्या जवळपासच्या भागात आढळते. निशिगंधाच्या नुकत्याच उमललेल्या फुलांमध्ये दुर्मिळ असे उत्तम प्रतीचे सुवासिक तेल (अर्क) असते. ह्या तेलाचा उपयोग औषधव्यवसायात तसेच सुवासिक तेले, साबण, पावडर, स्नो, शॅम्पू यांमध्ये केला जातो. निशिगंधाच्या तेलाचा दर्जा गुलाबाच्या अत्तरा- इतकाच चांगला असतो, यामुळे काही शेतकरी निशिगंधाच्या लागवडीकडे आकर्षित होत आहेत.
गुलछडी अथवा निशिगंधाची सोपी व सुटसुटीत लागवडीची पद्धत, वर्षभर मिळणारी फुले, त्यामुळे उपलब्ध होणारा रोजगार, बाजारातून बारमाही मागणी, सतत चांगला भाव, रोग व किडींचा कमी प्रादुर्भाव, औद्योगिक महत्त्व यांमुळे या पिकाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.
निशिगंध लागवडीखालील क्षेत्र । निशीगंधाचे उत्पादन । Area under Nisigandh cultivation.। Nisigandh production. ।
मेक्सिको हा देश निशिगंधाचे उगमस्थान असून मेक्सिकोमधून त्याचा प्रसार प्रथम युरोपात इंग्लंड, हॉलंड, फ्रान्स, इटली आणि स्पेन या देशांत झाला. नंतर भारत, केनिया, मोरोक्को या देशांत निशिगंधाची लागवड केली गेली. भारतात निशिगंधाची लागवड मुख्यतः पश्चिम बंगाल, कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामीळनाडू या राज्यांत होते. भारतात निशिगंधाची लागवड सुमारे 20,000 हेक्टर क्षेत्रावर होते. महाराष्ट्रात 3,000 हेक्टर क्षेत्र या फुलपिकाखाली आहे. पुणे, अहमदनगर, नाशिक, सोलापूर, सांगली, ठाणे, औरंगाबाद या जिल्ह्यांत निशिगंधाची लागवड मोठ्या प्रमाणावर होते.
निशिगंधाच्या मोहक आणि सुवासिक फुलांमुळे त्यांचा रोजच्या जीवनातील वापर वाढत असून या फुलांना बाजारात वर्षभर चांगली मागणी व भाव असतो. म्हणून या पिकाचे क्षेत्रही झपाट्याने वाढत आहे.
निशिगंध पिकास योग्य हवामान । निशिगंध पिकास योग्य जमीन । Suitable climate for Nisigandh crop.। Nisigandha suitable land for crop. ।
निशिगंधाच्या पिकाला उष्ण आणि काही प्रमाणात दमट हवामान चांगले मानवते. अती उष्ण (40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त) किंवा अती थंड (10 अंश सेल्सिअसपेक्षा कमी) तापमान निशिगंधाच्या पिकास अपायकारक ठरते. यामुळे झाडांची वाढ खुंटते. झाडे नीट वाढत नाहीत आणि फुले येण्याचे प्रमाण कमी होते. म्हणून साधारणपणे 25 ते 30 अंश सेल्सिअस तापमान आणि 50-55% आर्द्रता असलेल्या भागात निशिगंधाची चांगली वाढ होते आणि जास्त उत्पादन मिळते. अती थंड आणि धुके पडणाऱ्या ठिकाणी निशिगंधाच्या पिकाची वाढ नीट होत नाही. पिकाच्या चांगल्या जोमदार वाढीसाठी भरपूर स्वच्छ सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. अन्यथा झाडे नीट वाढत नाहीत आणि फुले चांगल्या प्रतीची मिळत नाहीत. थंडीची लाट अथवा अती उष्ण वारे या पिकाला सहन होत नाहीत. कडक उन्हात पाने गळणे, कळचा सुकणे, फुले लवकर उमलणे असे प्रकार पिकावर होतात. महाराष्ट्रातील बहुतेक सर्वच ठिकाणचे हवामान निशिगंधाच्या पिकाला चांगले आहे.
निशिगंधाचे पीक कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगले येते. क्षारयुक्त जमिनीतही निशिगंधाचे पीक घेता येते. उथळ आणि हलक्या जमिनीत निशिगंधाचे फुलदांडे आणि फुले लहान राहतात आणि पिकाचा हंगामही थोड्याच दिवसांत संपतो. भारी काळया जमिनीत मर आणि कूज रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो. फुलांसाठी जांभ्या दगडाच्या वाळूमिश्रित आणि सामू 6.5 ते 7 असलेल्या जमिनीत निशिगंधाची लागवड करावी. जमीन पाण्याचा निचरा होणारी आणि भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली असावी.
निशिगंधाच्या जाती । Varieties of Nisigandha.।
निशिगंधाच्या जातींचे फुलांच्या प्रकारानुसार सिंगल, डबल, सेमिडबल आणि व्हेरिगेटेड असे चार प्रकार पडतात.
सिंगल निशिगंध :
या प्रकारातील फुले पांढरीशुभ्र असून अत्यंत सुवासिक असतात. फुलांमध्ये फक्त 5 पाकळया असून त्या आकर्षकरित्या एकाच वर्तुळाकार ओळीत असतात. या प्रकारची फुले हार, वेणी, गजरा, माळा यांसाठी विशेष योग्य असतात. परंतु काही वेळा गुच्छ आणि फुलदाणीत ठेवण्यासाठीही फुले वापरतात. उदाहरणार्थ, मेक्सिकन सिंगल, कलकत्ता सिंगल.
डबल निशिगंध :
या प्रकारातील जातींचा फुलदांडा भरपूर जाड असतो. फुलांमध्ये पाकळयांची संख्या 10 पेक्षा जास्त असते आणि पाकळया 3-4 घेरांमध्ये असतात. फुलांचा रंग फिकट पांढरा असतो. या प्रकारातील जातीच्या फुलदांड्यांना वास कमी असतो; मात्र दांडा भरपूर जाड असतो. या प्रकारातील जातींचे फुलदांडे फुलदाणीत ठेवण्यास आणि परदेशात पाठविण्यास योग्य असतात. उदाहरणार्थ, कलकत्ता डबल, पर्ल, ड्वार्फ पर्ल, एक्सेलसियर
सेमिडबल निशिगंध :
या प्रकारातील फुलात 5 पाकळ्यांची एकात एक दोन वर्तुळे असून 10 पाकळ्या असतात. कळीच्या टोकाला गुलाबी छटा असते. कळी उमलताना पांढरीशुभ असते. फुलदाणीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी या प्रकारातील जाती उपयुक्त आहेत.
व्हेरिगेटेड निशिगंध :
या प्रकारातील जातींची फुले सिंगल प्रकारासारखीच असतात; मात्र पानांवर पांढरट-पिवळे पट्टे असतात. रंगीत पानांमुळे झाड अधिक शोभिवंत दिसते. हा प्रकार कुंड्यांत अथवा बागेत रस्त्याच्या कडेला लावण्यासही जास्त प्रमाणात वापरतात.
याशिवाय राष्ट्रीय बागवानी संशोधन संस्था, बंगलोर यांनी अनुक्रमे सिंगल प्रकारात श्रींगार तर डबल प्रकारात सुहासिनी या जातींची शिफारस केलेली आहे आणि त्यातील श्रींगार हा प्रकार दोन्ही उद्देशांसाठी म्हणजे सुटी फुले व लांब दांड्याच्या कटफ्लॉवर्ससाठी उत्तम असल्याचे पुणे केंद्रातील प्राथमिक चाचणीत आढळून आलेले आहे. तसेच राष्ट्रीय वनस्पती केंद्र, लखनौ यांनी सुवर्णरेखा व रजतरेखा अशा दोन जातींची शिफारस केलेली आहे. रंगीत गुलछडी अजून वनस्पती पैदासकारांना तयार करता आलेली नाही. परंतु कृत्रिम रंगांनी पिवळा, निळा, तांबडा अशी ती सजविता येते.
निशिगंध पिकाची अभिवृद्धी । निशिगंध पिकाची लागवड पद्धती । Nisigandh crop growth. । Cultivation method of Nisigandh crop.।
निशिगंधाची अभिवृद्धी बियांपासून तसेच जमिनीत वाढणाऱ्या सुप्त कंदांपासून लागवड करून करतात. मात्र निशिगंधाची व्यापारी लागवड कंदांपासूनच केली जाते. निशिगंधाच्या लागवडीसाठी कंद निवडताना आधीच्या पिकाचे नीट निरीक्षण करणे आवश्यक असते. कारण या पिकातूनच फुलांचा हंगाम संपल्यानंतर बेण्याची निवड केली जाते. म्हणून ज्या पिकातून बेणे निवडायचे ते रोगमुक्त आणि चांगले उत्पादन देणारे असणे आवश्यक आहे. मूळ मातृकंदाभोवती लहानमोठे बरेच कंद असतात. या सर्व समूहाला इंग्रजीत क्लम्प असे म्हणतात. या सर्व समूहाचा उपयोग करून निशिगंधाची लागवड केली जाते. परंतु लहानमोठ्या आकाराच्या कंदांमुळे येणारे पीक एकसारखे न वाढता कमीअधिक प्रमाणात वाढते आणि उत्पादन कमी मिळते. शिवाय मर्यादित क्षेत्रच त्यामुळे लावता येते. हे टाळण्यासाठी समूहाने लागवड करण्यापेक्षा स्वतंत्र कंदाची लागवड करावी. यासाठी मूळ मातृकंदाभोवती असलेले सर्व लहानमोठे कंद वेगवेगळे ठेवावेत. आधीच्या पिकातील निवडलेले क्षेत्र खोल खणून कंदसमूह सावलीत दोन आठवडे पसरवून ठेवावेत. नंतर त्यामधून सारख्या आकाराचे 3 सेंटिमीटर व्यासाचे कंद लागवडीसाठी निवडावेत. अशा कंदाचे वजन साधारणपणे प्रत्येकी 15 ग्रॅम असते. साधारणपणे उभट, त्रिकोणी कंद लागवडीसाठी निवडावेत. असे कंद वापरल्यास फुले लवकर मिळतात. फुलांचा दांडा लांब मिळून फुलांची संख्याही जास्त मिळते. 10 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे लहान कंद लागवडीसाठी वापरल्यास फुले उशिरा लागतात; तर 30 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे मोठे कंद लागवडीसाठी वापरल्यास फुले लवकर येतात. 15 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचे कंद वापरल्यास 50 ते 60 दिवसांत फुले येतात; तर 10 ग्रॅम किंवा त्यापेक्षा कमी वजनाचे कंद वापरल्यास फुले येण्यास 200 ते 250 दिवस लागतात. 30 ग्रॅमपेक्षा जास्त वजनाचे कंद वापरल्यास फक्त 40 दिवसांत फुले येतात. पर्यायाने त्यांची गुणवत्ता चांगली मिळत नाही. कंदांना काही काळ साठवणीची प्रक्रिया दिल्यास अथवा लागवडीपूर्वी संजीवकांमध्ये बुडवून लागवड केल्यास त्यांच्या सुप्तावस्थेचा काळ कमी होतो व कंद लवकर उगवतात. यासाठी जिबरेलिक अॅसिड, थायोयुरिया, इथ्रेल, इत्यादी संजीवकांचा चांगला उपयोग होतो. त्यासाठी 100 ते 200 पीपीएम थायोयुरिया वापरावे. लागवडीसाठी निवडलेल्या कंदांना लागवडीपूर्वी बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी. त्यासाठी निवडलेले कंद 0.2% तीव्रतेच्या ताम्रयुक्त बुरशीनाशकात 15 मिनिटे बुडवून कंद सावलीत वाळवावेत आणि मग लागवडीसाठी वापरावेत. निशिगंधाची लागवड करण्यासाठी सरी-वरंबा अथवा सपाट वाफे पद्धतीने शेताची आखणी करून त्यात लागवड करावी. जमीन जर हलकी, पाण्याचा चांगला निचरा होणारी असेल तर सपाट वाफे वापरावेत. जमीन मध्यम आणि पाण्याचा कमी निचरा होणारी असल्यास सरी-वरंबा पद्धत वापरावी.
लागवड करण्यासाठी निवडलेल्या बागेतील जमीन उभी-आडवी खोल नांगरून कुळवाच्या दोन उभ्या-आडव्या पाळ्या घालून ती भुसभुशीत करावी. हेक्टरी 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. जमिनीच्या पोताप्रमाणे, उताराप्रमाणे भारी जमिनीसाठी सरी-वरंबे अथवा हलक्या जमिनीसाठी सपाट वाफे तयार करावेत. वाफे शक्यतो 3 मीटर लांब आणि 2 मीटर रुंद आकाराचे करावेत.
निशिगंध लागवड हंगाम । निशिगंध लागवडीचे अंतर । Nisigandha planting season.। Nisigandha planting distance.।
निशिगंध उष्ण कटिबंधातील बहुवर्षीय फुलझाड असून एकदा लागवड केल्यानंतर त्याच शेतात सतत तीन-चार वर्षे पीक ठेवता येते. काही ठिकाणी प्रत्येक वर्षी नवीन लागवड केली जाते. निशिगंधाची लागवड जास्त पावसाचा काळ (जून-जुलै) आणि अतिथंडीचे महिने (नोव्हेंबर – डिसेंबर) वगळता पाण्याची उपलब्धता असल्यास वर्षभर केव्हाही करता येते. वर्षभर सतत फुले मिळविण्यासाठी निशिगंधाची जानेवारी-फेब्रुवारी, मे- जून आणि सप्टेंबर- ऑक्टोबर या महिन्यांत लागवड करावी.
निशिगंधाची सरी-वरंब्यावर लागवड करताना 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या काढून प्रत्येक वरंब्याच्या दोन्ही बाजूंस 20 ते 30 सेंटिमीटर अंतरावर कंदांची लागवड करावी. सपाट वाफ्यात लागवड करताना दोन ओळींत 20 ते 30 सेंटिमीटर आणि दोन कंदांमध्ये 15 ते 25 सेंटिमीटर अंतर राखून करावी.
लागवडीपूर्वी निवडलेल्या बेण्याला बुरशीनाशकाची प्रक्रिया देऊन सपाट वाफ्यात 20 ते 30 सेंटिमीटर अंतरावर प्रत्येक ठिकाणी एक चांगला कंद लावावा. कंद लावताना 5 ते 6 सेंटिमीटर खोल जमिनीत पुरवावा. त्याचा निमुळता भाग वरच्या बाजूस राहील असे पाहावे आणि त्याला मातीने झाकून टाकावे. लागवडीनंतर शेतास त्वरीत पाणी द्यावे. सरी-वरंबा पद्धतीमध्ये लागवड करावयाची झाल्यास 60 सेंटिमीटर अंतरावर सऱ्या काढून प्रत्येक ठिकाणी एक कंद ठेवावा. निशिगंधाच्या लागवडीसाठी हेक्टरी साधारणपणे 1,200 ते 1,500 किलो बियाणे म्हणजेच 60 ते 70 हजार कंद पुरेसे होतात.
निशिगंध खत व्यवस्थापन । निशिगंध पाणी व्यवस्थापन । Management of contaminated manure.। Management of polluted water.।
निशिगंध हे कंदवर्गीय पीक असल्यामुळे खतांना चांगला प्रतिसाद देते. तसेच वेगवेगळ्या जमिनीत आणि हवामानात हे पीक वेगवेगळा प्रतिसाद देते. निशिगंधाच्या लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करताना 40 ते 50 टन चांगले कुजलेले शेणखत मिसळावे. शेणखत उपलब्ध नसल्यास लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीत प्रथम पावसाळयात तागासारखे हिरवळीचे पीक लावावे. ते पावसाळयात फुलण्यापूर्वी जमिनीत गाडावे आणि चांगले कुजल्यानंतर निशिगंधाची लागवड करावी. निशिगंधाच्या पिकाला नत्रखतापेक्षा स्फुरद आणि पालाश खत जास्त प्रमाणात लागते. म्हणून हेक्टरी 100 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश दिल्यास निशिगंधाचे जास्त उत्पादन मिळते. संपूर्ण स्फुरद आणि पालाश आणि नत्राचा एकचतुर्थांश हप्ता लागवडीच्या वेळी द्यावा. राहिलेले नत्र तीन समान हप्त्यांत लागवडीनंतर 30, 60 आणि 90 दिवसांनी द्यावे.
लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. दुसरे पाणी 5-7 दिवसांनी द्यावे. त्यानंतर पावसाळयात पाऊस नसेल तर 10 ते 12 दिवसांनी, हिवाळयात 8-10 दिवसांनी तर उन्हाळयात 5-6 दिवसांनी, जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे. फुलांचे दांडे येण्यास सुरुवात झाल्यावर पाणी नियमित द्यावे. या वेळी पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या उत्पादनावर अनिष्ट परिणाम होतो.
निशिगंध पिकातील आंतरपिके । Intercropping in Nisigandh crop.
निशिगंध हे कमी अंतरावर लावले जाणारे फुलपीक असल्यामुळे निशिगंधाच्या पिकात आंतरपिके सर्वसाधारणपणे घेतली जात नाहीत. परंतु शहरी भागाजवळ फुलशेती असल्यास वाहतुकीची रोजची सोय असल्यास मेथी, कोथिंबीर, मुळा यांसारखी लवकर येणारी भाजीपाला पिके पाटाच्या कडेने अथवा सपाट वाफ्याच्या आतील कडेच्या बाजूने घेता येतात.
निशिगंध पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । Important pests of Nisigandha crops and their control.
नाकतोडे :
नाकतोडे निशिगंधाची कोवळी पाने तसेच कोवळे फुलदांडेही खातात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 33 मिलिलीटर डायमेथोएट (रोगोर 30% प्रवाही) अथवा 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन मिसळून फवारावे.
पाने कुरतडणाऱ्या अळया :
ह्या अळया रात्रीच्या वेळी निशिगंधाच्या कोवळया खोडावर आणि पानांवर राहून अन्नरस शोषण करतात. विशेषतः पानांच्या कडा कुरतडून त्यांतील रस शोषून घेतात आणि त्यामुळे पाने कातरलेली दिसतात. ही अळी मुळांवरही आढळते. कंदाचा आतील भाग खाऊन अळी कंदामधून बोगदे तयार करते.
उपाय : या अळीच्या नियंत्रणासाठी पिकावर कार्बारिल भुकटी (10%) प्रति हेक्टरी 20 किलो या प्रमाणात धुरळावी किंवा 40 ग्रॅम कार्बारिल भुकटी 10 लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावी.
मावा :
हे लहान, हिरव्या रंगाचे किडे फुलांच्या कोवळ्या पाकळयांवर, कळयांवर आणि शेंड्यांवर राहतात आणि त्यांतील अन्नरस शोषून घेतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 मिलिलीटर रोगोर (30%) 10 लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारावे.
फुलकिडे :
ही कीड पाने, फुलदांडा आणि फुलांवर राहून अन्नरस शोषून घेते. त्यामुळे झाड निस्तेज बनते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर डायमेथोएट (30 % प्रवाही) अथवा 4 मिलिलीटर फॉस्फोमिडॉन ( 85 % प्रवाही) मिसळून पिकावर फवारावे.
निशिगंध पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important diseases of Nisigandha crop and their control.
खोडकूज :
या रोगामुळे पानांवर तांबूस रंगाचे बुरशीचे ठिपके पडतात. पानांचा रंग फिकट हिरवा होतो. पानांवरील ठिपक्यांचा आकार वाढत जाऊन सर्व पानभर ठिपके पसरतात. काही दिवसांनी रोगट पाने गळून पडतात. हा बुरशीजन्य रोग पावसाळयात पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनीत मोठ्या प्रमाणात आढळतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जमिनीतील पाण्याचा चांगला निचरा करावा. तसेच लागवड करण्यापूर्वी 0.1% मर्क्युरी क्लोराईड किंवा 0.2% फारमॅलीन या बुरशीनाशकांचा वापर करून शेतजमीन संपूर्णपणे निर्जंतूक करून घ्यावी. नवीन लागवड करताना रोगट झाडांचे कंद लागवडीसाठी वापरू नयेत.
फुलदांडा सडणे :
हा रोग जिवाणूंमुळे होतो. मुख्यतः कोवळया फुलांच्या कळयांवर या रोगाचा प्रादुर्भाव होतो. कळया कोरड्या होतात, त्यांच्यावर तपकिरी खोलगट खड्डे पडतात आणि ते निस्तेज होतात. कालांतराने कळया सुकतात. रोग कळ्यांच्या टोकाकडून देठाकडे पसरत जातो. फुलदांडे सुकतात.
उपाय : वाळत जाणारे दांडे आणि झाडे काढून नष्ट करावीत.
कंदकूज :
या बुरशीजन्य रोगामुळे कंद कुजतात. ज्या जमिनीत पाण्याचा चांगला निचरा होत नाही अशा जमिनीत या रोगाचे प्रमाण जास्त आढळते.
उपाय : या रोगाच्या प्रतिबंधासाठी लागवडीपूर्वी कंद 25% कॉपर ऑक्सिक्लोराईड या बुरशीनाशकाच्या द्रावणात 15 मिनिटे बुडवून नंतर सुकवून हे कंद लावावेत. पाण्याचा निचरा न होणाऱ्या जमिनीत कंदांची लागवड सरी-वरंब्यावर करावी. वाफ्यांमध्ये 0.6% तीव्रतेच्या बोर्डो मिश्रणाच्या द्रावणाचे ड्रेचिंग करावे.
बंची टॉप :
या विषाणुजन्य रोगामुळे फुलांचा दांडा सारखा न वाढता चेंडूसारखा गोल होतो आणि त्याची लांबी नेहमीच्या लांबीच्या निम्मीच राहते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे उपटून नष्ट करावीत. रोगाचा प्रसार फुलकिडींमार्फत होत असल्याने फुलकिडीचा योग्य प्रकारे बंदोबस्त करावा.
निशिगंध पिकातील तण आणि त्यांचे नियंत्रण । Weeds in Nisigandha crops and their control.
निशिगंध हे जमिनीलगतच वाढत असल्यामुळे त्याच्या वाढीचा वेग गवतासारखाच असतो. लागवड केल्यापासून पहिल्या 3-4 महिन्यांत वेळोवेळी तण काढून जमीन स्वच्छ व भुसभुशीत ठेवली तर मुख्य पिकाची वाढ जोमाने होते. काही दिवसांनी जमीन मुख्य पिकाने व्यापल्यानंतर तणांचा उपद्रव जास्त प्रमाणात होत नाही. पाटाच्या पाण्याची शेती असेल तर किंवा वाऱ्याबरोबर शेतात दुसरीकडे काही तणांचे हलके बी येऊन पडल्यास पिकामध्ये तणांची वाढ दिसून येते. मुख्य पिकाचा काढणीचा बहर ओसरल्यानंतर त्याच्या आजूबाजूची पाने वाळल्यावर काही जमीन मोकळी मिळते. या मोकळया जमिनीत तणांचा उपद्रव वाढतो. अनेकदा हरळी आणि लव्हाळा यांसारखी बहुवर्षायु तणेही मोठ्या प्रमाणावर निशिगंधाच्या पिकात आढळतात.
निशिगंध हे बहुवर्षायु फुलपीक असल्यामुळे या पिकात मुख्य हंगाम संपल्यावर खोडवा म्हणजे दुबार अथवा तिबार पिके घेता येतात. यासाठी नवीन लागवड केलेल्या निशिगंधाच्या बागेतील फुलांची वेचणी झाल्यानंतर म्हणजेच एप्रिल महिन्यात बागेचे पाणी तोडून बागेला विश्रांती द्यावी. 7-8 आठवड्यांच्या विश्रांतीनंतर हलकी खोदणी करून पुन्हा खते द्यावीत आणि बागेला पाणी देण्यास सुरुवात करावी. दुसऱ्या वर्षी फुलांचे उत्पादन दीड ते दोन पटीने जास्त येते. अशा प्रकारे तीन वर्षांपर्यंत त्याच शेतात पीक घेता येते. मात्र अशा खोडवा घेतलेल्या शेतात तणांचा योग्य बंदोबस्त करता येत नाही. त्यामुळे हरळी आणि लव्हाळी या तणांचा उपद्रव वाढतो. हरळी आणि लव्हाळा निशिगंधाच्या शेतात आल्यास संपूर्ण बागच नष्ट होते. म्हणून सुरुवातीलाच लव्हाळा आणि हरळी मोठ्या प्रमाणात असलेले शेत निशिगंधाच्या लागवडीसाठी निवडू नये किंवा अशा शेतात निशिगंधाची लागवड करण्यापूर्वी ॲट्रॅझिन या तणनाशकाची 3 किलो दर हेक्टरी मात्रा वापरून लागवडीपूर्वी जमिनीवर फवारावे. त्यामुळे उगवण होण्यापूर्वी किंवा उगवण झालेली सर्वच तणे नष्ट होतात. पांढरी फुली, घोळू, कुरडू अशी हंगामी तणे बागेत दिसल्यास लगेच निंदणी करून उपटून काढावीत.
निशिगंधाच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of Nisigandha flowers.
निशिगंधाच्या कंदांच्या लागवडीनंतर 60 ते 80 दिवसांत फुलांचे दांडे दिसू लागतात आणि एक आठवड्यात फुलदांड्यावरील सर्वांत खालची फुलांची जोडी पूर्ण उमलते. या वेळी निशिगंधाच्या फुलदांड्यासाठी काढणी करावी. या फुलदांड्याचा उपयोग फुलदाणीत सजावटीसाठी अथवा गुच्छ तयार करण्यासाठी करतात. फुलदांडे जमिनीपासून 10-15 सेंटिमीटर उंचीवर धारदार चाकूने कापून लगेच पाण्यात बुडवून ठेवावेत. दांडा कापताना जमिनीलगत न कापता पानांच्या वरील बाजूस कापावा. पानांसह दांडा कापू नये. त्यामुळे कंदाच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. सर्व फुलदांडे कापून बागेत झाडाखाली अथवा एखाद्या थंड खोलीत बादलीतच सहा तास ठेवावेत. नंतर 60 ते 100 सेंटिमीटर लांबीचे लांब दांडे, 80 ते 90 सेंटिमीटर लांबीचे मध्यम दांडे आणि 80 सेंटिमीटर लांबीचे लहान दांडे अशा प्रकारे फुलदांड्यांची प्रतवारी करून एक डझनाच्या जुड्या बांधाव्यात. वर्तमानपत्राच्या कागदात वरच्या बाजूने गुंडाळून आणि वेताच्या लांब करंड्यांतून अथवा खोक्यांत भरून लांबच्या बाजारपेठेत पाठवाव्यात. सर्वसाधारणपणे निशिगंधाचे दर हेक्टरी 7 ते 8 लाख फुलदांडे मिळतात.
हार, वेणी, गजरा यांसाठी सुटी पूर्ण वाढलेली फुले लागतात. अशी फुले, फुलदांडे यायला सुरुवात झाल्यानंतर 15 ते 20 दिवसांनी उमलू लागतात. यासाठी अशा फुलांची वेचणी दररोज करावी लागते. हार, वेण्यांसाठी पूर्ण उमललेली फुले वापरता येत नाहीत. म्हणून पूर्ण वाढ झालेल्या कळयांची तोडणी करावी. ह्या कळया दांड्यावर जोडीने येतात. एका फुलदांड्यावर सर्वसाधारणपणे 16 ते 20 जोडकळ्या येतात. साधारणतः एका दांड्यावरील 2-3 जोडकळया रोज काढणीस येतात. या जोडकळयांची रोज काढणी करावी. फुलदांड्याच्या टोकाकडे 3 ते 4 जोडकळचा अतिशय लहान असतात. त्या तशाच सोडून द्याव्यात. जोडकळ्या वेचताना फुलदांडी मोडणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे पूर्ण उमललेली फुले दिसल्यास ती काढून वेगळी ठेवावीत. पूर्ण उमललेली फुले फुलदांड्यांवर तशीच ठेवू नयेत. फुलदांड्यांवरील कळयांची वेचणी पूर्ण झाल्यावर असे फुलदांडे कापून टाकावेत. पूर्ण उमललेली फुले फुलांपासून सुवासिक अर्क काढण्यासाठी वापरतात. यासाठी उद्देश लक्षात घेऊन योग्य अवस्थेतील फुले तोडून करंडीत अथवा कापडी पिशवीत भरावीत आणि बाजारात विक्रीसाठी पाठवावीत. फुले करंड्यांत भरण्यापूर्वी करंडीच्या तळाशी कडूनिंबाच्या पाल्याचा पातळ थर द्यावा आणि नंतर फुले अंथरावीत. करंडी बंद करण्यापूर्वीही याच पद्धतीने प्रथम पाला अथवा वर्तमानपत्राचा कागद ठेवून नंतर करंडी बंद करून सुतळीने चांगली शिवून पाठवावी. सुट्या फुलांचे उत्पादन हंगामाप्रमाणे हेक्टरी 6-8 टनांपर्यंत मिळते.
हार,
वरील सर्व अवस्थांसाठी फुलांची काढणी शक्यतो सकाळी सूर्योदयापूर्वी करावी. लांब फुलदांड्यांसाठी 9 वाजेपर्यंत अथवा संध्याकाळी 5 नंतर काढणी केली तरी चालते. गजरा आणि वेणीसाठी शक्यतो सकाळी 7 पूर्वी फुलांची काढणी करावी. फुलांचा अर्क काढण्यासाठी सकाळी 5-6 पर्यंत फुलांची काढणी पूर्ण होणे आवश्यक आहे. सुट्टया फुलांना भारतीय बाजारपेठेत नियमित मागणी असते; परंतु सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी माल पाठविल्यामुळे बाजारभाव कमी मिळतो. सशक्त, लांब आणि फुलांची भरपूर संख्या असलेल्या फुलदांड्यांना मुंबई-पुणे बाजारात चांगला भाव मिळतो. अशा चांगल्या दांड्यांना विशेषतः ‘डबल’ निशिगंधास इंग्लंड आणि फ्रान्समध्ये भरपूर मागणी आहे.
निशिगंध फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण । Packaging and storage of Nisigandha flowers.
सुटी फुले काढल्यानंतर ती 10 ते 15 किलो वजनाच्या बांबूच्या अथवा वेताच्या टोपलीत भरून पाठवितात. बाजारासाठी फुले पाठविताना ट्रक, मोटारसायकल, सायकल, इत्यादी साधनांचा उपयोग होतो. बाजारात फुलांची विक्री वजनावर होते. लांब दांड्यांची फुले छोट्या- छोट्या जुड्यांच्या स्वरूपात बांधून बाजारपेठेत पाठवितात. त्यांचा भाव डझनावर ठरतो. लांब दांड्याची फुले जास्त काळ टिकविण्यासाठी साखर, सायट्रिक अॅसिड, बेझिमिडॅझोल यांच्या स्वतंत्र अथवा संयुक्त मिश्रणाच्या विशिष्ट तीव्रतेच्या द्रावणात काही तास ठेवून नंतर वापरली तर ती जास्त काळ टिकतात.
परदेशी बाजारपेठेसाठी निशिगंधाच्या फुलांचे पॅकिंग करताना 100 फुलदांड्याचे एक अशी गोल बंडल्स बांधतात. बंडलच्या बुंध्याकडील भाग ओल्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळतात. कळयांना इजा होऊ नये यासाठी फुलदांड्यांचे पूर्ण बंडल नरम, पांढऱ्या टिश्यूपेपरमध्ये गुंडाळून हे फुलदांडे कार्डबोर्ड बॉक्समध्ये पॅक करून त्वरित विक्रीसाठी पाठवावेत.
निशिगंधाच्या कंदांची काढणी आणि साठवण । Harvesting and storage of Nisigandha tubers.
निशिगंधाच्या लागवडीनंतर तीन वर्षांनी वाफ्यातील सर्व जागा कंद आणि आजूबाजूस वाढलेल्या कंद पिल्लांनी व्यापली जाते. त्यानंतर पुन्हा खोडव्याचे पीक घेणे फायदेशीर होत नाही. म्हणून जास्तीत जास्त फुले काढून झाल्यानंतर बागेचे पाणी एक महिनाभर बंद करावे. सर्व जून पाने पिवळी पडून वाळू लागतात आणि जमिनीतील कंद चांगले पोसतात. नंतर खोलवर नांगरट करून अथवा टिकावाने खोल खणून कंद काढावेत. दोन आठवडे त्यांना चांगले सुकू द्यावे. त्या वेळेस कंदाच्या समूहाच्या आजूबाजूची माती वाळते आणि गळून पडते. असे कंदसमूह नंतर थंड आणि कोरड्या सावलीच्या जागी पातळ थरात पसरून ठेवावेत. कंदांवर बुरशी आणि किडींचा उपद्रव होऊ नये म्हणून गंधक भुकटी आणि ब्लॉयटॉक्स यांचे एकत्रित मिश्रण धुरळून घ्यावे. या पद्धतीने 4-5 महिन्यांपर्यंत कंद चांगल्या स्थितीत टिकतात.
सारांश ।
निशिगंध हे उष्ण आणि दमट हवामानात चांगल्या प्रकारे वाढणारे बहुवर्षायु फुलपीक आहे. निशिगंधाच्या फुलांचा उपयोग फुलांच्या वेण्या, गजरा, माळा, हार तयार करण्यासाठी किंवा स्त्रियांना केसात माळण्यासाठी लांब फुलदांडे, गुच्छ तयार करण्यासाठी अथवा फुलदाणीत सजावटीसाठी केला जातो. महाराष्ट्रात निशिगंधाच्या पिकाखाली 3,000 हेक्टर क्षेत्र असून ते प्रामुख्याने पुणे, नाशिक, अहमदनगर, सांगली या जिल्ह्यांत आहे. या फुलांपासून सुवासिक अर्कही काढता येतो. त्याचा उपयोग साबण आणि अत्तर तयार करण्यासाठी करतात.
निशिगंधाला लागवडीसाठी हलकी ते मध्यम अशी जांभ्या दगडाची, वाळूमिश्रित पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन असावी. लागवडीसाठी उमीटर x 2 मीटर आकाराचे सपाट वाफे अथवा सरी-वरंबे काढून 30 सेंटिमीटर x 20 सेंटिमीटर अंतरावर लागवड करावी. लागवडीसाठी 3 सेंटिमीटर व्यासाचा चांगला मध्यम आकाराचा 15-20 ग्रॅम वजनाचा त्रिकोणी कंद निवडावा. तो 5 ते 7 सेंटिमीटर खोलीवर लावावा. एका जागी एकच कंद लावावा.
निशिगंधाला हेक्टरी 40 टन शेणखत, 100 किलो नत्र, 200 किलो स्फुरद आणि 200 किलो पालाश द्यावा. उन्हाळयात दर आठ दिवसांनी पाणी द्यावे. लागवडीपासून अडीच महिन्यांनंतर फुलदांडे यायला सुरुवात होते. फुले ज्या प्रकारासाठी हवी असतील त्याप्रमाणे आणि बाजाराचे अंतर लक्षात घेऊन ठरावीक अवस्थेत काढावीत. काढणी दररोज सकाळी करावी. अर्क काढण्यासाठी फुले 5 वाजता वेचावी. निशिगंधावर रोग-किडींचा फारसा उपद्रव होत नाही. मात्र योग्य प्रमाणात पाण्याचा निचरा न झाल्यास कंदकूज रोगाची लागण होते. या रोगाच्या बंदोबस्तासाठी पिकामध्ये बुरशीनाशकाचे ड्रेचिंग करावे.
निशिगंधाचे हेक्टरी 7 ते 8 लाख फुलदांडे अथवा 6 ते 8 टन फुले मिळतात. निशिगंधाच्या पिकापासून खोडवा घेता येतो. त्यामुळे लागवडीसाठी बेणे पुन्हा पुन्हा घ्यावे लागत नाही आणि त्यावरील खर्च वाचतो. तसेच शेतात पूर्वमशागतीचा खर्च वाचतो. दुसऱ्या वर्षी खोडव्यापासून दीड ते दोन पट उत्पन्न मिळते. निशिगंधाच्या फुलांना वर्षभर बाजारात मागणी असते आणि चांगला बाजारभावही असतो.