जाणून घ्या फालसा लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Phalsa Lagwad Mahiti (Falsa) Phalsa Sheti) – Phalsa Farming (Falsa Farming)

फालसा लागवड |Phalsa Lagwad | Phalsa Sheti-Falsa Sheti|फालसा पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।फालसा पिकाखालील क्षेत्र । फालसा पिक उत्पादन ।फालसा पिकास योग्य हवामान । फालसा पिकास योग्य जमीन ।फालसा पिकाच्या सुधारित जाती ।फालसा पिकाची अभिवृद्धी । फालसा पिकाची लागवड ।फालसा पिकास योग्य हंगाम । फालसा पिकास योग्य लागवडीचे अंतर ।फालसा पिकास वळण । फालसा पिकास छाटणीच्या पद्धती ।फालसा पिक खत व्यवस्थापन । फालसा पिक पाणी व्यवस्थापन ।फालसा पिकातील आंतरपिके । फालसा पिकातील तणनियंत्रण ।फालसा पिकावरील महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण ।फालसाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।फालसाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

फालसा लागवड |Phalsa Lagwad | Phalsa Sheti-Falsa Sheti|

फालसा हे अत्यंत काटक आणि दुष्काळात तग धरून राहणारे फळझाड असून कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगले वाढते. फालसाच्या झाडाची लागवड केल्यानंतर दुसऱ्या वर्षापासून फळे मिळण्यास सुरुवात होते आणि सुमारे 20 वर्षांपर्यंत या झाडांपासून उत्पादन मिळते. फालसाची फळे करंवदाच्या रंगाची परंतु आकाराने लहान आणि गोल असतात. चव आंबट-गोड असते. पक्व ताजी फळे खाण्यास चविष्ट आणि रुचकर असतात. पाण्याची कमतरता असणाऱ्या भागात फालसाच्या लागवडीस चांगला वाव आहे.

फालसा पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।

फालसा या फळझाडाचे उगमस्थान भारत हा देश आहे. भारतात पंजाब, हरियाना राजस्थान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यात फालसाची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते.
फालसाची फळे लहान आकाराची, गोल असून चवीला आंबट-गोड असतात. फालसाची फळे उन्हाळयात पक्क होऊन काढणीसाठी तयार होतात. फालसाची ताजी फळे खाण्यासाठी वापरतात. फालसाच्या फळांपासून स्क्वॅश आणि सरबत तयार करता येते. फालसाच्या फळांचा आणि मुळ्यांचा रस उष्णतेपासून होणारे विकार, मधुमेह, तीव्र रक्तदाब वगैरे विकारांवर अतिशय उपयुक्त आणि लाभदायक आहे. फालसाच्या फळांमध्ये 50 ते 60 % रसाचे प्रमाण असते. फळामध्ये साखरेचे प्रमाण 10% आणि आम्लाचे प्रमाण 2% इतके असते. फालसाच्या फळांमध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व तसेच लोह आणि स्फुरद ही खनिजे भरपूर प्रमाणात असतात. फालसाच्या झाडाच्या छाटणीनंतर मिळणाऱ्या फांद्यांपासून वेताच्या पाट्यांसारख्या चांगल्या मजबूत पाट्या विणता येतात. या पाट्यांचा उपयोग फळे आणि भाजीपाला वाहतुकीसाठी करता येतो. फळझाडाच्या लागवडीचे अंतर जास्त असणाऱ्या फळझाडाच्या आंबा, चिंच, कवठ, आवळा, जांभूळ यांसारख्या लागवडीमध्ये आंतरपीक म्हणून लावण्यासाठी फालसा हे उत्कृष्ट फळझाड आहे. फालसाचे झाड झुडपासारखे वाढत असल्यामुळे शेताच्या बांधावर लावण्यासाठी चांगले आहे.

फालसा पिकाखालील क्षेत्र । फालसा पिक उत्पादन ।

भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाना, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांत फालसाची व्यापारी तत्त्वावर लागवड केली जाते. इतर राज्यांत फालसाची झाडे नैसर्गिकरित्या वाढलेली आढळतात. महाराष्ट्रात पुणे, कोल्हापूर, अहमदनगर, नागपूर, अकोला या ठिकाणी फालसाच्या झाडाची स्वतंत्र लागवड तुरळक प्रमाणात आढळते. फालसाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन यांबाबत निश्चित आकडेवारी उपलब्ध नाही. फालसाचे उत्पादनक्षम आयुष्य सुमारे 20 वर्षांचे असते.

फालसा पिकास योग्य हवामान । फालसा पिकास योग्य जमीन ।

फालसा हे समशीतोष्ण कटिबंधातील झाड असून कडक हिवाळा आणि उन्हाळा असणाऱ्या प्रदेशात फालसाचे झाड चांगले वाढते. कडक हिवाळा असणाऱ्या भागात फालसाच्या झाडाची पानगळ होते आणि झाड सुप्तावस्थेत जाते. त्यामुळे हिवाळ्यातील कडक थंडीला फालसाचे झाड चांगले दाद देऊ शकते.
ज्या भागात हिवाळ्यात थंडी कमी असते अशा हवामानात वाढणाऱ्या फळांची प्रत चांगली नसते. तथापि, फालसाचे झाड 44 अंश सेल्सिअस इतके उष्ण तापमान सहन करू शकते. जास्त तापमानात फळांची पक्वता चांगली होते. फालसाच्या झाडाला फुले येण्याच्या काळात हवामान स्वच्छ असावे. झाडाला फुले येण्याच्या काळात पाऊस पडल्यास फलधारणा कमी प्रमाणात होते. फालसाचे फळझाड अनेक प्रकारच्या जमिनींत चांगले वाढते. फालसाचे झाड खारवट जमिनीतही चांगले येते. ज्या जमिनीत इतर फळझाडे वाढू शकत नाहीत अशा जमिनीत फालसाची यशस्वी लागवड करता येते. मात्र पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत फालसाच्या झाडाची नीट वाढ होत नाही. पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या पोयटायुक्त जमिनीत फालसाची झाडे उत्तम वाढतात. फालसाच्या झाडाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्यामुळे भारी जमीन अथवा चुनखडीचा थर असलेली जमीन फालसाच्या लागवडीसाठी निवडू नये. डोंगरउताराच्या जमिनीत फालसाची झाडे लावून जमिनीची धूप थांबविता येते..

फालसा पिकाच्या सुधारित जाती ।

फालसाच्या झाडाच्या प्रचलित सुधारित जाती उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी ‘स्थानिक’ आणि ‘शरबती’ अशा नावाने फालसाच्या झाडाचे दोन प्रचलित प्रकार दिसून येतात. याशिवाय हिस्सार येथे फालसाच्या जातीचे उंच आणि बुटक्या जाती असे दोन प्रकार असून यांपैकी बुटक्या जाती अधिक उत्पादन देतात.

फालसा पिकाची अभिवृद्धी । फालसा पिकाची लागवड ।

फालसाची अभिवृद्धी प्रामुख्याने बियांपासून रोपे तयार करून करतात. फालसाच्या फळांपासून काढलेल्या ताज्या बिया रोपे तयार करण्यासाठी वापरतात. 90 ते 100 दिवसांत बियांची उगवणशक्ती झपाट्याने कमी होते. मात्र थंड तापमानाला साठविल्यास बियांची उगवणशक्ती सहा महिन्यांपर्यंत चांगली राहते. बिया 15 ते 20 दिवसांत उगवून 3-4 महिन्यांत रोपे शेतात लावणीयोग्य होतात. फालसाची अभिवृद्धी फाटे कलमाने किंवा गुटी कलम पद्धतीने करता येते; परंतु त्यासाठी संजीवकांचा वापर करावा लागतो. पावसाळी हंगामात फांद्यांपासून जाड फाटे कलमे तयार करून 100 पी. पी. एम. तीव्रतेच्या इंडॉल ब्युटेरिक अॅसिडच्या द्रावणात 24 तास बुडवून लावल्यास 60% कलमांना मुळया फुटतात. गुटी कलमे तयार करण्यासाठी काप घेतलेल्या भागावर इंडॉल ब्युटेरिक अॅसिड किंवा नॅफ्थॅलीन अॅसेटिक अॅसिड या संजीवकांच्या 5,000 ते 10,000 पीपीएम तीव्रतेच्या द्रावणाचा वापर केल्यास 80 ते 90% गुटी कलमांना मुळ्या फुटतात. भेट कलमे करून गावठी फालसाचे रूपांतर चांगल्या जातींमध्ये करता येते. फालसाच्या रोपांची / कलमांची लागवड करण्यापूर्वी जमिनीची चांगली मशागत करावी. त्यासाठी जमीन चांगली उभी-आडवी नांगरून घ्यावी. जमिनीत दर हेक्टरी 10 ते 15 टन चांगले शेणखत टाकावे. शेणखत टाकल्यावर जमीन पुन्हा उभी – आडवी नांगरून घेऊन शेणखत मातीत चांगले मिसळून घ्यावे. फालसाच्या लागवडीसाठी 50X50X50 सेंटिमीटर आकाराचे खड्डे खणून प्रत्येक खड्डा अर्धा किलो सुपर फॉस्फेट आणि चांगले कुजलेले शेणखत व मातीच्या मिश्रणाने भरावा. पावसाळयाच्या सुरुवातीला प्रत्येक खड्डयात फालसाचे एक रोप लावावे.

फालसा पिकास योग्य हंगाम । फालसा पिकास योग्य लागवडीचे अंतर ।

फालसाच्या रोपांची लागवड शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीलाच जून-जुलै महिन्यात करावी. पाणी देण्याची सोय असल्यास रोपांची अथवा कलमांची लागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करावी. भारी जमिनीत रोपांची लागवड 3X3 मीटर अंतरावर करावी. हलक्या जमिनीत रोपांची लागवड 2.5 x 2.5 मीटर अंतरावर करावी. जोड ओळ पद्धतीने फालसाची लागवड केल्यास दर हेक्टरी झाडांची संख्या वाढल्यामुळे एकूण उत्पादनात 20 ते 30 टक्क्यांनी वाढ होते. जोड ओळ पद्धतीने लागवड करताना 60 सेंमी. अंतरावर एका ठिकाणी फालसाची रोपे लावावीत. रोपांची दुसरी जोडी पहिल्या जोडीपासून 3 मीटर अंतरावर लावावी. अशा प्रकारे दोन जोड ओळींच्या रांगेतील अंतर 3 मीटर ठेवावे.

फालसा पिकास वळण । फालसा पिकास छाटणीच्या पद्धती ।

फालसा या फळझाडापासून भरपूर आणि दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी झाडाची छाटणी करणे आवश्यक आहे. फालसाच्या झाडाला नवीन फुटीवरच फुले आणि फळे येतात. जुन्या खोडावर फुले आणि फळे येत नाहीत. त्यामुळे फालसाच्या झाडाची दरवर्षी छाटणी करावी लागते. फालसाच्या झाडाला छाटणीनंतर जास्तीत जास्त धुमारे फुटतील या दृष्टीने छाटणी करावी. छाटणी केल्यानंतर नवीन वाढीतील फुटीवर पानांच्या बेचक्यातून फळधारणा झुपक्याने होते. म्हणूनच झाडाची छाटणी केल्यानंतर येणारी फूट जास्तीत जास्त जोमदार आणि भरघोस वाढीची निघावी या दृष्टीने छाटणी करावी. निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या पद्धतीने फालसाच्या झाडाची छाटणी करतात. उत्तर भारतात आणि आंध्र प्रदेशात फालसाच्या झाडाची जमिनीला लागून छाटणी करतात; परंतु त्यामुळे फलधारणा उशिरा होऊन उत्पादनही कमी येते. जमिनीपासून 1.5 मीटर उंचीवर झाडांची हलकी छाटणी केल्यास भरपूर उत्पादन मिळते. छाटणी करताना लहान फांद्या कात्रीने आणि मोठ्या जाड फांद्या करवतीने कापून काढाव्यात. महाराष्ट्रातील हवामानात फालसाच्या झाडांची छाटणी जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात करावी. यापूर्वी छाटणी केल्यास नवीन कोवळी फूट कडक थंडीच्या माऱ्यात सापडून नुकसान होण्याची शक्यता असते.

फालसा पिक खत व्यवस्थापन । फालसा पिक पाणी व्यवस्थापन ।

बहुतेक ठिकाणी निकृष्ट जमिनीवरच फालसाचे फळझाड घेतले जात असल्याने झाडाच्या सुरुवातीच्या वाढीच्या काळात सर्वसाधारणपणे दर 15 ते 20 दिवसांनी झाडाच्या वाढीनुसार नत्रयुक्त खते देणे अत्यंत आवश्यक आहे. लागवडीनंतर एक ते दीड महिन्यांनी 15 ते 25 सेंटिमीटर अंतरावर गोलाकार चर घेऊन 100 ग्रॅम युरिया अथवा 300 ग्रॅम सुफला (15 15 15) द्यावा. जमीन खुरप्याने हलवून घ्यावी आणि खत दिल्यानंतर पाणी द्यावे. झाडाचा पसारा पाहून वाफे तयार करून नत्रयुक्त खताचे प्रमाण वाढवीत जावे. 3 ते 5 वर्षे वयाच्या प्रत्येक झाडाला 300 ते 400 ग्रॅम युरिया द्यावा. छाटणीनंतर प्रत्येक झाडाला 10 ते 15 किलो शेणखत आळे पद्धतीने मातीत मिसळून दिल्यास उत्पादनात भरीव वाढ होते.
स्फुरद आणि पालाशाच्या कमतरतेमुळे झाडाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम झाल्याचे काही ठिकाणी आढळून आले आहे. राजस्थानमध्ये दर हेक्टरी 100 किलो नत्र, 40 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश दिल्याने फालसाचे उत्पादन वाढल्याचे दिसून आले आहे. जस्त आणि लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांमुळे फालसाच्या फळांचा आकार आणि फळांतील रसाचे प्रमाण वाढते. फालसाची फुले उमलण्यापूर्वी 0.4% झिंक सल्फेटचा फवारा द्यावा. यासाठी 10 लीटर पाण्यात 40 ग्रॅम झिंक सल्फेट मिसळावे.
नत्रयुक्त खते दिल्यानंतर ताबडतोब पाणी देणे आवश्यक असते. फालसाचे झाड इतर पाण्याचा ताण सहन करू शकते; परंतु फुलोरा येण्याच्या आणि फळवाढीच्या काळात पाणी दिल्यास फळांची अधिक जोमाने वाढ होऊन फळांतील रसाचे प्रमाण वाढते. वेळी मात्र जमिनीचा मगदूर, हवामान आणि मुख्यत: जमिनीतील ओलावा पाहूनच पाणी द्यावे. उन्हाळयात 15 ते 20 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

फालसा पिकातील आंतरपिके । फालसा पिकातील तणनियंत्रण ।

फालसाच्या लागवडीनंतर सुरुवातीच्या 4 ते 5 वर्षांच्या काळात झाडाच्या दोन ओळींच्या मधील रिकाम्या जागेत पाण्याच्या उपलब्धतेनुसार मुळा, गाजर, वांगी, गवार, टोमॅटो, भेंडी, कांदा आणि पालेभाज्या यांसारखी आंतरपिके घेणे शक्य आहे. फालसाची झाडे लहान असताना मूग, उडीद, चवळी यांसारखी द्विदल पिके तसेच तागासारखी हिरवळीची पिके पावसाळ्यात आंतरपिके म्हणून घ्यावीत. त्यांचा खत म्हणून उपयोग होतो. पुष्कळ वेळा फालसाचे झाड आंबा, चिंच, आवळा यांसारख्या लागवडीचे अंतर जास्त असणाऱ्या फळझाडांमध्ये आंतरपीक म्हणून घेतले जाते.
फालसाच्या झाडाच्या आळयाभोवती असलेली तणे वेळोवेळी खुरपून काढून टाकावीत, त्यामुळे बुंध्यालगतची माती सैल होऊन झाडांची वाढ जोमदार होते. तणांचे नियंत्रण केल्यामुळे कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. झाडांची छाटणी केल्यानंतर नांगरणी केल्यामुळे तणे जमिनीत गाडली जाऊन तणांचे नियंत्रण होण्यास मदत होते.

फालसा पिकावरील महत्त्वाच्या किडी, रोग आणि त्यांचे नियंत्रण ।

फालसाच्या झाडावर किडी आणि रोगांचा फारसा उपद्रव दिसून येत नाही. परंतु काही वेळा साल पोखरणाऱ्या अळीचा उपद्रव फालसाच्या झाडावर मोठ्या प्रमाणावर होतो.

साल पोखरणारी अळी :

ही अळी झाडाचे खोड आणि फांद्यांवरील साल पोखरून आत शिरते. आतील भागावर उपजीविका करते. अळीचा उपद्रव झालेल्या फांद्या सुकतात.

उपाय : साल पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी झाडाची छाटणी केल्यानंतर डिसेंबर-जानेवारी महिन्यात अळीने पाडलेल्या छिद्रांमध्ये नुवाक्रॉनमध्ये भिजविलेल्या कापसाचा बोळा घालून छिद्रे बंद करावीत आणि मातीने लिंपून घ्यावीत.

पानांवरील तपकिरी ठिपके (ब्राऊन स्पॉट) :

सर्कोस्पोरा ग्रेवी नावाच्या बुरशीमुळे फालसाच्या पानांच्या दोन्ही बाजूंस तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. हे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पानांवर पसरतात. त्यामुळे पाने पूर्ण वाढ होण्यापूर्वीच गळून पडतात.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 40 मिलिलीटर डायथेन झेड- 78 हे बुरशीनाशक मिसळून झाडावर फवारणी करावी.

फालसाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

फालसाच्या झाडाला लागवडीनंतर दुसऱ्या वर्षापासूनच फळे येण्यास सुरुवात होते; परंतु फालसाच्या झाडाचे तिसऱ्या वर्षापासून व्यापारी तत्त्वावर उत्पादन घेता येते. फालसाची फळे एकदम तयार होत नसल्यामुळे फळांची वारंवार तोडणी करावी. तोडणीचा खर्च मात्र वाढतो. जानेवारीच्या दुसऱ्या पंधरवड्यात छाटलेल्या झाडांची फळे साधारणपणे एप्रिल- मे महिन्यांत तयार होतात. फालसाची फळे तयार होऊन पक्व होण्यास सुरुवात झाल्यावर फळांचा हिरवा रंग बदलून फळांवर पिवळसर छटा दिसतात. त्यानंतर लालसर गुलाबी रंगाची छटा येऊन फळे गर्द जांभळ्या रंगाची झाल्यावर पूर्ण पक्व झाली असे समजावे. व्यवस्थित काळजी घेऊन झाडे वाढवली तर फालसाच्या प्रत्येक झाडापासून सरासरी 6 ते 7 किलो फळे मिळतात.
फालसाच्या फळांची तोडणी केल्यानंतर फळे जास्त काळ टिकत नाहीत; म्हणूनच काढणीनंतर ती ताबडतोब विक्रीसाठी पाठविणे आवश्यक असते. फळांची विक्री करण्यासाठी सर्वसाधारणपणे 3 ते 5 किलो वजनाची फळे बसतील अशा उभ्या करंड्या वापराव्यात. प्रथम करंड्यात तळाशी आणि बाजूला करंजीचा पाला लावून फळे भरावीत आणि पुन्हा वर पाला घालावा.

फालसाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।

फालसाची फळे अत्यंत नाशवंत असल्यामुळे काढणीनंतर फळांची जास्त दिवस साठवण करता येत नाही. फालसाची फळे झाडांवरच पिकत असल्यामुळे फळे पिकविण्याच्या स्वतंत्र पद्धती नाहीत.

सारांश ।

फालसा हे समशीतोष्ण कटिबंधातील झाड असून अत्यंत काटक आणि ‘दुष्काळात तग धरून राहणारे झाड आहे. फालसाच्या झाडाच्या वाढीसाठी कडक थंडी आणि उन्हाळा असणारे हवामान आवश्यक असते. फालसाचे झाड कोणत्याही प्रकारच्या जमिनीत चांगले वाढते. फालसाच्या झाडावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात येतो.
फालसाच्या झाडाला नवीन फुटींवरच फुले आणि फळे येतात. त्यामुळे फालसाच्या झाडाची दरवर्षी छाटणी करणे आवश्यक असते. फालसाच्या एका झाडापासून सुमारे 6 ते 7 किलो फळे मिळतात. फालसाची फळे अतिशय नाशवंत असल्यामुळे काढणीनंतर जास्त काळ साठवून ठेवता येत नाहीत.

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )