कोणाला म्हणतात पुरोहित आणि पुरोहित यांचे कार्य काय

पुरोहित । पुरोहितसंस्थेचा उगम व विकास । पुरोहिताचे कार्य । पुरोहितांचे वर्ग, श्रेणी इत्यादी । स्त्री-पुरोहित ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

पुरोहित

‘पुरोहित’ हा शब्द ‘पुढे ठेवणे’ वा ‘नेतृत्व देणे’ या अर्थाच्या ‘पुरस् + धा’ या संस्कृत शब्दांपासून बनलेला असून ‘धर्मकृत्यांमध्ये नेतृत्व करणारा विशेषज्ञ’ असा त्याचा अर्थ आहे. हिंदू धर्मात पुरोहित हा कर्मकांड यथासांग जाणणारा म्हणून कर्मकांडाच्या नेतृत्वास आवश्यक असलेले पुण्य अंगी असणारी व्यक्ती होय. मात्र सर्वच कर्मकांडास पुरोहिताच्या नेतृत्वाची आवश्यकता नसते. उदा. संध्या, पूजा इ. पुरोहितावाचून करण्याचा यजमानास अधिकार असतो.

पुरोहिताच्या कार्याला ‘पौरोहित्य’ वा ‘पुरोहिती’ असे म्हणतात. जगातील बहुतेक सर्व समाजांतून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात पुरोहितांचे अस्तित्व आढळते.

पुरोहितसंस्थेचा उगम व विकास :

धर्माची सुरुवात झाली, तेव्हापासूनच पुरोहितसंस्था अस्तित्वात आहे, असे एक मत आहे. ती फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, एवढे मात्र निश्चितच. मोहें-जो-दडो व हडप्पा येथील समाजांत ती सुप्रतिष्ठित होती, असे दिसते. प्रागैतिहासिक काळातील गुहांतून पुरोहितांची चित्रे व मूर्ती आढळल्या आहेत. यूरोपात पुराणाश्मयुगाचा प्रारंभीचा काळ सोडला, तर इतर सर्व काळात पुरोहितांचे अस्तित्व असल्याचे पुरावे मिळाले आहेत. पुराणाश्मयुगाच्या मध्यकालात व उत्तरकालात पुरोहित हा बहुधा जमातीचा प्रमुख आणि चित्रकारही होता. नवाश्मयुगात शेतीला महत्त्व आले. नांगरणी, पेरणी, सुगी इत्यादींशी संबंधित विधी करण्यासाठी पुरोहिताची अधिकाधिक गरज भासू लागली आणि पुढे त्याचे महत्त्व वाढतच गेले.

धर्माच्या प्रारंभीच्या काळात पुरोहित नव्हते, प्रत्येक व्यक्ती स्वतःची धर्मकृत्ये स्वतःच करीत असे, असेही एक मत आढळते. धर्मकृत्यांचे कर्मकांड क्रमाक्रमाने गुंतागुंतीचे होत गेल्यामुळे सर्वसामान्य माणसाला स्वतःच्या उपजीविकेचे इतर व्यवहार सांभाळून हे कर्मकांड विधिपूर्वक पार पाडणे अशक्य झाले. मग श्रमविभागणीच्या व विशेषीकरणाच्या तत्त्वानुसार विशिष्ट व्यक्तींकडे ही धर्मकृत्ये सोपवली गेली. सर्वसामान्य लोकांना देवतेशी संपर्क साधता येत नाही परंतु या विशिष्ट व्यक्तींमध्ये काही अलौकिक सामर्थ्य असल्यामुळे त्यांना मात्र देवतेशी संपर्क साधता येतो, असे मानले जाई. मग असे लोक पुरोहित बनत.

योहानेस मारिंजर यांनी पुरोहितसंस्थेच्या विकासाची काही सामाजिक व आर्थिक कारणे पुढीलप्रमाणे दिलेली आहेत : यज्ञ व कर्मकांडाचे स्तोम, जेथे नित्य वा नैमित्तिक पूजा केली जाते अशा मंदिरांचे अस्तित्व, आध्यात्मिक व्यवहारांसाठी रिकामा वेळ, श्रमविभागणी होऊन स्थिर झालेला समाज आणि आर्थिक सुबत्ता, ही ती कारणे होत. सर्वसामान्यांची अंधश्रद्धा आणि पुरोहितांचे प्रभावी व्यक्तिमत्व यांमुळे पुरोहितसंस्था अधिकाधिक दृढमूल होत गेली. परंतु आधुनिक काळातील वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक इ. कारणांमुळे आता पुरोहितांचा प्रभाव खूपच कमी झालेला आहे.

आवश्यक पात्रता :

पुरोहित होण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीने ‘बृहस्पतिसव’ करावा, असे श्रौतसूत्रांतून म्हटलेले आहे. केवळ वंशपरंपरा, केवळ गुणवत्ता किंवा वंशपरंपरेसह गुणवत्ता या गोष्टींना महत्त्व देऊन पुरोहितांची निवड करण्याच्या भिन्नभिन्न पद्धती आहेत. उमेदवाराला अतिमानवी शक्तीशी संपर्क साधता येणे, ही अत्यंत महत्त्वाची अट असते. अंगात येणे, विशिष्ट स्वप्ने दिसणे, दृष्टांत होणे इ. मार्गांनी हा संपर्क साधल्याचे स्पष्ट होते. त्याखेरीज कुल, शील, विद्वत्ता इ. सद्‌गुण अंगी असावे लागतात. विशिष्ट वयाचीही अट घातली जाते. ज्योतिष, राजकारण, कायदा, न्यायदान इत्यादींचे ज्ञानही त्याच्याकडून अपेक्षित असते. त्याला शारीरिक व्यंग असू नये, असे सामान्य मत असले, तरी काही वेळा कुरूप, अपंग व तऱ्हेवाईक लोकांनाच पुरोहित केले जाते कारण, त्यातच त्यांचे इतरांहून वेगळेपण असते. पुरोहितपद हे बहुधा विधिपूर्वक स्वीकारले जाते. कधीकधी त्यासाठी लहानपणापासूनच शिक्षण घेतलेले असते. निवड करताना ब्रह्मचर्य, उपवास, अग्नी हातात धरणे, सर्पदंश इ. बाबतींतील व्यक्तीची सहनशीलता पाहिली जाते. काही वेळा, पूज्य मानलेल्या एखाद्या प्राण्याने एखाद्या व्यक्तीवर हल्ला करणे किंवा त्याने त्याच्या दारात उभे राहणे, यांसारख्या घटनांवरूनही पुरोहिताची निवड केली जाते. ईजिप्तमध्ये पुरोहितपद विकता येत असे. ग्रीकांमध्येही काही वेळा लिलाव करून ते विकले जाई

पुरोहिताचे कार्य :

पवित्र व लौकिक यांचे नाते जोडणारा कर्मकांडाचा जाणकार, ही पुरोहिताची मुख्य भूमिका असते. मानवसमूहाचा वा काही व्यक्तींचा प्रतिनिधी या नात्याने त्या समूहाच्या वा त्या व्यक्तींच्या वतीने तो आपले कार्य करीत असतो. जन्म, वयात येणे, विवाह, मृत्यू इ. महत्त्वाच्या प्रसंगी आणि विशेष अशा इतरही काही प्रसंगी त्याला बोलावले जाते. हिंदू लोक सोळा संस्कारांचे विधी करताना पुरोहिताची मदत घेतात. कर्मकांडाशी संबद्ध असलेली वा नसलेली अशी इतरही विविध कामे त्याला करावी लागतात. पुराणकथा, मंत्र, धर्मग्रंथ इत्यादींचे वाचन व पठण, मंदिरांचे रक्षण, पुराणकथांचे नाट्यीकरण, नृत्यांचे व मिरवणुकीचे नेतृत्व, संगीताची योजना इ. कृत्यांची जबाबदारी त्याच्यावर असते. त्याला देवतेचे रूप घेऊनही वावरावे लागते. उदा. ईजिप्तमध्ये हाथरदेवीच्या पुरोहित असलेल्या स्त्रिया तिचे रूप घेऊन नृत्य करतात. मुहूर्त पाहणे, ज्योतिष पाहणे, शुभाशुभ फल सांगणे, शकुनांचा अर्थ लावणे, भूत काढणे, धार्मिक चित्रे रेखाटणे, पूजेस लागणारे पदार्थ तयार करणे इ. कृत्येही तो करतो. न्याय देणे, संघर्ष मिटविणे, सदाचरणाचा उपदेश करणे ही कामेही त्याला करावी लागतात. सुफलता, शिकार, मासेमारी, हवापाण्यावर नियंत्रण, कृषी इत्यादींसाठी त्याची मदत घेतली जाते.

भारतात पुत्रप्राप्तीसाठी पुरोहितांकडून नियोग करून घेतल्याची उदाहरणे आहेत. एकंदरीत, पुरोहित हा समाजाला स्थैर्य देणारी विविध कृत्ये करीत असतो. ही कृत्ये करीत असताना त्याला विविध निषिद्धांचे पालन करावे लागते.

पुरोहितांचे वर्ग, श्रेणी इत्यादी :

भारतात वैदिक काळी पुरोहितांचा स्वतंत्र वर्ग नव्हता, असे दिसते. त्यामुळे ब्राह्मणेतर व्यक्तीही पुरोहित झाल्याची उदाहरणे आढळतात. परंतु पुढे त्यांची स्वतंत्र जात बनली. ग्रीक लोकांत पुरोहितांचा स्वतंत्र वर्ग नव्हता. तेथे कोणालाही पुरोहित होता येई. मादागास्करमधील काही जमाती, अमेरिकन इंडियन इ. लोकांतही पुरोहितांचा स्वतंत्र वर्ग आढळत नाही. इतर अनेक ठिकाणी मात्र वंशपरंपरागत अशा पुरोहितांचे स्वतंत्र वर्ग बनल्याचे आढळते. पुरोहितांतील दैवी शक्ती, त्यांचे कार्य, विद्वत्ता आणि प्रतिष्ठा यांनुसार त्यांच्यामध्ये उच्चनीच श्रेणी आणि विविध प्रकार निर्माण होतात. मग एकापेक्षा अधिक पुरोहितांची नियुक्ती केली जाते. वैदिक यज्ञातील ऋत्विजांची, म्हणजेच पुरोहितांची, संख्या १७ इतकी होती. अवेस्तामध्ये आठ प्रकारचे पुरोहित निर्दिष्ट केले आहेत. ज्यू पुरोहितांचे २४ गट पाडलेले होते. रोमन, पारशी, ख्रिस्ती इ. लोकांतही पुरोहितांचे अनेक प्रकार आढळतात.

स्त्री-पुरोहित :

जगातील अनेक समाजांतून स्त्रिया पुरोहित असल्याचे आढळते. निग्रो, अमेरिकन इंडियन, काही सैबेरियन जमाती, फिलिपीन्स बेटातील काही जमाती इ. लोकांत स्त्रिया पौरोहित्य करतात. ईजिप्तमध्येही स्त्रिया पुरोहित होत्या. रोममध्ये फ्लॅमेन डायालिस या पुरोहिताला आपली पत्नी फ्लॅमिनिका हिच्या निधनानंतर आपले पद सोडावे लागे कारण, तिच्याशी विवाह झाल्यामुळेच त्याला हे पद मिळालेले असे. आसाममधील खासी लोकांत स्त्रिया पुरोहित असतात. उग्रो-फिनिक, अंदमानी, काही ऑस्ट्रेलियन जमाती इ. लोकांमध्ये मात्र स्त्रियांना पुरोहित होण्यास बंदी घातलेली होती.

हिंदू धर्मातील ऋषी चे प्रकार आणि ऋषी विषयी माहिती

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )