संत रामदास स्वामी यांच्या जीवन यात्रेचा प्रवास कसा होता ?

Sant Ramdas Swami,संत रामदास स्वामी ,जय जय रघुवीर समर्थ,संत रामदास स्वामी माहिती,समर्थ रामदासांनी कोणता संदेश दिला,समर्थ रामदासांनी मारुतीची स्थापना केलेले गाव संत रामदास स्वामी जीवन प्रवास । श्रीसमर्थांचे जीवनकार्य ।

नमस्कार जय महाराष्ट्र || जय जय रघुवीर समर्थ ||

संत रामदास स्वामी जीवन प्रवास

श्री समर्थ रामदासस्वामी यांचा जन्म जांब या गावी जिल्हा जालना शके १५३० सन १६०८ मध्ये रामनवमीच्या दिवशी म्हणजे चैत्र शुध्द नवमीस, रामजन्माच्याच शुभमुहुर्तावर, म्हणजे माध्याह्नी झाला. ठोसरांचे घराणे सूर्योपासक होते. नारायण सात वर्षाचा असतांनाच वडील सूर्याजिपंतांचे निधन झाले. घरची सांपत्तिक स्थिती चांगली होती. पण नारायण लहानपणापासूनच विरक्त होते. इतरांहून वेगळे होता. अतिशय बुध्दिमान,निश्चयी तसेच खोडकरही होता. हाती घेतलेले काम तडीस न्यावयाचे असा त्याचा बाणा होता. याच्या बाळपणाची एक गोष्ट प्रसिध्द आहे. एकदां हा लपून बसला, कांही केल्या सापडेना. अखेर एका फडताळांत सांपडला. “काय करीत होतास” असे विचारल्यावर “आई, चिंता करितो विश्वाची” असे उत्तर याने दिले होते..
अशा या विलक्षण मुलाला संसारांत अडकविले, तर तो ताळ्यावर येइल या कल्पनेने १२ व्या वर्षी याचे लग्न ठरविण्यात आले. लग्न-समारंभात पुरोहितांनी “सावधान” हा शब्द उच्चारतांच तो एकून, नेसलेले एक अंगावरील पांघरलेले दुसरे, अशा दोन वस्त्रानिशी हा मंडपातून पळाला. लोकांनी पाठलाग केला. पण याने तांतडी करून गांवाबाहेरची नदी गांठली आणि नदीच्या खोल डोहांत उडी मारली.

तपश्चर्या आणि साधना :

पुढे तेथून पायी चालत चालत पंचवटीस येऊन याने रामाचे दर्शन घेतले, आणि टाकळीस दीर्घ तपश्चर्या केली. सूर्योदयापासून माध्याह्नापर्यंत नदीच्या डोहांत छातीइतक्या पाण्यांत उभे राहून गायत्री पुरश्चरण केले. रामनामाचे १२ कोटी वेळा नामस्मरण करून अवतार कार्याला आरंभ केला. साक्षात प्रभू श्रीराम हेच त्यांचे सद्‌गुरू झाले. १२ वर्षाच्या तीव्र तपश्चर्येनंतर यांना आत्म-साक्षात्कार झाला. त्यावेळी समर्थांचे वय २४ वर्षाचे होते.

पुढील १२ वर्षे समर्थांनी तीर्थयात्रा केली. सारा हिंदुस्थान पायांखाली घातला. प्रत्येक ठिकाणच्या लोक-स्थितीचे सूक्ष्म निरीक्षण केले. भारत-भ्रमण करीत असतां पंजाबांत शीखांचे सहावे गुरू हरगोविंद यांच्याशी समर्थांची भेट झाली होती. समाजाच्या दुर्धर स्थितीसंबंधी दोघांची चर्चा/बातचीतही झाली होती. ‘समान-शिले-व्यसनेषु सख्यम्’ या न्यायाने दोघांत सख्य झाले होते. याच वेळी प्रचलित सर्व शास्त्रांचा अभ्यासही केला, आणि वयाच्या ३६ व्या वर्षी ते महाराष्ट्रात परत आले.

श्रीसमर्थांचे जीवनकार्य :

आत्म-साक्षात्कार झाल्यानंतर प्रथमत:सामान्य लोकांनाही पारमार्थिक मार्गास लावावे, अशी इच्छा त्यांना साहजिकच झाली. पण पुढील १२ वर्षाच्या प्रवासांत त्यांनी जे पाहीले, जे भयंकर विदारक अनुभव घेतले, त्याने त्यांच्या चरित्र्यास एक वेगळीच कलाटणी मिळाली. त्या काळी भारतांतील जनता कमालीच्या हीन, दीन, त्रस्त आणि अपमानित अवस्थेत काळ कंठीत होती. यावनी सत्तेच्या अमानुष जुलुमाखाली भरडली जात होती. लोकांची मालमत्ता, बायका-मुले, आया-बहिणी, देव, धर्म, संस्कृती, कांहीच सुरक्षित नव्हते.जनतेची ही ह्र्दय-द्रायक अवस्था पाहून समर्थ अत्यंत अस्वस्थ झाले, उद्विग्न झाले.

सर्वस्वी निसत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश हानिकारकच ठरण्याचा संभव आहे, समाजाला प्रथम संघटित आणि शक्ति-संपन्न बनविले पाहीजे, समाजाचा लुप्त झालेला आत्म-विश्वास पुन: जागृत केला पाहिजे, अशी त्यांची खात्री झाली.
मसूरास रामनवमीचा उत्सव करून समर्थांनी आपल्या लोकोध्दाराच्या कार्याला पाया घातला. शके १५७० मध्ये त्यांनी चाफळास राम-मंदिराची स्थापना केली. निरनिराळ्या गांवी अकरा मारूतींच्या मंदिराची स्थापना केली. ‘मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा।’ यासाठी त्यांनी काया झिजविली. हरिकथा निरूपण, राजकारण; सावधपण व साक्षेप या तत्त्वांच्या आधारे कार्य करणारा ‘रामदासी’ संप्रदाय त्यांनी निर्माण केला. या माध्यमातून संघटना बांधत, त्यांनी कार्य सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार लोक-संग्राहाचा अचाट उद्योग त्यांनी मांडला. समर्थ रामदासांच्या ‘जय जय रघुवीर समर्थ’ या गर्जनेने मरगळलेला महाराष्ट्र जागा झाला. दर्‍या-खोर्‍यातून; डोंगर कपारीतून एकच नाद घुमला. सह्याद्रीच नव्हे तर गंगा-यमुना आणि कावेरीची खोरीही या घोषणेने दणाणून टाकली. आसेतुहिमाचल मठ-महंत निर्माण करून, नि:स्पृह नेतृत्व समाजात निर्माण करून त्यांनी राष्ट्र उभारणीच्या कार्याला पूरक असे कार्य साधले. धर्मसत्ता व राजसत्ता यांचा अपूर्व समन्वय साधून सशक्त तरुणांची मने राष्ट्रवादाने भारून टाकली. प्रभू श्रीरामचंद्र, आदिशक्ती तुळजाभवानी आणि शक्ती उपासनेसाठी मारुतीराया या तीन देवतांचा जागर त्यांनी समाजात मांडला. अक्षरश: शेकडो मारूती मंदिरांची स्थापना त्यांनी केली. स्वत:डोंगरदर्‍यात, घळीत राहून समाजाचे व देशाच्या कल्याणाचेच चिंतन केले. समाजातील प्रत्येक घटकाला, अनेक अनाथ, निराधार बालकांना, स्त्रियांना सन्मार्गाचा, आत्मोद्धाराचा मार्ग दाखविला.प्रपंच आणि परमार्थ नेटका करण्यासाठी विवेकसंपन्न व्हा, असा उपदेश केला.आनंदवनभुवनाचे स्वप्न पाहिले.हिंदुस्थान बलसंपन्न व्हावा यासाठीच क्षात्रतेज व ब्राह्मतेज जागविले.
‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे। परंतु, तेथे अधिष्ठान पाहिजे। भगवंताचे।’ या त्यांच्याच सूत्रानूसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या लोकोत्तर कार्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वराज्य बलशाली व्हावे म्हणून समाजसंघटन करून राष्ट्रउभारणीच्या कार्याला मोलाची मदत केली. सहिष्णू व जयिष्णू धर्माचा समन्वय साधून रामराज्याचा मंत्र जागविला.शिवाजीमहाराज आग्य्राहून सुटुन महाराष्ट्रांत परत आले, तेव्हां त्या जोखमीच्या परतीच्या प्रवासांत या मठांचा त्यांना उपयोग झाला होता.

कसा संपला प्रभू श्रीराम यांचा अवतार ? माता सीता पृथ्वीमध्ये समर्पित झाल्यानंतर कसे होते त्यांचे आयुष्य ?

विविध विषयांतून लीलया समाजप्रबोधन करणार्‍या समर्थांचे हे सर्व करीत असताना मुख्य उद्दिष्ट होते हिंदवी स्वराज्य त्यासाठीच त्यांनी देशात हलकल्लोळ माजवला. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीचा पाया भक्कम करण्याचे काम समर्थांमुळे सोपे झाले आणि या महाराष्ट्राच्या भुवनी आनंदवन उदयास आले.सातारा, चाफळ, सज्जनगड या परिसरात समर्थांचे वास्तव्य अधिक काळ होते. समर्थ स्थापित राम मंदिर, अकरा मारूतींची मंदिरे याच परिसरात आहेत. ती पुढीलप्रमाणे: (१) दास मारुती,चाफळ (राम मंदिरासमोर) (२) वीर मारुती, चाफळ (राम मंदिरामागे) (३) खडीचा मारुती, शिंगणवाडी, चाफळ (डोंगरावर) (४) प्रताप मारुती, माजगांव, चाफळ (५) [उंब्रज]] मारुती (ता. कराड) (६)शहापूर मारुती (उंब्रज जवळ) (७) मसुर मारुती (ता. कराड) (८) बहे-बोरगांव (क्रुष्णामाई) मारुती (जि. सांगली) (९) शिराळा मारुती (बत्तीस शिराळा, जि. सांगली) (१०) मनपाडळे मारुती (जि.कोल्हापूर) (११) पारगांव मारुती (जि. कोल्हापूर).

दासबोधाचे लेखन त्यांनी रायगडाजवळील शिवथरघळीत बसून केले. चाफळ परिसरात समर्थांची व छत्रपती शिवाजी महाराजांची भेट झाल्याचे उल्लेख इतिहासात आढळतात. परमार्थ, अध्यात्म,श्रीराम व श्रीहनुमान भक्ती आणि संपूर्ण समाजाचा ‘नेटका प्रपंच’ या सर्वच बाबतीत स्वत:अत्युच्च स्थान गाठून समाजाला मार्गदर्शन करणार्‍या (आजही मार्गदर्शक ठरणार्‍या)समर्थांनी शके १५७१ च्या वैशाखांत समर्थांनी शिवाजीमहाराजांना अनुग्रह दिला.महाराजांच्याच विनंतीवरून त्यांनी पुढे सज्जनगडावर वास्तव्य केले. शके १६०२ (सन १६८०) मध्ये शिवाजीमहाराज कैलासवासी झाल्यानंतर पुढच्याच वर्षी माघ वद्य नवमी शके १६०३ (सन १६८१) समर्थांनीही सज्जनगडावर देह ठेवला. हीच दासनवमी होय.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )