।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
संत बहिणाबाई
संत बहिणाबाई (जन्म : इ.स. १६२८ (शके १५५१); मृत्यू २ ऑक्टोबर १७००). संत तुकारामांच्या समकालीन पुढच्या पिढीतील वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्या. स्त्री संत यांच्यातील अग्रेसर मुक्ताबाई, कान्होपात्रा, जनाबाई, वेणाबाई, आक्काबाई, मीराबाई यांसह बहिणाबाईंचे स्थान आहे.
संत बहिणाबाई जीवन प्रवास – Sant Bahinabai Life Journey
बहिणाबाईचा जन्म, गोदावरीच्या उत्तरेस घृष्णेश्वराच्या पश्चिमेस, कन्नड तालुक्यातील वेळगंगा नदीच्या काठी देवगांव (रंगाऱ्याचे) येथे शके १५५१ मध्ये झाला. तिच्या आईचे नांव जानकी व पित्याचे नांव आऊजी. माता-पित्यानी तिचा विवाह वयाच्या पाचव्या वर्षी त्याच गावापासून पाच कोसावर असलेल्या रत्नाकर पाठक यांच्याशी लावला. त्यांना दोन मुले होती.
संत बहिणाबाईना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती. कथा – कीर्तने, पुराण-श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात संत बहिणाबाई रमली होती. पण तिची संसारावरील आसक्ती कमी होऊन पारमार्थिक वृत्ती वाढत गेली. घरची गरिबी, शि़क्षणाचा अभाव, तरीही समाधानी वृत्ती व संतवृत्तीला साजेशी पांडुरंगाची ओढ मनात होतीच. अखंड नामस्मरण चालू असे. शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे. पुढे कोल्हापूरच्या वास्तव्यात जयराम स्वामीच्या कथा कीर्तनाचा संत बहिणाबाईच्या मनावर प्रभाव पडला. ती रोज तुकारामाचे अभंग म्हणू लागली व तिने तुकारामाच्या दर्शनाचा ध्यास घेतला.
तिला तुकोबारायांना सदगुरू करून त्यांचे अनुग्रह व आशीर्वाद घ्यावयाचा होता. म्हणून रात्रंदिवस तुकोबांचे अभंग म्हणत ती त्यांचे ध्यान करू लागली. भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठागमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. शेवटी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तुकोबारायांनी कार्तिक वद्य ५ शके १५६९ रोजी स्वप्नात येऊन तिला साक्षात दर्शन व गुरूपदेश दिला. बहिणाबाईचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले.
तिने आपले गुरू संत तुकाराम महाराज व त्यांचीही गुरुपरंपरा आपल्या अभंगांत वर्णन केली आहे. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे हे अभंग आहेत, त्यामुळे या अभंगांना विशेष महत्त्व आहे. त्यांचे वर्णन करताना गेल्या शतकातील एक श्रेष्ठ संत, संतचरित्रकार आणि ‘श्री गजानन विजय’कर्ते संतकवी दासगणू महाराज लिहितात. पहा केवढा अधिकार .. ऋणी तिचा परमेश्वर … त्यांच्या अभंगांंपैकी ‘संत कृपा झाली। इमारत फळा आली ॥ हा अत्यंत प्रसिद्ध अभंग आणि “घट फुटलियावरी। नभ नभाचे अंतरी॥ हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधिस्थ झाल्या. या साध्वीची समाधी शिऊर या गावी आहे.
संत बहिणाबाई अभंग रचना – Sant Bahinabai Abhang Rachna
बहिणाबाईंचे एकूण ७३२ अभंग प्रकाशात आले आहेत. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस!, या प्रसिद्ध अभंगाची रचना साध्वी बहिणाबाई यांचीच आहे. संपूर्ण अभंग
संत कृपा झाली इमारत फळा आली | ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया |
नामा तयाचा किंकर तेणे विस्तरिले आवार | जनी जनार्दन एकनाथ स्तंभ दिला भागवत |
तुका झालासे कळस भजन करा सावकाश | बहिणा फडकती ध्वजा तेणे रूप केले ओजा ||
संत बहिणाबाई यांच्या पूर्व जन्मीचे प्रसंग – Events of Sant Bahinabai’s previous birth
असे सांगतात की बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या बारा जन्मांचे स्मरण होते. तेरावा जन्म स्त्रीचा म्हणजे बहिणाबाईंचा होय. संत बहिणाबाईनी आपल्या बारा जन्माचे पस्तीस अभंग आपल्या मुलाला सांगितले. या साध्वीच्या चरित्रातील एक प्रसंग ज्ञात आहे तो असा : नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना त्याना अचानक थंडी वाजून ताप भरला. परंतु पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ, की त्यांनी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, “ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव. एवढी वारी करून येईन आणि मग माझा भोग भोगीन.” ही घोंगडी त्यानी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या.त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिंव भरल्यासारखे थड थड हालत होते.
Related Post
संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज देहू (Sant Tukaram Maharaj Dehu)
विठ्ठल भक्तीची अनोखी गाथा संत सखूबाई | Sant Sakhubai |
पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीत थोर संत गोरा कुंभार यांनी आपले जीवन समर्पित केले