।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
पुत्रदा एकादशीची ही कथा : Putrada Ekadashi Katha :
पूर्वी महिष्मती नावाच्या नगरात महिजित राजा राज्य करीत होता. तो प्रजाहितदक्ष होता. त्याच्या राज्यात भरपूर धनधान्य होते. राजा प्रजेच्या आरोग्याकडे ,काम धंद्याकडे, शेतीकडे, आणि धार्मिक कार्याकडे जातीने लक्ष घालीत असे. भरपूर दानधर्म आणि प्रजेचे संरक्षण यामुळे त्याची कीर्ती सर्वदूर पसरली होती.
परंतु राजाच्या मनात एकच खंत होतीे, त्याला पुत्र संतान नव्हते… निपुत्रिक माणूस कितीही श्रेष्ठ असला तरी संतानाशिवाय अभागी आहोत, आपल्या राज्याला वारस नाही, पिंडदान करणारा पुत्र नसल्यामुळे स्वर्गात स्थान नाही, मोक्ष नाही, पुत्रावाचून आपले जीवन निरर्थक असे राजाला वाटू लागले. त्याने दानधर्म, यज्ञ-याग, जप तप, व्रतवैकल्ये आणि तीर्थयात्रा केल्या, परंतु सर्व काही निष्फळ ठरले. एकेदिवशी त्याने आपल्या राज्यातील प्रतिष्ठित लोकांना, ब्राम्हणांना आणि विद्वान पंडितांना आपल्या राज्यसभेत बोलवून सांगितले “सज्जन हो ! माझ्या राज्यात सर्वकाही आहे. धनधान्य, शांती, समृद्धी, सुसज्ज सैन्य, कर्तबगार मंत्री आणि अधिकारी आहेत, पण मला पुत्रसंतान नाही… पुत्र नसल्यामुळे आम्ही पती-पत्नी दुःखी आहोत. आता तुम्हीच यावर उपाय शोधा.
राजाने स्पष्टतः आपली मनोव्यथा आपल्या राज्यातील निवडक मंडळींसमोर मांडली. राजाच्या या बोलण्याने जमलेल्या सर्व मंडळींची मने हेलावली. आपण इतके दिवस याचा विचारही केला नाही, फक्त स्वतःच्याच सुखाचा विचार केला असे लोकांना वाटले. राजाचे दुःख किती तीव्र आहे हे समजल्यामुळे आपण निष्क्रिय राहता कामा नये असे लोकांना वाटले. जमलेल्या मंडळींपैकी काही जणांनी सांगितले की आपली व्यथा ही प्रजेची व्यथा आहे. आम्ही आत्ताच साधू संतांकडे जाऊन यावर मार्ग व उपाय शोधतो, असे म्हणून जनतेतील मातब्बर मंडळी जंगलात राहणाऱ्या ऋषी जनांच्या आश्रमाकडे निघाली. हे शिष्टमंडळ लोमेश ऋषींच्या आश्रमात आले. ऋषींनी त्यांना येण्याचे कारण विचारले तेव्हा, त्यांनी महिष्मती राज्याबद्दल आणि राजा महीजित याबद्दल सर्व माहिती दिली. आमच्या राज्याला वारस नाही ही आमच्या राज्याची, राजाची ,आणि आमची व्यथा आहे.
लोमेश ऋषी अंतर्ज्ञानी होते. काही वेळ डोळे मिटून ते स्तब्ध राहिले. त्यांच्या मनोदृष्टीला राजा महिजिताचे पूर्व चरित्र दिसू लागले. नंतर डोळे उघडून लोमेश ऋषी बोलू लागले, “सज्जन हो ! महीजित राजा सत्वशील प्रजाहितदक्ष राजा आहे. परंतु तो पूर्वी एक गरीब व्यापारी होता. पाठीवर माल घेऊन त्याला गावोगावी हिंडावे लागे. पुण्यकर्म करण्याकडे त्याने त्याजन्मी फारसे लक्ष दिले नाही. तो स्वार्थी व वैश्य वृत्तीचा माणूस होता, मात्र तो एकादशीचे व्रत नेमाने पाळीत असे. त्यामुळे कालांतराने त्याला राज्यप्राप्ती झाली आहे, परंतु व्यापारासाठी हिंडत असताना एकदा त्याला तहान लागली. तळ्यावर जाऊन तो पाणी पिऊ लागला, तेव्हा तेथे एक गाय आली. त्याने तिला जबरदस्तीने हाकलली हे पापकर्म त्याला आता बाधत आहे.
यावर सर्वजण म्हणाले, “ऋषिवर्य, आता यावर काय उपाय करावा ते आपण सांगावे. ” लोमेश ऋषी म्हणाले, “तुम्ही सर्वांनी श्रावण शुक्ल एकादशीचा उपवास करा व त्या व्रताचे सर्व पुण्य राजाला अर्पण करा. राज्यातील प्रजेने आणि राजाराणीने पुत्रदा एकादशीचे व्रत केले .या व्रताच्या पुण्याईने राजाला पुत्रप्राप्ती झाली. त्यापुढे महिष्मती राज्यात ते पुत्रदा एकादशीचे व्रत नेहमी केले जाऊ लागले.