जाणून घ्या फणस लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Phanas Lagwad Mahiti Phanas Sheti) – Jackfruit Farming

फणस लागवड |Passion Fruit Lagwad | Passion Fruit Sheti | फणस पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।फणस लागवडीखालील क्षेत्र । फणस पिकाचे उत्पादन । फणस पिकासाठी योग्य हवामान । फणस पिकासाठी योग्य जमीन ।फणस पिकाच्या सुधारित जाती । फणस पिकाची अभिवृद्धी । फणस पिकाची लागवड पद्धती । फणस पीक लागवड हंगाम । फणस पीक लागवडीचे अंतर ।फणस पिकास वळण । फणस पिकास छाटणीच्या पद्धती । फणस पिक खत व्यवस्थापन । फणस पिक पाणी व्यवस्थापन । फणस पिकातील आंतरपिके । फणस पिकातील तणनियंत्रण ।फणस पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।फणस पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।फणसाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।फणसाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

फणस लागवड |Phanas Lagwad | Phanas Sheti |

फणस हे कोरडवाहू फळझाड असून फणसाची फळे कोकण भागात अतिशय लोकप्रिय आहेत. कोकणात 150 ते 200 वर्षे वयाची फणसाची झाडे अनेक ठिकाणी आढळतात. कोकणात आणि पश्चिम घाटातील जंगलात फणसाची झाडे नैसर्गिकरित्या वाढलेली दिसतात. दक्षिण भारतात कॉफी, नारळ, सुपारी, वेलदोडा आणि काळी मिरी या पिकांची लागवड करताना त्या पिकांना सावली मिळावी म्हणून फणसाची झाडे लावली जातात. अलीकडच्या काळात पुण्या-मुंबईसारख्या शहरी भागात फणसाची फळे मोठ्या प्रमाणावर इतर राज्यांतून आयात केली जातात. त्यामुळे महाराष्ट्रात फणसाची व्यापारी तत्त्वावर लागवड करणे फायदेशीर होऊ लागले आहे.

फणस पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।

फणस हे मोरेसिया या वनस्पती कुळातील फळझाड असून फणसाचे उगमस्थान भारत देश समजले जाते. भारतातून या झाडाचा प्रसार मलेशिया, वेस्ट इंडिज, इत्यादी देशांत झाला.
जगात भारत, म्यानमार, श्रीलंका, जमैका, मॉरिशस, ब्राझील, इत्यादी देशांत फणसाची झाडे आढळतात. भारतात फणसाची लागवड प्रामुख्याने आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, तामीळनाडू आणि पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर केली जाते.
फणस हा पोषणमूल्याच्या दृष्टीने पौष्टिक असतो. फणसाच्या गरापेक्षा फणसाच्या बियांमध्ये कार्बोहायड्रेट्स्, प्रोटीन्स आणि खनिजे तुलनात्मकदृष्ट्या जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे फणसाच्या बिया भाजून किंवा उकडून खाणे कोकणात फारच लोकप्रिय आहे. कोकणात फणसाची कच्ची फळे भाजी करण्यासाठी वापरतात. फणसाच्या फळांचे गर आणि बी सोडून राहिलेल्या 55 ते 65 % फळाचा भाग जनावरांना खाद्य म्हणून वापरता येतो. फणसाच्या गरापासून पापड आणि सुकविलेले पदार्थ तयार करता येतात. फणसापासून फणसपोळी, जॅम, जेली, सरबत, लोणचे इत्यादी विविध टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. कापा फणसाचे गरे हवाबंद डब्यात भरून साठविता येतात.
फणसाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागातील घटकांचे प्रमाण पुढीलप्रमाणे असते.

अन्नघटककच्चा गर प्रमाणपक्व गर
प्रमाण
बिया प्रमाण
पाणी847765
शर्करा (कार्बोहायड्रेट्स्)9.019.026.0
प्रथिने (प्रोटीन्स)2.62.06.6
स्निग्धांश (फॅट्स)0.30.10.4
खनिजे0.90.81.2
तंतुमय पदार्थ1.1
कॅल्शियम0.050.020.02
फॉस्फरस0.100.030.03
लोह0.0020.5
पोटॅशियम0.025
जीवनसत्त्व ‘अ’540 इंटरनॅशनल युनिट17 इंटरनॅशनल युनिट
उष्मांक (कॅलरी)84
फणसाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण

फणसाच्या झाडाला वाळवी लागत नाही. फर्निचरसाठी फणसाचे लाकूड उत्कृष्ट समजले जाते. फणसाच्या लाकडाला पॉलिश केल्यावर ते आणखी उत्कृष्ट दिसते. कोकणात तसेच देशावर घरासाठी फणसाचे लाकूड वापरले जाते. फणसाचे लाकूड चांगले टिकाऊ असून या लाकडाचा वापर शेती अवजारांसाठी, बैलगाड्यांचे जू, विहिरीसाठी, भात गिरणीतील उखळाचे दांडे आणि बोटीसाठी करतात. फर्निचर, केबिनेट्स तसेच पेट्या तयार करण्यासाठी फणसाचे लाकूड उत्कृष्ट असल्याने युरोपात फणसाच्या लाकडाची निर्यात होते.

फणस लागवडीखालील क्षेत्र । फणस पिकाचे उत्पादन ।

भारतात अंदाजे 66,572 हेक्टर क्षेत्र फणसाच्या लागवडीखाली असून त्यापैकी सर्वांत जास्त क्षेत्र बिहार आणि आसाम या राज्यांत आहे. आसाममध्ये फणसाच्या लागवडीखाली 8,000 हेक्टर क्षेत्र असून बिहारमध्ये 4,000 हेक्टर क्षेत्र आहे. दक्षिण भारतात सुमारे 2,000 हेक्टर क्षेत्र फणसाच्या लागवडीखाली आहे. महाराष्ट्रात सुमारे 1,000 हेक्टर क्षेत्र असून ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, चंद्रपूर, बुलढाणा, भंडारा या राज्यात फणसाची झाडे आढळतात. वार्षिक उत्पादन सुमारे 15,000 टनांच्या आसपास येते.

फणस पिकासाठी योग्य हवामान । फणस पिकासाठी योग्य जमीन ।

फणसाचे पीक उष्ण कटिबंधातील हवामानात वाढणारे आहे. कोकणातील उष्ण आणि दमट हवामान फणसाच्या झाडाला चांगले मानवते. अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, नाशिक, धुळे या जिल्ह्यांत फणसाची झाडे चांगली वाढतात. अतिउष्ण आणि अतिकोरडे हवामान फणसाच्या झाडाला मानवत नाही. धुके आणि कडाक्याच्या थंडीचा फणसाच्या झाडावर वाईट परिणाम होतो. इतर कोरडवाहू झाडांच्या तुलनेत फणसाच्या झाडाला कसदार आणि खोल जमीन लागते. फणसाचे झाड उत्तम गाळाच्या आणि खोल जमिनीत चांगले वाढते. जांभ्या दगडापासून बनलेल्या सुपीक, पाण्याचा चांगला निचरा होणाऱ्या, रेताड पोयट्यापासून अथवा तांबड्या जमिनीत फणसाची वाढ चांगली होते.

फणस पिकाच्या सुधारित जाती ।

फणसामध्ये फळाचा आकार आणि गराचा रंग, मऊपणा, इत्यादींवरून वेगवेगळया स्थानिक जाती प्रचलित आहेत. परंतु फणसाच्या स्थानिक जाती उपलब्ध नाहीत. फणसाच्या झाडाचे गराच्या मऊपणावरून ‘कापा’ आणि ‘बरका’ असे दोन प्रमुख प्रकार पडतात. फळांच्या बाह्य स्वरूपावरून कापा आणि बरका या जातीची फळे ओळखण्यास शक्य होत नाही. यासाठी मूळ झाडांची माहिती असणे आवश्यक असते.

कापा फणस :

कापा प्रकारच्या फणसाच्या फळातील गरे कोरडे, खुसखुशीत, गोड आणि उत्तम स्वादाचे असतात. गरे पिवळे, पिवळे जर्द किंवा केशरी रंगाचे असतात. कापा फणसाचे गरे मीठ लावून तळल्यास चांगले खुसखुशीत लागतात. पिकलेले गरे हवाबंद डब्यात साठविता येतात. म्हणून कापा फणसांना बाजारात चांगली मागणी असते.

बरका फणस :

बरका प्रकारच्या फळांचे गरे मऊ, रसाळ आणि भरपूर प्रमाणात रेषा असलेले आढळतात. अशा गरांपासून प्रामुख्याने फणसपोळी आणि घारगे तयार करतात. ह्या फणसाचे गरे जास्त काळ टिकत नाहीत. परंतु या फणसाच्या गऱ्यांपासून तयार केलेली फणसपोळी वर्षभर साठविता येते.

सिंगापुरी फणस :

सिंगापुरी जातीचे फणस दक्षिण भारतात काही ठिकाणी आढळून येतात. ही जात श्रीलंकेतून आणण्यात आली आहे. या जातीच्या फळांना अडीच ते तीन वर्षांनी फळे धरण्यास सुरुवात होते. ही भरपूर उत्पादन देणारी जात असून या जातीची फळे मोठी आणि मध्यम दर्जाची असतात.

नारळी फणस :

कोल्हापूर जिल्ह्यात आजरा या गावी नारळी फणसाचे झाड निवड पद्धतीने शोधून काढले आहे. या फणसाची फळे नारळाच्या आकाराएवढी असतात. म्हणून यास नारळी फणस असे म्हणतात. नारळी फणसाच्या एका फळाचे वजन दोन किलोपर्यंत असते. या जातीच्या फणसाचे गरे कापा प्रकारचे असतात. सर्वसाधारणपणे फणसाच्या मोठ्या फळात 27% गरे आणि 16% बी आढळते. अशा प्रकारे मोठ्या फणसात 37% गरे आणि बी असते. तर नारळी फणसात 50% गरे आणि बी असते.

गुलाबी गराचा फणस :

कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर येथे गुलाबी रंगाचे, कापा प्रकाराचे गोड आणि उत्कृष्ट स्वादाचे गरे असलेले फणसाचे झाड निवड पद्धतीने शोधून काढण्यात आले आहे. या झाडाची फळे सर्वसाधारणपणे 3 ते 5 किलो वजनाची असतात. काही फळांचे वजन 7 ते 10 किलोपर्यंत असते. या फळातील गरांना विशिष्ट प्रकारचा रुचकर आणि गोड स्वाद असतो. या फणसाचे गरे गुलाबी रंगाचे, मधासारखे गोड, जाड आणि घट्ट असतात.

रुद्राक्षी फणस :

रुद्राक्षी फणसाची फळे आकाराने गोल आणि मोठी असतात. या जातीच्या फळाची साल बाहेरच्या बाजूने मऊ आणि कमी काटेरी असते; परंतु फळाची प्रत कमी दर्जाची असते.

फणस पिकाची अभिवृद्धी । फणस पिकाची लागवड पद्धती ।

फणसामध्ये परपरागीभवन होत असल्यामुळे बियांपासून तयार केलेल्या रोपांचे गुणधर्म मातृवृक्षासारखेच येत नाहीत. यासाठी निवडक झाडांपासून कलमे तयार करून फणसाची लागवड करावी.

मातृवृक्षाची निवड करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत :

(1) लवकर फळे धरणारी झाडे असावीत.

(2) फळे मध्यम आकाराची असावीत.

(3) झाडे अधिक उत्पादन देणारी असावीत.

(4) फळामध्ये गराचे प्रमाण अधिक असावे.

(5) गरे जाड, गोड, उत्कृष्ट स्वादाचे, खुसखुशीत आणि आकर्षक रंगाचे असावेत; बियांचा आकार लहान असावा.

भेट कलम, गुटी कलम, मृदुकाष्ठ कलम, अंकुर कलम आणि ठिगळ कलम पद्धतीने डोळे भरणे अशा विविध पद्धतींनी फणसाची कलमे तयार करता येतात. यांपैकी अंकुर कलम आणि ठिगळ पद्धतीने डोळे भरणे या पद्धती सोप्या असून 80% यशस्वी ठरतात.

(1) अंकुर कलम :

अंकुर कलम करताना प्रथम खुंटरोप तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेल्या फणसाच्या मोठ्या आकाराच्या बिया निवडाव्यात. अशा बिया 15X20 सेंटिमीटर आकाराच्या पॉलिथीनच्या पिशवीत सुमारे 1 सेंटिमीटर खोल पेराव्यात. पिशव्या भरण्यासाठी माती आणि शेणखत (3 : 1 ) यांचे मिश्रण वापरावे. पिशव्यांना नियमितपणे पाणी द्यावे. साधारणपणे 20 ते 25 दिवसांत फणसाच्या बिया रुजून पिवळसर हिरव्या रंगाचे अंकुर वर येतात. बिया रुजल्यावर 8 ते 15 दिवसांच्या आत त्यावर कलम करावे. कलमे करण्यासाठी जोमदार वाढणारे आणि पेन्सिलच्या जाडीचे हिरवट रंगाचे खुंटरोप निवडावे.
कलमाचे यश डोळकाडीच्या निवडीवर अवलंबून असते. निवडलेल्या झाडांपासून फांदीच्या टोकाकडे जून झालेली परंतु गर्द हिरव्या रंगाची, खुंटरोपाच्या जाडीची, 10 ते 15 सेंटिमीटर लांबीची डोळकाडी निवडावी. काडीच्या शेंड्यावरील डोळा फुगीर असावा. निवडलेल्या खुंटरोपांचा अंकुर जमिनीपासून 6 ते 8 सेंटिमीटर अंतरावर छाटावा. त्यानंतर बरोबर मध्यावर 5 ते 6 सेंटिमीटर लांबीचा छेद घ्यावा. निवडलेल्या डोळकाडीवरही छेदाच्याच लांबीची पाचर करावी. ही पाचर रोपाच्या छेदलेल्या भागात बसवून पॉलिथीन कागदाच्या पट्टीने घट्ट बांधावी. कलम बांधताना काडीचा आणि रोपाचा कापलेला भाग एकमेकांवर बरोबर बसेल याची काळजी घ्यावी. डोळकाडी रोपाच्या जाडीपेक्षा थोडी जाड असेल तर डोळकाडीची एक बाजू खुंटरोपावर नीट बसवावी. बांधलेले कलम सावलीत ठेवावे आणि कलमाला नियमितपणे पाणी द्यावे. कलम बांधल्यापासून सुमारे तीन आठवड्यांनी नवीन फूट येण्यास सुरुवात होते. याच वेळी खुंटरोपावर कलमांच्या जोडाच्या खालच्या भागात येणारे फुटवे वेळोवेळी काढून टाकावेत. फणसाची अंकुर कलमे तयार करण्यासाठी एप्रिल ते मे हा काळ सर्वांत उत्तम असतो. या काळात तयार केलेली 70 ते 80 % कलमे यशस्वी होतात.

(2) ठिगळ पद्धतीने डोळे भरणे (पॅच बडिंग) :

ठिगळ पद्धतीने डोळे भरून कलमे तयार करण्यासाठी एक ते दीड वर्षे वयाची खुंटरोपे निवडावीत. खुंटरोपाच्या बुंध्यापासून 15 ते 20 सेंटिमीटर उंचीवर 1.8X2.5 सेंटिमीटर आकाराचा पॅच काढावा. त्याच आकाराचा डोळा असलेला पॅच निवडलेल्या डोळकाडीवरून काढून तो रोपाच्या कापलेल्या भागावर व्यवस्थित बसवावा आणि पॉलिथीन कागदाच्या पट्टीने बांधावा. या पद्धतीने सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात कलमे तयार केल्यास 70 ते 80 % कलमे जगतात.
फणसाच्या कलमांच्या लागवडीसाठी एप्रिल-मे महिन्यात 1 X 1 X 1 मीटर आकाराचे खड्डे खोदावेत. प्रत्येक खड्डयात 5 ते 10 किलो चांगले कुजलेले शेणखत, दीड ते दोन किलो हाडांचा चुरा आणि माती मिसळून खड्डे भरावेत. पावसाळ्यात प्रत्येक खड्डयात फणसाचे एक रोप अथवा कलम लावावे. कलम लावल्यानंतर पाऊस नसल्यास कलमांना लगेच पाणी द्यावे.

फणस पीक लागवड हंगाम । फणस पीक लागवडीचे अंतर ।

फणसाची लागवड सपाट जमिनीवर चौरस पद्धतीने करावी. फणसाच्या रोपांची अथवा कलमांची लागवड 10X10 मीटर अंतरावर करावी. लागवड साधारणपणे पावसाळा सुरू झाल्यावर जून महिन्यात करावी. पावसाळयात कलमाजवळ पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. भटक्या जनावरांपासून झाडांचे संरक्षण करण्यासाठी झाडाभोवती कुंपण घालावे. जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी पावसाळा संपल्यानंतर आक्टोबर महिन्यात झाडाच्या बुंध्याशी पालापाचोळा किंवा गवताचे आच्छादन घालावे.

फणस पिकास वळण । फणस पिकास छाटणीच्या पद्धती ।

फणसाच्या झाडांची नियमित छाटणी केली जात नाही. परंतु झाडाला योग्य वळण देण्यासाठी सुरुवातीच्या काळात जमिनीपासून अनेक खोडे वाढू नयेत म्हणून छाटणीची आवश्यकता असते. झाड एकाच खोडावर ठेवावे. जमिनीपासून 3 फुटांपर्यंतच्या खोडावरील फुटवे काढून फांद्या सर्व दिशांना विखुरलेल्या स्थितीत राहतील अशा ठेवाव्यात. जून आणि अनावश्यक फांद्या काढून टाकाव्यात. दरवर्षी वाळलेल्या, दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. बागेत भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा राहील याची काळजी घ्यावी.

फणस पिक खत व्यवस्थापन । फणस पिक पाणी व्यवस्थापन ।

फणसाच्या झाडांना लागवडीनंतर फारशी खते दिली जात नाहीत; परंतु अधिक उत्पादनासाठी फणसाच्या झाडाला खाली दर्शविलेल्या प्रमाणात खते द्यावीत.

खतचे प्रमाण
झाडाचे वय (वर्षे)शेणखत किलोनत्र (ग्रॅम)स्फुरद (ग्रॅम)पालाश (ग्रॅम)
151005050
210200100100
315300150150
420400250250
5 आणि
त्यापुढील वर्षे
25500250250
फणसाच्या झाडाला द्यावयाची खते

फणसाच्या झाडाला शक्यतो ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात खते द्यावीत. खते झाडाच्या बुंध्याशी फांद्यांच्या पसाऱ्याखाली मातीत चांगली मिसळून द्यावीत. लागवडीपासून सुरुवातीची दोन वर्षे झाडाला 10 ते 15 दिवसांच्या अंतराने नियमित पाणी द्यावे. फुले येण्याच्या आणि फळधारणेच्या काळात झाडाला पाण्याची जास्त आवश्यकता असते.

फणस पिकातील आंतरपिके । फणस पिकातील तणनियंत्रण ।

फणसाच्या बागेत सुरुवातीच्या 8 ते 10 वर्षांपर्यंत दोन झाडांच्यामध्ये पावसाळ्यात चवळी, श्रावण घेवडा, भेंडी, मिरची, टोमॅटो, कुळीथ, स्टायलो, इत्यादी आंतरपिके ज्या ठिकाणी पाण्याची सोय आहे, अशा ठिकाणी घ्यावीत. पाण्याची सोय नसलेल्या ठिकाणी शेवग्याची झाडे आंतरपिके म्हणून लावता येतात.
बागेतील तण मुख्य पिकाबरोबर अन्नद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाश यासाठी स्पर्धा करतात आणि त्याचा अनिष्ट परिणाम मुख्य पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होतो, म्हणून वेळोवेळी झाडाभोवतालच्या तणांचा बंदोबस्त करावा. निंदणी, खुरपणी करून तणांच्या बंदोबस्तासाठी बागेत दोन झाडांमधील मोकळ्या जागेत हिरवळीची पिके घ्यावीत.

फणस पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।

फणसाचे झाड अतिशय काटक आणि कणखर असून या झाडावर किडींचा उपद्रव फारसा होत नाही. क्वचित प्रसंगी खोडकिडा, शेंडा कुरतडणारी अळी, मिलिबग आणि खवले किडीचा उपद्रव होतो.

खोडकिडा :

या किडीची अळी झाडाच्या फांद्या आणि खोडांवर छिद्रे करून आत शिरते आणि आतील भाग पोखरत जाते. त्यामुळे फांद्या वाळतात.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 40 ग्रॅम कार्बारिल (सेव्हीन (50%) या प्रमाणात मिसळून झाडावर फवारणी करावी.

उंदीर :

फणसाच्या मुळया उंदरांना खूप आवडत असल्याने बऱ्याच वेळा उंदीर मुळचा खाऊन झाडाला कमकुवत करतात आणि काही वेळा झाड मरते.

उपाय : उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी बिळाजवळ झिंक फॉस्फॉईडच्या गोळया ठेवाव्यात.

फणस पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।

फणसाच्या झाडावर फारसे नुकसानकारक रोग आढळून येत नाहीत.

फळकूज :

हा रोग रायझोपस अरटोकार्पी नावाच्या बुरशीमुळे होतो. बुरशीचा उपद्रव झालेली फळे सडतात आणि पूर्ण वाढ होण्यापूर्वीच गळून पडतात.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम-45 (0.2 %) किंवा 10 ग्रॅम बाविस्टीन (0.05%) मिसळून 15 दिवसांच्या अंतराने फळवाढीच्या काळात झाडावर फवारणी करावी.

फणसाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

फणसाच्या बियांपासून रोपे तयार करून लागवड केलेल्या फणसाच्या झाडांपासून लागवडीनंतर दहा वर्षांनी उत्पादन मिळण्यास सुरुवात होते. कलमांच्या लागवडीनंतर 7 8 वर्षांनी फळे मिळण्यास सुरुवात होते. फणसाच्या झाडाच्या फुलोऱ्यात नर आणि मादी फुले लांब, लोंबकळत्या नतकणीस (कॅटकीन) प्रकारच्या पुष्पबंधात येतात. मादी फुले आंगठ्याच्या आकाराची आणि हिरवी असतात. फळे मुख्य खोडावर, खोडाच्या पायथ्याशी किंवा मुख्य फांद्यांच्या वर बगलेत येतात. फुलांना विशिष्ट सुगंध असतो. फणसाच्या झाडाला पश्चिम भारतात डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात फुले येतात. नर फुले काही दिवसानंतर आपोआप गळून पडतात. फणसाची फळे जुलै ते ऑगस्ट या महिन्यात काढण तयार होतात. फळे सर्वसाधारणपणे 50-60 सेंमी. लांबीची आणि 20-30 सेंमी. रुंदीची असतात. फळांची साल सुमारे 5-7 सेंटिमीटर जाड असते. फळाच्या सालीवर बाहेरील बाजूला रुंद, टोकदार किंवा बोथट काटे असतात. साल भरपूर जाड असल्यामुळे फळांना टिकाऊपणा चांगला असतो आणि त्याचे स्वतंत्र पॅकिंग करावे लागत नाही. फळे वजनाने सुमारे 5 किलो पासून 25 किलोंपर्यंत भरतात. प्रत्येक झाडाला सुमारे 25 ते 50 पर्यंत फळे लागतात. त्यांचे वजन 200 किलोग्रॅम येते. एका झाडापासून 40 ते 50 वर्षे फळे मिळतात.

फणसाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।

फणसाची फळे झाडावरून काढल्यानंतर ट्रकने बाजारामध्ये विक्रीसाठी पाठवितात. पूर्ण वाढलेली फळे काढणीनंतर 3-5 दिवसांत पिकून त्यांना चांगला वास येतो. काढणीनंतर फळे एकमेकांवर उघड्यावरच रचून ठेवतात. फणसाची फळे पिकविण्याच्या स्वतंत्र पद्धती नाहीत.

सारांश ।

फणसाच्या झाडाचे उगमस्थान भारत हा देश असून भारतातील निरनिराळ्या भागांत फणसाची लागवड केली जाते. समुद्रकिनाऱ्यावरील उष्ण आणि दमट हवामान तसेच जास्त पाऊस फणसाच्या झाडास योग्य असतो. फणसाच्या फळातील गराच्या प्रकारावरून फणसाचे कापा आणि बरका असे दोन प्रकार आढळतात. फणसाचे फळ पौष्टिक असून कापा फणसाचे गरे हवाबंद करून डब्यात साठविता येतात. फणसाच्या गऱ्यांपासून अनेक टिकाऊ पदार्थ तयार करता येतात. सिंगापुरी फणस, नारळी फणस आणि गुलाबी फणस ह्या फणसाच्या जाती आहेत. फणसाच्या झाडाची अभिवृद्धी अंकुर कलम आणि पॅच कलम पद्धतीने डोळे भरून केली जाते. फणसाच्या झाडाला सुरुवातीपासून पाणी आणि खतांचे योग्य व्यवस्थापन केल्यास अधिक उत्पादन मिळते. फणसाच्या लागवडीपासून पहिल्या 10 वर्षांपर्यंत आंतरपिके घेता येतात. साधारणपणे कलमी झाडाला 7 ते 8 वर्षांनी फळे येऊ लागतात. पूर्ण वाढ झालेली फळे काढणीनंतर 3 ते 5 दिवसांत पिकतात. फणसाच फळे पिकविण्याची खास पद्धत नाही. झाडावरून काढून फळे लगेच विक्रीसाठी बाजारात पाठवितात.

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )