राष्ट्र संत तुकडोजी महाराज

तुकडोजी महाराज । तुकडोजी महाराजांनी मराठी आणि हिंदी भाषांमधून लिहिलेली ग्रंथसंपदा । मराठी ग्रंथ (पद्य) । मराठी ग्रंथ (गद्य) । हिंदी ग्रंथ (पद्य) । हिंदी ग्रंथ (गद्य) ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

तुकडोजी महाराज (१९०९ – १९६८)

तुकडोजी महाराज (पूर्ण नाव – माणिक बंडोजी इंगळे, (१९०९-१९६८) यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते… अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी ग्रामगीता या काव्यातून मांडले. त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी इ.स. १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते…..

तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते… आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. त्यांनी त्यांचे मूळचे माणिक हे नाव त्यांचे गुरू आडकोजी महाराज यांनी बदलून तुकडोजी असे केले. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर जपानसारख्या देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला…..

सन १९४२च्या भारत छोडो आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती… “आते है नाथ हमारे” हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते…..

भारत हा खेड्यांचा देश आहे, हे लक्षात घेऊन ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, अशी तुकडोजी महाराजांची श्रद्धा व विचारसरणी होती… समाजातल्या सर्व घटकांतील लोकांचा उद्धार कसा होईल, याविषयी त्यांनी अहर्निश चिंता केली. ग्रामोन्नती व ग्रामकल्याण हा त्यांच्या विचारसरणीचा जणू केंद्रबिंदूच होता. भारतातील खेड्यांच्या स्थितीची त्यांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी ग्रामविकासाच्या विविध समस्यांचा मूलभूतस्वरूपी विचार केला व त्या समस्या कशा सोडवाव्यात, याविषयी उपाययोजनाही सुचविली. या उपाययोजना त्यांच्या काळाला तर उपकारक ठरल्याच पण त्यानंतरच्या काळालाही उचित ठरल्या. हे आज (त्यांनी आपली जीवनयात्रा संपल्यानंतरच्या काळातही) तीव्रतेने जाणवते. अशा गोष्टींतूनच राष्ट्रसंतांचे द्रष्टेपण दिसून येते

अमरावतीजवळ मोझरीच्या गुरुकुंज आश्रमाची स्थापना हे तुकडोजींच्या आयुष्यातील जसे लक्षणीय कार्य आहे, त्याचप्रमाणे ग्रामगीतेचे लेखन हाही त्यांच्या जीवनकार्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे… ग्रामगीता ही जणू तुकडोजी महाराजांच्या वाङ्‌मयसेवेची पूर्तीच होय. स्वतःला ते तुकड्यादास म्हणत कारण भजन म्हणताना ते जी भिक्षा घेत, त्यावरच आपण बालपणी जीवन कंठिले, ह्याची त्यांना जाणीव होती…..

खेडेगाव स्वयंपूर्ण कसे होईल, याविषयीची जी उपाययोजना तुकडोजी महाराजांनी सुचविली होती, ती अतिशय परिणामकारक ठरली… ग्राम हे सुशिक्षित व्हावे, सुसंस्कृत व्हावे, ग्रामोद्योग संपन्न व्हावेत, गावानेच देशाच्या गरजा भागवाव्यात, ग्रामोद्योगांना प्रोत्साहन मिळा्वे, प्रचारकांच्या रूपाने गावाला नेतृत्व मिळावे, असा त्यांचा प्रयत्‍न होता. त्याचे प्रतिबिंब ग्रामगीतेत उमटले आहे. देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात, याविषयी त्यांनी अविरत प्रयत्‍न केले…..

सर्वधर्मसमभाव हेही या राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे एक वैशिष्ट्य होते… त्यासाठी तुकडोजी महाराजांनी सामुदायिक/सर्वधर्मीय प्रार्थनेचा आग्रहपूर्वक पुरस्कार केला…..

तुकडोजी महाराज हे विवेकनिष्ठ जीवनदृष्टीतून एकेश्वरवादाचा पुरस्कार करत असत… धर्मातील अनावश्यक कर्मकांडाला त्यांनी फाटा दिला होता. आयुष्याच्या शेवटापर्यंत त्यांनी आपल्या प्रभावी खंजिरी भजनाच्या माध्यमातून त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारसरणीचा प्रचार करून आध्यात्मिक, सामाजिक, राष्ट्रीय प्रबोधन केले. स्वातंत्र्याच्या चळवळीत भाग घेतला म्हणून त्यांना कारावासही भोगावा लागला. अखिल भारतीय पातळीवर त्यांनी साधुसंघटनेची स्थापना केली. गुरुकुंज आश्रमाच्या शाखोपशाखा स्थापन करून त्यांनी शिस्तबद्ध सामाजिक कार्यकर्त्यांची एक फळीच निर्माण केली. गुरुकुंजाशी संबंधित असलेले हे सर्व निष्ठावंत कार्यकर्ते आजही त्यांचे हे कार्य अखंडव्रतासारखे चालवीत आहेत…..

महिलोन्नती हाही तुकडोजी महाराजांच्या विचारविश्वाचा एक लक्षणीय पैलू होता… कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था, राष्ट्रव्यवस्था ही स्त्रीवर कशी अवलंबून असते, हे त्यांनी आपल्या कीर्तनांद्वारे समाजाला पटवून दिले. त्यामुळे स्त्रीला अज्ञानात व दास्यात ठेवणे कसे अन्यायकारक आहे, हे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पटवून दिले.

देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ… ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजींनी केले. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला…..

ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे… त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते…..

तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाद्वारे केले जाते…..

ग्रामगीता हा त्यांचा ग्राम विकासावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे… या शिवाय हिंदीतून लिहिलेले लहरकी बरखा हे पुस्तकही प्रसिद्ध आहे. त्यांचे ग्रामगीता या ग्रंथामधील विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचावे याकरिता महाराष्ट्र शासनाने ग्रामगीता हा ग्रंथ पुनर्मुद्रित करून, सवलतीच्या १० रुपये या किंमतीत उपलब्ध करून दिला आहे

तुकडोजी महाराजांनी मराठी आणि हिंदी भाषांमधून लिहिलेली ग्रंथसंपदा खालीलप्रमाणे :

मराठी ग्रंथ (पद्य) :

आनंदामृत (१९२७), आत्मप्रभाव (१९२७), अनुभव सागर भजनावली : भाग-१, २ (१९३४), स्फूर्ती तरंग (१९४४), माझी आत्मकथा (१९४४), आदेश रचना (१९४४), सामुदायिक प्रार्थना व निवडक भजने (१९४४), अनुभवामृत अभंगगाथा (१९४५), जीवन जागृती भजनावली (१९४६), समाज संजीवनी भजनावली (१९४९), ग्रामगीता (१९५५), राष्ट्रीय भजनावली (१९५५), क्रांतिवीणा भजनावली (१९५६), दिव्यदर्शन भजनावली (१९५८), नवजागृती भजनावली (१९५८), विवेक माधुरी भजनावली (१९५९), अरुणोदय भजनावली (१९६८), भक्तीकुंज भजनावली (१९८१), संस्कार साधना (२००८), तुकड्यादास भजनामृत सागर (२०१४).

मराठी ग्रंथ (गद्य) :

सुविचार स्मरणी (१९४४), विश्वशांतियोग (१९५०), युगप्रभात (१९५०), गीता प्रसाद (१९६५), राष्ट्रसंतांची प्रवचने (१९६५), राष्ट्रसंतांची पत्रे (१९६५), राष्ट्रसंतांची भाषणे (१९६५), भागवत प्रवचने (१९६५), हितबोध (१९६८), श्रीगुरुदेव लेख व भाषण संग्रह.

हिंदी ग्रंथ (पद्य) :

स्वानंदामृत भजनावली (१९२९), लहर की बरखा : भाग-१, २, ३ (१९३४), अनुभव प्रसाद भजनावली : भाग-१, २ (१९३६), अनुभव प्रकाश भजनावली (१९३९), जीवन ज्योती भजनावली (१९४६), सुधा-सिंधु भजनावली (१९५६), क्रांतिदिप (१९५६), ज्ञानदीप भजनावली (१९५९), राष्ट्रनौका भजनावली (१९६०), आत्मप्रभाव भजनावली (१९६१), सदविचार प्रवाह (१९६१), विवेक-सरिता भजनावली (१९६२), वाचावल्ली भजनावली (१९६५), भजनकुंज भजनावली (१९६५), राष्ट्रीय भजनावली (१९६८), गांधी गीतांजली (१९६८), मेरी जीवन यात्रा (१९७०), ज्ञान कुंज भजनावली (१९८२), भक्ती सुधा भजनावली (१९८२), तुकड्यादास भजनामृत सागर : भाग-१, २ (२०१४).

हिंदी ग्रंथ (गद्य) :

मेरी जपान यात्रा (१९५६), भारत साधू समाज की सेवासाधना (१९५६), सुधा-सिंधु की लहरे, श्रीगुरुदेव लेख व भाषण संग्रह.

दत्तावतार व भिक्षेचे महत्व

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )