।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
साने गुरुजी
पांडुरंग सदाशिव साने गुरुजी | साने गुरुजी स्मृतिदिन. – Pandurang Sadashiv Sane Guruji | Pandurang Sadashiv Sane Guruji Memorial Day.
(जन्म : २४ डिसेंबर १८९९; – ११ जून १९५०) हे मराठीतले एक श्रेष्ठ गांधीवादी शिक्षक, समाजसुधारक आणि प्रतिभावंत लेखक होते.
साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला… त्या ठिकाणी त्यांचे वडील कोर्टाचे काम करीत असत. कोर्टाचे घराणे साधारणतः वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण त्यांच्या वडिलांच्या, सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. त्यानी इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. ही उच्च पदवी मिळवली होती.
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून सहा वर्षे (१९२४ ते १९३०) नोकरी केली… प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवावृत्ती शिकवली. अंमळनेर येथील प्रताप तत्त्वज्ञान केंद्र येथे त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला…..
इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले… त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खादीचाच वापर करत असत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न केले. जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील काँग्रेस अधिवेशन (१९३६) यशस्वी होण्यासाठी त्यांनी खूप काम केले. इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार केला. फैजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी ‘मैला वाहणे’ व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली…..
साने गुरुजी यांनी राष्ट्र सेवा दलाची स्थापना केली. – Sane Guruji established Rashtra Seva Dal.
‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून साने गुरुजीच्या देशभक्तिपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत… त्यातील “बलसागर भारत होवो” सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. त्यातील ही एक कविता…..:
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो||ध्रु||
समाजातील जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला… सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी १९४६ च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला, या भूमिकेला महात्मा गांधींचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला, तो शेवटपर्यंत मिळाला नाही. अखेर साने गुरुजींनी या मुद्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. ‘एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले,’ असे त्या वेळी म्हटले गेले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले… स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे- रचित गीता प्रवचने सुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात (१९३२) सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. तसेच पुढे बंगलोर येथील तुरुंगात असताना त्यांनी तिरुवल्लिवर नावाच्या कवीच्या ‘कुरल’ नावाच्या तमिळ महाकाव्याचे मराठीत भाषांतर केले. नंतर फ्रेंच भाषेतील Les Misérables या कादंबरीचे ‘दुःखी’ या नावाने मराठीत अनुवादन केले.
डॉ. हेन्री थॉमस या जगप्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाच्या The story of human race या पुस्तकाचे मराठीत ‘मानवजातीचा इतिहास’ असे भाषांतर केले… ‘करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभुशी तयाचे’ हे गुरुजींच्या जीवनाचे सार होते. मनोरंजनातून मुलांवर सुसंस्कार करण्यासाठी गुरुजींनी अनेक पुस्तके लिहिली. साने गुरुजींचे भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मावर निरतिशय प्रेम होते. त्यानी भारतीय संस्कृती हा ग्रंथ लिहिला. तसेच भारतीय संस्कृतीतील अनेक महापुरुषांची चरित्रे लिहिली. त्यांचे ‘मोरी गाय’ हे पुस्तक प्रसिद्ध आहे. मातृहृदयी गुरुजींनी आई वडिलांच्या प्रेमावर ‘मोलकरीण’ नावाची अप्रतिम कादंबरी लिहिली ज्यावर पुढे जाऊन मराठी चित्रपट निघाला.
साने गुरुजींच्या गाजलेल्या कविता. – Famous Poems of Sane Guruji.
खरा तो एकची धर्म..
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.
“जगी जे हीन अतिपतित, जगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावे, जगाला प्रेम अर्पावे
जयांनाना कोणी जगती सदा ते अंतरी रडती तया जाऊन सुखवावे, जगाला प्रेम अर्पावे
समस्तां धीर तो द्यावा, सुखाचा शब्द बोलावा अनाथा साह्य ते द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
सदा जे आर्त अतिविकल, जयांना गांजती सकल या जाऊन हसवावे, जगाला प्रेम अर्पावे
कुणाना व्यर्थ शिणवावे, कुणाना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावे, जगाला प्रेम अर्पावे
प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणाना तुच्छ लेखावे, जगाला प्रेम अर्पावे
असे जे आपणापाशी असे, जे वित्त वा विद्या सदा ते देतची जावे, जगाला प्रेम अर्पावे
भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावे, जगाला प्रेम अर्पावे
असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे परार्थी प्राणही द्यावे, जगाला प्रेम अर्पावे
जयाला धर्म तो प्यारा, जयाला देव तो प्यारा त्याने प्रेममय व्हावे, जगाला प्रेम अर्पावे “
ही कविता भारतीय संस्कृतीची द्योतक आहे. त्यांनी आपल्या प्रेमळ व्यक्तित्वाने पुढील पिढीतील एस.एम. जोशी, ग.प्र. प्रधान, दादा गुजर, ना.ग. गोरे, प्रकाशभाई मोहाडीकर, प्रा. प्र.द. पुराणिक, मधु दंडवते, यदुनाथ थत्ते, रा.ग. जाधव,राजा मंगळवेढेकर, वा.रा. सोनार, शांतीलाल पटणी, सी.न. वाणी, इत्यादी अनेक थोर व्यक्तित्वे घडविली.
आता उठवू सारे रान..
आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान
शेतक-यांच्या राज्यासाठी लावु पणाला प्राण..किसान मजूर उठतील, कंबर लढण्या कसतील
एकजुटीची मशाल घेऊनि पेटवतील सारे रान..कोण आम्हां अडवील, कोण आम्हां रडवील
अडवणूक त्या करणा-यांची उडवू दाणादाण..शेतक-यांची फौज निघे, हातात त्यांच्या बेडी पडे
तिरंगी झेंडे घेती, गाती स्वातंत्र्याचे गान..पडून ना राहू आता, खाऊ ना आता लाथा
शेतकरी अन् कामकरी मांडणार हो ठाण..
बलसागर भारत होवो.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो..
हे कंकण करि बांधियले, जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले, मी सिद्ध मराया होवो..
विश्वात शोभुनी राहो..वैभवी देश चढवीन, सर्वस्व त्यास अर्पीन
तिमीर घोर संहारीन, या बंधु सहाय्याला होवो..
विश्वात शोभुनी राहो..हातांत हात घेऊन, हृदयास हृदय जोडून
ऐक्याचा मंत्र जपून, या कार्य कराया होवो..
विश्वात शोभुनी राहो..करि दिव्य पताका घेऊ, प्रिय भारतगीते गाऊ
विश्वास पराक्रम दावू, ही माय निजपदा लाहो..
विश्वात शोभुनी राहो..या उठा करू हो शर्थ, संपादु दिव्य पुरुषार्थ
हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसूर्य तळपत राहो..
विश्वात शोभुनी राहो..ही माय थोर होईल, वैभवे दिव्य शोभेल
जगतास शांति देईल, तो सोन्याचा दिन येवो..
विश्वात शोभुनी राहो..
आंतरभारती – Antarbharati
१९३० मध्ये साने गुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषिकांशी त्यांचा संबंध आला. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी साने गुरुजींना वाटायची.यातूनच ‘आंतरभारती’ची संकल्पना त्यांना सुचली.
प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वाला बाधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात, चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले… त्यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतनाप्रमाणे काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलताना व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांनी आत्महत्या केली.
पालगडमधील घर – A house in Palgad
साने गुरुजी यांनी आपल्या आयुष्यातली शेवटची अनेक वर्षे रत्नागिरी जिल्ह्यातल्या हर्णैजवळच्या आपल्या मूळ गावी- पालगड गावी काढली. तेथे त्यांचे राहते घर आजही चांगल्या प्रकारे ठेवले आहे… ते ज्या शाळेत जात होते ती प्राथमिक शाळाही आज चालू आहे. पालगड हे मंडणगडनजीक दापोली तालुक्यात दुर्गम भागात आहे. जाणते पर्यटक या गावाला व घराला आवर्जून भेट देतात…..
साने गुरुजींची पुतणी सुधाताई बोहोडा यांनी साने गुरुजींचे हे राहते घर राष्ट्राला अर्पण केले… त्यानंतर या घराची देखभाल वडघरचे साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ही संस्था करत आली आहे..