रांगोळी,रंगोली । Rangoli ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
रांगोळी
रांगोळी ही भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोक-कला आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावनेत आणि संस्कृतीमध्ये बरीचशी समानता आहे.
अंगणामध्ये रांगोळी रोज काढली जाते. जेवणाच्या ताटाभोवतीही काढतात. दिवाळी किंवा तिहार, ओणम, पोंगल आणि भारतीय उपखंडातील हिंदू सणांच्या वेळी घरासमोर रांगाोळ हमखास काढतात. रांगोळ्यांच्या डिझाईन्स त्यांच्यातील कला आणि परंपरा दोन्ही जिवंत ठेवून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पाठविल्या जातात.
रांगोळीचा हेतू म्हणजे शक्ती, उदारता जाणवणे आणि नशीब मिळविणे हे आहे. परंपरा, लोकसाहित्य आणि प्रत्येक क्षेत्रासाठी खास असलेल्या पद्धती प्रतिबिंबित केल्यामुळे डिझाईनचे वर्णनदेखील भिन्न असू शकते. हे पारंपरिकपणे मुली किंवा महिलांनी केले आहे. साधारणता, सण, शुभ उत्सव, विवाह उत्सव आणि इतर समान टप्पे आणि मेळावे यासारख्या प्रसंगांमध्ये रांगोळ्या काढतात.
रांगोळी डिझाईनमध्ये साधे भूमितीय आकार, देवतांचे प्रभाव किंवा फुलांचे आणि पाकळ्याचे आकार (दिलेल्या उत्सवासाठी योग्य) असू शकतात, परंतु असंख्य लोकांकडून तयार केलेल्या त्यांत खूप विस्तृत डिझाइन्स देखील असू शकतात. बेस सामग्री सामान्यत: कोरडे किंवा ओले रांगोळीच्या दगडाचे चूर्ण, तांदळाचे पीठ किंवा अन्या कोरडे पीठ असते. रांगोळीत शेंदूर, हळद, कुंकू आणि इतर नैसर्गिक रंग जोडले जाऊ शकतात. इतर सामग्रीमध्ये लाल विटांची पावडर आणि फुले व त्यांच्या पाकळ्या समाविष्ट असतात.
संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते. सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात. रांगोळी म्हणजे रांगोळीच्या दगडाच्या चूर्णापासून व रंगांच्या साहाय्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झालेली आकृती. भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला खूप महत्त्व आहे. सण, उत्सव, मंगलसमारंभ, पूजा, कुलाचार, कुलधर्म, संस्कारविधी, व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे. रांगोळी ही एक कला आहे आणि तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे असे मानले जाते. प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे. देवघर, अंगण, उंबरठा तसेच तुळशीयांच्याजवळ रांगोळी काढली जाते. एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेल्या पाटाभोवती आणि पाटाखालीही रांगोळी काढतात. दिवाळीच्या सणात दारापुढे किंवा अंगणात विविध प्रकारच्या रांगोळ्या काढून त्या विविध रंगांनी भरतात. सारवलेल्या जमिनीवर रांगोळीच्या किमान चार रेषा काढल्या जातात. गोपद्मव्रतामध्ये चातुर्मासात रांगोळीने गायीची पावले काढणे अशासारखे आचारही परंंपरेने केले जातात.
सकाळी सडासंमार्जन केल्यावर अंगणात रांगोळी काढण्याची पद्धती ग्रामीण भागात विशेष पहायला मिळते. शहरातही काही महिला आपल्या घरापुढे रांगोळी काढतात. हिंदू धर्माप्रमाणेच पारशी धर्मातही रांगोळी ही अशुभनिवारक व शुभप्रद मानली गेली आहे.
रांगोळीचा उल्लेख रामायण, महाभारत तसेच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो. वैदिक साहित्यात मंडल अथवा चक्र असे शब्द आढळतात. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी वात्स्यायनाने लिहिलेल्या कामसूत्र या ग्रंथामध्ये स्त्रियांना अवगत असाव्या अशा चौसष्ट कलांमध्ये रांगोळी या कलेचा समावेश केला आहे. इसवी सनाच्या तिसऱ्या शतकात धान्याचा उपयोग करून रांगोळी काढीत. सरस्वतीच्या मंदिरात तसेच कामदेव व शिवलिंग यांच्या पूजेसाठी विविधरंगी फ़ुलांनीही आकृतिबंधात्मक रांगोळी काढत.
वरांग चरित या ग्रंथात (सातवे शतक) पंचरंगी चूर्णे, धान्ये व फुले यांनी रांगोळीचे चित्रविचित्र आकृतिबंध तयार करीत असल्याचे उल्लेख आहेत. .नलचम्पू ग्रंथात (दहावे शतक) उत्सवप्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचे उल्लेख आहेत. गद्यचिंतामणी, देशीनाममाला, मानसोल्लास या गद्यचिंतामणी (अकरावे शतक) या ग्रंथात भोजनसमारंभात मंगलचूर्णरेखा काढीत, असा उल्लेख आढळतो. हेमचंद्राच्या (अकरा-बारावे शतक) देशीनाममाला या ग्रंथात तांदळाच्या पिठाने रांगोळी काढीत असल्याचा निर्देश आहे.
जमिनीवर केलेले सुशोभन हा जगातील विविध संस्कृतींमध्ये आधुनिक येणारा कलाप्रकार आहे. आफ्रिका, प्राचीन अमेरिका, क्यूबा, तिबेट येथील वांशिक जनजाती अशा प्रकारच्या चित्ररचना जमिनीवर करीत असत. प्रजननासाठी तसेच सुप्त शक्तीना प्रसन्न करण्यासारख्या विविध हेतूंनी या जनजाती अशा आकृती रेखाटत असत. भारतातही वांशिक जनजातींनी ही पद्धती आत्मसात केली असावी असे मानले जाते. मानसोल्लासात (बारावे शतक) सोमेश्वराने धूलिचित्र या नावाने व श्रीकुमार याने शिल्परत्नात धूलिचित्र किंवा क्षणिकचित्र या नावाने रांगोळीचा निर्देश केला आहे.
सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे दोन उद्देश होत. रांगोळीच्या ज्या आकृत्या काढतात त्या प्रतीकात्मक असतात. स्वस्तिक, सूर्य, चंद्र, तारे, चक्र, चक्रव्यूह, त्रिशूळ, वज्र, कलश अशा प्रतीकांचा समावेश असतो.रांगोळीचे त्रिदल हे त्रिभुवन, तीन देव, तीन अवस्था व त्रिकाळ यांचे म्हणजेच पर्यायाने त्रिधा विभक्त अशा विश्वतत्त्वाचे प्रतीक आहे असे मानले जाते. शंख, स्वस्तिक, चंद्र, सूर्य ही आणखी प्रतीके होत.साखळी ही नागयुग्माचे, अष्टदल हे अष्टदिशातत्मक विश्वाचे, कमल हे लक्ष्मीचे व प्रजननशक्तीचे प्रतीक असून वैष्णव उपासनेत त्याला विशेष महत्त्व आहे. याशिवाय एकलिंगतोभद्र, अष्टलिंगतोभद्र, सर्वतोभद्र अशाही रांगोळ्या धर्मकृत्यांत काढल्या जातात. प्रतीकांच्या रचना म्हणजे एक प्रकारची सांकेतिक भाषाच असते असे मानले जाते.
रांगोळीतील प्रतीके ही आध्यात्मिक अनुभूती देतात अशीही धारणा रांगोळी काढण्यामागे दिसून येते. साधारणत: रांगोळीमध्ये स्वस्तिक, गोपद्म, शंख, चक्र, गदा, कमळाचे फूल, बिल्वपत्र, लक्ष्मीची पावले, सूर्य देवेतेचे प्रतीक, श्री, कासव इत्यादी मांगल्यसूचक व पवित्र रांगोळ्या काढल्या जातात.
चैत्र महिन्यात काढले जाणारे चैत्रांगण ही एक विशेष प्रतीकात्मक रांगोळी आहे. यात झुल्यात बसलेली देवी, राधाकृष्ण, चंद्र, सूर्य, गणपती, गोपद्म, गणपती, सरस्वतीचे रेखांकन, अशी विविध प्रतीके काढली जातात.
आधुनिक व्यक्तिचित्रणात्मक रांगोळी रांगोळीचे आकृतीप्रधान आणि वल्लरीप्रधान असे दोन भेद मानले जातात. आकृतीप्रधान प्रकारात रेषा, वर्तुळ यांचा समावेश असतो तर वल्लरीप्रधान मध्ये वेळी, पाने, फुले यांचे आकार असतात.ठिपक्यांची रांगोळी हा आणखी एक प्रकार. प्रथम भूमीवर मोजून काही ठिपके देतात व ते उभ्या आडव्या रेषांनी जोडून त्यातून मोर, कासव, कमळ, वेल इ.आकृती निर्माण करतात. सध्याच्या काळात अनेक धार्मिक, सामाजिक व पर्यावरण विषयकही रांगोळ्या काढल्या जातात. मुक्त हस्त चित्रात्मक रांगोळी असा कलाप्रकारही विकसित झालेला दिसून येतो.