।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
संत मुक्ताबाई जीवनपट – Sant muktabai Biography
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई या भावंडांमध्ये मुक्ताबाई या सर्वात लहान होत्या. पोरवयातच निवृत्तीनाथ आणि त्यांच्या भावंडांना स्वजातीयांनी संन्याशाची पोर म्हणून वाळीत टाकून त्यांची विटंबना केली, पण हे सारे भोग सोसत ह्या चारही बहिण-भावंडांनी ब्रह्मविद्येची अखंड उपासना केली. आपल्यानंतर आपली मुलं तरी सुखी राहावीत या आशेने विठ्ठलपंत रुक्मिणी यांनी निर्दय समाजाने दिलेल्या देहांत प्रायःश्चिताचा निर्णय शिरसावंद्य मान्य करून त्रिवेणी संगमात देहविसर्जन केले. मात्यापित्यांच्या या देहत्यागानंतर या अनन्य साधारण कुटुंबाच्या गृहिणीपदाची नाजूक जबाबदारी मुक्ताबाईंवर पडली. ती तितक्याच समर्थपणे तिने उचलली आणि पेलली. त्यामुळे खेळण्या-बागडण्याच्या बालवयातच मुक्ताई प्रौढ गंभीर, सोशिक समंजस बनली. हळव्या निरागस वयात जीवनाच्या वास्तव सत्याकडे आणि कठोर स्वरूपाकडे निर्लीप्तपणे पाहण्याचे प्रगल्भ प्रौढत्व तिच्यात आलेले होते.
मुक्ताबाईंनी आपल्यापेक्षा मोठ्या भावंडांना मायेची पाखर दिली. वात्सल्याने सावरले व प्रसंगी जागरूक करण्यासाठी आत्मीयतेने फटकारले देखील. सर्व तत्कालीन संतांनी एकमुखाने मुक्ताबाईचा ज्ञानाधिकार मान्य केला. तिचा आदेश स्वीकारला. मुक्ताबाईचे गुरु म्हणजे तिचेच मोठे बंधू संत निवृत्तीनाथ ज्यांना मुक्ताबाईंनी गुरुमंत्र दिला ते म्हणजे विसोबा खेचर आणि हठयोगी चांगदेव हे होत. मुक्ताबाईंनी बालपणीच त्यांच्या समकालीन समाजाचे उग्र कठोर वास्तव अनुभवले आणि ते पचवून लौकिक जीवनसंघर्षाकडे पाठही फिरविली. त्यांच्या वाणीत सांसारिक सुखदुःखाचा वा क्लेश पीडांचा प्रतिसाद नाही.
सारे जीवनच त्यांनी अलौकिक रंगात रमवून टाकले आहे. मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांच्या संत मंडळीतील श्रेष्ठांनादेखील आपल्या आध्यात्मिक अधिकार बळावर स्पष्टोक्तीच्या सुरात जागविले आहे. याबाबतीत संत नामदेवांचा प्रसंग बोलका आहे. संत नामदेवराय हे विठ्ठलाचे परम भक्त, ते एकदा सहज ज्ञानदेवाच्या भावंडांना भेटले असता, निवृत्तीसह दोघाभावांनी नामदेवांना वंदन केले; परंतु नामदेवांनी मात्र त्यांना उलट नमस्कार केला नाही, तर ते ताठ बसून राहिले. मुक्ताबाईंनी मात्र नामदेवांचा हा अहंकार ओळखून त्यांना नमस्कार केला नाही, दर्शन घेतले नाही. उलट अधिकारवाणीने अत्यंत झणझणीत शब्दात तिने नामदेवाची कानउघाडणी केली.
गाथेत मुक्ताईच्या नावावर एकूण ४२ अभंग आहेत. त्यात तिने आपला शिष्य चांगदेव याला उद्देशून रचिलेल्या व आता त्याच्या नावावर छापलेल्या सहा अभंगांची भर घालावी लागेल. त्या सहा अभंगात मुद्रिका ‘मुक्ताई म्हणे’ अशीच आहे. याशिवाय नामदेव गाथेतील ‘नामदेव-भक्तिगर्वपरिहार’ या मथळ्याखालील अभंगांपैकी (१३३४ ते १३६४) दहापंधरा तरी निश्चितपणे मुक्ताईचे आहेत. तसेच गाथेत न मिळणारे ‘ताटीचे अभंग’ ही तिचेच होत. म्हणजे तिची एकूण अभंगरचना सु. पाऊणशेच्या घरात जाईल. ती सर्व रचना काव्यगुणांनी समृद्ध आहे. ती मुख्यतः भक्तिपर असले, तरी योगमार्गाच्या खुणांनीही ती युक्त आहे.
मुक्ताईच्या काव्यात तिच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू उठून दिसतात. अंधपणामुळे वाया जात असलेल्या या मुक्ताईला निवृत्तिराजाने सावध केले व त्यामुळे ‘मुक्तपणे मुक्त । मुक्ताई पैं रत । हरिनाम स्मरत । सर्वकाळ ।’ अशी आपली अवस्था होऊन गेल्याचे ती सांगते. तिच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहे, साक्षात्काराचे पडसाद आहेत, हे सर्व खरे; पण त्याबरोबरच त्यांत हृदयाचे मार्दव आणि भावनेची हळुवारताही आहे. तसे पाहिल्यास तिचा स्वभाव सोपानदेवाप्रमाणे थोडा परखड दिसतो. ज्ञानदेव-भगिनी मुक्ताबाईचे मराठी संतमंडळातील स्थान अनन्यसाधारण आहे. सर्व प्रकारच्या प्रतिकूलतेचा प्रतिकार करण्याचा ज्ञानदेवादी भावंडांतील बालयोगिनी मुक्ताबाई यांचा आध्यात्मिक अनुभव थोर होता. ज्ञानेश्वरादी भावंडांमधील अस्मिता, स्वाभिमान, प्रतिकार यांचे सजीव रूप मुक्ताबाई होय.
संत मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग – Abhang of Sant Muktabai
संत मुक्ताबाईंनी रचलेले ताटीचे एकूण ४२ अभंग प्रसिद्ध आहेत. या अभंगांमध्ये त्यांनी आत्मक्लेशामुळे दरवाजा बंद करून बसलेला आपला भाऊ ज्ञानदेव यांनी दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी केली आहे.
तिने ज्ञानेश्वरांना, आदिनाथांपासून गहीणीनाथांकडे आणि त्यांच्याकडून निवृत्ती, ज्ञानदेवाकडे आलेल्या नाथसंप्रदायाची आठवण करून दिली. घराण्याच्या मोठेपणाचे, योगीपणाचे स्मरण दिले. जो जनांचे अपराध सहन करतो तो योगी. अवघे विश्व जरी आपल्यावर रागावले तरी जलासारखे थंडपण घेऊन त्या क्रोधाग्निला विझवायचे. लोकांच्या शब्दरूपी शस्त्राने जरी त्रास झाला तरी चांगला उपदेश मान्य करायचा. अशा शब्दात समजावताना मुक्ताच्या शब्दांचे अभंग झाले तेच ताटीचे अभंग.
योगी पावन मनाचा | साहे अपराध जनांचा विश्व रागे झाले वन्ही | संती सुखे व्हावे पाणी
शब्दशस्त्रे झाले क्लेश | संती मानावा उपदेश विश्वपट ब्रम्हदोरा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा
समजवताना ती म्हणते, आपलाच हात आपल्याला लागला तर त्याचे दुःख करू नये. आपली जीभ आपल्या दाताखाली आली म्हणून लगेच काही आपण दात पडून टाकत नाही. ब्रह्मपदाला पोहोचायचे तर लोखंडाचे चणे खावे लागतात, अपेष्टा सहन कराव्या लागतात,
हात आपुला आपणा लागे | त्याचा करू नये खेद
जीभ दातांनी चाविली | कोणे बत्तीशी पाडिली
चणे खावे लोखंडाचे | मग ब्रह्मपदी नाचे
समजवण्याच्या सगळ्या मार्गांनी जाऊनही ज्ञानदादा काही ताटीचे दार उघडेना. तेव्हा हळवी झालेली मुक्ता म्हणते,
लडिवाळ मुक्ताबाई | जीव मुद्द्ल ठायीचे ठायी
तुम्ही तरुण विश्व तारा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा
ज्ञानदेवांनी ताटीचे दार उघडले आणि त्यानंतर आयुष्यात त्यांच्या हातून अलौकिक कार्य घडले. ज्ञानदेवांच्या अलौकिक कार्याला श्री निवृत्तीनाथांची कृपा आणि मुक्ताबाईंची धेयस्वप्नांची जाणीव होती.
समाजाभिमुख आणि अत्यंत अर्थपूर्ण अशी मुक्ताबाईच्या अभंग रचना आहेत. मुक्ताबाईंनी ताटीचे अभंग लिहिले त्याचप्रमाणे हरिपाठाचे सुद्धा अभंग लिहिलेत.
“अखंड जायला देवाचा शेजार कारे अहंकार नाही गेला |
मान अपमान वाढविसी हेवा दिवस असता दिवा हाती घेसी ||”
मुक्ताबाईंचे विचार फार साधे मात्र परखड होते. मराठीतील पहिल्या कवयित्री म्हणून आज देखील त्यांचा नामोल्लेख होतो. मुक्ताबाईंनी ‘ज्ञानबोध’ या ग्रंथाचेही लेखन केले आहे. ह्या ग्रंथामध्ये संत निवृतिनाथ आणि संत मुक्ताबाई ह्यांचा संवाद आलेला आहे.
संत मुक्ताबाईंचा मृत्यू – Death of Sant Muktabai
संत ज्ञानदेवांनी समाधी घेतल्यानंतर ज्येष्ठ बंधू निवृतिनाथ मुक्ताबाईंना घेऊन तीर्थयात्रा करण्याकरता निघाले. ते तापी नदीवर आले असता अचानक वीज कडाडली. संत मुक्ताबाई प्रचंड विजेच्या प्रवाहात लुप्त झाल्या (१२ मे १२९७). मुक्ताबाईंची समाधी जळगाव जिल्ह्यातील कोथळी येते आहे..
मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर – Muktai Temple Muktainagar
उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्हात मुक्ताईनगर हे तालुक्याचे गांव. सातशे वर्षापूर्वी या गावांचे नाव महतनगर होते मुस्लिम राजवटीत आदीलशहाच्या नावावरुन आदीलाबाद त्याचेच अपभ्रंश एदलाबाद झाले याच गावी 718 वर्षापूर्वी संत मुक्ताबाई विजेच्या प्रचंड कडकडाटात अंतर्धान झाल्या ; गुप्त झाल्या ती विज ज्या ठिकाणी पडली तेथे आई मुक्ताई चे प्रशस्त मंदीर संस्थान आहे. ऐतिहासिक नाव परंपरेशी दुरावलेल्या महतनगर- एदलाबाद-चे श्री क्षेत्र मुक्ताई नगर असे सार्थ नामकरण शासनाने केले आहे.एशिया महामार्ग क्र. 46 व मुंबई- नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र.6 तसेच औरंगाबाद- ईदौर या आंतरराज्य महामार्गावर मुक्ताईनगर वसलेले आहे.तापी-पुर्णा या महानद्याचा विस्तीर्ण संगम ; योगी चांगदेवाने १४०० वर्ष तपश्चर्या केलेले ठिकाण पुरातन मंदीर असा रमणीय परिसर आहे. श्री संत मुक्ताबाई संस्था मध्ये निवासाच्या महाप्रसादाची व्यवस्था आहे. दरमहा वद्य एकादशी ला हजारो वारकरी वारी करतात वार्षिक महायात्रा माघ वारी महाशिवरात्रीस भरते व आषाढीस पालखी सोहळा. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील संत मुक्ताई मंदिरात दररोज मोठ्या संख्येने अनेक भाविक येत असतात. महाशिवरात्रीला तर विदर्भ व मराठवाडा येथून पालख्या येतात. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी श्री क्षेत्र आळंदी येथे संजिवन समाधी घेतल्यानंतर सोपानकाका सासवडला समाधिस्त झाले. नंतर नेवासा, आपेगांव, पुणतांबे, पैठण, घृणेश्वर, पहुर, जामनेर, बोदवड मार्गे हि संत मंडळी देवासह, ऋषीगण, यक्ष, किन्नर, गंधर्व सर्व मुक्ताईनगर (तेंव्हाचे महत् नगर) येथे आले असता १५ दिवस मुक्ताईनगर कोथळी परिसरात वास्तव्य करुन वै. वद्य १० ला दुपारी १ वजुन १५ मिनिटांनी विजेच्या कडकडाटासह मुक्ताई गुप्त (स्व-स्वरुपकार) झाल्या. त्याच मुक्ताईच्या पावन भुमीमध्ये मुक्ताई समाधी स्थळ व प्रगट्य स्थान म्हणून भव्य मंदिर आहे.
Related Post
विठ्ठल भक्तीची अनोखी गाथा संत सखूबाई | Sant Sakhubai |
संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज देहू (Sant Tukaram Maharaj Dehu)
पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीत थोर संत गोरा कुंभार यांनी आपले जीवन समर्पित केले