ऑर्किड लागवड महत्त्व | ऑर्किड लागवडी खालील क्षेत्र । ऑर्किड पिकाचे उत्पादन | ऑर्किड पिकास योग्य हवामान । ऑर्किड पिकास योग्य जमीन | ऑर्किड पिकाच्या उन्नत जाती | ऑर्किड पिकाची अभिवृद्धी । ऑर्किड पिकाची लागवड पद्धती | ऑर्किडची लागवड पद्धती | पॉलिथीन गृहामध्ये ऑर्किडची लागवड | ऑर्किड पिकास योग्य हंगाम । ऑर्किड पिकास योग्य लागवडीचे अंतर | ऑर्किड पिकास खत व्यवस्थापन । ऑर्किड पिकास पाणी व्यवस्थापन | ऑर्किड पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण | ऑर्किड पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण | ऑर्किडच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री | ऑर्किडच्या फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण |
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
ऑर्किड लागवड । Orchid Lagwad | Orchid Sheti |
सर्वसामान्य माणसाला ऑर्किडची फुले फारशी परिचित नाहीत. बऱ्याच लोकांनी ही फुले पाहिलेली नसतात. परंतु भारताला ऑर्किड नवीन नाही. वेदामध्ये ऑर्किडचा वंदा असा उल्लेख आहे. आजही व्हेंडा या नावाने तो प्रचलित आहे. जागतिक बाजारपेठेत या फुलांना खूप वरच्या दर्जाचे स्थान असून भरपूर पैसे मिळवून देणारे हे फुलपीक आहे. सिबिडियम, पॅफिओपेडिलम, फॅलिनॉप्सिस आणि कॅटलिया या ऑर्किडच्या फुलांना अमेरिका आणि युरोपमध्ये प्रचंड मागणी आहे. खूप पाऊस पडणाऱ्या भागात झाडांची दाटी झालेली असते आणि हवेतील आर्द्रता वाढलेली असते; अशा भागात नैसर्गिकरित्या झाडांच्या खोडावर ऑर्किड फुलतात. महाराष्ट्रात महाबळेश्वरच्या जंगलात तसेच सातपुड्याच्या जंगलात मोठ्या प्रमाणात ऑर्किड फुलतात. उत्तर भारतातील आणि दक्षिण भारतातील खूप पाऊस पडणाऱ्या उंच डोंगराळ परंतु घनदाट अरण्याच्या परिसरात अत्यंत सुंदर अशी ऑर्किडची फुले फुलतात आणि ही फुले परदेशात भरपूर किमतीला विकली जातात.
पॉलिहाऊसमध्ये नियंत्रित वातावरणात ऑर्किडच्या फुलांचे व्यापारी तत्त्वावर उत्पादन केले जाते. उन्हाळा कडक नसेल आणि हवामानात थोडी जास्त आर्द्रता असेल तर सावलीमध्ये कुंड्यांमध्ये किंवा मॉसस्टिक्सवर ही फुले फुलतात. या फुलांचे अप्रतिम सुंदर रंग आणि टिकाऊपणा यांमुळे ही फुले मुंबई, दिल्ली, कोलकाता यांसारख्या मोठ्या शहरांतील पंचतारांकित हॉटेलमध्ये भरपूर किंमत देऊन खरेदी केली जातात. अलीकडच्या काळात ऑर्किडचे फूल अतिशय लोकप्रिय होत आहे. या फुलझाडाची पद्धतशीर लागवड केल्यास चांगले उत्पादन मिळू शकते.
ऑर्किड लागवड महत्त्व | Importance of Orchid Cultivation |
ऑर्किड हे एक बहुवर्षायु फुलझाड आहे. ऑर्किड हा शब्द ग्रीक भाषेपासून तयार झाला आहे. ऑर्किस या ग्रीक शब्दाचा अर्थ अंडकोश असा होतो. भूमध्य सागरी प्रदेशातील एका ऑर्किडचे जोडकंद हे माणसाच्या अंडकोशासारखे दिसतात म्हणून यास ऑर्किड हे नाव दिले गेले आहे. प्राचीन काळी जेव्हा कोणतेही वैद्यकीय शास्त्र फारसे प्रगत झाले नव्हते त्या वेळी माणसे औषध म्हणून ऑर्किडचा वापर करीत असत.ऑर्किडच्या फुलांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान आहे. बँकॉक येथे ऑर्किडचा व्यापार मोठ्या प्रमाणावर केला जातो आणि त्यातून लक्षावधी डॉलरचे परकीय चलन त्या देशाला मिळते. मुंबईतील पंचतारांकित हॉटेलांमधून ऑर्किडची फुले आणि फुललेली झाडे अत्यंत चढ्या किमतीमध्ये खरेदी केली जातात. ऑर्किडच्या विविध रंगछटा आणि 2 ते 4 आठवडे फुलदाणीत टवटवीत राहण्याची क्षमता यांमुळे ऑर्किडचे फूल हे उत्कृष्ट कटफ्लॉवर आहे. लाल, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा, तपकिरी, पांढरा, इत्यादी रंगछटा ऑर्किडच्या फुलात दिसतात.
फुललेले ऑर्किड झाडावर जास्त काळ टवटवीत राहतात आणि अत्यंत मनमोहक दिसतात; म्हणून गृहसजावटीसाठी त्यांचा चांगला उपयोग होतो. फिलिपाईन्स, इंडोनेशिया आणि न्यूगिनिया देशांत डेन्ड्रोबियमच्या काही प्रजातींचा उपयोग टोपल्या तयार करण्यासाठी होतो. न्यूगिनियातील आदिवासी याचा उपयोग हातातील आकर्षक कंकण, चुडा आणि कडे तयार करण्यासाठी करतात. ऑर्किडचा वापर अन्न म्हणूनसुद्धा केला जातो. मलेशिया, इंडोनेशिया या देशांत अनोइक्टोचिलस प्रकारातील ऑर्किडची पाने भाजी म्हणून खातात. डेन्ड्रोबियम आणि सॅलॅक्सेन्स प्रकारातील ऑर्किडची वाळलेली पाने भात शिजताना भातात मिसळल्यास भाताला अतिशय चांगला स्वाद येतो. सायप्रस या देशात ऑर्किडच्या कंदापासून दूधमिश्रित स्वादिष्ट पेय बनवितात. ऑर्किडला औषधी वनस्पती म्हणून महत्त्व असून ऑर्किडच्या काही जातींच्या आभासी कंदांचा उपयोग वेगवेगळी औषधे तयार करण्यासाठी होतो. व्हॅनिलासारख्या वाढणाऱ्या ऑर्किडपासून सुगंधी द्रव्य बनविले जाते. त्याचा उपयोग आइस्क्रीम, शीतपेये आणि अनेक औषधांमध्ये केला जातो.
ऑर्किड लागवडी खालील क्षेत्र । ऑर्किड पिकाचे उत्पादन | Areas under orchid cultivation. Orchid Crop Production |
जगात निरनिराळ्या देशांत ऑर्किडचे एक किंवा अनेक प्रकार कमीअधिक प्रमाणात वाढलेले दिसतात. मात्र ऑर्किडच्या बहुतांश जाती दक्षिण आणि मध्य अमेरिका, भारत, ब्रह्मदेश, चीन, थायलंड, मलेशिया, ब्राझील, फिलिपाईन्स, ऑस्ट्रेलिया, इत्यादी उष्ण हवामान असणाऱ्या परंतु खूप आर्द्रता असणाऱ्या घनदाट जंगलातील प्रदेशातील आहेत. भारतात ऑर्किडच्या 1,600 प्रजाती आहेत. त्यांपैकी 800 प्रजाती आसाम राज्यात तर 250 प्रजाती दक्षिण भारतात उपलब्ध आहेत. पश्चिम बंगालमधील कॅलिम्पाँग हे तर ऑर्किडचे नंदनवन
आहे. महाराष्ट्रामध्ये महाबळेश्वरसारख्या जास्त पाऊस पडणाऱ्या भागात घनदाट जंगलामध्ये झाडांच्या फांद्यांवर ऑर्किड नैसर्गिकरित्या वाढलेले आढळतात. महाबळेश्वर भागात ऑर्किडच्या 40 प्रजाती आढळतात. पुणे, ठाणे, सातारा, इत्यादी जिल्ह्यांत कुंड्यांमध्ये आणि ग्रीनहाऊसमध्ये ऑर्किडची लागवड व्यापारी तत्त्वावर केली जाते. रासू फार्म, परंदवाडी, सोमाटणे फाटा, तळेगाव (जि. पुणे) येथे खाजगी स्वरूपात अद्ययावत पद्धतीने पॉलिहाऊसमध्ये ऑर्किडची लागवड केली जाते. थोडीशी सावली आणि सम हवामान असलेल्या भागात झाडांच्या फांद्यांवर आणि लाकडी ठोकळ्यांवर शेवाळ (मॉस) लावून तसेच कुंड्यांमध्ये ऑर्किडच्या वेगवेगळ्या जातींची लागवड करता येते. महाराष्ट्रातील पश्चिम घाट भागात ऑर्किडच्या आणखी काही जाती वाढविण्यास खूप वाव आहे.
ऑर्किड पिकास योग्य हवामान । ऑर्किड पिकास योग्य जमीन | Suitable climate for orchid crop. Land suitable for orchid cultivation
ऑर्किडचे वेगवेगळे प्रकार आणि जाती आहेत. तापमान, सूर्यप्रकाश आणि आर्द्रता यांबाबत प्रत्येक प्रकाराची आवश्यकता वेगवेगळी आहे. त्या आवश्यकतेप्रमाणे त्यांचे विशिष्ट प्रकारचे गट पडतात.
हवा :
ऑर्किडचे बरेच प्रकार झाडाच्या आधाराने हवेत वाढणारे (इपिफायटिक) आहेत. त्यांना खेळत्या हवेची आवश्यकता असते. व्हेन्डा या प्रकारातील ऑर्किडला आधारावरून हवेतच मुळे फुटतात आणि अन्न तयार करण्यासाठी त्यांना खेळत्या हवेची गरज असते.
तापमान :
तापमानानुसार ऑर्किडचे थंड हवामानात वाढणारे, समशीतोष्ण हवामानात वाढणारे आणि उष्ण हवामानात वाढणारे असे तीन गट पडतात. विशिष्ट तापमानात वाढणारे ऑर्किड दुसऱ्या प्रकारच्या हवामानात चांगले वाढत नाहीत. ग्रीनहाऊसमध्ये कृत्रिमरित्या तापमान कायम राखण्याची व्यवस्था केल्यास ऑर्किडची लागवड करता येते.
सूर्यप्रकाश :
निसर्गामध्ये ऑर्किड ह्या वनस्पती मोठ्या वृक्षांच्या अर्धवट छायेत वाढतात आणि फुलतात. ऑर्किडचे काही प्रकार हवेतील आर्द्रता जास्त आणि तापमान कमी असणाऱ्या ठिकाणी खडकावरही वाढू शकतात. ऑर्किडच्या बहुतेक प्रकारांना अप्रत्यक्ष सूर्यप्रकाशाची गरज असते. सूर्यप्रकाशाअभावी ऑर्किडची वाढ खुंटते आणि फुलेही नीट येत नाहीत. काही ऑर्किड्सच्या वाढीसाठी सावलीची आवश्यकता असते. अशी ऑर्किड्स्
बैठकीच्या खोलीत शोभेसाठी लावतात. उदाहरणार्थ, डेन्ड्रोबियम, व्हेंडाज प्रकारातील काही जाती. काही प्रमाणात सावली आवश्यक असणाऱ्या सिम्बिडियम, डेन्ड्रोबियम, रिकोस्टिलस, एराईड्स, इत्यादी प्रजाती व्हरांडा, गॅलरी या ठिकाणी लावता येतात. भरपूर सूर्यप्रकाश मिळणाऱ्या ठिकाणी डेन्ड्रोबियम, व्हेंडा, अरंडा, अरेंचनिस, ओन्सिडियम या प्रजातींची लागवड करावी.
अ. क्र | तापमान | दिवसाचे तापमान | रात्रीचे तापमान | उदाहरण |
1 | थंड | 15 ते 21 | 10 ते 12 | सिम्बिडियम, पॅफिओपेडिलम, मिलटोनिया, ओडोंटोग्लॉसम, डेन्ड्रोबियम |
2 | मध्यम | 18 ते 21 | 15 ते 18 | कॅटलिया, लिलिया, ब्रासोव्हॅला, ऑन्सिडियम, इपिडेंड्रम |
3 | उष्ण | 21 ते 29 | 18 ते 21 | फॅलिनॉप्सिस, व्हेंडा, डेन्ड्रोबियमचे प्रकार |
आर्द्रता :
ऑर्किडच्या वाढीसाठी हवेत योग्य प्रमाणात आर्द्रता राखणे अत्यंत आवश्यक आहे. ग्रीनहाऊसमध्ये अलीकडे अत्यंत लहान तुषारांच्या स्वरूपात (मिस्ट) पाण्याचे फवारे उडवून हवेतील आर्द्रता कायम ठेवली जाते. ग्रीनहाऊसमध्ये मध्यभागी पाण्याचे छोटेसे तळे ठेवले तर आर्द्रता राखण्यास मदत होते. ऑर्किडसाठी हवेत 70 ते 90% आर्द्रता असणे आवश्यक असते.
ऑर्किड नैसर्गिकरित्या झाडाच्या फांद्यांवर, खोडांवर, खडकांवर आणि जमिनीवर वाढतात . ऑर्किडची व्यापारी तत्त्वावर लागवड करताना वाळू, माती, विटांचे तुकडे, कठीण. लाकडाचे तुकडे, पिटमॉस, व्हर्मिक्युलाईट, कठीण कोळशाचे तुकडे, खडी, कंपोस्ट, ट्री फर्न, फायबर, इत्यादी माध्यमांचा उपयोग करतात.
ऑर्किड पिकाच्या उन्नत जाती | Improved Varieties of Orchid Crop |
ऑर्किड हे एक बहुवर्षायु फूलझाड असून वनस्पतिशास्त्रीयदृष्ट्या ते ऑर्किडसी या कुटुंबातील आहे. जगात ऑर्किडच्या 15 हजारांहून जास्त प्रजाती आहेत.
ऑर्किडच्या झाडाच्या वाढीच्या पद्धतीनुसार मोनोपोडिअल (एक खोड असलेले) आणि सिम्पोडिअल (अनेक खोड असलेले) असे दोन गट पडतात.
मोनोपोडिअल या प्रकारात अन्नसंचय करणारे एकच खोड असून ते वर्षानुवर्षे वाढत राहते आणि पानांच्या बेचक्यातून फुले येत राहतात. उदाहरणार्थ, व्हेंडा, पॅलानि आप्सिस, रेनथेरा, इत्यादी.
सिम्पोडिअल या प्रकारात झाडाला अनेक खोडे येतात. उदाहरणार्थ, कॅटेलिया, सिम्बिडियम आणि डेन्ड्रोबियम. या प्रकारामध्ये मुख्य खोडाला फुले आल्यानंतर त्याची वाढ थांबते. पुढील हंगामात नवीन खोडावर फूल येते.
ऑर्किडचे बहुतांश प्रकार इपियफायटिक असतात. ते झाडांच्या खोडांचा अथवा फांद्यांचा अथवा शेवाळलेल्या खडकांचा फक्त आधारासाठी उपयोग करतात. झाडांच्या खोडावरून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्यातील सेंद्रिय पदार्थातील सूक्ष्म अन्नद्रव्यांवर ऑर्किडची वाढ होत राहते.
इपिपोगॉन अॅम्फिलस आणि कोरालोरायझा इनाटा या ऑर्किडच्या दोन प्रजातींना पाने अथवा मुळे नसतात तर झाडाखालील मातीतील सेंद्रिय पदार्थांवर ते वाढतात. राइझेंथिलिया गोर्डनेरी हा प्रकार तर जमिनीखाली वाढतो. म्हणून त्याला जमिनीतील ऑर्किड असेही म्हणतात. टेरेस्ट्रियल ऑर्किड जमिनीतील मुळांची वाढ करून अन्न घेतात आणि वाढतात. थंड हवामानातील बहुतांश ऑर्किड इपिफायटिक असतात तर उष्ण हवामानात वाढणारे ऑर्किड टेरेस्ट्रियल असतात.
ऑर्किडचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे आहेत :
(01) एराइड्स | (02) अनोइक्टोचीलस | (03) अरॅकनीस | (04) अॅस्कोसेंट्रम | (05) ब्रासाव्होला | (06) बॅसिया |
(07) ब्रुगटोनिया | (08) कॅलॅन्थी | (09) कॅटलिया | (10) कोकली ओडा | (11) कोलाजीन | (12) सिम्बिडियम |
(13) सायप्रीपेडिअम | (14) डेन्ड्रोबियम | (15) डायक्रीयम | (16) इपिडेंड्रम | (17) युॲन्थी | (18) लॅलिया |
(19) लायकास्टी | (20) मॅसेडेव्हॅलिया | (21) मिल्टोनिया | (22) ओडोन्टोग्लॉसम | (23) ऑन्सिडियम | (24) पॅफी ओपेडिलम |
(25) पॅराफालेनॉप्सिस | (26) फालेनॉप्सिस | (27) रेनॅ-थेरा | (28) हिन्कोस्टिलिस | (29) रॉड्रिम्युझिया | (30) सोफ्रोनिटिस |
(31) स्पॅथोग्लॉटिस | (32) युनिया | (33) व्हेंडा | (34) व्हँडॉप्सिस | (35) झायगोपेटॅलम |
ऑर्किडच्या नवनवीन संकरित जाती सतत निर्माण होत आहेत. काही नैसर्गिकरित्या संकर होऊन तयार झालेल्या आहेत तर काही कृत्रिम संकरातून निर्माण केलेल्या आहेत.
(1) डेन्ड्रोबियम सिसार | (2) डेन्ड्रोबियम हवाई | (3) डेन्ड्रोबियम मिओ हवाई |
(4) डेन्ड्रोबियम पोम्पॅडोर | (5) अॅरचिनीस मॅगी ओई | (6) अरंडा |
(7) अरंथेरा जेम्सस्टोरीज | (8) व्हेंडा जॉन क्लब | (9) ओन्सिडियम गोल्डन शॉवर |
ऑर्किडचे विविध प्रकार असले तरी आपण कोणते ऑर्किड लागवडीसाठी निवडायचे हे ते लावण्याचा आपला उद्देश काय आहे यावर अवलंबून असते. व्यापारीदृष्ट्या ग्रीनहाऊस अथवा ऑर्किड हाऊसमध्ये ऑर्किडची लागवड करताना बाजारपेठेत ज्या ऑर्किडला अधिक मागणी आहे आणि बाजारभाव चांगला मिळतो अशा प्रकारच्या ऑर्किडची निवड करावी.
घरातील खिडक्यांमध्ये अथवा मोकळी जागा असेल तर व्हेंडा प्रकारातील ऑर्किड मॉसस्टिक्सवर लावावेत. दिवाणखान्यातून चांगली हिरवीगार पाने येणारे ऑर्किडचे प्रकार निवडावेत; उदाहरणार्थ, पॅफिओपेडिलम, फायस, कॅलंथ, डेन्ड्रोबियम आणि व्हेंडाचे काही प्रकार. अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश येणाऱ्या व्हरांड्यामध्ये सिम्बिडियम, डेन्ड्रोबियम, रिफोस्टिलस, एराईड्स, इत्यादी प्रकार चांगल्या लाकडी टोपल्यांत लावावेत.
ऑर्किड पिकाची अभिवृद्धी । ऑर्किड पिकाची लागवड पद्धती | Growth of orchid crop. Cultivation method of orchid crop
लैंगिक अभिवृद्धी |
ऑर्किडच्या झाडाला पर परागसिंचन होऊन शेंगा लागतात. या शेंगांमध्ये असंख्य बिया असतात. ऑर्किडच्या बिया म्हणजे अतिशय सूक्ष्म कण असलेली भुकटी असते. इतर वनस्पतींमध्ये ज्याप्रमाणे बियांमध्ये भ्रूणाभोवती अन्नद्रव्याचा साठा केलेला असतो, त्याप्रमाणे ऑर्किडच्या बियांमध्ये भ्रूणाभोवती अन्नसाठा केलेला नसतो. उलट भ्रूणाभोवतीच्या पेशी मृत असतात. त्यामुळे बियांची उगवण अतिशय कमी प्रमाणात होते. ऑर्किडच्या बियांचा मायको- हायझा नावाच्या बुरशीबरोबर संयोग झाला तरच त्या उगवतात. ही बुरशी बियांवरील आवरण छेदून भ्रूणापर्यंत पोहोचते आणि भ्रुणाला अन्नपुरवठा करून त्याचे पोषण करते आणि त्यामुळे बियांची उगवण होते. ऑर्किडचे बी परिपक्व होण्यास 12-14 महिने लागतात.
शाखीय अभिवृद्धी |
ऑर्किडची अभिवृद्धी बियांपासून करता येत असली तरी मातृवृक्षाचे गुणधर्म बियांपासून तयार केलेल्या नवीन झाडांमध्ये उतरत नाहीत. म्हणून शाखीय पद्धतीने अभिवृद्धी करणे हीच पद्धत मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. शाखीय पद्धतीने अभिवृद्धी करण्यासाठी छाट कलम, मुळासह छाट कलम, फांद्या (किकी), विभाजन, गुटी आणि ऊतिसंवर्धन पद्धतींचा वापर
करतात.
फांद्या (किकी) :
ऑर्किडच्या काही प्रजाती उदाहरणार्थ, डेन्ड्रोबियम, इपिडेन्ड्रम, इत्यादी ऑर्किडमध्ये पेरामधून फुटवा फुटून त्याला मुळ्या फुटतात. याला किकी अथवा ऑफशूट असे म्हणतात. अशा मुळ्या फुटलेल्या फांद्या काढून वेगळ्या कुंडीत लावल्यास त्यापासून नवीन झाड तयार होते.
विभाजन :
या पद्धतीत फक्त सिम्पोडिअल ऑर्किडची म्हणजेच अनेक खोडे असलेल्या ऑर्किडची अभिवृद्धी करता येते. ऑर्किडच्या आभासी कंदास एकदा फुले येऊन गेल्यानंतर त्यांची वाढ थांबते आणि त्यांची पाने गळून पडतात. त्यानंतर या आभासी कंदाचा सर्वांत खालचा डोळा फुटून त्यातून दुसरा आभासी कंद तयार होतो. अशा प्रकारे एका कुंडीत अनेक आभासी कंद तयार होतात. एकदा फुले येऊन गेलेल्या आभासी कंदास बॅक बल्ब (पूर्वीच्या) असे म्हणतात. अशा प्रकारे तयार झालेले आभासी कंद मुख्य कुंडीतून काढून दुसऱ्या छोट्या कुंडीत अथवा ट्रेमध्ये कोळशाचे तुकडे, विटांचे तुकडे, स्पॅग्नम मॉस, इत्यादींच्या माध्यमात ठेवून नियमित पाणी दिल्यास त्यापासून नवीन रोपे तयार होतात. कंदांचे विभाजन करताना पूर्वकंद 1,000 पीपीएम तीव्रतेच्या आयबीए या संजीवकाच्या द्रावणात बुडवून काढल्यास कंदांना जास्त मुळे फुटून वाढ जोमाने होते.
मुळासह छाट कलम :
मोनोपोडिअल म्हणजेच एक खोड असणाऱ्या ऑर्किडमध्ये मुळासह छाट कलमाने अभिवृद्धी करतात. या प्रकारच्या ऑर्किडमध्ये एकच खोड शेवटपर्यंत वाढत राहते. खोडाच्या जुन्या मुळ्या सुकतात आणि पेरामधून नवीन मुळ्या फुटून एकच खोड सरळ वाढत राहते. अशा ऑर्किडमध्ये खोडाचा शेवटचा शेंड्याकडील भाग एकदोन मुळांसह छाटून इतर कुंडीत लावून नवीन झाड तयार होते.
छाट कलम :
छाट कलम (कटिंग) पद्धतीने ऑर्किडची अभिवृद्धी एराईड्स, इपिडेंड्रम, व्हेंडा, डेन्ड्रोबियम या प्रकारातील ऑर्किडमध्ये करतात. यासाठी ऑर्किडचे 8 ते 12 सेंटिमीटर लांबीचे छाट कोणत्याही बुरशीनाशकाच्या द्रावणात बुडवून लावतात. एन.ए.ए. या संजीवकाचा वापर केल्यास छाट कलमाला भरपूर आणि लवकर मुळे फुटतात. सिम्पोडिअल प्रकारातील कॅटलिया, डेन्ड्रोबियम आणि सिम्बिडियम या प्रकारातील ऑर्किडची अभिवृद्धी छाट कलमाने करता येते. 6,000 ते 20,000 पीपीएम तीव्रतेच्या आय.बी.ए. या संजीवकाच्या द्रावणात बुडवून त्यांची लागवड केल्यास अशा छाट कलमांना लवकर मुळे फुटतात.
गुटी :
व्हेंडा किंवा इतर मोनोपोडिअल प्रकारातील ऑर्किडची गुटी पद्धतीने अभिवृद्धी करता येते. यासाठी फांदीच्या टोकाकडून 20-30 सेंटिमीटर अंतरावर धारदार चाकूने खोड टोकाकडे छाटत न्यावे. हा काप अडीच सेंटिमीटर खोल असावा. काप पुन्हा जोडला जाऊ नये म्हणून कापामध्ये वाळलेली काडी ठेवून नंतर या भागावर ओले शेवाळ लावून पॉलिथीन कागदाने झाकावे. पॉलिथीन कागदाच्या दोन्ही बाजूंची टोके खोडावर सुतळीने घट्ट बांधावीत. मुळ्या फुटल्यानंतर गुटी वेगळी करून दुसऱ्या कुंडीत लावावी.
ऊतिसंवर्धन :
ऊतिसंवर्धन पद्धतीमार्फत अतिशय कमी कालावधीत ऑर्किडची अनेक रोपे तयार करता येतात. काही ऑर्किडमध्ये पानफुटीप्रमाणे पानांच्या कडांतून नवीन रोपे तयार होतात. काही ऑर्किडमध्ये कंदावर मुळ्या फुटून त्यातून छोटे कंद बाहेर येतात. हे कंद वेगळे करून त्यापासून नवीन रोपे तयार करता येतात.
ऑर्किडची लागवड पद्धती |
ऑर्किड नैसर्गिकरित्या जंगलात झाडांच्या फांद्यांवर, खोडांवर, शेवाळलेल्या खडकांवर आणि जमिनीवर आपोआप वाढत असते. अप्रत्यक्ष सावली, हवेत पुरेशी आर्द्रता आणि सौम्य उन्हाळा असलेल्या ठिकाणी झाडांच्या फांद्यांवर आणि खोडावर, लाकडी ठोकळ्यांवर मॉस बांधून, कोळशाच्या मोठ्या तुकड्यांवर, बांबूच्या लांबट टोपल्यांमध्ये किंवा मातीच्या जाळीदार भांड्यांमध्ये ऑर्किड लावता येतात. अलीकडच्या काळात नारळाच्या काथ्यापासून तयार केलेल्या बास्केटमध्ये ऑर्किडची लागवड करतात. या बास्केटला कोकोनेस्ट असे म्हणतात. या बास्केट मजबूत असून त्यांमध्ये नैसर्गिक हवा खेळती राहते, ओलावा टिकून राहतो. त्यामुळे या बास्केटमध्ये ऑर्किड चांगले वाढतात. इपिफायटिक ऑर्किडमधील कॅटेलिया, डेन्ड्रोबियम, इपिडेन्ड्रोबियम, व्हेंडा, इत्यादी प्रकार या पद्धतीने लावता येतात. टेरेस्ट्रियल ऑर्किड (मातीत वाढणारे) प्रजातीतील प्रकार मातीच्या कुंड्यांमध्ये विटांचे तुकडे, वाळलेल्या पानांचे खत, वाळू, कोळसा, इत्यादींचे मिश्रण स्वतंत्ररित्या भरून लावतात. ऑर्किड लागवडीसाठी विटांचे तुकडे, कठीण लाकडाचे तुकडे, पिटमॉस, व्हर्मिक्युलाईट, कठीण कोळशाचे तुकडे, खडी, कंपोस्ट, ट्री फर्न, काथ्या, इत्यादी माध्यमांचा वापर करतात. ऑर्किड लागवडीसाठी मातीच्या लहान कुंड्या (पेले) अथवा प्लास्टिकच्या छोट्या कुंड्यांना पाण्याचा निचरा होण्यासाठी तळाशी छिद्र ठेवावे. कुंडीच्या तळाला कोळसा अथवा विटांचे मोठे तुकडे भरावेत आणि वरचा भाग कंपोस्ट खत, कोळसा आणि विटांचे तुकडे 1:1:1 या प्रमाणात भरून त्यात इपिफायटिक प्रकारातील ऑर्किड लावता येतात. टेरेस्ट्रियल प्रकारातील ऑर्किडसाठी वाळू, माती आणि शेणखत सम प्रमाणात मातीच्या कुंड्यांत भरून त्यात लागवड करतात.
लागवड करताना व्हेंडा किंवा डेन्ड्रोबियम प्रकारातील मुळासह फुटवे तुटू न देता त्यांची लागवड करावी. लागवडीनंतर आवश्यकतेप्रमाणे झाडाला आधार द्यावा. झाडांची वाढ जोमाने आणि भरपूर प्रमाणात होत नसल्यास वर्षातून एकदा लागवडीसाठी वापरलेले मिश्रण बदलून नवीन मिश्रण भरावे.
पॉलिथीन गृहामध्ये ऑर्किडची लागवड | Orchid Cultivation Methods |
ऑर्किडच्या वाढीसाठी हवामान पोषक नसलेल्या ठिकाणी पॉलिथीन गृहात अथवा ऑर्किडेरियममध्ये ऑर्किडची लागवड करतात. फायबर ग्लासपासून तयार केलेल्या, छत असलेल्या ऑर्किडेरियममध्ये ऑर्किडच्या वाढीसाठी आवश्यक असलेला सूर्यप्रकाश आत येत असल्यामुळे ऑर्किडची वाढ चांगली होते. या ऑर्किडेरियममध्ये वरील बाजूस फायबर ग्लास आणि चारही बाजूंस जाळी किंवा काचा लावलेल्या असतात. मध्यभागी पाण्याची टाकी बनविलेली असते. त्यामुळे आर्द्रता कायम राखण्यासाठी लोखंडी अथवा पी.व्ही.सी. पाईपच्या नळ्या लावून त्यातून अत्यंत लहान तुषारांच्या स्वरूपात पाण्याचा शिडकावा दिवसातून ठरावीक वेळी केला जातो. ऑर्किडेरियममध्ये ठरावीक प्रकारच्या सिमेंटचे स्टैंड बनवून त्यावर ऑर्किडच्या कुंड्या ठेवतात.
फायबर ग्लास असलेल्या आर्केडेरियम प्रमाणेच काचगृहातदेखील ऑर्किड लावले जातात. मात्र या काचगृहामध्ये एका बाजूने थंड हवा येण्यासाठी आणि आतील गरम हवा बाहेर काढून टाकण्यासाठी व्यवस्था केलेली असते. हवेतील तापमान आणि आर्द्रता कायम ठेवली जाते. अशा रितीने सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता आणि खेळती हवा या महत्त्वाच्या बाबी ऑर्किडच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक असतात. या घटकांची पूर्तता केल्यास ऑर्किडेरियममध्ये वर्षभर फुलांचे चांगले उत्पादन मिळू शकते.
बियांपासून लागवड : ऑर्किडचे बी रुजविण्यासाठी ज्या कुंडीत ऑर्किड रुजवावयाचे आहे, त्या कुंडीत स्पॅग्नम मॉस टाकून ठेवावे आणि त्यावर दररोज पाणी शिंपडत राहावे. परिपक्व झालेल्या बिया या स्पॅग्नम मॉसवर टाकाव्यात व त्यावर थोडासा स्पॅग्नम मॉसचा थर द्यावा आणि नियमित पाणी द्यावे. या पद्धतीने 10-12% बियाण्याची उगवण होते.
ऑर्किड पिकास योग्य हंगाम । ऑर्किड पिकास योग्य लागवडीचे अंतर | Suitable season for orchid crop. Suitable Planting Spacing for Orchid Crop |
निसर्गत: ऑर्किड झाडांच्या खोडांवर आणि फांद्यांवर वाढत असतात. तसेच ऋतुमानाप्रमाणे फुलतही असतात. महाराष्ट्रात नैसर्गिक पद्धतीने ऑर्किडची लागवड एकदोन पाऊस पडून गेल्यानंतर जून ते ऑगस्ट या काळात किंवा नोव्हेंबर-डिसेंबर या महिन्यांत करावी. पॉलिहाऊसमध्ये अथवा अन्य ठिकाणी जेथे कृत्रिमरित्या तापमान, आर्द्रता, इत्यादींचे नियंत्रण केलेले असते तेथे ऑर्किडची लागवड वर्षभरात केव्हाही करता येते.
ऑर्किड पिकास खत व्यवस्थापन । ऑर्किड पिकास पाणी व्यवस्थापन | Fertilizer management of orchid crops. Orchid Crop Water Management |
निसर्गामध्ये वाढणाऱ्या ऑर्किडची वाढ ऑर्किड ज्या झाडावर वाढत असतात त्या झाडाच्या सालीतून, पावसाच्या पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या अन्नद्रव्यांवर आणि वातावरणातून शोषून घेतलेल्या अन्नद्रव्यांवर होत असते. परंतु मातीच्या भांड्यातून अथवा टांगत्या कुंड्यांमध्ये ऑर्किडची लागवड केली जाते, तेव्हा ही द्रव्ये खतामधून योग्य प्रमाणात पुरविण्याची गरज असते. अशा प्रकारची खतांची मिश्रणे द्रवरूप स्वरूपात किंवा भुकटीच्या स्वरूपात मिळतात. ओहिओ डब्ल्यू हे द्रवरूप खताचे मिश्रण इपिफायटिक ऑर्किडसाठी उत्तम समजले जाते.
या द्रवरूप खताचे घटक खालीलप्रमाणे आहेत :
पाणी | 4.0 लीटर |
पोटॅशियम नायट्रेट | 2.63 ग्रॅम |
अमोनियम सल्फेट | 0.44 ग्रॅम |
मॅग्नेशियम सल्फेट | 2.04 ग्रॅम |
मोनोकॅल्शियम फॉस्फेट | 1.09 ग्रॅम |
कॅल्शियम सल्फेट | 4.86 ग्रॅम |
फेरस सल्फेट | 0.5 ग्रॅम |
मँगनीज सल्फेट (1%) | 25 मिली. |
नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या 10:12:10 या प्रमाणातील द्रावणाची वाढीच्या काळातील फवारणीदेखील खूप उपयुक्त ठरते. ऑर्किडच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात नत्रयुक्त खताची तर फुले येण्याच्या काळात स्फुरदयुक्त खताची गरज असते. या खतांबरोबर अल्प प्रमाणात मॅग्नेशियम, कॅल्शियम, मँगनीज आणि लोह यांचा समावेश करणे आवश्यक असते.
ऑर्किडला जरुरीपुरते परंतु नियमित पाणी देण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्यामध्ये दिवसातून 2 ते 3 वेळा ऑर्किडला पाणी द्यावे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी दिल्यास पान आणि खोड यांना रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. ऑर्किडेरियममध्ये पाण्याची गरज यांत्रिक पद्धतीने नियंत्रित केलेली असते.
ऑर्किड पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण | Important pests of orchid crop and their control
ऑर्किडवर लाल कोळी, फुलकिडे, खवले किडे, तुडतुडे, पिठ्या ढेकूण, इत्यादी किडींचा उपद्रव होतो. या किडी पानांतील रस शोषून घेतात, त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
लाल कोळी :
ही कीड पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पानांवर पांढऱ्या रेषा दिसतात. पानांवर कोळ्यांची जाळी दिसतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
फुलकिडे :
हे तपकिरी रंगाचे कीटक पानांवर, फांद्यांच्या शेंड्यांवर, कळ्यांवर अथवा फुलांवर राहून रस शोषून घेतात. रस शोषून घेण्यासाठी हे कीटक पानांचा पृष्ठभाग खरवडून काढतात. त्यामुळे पानांवर चंदेरी पांढऱ्या रंगाच्या रेषा दिसतात. हे कीटक कळ्यांच्या आतील भागात राहून रस शोषून घेतात. अशा कळ्या उमलत नाहीत. अथवा अशा कळ्या उमलल्यास त्यांचा आकार वेडावाकडा दिसतो.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
खवले कीड :
ही कीड पानावर चिकटून राहते आणि पानातील रस शोषून घेते. त्यामुळे पाने सुकतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 मिलिलीटर रोगार या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
मावा :
ही कीड झाडाची पाने, कोवळे शेंडे, कळ्या, फुले यांतील अन्नरस शोषून घेते. या किडीच्या शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर पडतो. हा पदार्थ पानांवर पसरून त्यावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे पानांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. या किडीमार्फत काही विषाणुजन्य रोगांचाही प्रसार होतो.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर मॅलॅथिऑन या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
पिठ्या ढेकूण :
या किड्यांच्या शरीराभोवती पांढऱ्या रंगाच्या धाग्यांचे जाळे असते. त्यामुळे किड्यांच्या अंगाभोवती पांढऱ्या रंगाची पावडर पसरल्यासारखी दिसते. हे किडे फांद्यांच्या खोबणीत, पानांच्या देठाच्या खोबणीत, तसेच कळ्या आणि फुलांच्या देठांवर, पांढऱ्या पुंजक्यांच्या स्वरूपात राहून अन्नरस शोषण करतात. त्यामुळे फुलांची प्रत कमी होते.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर डायमेथोएट अथवा 15 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
ऑर्किड पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण | Important diseases of orchid crop and their control |
या बुरशीजन्य रोगामुळे पानावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. दमट हवामान आणि कमी सूर्यप्रकाश असलेल्या ठिकाणी या रोगाचा प्रसार लवकर होतो.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.
काळी कूज :
हा रोग पिथियम नावाच्या बुरशीमुळे होतो. या बुरशीचा प्रादुर्भाव झालेली झाडे काळी होतात, पाने गळून पडतात आणि आभासी कंदांचा आतील भाग कुजण्यास सुरुवात होते. हा रोग एका झाडावरून दुसऱ्या झाडावर वेगाने पसरतो. कॅटेलिया आणि इपिडेन्ड्र म या प्रकारातील ऑर्किड या रोगाला जास्त प्रमाणात बळी पडतात.
उपाय : झाडाचे पाणी बंद करून झाडाभोवतीची आर्द्रता कमी केल्यास या रोगाचे काही प्रमाणात नियंत्रण होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगट झाडे काढून नष्ट करावीत आणि उर्वरित झाडांवर 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम 45 या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.
ऑर्किडच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री | Harvesting, production and sale of orchid flowers
ऑर्किडच्या फुलांची काढणी ही अत्यंत काळजीपूर्वक करावी लागते. लावलेल्या ऑर्किडला फुले कशा प्रकारची येतात, ती किती दिवसांत फुलतात याचा अभ्यास करून फुलांची काढणी करावी. ऑर्किडला योग्य प्रमाणात खते आणि पाणी मिळाल्यास आणि वाढीला अनुकूल परिस्थिती मिळाल्यास वर्षभरात ऑर्किडला फुले येतात. काही ऑर्किडला वर्षभर सतत फुले येतात तर काही प्रजातींना ठरावीक हंगामात फुले येतात.
अ.क्र. | आर्किडचा प्रकार | फुले लागण्याची वेळ | फुलांचा कालावधी (महिने) |
1 | डेन्ड्रोबियन | जानेवारी ते मार्च | 3 |
2 | व्हेंडा | मार्च ते जुलै | 2 |
3 | कॅटलिया | सप्टेंबर ते डिसेंबर | 3 |
4 | लेडीज स्लीपर | ऑगस्ट ते डिसेंबर | 4 |
5 | पॅफिओपेडिलम | ऑगस्ट ते डिसेंबर | 4 |
6 | ओन्सिडियम | ऑगस्ट ते नोव्हेंबर | 4 |
ऑर्किडची फुले पूर्ण उमलल्यावर 3 ते 4 दिवसांनी त्यांची काढणी करावी. याआधी फुलांची काढणी केल्यास फुले बाजारात पोहोचेपर्यंत सुकून जातात. फुलांची काढणी शक्यतो संध्याकाळी करावी. काढणीनंतर फुलाच्या दांड्याचे खालचे टोक पाण्यात ठेवावे. फुलांच्या काढणीसाठी वापरण्यात येणारा चाकू अथवा कात्री निर्जंतूक असावी.
आपल्याकडे ऑर्किडच्या फुलांची विक्री करताना फुलांचे आकारमान आणि रंग विचारात घेतला जातो. मात्र फुलांची प्रतवारी करताना फुलांच्या दांड्यांची लांबी, दांड्यावरील एकूण कळी अवस्थेतील व पूर्ण उमललेली फुले, फुलांचे आकारमान, दांड्यावरील फुलांची रचना, दांड्यावरील इतर फुलांच्या फांद्यांची संख्या, इत्यादी बाबी विचारात घ्याव्यात.
वर्षभर सतत फुले येणाऱ्या व ठरावीक हंगामात फुले येणाऱ्या ऑर्किडचे उत्पादन प्रजातींनुसार भिन्न भिन्न असते.
ऑर्किडच्या फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण | Packaging and Storage of Orchid Flowers |
फुले काढल्यानंतर ठरावीक आकाराच्या खोक्यात भरून अतिशय काळजीपूर्वक विक्रीसाठी पाठविली जातात. एका खोक्यात सिम्बिडियम प्रकारातील 100 फुले तर डेन्ड्रोबियम प्रकारातील 4 डझन फुले भरली जातात. फुलांच्या कापलेल्या दांड्यांच्या टोकाभोवती ओला कापूस गुंडाळून त्यावरून पॉलिथीनचा कागद गुंडाळल्यास फुले टवटवीत राहतात. फुले टिकविण्यासाठी खास तयार केलेले द्रावण छोट्या घटांमध्ये ओतून त्यात फुलांचे दांडे भिजत ठेवून घटांचे तोंड व्यवस्थित बंद करून पाठविण्याची पद्धत लांबच्या बाजारात फुले पाठविण्यास योग्य असते.
फुले जास्त दिवस टिकण्याकरिता फुलदाणीत 8 एच. क्यू. सी. आणि 5% साखर यांचे द्रावण टाकले तर त्याचा चांगला परिणाम होऊन फुले जास्त काळ टिकतात. शीतगृहामध्ये ऑर्किडची फुले 5 ते 7 अंश सेल्सिअस तापमानामध्ये 10 ते 14 दिवसांपर्यंत साठवून ठेवता येतात.
सारांश |
ऑर्किड हे एक अत्यंत आकर्षक, लाल, नारिंगी, निळा, जांभळा, पिवळा, हिरवा, पांढरा अशा विविध छटा असलेले फूल आहे. ऑर्किडची फुले उमलल्यानंतरही खूप दिवस टवटवीत राहतात. म्हणूनच ऑर्किडच्या फुलांना कटफ्लॉवर म्हणून तसेच ऑर्किडच्या फुललेल्या झाडांना पंचतारांकित हॉटेलांमध्ये आणि श्रीमंत लोकांच्या दिवाणखान्यांत सजावटीसाठी मागणी असते. ऑर्किडच्या फुलांचा उपयोग औषधांसाठी आणि सुगंधित द्रव्य तयार करण्यासाठी केला जातो. अलीकडच्या काळात ऑर्किडच्या काही प्रजातींचा उपयोग बुरशीनाशक तयार करण्यासाठी केला जातो. त्यामुळे ऑर्किडच्या काही प्रजातींना अमेरिका आणि युरोपीय देशांत खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
भारतात ऑर्किडचे जवळपास 1,600 प्रकार असून आसाममध्ये ऑर्किडचे सर्वांत जास्त प्रकार आहेत. महाराष्ट्रात महाबळेश्वर या ठिकाणी नैसर्गिकरित्या ऑर्किड काही झाडांवर वाढलेले दिसून येतात. नियंत्रित वातावरणात ऑर्किडेरियममध्ये ऑर्किडची व्यापारी तत्त्वावर लागवड करता येते. ऑर्किडचे मोनोपोडिअल (एक खोड) आणि सिम्पोडिअल (अनेक खोड) असे दोन प्रकार पडतात. झाडाच्या खोडावर आणि फांद्यांवर वाढणाऱ्या ऑर्किडला इपिफायटिक ऑर्किड असे म्हणतात. उदाहरणार्थ, व्हेंडा, डेन्ड्रोबियम, इत्यादी. जमिनीवर वाढणाऱ्या ऑर्किडला टेरिस्ट्रिअल ऑर्किड असे म्हणतात.
ऑर्किडची अभिवृद्धी बियांपासून आणि शाखीय पद्धतीने करता येते. ऑर्किडेरियममध्ये अथवा सावलीमध्ये मातीच्या अथवा प्लास्टिकच्या कुंड्यांमध्ये वाळू, विटांचे तुकडे अथवा कोळसा भरून त्यात ऑर्किडची छाट कलमे लावतात. • ऑर्किडला नियमित परंतु जरुरीपुरता पाणीपुरवठा करतात. ऑर्किडला खते देण्यासाठी वेगवेगळी मिश्रणे उपलब्ध आहेत. सर्वसाधारणपणे नत्र, स्फुरद आणि पालाश 10 12 10 या प्रमाणात मिसळून ऑर्किडला रासायनिक खते द्यावीत.
ऑर्किडवर प्रामुख्याने लाल कोळी, फुलकिडे, मावा, खवले कीड, पिठ्या ढेकूण, इत्यादी किडींचा तर पानावरील ठिपके, काळीकूज या रोगांचा प्रादुर्भाव होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करणे आवश्यक आहे.
ऑर्किडला प्रजातीनुसार वर्षभर किंवा ठरावीक हंगामात फुले येतात. फुले पूर्ण उमलल्यानंतर त्यांची काढणी करावी. काढणीनंतर फुले ठरावीक आकाराच्या खोक्यात भरून विक्रीसाठी पाठवावीत. ऑर्किडची फुले शीतगृहामध्ये 5 ते 7 अंश तापमानामध्ये 10 ते 14 दिवसांपर्यंत साठवून ठेवता येतात.