पितृपक्ष – पितृपंधरवडा – श्राद्ध आणि श्राद्ध विधीचे महत्व (Pitrupaksh-Pitrupandhravda – Shradh Vidhi)

पितृपक्ष हे तर कृतज्ञता पर्व आहे | पितरलोक | पितृपक्ष : पूर्वजांविषयी कृतज्ञता | श्राद्ध | पितृस्तोत्र पठनाचे फायदे | पितृस्तोत्र | श्राद्धाचे प्रकार । कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे । श्राद्ध घालतांना नैवेद्य मंडल कसे घालावे । ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे । श्राद्ध करण्याची पद्धत । मातामह श्राद्ध म्हणजे काय । मातामह श्राद्ध अधिकार कोणाला असतो । श्राद्धविधी । श्राद्ध नेमके कधी करावे । श्राद्धपक्षादी । भरणी श्राद्ध । पक्षपंधरवडा पितृपक्ष सर्व कर्मास निषिद्ध का असतो । संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे । पितृपक्षात पारायण करता येते का । दैनंदिन जीवनात पितरांची सेवा कशी करता येते । पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व । ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात । मघादी श्राद्धे भरणी । नित्य तर्पण ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

पितृपक्ष हे तर कृतज्ञता पर्व आहे :

जगातील प्रत्येक संस्कृती मध्ये मृतांच्या साठी दिवस असतो. बरेचदा भेसूर स्वरुपातच असतो.परंतु अतिप्राचीन अशा आपल्या हिंदू संस्कृती मध्ये तो भेसूर पणा टाळून दैवी काळ समजला जातो. पितृपक्ष हा फक्त पूर्वजांविषयीच नाही तर निकटच्या गतात्म्यांविषयी, सुहृद, आचार्य-गुरु यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा अतिशय पवित्र काळ आहे.पिंडदान किंवा तर्पण हा त्याचा अत्यंत लहानसा भाग आहे. त्याला “कांड” आपण बनवलंय, कारण ती एक कशीबशी “उरकून टाकण्याचं ओझं” असं स्वरूप त्याला आपणच दिलंय. आपल्याच पूर्वजांची आठवण ठेवणे, कृतज्ञता व्यक्त करणे, अन्नदान करणे, समाजाभिमुख काही कामं करणे, ही या पवित्र काळाची कर्मपूर्ती आहे.

परंपरेत खंड पडला असेल तर , to start with , निदान आपल्या पूर्वजांची आठवण करुन एक दीप प्रज्वलित करा. अनाथाश्रम, महिलाश्रम, वृद्धाश्रमांना पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करत काही मदत करा. मंदीरांमधे देणगी द्या. अगदी काहीच जमलं नाही तरी रोज थोडा वेळ स्वस्थ बसून गतात्म्यांची, त्यांच्यासोबत काढलेल्या आनंदपर्वाची मनोमन आठवण तरी काढू शकालच. या पवित्र काळातील कृतज्ञता व्यक्त करण्यातून मिळणारे समाधान तुमचे तुम्हीच ताडून पाहू शकाल.

हिंदूधर्म अत्यंत लवचिक आहे, flexible आहे. जो निर्धन आहे, त्याने वनात, वृक्षांच्या सानिध्यात एकांतात जाऊन आभाळाकडे दोन्ही हात पसरुन, “मी निर्धन आहे, मी अन्य काही करु शकत नाही, पण माझ्या पूर्वजांनी माझी कृतज्ञता स्वीकारावी,” एवढे जरी म्हणले तरी ते श्राद्ध केल्याचे फळ देण्यास पुरेसे आहे असे शास्त्रे सांगतात. इतकी विशाल, सहृदय मानवी परंपरा कर्म “कांड” असूच शकत नाही. आपल्या परंपरेत खंड पडला असेल, तर यंदाच्या पितृपक्षाच्या पावन कालखंडात पूर्वज, गुरु, निकटवर्तीय यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करा आणि समाधान अनुभवा.

पितरलोक :

आपल्याकडे बोलताना सहज ‘पितरलोक’ असा शब्द वापरला जातो. पितरलोक म्हणजे नेमकं काय? पितरलोक: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्राच्या पुढील अंतरिक्ष ‘पितृलोक’ म्हणून ओळखतात… अंतरिक्ष, स्वर्ग व पृथ्वी यामधील भागास पितृलोक म्हणतात. पितर येथेच राहतात असे मानले जाते. आपण जेव्हा पिंडदान-जलदान-हवन करतो तेव्हा या द्रव्यांना सुगंधित करून पितरांपर्यंत पोहोचवतो अशी श्रद्धा आहे. पितृलोक हा एक प्रकारचा श्रेष्ठ देवतासदृश योनींचा प्रदेश आहे. या प्रदेशाचे अस्तित्व प्रत्येक धर्मात मानले गेले आहे. भलेही त्याचे नाव वेगवेगळे असेल पण याच्या अस्तित्वाला मान्यता दिली गेलीय…..

हिंदूंव्यतिरिक्त जैन, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांमध्ये देखील श्राद्धविधी सांगितलेला आहे… जैनांमध्ये श्राद्धतिथीस तीर्थंकरांना, ख्रिश्चनांच्या रोमन कॅथलिकांमध्ये चर्चमध्ये, मुस्लिम धर्मियांमध्ये कुराण पठणासहित फकिरांना अन्नदान करण्याची परंपरा आहे. पारशी लोकांमध्ये ‘मुक्ताद’ किंवा ‘डोसला’ करताना अध्यारूस घरी बोलावून सदक्षिणा भोजन देतात. इजिप्त व ग्रीकांमध्येही ‘ममी’जवळ त्यांच्या परलोक प्रवासासाठी आवश्यक साधनसाम्रगी ठेवतात…..

पितरलोक जरी आपल्याला दिसत नसला तरी हेच पितर प्रसंगी स्वप्नात येऊन मार्गदर्शन व खबरदारीच्या सूचना सांगत असल्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी अनेकवेळा घेतला असेल… यासंदर्भात एक प्रश्न नेहमी विचारला जातो. श्राद्ध केल्याने काय काय प्राप्ती होते? श्रद्धेने श्राद्ध करावे. ती कीर्ती, बल, लक्ष्मी, यश, आरोग्य, धन, धान्य, ऐश्वर्य मिळविण्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे आपला सर्वतोपरी उत्कर्ष होतो. आपणही ऋणमुक्तीच्या भावनेतून कृतज्ञतेने करावे…..

श्रीमद्भगवतगीता अध्याय चौथा… श्लोक सातवा. यदा यदा हि धर्मस्य… असे म्हणत धर्मसंस्थापनेच्या कार्यार्थ त्या सर्वशक्तीमान ईश्वराला देखील पुन:पुन्हा अवतार घेणे क्रमप्राप्त असेल तर तेथे आपल्यासारख्या क्षूद्र मानवाची काय कथा…..?

मनुने सर्वात प्रथम श्राद्ध केले असे मानले जाते म्हणूनच मनूला श्राद्धदेव म्हटले जाते… प्रभू श्रीरामाने जटायूसाठी, पिता दशरथासाठी, वराहदेवासाठी श्राद्ध तर्पण केले. श्रीरामप्रभू वनवासात होते. त्यामुळे त्यांनी वनात उपलब्ध होते त्या फळांनीच श्राद्ध केले. कारण आपण जे सेवन करतो तेच पितरही आनंदाने स्वीकारतात. जटायूच्या मृत्यूची वार्ता प्रभू श्रीरामांकडून संपातीला समजली. तेव्हा संपातीनेही जटायूसाठी श्राद्ध तर्पण केले. सुग्रीवाने वालीचे, बिभिषणाने दशाननाचे, पांडवांनी पंडुराजाचे श्राद्ध करून आपापले कल्याण करून घेतले. आपल्या वैदिक आर्यांनी देखील यमधर्मालाच आपला प्रथम पितर मानून ‘आम्ही प्रार्थना करताच तू आमचे रक्षण कर’ म्हणून आळविल्याचे संदर्भ सापडतात…..

वेद-उपनिषदे, गीता-गाथा, ज्ञानेश्वरी इत्यादी जगन्मान्य ग्रंथांमध्येही पितृतर्पण, श्राद्ध, हवन, दान इत्यादी पितृयज्ञांची महती सांगितलेली आहे… प्रत्येकालाच आपल्या घराण्याला नेमका पितृदोष आहे की नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता असते…..

भाग्यभावाच्या नक्षत्रस्वामीचे पूजन केल्यास, दानधर्म, जप-तप, हवनादी विधिपूर्वक केल्यास अनुकूलता अनुभवास येते. पितर- ज्योतिष- नक्षत्र- राशी यांचा फार घनिष्ठ संबंध आहे… यमाने पितृपंधरवड्यातील प्रत्येक तिथी व नक्षत्रावर केलेल्या श्राद्धाची फळे सांगितली आहेत. पितृपक्षात आपले पितर न बोलावता आपल्याकडे येतात. त्यांना जल, अन्नादींनी संतुष्ट करावे हे आपले कर्तव्य असते. बर्‍याच जणांना आपल्या पित्याची मृत्यूची तिथी माहिती असतेच असे नाही. अशांनी सर्वपित्री अमावस्येला श्राद्ध करावे. मृत्यूतिथी, महिना काहीच माहिती नसेल तेव्हा माघ अमावस्या, मार्गशीर्ष अमावस्येला श्राद्धविधी करावेत. एकादशीला श्राद्ध येत असल्यास श्राद्धाचे अन्नपदार्थ केवळ हुंगून (वास घेऊन) गायीला पान द्यावे. मात्यापित्यांचे एकाच तिथीला श्राद्ध असेल तर अगोदर पित्याचे व नंतर मातेचे श्राद्ध करावे.

पितृपक्ष : पूर्वजांविषयी कृतज्ञता :

आपल्या पूर्वजाविषयी कृतज्ञता व श्रध्दा व्यक्त करण्याच्या काळास पितृपंधरवडा किंवा श्राध्दपक्ष असे म्हटले जाते.भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास ‘श्राध्दपक्ष‘ म्हटले जाते… यात भाद्रपद शुक्ल पौर्णिमेचा दिवस मिळवल्यात सोळा दिवसांचा होत असतो. या पंधरवड्यात तिथीला मरण पावलेल्या वडीलधार्‍या मंडळींना संतुष्ट करून त्यांच्याप्रती‍ कृतज्ञता व्यक्त केली जात असते…..

यादिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाचा पितर बसवून श्राध्द व तर्पण केल्याने सुख, समृध्दी व संततीची प्रार्थना केली जात असते… जर तिथी लक्षात नसेल तर पितृपंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी अमावास्या येते. तिला सर्वपित्री अमावास्या म्हटले जाते. या दिवशी श्राध्द केले जाते. यादिवशी सूर्य, चंद्र यांची युती होते. सूर्य कन्या राशीत प्रवेश करतो. श्राध्द पक्षात आपले पूर्वज पृथ्वीवर येऊन आपल्या कुटूंबियांसोबत वास्तव्य करत असतात, असा उल्लेख मार्कण्डेय पुराणात आला आहे. त्यांच्या संतुष्टीसाठी श्रेष्ठ ब्राह्मणांना जेवण, दान दिले जाते श्राध्द पक्षात तिर्थस्थानी जाऊन त्रिपींड दान केले जाते… नारायण नागबलीची पूजा केली जाते. आपल्या कुटुंबात सुख- समुध्दी नांदावी म्हणून दानधर्म केले जात असतात.

देश काले च पात्रे च श्रद्धया विधिनाच यत।
पितनुद्दिश्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धमुदाहृतम।।

म्हणजे देश, काल आणि पात्र (योग्य स्थळ) यांना अनुलक्षून श्रद्धा आणि विधीयुक्त असे जे (अन्नादी) पितरांना उद्देशून ब्राह्मणांना दिले जाते त्याला ‘श्राद्ध‘ म्हणावे.

माता-पिता तसेच निकटवर्तीय हयात असताना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो… त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते, असे भारतीय संस्कृती सांगते. या कर्तव्यपूर्तीची सुसंधी आपल्याला श्राद्धाच्या निमित्ताने मिळते. आपल्या प्रिय निकटवर्तीयांचा मृत्युतर प्रवास हा सुखमय व क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे देवऋण, ऋषीऋण, पितृऋण व समाजऋण. ही चार ऋण फेडणे होय. देवांना यज्ञ भाग देवून देव ऋण फेडता येते. तर ऋषी मुनी संत यांच्या विचारांना आदर्शांना आत्मसात करत त्यांचा प्रचार प्रसार करत त्यानुसार जीवन घडवून ऋषी ऋण फेडता येते. तर पितृऋण फेडण्यासाठी श्राद्ध आवश्यक असते. श्राद्धविधी हा हिंदुधर्माचा अविभाज्य भाग आहे व धर्मशास्त्रात श्राद्ध हे गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे…..

हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेनुसार पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना साहाय्य करणे… आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे. काही पितर त्यांच्या कुकर्मांमुळे पितृलोकात जात नाहीत त्यांना भूतयोनी लाभते. अशा पितरांना श्राद्धाद्वारे त्या योनीतून मुक्त करणे. असे विविध हेतू श्राद्धविधी करण्यामागे आहेत. शास्त्रनियमाप्रमाणे आपण हयात असेपयर्ंत पितरांप्रती कृतज्ञता म्हणून प्रतिवर्षी श्राद्ध केले पाहिजे…..

ऋग्वेदकाली समिधा आणि पिंड यांची अग्नीत आहुती देऊन पितृपूजा केली जात असे… यजुर्वेद, ब्राह्मणे आणि श्रौत व गृह्यसूत्रांच्या काळात पिंडदान प्रचारात आले. गृह्यसूत्रे, श्रुती-स्मृती यांच्या पुढील काळात श्राद्धात ब्राह्मण भोजन आवश्यक मानले गेले आणि तो श्राद्धविधीतला एक प्रमुख भाग ठरला. सध्या आपण ज्याला श्राद्धविधी म्हणतो त्यामध्ये वरील तिन्ही अवस्था एकत्रित झाल्या आहेत. धर्मग्रंथांमध्ये श्राद्धचे जवळजवळ शंभरपेक्षा जास्त प्रकारे वर्णन केले आहेत. त्यातील मुख्य श्राद्ध विधींची माहिती खाली देत आहोत…..

औध्वर्देहिक विधी :

यामध्ये अंत्येष्टी संस्कारात अंतभरूत असलेली विविध श्राद्धे येतात… ही सर्व श्राद्धे मृत व्यक्तीला पितृत्व प्राप्त होईपयर्ंतची (सपिंडीकरण श्राद्ध) असून मृत्यूनंतर एका वर्षात करावयाची असतात. अधिक खुलाशासाठी अंत्येष्टी विधीबद्दल या संकेतस्थळवरील माहिती वाचावी…..

उदकुंभ श्राद्ध :

मृत व्यक्ती प्रीत्यर्थ निधनानंतर प्रत्येक महिन्यात हे श्राद्ध करावयाचे असते… परंतु आजकाल हे शक्य होत नसल्याने वर्षश्राद्धापूर्वी सांकेतिक विधी म्हणून एकदाच हा श्राद्धविधी केला जातो…..

नित्य श्राध्द :

पितरांप्रीत्यर्थ रोज केल्या जाणार्‍या श्राद्धाला पितृयज्ञ/नित्यश्राद्ध म्हणतात… हे केवळ उदकाने तर्पण करून किंवा तीलतर्पण करून करता येते,

वृद्धी श्राद्ध :

प्रत्येक वर्षी मृत्यूतिथीला जे श्राद्ध करतात त्याला सांवत्सरिक किंवा वृद्धी श्राद्ध म्हणतात…..

पार्वण श्राद्धे

तीर्थ श्राद्ध :-

काशी, प्रयाग, मातृगया, पितृगया इत्यादी पवित्र तीर्थक्षेत्री सर्व पितरांप्रीत्यर्थ केल्या जाणार्‍या श्राद्धाला ‘तीर्थ श्राद्ध’ म्हणतात…..

महालय श्राद्ध :

भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपयर्ंतच्या हिंदू वर्षातील काळाला ‘पितृपक्ष’ म्हणतात… या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबीयांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात, अशी हिंदू धर्मीयांची श्रद्धा आहे. या काळात श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात. त्यामुळे प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. हे श्राद्ध पितृत्रई म्हणजेच पिता, पितामह (आजोबा) व प्रपितामहा (पणजोबा); मातृत्रयी म्हणजे माता, पितामही, प्रपितामही; सापत्न माता, मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातूल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरू, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात…..

नांदी श्राद्ध :

पुत्रजन्म, उपनयन (मुंज), विवाह यांसारख्या संस्कारांच्या वेळी, तसेच विविध प्रकारची यज्ञकर्मे, गृहप्रवेश, वयाच्या पन्नासाव्या वर्षांपासून शंभर वर्ष वयापयर्ंत दर पाच वर्षांनी करण्याची शांती इत्यादी शुभ प्रसंगी पितरांचे आशीर्वाद लाभावे याकरिता ‘नांदी श्राद्ध’ करतात.

त्रिपिंडी श्राद्ध :

सतत तीन वर्षे श्राद्धकर्म न केल्यास पितरांना प्रेतत्व प्राप्त होते. यामुळे लौकिक जीवनात त्रास होऊ शकतो, असे धर्मशास्त्र सांगते. या त्रासाच्या निवारणासाठी प्रेतत्व पावलेल्या पितरांना पुनश्‍च पितृत्व प्राप्त व्हावे म्हणून त्रिपिंडी श्राद्ध करतात. हे श्राद्ध तीर्थक्षेत्राच्या ठिकाणीच केले जाते. त्रिपिंडी श्राद्ध केल्यानंतर देखील प्रतिवर्षी श्राद्ध विधी करणे अपेक्षित असते,

सामान्यत, दरवर्षी मनुष्य मृत झालेल्या तिथीला श्राद्ध करावे. फक्त महिना माहीत आहे, अशा वेळी त्या महिन्याच्या अमावास्येला श्राद्ध करावे… मृत्युतिथी व महिना दोन्ही माहीत नसल्यास माघ किंवा मार्गशीर्ष अमावास्येला श्राद्ध करावे. निश्‍चित मृत्युतिथी माहीत नसल्यास मृत्यूची बातमी समजलेल्या दिवशी श्राद्ध करावे. पितरांचे श्राद्ध दररोज करायला पाहिजे. हे श्राद्ध उदकाने म्हणजे पितरांना तर्पण करूनही करता येते. पितरांचे श्राद्ध दररोज करणे अशक्य असल्यास दर्शश्राद्ध म्हणजे दर महिन्याच्या अमावास्येला करावे. त्यामुळे नित्य श्राद्धाची सिद्धी होते. दर महिन्याला दर्शश्राद्ध करणे अशक्य असल्यास चैत्र, भाद्रपद व आश्‍विन या महिन्यांच्या अमावास्यांना तरी करावे. दर्शश्राद्ध चैत्र, भाद्रपद व आश्‍विन या महिन्यांच्या अमावास्यांना करणेही शक्य नसल्यास पितृपक्षात महालय श्राद्धे तरी अवश्य करावी. तेही शक्य नसल्यास भाद्रपद महिन्यातील अमावास्येला (सर्व पितरी अमावास्येला) तरी श्राद्ध करावे.

श्राद्ध :

‘श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम्’ म्हणजे जे श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय… पितरांविषयी आदर बाळगणे, त्यांच्या नावे दानधर्म करणे व त्यांना संतोष होईल अशी कृत्ये करणे हे वंशजांचे कर्तव्य आहे, असे धर्मशास्त्र सांगते. देवपितृकार्याभ्यां न प्रमदितव्यम् । देव आणि पितर यांच्या कार्यात हेळसांड करू नये असा उपनिषदांचा आदेश आहे…..

पितृपक्षाचा काळ भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते सर्वपित्री अमावस्येपर्यंत असतो… वडिलांच्या मृत्युतिथीला या पितृपक्षकाळात ज्येष्ठ पुत्राने श्राद्ध करावे असा संकेत आहे. त्यानिमित्त पिंडदान करतात. प्रत्येक गृहस्थाश्रमीला तीन प्रकारचे कर्ज (ऋण) फेडायचे असते, असा समज आहे. मातृऋण, पितृऋण व समाजऋण. ही सर्व ऋणे पुत्राने/पौत्राने फेडणे हे त्याचे कर्तव्य आहे असा शास्त्रसंकेत आहे. या पितृऋणातून मुक्त होण्यासाठी श्राद्ध विधी करतात…..

श्राद्धविधी सुरू असतांना मृत व्यक्तीचा आत्मा तेथे वासनामय कोषात उपस्थित असतो, असा समज आहे. पितरांचे श्राद्ध करतांना पिता, पितामह, प्रपितामह, मातामह यांचेही स्मरण करतात. त्या आधीच्या पिढ्या ह्या मुक्त झालेल्या असतात असे मानतात…

शुद्ध मनाने श्राद्ध करणाऱ्यास मृत्यूनंतर स्वर्ग मिळतो, अशी भावना आहे….. अमावस्या व पौर्णिमेस मृत झालेल्यांचे श्राद्ध अमावस्येस करतात. भाद्रपद कृष्ण चतुर्दशीस शस्त्राघाताने मृत्यू पावलेल्यांचे श्राद्ध करतात. पितृपक्षात अन्नदान व गोग्रास यांचेही महत्त्व मानतात. अधिक मासात मृत्यू पावलेल्याचे श्राद्धही महालयात (पितृपक्षात) त्याच तिथीवर करतात…..

धर्मशास्त्रावरील निरनिराळ्या ग्रंथात श्राद्धाच्या व्याख्या दिल्या आहेत. त्या अश्या – ब्रह्मपुराणात म्हटले आहे की, ‘पितराना उद्देशून (त्यांच्या हिताकरिता) जे जे काही योग्य काळी, योग्य स्थळी, सत्पात्र व्यक्तींना आणि ब्राह्मणाना धर्मशास्त्रात सांगितलेल्या विधीला अनुसरून श्रद्धापूर्वक देण्यात येते त्याला श्राद्ध म्हणतात…..

याज्ञवल्क्याने म्हटले आहे की पितर म्हणजे श्राद्धामध्ये देवता असणारे वसू, रुद्र, आणि आदित्य श्राद्धाच्या योगाने संतुष्ट होऊन मनुष्याच्या पूर्वजांना संतोष देतात…

पितरांच्या अंगात जिवंत मनुष्यांचे हित अथवा अहित करण्याचे सामर्थ्य असते, अशा प्रकारची कल्पना वेदांच्या काळी अस्तित्वात असल्याचे ऋग्वेदातील उल्लेखावरून आढळून येते… त्यामुळे प्राथमिक स्थितीत असणाऱ्या मृतांची पूजा करणे हे एक प्रमुख लक्षण बनले. अत्यंत प्राचीन काळी मृत पूर्वजांचा राग घालविण्याच्या उद्देशाने त्यांना उद्देशून काही पदार्थ अर्पण करण्याचा प्रघात पडला असेल, त्यांना उद्देशून काही विधी करण्यात येऊ लागले असतील, आणि तो प्रघात आणि ते विधी पुढील काळात त्या मृत पूर्वजांविषयी शुद्ध प्रेमाचे लक्षण म्हणून पुढे चालू राहिले असावेत.

पितृस्तोत्र पठनाचे फायदे :

१. कौटुंबिक सुख, समृद्धी आणि शांती…
ज्या कुटुंबात पितृ स्त्रोताचे रोज पठण केले जाते, तेथे कोणत्याही प्रकारची कमतरता नसते. सुख-समृद्धी वाढते आणि कुटुंबात शांततेचे वातावरण असते…..

२. निरोगी आणि आनंदी…
ज्या कुटुंबात पितृत्रयांचे रोज नियमित पठण केले जाते, त्या कुटुंबातील सर्व सदस्य सुखी आणि निरोगी असतात आणि त्यांची कामे आपोआप पूर्ण होऊ लागतात. त्यांच्या कामातील सर्व अडथळे आपोआप दूर होतात…..

३. पितृदोषापासून मुक्ती…
ज्या व्यक्तीच्या कुंडलीत पितृदोष असतो आणि ती व्यक्ती नियमितपणे पूर्ण विधीमध्ये श्री पितृ स्तोत्राचा पाठ करते, तर त्याच्या कुंडलीत पितृदोष दूर होऊ लागतो. त्याचे वाईट परिणाम मिळणे बंद होते…..

४. इच्छित कार्य पूर्ण होते…
ज्याला आपल्या जीवनात कोणतेही काम करण्यापूर्वी कोणत्याही अडथळ्याचा सामना करावा लागतो, तो पितृ स्तोत्राचा दररोज पाठ केल्यास तो अडथळा दूर होतो आणि त्या व्यक्तीची सर्व कामे पूर्ण होतात. ती व्यक्ती वाढतच जाते…..

५. नोकरी आणि व्यवसायात यश…
जो व्यक्ती रोज श्री पितृ स्त्राचा पाठ करतो, तो नोकरी आणि व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती करत राहतो. व्यवसाय आणि नोकरीत यश मिळते. तो दिवसेंदिवस उच्च पदाकडे वाटचाल करतो.

पितृ स्तोत्र :

अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम् ।
नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम् ॥

इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा ।
सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् ॥

मन्वादीनां मुनीन्द्राणां सूर्याचन्द्रमसोस्तथा ।
तान् नमस्याम्यहं सर्वान् पितृनप्सूदधावपि ॥

नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा।
द्यावापृथिवोव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि: ॥

देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान् ।
अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येsहं कृताञ्जलि: ॥

प्रजापते: कश्यपाय सोमाय वरुणाय च ।
योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि: ॥

नमो गणेभ्य: सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु ।
स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे ॥

सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा ।
नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम् ॥

अग्रिरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम् ।
अग्नीषोममयं विश्वं यत एतदशेषत: ॥

ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्निमूर्तय:।
जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिण: ॥

तेभ्योsखिलेभ्यो योगिभ्य: पितृभ्यो यतमानस:।
नमो नमो नमस्ते मे प्रसीदन्तु स्वधाभुज: ॥
॥ इति पितृ स्त्रोत समाप्त ॥

श्राद्ध / पितृपक्षाविषयी शंका समाधान

१. घरात / कुळात चालू वर्षात एखादी व्यक्ती मृत झाली असल्यास महालय श्राद्ध करता येते का ?

उत्तर : नाही. मृत व्यक्तीस एक वर्ष पूर्ण झाल्याशिवाय महालय श्राद्ध करता येत नाही.

२. घरात / कुळात सवाष्ण मृत झाली असल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?

उत्तर : सवाष्ण व्यक्ती मृत होऊन एकवर्ष पूर्ण झाल्यानंतर पितृपक्षात “अविधवा नवमी” (भाद्रपद कृष्ण नवमी) या दिवशी श्राद्ध करता येते.

३. ज्या पूर्वजांची तिथी पौर्णिमा असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालतात ?

उत्तर : पंचमी, अष्टमी, द्वादशी किंवा सर्वपित्री अमावस्येला घालतात.

४. ज्यांचा मृत्यू हा घातपाताने झाला असेल किंवा आत्महत्या केली असेल त्यांचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे. ?

उत्तर : शस्त्रदहित श्राद्ध म्हणजे भाद्रपद कृष्ण चतुर्दशी या तिथीस घालावे.

५. संन्याशी किंवा घर सोडून गेलेल्या व्यक्तींचे श्राद्ध कोणत्या तिथीस घालावे ?

उत्तर : अशा व्यक्तींचे श्राद्ध भाद्रपद कृष्ण द्वादशीला घालतात.

६. पितरांची तिथी माहित नसल्यास कोणत्या दिवशी श्राद्ध करावे ?

उत्तर : भाद्रपद कृष्ण द्वादशी किंवा अमावस्या ( सर्वपित्री अमावस्या ) या दिवशी सर्व पितरांचे (ज्ञात-अज्ञात)श्राद्ध घालता येते. तसेच ब्राम्हणास हिरण्यदान व अमावस्या मागणाऱ्या स्त्रीला शिधा दान द्यावे.

७. श्राद्ध घालतांना नैवेद्य मंडल कसे घालावे ?

उत्तर : पाण्याचे गोल मंडल करून त्यावर नैवेद्याचे ताट मांडावे व अंगठ्याच्या बाजूने उलट्या दिशेने पाणी फिरवावे.

८. अघोर पितरांच्या सद्गतीसाठी कोणती सेवा करावी ?

उत्तर : पितृस्तुती, बाह्यशांती सुक्त, पितरतुष्टीकारक स्तोत्र वाचावे तसेच दुपारी १२ वाजता एका पोळीवर थोडा भात, तूप, ५-७ काळे तीळ घेऊन खालील मंत्र दक्षिणाभिमुख बसून १ माळ जप करून अंती त्या माळेचा स्पर्श त्या भातास करणे. यामुळे अघोर पितरांना देखील सद्गती लाभते.

मंत्र : मध्व: सोमास्याधीना मदाय प्रत्नो होता विवासते वाम | बहिर्ष्मती रातीर्वीश्रिता गिरीषा यांत नासत्योप वाजै: ||

९. मातामह श्राद्ध म्हणजे काय ? त्याचा अधिकार कोणाला असतो ?

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध म्हणजे आईच्या वडिलांचे श्राद्ध (दौहित्र) असते. ज्यांचे वडील जिवंत आहेत व आजोबा (आईचे वडील) जिवंत नाहीत अशा मुलांनाच दौहीत्राचा अधिकार असतो.

ज्या स्त्रियांच्या माहेरी भाऊ किंवा कोणी पुरुष नाही त्यांच्यासाठी) आजोबा गेल्यावर एक वर्षाने दौहित्र करण्यास सुरवात करावी. स्वत:चे वडील गेल्यास दौहित्र करू नये. दौहीत्राचा अधिकार नातवास तिसऱ्या वर्षापासून येतो. हे दौहित्र श्राद्ध पूर्ण स्वयंपाक करून करणे अधिक इष्ट होय.

नवरात्रीचा पहिला दिवस असला तरी देवीचा वेगळा स्वयंपाक करण्याची गरज नाही.

१०. पितृपक्षात पारायण करता येते का ?

हो. पितृपक्षात कोणत्याही ग्रंथाचे पारायण करता येते.(गुरुचरित्र/नवनाथ/भागवत/श्रीपाद चरित्र इत्यादी) पितृपक्षात केलेले पारायण हे पितरांना संतोषकारक असते.

११. दैनंदिन जीवनात पितरांची सेवा कशी करता येते ?

सकाळी उठल्यानंतर देवपूजेच्या आधी नित्यसेवा ग्रंथातील पितर तुष्टीकारक स्तोत्र व बाह्यशांती सुक्त वाचावे. रोज पंचमहायज्ञ करावा (नित्यासेवा ग्रंथात विस्तृत माहिती वाचावी) या पंचमहायज्ञासाठी फक्त ५ मिनिटे लागतात. दर अमावस्येला हिरण्यदान करावे. (१ जाणवे, पेढे, ५ / १० रु. दक्षिणा इत्यादी ब्राम्हणाला दान करावेत) . दर अमावस्येला १ किलो कोळसा व ३ नारळ घेऊन त्यावर १ माळ महामृत्युंजय जप करावा व जवळपासच्या जलाशयात सोडून द्यावे.

१. पक्ष भाद्रपद मासातील कृष्णपक्ष
२. पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व

पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे पितर वाईट शक्तींच्या नियंत्रणात जाऊन त्यांचे दास झाल्याने वाईटशक्तींनी त्यांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता असते.

श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते.

पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त रहातात.

व्यक्तीच्या मृत्यूनंतर आत्म्याला सद्गती मिळावी; म्हणून श्राद्ध करणे हे हिंदु धर्माचे एक वैशिष्ट्य आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते.

श्राद्ध करण्याचे महत्त्व, पद्धत, तसेच श्राद्धपक्ष हा शुभकार्यासाठी निषिद्ध का मानला जातो, यामागील कारणे या लेखातून जाणून घेऊया.

३. पितृपक्षात श्राद्ध का करावे ?

अ) पितृपंधरवड्यामध्ये वातावरणात तिर्यक लहरींचे (रज-तमात्मक लहरींचे) आणि यमलहरींचे आधिक्य असल्याने पितृपक्षात श्राद्ध केल्याने रज-तमात्मक कोषांशी निगडित असणार्या पितरांना पृथ्वीच्या वातावरणकक्षेत येणे सोपे जाते; म्हणून हिंदु धर्मात सांगितलेले विधीकर्म हे त्या त्या काळी करणे जास्त श्रेयस्कर असते.

आ). पितृपक्ष हे हिंदु धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद पौर्णिमेपासून आमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे.

इ). पितृपक्षाच्या काळात पितर यमलोकातून आपल्या कुटुंबियांच्या घरी वास्तव्य करण्यासाठी येतात. यात एक दिवस श्राद्ध केले असता पितर वर्षभर तृप्त राहतात.

ई). पितृपक्षात आपल्या सर्व पितरांसाठी श्राद्ध घातल्याने त्यांच्या वासना, इच्छा तृप्त होऊन त्यांना गती मिळते.

४. पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व

दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा न्यूनतम ७२ माळा नामजप करावा.

तिथी श्राद्धाचे नाव कोणासाठी ?

विधीविशेष

१. चतुर्थी किंवा पंचमी (भरणी नक्षत्र असतांना) भरणी मृत झालेली – व्यक्ती

२. नवमी अविधवा नवमी अहेवपणी मृत झालेली स्त्री श्राद्ध न करता सवाष्णीला भोजनही घालतात

३. त्रयोदशी बाळाभोळानी तेरस (सौराष्ट्रातील नाव) लहान मुले काकबळी

४. चतुर्दशी घातचतुर्दशी अपघातात मृत्यू पावलेले, शस्त्राने मारले गेलेल,

५. श्राद्ध करण्याची पद्धत

अ. ‘भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे; पण ते शक्य नसल्यास
ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे.

हे श्राद्ध पितृत्रयी – पिता, पितामह (आजोबा), प्रपितामह (पणजोबा);

मातृत्रयी – माता, पितामही, प्रपितामही; सापत्नमाता, मातामह (आईचे वडील), मातृपितामह, मातृप्रपितामह, मातामही (आईची आई), मातृपितामही, मातृप्रपितामही, पत्नी, पुत्र, कन्या, पितृव्य (काका), मातुल (मामा), बंधू, आत्या, मावशी, बहीण, जावई, सासरा, आचार्य, उपाध्याय, गुरु, मित्र, शिष्य या सर्वांच्या प्रीत्यर्थ करायचे असते. जे कोणी जिवंत असतील, ते वगळून इतरांच्या नावाचा उल्लेख करतात.

आ. देवांच्या स्थानी (जागी) धूरिलोचन संज्ञक विश्वेदेव घ्यावे.

इ. शक्य असल्यास देवांकरता दोन, चार पार्वणांना (मातृत्रयी, पितृत्रयी, मातामहत्रयी आणि मातामहीत्रयी) प्रत्येकी तीन आणि पत्नी इत्यादी एकोद्दिष्ट गणाला प्रत्येकी एक असे ब्राह्मण बोलवावेत. एवढे शक्य नसेल, तर देवांकरता एक, चार पार्वणांकरता चार आणि सर्व एकोद्दिष्ट गणाला एक, असे सहा ब्राह्मण सांगावेत.

ई. योग्य तिथीवर महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे ‘यावद्वृश्चिकदर्शनम्’ म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले, तरी चालते.’

उ. पितृपक्षातील विविध तिथींना विशिष्ट व्यक्तींसाठी करावयाची श्राद्धे खाली सारणीत दिली आहेत.

टीप:- पितृपक्षातील भरणी नक्षत्रावर श्राद्ध केल्यास गयेला जाऊन श्राद्ध केल्यास जेवढे फळ मिळते, तेवढे फळ मिळते. शास्त्रानुसार भरणी श्राद्ध हे वर्षश्राद्धानंतर करावे. वर्षश्राद्धापूर्वी सपिंडीकरण केले जाते.

त्यानंतर भरणी श्राद्ध केल्यास मृताच्या आत्म्याची प्रेतयोनीतून सुटका होण्यास साहाय्य होते. हे श्राद्ध प्रत्येक पितृपक्षात करावे.

काळानुरूप प्रचलित झालेल्या पद्धतीनुसार व्यक्ती मृत झाल्यानंतर १२ व्या दिवशीच सपिंडीकरण केले जाते. त्यामुळे काही शास्त्रकारांच्या मते व्यक्ती मृत झाल्यानंतर त्या वर्षी येणार्या पितृपक्षामध्येच भरणी श्राद्ध केले, तरी चालते. (मूळस्थानी)

६. इतरही मघादी श्राद्धे भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसर्या वर्षापासून करावीत.

७. नित्य तर्पण नित्य तर्पणातही मृत व्यक्तीचा अधिकार प्राप्त झाल्यावरच त्याच्या नावाचा उच्चार करावा. पहिल्या वर्षी करू नये.’

८. पक्षपंधरवडा (पितृपक्ष) सर्व कर्मास निषिद्ध का असतो ?

अ. पक्षपंधरवडा कालावधी भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून महालयास प्रारंभ होतो; पण भाद्रपद अमावास्येला (म्हणजेच सर्वपित्री अमावास्या) महालयाची समाप्ती होत नाही. महालयाची समाप्ती सूर्य तुला राशीतून वृश्चिकेला गेल्यावरच होते; म्हणून महालयाचा जवळजवळ दोन मासांचा कालावधी अशुभ किंवा निषिद्ध मानावा लागेल.

आ. विवाहाच्या प्राथमिक सिद्धतेसाठी हा काळ निषिद्ध नसणे

पक्षपंधरवडा (महालय) निषिद्ध किंवा अशुभ मानण्याची मजल इतकी लांबपर्यंत गेलेली आहे की, या पंधरवड्यात ‘विवाह’ हा शब्दही उच्चारला जात नाही. मग विवाहविषयक बोलणी करणे, स्थळांना भेटी देणे, विवाह निश्चिती इत्यादी गोष्टी पुष्कळ दूर रहातात.

प्राथमिक सिद्धता
इत्यादी कोणत्याही गोष्टींसाठी पक्षपंधरवडा आड येत नाही. पक्षपंधरवड्याचा दूरान्वयाने संबंध पिशाचे इत्यादी पापयोनींशी लावला जातो; पण परिस्थिती अगदी उलट असते. निधन झालेल्या व्यक्तीची प्रेतत्वनिवृत्ती वर्षभर होत नसल्यामुळे निधनोत्तर येणार्या पहिल्या महालयात त्यांना स्थान असत नाही.

९. भरणी श्राद्ध

अ. पहिल्या वर्षी भरणी श्राद्ध केल्याने शास्त्राज्ञेचे उल्लंघन होणे

पहिल्या वर्षी अब्दपूर्ती वर्षश्राद्ध होईपर्यंत मृत व्यक्तीस प्रेतत्व असते, पितृत्व नसते. पहिल्या वर्षी त्यांना महालयातील कोणत्याही श्राद्धांचा अधिकार नसतो. असे असतांनाही अगदी आवर्जून पहिल्या वर्षीच भरणी श्राद्ध केले जाते, यात शास्त्राज्ञाचे उल्लंघन होते.

आ. भरणी श्राद्ध करण्याचा काल पहिल्या वर्षानंतर भरणी श्राद्ध अवश्य करावे. वास्तविक ‘ते प्रतिवर्षी करावे’, अशी शास्त्राज्ञा आहे; पण दुराग्रहाने ते एकदाच करणार्यांनी निदान ते पहिल्या वर्षी तरी करू नये.

१०. इतरही मघादी श्राद्धे भरणी श्राद्धाप्रमाणेच इतरही मघादी श्राद्धे निधनोत्तर पहिल्या वर्षी महालयात न करता दुसर्या वर्षापासून करावीत.

१. स्वतः करणे महत्त्वाचे : श्राद्धविधी स्वतः करायचा असतो. तो स्वतःला करता येत नाही; म्हणून आपण ब्राह्मणाकडून करवतो.

आता श्राद्ध करणारे ब्राह्मणही मिळेनासे झाले आहेत. यावर उपाय म्हणून श्राद्ध-संकल्पविधीच्या पोथ्या मिळतात. त्या
आणून प्रत्येकाने श्राद्ध-संकल्पविधी पाठ करावा. हा पाठ संस्कृत भाषेत असतो. आपण अन्य भाषा शिकतो, मग संस्कृत तर देवभाषा आहे. तसेच ती आपल्याला सहज येण्यासारखीही आहे.

(वरील सूत्र तत्त्वतः योग्य असले, तरी संस्कृत भाषेतील उच्चारांतील काठीण्य, शास्त्रात सांगितलेला विधी नीट आकलन होण्याची मर्यादा इत्यादी पहाता स्वतः श्राद्धविधी यथासांग पार पाडणे, हे प्रत्येकाला शक्य होईल, असे नाही. अशांनी ब्राह्मणाकरवी आणि ब्राह्मण न मिळाल्यास एखाद्या जाणकाराकरवी श्राद्धविधी करण्यास आडकाठी नाही. श्राद्धविधी होणे, हे अधिक आवश्यक आहे, हे येथे लक्षात घ्यावे.)

२. श्राद्धपक्षादी : पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करणे आवश्यक असणे पूर्वजांची स्पंदने आणि त्यांच्या सर्वांत जवळच्या वारसदारांची स्पंदने यांमध्ये पुष्कळ साधर्म्य असते. एखादा सूक्ष्म-देह वेदना अनुभवत असतो, तेव्हा त्या त्रासाची स्पंदने त्याचा सर्वांत जवळचा वारसदारही अनुभवत असतो. याच कारणास्तव श्राद्धपक्षादी पितरांसाठी केले जाणारे विधी मुलाने करायचे असतात.

मुलाची स्पंदने आणि पितरांची स्पंदने एकसारखीच असल्यामुळे श्राद्धतर्पणाच्या वेळी मुलाने दिलेले तर्पण पितरांना ग्रहण करणे सुलभ होते.

३. श्राद्धविधी : अमुक एक व्यक्ती करू शकत नाही; म्हणून केला नाही, असे कोणालाही म्हणायला ‘संधी न देणारा हिंदु धर्म मुलगा (उपनयन न झालेलाही), मुलगी, नातू, पणतू, पत्नी, संपत्तीत वाटेकरी असणार्या मुलीचा मुलगा, सख्खा भाऊ, पुतण्या, चुलत भावाचा मुलगा, वडील, आई, सून, थोरल्या आणि धाकट्या बहिणीची मुले, मामा, सपिंड (सात पिढ्यांपर्यंतचे कुळातील कोणीही) समानोदक (सात पिढ्यांनंतरचे गोत्रातील कोणीही) शिष्य, उपाध्याय, मित्र, जावई या क्रमाने पहिला नसेल, तर दुसर्याने श्राद्ध करावे. एकत्र कुटुंबात कर्त्या वडील पुरुषाने (कुटुंबात वयाने मोठ्या किंवा सर्वांचे पालन पोषणाचे उत्तरदायित्व असलेल्या व्यक्तीने) श्राद्धे करावीत.विभक्त झाल्यावर प्रत्येकाने स्वतंत्र श्राद्धे करावीत.’ प्रत्येक मृत व्यक्तीसाठी श्राद्ध केले जाईल आणि त्याला सद्गती मिळेल, अशी पद्धत हिंदुधर्माने सिद्ध केली आहे.

पितृपक्षाबद्दल अधिक माहिती

सामान्यांना एकाच प्रकारचे श्राद्ध माहिती आहे, पण श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत…

१. नित्यश्राद्ध : यासाठी दररोज केवळ जलाचा वापर करतात.

२. नैमित्तिक श्राद्ध : सपिंडाच्या अगोदर करतात.

३. काम्यश्राद्ध : आपली जी कामना-इच्छा असेल ती तडीस जाण्यासाठी हे श्राद्ध करतात.

४. नांदी श्राद्ध : षोडष संस्कारादरम्यान करावयाचे एकप्रकारचे वृद्धीश्राद्ध. यालाच कर्मांग श्राद्धदेखील म्हणतात.

५. वृद्धीश्राद्ध : विवाहाच्या मंगलकार्यप्रसंगी करायचे श्राद्ध.

६. यात्रा श्राद्ध : यात्रेस प्रस्थान करण्यापूर्वी घृताचा वापर करून करावयाचे श्राद्ध.

७. सपिंडन श्राद्ध : एखादी व्यक्ती मृत झाल्यापासून १२ व्या दिवशी करावयाचे श्राद्ध. यामुळे व्यक्ती आपल्या पितरांमध्ये संयुक्त होते. हे श्राद्ध झाल्याशिवाय इतर कुठलेच मंगलकार्य, शुभकार्य करता येत नाही.

८. शुद्धीश्राद्ध : प्रायश्चित्त इत्यादीसाठी, मन, शरीरशुद्धीसाठी हे करतात.

९. अष्टकाश्राद्ध : भाद्रपद कृष्ण अष्टमीला हे श्राद्ध करतात.

१०. पुष्टीश्राद्ध : द्रव्य, संपत्ती, ऐश्वर्य, आरोग्य इत्यादींच्या प्राप्तीसाठी पुष्टीश्राद्ध करतात.

११. पार्वण श्राद्ध : दरवर्षी करावयाच्या’ श्राद्धाला पार्वण श्राद्ध म्हणतात. अमावस्या, चतुर्दशी, अष्टमी व संक्रांती पर्वावर करावयाच्या श्राद्धासही पार्वण श्राद्ध म्हणतात.

१२. गोष्टी श्राद्ध : विद्वान व ब्राह्म समुदाय एकत्र येऊन तीर्थाच्या ठिकाणी पितरतृप्त करून संपत्ती व सुख प्राप्तीसाठी करावयाच्या श्राद्धास गोष्टीश्राद्ध म्हणतात. श्राद्धाविषयी चर्चा करताना अचानक स्वयंस्फूर्तीने जे श्राद्ध केले जाते त्यालाही गोष्टी श्राद्ध म्हणतात.

याव्यतिरिक्त दधी श्राद्ध, हिरण्य श्राद्ध, हस्तश्राद्ध, चट श्राद्ध, आत्म श्राद्ध असे विविध श्राद्ध प्रकार आहेत.

श्राद्धाच्या काही सोप्या पद्धती पण आहेत.

श्राद्धाच्या सोप्या रिती

  • १. पाण्याने भरलेला कुंभ-कलश दान करा.
  • २. अन्नदान करा
  • ३. तीळाचे दान करा
  • ४. गाईस गवत घाला
  • ५. श्राद्ध तिथीस उपोषण-उपवास करा
  • ६. श्राद्ध विधीचे वाचन करा
  • ७. दक्षिणाभिमुख बसून पितरांचे मन:पूर्वक श्रद्धेने स्मरण करा. त्यांच्या आठवणीने डोळे आपोआप ओले होतात. ते होऊ द्या. (नित्यसेवा ग्रंथात दिलेले पितर तुष्टीकारक स्तोत्र वाचावे)
  • ८. निर्मनुष्य जंगलात आकाशाकडे दोन्ही हात उंच फैलावून अंत:करणापासून मी निर्धन व अन्नविरहित आहे, मला पितृऋणातून मुक्त करा, अशी प्रार्थना करा.

जो श्राद्ध करणार असतो त्याला आपल्या मृत पित्याची मृत्यूची तिथी नीट माहिती असावी. त्याच तिथीला महालय पक्षात (म्हणजेच भाद्रपद कृष्ण पक्ष अमावस्येपर्यंत) श्राद्ध करावे.

हे श्राद्ध नेमके कधी करावे ?

उत्तर :- श्राद्ध अपरान्हकाळात करावे. आता प्रश्न पडेल तो हा अपरान्ह काळ काढण्यासाठी बाहेर कुठेही जाण्याची गरज नाही. तो आपल्यालाही काढता येतो. अपरान्ह काळ काढण्यासाठी आपल्या गावच्या सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळा माहिती असायला हव्यात. प्रत्येक गावाची ती वेळ वेगळी असल्याने अपरान्ह काळदेखील वेगळा असतो. अपरान्ह काळ काढण्यासाठी दिवसाचे पाच समान भाग करावे लागतील. त्या पाच समान भागांना वेगवेगळी नावे आहेत.

ती अशी.

  • १. स्थानिक सूर्योदय वेळ
  • २. प्रात:काळ समाप्त
  • ३. संगव काळ समाप्त
  • ४. माध्यान्ह काळ समाप्त
  • ५. अपरान्ह काळ समाप्त
  • ६. स्थानिक सूर्यास्त वेळ.

ज्याने त्याने आपापली स्थानिक सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ गृहीत धरावी. सूर्यास्ताच्या वेळेतून सूर्योदयाची वेळ वजा केली की दिनमान म्हणजेच दिवसाचे एकूण तास येतात. याच दिनमानाचे पाच समान भाग करावेत. त्यानंतर प्रत्येक समान भाग सूर्योदयाच्या वेळेत मिळवित जावा. म्हणजे आपणास क्रमश: प्रात:काळ, संगवकाळ, माध्यान्ह काळ, अपरान्ह काळ व सूर्यास्त या समाप्ती वेळा मिळतील. त्यातील अपरान्हकाळ महत्त्वाचा.

उदाहरणार्थ:- आपल्या गावचा सूर्योदय सकाळी ६:०० वाजता व सूर्यास्त सायंकाळी ६:३० वाजता असेल तर दिवसाचे तास झाले साडेबारा. त्याचे पाच समान भाग केले तर अडीच तासांचा एक भाग होतो. सूर्योदयाच्या वेळेत पहिले अडीच तास मिळविले की मिळेल प्रात:समय. समाप्तीचा काळ म्हणजे सकाळचे साडेआठ. त्यात पुढे अडीच तास मिळविले की वाजतात ११. हा झाला संगव काळ. त्यात पुढचे अडीच मिळवायचे. वाजला दीड. हा झाला माध्यान्ह काळ. त्यात पुढचे अडीच मिळविले की वाजतात चार म्हणजेच दुपारी दीड ते चार हा झाला त्या गावचा अपरान्ह काळ. ज्यावेळी कावघास टाकणे प्रशस्त मानले जाते.*

कावघास टाकण्यासाठी माध्यान्ह काळ समाप्ती वेळेपासून अपरान्ह काळ समाप्तीपर्यंतचा काळ प्रशस्त असतो.

श्राद्ध म्हटले की लोकांना अनेक प्रश्न पडतात.

  • एखाद्याचा मृत्यू अधिकमासात झाला असेल तर?
  • श्राद्ध तिथीला ग्रहण असेल तर ?
  • श्राद्धाचे भोजन करावे की नाही ?
  • जिथे प्रश्न आहे तिथे उत्तर आहे…
  • एखाद्याचा मृत्यू अधिकमासात झालेला असतो. पण तरी त्याचे वर्षश्राद्ध मात्र अधिकमास ज्या महिन्यात असेल
    त्या नेहमीच्या महिन्यातच करावे.*
  • ग्रहण काळात श्राद्ध येत असेल तर ग्रहण वेधाच्या काळात हिरण्य श्राद्ध करावे.
  • माता-पिता जिवंत असताना इतर ठिकाणी श्राद्धाचे भोजन करावयास जायला कोणतीही हरकत नसते.
  • श्राद्धवेळी साधू-संन्यासी, योगी पुरुषांना भोजन दिल्यास पितर अधिक संतुष्ट होतात.
  • अनेकांना श्राद्धाच्या वेळी गोत्र माहीत नसते. मग त्यांनी श्राद्ध करताना ‘कश्यप’ गोत्र उच्चारावे.
  • अनेकांना पितरांची नावे माहिती नसतात किंवा वयोमानाने आठवत नसतात. मग अशावेळी पुरुष पितरांसाठी देवांची
    नावे घ्यावीत व स्त्री पितरांसाठी नद्यांची नावे घ्यावीत.

गरूड पुराणातातील बाराव्या अध्यायात ७० व ७१ क्रमांकाचा एक श्लोक आहे. तो असा…

” तस्मात पुत्रेण कर्तव्य षोडशत्रयम भर्तुर्वा कुरूते पत्नी तस्या: श्रेयो ह्यनन्तकम सम्परैतस्य या पत्यु: कुरूते चौर्ध्वदैहिकम क्षयाहं पाक्षिकं श्राद्धं सा सतीत्युचते मया “

याचा अर्थ असा आहे, जिला संतान नाही तिने पती हयात नसताना स्वत: श्राद्ध केले तरी चालते. वडील हयात
असताना पुत्राची आजोबा-पणजोबा यांच्यासाठी तीर्थश्राद्ध करायची इच्छा असेल तर त्याने त्यासाठी पित्याची परवानगी घ्यावी. पित्याच्या परवानगीशिवाय त्याने ते श्राद्ध करू नये

‼ श्री स्वामी समर्थ ‼

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )