संत्रा लागवड । Orange Farming । Santra Lagwad । Santra Sheti । संत्रा शेती । संत्रा या पिकास हवामान । संत्रा या पिकास जमीन । संत्रा या पिकाच्या सुधारित जाती । संत्रा या पिकाची अभिवृद्धी । संत्रा या पिकाची लागवड पद्धती । संत्रा या पिकातील आंतरपिके । संत्रा या पिकातील आंतरमशागत। संत्रा या पिकातील तणनियंत्रण । संत्रा या पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । संत्रा या पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । संत्रा या पिकातील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण । संत्रा या पिकाच्या फळांची काढणी आणि उत्पादन । संत्रा या फळांची साठवण, फळे पिकविण्याच्या पद्धती आणि विक्रीव्यवस्था ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
संत्रा या पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार : Origin, Importance and Geographical Distribution of the Orange Crop:
संत्रा या पिकाचे उगमस्थान दक्षिण चीन हे असून जगातील अनेक देशांत या पिकाचा प्रसार झालेला आहे. संत्र्याची ताजी फळे खाण्यासाठी वापरतात. तर रस, सरबत, मार्मालेड असे पदार्थही तयार करता येतात. शारीरिक आळस, मरगळ आणि प्रवासातील थकवा घालविण्यासाठी संत्रा फळ उपयुक्त आहे. संत्रा फळातील अन्नघटक पुढीलप्रमाणे आहेत.\
(1) शर्करायुक्त पदार्थ – 10.6%
(2) स्निग्धांश 0.3%
(3) जीवनसत्त्व अ 350 इंटरनॅशनल युनिट जीवनसत्त्व ब 1120 इंटरनॅशनल युनिट जीवनसत्त्व क – 8 इंटरनॅशनल युनिट, रिबोफ्लेवीन 60 इंटरनॅशनल युनिट 4.2.2 पिकाखालील क्षेत्र आणि उत्पादन
संत्रा या पिकास हवामान आणि संत्रा या पिकास जमीन : Climate for Orange Crop and Land for Orange Crop:
हवामान :
उन्हाळयातील उच्च तापमान आणि हिवाळयातील कडक थंडी म्हणजे 45° 46° सेल्सिअस आणि 70-80 सेल्सिअस असे विषम हवामान असेल तरी हे फळझाड तग धरते. समुद्र सपाटीपासून 300-600 मीटर उंची असणारा प्रदेश या पिकास मानवतो. फळधारणेच्या काळात आर्द्रता आणि फळे पिकण्याच्या काळात कोरडी हवा असल्यास फळांची गुणवत्ता सुधारते.
जमीन :
संत्र्याच्या लागवडीसाठी जमिनीची निवड करताना पुढील बाबींकडे लक्ष द्यावे :
(1) पाण्याचा निचरा चांगला हवा,
(2) जमिनीची खोली 1 ते 1.5 मीटर एवढी असावी,
(3) जमिनीत खालच्या थरात चुनखडी नसावी,
(4) जमिनीचा सामू 5.5 ते 8.5 या दरम्यानचा असला तरी चालतो,
(5) क्षारांचे प्रमाण कमी असावे,
(6) सेंद्रिय पदार्थ 0.06 ते 1.0 टक्का एवढे असावे,
(7) जमिनीत वाळवी, सूत्रकृमी यांचा उपद्रव नसावा.
संत्रा या पिकाच्या सुधारित जाती : Improved Varieties of Orange:
संत्र्याच्या पुढील जाती महत्त्वाच्या असून वेगवेगळया भागांत लागवडीखाली आहेत.
कलमोंडिन :
अधिक थंडी सहन करणारी ही जात आहे. उंच वाढणारी व लहान फळे देणारी ही जात आहे.
क्लिमेंटाईन :
या जातीस अल्जेरियन संत्रा असे म्हणतात. मंडारीन आणि सावर ऑरेंज यांच्या संकरातून ही जात तयार केली आहे.
क्लिओपात्रा :
ही मूळची चीनमधली जात असून नंतर हिचा जगभर प्रसार झाला आहे. फळे पिकल्यानंतर नारिंगी- लालसर दिसतात. फळात भरपूर पण आंबट रस असतो.
कूर्ग :
दक्षिण भारतात या जातीची लागवड आहे. फळे आकर्षक रंगाची, मध्यम आकाराची आणि उशिराने पिकणारी आहेत.
डान्सी :
अमेरिकेतील फ्लोरिडामधील ही जात असून फळे नारिंगी रंगाची व चवीस गोड असतात.
देशी :
ही झाडे आकाराने विस्तीर्ण वाढतात. फळांची साल जाड असते. पंजाब राज्यात लागवड आढळते.असतो.
खासी :
आसाम राज्यात, डोंगराळ भागात या जातीची लागवड आहे.
नागपूर संत्रा :
फळाची साल पातळ- मऊ असून रस केशरी आणि स्वादयुक्त
किन्नो :
कूर्ग आणि विलोलीफ या जातींपासून ही जात संकरित केलेली आहे. आपल्याकडे पंजाब राज्यात या जातीची यशस्वी लागवड केलेली आहे. रसाचा रंग पिवळट आणि त्यात साखरेचे प्रमाण 15 ते 17 टक्क्यांपर्यंत असते. महाराष्ट्रात ही जात यशस्वी झाली नाही.
किंग :
ही जात जपानमध्ये विकसित झालेली आहे. आसाममध्ये काही प्रमाणात ही जात लागवडीखाली आहे.
संत्रा या पिकाची अभिवृद्धी आणि संत्रा या पिकाची लागवड पद्धती : Growth of oranges and methods of cultivation of oranges:
संत्रा लागवड कलमे लावून केली जाते. कलमे करण्यासाठी रंगपूर लाईम किंवा जंबेरी या खुंटाच्या 1 वर्षे वयाच्या रोपावर इच्छित जातीचे डोळे भरून अभिवृद्धी केली जाते. एक ते दोन वर्षे वयाची कलमे लागवडीसाठी वापरावीत. लागवड करण्यासाठी हमचौरस पद्धतीने 75 X 75 x 75 सेंमी. आकारमानाचे खड्डे पावसाळ्यापूर्वी खोदून आणि ते खतमातीने भरून पूर्वतयारी करावी.
हंगाम आणि लागवडीचे अंतर :
संत्रा लागवड पावसाळा सुरू झाल्यावर करावी. थंडी सुरू होण्यापूर्वी लागवड पूर्ण करावी. जमिनीच्या प्रतीनुसार आणि जातीच्या वाढीवरून लागवडीचे अंतर ठरवावे. समान्यपणे 7X7 मी. अथवा 6.5 X 6.5 मी. आणि किमान 6X6 मी. अंतर राखून लागवड करावी.
वळण आणि छाटणी :
संत्रा लागवडीनंतर खोड सरळ वाढवून घ्यावे. साधारणपणे 1 मीटर उंचीपर्यंतची फूट काढून टाकावी. झाडास डेरेदार आकार देण्यासाठी दाटीच्या फांद्या छाटून टाकाव्यात. सुरुवातीच्या काळात खुंटावर येणारी फूट वारंवार काढून टाकावी.
पाणफोक ( वाटर शूट) मर, रोगट अशा फांद्या बहार धरण्यापूर्वी छाटून टाकाव्यात. फुले लागण्यासाठी छाटणी करण्याची गरज नसते.
खते आणि पाणी व्यवस्थापन : Fertilizer and Water Management:
नवीन लागलेल्या झाडांना सुरुवातीस हप्त्याने खते द्यावीत. यात सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खतांचाही समावेश करावा. झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर, बहार धरताना प्रत्येक झाडास 50 ते 70 किलो कंपोस्ट खत, एक किलो नत्र, अर्धा किलो स्फुरद आणि 1.25 किलो पालाश तसेच चुना, गंधक, आणि मॅग्नेशियम यांची प्रत्येक 100-125 ग्रॅम प्रमाणे मात्रा द्यापी. एक हेक्टर संत्रा बागेतून एका वर्षात खालीलप्रमाणे मुख्य अन्नद्रव्ये शोषून घेतली जातात
उत्पादन | नत्र (किलो) | स्फुरद (किलो) | पालाश (किलो) | चुना (किलो) |
अधिक | 100 | 55 | 200 | 275 |
मध्यम | 115 | 35 | 130 | 215 |
कमी | 60 | 20 | 65 | 140 |
खताबरोबरच पाणी व्यवस्थापन करणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. बहार काळात पाणीटंचाई भासू देऊ नये. गरजेप्रमाणे फळांची वाढ आणि हवामान यांचा मेळ बसवून पाण्याची पाळी द्यावी. गरजेपेक्षा अधिक पाणी देऊ नये. तसेच खोडास पाणी लागणार नाही अशा बेताने आळी करून, खते दिलेल्या भागातच पाणी द्यावे. ठिबक पद्धतीने पाणी दिल्यास पाण्याची बचत होते, पण पुढे ताण काळात कमी ओलाव्यामुळे विपरीत परिणाम संभवतात.
संत्रा या पिकातील आंतरपिके, संत्रा या पिकातीलआंतरमशागत आणि संत्रा या पिकातील तणनियंत्रण : Intercropping in Orange, Intercropping in Orange and Weed Control in Orange:
लागवडीनंतर पहिली 3/4 वर्षे आंतरपिके जरूर घ्यावीत. यामध्ये लसूण घास, पपई, भुईमूग, हरबरा, भाजीपाल्याची पिके घेतल्यास चांगला फायदा होतो. झाडे मोठी झाल्यानंतर नियमितपणे आंतरमशागत करावी. मशागत करताना मुळांना, खोडांना इजा होणार नाही अशी दक्षता घ्यावी. बारमाही तणांचा बंदोबस्त करण्यासाठी खोल मशागत करण्याऐवजी तणनाशके व आच्छादने यांचा वापर करावा. झाडे लहान असताना मात्र तणनाशकांचा वापर टाळावा. ग्रामोक्झोन, बासालीन, ग्लायसेल, इत्यादी तणनाशके कारणपरत्वे वापरावीत.
बहार धरणे :
संत्रा झाडांना फुले येऊन फळांचे उत्पादन वाढवण्यासाठी झाडाच्या खोडामध्ये आणि फांद्यांमध्ये अन्नद्रव्यांचा साठा असणे आवश्यक आहे. हा साठा होण्यासाठी झाडावर नवीन वाढ काही काळासाठी थांबवावी लागते. यासाठी झाडांचे पाणी तोडून जमिनीची मशागत करून आणि पाणगळ करून झाडांना विश्रांती द्यावी लागते. यासच बहार धरणे म्हणतात. महाराष्ट्रातील हवामानात संत्रा झाडांना वर्षातून तीन वेळा बहार येतो. हा काळ म्हणजे आंबे बहार जानेवारी-फेब्रुवारी, मृगबहार- जून-जुलै आणि हस्त बहार ऑक्टोबर असा असतो. बहार येण्यापूर्वी जमिनीच्या मगदुराप्रमाणे महिना दीड महिना अगोदर बागेचे पाणी बंद करून झाडांना विश्रांती देता येते. वरीलपैकी कोणत्याही एकाच बहाराचे नियंत्रण करणे सुलभ ठरते.
संत्रा या पिकातील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण : Important pests of orange and their control:
सिट्स शीला :
संत्रा पिकावरील प्रमुख कीड म्हणून ही कीड ओळखली जाते. किडीचा आकार लहान असून तिला करड्या रंगाचे पंख असतात. किडीचे आयुष्यमान सहा महिन्यांचे असते. पाने, फुले, कोवळे शेंडे, फळे यांतील रस शोषून घेऊन ही कीड नुकसान करते. या किडीच्या शरीरातून चिकट गोड-चमकदार द्रव पाझरतो व त्यामुळे कोळशी रोगाचा प्रार्दुभाव होतो. या किडीमुळे ग्रिनिंग व्हायरस हा रोग पसरतो. असे तिहेरी नुकसान करणारी कीड आटोक्यात आणण्यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करावी. मॅलॅथियॉन, मोनोक्रोटोफॉस, कार्बारिल, फॉस्फोमिडॉन यांपैकी एक कीटकनाशक निवडून 15-20 दिवसांच्या अंतराने 3-4 फवारण्या कराव्यात.
लीफ मायनर किंवा नाग अळी :
या किडीची अळी पानाच्या आतून पोखरण करते. अशी पाने चुरमुडून नंतर गळून पडतात.
या किडीच्या बंदोबस्तासाठी मोनोक्रोटोफॉस आणि फॉस्फोमिडॉन यांच्या आलटून पालटून फवारण्या कराव्यात. टारझन नावाचे औषधही चांगले प्रभावी ठरते.
लेमन बटरफ्लाय :
या किडीची अळी पाने कुरतडते व झाडे पर्णहीन करते. या किडीच्या बंदोबस्तासाठी कार्बारिल 50 टक्के पंधरा दिवसांच्या अंतराने 3/4 वेळा फवारावे.
पांढरी माशी :
ही कीड पानांतील रस शोषून घेते, तसेच चिकट द्रव स्रवते. त्यामुळे कोळशी रोग वाढतो. बंदोबस्तासाठी मोनोक्रोटोफॉस आणि डायमिथोएट आलटून पालटून फवारावे.
संत्रा या पिकातील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण : Important diseases of orange crop and their control:
मूळकुजव्या रोग :
झाडाची मुळे कुजून नंतर झाड कोलमडते.
उपाय : पाण्याचा निचरा सुधारावा आणि बोर्डो मिश्रण अथवा क्रीनॅकचे खोडा- मुळाजवळ ड्रेचिंग करावे.
मर :
या रोगामुळे झाड शेंड्याकडून सुकत येते व शेवटी जायबंदी होते.
उपाय : निचऱ्याची व्यवस्था करावी, तसेच झाडावर रोग पसरवणाऱ्या किडींचा वेळेवर नायनाट करावा. तसेच रंगपूर लाईम हा खुंट वापरलेली कलमे लागवड करावीत.
डिंक्या :
खोडावर व फांद्यांवर साल फाटलेली दिसते व त्यातून डिंक पाझरतो. सालीचा रंग बदलत जाऊन झाड कोलमडते.
उपाय : रंगपूर लाईम हा खुंट वापरावा. बाग नेहमी स्वच्छ ठेवावी. खोडावर बोर्डो मिश्रण पेस्ट लावावी.
संत्रा या पिकातील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण : Physiological disorders in orange crop and their control:
संत्र्याची अभिवृद्धी करतानाच दोषी खुंट वापरला किंवा कलम डोळा जोड नीट सांधला नाही तर झाडामध्ये वैगुण्य येते. है वैगुण्य सुरुवातीला लक्षात येत नाही. अशा दोषयुक्त झाडाला फळे लागत नाहीत. काही वेळा पानफोकच बळावतात तर काही वेळ झाड लवचीक, वेडेवाकडे वाढते. ही विकृती वाढू नये म्हणून खुंटाची निवड करून शास्त्रोक्त पद्धतीने डोळे भरलेली कलमेच खात्रीच्या ठिकाणाहून निवडून लावावीत. बागेत अशी झाडे आढळल्यास ती नष्ट करून टाकावीत.
संत्रा या पिकाच्या फळांची काढणी आणि उत्पादन : Harvesting and Production of Fruits of Orange Crop:
हवामानानुसार आंबे आणि मृग बहाराची फळे अनुक्रमे सप्टेंबर ते डिसेंबर आणि फेब्रुवारी ते एप्रिल या कालावधीत तयार होतात. फळे काढणीस तयार होताना फिकट नारंगी रंग येतो, तसेच फळांची साल जरा सैल पडते. तयार फळे अलगद काढावीत. फळे यायला आरंभ झाल्यानंतर पहिली 4-5 वर्षे एक झाडापासून 400 ते 800 फळे मिळतात व त्यानंतर दरवर्षी 800 ते 1000 फळे मिळतात. चांगली बाग 30-35 वर्षे नियमित उत्पादन देते.
संत्रा या फळांची साठवण, फळे पिकविण्याच्या पद्धती आणि विक्रीव्यवस्था : Storage, methods of fruit cultivation and marketing of oranges:
फळे काढल्यानंतर आठवडाभर टिकतात. शीतगृहात 4-6° सेल्सिअस आणि 85-90 % आर्द्रता राखल्यास फळे तीन महिने टिकतात.
सारांश :
महाराष्ट्रातील नागपूर भागात संत्र्याचे चांगले उत्पादन येते. या पिकास कसदार, फार उत्तम निचऱ्याची जमीन मानवते. नागपूर, अमरावती या जिल्ह्यांत संत्र्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे. संत्रा लागवड करण्यासाठी रंगपूर लाईम अथवा जंबेरी या जातीच्या खुंटावर इच्छित जातीचे डोळे भरून कलमे करतात. लागवडीसाठी 6X6 ते 7X7 मीटर अंतर राखावे. संत्र्याचे उत्पादन साधण्यासाठी मृग बहार अथवा आंबे बहाराची निवड करावी. बहार धरण्यापूर्वी झाडांना विश्रांती मिळाली पाहिजे. फळे पोसण्यासाठी झाडांना खत, पाणी यांचा नियमित पुरवठा करावा. संत्र्याच्या बागेत पांढरी माशी, सिट्रस शीला या किडींचा आणि डिंक्या, डायबॅक, व्हायरस या रोगांचा प्रादुर्भाव होतो. उत्तम निचरा, निरोग कलमे आणि वेळेवर कीड- रोगनाशकांच्या फवारण्या करून त्यांचा बंदोबस्त करता येतो. संत्र्याचे उत्पादन 5 व्या वर्षी सुरू होते. दहाव्या वर्षापासून पुढे 30-35 वर्षे नियमित उत्पादन मिळते वर्षभरात एका झाडापासून 800-1,000 फळे मिळतात. तयार फळे वेगवेगळ्या बाजारात विक्रीसाठी दलालामार्फत पाठवून विक्री केली जाते.