Shiv Sati Vivah Sohala । दक्षाचा घरी उमेचा (देवी सती) जन्म । शिव आणि सतीचा विवाह । शिव सती विवाहातील घटना व दोघांचे कैलासावर प्रस्थान ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
दक्षाचा घरी उमेचा (देवी सती) जन्म
|| श्री गणेशाय नम: ||
अनेक कन्या आणि पुत्राची उत्पत्ती केल्यानंतर, दक्षाने व त्याच्या पत्नीने मनोमन जगदंबेचे ध्यान केले. तिचे अनेक प्रकारे भावपूर्ण स्तुती केली. यामुळे भगवती शिवा अतिशय संतुष्ट झाली. तिने दक्ष पत्नीच्या गर्भातून अवतार घेण्याची सिद्धता केली. यथावकाश असिक्नी गरोदर राहिली. यावेळी आपल्या पोटी साक्षात भगवती अवतार घेणार आहे, या भावनेने तिचे मन फारच प्रसन्न झाले होते. नऊ महिने होऊन दहावा महिना लागला तेव्हा एका सुमुहूर्तावर भगवती शिवा माते संमुख कन्या रूपात प्रकट झाली. ती अवतीर्ण होताच दक्ष फारच प्रसन्न झाला. त्या दिव्य तेजयुक्त कन्येला पाहून ही साक्षात शिवा देवी आहे याची त्याला खात्री पटली. त्यासमयी आकाशातून पुष्पवृष्टी झाली. मेघांनी जलसृष्टी केली. सर्व दिशा शांत झाल्या. देवांनी आकाशात गर्दी केली. मंगल वाद्यांचा गजर झाला. अग्नी प्रज्वलित झाले. संपूर्ण सृष्टी आनंदाने बहरून गेली. यानंतर भगवतीने दक्षाला पूर्वी दिलेल्या वराची आठवण केली, आणि आपल्या मायेने शिशुरूप धारण केले व ती रडू लागली.
त्या बालिकेचे रडणे ऐकून दक्ष पत्नीच्या दासी व अन्य स्त्रिया धावतच आल्या. असिक्नीच्या कन्येचे अलौकिक रूप पाहून त्यांना फारच हर्ष झाला. दक्षाने श्रेष्ठ ब्राह्मण यांना बोलावून विधीपूर्वक सर्व कुलाचार केले. दानधर्म केला. दक्षकन्येच्या जन्मोत्सवात ऋषी,मुनी,देवादिकांनी ही उत्साहाने भाग घेतला. दक्षाने श्रीहरी व अन्य देव श्रेष्ठ यांच्या आज्ञेने तिचे उमा असे नामकरण केले. तिला अनेक नावांनी संबोधले. ती सर्वनामे मंगलकारक आणि विशेषतः समस्त दुःखांचा नाश करणारी आहेत. दक्षाने उमाचे अतिशय उत्तम रीतीने पालन केले. तिचे देखणे रूप दिसामासाने प्रकर्ष पावू लागले. सख्यासमवेत खेळताना ती शंकराची प्रतिमा तयार करत असे. तिच्या बाल्योचीत गाण्यांमधून शिवाजींची स्तुती प्रकट होत असे. ती त्यांचेच स्मरण करत असे. त्यांच्या भक्तीत लीन राहत असे. ती गृहकार्य निपून होती आणि उत्तम आचरणाने आपल्या मातापित्याला ही संतोष देत होती.
हळूहळू सती वयात आली. तारुण्यावस्थेत फारच सुंदर दिसू लागली. तिचे लावण्य वर्णनातीत होते. दक्षाच्या मनात तिच्याविषयी विवाहाचे विचार येऊ लागले व तिने मनोमन शंकरांना वरले होते. आपला पिता आपल्या विवाहाची चिंता करत आहेत हे लक्षात घेऊन ती आपल्या मातेपाशी गेली. तिने शिवजींना वरण्याची इच्छा बोलून दाखवली आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी तपाची आज्ञा मागितली. मातेची अनुमती मिळताच महेश्वर हेच पती लाभावेत म्हणून या उद्देशाने ती घरातच दृढतेने आराधना करू लागली.
ती शिवजींचे ध्यान करू लागली. तिने आपल्या हृदयात शिवप्रभूनाच धारण केले होते. त्यावेळेस सर्व देवता,ऋषी, विष्णू आणि ब्रह्मदेव सतिची तपश्चर्या पाहण्यास गेले होते. ध्यानामध्ये शिवजींची तद्रूप झालेली ती देवी सिद्ध अवस्था प्राप्त झाल्यासारखी दिसली. तिची तपसाधना पाहून सर्व थक्क झाले. तिला आदराने नमस्कार केला व सर्व कैलास पर्वतावर गेले. त्या समयी ब्रह्मदेवानंसोबत सावित्री आणि विष्णू समवेत लक्ष्मी या दोघीही गेल्या. त्या सर्वांनी भगवान रुद्र देवांना नमस्कार केला. ब्रह्मदेवाने हात जोडून विनम्र भावाने त्यांची स्तुती केली, “मागे आपण सांगितल्याप्रमाणे आपलेच एक उत्तम रूप उत्पन्न झाले ते रुद्र नावाने प्रसिद्ध झाले. मी सृष्टीकर्ता, विष्णू तिचा पालनकर्ता आणि आपण स्वतः रुद्ररूपाने लयकर्ता झालात. एका स्त्रीशी विवाह करून लोकांची कार्य सिद्ध करा. हे वचन पूर्ण करा. ज्याप्रमाणे लक्ष्मी विष्णूंची आणि सरस्वती ही माझी सहधर्मचारिणी आहे, त्याप्रमाणे तुम्ही स्वतःला अनुरूप अशा कांतीचे पाणिग्रहण करा.” ब्रह्मदेवांचे मनोगत जाणून लोकेश्वर रुद्र प्रसन्नतेने हसले. ते म्हणाले, “ब्रह्मदेव, श्रीहरी ! तुम्ही दोघेही माझे आवडते आहात. पण मी विवाह करणे उचित नाही कारण मी नेहमी तपश्चर्येत मग्न असतो. संसाराविषयी मी पूर्णतः निरीच्छ आहे. विषयाबाबतीत विरक्त आहे. श्रेष्ठ योगी अशीच माझी ख्याती आहे. परंतु तरीही जगाच्या हितासाठी तुम्ही जे सांगाल ते मी करेल. भक्तांच्या वचनाला मान देणे हे माझे व्रत आहे. तुमच्या इच्छेखातर मी विवाह करण्यास तयार आहे.
मी कोणत्या प्रकारच्या स्त्रीचा पत्नी म्हणून स्वीकार करेन ते आता सांगतो. जी माझे तेज सहन करण्यास समर्थ आहे अशा योगिनी स्त्रीला तुम्ही उपदेश करून माझ्याशी विवाह करण्यास तयार करा. मी जेव्हा योगसाधना करीन तेव्हा तिने योगिनी व्हावे आणि मी जेव्हा कामासक्त होईल तेव्हा तिने कामिनी व्हावे. मी ज्योती स्वरूप सनातन शिवजींचे निरंतर चिंतन करतो आणि करत राहील. त्या स्त्रीने माझ्या चिंतनात विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर ती जीवित राहणार नाही. शिवचिंतनाशिवाय मला क्षणभरही करमत नाही. विवाह केल्याने त्यात बाधा येत असेल तर मी अविवाहित राहणेच योग्य आहे. जर त्या स्त्रीने माझ्या बोलण्यावर अविश्वास दाखवला, तर मी तिचा त्याग करीन. हे मी अगदी स्पष्ट सांगतो आहे. अर्थात माझ्यासाठी अशी पत्नी शोधा, जी सर्वार्थाने मला अनुरूप व माझ्या सांगण्यानुसार वागणारी असेल.”
भगवान रुद्राचे बोलणे ऐकून ब्रह्मदेव आणि श्रीहरी आनंदित झाले. ब्रह्मदेव नम्रपणे म्हणाले, “हे नाथ! तुम्ही आम्हाला तुमच्या पत्नी विषयक अपेक्षा सांगितल्या आहेत. त्या अपेक्षा पूर्ण करू शकेल आणि जी सर्वार्थाने तुम्हाला अनुरूप आहे, अशी एक स्त्री आमच्या पाहण्यात आहे. भगवती शिवा लोकहितार्थ दक्षकन्या सती च्या रुपाने अवतिर्ण झाली आहे. तुमच्यासाठी तीच एक अनुरूप स्त्री होईल. ती महातेजस्वी सती तुम्हास वरण्याची इच्छा धरून दृढ तप करत आहे. भगवान तुम्ही तिच्यावर प्रसन्न व्हा. तिच्यावर कृपा करा. तिला वरदान द्या आणि तिच्या इच्छेप्रमाणे तिच्याबरोबर विवाह करा.” सर्वांची प्रार्थना ऐकून भक्तवत्सल रुद्र प्रसन्न झाले व तथास्तु असे म्हणून त्यांनी देवांच्या प्रस्तावास मान्यता दिली. सर्वांचा आनंद गगनात मावेना. त्यांच्या आज्ञेने सर्वजण आपापल्या स्थानी गेले.
शिव आणि सतीचा विवाह
तिकडे सती दक्षगृही शिवजी प्रित्यर्थ नंदा व्रत करत होती. अश्विन शुद्ध अष्टमीला तिने उपवास केला. सर्वेश्वर शिवप्रभूंचे भक्तिभावाने पूजन केले. व्रत सांगता झाल्यावर नवमीच्या दिवशी ती शिव ध्यानात मग्न झाली होती. तेव्हा भगवान शंकर तिच्यासमोर प्रकट झाले. त्यांचे स्वरूप अतिशय मनोहर होते .शरीर गौरवर्णी होते. त्यांचे चित्त प्रसन्न होते. कोट्यावधी मदन लज्जित व्हावे असे त्यांचे लावण्य होते. त्यांना पाहुन कोणतीही स्त्री मोहित झाली असती.
भगवान शंकरांना प्रकट स्वरूपात पाहून सतीने त्यांच्या चरणांना अत्यंत आदराने वंदन केले, तेव्हा तपश्चर्येचे फळ प्रदान करणारे शिवजी तिला उद्देशून म्हणाले, “उत्तम व्रताचे पालन करणाऱ्या दक्षनंदिनी, तुझ्या आराधनेने ,मी संतुष्ट झालेलो आहे. तुला इच्छित वर देण्यासाठी येथे आलो आहे. तरी तुझ्या मनात जे असेल ते सांग. तुझी अभिष्टकामना मी नक्की पूर्ण करेल.” सतीने कसेबसे स्वतःला सावरले व मधुर वाणीने म्हणाली, “प्रभू! आपली जी इच्छा असेल तो वर द्या.” तेव्हा ती लज्जावश काही बोलू शकत नाही, हे जाणून ते स्वतः म्हणाले, “देवी! तू माझी पत्नी हो.” ते ऐकून तिचे सर्वांग आनंदाने रोमांचित झाले. हा तिच्यासाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण होता. तिची साधना फलद्रूप झाली होती. काहीही न मागता मनोवांच्छित इष्ट फल प्राप्त झाले होते. प्रसन्नचित्त सती दोन्ही हात जोडून म्हणाली, “देवा! आपण माझ्या पित्याशी बोलणे करून विवाहनिधीने माझा स्वीकार करा.” तेव्हा तथास्तु! असे आश्वासन देऊन शिवजी स्वस्थानी परतले.
सती आपल्या मातेपाशी गेली व तिने आपल्या मातापित्यांना नमस्कार केला. तिच्या सखीने सर्व वृत्तान्त सांगितला. त्यामुळे त्यांना फारच आनंद झाला. तिच्या मातेने कन्येला हृदयाशी धरले. तिच्या मस्तकाचे चुंबन घेतले. शिवजींना प्रसन्न करून घेतल्याबद्दल तिची फारच प्रशंसा केली. दक्षाने मोठा उत्सव केला. ब्राह्मणांना व गरिबांना दानधर्म केला.
काही काळ गेल्यावर दक्षाच्या मनात चिंता उत्पन्न झाली. तो स्वतःशीच विचार करु लागला. भगवान शिव अजूनही सतीला मागणी घालायला आलेले नाहीत? अशाप्रकारे चिंतामग्न असताना ब्रह्मदेव सरस्वतीसह त्यांच्या घरी गेले. त्यांना पाहून दक्षाला फारच आनंद झाला. त्याने त्या दोघांना नमस्कार केला व येण्याचे कारण विचारले. ब्रह्मदेव म्हणाले, “तुझ्या कन्येने महादेवाची आराधना करून जो वर मिळवला आहे तो पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. तिला मागणी घालण्यासाठी त्यांनी मला पाठवले आहे. तिच्या विरहामुळे त्यांना चैन पडत नाही. कामदेवाने आपल्या पाच बाणांनी शरसंधान करूनही जे वश झाले नाहीत त्यांना तुझ्या कन्येने जिंकून घेतले आहे. आत्मचिंतन सोडून ते सतीच्या चिंतनातच गढले आहेत. म्हणून जी त्यांच्यासाठीच अवतरली आहे ती त्यांनाच अर्पण कर. तिच्या रूपाने रुद्रांना कन्यादान केल्याने तू कृतकृत्य होशील.” ते ऐकून दक्षाला फारच हर्ष झाला. तो म्हणाला, “पूज्य पिताश्री, मला सर्व मान्य आहे. सर्व काही आपल्या मनासारखे होईल.” तेव्हा “ठीक आहे, तू विवाहाची तयारी कर. मी आणि नारद त्यांना येथे घेऊन येतो.” असे सांगून ब्रह्मदेवाने त्यांचा निरोप घेतला आणि सरस्वतीसह कैलासाकडे निघाले. इकडे भगवान शिव उत्कटतेने ब्रह्मदेवांच्या येण्याची वाट पाहत होते आणि तिकडे दक्ष व त्याची पत्नी व सती पूर्णकाम होऊन आनंदात नाहुन निघत होते.
शिवविवाहाच्या शुभवार्तेने सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. भगवान विष्णू गरुडावर बसून लक्ष्मी आणि गणपरीवारासह कैलासावर आले. चैत्र शुद्ध त्रयोदशीस, रविवारी, पूर्वा-फाल्गुनी नक्षत्रावर भगवान महेश्वरांनी आपल्या विवाहासाठी सर्वांना बरोबर घेऊन प्रस्थान केले. ती सर्व मंडळी नटूनथटून वाजत-गाजत मिरवणुकीने निघाली. देव-देवता, ऋषी-मुनी आणि गणांसह विभूषित भगवान रुद्र फारच शोभुन दिसत होते. त्यांच्या जयजयकाराने दशदिशा दुमदुमत होत्या. मार्गामध्ये सर्वत्र उत्सवच होता. सर्वांचा उत्साह ओसंडून वाहत होता. नंदिकेश्वरावर आरूढ झालेले आणि व्याघ्रांबर, गजचर्म, सर्प, जटा, चंद्रकला आदि आभूषणांनी शोभणारे भगवान महादेव प्रसन्नतेने दक्षाच्या घरी गेले.
त्यांच्या आगमनाने कन्येकडील मंडळींना आनंदाचे उधाण आले. दक्ष आपल्या सहकाऱ्यांना घेऊन रुद्रांना सामोरा आला. त्याने सर्वांचा यथायोग्य सत्कार केला. प्रारंभिक आदरातिथ्य झाल्यावर सर्वांची विनंती मान्य करून ब्रह्मदेव उठले आणि विवाह विधीला सुरुवात केली. शुभलग्न आणि शुभमुहूर्त पाहून दक्षाने सतीचे कन्यादान केले. भगवान शिवजीनी तिचे विधिपूर्वक पाणिग्रहण केले. त्या मंगलप्रसंगी ब्रह्मदेव, श्रीहरी आदी सर्वांनी शिवप्रभूंना नमस्कार करून नानाविध स्तुतींनी त्यांना प्रसन्न केले. दक्षाने मोठा महोत्सवच केला. नृत्यगायनाचे कार्यक्रम केले. तो दिव्य विवाहसोहळा थाटामाटात संपन्न झाला. सर्वजण आनंदमग्न होते. सतीचे कन्यादान करून दक्ष कृतकृत्य झाला. त्याने रुद्रदेवांना पुष्कळ भेटवस्तू दिल्या. ब्राह्मणांना अपार द्रव्य दिले. महेश्वरांच्या विवाहाने सर्व विश्वच मंगलमय झाले.
शिव सती विवाहातील घटना व दोघांचे कैलासावर प्रस्थान :
त्या समयी एक विलक्षण घटना घडली. अग्नीला प्रदक्षिणा घालत असताना सतीच्या पायावरचे वस्त्र उडाले व ब्रह्मदेवांना तिच्या चरणांचे दर्शन झाले. ते चरण फारच कोमल आणि विलोभनीय होते. त्यामुळे ब्रह्मदेव अक्षरशः मोहित झाले. शिवमायेच्या प्रभावाने कामपिडीत होऊन तिच्या सर्वांगाचे अवलोकन करू लागले. ते जसजसे तिचे शरीर पाहू लागले तसेतसे ते अधिकाधिक बेचैन होऊ लागले. ब्रह्मदेवांना तिचे मुख पाहण्याची अनावर इच्छा झाली. रुद्राच्या भीतीने ते मूख पाहण्यास धजले नाही, पण कामाच्या प्रभावामुळे काय करावे म्हणजे तिचे मुख पाहता येईल? असा विचार ते करू लागले. त्यांनी अग्नीत थोडी ओली लाकडे घातली व हळूहळू आहुती टाकू लागले. त्यामुळे तेथे खूप धुर झाला. चारही बाजूंनी फैलावला. वेदीच्या आसपासची सर्व जागा धुराने व्यापून गेली.
धुर झोंबल्यामुळे रुद्राने आपले डोळे दोन्ही हाताने झाकून घेतले. ब्रह्मदेवांना तेच हवे होते. ब्रह्मदेवाने सतिच्या मुखावरचे वस्त्र हळूच दूर केले आणि तिचे सुंदर मुख पाहिले. कामार्त होऊन त्याकडे पुन्हा पुन्हा पाहिले. त्यांच्या मनात तिच्याबद्दल प्रेम उत्पन्न झाले आणि त्याच क्षणी त्यांचे विर्य स्खलित झाले. ते खाली पडताच ते भानावर आले व चपापून इकडेतिकडे पाहू लागले. खाली पडलेले वीर्यबिंदू कोणाला कळणार नाहीत अशाप्रकारे लपवले. अंतर्ज्ञानी भगवान रुद्रांनी सर्व वर्तमान जाणले. ते ब्रह्मदेवांवर अत्यंत क्रोधित झाले व म्हणाले माझ्या विवाहात माझ्या वधूचे मुख तुम्ही कामुक होऊन पाहिलेत. हे कुत्सित कर्म तुमच्याकडून घडलेच कसे? तुम्हाला काय वाटले तुम्ही चोरून केलेली गोष्ट मला कळणार नाही? मी सर्वसाक्षी सर्वेश्वर आहे. संपूर्ण विश्वात मला ज्ञात नाही असे काहीही नाही, समजलात ?
संतापलेल्या रुद्रदेवांनी ब्रह्मदेवांना मारण्यासाठी त्रिशुल उगारला. तेव्हा विवाह मंडपात एकच हाहाकार माजला. वृद्ध मुनींनी नम्रतापूर्वक प्रार्थना केल्या. दक्षानेही शिवजीपाशी जाऊन, “कृपा करा, ब्रम्हाजीचा वध करू नका.” असे वारंवार विनवले. तेव्हा शिव म्हणाले, “जो सती कडे कामुक नजरेने पाहील त्याला ठार करा, असे श्रीविष्णूंनी मला आधीच सांगितले आहे. मी त्यांना ठार मारणारच.” त्यांचा क्रोधावेश पाहून ब्रह्मदेव प्राण भयाने व्याकुळ झाले. सर्वजण थरथर कापत होते. परिस्थितीचे गांभीर्य जाणून कार्य चतुर श्रीहरी तत्परतेने पुढे आले. त्यांनी रुद्राची स्तुति केली व म्हणाले, “प्रभो! तुम्ही उदार अंतःकरणाचे आहात. येथे ब्रह्माजीकडून प्रमाद घडला हे खरे आहे. पण आता त्यांना पश्चाताप होत आहे. ते तुम्हाला शरण आले आहेत. त्यांचे रक्षण करा. मी तुमच्या आज्ञेने सर्वांना शिवतत्त्व समजावून सांगतो. तुम्ही प्रधान आणि अप्रधान आहात. तुमचे अनेक भाग आहेत तरीही तुम्ही भागरहित आहात. तुम्ही ज्योतिर्मय परमेश्वर आहात, त्याप्रमाणे आपल्या तिघांचे स्वरूप व कार्य जरी निराळे असले तरी आपण तिघे तुमचेच भाग आहोत. ज्योतिर्मय,सर्वव्यापी,निर्लेप,पुराणपुरुष,कुटस्थ,अव्यक्त,अनंत,नित्य,दीर्घ आदी विशेषणांनी युक्त असे जे निर्विशेष ब्रह्म आहे,ते तुम्हीच आहात याचा विचार करा.”
विष्णू चे बोलणे ऐकून भगवान रुद्र प्रसन्न झाले. त्यांनी ब्रह्मदेवांना मारण्याचा विचार सोडून दिला. त्यामुळे सर्वजण निर्भय झाले. उपस्थितांनी त्यांचा जयजयकार केला. त्यांनी ब्रह्मादेवांना अभय दिले व म्हणाले, “विधी! मला नमस्कार करताना तुमचे हात असतात, ते तसेच डोक्यावर ठेवा.” ब्रह्मदेवांनी मान खाली घातली व म्हणाले, “हे प्रभो! मला क्षमा करा. माझ्याकडून जे पाप घडले आहे, त्यासाठी काही प्रायश्चित्त सांगा.” रुद्र म्हणाले, “आता मी ज्या रूपात अधिष्ठित आहे, त्याच रूपाची तुम्ही आराधना करा. तुम्ही रुद्रशीर नावाने प्रख्यात व्हाल. तुमच्या मनात काम उत्पन्न झाला, हे तुमचे वर्तन सामान्य मनुष्याप्रमाणे झाले. म्हणून तुम्ही मनुष्यरूपाने डोक्यावर नमस्कार केल्यासारखे हात आहेत, अशा स्थितीत फिरत राहाल. तुम्हाला भेटणारा प्रत्येक जण हे काय? असे विचारेल. तेव्हा सर्व हकीकत सांगितल्यावर तो तुमची निंदा करेल. नंतर तो दुसऱ्यांना सांगेल. ते ही तुमची निंदा करून हसतील. मी तुम्हाला हीच शिक्षा दिली आहे. जसे जसे अधिकाधिक लोक तुमचे पाप सांगत हिंडततील तसे तसे तुमचे पाप कमी होऊन तुमची शुद्धी होईल. त्याच प्रमाणे तुमच्या वीर्याचे चारथेंब भूमीवर पडले आहेत. त्यांचे प्रलयकारी मेघांमध्ये रूपांतर होईल. ते चार महामेघ अनुक्रमे संवर्त,आवर्त, पुष्कर आणि द्रोण या नावाने ओळखले जातील.
त्यानंतर त्या विवाह यज्ञाचे स्वामी भगवान रुद्र लौकिक परंपरेला अनुसरुन ब्रह्मदेवाला म्हणाले, “ब्रह्मण! तुम्ही माझे वैवाहिक कार्य व्यवस्थित संपन्न केले. त्याबद्दल तुमचे आभार मानतो. या विवाहात तुमचा स्वार्थ असला तरी मी प्रसन्न आहे. तुम्ही माझे आचार्य आहात. सांगा मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ? जे पाहिजे असेल ते मागा. ते दुर्लभ असेल तरी मी तुम्हाला देईल.” ब्रह्मदेवाने नमस्कार केला व म्हणाले, “तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल आणि मला काही देऊ इच्छित असाल तर माझे एवढेच म्हणणे आहे की, चैत्र शुद्ध त्रयोदशीला, पूर्वाफाल्गुनी नक्षत्रावर, रविवारी जो मनुष्य भक्तिभावाने तुमचे दर्शन घेईल ,त्याची सर्व पापे नष्ट व्हावेत. पुण्यवृद्धी होऊन त्याच्या समस्त रोगांचा नाश होवो.” ब्रम्हदेवांचे बोलणे ऐकून शिवजी प्रसन्न झाले व ते म्हणाले, “हे विधी! तुझ्या इच्छेला अनुसरून मी या वेदीवर सती सह राहील.” मग त्यांनी सती सह आपली अंशरूपाने मूर्ती प्रकट केली आणि त्या वेदिच्या मध्यभागी विराजमान झाले.
त्यानंतर स्वजनांवर प्रेम करणाऱ्या शिवजींनी सतीसह कैलासावर जाण्याची तयारी केली. त्यांनी दक्षाकडे अनुज्ञा मागितली. त्याने हात जोडून अत्यंत विनयाने त्यांची स्तुती केली. देव, ऋषी, शिवगण आदी सर्वांनी त्यांचा जयजयकार केला. भगवान रुद्र सतीसह महानंदीवर आरूढ झाले आणि कैलासाकडे निघाले. वाजतगाजत वरात निघाली. त्यावेळी कोणी मधुर स्वरांनी मंगल गीते म्हटली तर कोणी शिवजींचे कल्याणमय यशोगान करू लागले. सतीला सासरी पाठवताना सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले होते. दक्ष अर्ध्या वाटेपर्यंत त्यांना पोहोचवण्यास गेला. शिवजींनी विष्णू आदी सर्व देवांना तिथूनच स्वस्थानी जावे असे सांगितले होते पण ते प्रेमाने त्यांच्याबरोबर चालत राहिले. शंकरांनी सतीसह हिमालयावरील कैलास धामात प्रवेश केला. तेथे सर्वांचा उत्तम आदर-सत्कार केला. त्यांच्या आज्ञेने सर्व मंडळी आपापल्या स्थानी गेली. भगवान रुद्र सतीसह आनंदाने कालक्रमणा करू लागले.
रुद्राचा विवाह स्वायंभूव मन्वंतरात झाला. जो मनुष्य विवाह, यज्ञ वा अन्य कोणत्याही शुभ कार्यारंभी शिवपूजन करून ही कथा शांतचित्ताने श्रवण करतो, त्याची सर्व कार्य निर्विघ्नपणे पार पडतात. जी विवाहोत्सुक कन्या अत्यंत शुभ असे हे उपाख्यान प्रेमाने श्रवण करते तिला उत्तम सौभाग्य प्राप्त होते. ती पतिव्रता आणि पुत्रवती होते.