palkhi prasthan,पालखी प्रस्थान,पालखी प्रस्थान म्हणजे काय
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
पालखी प्रस्थान :
१०/०६/२०२३- संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान, देहू.
प्रस्थान या शब्दाचा अर्थ – प्रवासासाठी निघणे… आषाढी वारीसाठी संतांच्या पालख्या संत क्षेत्रावरून निघतात. या कार्यक्रमाला प्रस्थान असे म्हणतात. वारीचा हा पहिला दिवस असतो…..
कोणती पालखी कोणत्या दिवशी निघणार याची तिथी म्हणजे प्रस्थानाचा दिवस ठरलेला असतो… संपर्काची प्रभावी साधने नव्हती, त्या काळात लोक कोणत्याही आमंत्रणाशिवाय त्या ठराविक तिथीला त्या संत क्षेत्री जमत. प्रस्थानाच्या कार्यक्रमाचे स्वरूप प्रत्येक पालखीनुसार थोडे वेग वेगळे आहे. ज्ञानेश्वर माउली व संत तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थाना नंतर मंदिरातून बाहेर पडून नगर प्रदक्षिणा करून गावातच थांबते, तर संत एकनाथ, संत सोपानकाका, संत निवृत्तीनाथ व बहुतेक इतर सर्व संतांच्या पालख्या पहिल्या दिवशी प्रस्थाना नंतर अन्य गावी मुक्कामाला पोचतात…..
संत ज्ञानेश्वर माउली व तुकोबांचा प्रस्थान सोहळा…
प्रस्थानाचा कार्यक्रम दुपारी सुरु होतो. प्रस्थानाच्या दिवशी गुरुवार असेल तर ज्ञानेश्वर माऊलींचे प्रस्थान संध्याकाळी होते… प्रस्थानाच्या काही वेळ आधी दर्शन बंद करून मंदिर रिकामे केले जाते. त्यानंतर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश देतात. या दिंड्या मंडपाभोवती अनुक्रमे वर्तुळाकार उभ्या रहातात. जागे अभावी पहिल्या काही दिंड्यांनाच प्रवेश देणे शक्य होते. ज्या दिंड्यांना मंदिरात प्रवेश मिळत नाही, त्या दिंड्या सुद्धा मंदिराच्या बाहेर येऊन थांबतात. सर्व दिंड्यांच्या दिंडीप्रमुखांना मात्र सभामंडपात प्रवेश देतात. देवळाच्या आवारात उभ्या असलेल्या दिंड्यांमध्ये ‘ज्ञानोबा – तुकाराम’ हे भजन सुरु असते. भजन करताना वारकरी विविध खेळ खेळतात…..
सभामंडपात फुलांनी सुशोभित केलेली पालखी ठेवण्यात येते… मंडपात पालखी सभोवती या सोहळ्याचे मानकरी मंडळी बसतात. या मध्ये दिंडी प्रमुख, सोहळ्यामध्ये पूर्वापार सेवा करणाऱ्या मंडळींचे प्रतिनिधी – शिष्य/ वंशज, अन्य देवस्थानांचे प्रतिनिधी यांचा समावेश असतो. पालखीच्या सोबत असणारे अश्व मंदिरात प्रवेश करतात व देवाचे दर्शन घेतात. गाभाऱ्यात समाधीची व पादुकांची पूजा होते. यानंतर मानकरी पादुका उचलून मंडपातील पालखीत आणून ठेवतात. यावेळेस भजन टिपेला पोचते. पादुका पालखीत ठेवल्यावर चोपदार चोप उंचावतात व त्यानंतर भजन थांबते. सर्वत्र शांतता पसरते. यानंतर मंडपात मानकऱ्यांना नारळ प्रसाद दिला जातो. सर्व मानकऱ्यांना प्रसाद दिल्यावर चोपदार इशारा करतात. यानंतर पालखी मंडपाबाहेर आणतात…..
सर्व दिंड्यांमध्ये पुन्हा भजनाला सुरवात होते… छत्र, अब्दागिरी, चवरी यांसह पालखी देऊळवाड्यात प्रदक्षिणा करते. सर्व दिंड्या प्रदक्षिणा करून मंदिराबाहेर पडतात. यावेळेस मंदिरामध्ये जागेअभावी प्रवेश न मिळालेल्या दिंड्या मंदिरात प्रवेश करून आत प्रदक्षिणा करून या सोहळ्यात मागे सामील होतात. हे सर्व होत असताना दिंड्यांचा क्रम काटेकोरपणे सांभाळला जातो…..
यानंतर गावात ठरलेल्या मार्गावरून नगर प्रदक्षिणा करून पालखी सोहळा ठरलेल्या मुक्कामाच्या जागी पोचतो… यावेळेस पालखी खांद्यावरून नेतात. दुसऱ्या दिवसापासून रथाचा वापर करतात. ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचा पहिला मुक्काम आळंदीत गांधीवाड्यात असतो. वारकरी याला आजोळघर असे म्हणतात. तर तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम देहू गावात तुकोबांच्या वंशजांच्या इनामदार वाड्यात असतो. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पोचल्यावर आरती होते. अशा प्रकारे पालखीचे प्रस्थान होते…..
संत सोपानकाका, संत एकनाथ, संत निवृत्तीनाथ व इतर संतांच्या पालखीचे प्रस्थान झाले कि पालखी वाटचालीला सुरवात होऊन पहिलाच मुक्काम दुसऱ्या गावी होतो सोपानकाकांच्या प्रस्थानाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रस्थानापूर्वी मुख्य मंडपात भजन होते. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा। तुझी चरणसेवा पांडुरंगा ।। हा तुकोबांचा अभंग झाला कि पादुका पालखीत आणून ठेवतात…..
काही महत्वाच्या पालख्यांची प्रस्थान तिथी व निघण्याचे ठिकाण…
संत मुक्ताबाई, मेहूण पालखीप्रस्थान – जेष्ठ शुद्ध प्रतिपदा, मेहूण…
संत मुक्ताबाई, कोथळी पालखी प्रस्थान – जेष्ठ शुद्ध पंचमीच्या सुमारास, कोथळी, मुक्ताईनगर.
संत निवृत्तीनाथ महाराज पालखी प्रस्थान – जेष्ठ शुद्ध पौर्णिमा, त्र्यंबकेश्वर…
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान – जेष्ठ वद्य सप्तमी, देहू…
संत एकनाथ महाराज पालखी प्रस्थान – जेष्ठ वद्य सप्तमी, पैठण…
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान – जेष्ठ वद्य अष्टमी, आळंदी…
संत बहेणाबाई पालखी प्रस्थान – जेष्ठ वद्य अष्टमी, देगाव रंगारी, औरंगाबाद…
संत बहेणाबाई पालखी प्रस्थान – जेष्ठ वद्य अष्टमी, शिऊर, औरंगाबाद…
संत सोपानकाका पालखी प्रस्थान – जेष्ठ वद्य द्वादशी, सासवड…
संत निळोबा पालखी प्रस्थान – जेष्ठ वद्य द्वादशी ,पिंपळनेर…