।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
रक्षाबंधन : Raksha Bandhan :
आज सकाळी उठल्यापासून श्री ची गडबड चालु होती. आई दीदी कधी येणार तीला लवकर यायला सांग, चल पटकन, फोन लाव न तिला.
श्री माझा आठ वर्षांचा मुलगा. आणि त्याची दीदी म्हणजे माझ्या मोठ्या बहिणीची मुलगी. मला स्वतःची मुलगी नाही म्हणून मी प्रत्येक रक्षाबंधन आल्यावर तिलाच बोलवत होते. श्री लाही तिचा खूप लळा होता. आम्ही बहिणींमध्येसुद्धा खुप प्रेम. श्री सारखा फोन लावण्यासाठी गडबड करत होता म्हणून मी सकाळची कामे बाजूला ठेवली आणि त्याच्या दीदीला फोन केला.
फोन माझ्या बहिणीने घेतला. मी तीला श्री ची सकाळपासून चाललेली गडबड सांगितली आणि त्याच्या दीदीला लवकर पाठव म्हणून सांगितले. त्यावर बहिणीने जे उत्तरदिले ते ऐकून मी शांतच झाले. मी फोन ठेवला. श्री ची गडबड अजूनही चालूच होती.
आई दीदी कधी येणार सांग ना लवकर यायला सांगितले का तु ? तिला त्याचे ते शब्द ऐकून मला रडूच आले. मला रडताना बघून श्री देखील रडायला लागला. मी त्याला कसेतरी समजावले. की दीदीला काम असल्या मुळे ती नाही येऊ शकत. असे म्हटल्यावर श्री चा रडण्याचा जोर आणखीनच वाढला.
तो त्याच्या बाबांना जाऊन सांगायला लागला. बाबा दीदी येणार नाही आता मला राखी कोण बांधणार ? त्याचे बाबा मला म्हटले, का नाही येणार ग आपल्या श्री ची दीदी ?
मी श्री ला थोडं समजावले आणि बाहेर खेळायला पाठवले. फोनवर जेंव्हा बहीण मला म्हटली की तीचापन भाऊ आहे त्याला कोण राखी बांधणार. ?
हे ऐकून माझ्या पाया खालची जमीनच सरकली. खरं सांगायचं झालं तर बहिणीला दोन मुली होत्या. एकीने तिच्या मुलाला राखी बांधली असती. मला मुलगी नाही म्हणून मी तिच्याच मुलींवर माझी हौस पुर्ण करत होते पण ती असे का बोलली काही कळेना.
आम्हालाही मुलीची खूप हौस होती, पण श्रीच्या वेळेलाच मला प्रॉब्लेम आले होते. म्हणून मी पुढचा चान्स नाही घेऊ शकले. त्यागोष्टीचे आता पर्यंत कधी एवढे वाईट नव्हते वाटले. पण आज खरी मुलीची उणीव वाटत होती. श्री ला मी कसे तरी समजावले. पण तो खुप नाराज होता. मला सारखा म्हणत होता, माझे सगळे मित्र पूर्ण हाताला राखी बांधतात आणि मला एकपण राखी नाही. मला त्याचे शब्द टोचत होते.
रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी मी थोडी नाराजीनेच उठले. आणि ईच्छा नसतानाही रोजच्या कामाला लागले. श्री च्या बाबांनीही स्वतःचे आवरले आणि बाहेरून काही आणायचे का ? म्हणून विचारले मी त्यांना सामानाची यादी दिली. आणि मी घरातल्या पुढच्या कामाला लागले. श्री मला अधून मधुन विचारत होता, आई मला आज राखी कोण बांधेल ? मी त्याचं मन दुसरीकडे वळवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होते.
थोड्यावेळाने दारावरची बेल वाजली. श्री चे बाबा असतील म्हणून मी दार उघडले. बघते तर काय, श्री च्या बाबांबरोबर साधारण पाच वर्षांची गोंडस मुलगी उभी होती. आणि मी तिला याच्या आधी कुठेतरी बघितल्या सारखे वाटत होते.
श्रीच्या बाबांनी श्री ला बोलावून सांगितले, बघ तुला राखी बांधायला बहीण हवी होती न ? ही घे तुझी बहीण. तुला दर वर्षी हीच राखी बांधेल. मी उत्सुकतेनं त्यांच्याकडे बघत होते. श्री ला खुप आनंद झाला. तो लगेच तिच्या बरोबर खेळायला लागला. श्रीचे बाबा म्हटले, अग रोज मी ज्या आज्जी कडून भाजी घेतोना त्यांच्या मुलीची ही मुलगी. मला अचानक आठवले, हो हो मीपण बघितलंय हिला त्या आज्जींकडे.
श्रीचे बाबा सांगू लागले. हिची आई दोनवर्षापुर्वीच वारली, हिचे मोठेपणी लग्न करावे लागेल म्हणून हिच्या तिकडच्या आजी आजोबांनी हिची जबाबदारी घ्यायला नकार दिला. तेव्हापासून ही चिमुकली तिच्या ह्या भाजीवल्या आजी कडेच राहते. मी नेहमी तिची विचारपूस करतो. आजीला ह्या नातीची खूप काळजी लागून राहते.
आजी बऱ्याच वेळा म्हणतात, माझ्या नंतर कुणीच नाही हिचे. मी नेहमी आजीला गमतीत म्हणायचो आम्हाला मुलगी नाही देतेस का आम्हाला ? पण आज गमतीत न विचारता खरोखर विचारले. आजी तर रडायलाच लागल्या, म्हटल्या ह्या पोरीचं भाग्यच उजळेल. तुमच्या सारखे आई वडील मिळाले, तर माझी काही हरकत नाही.
हे सगळं ऐकून तर माझा माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता. मी रडायलाच लागले. ह्यांनी मला जवळ घेतले आणि मला हसवण्यासाठी म्हटले, तुझ्या सारखीच गोड. हे बघ आपली श्रेया. मी आश्चर्याने त्यांच्या कडे बघत म्हटले कोण श्रेया ?ह्यांनी माझे डोळे पुसत म्हटले श्री ची बहीण श्रेया.
मला खुदकन हसू आले. आणि गेल्या आठ वर्षातून पहिल्यांदा माझ्या श्री ला त्याच्या हक्काच्या बहिणीने राखी बांधली. आमच्या घरात लक्ष्मीचे आगमन झाले. एका भावाला गोड गोड बहीण मिळाली.