रामफळ पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । रामफळ पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन । रामफळ पिकास योग्य हवामान आणि रामफळ पिकास योग्य जमीन । रामफळ पिकाच्या सुधारित जाती । रामफळ पिकाची अभिवृद्धी आणि लागवड पद्धती । रामफळ पिकास योग्य हंगाम । रामफळ पिक लागवडीचे अंतर । रामफळ पिकास वळण । रामफळ पिक छाटणीच्या पद्धती । रामफळ पिक खत व्यवस्थापन । रामफळ पिक पाणी व्यवस्थापन । रामफळ पिकातील आंतरपिके, आंतरमशागत आणि तणनियंत्रण । रामफळ पिकाच्या महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । रामफळ पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । रामफळ पिकावरील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण । रामफळ पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि हाताळणी ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
रामफळ लागवड : Ramphal Lagwad : Ramphal Sheti :
रामफळ हे सीताफळ वर्गातील एक महत्त्वाचे फळपीक आहे. या फळझाडाच्या सलग बागा नसल्या तरी चार-दोन झाडांची लागवड फार वर्षांपूर्वीपासून होत आहे. अलीकडे रोजगार हमी योजनेमार्फत फळझाडांच्या लागवडीत रामफळाला स्थान मिळाल्यामुळे ही लागवड बागांच्या स्वरूपात होऊ लागली आहे. रामफळाचा मोठा वृक्ष होतो व अनेक वर्षे फळे देतो. फळे गरदार आणि चविष्ट असतात. भिन्न प्रकारच्या हवामानांत आणि जमिनींत हे फळझाड वाढते.
रामफळ पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार
रामफळाचे मूळस्थान क्युबा हे असल्याचे मानले जाते.
रामफळाचे महत्त्व :
रामफळ हे गरदार, चवदार असे फळ मानले जाते. पक्व फळात दर 100 ग्रॅममध्ये खालीलप्रमाणे अन्नघटक असतात.
अन्नघटक | प्रमाण % |
पाणी | 76.8 |
शर्करा | 20.9 |
प्रथिने | 1.4 |
स्निग्धांश | 0.3 |
खनिजे | 0.7 |
चुना | 0.07 |
स्फुरद | 0.01 |
लोह | 0.6 |
कॅरोटीन | अत्यल्प |
उष्मांक | 90 इंटरनॅशनल युनिट |
रामफळाचा भौगोलिक प्रसार :
उष्ण कटिबंधीय प्रदेशात या फळझाडाची वाढ चांगली होते. क्युबा, मध्य- अमेरिका, मध्य आफ्रिका, श्रीलंका, म्यानमार, हवाई बेटे, मलेशिया, भारत, बांगला देश, इत्यादी देशांत रामफळाची झाडे व लागवड आढळते.
रामफळ पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन :
महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा तसेच विदर्भात रामफळाची तुरळक झाडे आणि बागा आहेत. अलीकडच्या गणतीप्रमाणे महाराष्ट्रात एक लाख झाडे असण्याचा अंदाज आहे. अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद या जिल्ह्यांतून रामफळाची झाडे अधिक आहे. पूर्ण वाढलेल्या एका झाडापासून दरवर्षी सुमारे 200 फळे मिळतात व त्यांचे वजन सुमारे 80 किलो भरते.
रामफळ पिकास योग्य हवामान आणि रामफळ पिकास योग्य जमीन :
या पिकास उष्ण आणि दमट हवामान मानवते. कडाक्याची थंडी, डोंगरमाथ्यावरची हवा या फळास मानवत नाही. सुपीक, खोल आणि गाळाची जमीन या फळझाडास चांगली मानवते. हलक्या उथळ आणि मुरमाड जमिनीत रामफळ चांगले वाढत नाही.
रामफळ पिकाच्या सुधारित जाती :
या फळझाडात फारशा जाती नाहीत. तथापि आंध्र प्रदेशातील संगारेड्डी येथील संशोधन केंद्राने बुलक हार्ट आणि ठसेदार या दोन जाती विकसित केल्या आहेत.
रामफळ पिकाची अभिवृद्धी आणि लागवड पद्धती :
अभिवृद्धी :
रामफळाची लागवड रोपे लावून केली जाते. रामफळाच्या स्थानिक जातीवर इच्छित झाडाचे डोळे भरूनही अभिवृद्धी करता. इनसिटू- स्वयंभू पद्धतीने गावठी रामफळावर उत्पादनक्षम झाडाचे कलम करता येते.
लागवड पद्धती :
रामफळाची 8 x 8 मीटर अंतरावर 1 X 1 X 1 मीटर आकाराचे खड्डे खणून त्यांत पावसाळयात रोपे लावून लागवड केली जाते.
रामफळ पिकास योग्य हंगाम आणि रामफळ पिक लागवडीचे अंतर :
रामफळाची लागवड पावसाळयात जून-जुलै महिन्यात आणि 8 x 8 मीटर हमचौरस अंतरावर केली जाते.
रामफळ पिकास वळण आणि रामफळ पिक छाटणीच्या पद्धती :
रामफळाचे झाड एकाच खोडावर डेरेदार वाढवून घ्यावे. त्यासाठी 1 मीटर उंचीपर्यंतच्या फुटी लहान वयातच वेळोवेळी काढून टाकाव्यात. फळधारणा होण्यासाठी अथवा फुले लागण्यासाठी रामफळाच्या झाडाची छाटणी करावी लागत नाही.
रामफळ पिक खत व्यवस्थापन आणि रामफळ पिक पाणी व्यवस्थापन :
रामफळाच्या झाडांना नियमितपणे खते आणि पाणी जरुरीप्रमाणे देणे गरजेचे असते. रामफळास ऑगस्ट महिन्यात फुले येतात व मार्च – एप्रिल महिन्यामध्ये फळे तयार होतात.
तेव्हा फळधारणा झाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात रामफळाच्या झाडास प्रत्येकी पुढीलप्रमाणे खते द्यावीत.
- कंपोस्ट खत … 50 किलो
- सुपर फॉस्फेट… 2.5 किलो
- सल्फेट ऑफ पोटॅश…5.0 किलो
हिवाळयात 15-20 दिवसांनी तर फळे काढणीपर्यंत 15-20 दिवासांनी पाण्याची पाळी द्यावी. फळे काढणीस तयार असताना अखेरीस 15 दिवसांनी तर फळे काढणीपर्यंत 10-15 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी.
रामफळ पिकातील आंतरपिके, आंतरमशागत आणि तणनियंत्रण :
रामफळाच्या बागेत पहिली 5 वर्षे, एरंडी, तूर, शेवगा, यांसारखी पिके घ्यावीत. आंतरमशागत करताना खोडाभोवती चाळणी करून आळी करावीत. तणांचा बंदोबस्त, निंदणी, खुरपणी, आच्छादने आणि तणनाशकांचा वापर करून करावा.
रामफळ पिकाच्या महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :
या फळझाडावर फारशा किडी आढळत नाहीत.
रामफळ पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण
या झाडावर फारसे रोग आढळत नाहीत.
रामफळ पिकावरील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण :
या फळझाडावर शारीरिक विकृतींसंबंधी नोंद अथवा निरीक्षण आढळले नाही.
रामफळ पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि हाताळणी :
रामफळास ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये फुले येतात व फळे तयार होण्याचा काळ मार्च एप्रिल हा असतो. फळांचा रंग तसेच पोत बदलतो व त्यानुरूप फळ तयार झाले असे ओळखावे. लागवडीनंतर 10-12 वर्षांपासून भरपूर आणि नियमित उत्पादन सुरू होते. चांगल्या जमिनीत वाढलेल्या व व्यवस्थित निगा राखलेल्या एका झाडापासून सुमारे 200 फळे दरवर्षी मिळतात. या फळांचे वजन 80 ते 100 किलो भरते. रामफळाचे झाड 45-50 वर्षे उत्पादन देते.
सारांश :
रामफळ हे उष्ण कटिबंधातील सदाहरित प्रकाराचे फळझाड आहे. सीताफळ वर्गातील हे फळझाड खूप वर्षांपासून भारतात आढळत असले तरी त्याचे मूळस्थान क्युबा हे मानले जाते. भारतात- विशेषकरून दक्षिण भारतात रामफळाची लागवड आढळते. उष्णदमट हवा आणि खोल, पोयट्याची पाणी धरून ठेवणारी जमीन या फळझाडास मानवते. रामफळास ऑगस्ट-सप्टेंबर या काळात फुले येतात व मार्च – एप्रिल या काळात फळे तयार होतात. फळे गरदार, चवदार आणि पौष्टिक असतात. एका झाडापासून सुमारे 200 फळे वयाच्या 50 वर्षांपर्यंत मिळतात.