पंचांगाची रचना । Panchang Rachana ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

पंचांग (Panchang Rachana) :

पंचांगात प्रत्येक पक्ष अगर पंधरवड्यासाठी एक सबंध पान दिलेले असते, एक शुक्ल व दुसरे कृष्ण पंधरवड्यासाठी. प्रत्येक पानावर वरच्या बाजूस इसवी सन, हिजरी सन आणि महिना, संवत्, पारशी सन आणि त्या पंधरवड्याच्या शेवटाचा दिवस, प्रा. ग. व एक आकडा असतो… पंचांग गणिताचा प्रारंभ अहर्गणापासून असतो. एकोणीस सौरवर्षांचे एक चक्र असते. एका चक्रात ६,९४० दिवस असतात, याला अहर्गण वा प्रातर्गण असे म्हणतात. यांचा संक्षेप प्रा. ग. असा करून पुढे दिलेला आकडा चक्रातील कितवा दिवस हे दर्शवितो…..

असे हे विविध प्रकारचे गतकालदर्शक आकडे पहिल्या ओळीत असतात… त्यानंतरच्या एका ओळीत शालिवाहन शक, संवत्सराचे नाव, महिन्याचे व पक्षाचे नाव, इंग्रजी महिना, रात्रिमान (रा. मा.), त्या पंधरवड्यातील अयनांश, दक्षिणायन उत्तरायण यांपैकी जे असेल ते आणि त्यातील ऋतू अशी माहिती असते…..

भारतात बंगाली, कोल्लाम, कली, हिजरी, बार्हस्पत्य-वर्ष वगैरे अनेक कालगणना चालू असल्या, तरी शालिवाहन आणि विक्रम संवत् या दोन कालगणना विशेषकरून आढळतात… एकूण संवत्सरांची ६० नावे आहेत. त्यांचे चक्रच असते व तीच नावे पुनःपुन्हा त्याच क्रमाने देण्यात येतात…..

वेदांग ज्योतिषात पंचवर्षात्मक युग मानले आहे… संवत्सर, परिवत्सर, इदावत्सर, अनुवत्सर व इद्वत्सर अशी त्या युगांना नावे दिली आहेत. गुरू सु. १२ वर्षांत एक सूर्यप्रदक्षिण करतो. बारा वर्षांचे गुरूचे एक वर्ष होते. गुरूच्या पाच वर्षांचे एक युग मानलेले होते. अशा युगात ६० सौरवर्षे होतात. त्यांना प्रभवादि नावे दिलेली आहेत. शालिवाहन शकात १२ मिळवून ६० ने भागल्यावर जी बाकी राहील, त्या क्रमांकाचे यांपैकी नाव असते…..

वास्तविक गुरूचा प्रदक्षिणाकाल १२ वर्षांहून लहान असल्याने ८५ सौरवर्षांत ८६ बार्हस्पत्य संवत्सरे (गुरूने आपल्या माध्य– सरासरी– गतीने एक राशी आक्रमिण्यास लागणारा काल) होतात… म्हणजे एका बार्हस्पत्य संवत्सराचा लोप होतो. बार्हस्पत्यमानाने संवत्सरारंभ चैत्र शुद्ध प्रतिपदेस होत नाही. लोप व आरंभ या गोष्टी क्लिष्ट वाटल्यामुळे शके ८२७ पासून दक्षिण भारतात तिकडे दुर्लक्ष झाले. उत्तर भारतात लोपपद्धती शिल्लक राहिली, त्यामुळे दक्षिणेकडील व उत्तरेकडील संवत्सरांची नावे भिन्न दिसतात…..

वर आलेला अयनांश हा उल्लेख खगोलातील ज्या स्थिर बिंदूपासून सूर्य, चंद्र वा ग्रह यांचे भोग दिलेले असतात, त्या स्थिर बिंदूचे वसंतसंपातापासून क्रांतिवृत्तावरील अंतर होय… संपातबिंदू किंचित विलोम (उलट दिशा असलेल्या) गतीचा असल्यामुळे पंचांगात दर पानावर हा आकडा वाढत वाढत गेलेला दिसेल. यापुढे उत्तरायण वा दक्षिणायन व त्यानंतर सहापैकी एका ऋतूचे नाव दिलेले असते…..

अशा सामान्य व प्राथमिक माहितीनंतर पाच अंगांच्या माहितीचे रकाने असतात… पहिला रकाना तिथीचा असतो. यात शुद्ध पक्षात १ ते १५ (पौर्णिमा) आणि वद्य (कृष्ण) पक्षात १ ते १४ व ३० (अमावास्या) असे तिथिदर्शक आकडे असतात. वास्तविक रोज एक तिथी असावयाचीच परंतु या रकान्यात एखादा (तिथीचा) आकडा दोन वेळा आलेला दिसेल, तर एखादा आकडा वगळलेला दिसेल. दोन वेळा येईल तेव्हा त्या तिथीची वृद्धी झाली व वगळलेला असेल तेव्हा नसलेल्या आकड्याच्या तिथीचा क्षय झाला असे म्हणतात…..

यापुढचा रकाना वारांचा असतो. त्यानंतरचे दोन रकाने, ती तिथी त्या दिवशी सूर्योदयापासून किती घटका किती पळे शिल्लक आहे हे दर्शवितात… पृथ्वीच्या आकर्षणामुळे चंद्रकक्षा विवृत्ताकार असल्याने व चंद्रावर सूर्याचेही आकर्षण असल्यामुळे चंद्र-सूर्य यांच्या भोगांत १२° अंतर पडण्यास ६० घटकांहन कमीजास्त काल लागतो. म्हणजे तिथी सारख्या कालावधीच्या नसतात. कमीतकमी ५० व जास्तीत जास्त ६८ घटका, एवढा तिथीचा कालावधी असतो. जी तिथी सूर्याने दृष्ट किंवा सूर्योदयाच्या वेळी असते तीच तिथी संबंध दिवसाची असे मानण्यात येते आणि तोच आकडा तिथिदर्शक रकान्यात असतो…..

काही पंचांगांत जास्त सोयीसाठी म्हणून तिथी सूर्योदयाच्या नंतर किती कलाक (तास)- मिनिटे आहे, हे पुढे आणख्री दोन रकाने घालून देतात… यांपुढील रकान्यात क्रमाने नक्षत्रांची आद्याक्षरे असतात आणि त्यापुढच्या दोन रकान्यांत ते नक्षत्र त्या दिवशी सूर्योदयापासून किती घटका पळे आहे हे दिलेले असते. त्यावरून चंद्र त्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी व त्यानंतर कितो वेळ कोणत्या नक्षत्रात आहे हे समजते. तिथीप्रमाणेच हे त्या दिवसाचे दिवस-नक्षत्र मानले जाते. एकेक नक्षत्र सामान्यतः ६० घटका असते परंतु तिथीप्रमाणे याचाही कालावधी कमीजास्त असल्याने नक्षत्रालासुद्धा क्षय-वृद्धी असते. नक्षत्रासाठीही तिथीप्रमाणेच काही पंचांगांत कलाक-मिनिटांचे दोन आणखी रकाने असतात. यानंतरचे तीन रकाने योग व त्यांची घटका-पळे यांसाठी असतात…..

प्रमुख पाच अंगांखेरीज इतर माहितीसाठी आणखी रकाने असतात… एकामध्ये दररोजचे बदलते दिनमान म्हणजे सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत नुसता दिवस किती घटका-पळांचा आहे हे दिलेले असते. मुसलमानी तारीख, भारतीय दिनांक, इंग्रजी तारीख, रविउदयाच्या व रविअस्ताच्या कलाक- मिनिटात वेळा अशी माहिती पुढील रकान्यांतून असते. शेवटच्या जरा मोठ्या रकान्यात चंद्र त्या दिवशी कोणत्या राशीत असेल ती राशी दिलेली असते. त्या दिवशी दिवसभर त्या राशीत चंद्र नसेल, तर किती घ.प.नंतर पुढची रास लागते हे राशीच्या नावासह दिलेले असते…..

हे रकाने संपल्यावर पुढील जागेत प्रत्येक तिथीच्या पुढे दिनविशेष दिलेला असतो… त्यात जयंत्या, पुण्यतिथी, सण, प्रदोष, एकादशी, संकष्टी वगैरे व्रतवैकल्ये दग्ध, घबाड, गुरुपुष्य वगैरेंसारखे बरेवाईट योग इ. माहिती दिलेली असते. यांशिवाय निरनिराळे ग्रह कोणत्या राशीत किंवा कोणत्या नक्षत्रात किंवा त्याच्या कोणत्या चरणात आणि केव्हा प्रवेश करतात (घ.प.) ही महत्त्वाची माहिती दिलेली असते. ग्रहांचे उदयास्त दिलेले असतात. पानातच एक कुंडली दिलेली असते. कुंडली म्हणजे विशिष्ट वेळेचा आकाशाचा नकाशा. ही दिलेली कुंडली अमावास्येच्या किंवा पौर्णिमेच्या क्षणाची असते. यावरून कोणत्या राशीत कोणता ग्रह आहे हे चटकन समजते. काही मोठ्या पंचांगांत त्या पंधरवड्यात जितक्या वेळा ग्रहांचा राशि-बदल असेल तितक्या व त्या त्या बदलाच्या क्षणांच्या कुंडल्या दिलेल्या असतात. यांशिवाय एका कोपऱ्यातील कोष्टकात पौर्णिमा किंवा अमावास्या या क्षणांचे स्पष्ट ग्रह दिलेले असतात. ग्रहांच्या नावाखाली पूर्ण झालेल्या राशीचा अंक, त्यानंतर अंश, कला व विकला दिलेल्या असतात. त्याखाली प्रत्येक ग्रहाची दररोजची त्या पंधरवड्यातील सरासरी गती कलांमध्ये दिलेली असते…..

त्याखालीच ग्रह वक्री आहे की काय याचीही माहिती असते… ग्रहावलोकन म्हणचे त्या पंधरवड्यात कोणकोणते ग्रह आकाशात केव्हा व कोठे दिसू शकतील हे ढोबळ मानाने कधीकधी दिलेले असते. महाराष्ट्रात मराठीत अनेक पंचांगे रूढ आहेत. त्यांची रचना किरकोळ बाबतींत थोडीफार भिन्न असण्याची शक्यता असते. कधीकधी घ. प. कमी करून शक्यतो सर्वत्र स्टँ. टा. (प्रमाण वेळ) ची क. मि. देण्यात येतात…..

याखेरीज पुढे मागे काही पाने जोडून ज्योतिषशास्त्र दृष्ट्या उपयुक्त माहिती सविस्तरपणे दिलेली असते… प्रत्येक इंग्रजी तारखेस ग्रहांची स्थाने, रविक्रांती, लग्ने यांची मोठी कोष्टके असतात. असल्यास चंद्रसूर्याची ग्रहणे, युत्या, ग्रहांचे राशिप्रवेशकाल तसेच लग्नमुंजीचे आणि वास्तुशांतीचे मुहूर्त यांची माहिती असते. मोठमोठ्या गावांचे अक्षांश-रेखांश, वर्षभविष्य, पावसाचे त्या वर्षी नक्षत्रागणिक प्रमाण, निरनिराळ्या कामांस मुहूर्त, गोत्रावळ्या, अशौच निर्णय, मकरसंक्रांतीची वाहनादी माहिती, वधूवर गुणमेलन कोष्टक व अवकहडा चक्र अशी कितीतरी प्रकारची माहिती देण्यात येते. पंचांगाच्या मुखपृष्ठावर पंचांगांचे गणित कोणत्या अक्षांश-रेखांशाचे व वेळा प्रमाण वेळेप्रमाणे कोणत्या स्थळाच्या आहेत हे सांगितलेले असते…..

पंचांगे चांद्रसौर मानाची असल्यामुळे महिने, तिथी वगैरे जरी चांद्रगणनेप्रमाणे असली, तरी सौरमानाशी जुळते घेण्यासाठी सु. तीन वर्षांनी अधिक महिन्याची व काही वर्षांनी क्षय महिन्याची जरुरीप्रमाणे पंचांगात तरतूद केलेली असते….. अधिकमास क्षयमास)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )