राखी पौर्णिमा : Rakhi Pornima । रक्षाबंधन : इतिहास । राखी बांधण्यामागील शास्त्र । नारळी पौर्णिमा : Narali Pornima । नारळी पौर्णिमेच्या जेवणातील पदार्थ (Narali Pornima Jevnatil Padarth) । नारळीभात । रसातल्या शेवया । नारळपोळी । नारळाचे निनाव । नारळीपाकाचे लाडू ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
राखी पौर्णिमा : Rakhi Pornima :
श्रावण पौर्णिमेला येणार्या रक्षाबंधन या सणाच्या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याला प्रेमाचे प्रतीक म्हणून राखी बांधते भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देऊन तिला आशीर्वाद देतो. सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या रक्षाबंधन या सणामागील इतिहास, शास्त्र, राखी सिद्ध करण्याची पद्धत आणि या सणाचे महत्त्व या लेखातून आपल्या पर्यंत पोहचवत आहे.
राखी बांधणे.
१. रक्षाबंधन : इतिहास
- पाताळातल्या बळीराजाच्या हाताला लक्ष्मीने राखी बांधून त्याला आपला भाऊ केले आणि नारायणाची मुक्तता केली… तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता.
- बारा वर्षे इंद्र आणि दैत्य यांच्यात युद्ध चालले… आपली १२ वर्षे म्हणजे त्यांचे १२ दिवस. इंद्र थकून गेला होता आणि दैत्य वरचढ होत होते. इंद्र त्या युद्धातून स्वतःचे प्राण वाचवून पळून जाण्याच्या सिद्धतेत होता. इंद्राची ही व्यथा ऐकून इंद्राणी गुरूंना शरण गेली. गुरु बृहस्पति ध्यान लावून इंद्राणीला म्हणाले, ‘‘जर तू आपल्या पतिव्रत्य बळाचा उपयोग करून हा संकल्प केलास की, माझे पतीदेव सुरक्षित रहावेत आणि इंद्राच्या उजव्या मनगटावर एक धागा बांधलास, तर इंद्र युद्ध जिंकेल.’’ इंद्र विजयी झाला आणि इंद्राणीचा संकल्प साकार झाला.
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः । तेन त्वाम् अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
अर्थ : जे बारीक रक्षासूत्र महाशक्तीशाली असुरराज बळीला बांधले होते, तेच मी तुम्हाला बांधत आहे… तुमचे रक्षण होवो. हा धागा तुटू नये आणि तुमचे सदैव रक्षण होवो.
- भविष्यपुराणात सांगितल्याप्रमाणे रक्षाबंधन हे मूळचे राजांसाठी होते… राखीची एक नवी पद्धत इतिहासकाळापासून चालू झाली.
२. राखी बांधण्यामागील शास्त्र
राखीपौर्णिमेच्या अर्थात् रक्षाबंधन या दिवशी वातावरणात यमलहरींचे प्रमाण जास्त असते… यमलहरी या पुरुष साकारत्व असतात. म्हणजेच त्या पुरुषांच्या देहात जास्त प्रमाणात गतीमान होतात. याच कारणास्तव यमदूत किंवा यमराज यांना प्रत्यक्ष चित्र-साकारतेच्या दृष्टीने साकारतांना पुरुष स्वरूपात साकारले जाते. पुरुषांच्या देहात यमलहरींचे प्रवाह वहाणे चालू झाले की, त्यांची सूर्यनाडी जागृत होते आणि या जागृत सूर्यनाडीच्या आधारे देहातील रज-तमाची प्रबलता वाढून यमलहरी पूर्ण शरिरात प्रवेश करतात. जिवाच्या देहात यमलहरींचे प्रमाण ३० प्रतिशतहून अधिक झाल्यास त्याच्या प्राणाला धोका उद्भवण्याची शक्यता असते; म्हणून पुरुषात असलेल्या शिवतत्त्वाला जागृत करून जिवाच्या सुषुम्नानाडीची काही अंशी जागृती करून प्रत्यक्ष शक्तीबिजाद्वारे, म्हणजेच बहिणीद्वारे प्रवाहित होत असलेल्या यमलहरींना, तसेच त्यांना प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी साहाय्य करणार्या सूर्यनाडीला राखीचे बंधन घालून शांत करण्यात येते…..
नारळी पौर्णिमा : Narali Pornima :
वरुणदेवतेची कृपा आपल्यावर आणि आपल्या कुटुंबियांवर सदैव रहावी, यासाठी समुद्रकिनारी रहाणारे आणि समुद्राच्या माध्यमातून आपला चरितार्थ चालवणारे श्रावण पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवतेची पूजा करून समुद्राला नारळ अर्पण करतात… या दिवशी समुद्राचे पूजन केले जाते…..
नागपंचमीनंतर श्रावण महिन्यात येणारा हा दुसरा महत्त्वाचा सण आहे… श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. ‘या दिवशी आपतत्त्वरूपी वायूमंडलाचे प्रमाण सागरी किनारा, तसेच नदीकाठ यांठिकाणी जास्त प्रमाणात असते. म्हणून तो प्रदेश पूजाविधीसाठी जास्त उपयुक्त मानला जातो.
या दिवशी वरुणदेवतेचा आशीर्वाद मिळवून ब्रह्मांडातील अधिकतम प्रमाणात आपतत्त्वस्वरूप लहरी ग्रहण करण्याचा प्रयत्न केला जातो. श्रावण पौर्णिमेला समुद्रकिनारी रहाणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात.
यादिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ शुभसूचक आहे, तसेच ते सर्जनशक्तीचेही प्रतीक मानलेले आहे… नदीपेक्षा संगम आणि संगमापेक्षा सागर जास्त पवित्र आहे. ‘सागरे सर्व तीर्थानि’ असे वचन आहे. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा.
जहाजांनी मालाची वाहतूक करतांना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो साहाय्य करतो… ‘नारळी पौर्णिमेच्या अगोदर समुद्राला भरती येणे, तसेच लाटांचे प्रमाण अधिक असणे, यांमुळे समुद्र खवळलेला असतो. नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रदेवतेला नारळ अर्पण करतात. तसेच ‘तुझ्या रौद्ररूपापासून आमचे रक्षण होऊ दे आणि तुझा आशीर्वाद प्राप्त होऊ दे’, अशी प्रार्थनाही करतात. त्यामुळे समुद्राला येणार्या भरतीचे प्रमाण अल्प होते…..’
नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्रात नारळ अर्पण करतांना तो पाण्यात फेकतात… त्यामुळे नारळ अर्पण करण्यामागील अपेक्षित लाभ मिळत नाही; त्यामुळे तो भावपूर्ण हळुवारपणे पाण्यात सोडावा अन् वरील प्रार्थना करावी! नारळी पौर्णिमेला नारळाचे पुजन करुन श्रीफळ समुद्राला अर्पण करण्यापूर्वी त्याचे पूजन करण्यात येते. श्रीफळाचे पूजन केल्याने त्यात परमेश्वरी तत्त्वाचे वलय कार्यरत होते. समुद्रदेवतेला शरणागत भावाने नारळ अर्पण केल्यामुळे चैतन्याचा प्रवाह समुद्राकडे प्रक्षेपित होतो. समुद्रदेवतेचे भावपूर्ण पूजन केल्यामुळे परमेश्वरी तत्त्वाचा प्रवाह समुद्रात आकृष्ट होतो.
नारळी पौर्णिमेच्या जेवणातील पदार्थ (Narali Pornima Jevnatil Padarth)
नारळी पौर्णिमा म्हणजे आठवतो नारळीभात… काही वेळेला नारळीभात एक गोड पदार्थ जेवणात असावा म्हणून पण बनवला जातो. नारळी पौर्णिमा का म्हणतात, तर समुदात नारळ अर्पण करून समुदास शांत करतात. पण हे जास्त कोळी लोकांमध्ये आहे. तसंच दक्षिणेकडे नारळीभात वेगळ्या पद्धतीने करतात. आणि ते नारळाला पूजतात. त्यांची वेगळी प्रथा आहे. पण सण एकच. नारळ म्हटला की सर्वांना शांत करणारा. नारळाचं दूध शरीरास खूप थंड असतं. या वेळी नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे एकत्र आलं आहे. बरेच वेळा एकत्र असतं पण काही वेळेला पंचांगाच्या दृष्टीने कधी कधी वेगळ्या दिवशी येते. तर या वर्षी रक्षाबंधनाला गोड पदार्थ नारळातला प्रकार हा व्हायलाच हवा. आज नारळी पौर्णिमा व राखी पौर्णिमा निमित्त काही गोड पदार्थ…..
नारळीभात
साहित्य –
दोन वाट्या तांदूळ, नारळाचा चव एक वाटी, चार लवंगा, दोन वाट्या गूळ, अर्धी वाटी साखर, वेलदोड्याची पूड, जायफळाची पूड, भाजून थोडीशी कुटलेली खसखस साधारण दोन चमचे, तीन ते चार चमचे साजूक तूप.
कृती –
प्रथम तांदूळ (आंबेमोहर असल्यास उत्तम) धुवून तासभर ठेवावे. नारळ खरवडून घ्यावा… गूळ बारीक चिरून घ्यावा. पातेल्यात थोडे म्हणजे दोन ते तीन चमचे साजूक तूप घालून त्यावर चार लवंगा घालाव्यात. लवंगा तडतडल्या की तांदूळ घालून थोडे परतावे. नंतर तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा. चवीसाठी किचित मीठ भात शिजतानाच घालावे. शिजलेला भात परातील गार करण्यासाठी ठेवावा. नंतर जाड बुडाच्या अथवा नॉनस्टीक पॅनमध्ये प्रथम थोडे साजूक तूप घालावे. नंतर त्यावर भाताचा एक थर, खोवलेल्या नारळाचा एक थर, गुळ साखरेचा एक थर पुन्हा भाताचा थर असे एकावर एक थर घालावेत. पातेले मंद गॅसवर ठेवावे व त्यावर पाणी भरलेले झाकण ठेवावे. थोड्या वेळाने वाफ येऊन गुळ साखर विरघळू लागली की जायफळ पूड, वेलदोडा पूड व कुटलेली खसखस घालून हलवावे आणि पुन्हा आवश्यतेनुसार दोन तीन वाफा द्याव्यात. भात वाढताना वरून साजूक तूप घालावे. हा भात अतिशय रूचकर लागतो आणि गार गरम कसाही चांगला लागतो. भात मोकळा झाला पाहिजे. आवडत असल्यास काजू बदाम तुकडेही घालवेत…..
रसातल्या शेवया
साहित्य –
४ वाटय़ा तांदूळाचे पीठ, एक नारळ, पाव किलो गूळ, चवीपुरते मीठ, वेलची पावडर, जायफळ…..
कृती –
प्रथम पातेल्यात साडेतीन वाटय़ा पाणी घेऊन ते उकळत ठेवावे… त्यात चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळल्यावर त्यामध्ये पीठ घालून ढवळावे. झाकण ठेवून मंद आचेवर दोन मिनिटं वाफ येऊ द्यावी. वाफवलेले पीठ चांगले मळून घ्यावे. पिठाचे मुठीएवढे गोळे करून घ्यावे. शेवग्यात (शेवयांचा लाकडी साचा) किंवा चकलीच्या साच्यात पिठाचे गोळे घालून शेवया पाडाव्यात. नारळाचे दूध काढून त्यात गूळ, वेलची, जायफळ पावडर घालून रस तयार करावा. ताटलीत शेवया घेऊन, त्यात रस घालून त्याचा आस्वाद घ्यावा…..
नारळपोळी
साहित्य –
दोन वाट्या नारळाचा चव, अर्धा वाटी खवा, जायफळ वेलची पूड, तीन वाट्या साखर. नारळपोळीसाठी एक वाटी रवा, एक वाटी मैदा, एक वाटी दूध…
कृती :
रवा, मैदा आणि दूध टाकून नीट मळून घ्यावं. नारळाचा चव, खवा, साखर आणि थोडं दूध घालन शिजवून घ्यावं… हा नारळाचा चव गुळाच्या पोळीप्रमाणे दोन पाऱ्यात लाटून तव्यावर तूप घालून भाजावी. करायला पण सोपी आणि साधी आहे जरूर करून बघा. घट्ट डब्यात पाच-सहा दिवस चांगल्या कुरकुरतीत राहतात.
साहित्य –
अर्धा वाटी कॉर्नफ्लावर, अर्धा वाटी ओलं खोबरं, तीन वाट्या नारळाचं दूध, दीड वाटी गूळ, अर्धा चमचा जायफळाची पूड, अर्धा वाटी तूप…
कृती :
एका भांड्यात नारळाचं दूध, गूळ, खोबरं, जायफळ आणि तूप टाकून एक उकडी आणावी. कार्नफ्लावर थोड्या पाण्यात टाकून मिक्स करून घ्यावा. मिश्रण उकळल्यावर त्यात कॉर्नफ्लावर टाकून थोडंसं शिजवून घ्यावं. म्हणजे एक ते दीट मिनिट आणि लगेच तूप लावलेल्या थाळीमध्ये ओतावं. थोडं गार झाल्यावर त्याच्या वड्या पाडाव्यात. असंच डेझर्ट थाय कुकरीमध्ये पण करतात. हाच भात वेगळ्या पद्धतीने म्हणजे. नारळाच्या चव, गूळ टाकून वेगळी चव बनवावी. तांदूळ तूप टाकून परतवून मग साधं पाणी टाकून वाफवून घ्यावेत. नंतर त्यात नारळाचा चव टाकून नीट मिक्स करून घ्यावा. मग त्यात बदाम टाकून सर्व करावं…..
नारळीपाकाचे लाडू
साहित्य :
दोन वाटी रवा, एक वाटी नारळाचा चव, अर्धा वाटी तूप, अर्धा वाटी साखर, बेदाणे, एक चमचा वेलची पावडर, एक वाटी खवा
कृती :
एका कढईत तूप आणि रवा मंद गॅसवर भाजून घ्यावा… त्यात नारळाचा चव टाकून परत भाजून घ्यावा, रवा थोडा फुलल्यावर आणि खोबरं थोडं सुकं झाल्यावर बाजूला काढून ठेवावं. साखरेचा एकतारी पाक तयार करावा. खवा थोडा भाजून घ्यावा. रवा आणि खवा साखरेच्या पाकात टाकून नीट मिसळून घ्यावा. एक तासाने रवा साखरेच्या पाकात मिळून घट्ट होऊ लागतो. तेव्हा वेलची पूड आणि बेदाणे टाकून लाडू वळावेत. साखरेच्या ऐवजी गूळ पण वापरून लाडू करतात. हे पण छान लागतात.