।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
श्रावण मास
श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार वर्षातला पाचवा महिना आहे… या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिकेतला श्रावण महिना हा २३ जुले ते २२ ऑगस्ट या तारखांदरम्यान असतो…..
श्रावणाला हिंदीत सावन म्हणतात, संस्कृतमध्ये श्रावण आणि नभ(स्) असे कमीतकमी दोन शब्द आहेत…..
श्रावणामध्ये पावसाच्या दोन जोरदार सरींच्या दरम्यान चक्क ऊन्ह पडते… दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ चालू असतो. श्रावणाचे ऊन नेहमीच कोवळे असते. ते ज्याला सोसत नाही, ती व्यक्ती खरोखरच नाजूक असली पाहिजे. या श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची लावणी ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे.
अधिक श्रावण…
साधारणपणे ८ किंवा ११ आणि क्वचित १९ वर्षांनी अधिक श्रावण येतो. त्या महिन्यात येणाऱ्या शुक्ल किंवा वद्य या दोन्ही एकादश्यांना कमला एकादशी हे नाव आहे… उत्तर हिंदुस्थानात या एकादश्यांना अनुक्रमे पद्मिनी आणि परम एकादशी म्हणतात. एकादश्या वगळल्या तर अधिक श्रावणात कोणतेही हिंदू सण किंवा व्रताचे दिवस येत नाहीत. ज्यावर्षी अधिक श्रावण असतो त्यावर्षी पाच महिन्यांचा चातुर्मास असतो. चातुर्मासात लग्ने होत नसल्याने ती अधिक श्रावणातही होत नाहीत…..
अधिक श्रावण असलेली गेली आणि येणारी काही वर्षे : इसवी सन १९०१, १९०९, १९२०, १९२८, १९३९, १९४७, १९५८, १९६६, १९७७, १९८५, २००४ आणि २०२३, २०४२, २०६१…वगैरे.
सणांचा राजा….
श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा/सणांचा राजा म्हटले जाते… श्रावण महिन्यातील प्रत्येक वारी कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा वा व्रत करण्याची हिंदू आणि जैनधर्मीयांची परंपरा आहे. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणाऱ्या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे…..
श्रावण महिन्यातील सण
- श्रावण शुद्ध पंचमी- नागपंचमी या दिवशी नागांची पूजा करण्याची परंपरा भारतीय संस्कृतीत प्रचलित आहे.
- श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी कल्की जयंती असते.
- श्रावण शुक्ल त्रयोदशी – नरहरी सोनार जयंती.
- श्रावण पौर्णिमा- रक्षाबंधन, नारळी पौर्णिमा.
श्रावण पौर्णिमा.
नारळी पौर्णिमा’ हा सण हिंदू महिन्यांपैकी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो… या दिवशी समुद्रकिनारी राहणारे लोक वरुणदेवतेप्रीत्यर्थ समुद्राची पूजा करून त्याला नारळ अर्पण करतात. या दिवशी मासेमारी करणारे महाराष्ट्रातले कोळी व समुद्राशी निगडित असलेल्या व्यवसायांतील इतर लोक समुद्राची पूजा करून त्यास नारळ अर्पण करतात. पावसाळ्यात बंद असलेले मासे पकडणे या दिवसापासून परत सुरू होते. ज्या कुटुंबात रोजच्या खाण्यात नारळ नसतो, त्याही मराठी घरांमधून या दिवशी नारळीभात, नारळाच्या वड्या यांसारखे नारळापासून बनलेले खाद्य पदार्थ बनवतात…..
याच दिवशी बहीण भावाच्या हातात राखी बांधते त्यावरून या पौर्णिमेला राखी पौर्णिमा असे म्हणतात… ही पौर्णिमा पोवती पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते, कारण या दिवशी सुताची पोवती करून ती विष्णू, शिव, सूर्य इत्यादी देवतांना अर्पण करतात व मग कुटुंबातील स्त्री-पुरुष ती पोवती हातात बांधतात. याच दिवशी श्रवण नक्षत्र असल्याने ब्राह्मण पुरुष उपाकर्म करून नवीन यज्ञोपवीत धारण करतात. या विधीला श्रावणी असे नाव आहे.
श्रावणी ही श्रावण पौर्णिमेलाच करतात असे नाही, श्रावणी हस्त नक्षत्रात चंद्र असताना ‘श्रावण शुक्ल पंचमी’ लाही असू शकते… पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यास श्रावण पौर्णिमेला श्रावणी नक्कीच करत नाहीत. ऋग्वेद्यांची श्रावणी, यजुर्वेद्यांची श्रावणी, तैत्तिरीय शाखा व तिच्या अंतर्गत येणाऱ्या हिरण्यकेशी उपशाखेच्या ब्राह्मणांची श्रावणी या वेगवेगळ्या दिवशी असू शकतात.
श्रावण महिन्यात लागोपाठच्या दोन दिवशी पौर्णिमा असेल, तर पहिल्या दिवशी नारळी पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी राखी पौर्णिमा असते. राखी पौर्णिमेच्या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्याच्या चंपावत जिह्यातल्या देईपुरी इलाख्यात बरही देवीला खुश करण्यासाठी गावातल्या दोन गटांत एकमेकांवर दगडफेक होते… दगडफेकीत अनेकजण घायाळ होतात. २०१९ साली १२० लोक जखमी झाले होते. मात्र हायकोर्टाने दगडफेकीवर बंदी आणल्याने काही लोकांनी दगडांऐवजी सफरचंदे फेकून मारली.
श्रावण वद्य प्रतिपदा (मध्य प्रदेशातील भाद्रपद वद्य प्रतिपदा) : भुज(जा)रिया पर्व… राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी भुजरिया पर्व असते. भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील खेड्यांमध्ये हे धूमधडाक्यात साजरे होते. भुजरिया पर्वाची तयारी नागपंचमीपासून होते. या दिवशी घरांघरांत टोपल्यांमध्ये किंवा मातीच्या छोट्या कुंड्यांमध्ये माती भरून घरातले गव्हाचे बी पेरतात. अंकुर फुटल्यावर ती रोपे राखी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी उपटून नदीच्या पाण्यात बुचकळून धुतात आणि एकमेकांना वाटतात. रोपांना कजलिया म्हणतात. गावातील वृद्ध माणसे कजलिया पाहून एक प्रकारे मातीचे आणि बियांचे परीक्षण करतात, व रोपे आणणाऱ्या मुलांना खाऊ देतात…..
या निमित्ताने गावातले स्त्री-पुरुष टिमकी, ढोलक, झांजा, यांच्या तालावर नाचतात. स्त्रिया मंगलगीते गात गात नदीवर, जलाशयांवर जाऊन भुजारियांचे विसर्जन करतात…..
श्रावण वद्य अष्टमी- श्रीकृष्ण जयंती/’कृष्ण जन्माष्टमी’
श्रावण वद्य अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी असे म्हणतात, कारण या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला… या दिवशी भाविक स्त्रीपुरुष उपवास करतात व कृष्ण जन्माचा सोहळा करतात. श्रावण वद्य नवमी या दिवशी बालगोपाल गोपाळकाला किंवा दहीहंडी साजरी करतात…..
पिठोरी अमावास्या/दर्भग्रहणी अमावास्या/ पोळा.
श्रावण महिन्यातील अमावास्येला पिठोरी अमावास्या असे नाव आहे… संततीच्या प्राप्तीसाठी सौभाग्यवती स्त्रिया पिठोरी व्रत करतात. याच दिवशी काही ठिकाणी शेतकरी पोळा नावाचा सण साजरा करतात. ]हा सण बैलांसंबंधी असून, या दिवशी बैलांना शृंगारून त्यांची मिरवणूक काढतात.
सत्यनारायण पूजा
श्रावण महिन्यात सत्यनारायण पूजा करण्याची पद्धती महाराष्ट्रात प्रचलित झाली आहे…..
दान
श्रावण हा चातुर्मासातील श्रेष्ठ महिना मानला जात असल्याने कित्येक धनिक लोक प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत ब्राह्मणांना व गोरगरिबांना भोजन देतात… देवस्थानांतही या महिन्यात कथापुराणादी कार्यक्रम ठेवतात…..
कावड नेणे
उत्तर भारतात विशेषतः बिहार मधील वैजनाथ या ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या शिवमंदिरात गंगेचे पाणी कावडीतून वाहून नेऊन शिवपिंडीला अभिषेक करण्याची परंपरा आहे..
श्रावणातील वार विशेष.
चार्तुमासातला अत्यंत महत्त्वाचा असा हा महिना आहे… या महिन्यातील प्रत्येक वार हा काहीतरी विशेष असतो. आठवड्यातील सातही दिवसांना आपले एक महत्त्व आहे. एरवी बुधवारला तसे काही नसते, मात्र श्रावणात बुधवारचेही आपले महत्त्व आहे. तर पाहुया आठवड्यातील प्रत्येक वाराचे श्रावणी महत्त्व…..
रविवार
श्रावणातील प्रत्येक रविवारी गभस्ती नावाच्या सूर्याचे पूजन करण्यास सांगितले आहे… हे पूजन मौनाने करावे, असेही शास्त्रात सांगितले आहे…..
सोमवार
श्रावणातील प्रत्येक सोमवारी शिवांचे पूजन करण्यास सांगितले आहे… तसेच प्रत्येक सोमवारी शिवमुठ नावाचे व्रत करावे. हे व्रत विवाह (लग्न) पश्चात पाच वर्षे करावे. सोमवारी एकभुक्त (एक वेळ जेवण) राहून शिविंलगाची पूजा करावी. प्रत्येक सोमवारी धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या. जे धान्य घेणार त्याच्यापैकी तांदूळ असल्यास त्याचा एक दाणा रुप्याचा व इतर ध्यान्यामध्ये एक सोन्याचा दाणा अर्पण करावा. मूठ वाहताना म्हणावयाचा मंत्र असा,
नम: शिवाय शान्ताय पञ्चवक्त्राय शूलिने ।
शृङगभङ्गिमहाकालगणयुक्ताय शम्भवे ।।
पहिल्या सोमवारी -तांदूळ, दुसर्या तीळ, तिसर्या मूग, चौथ्या जवस, पाचव्या सातू अशा मुठी वाहत असतात. या व्रताची पाच वर्षे झाल्यावर उद्यापन करतात…..
मंगळवार
श्रावणातील प्रत्येक मंगळवारी मंगलागौरी यांचे व्रत केले जाते… हे व्रत नवोढा (नवविवाहित) मुलींचे नित्य आहे. विवाहानंतर ५ किंवा ७ वर्षे हे व्रत करतात. या व्रताच्या देवता शिव, गणेश यांचे बरोबर गौरी आहे. पूजनाचा मंत्र असा, “पुत्रान् देहि धनं देहि सौभाग्यं देहि मङले । अन्यांश्च सर्वकामांश्च देहि देवि नमोऽऽस्तुते ।।” पूजन झाल्यावर या व्रताची कहाणी ऐकावी…..
बुधवार
महाराष्ट्रात श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुध बृहस्पती पूजनाचे व्रत केले जाते… बुध बृहस्पतीचे (गुरू) चित्र घेतात किंवा रेखाटतात. त्यांची पूजा करतात. दही भाताचा नैवेद्य दाखवतात. सात वर्षांनंतर काही स्त्रिया याचे उद्यापन करतात…..
गुरुवार
श्रावण महिन्यातील प्रत्येक गुरुवारी बृहस्पती पूजन करण्यास सांगितले आहे… यांची देवता बृहस्पती (गुरू) आहे…..
शुक्रवार
श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवंतिका पूजन करण्यास सांगितले आहे… ही बालसंरक्षक आहे. पहिल्या शुक्रवारी केशर किंवा गंधाने भिंतीवर जिवंतिकेचे चित्र काढतात. आता सर्वत्र छापील चित्र मिळते. जिवंतिकेचे ध्यान असे आहे,
जरे जिवन्तिके देवि बालयुक्ते प्रमोदिनि । रक्षाव्रते महाशक्ति पूर्णकामे नमोऽस्तुते । ।
जीवंतिकेची पूजा करून देवीला ओवाळतात… व देवीची प्रार्थना करतात. ‘अक्षतां निक्षिपाम्यम्ब यत्र मे बालको भवेत् । तत्र त्वया रक्षणीयो जीवन्ति करूणार्णवे !!’ हे करूणामयी माते मी जिकडे अक्षता टाकते, त्या दिशेला असणार्या माझ्या बालकाचे तू रक्षण कर… अशी ही प्रार्थना माता आपल्या अपत्यांसाठी करत असते. आपल्या इकडे जरा -जिवंतिका म्हणतात. यात जरा ही देवीसुद्धा बालकांची रक्षण करणारी आहे…..
शनिवार
श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी शनीपीडेचा त्रास होऊ नये म्हणून हे व्रत केले जाते… शनीची लोखंडाची मूर्ती बनवावी व पंचामृती पूजा करावी. शनीच्या कोणस्थ, पिंगल, बभ्रू, कृष्ण, रौद्र, अंतक, यम, सौरी शनैश्र्चर आणि मंद या नावांचा जप करावा. उडीद-तांदूळाची खिचडी करावी, पायस, आंबिल, पुर्या यांचा नेवैद्य अर्पण करावा…..
या व्रताचा पर्याय :
प्रत्येक शनिवारी लक्ष्मी-नृसिंह, शनी, हनुमान यांची पूजा करावी… मारूतीला रुईच्या पानांची माळ अर्पण करावी. लक्ष्मी नृसिंहाप्रित्यर्थ ब्राह्मण सवाष्ण भोजनाला बोलवावे. शनीप्रित्यर्थ सूर्योदयापूर्वी पिंपळाची पूजा करावी. मुंज्या मुलाला अभ्यंगस्नान व भोजन द्यावे. एकभुक्त राहावे. श्रावणातील शनिवाराला संपत शनिवार म्हणतात
स्त्रियांचा आवडता श्रावण मास
श्रावण महिन्याची सर्व स्त्रिया व मुली आतुरतेने वाट पाहत असतात… कारण याच महिन्यात आपल्या भारतीय संस्कृतीत साजरे केले जाणारे बरेच सण असतात. त्यामुळे स्त्रियांना नटायला मिळते, हौसमौज करायला मिळते. हा श्रावण महिना खूप फसवा असतो. ऊन पडले आहे असे म्हणता म्हणता पावसाच्या सरीवर सरी कोसळू लागतात. श्रावणातील हा ऊनपावसाचा खेळ पाहून मन हरवून जाते. अवचित कधीतरी सप्तरंगी इंद्रधनुष्याचे मंगल तोरण आकाशाला एक वेगळीच शोभा आणते. तसेच हा श्रावण पक्ष्यांचा राजा मोर यास डौलदार पिसारा फुलवून नृत्य करण्यास आव्हान करतो. पावसाच्या सरी कोसळू लागल्या की मोराला थुई थुई नाचायला प्रोत्साहन चढते…..
अशातच पिसारा फुलवून नाचताना त्याची छबी कॅमेरामध्ये टिपतानाचा अनुभव हा खूपच अविस्मरणीय असतो… चैत्रापासून सुरु होणाऱ्या या मराठी महिन्यांचे रंगरूप आगळेवेगळेच असते. मला स्वतःला आवडतो आणि हवाहवासा वाटतो तो हा ‘हिरवा श्रावण’. श्रावणात सृष्टीत सर्वत्र हिरव्या रंगाची उधळण झालेली असते. हिरव्या रंगातही किती विविध छटा असतात. कुठे गर्द हिरवा, तर कुठे प्रसन्न हिरवा, तर कुठे पोपटी अशा रंगछटा सर्वत्र पाहायला मिळतात. श्रावणात वेली, वनस्पतींना नवीन पालवी फुटलेली असते. हे दृश्य पाहून असे वाटते की, जणू काही सृष्टीने नववधूचा वेशच धारण केला आहे.
फळाफुलांनी वृक्षही बहरून गेलेले असतात… गवते आपली पिवळी कात टाकून हरित वस्त्रे परिधान करतात. अशा वातावरणात खूपच प्रसन्न वाटते. पावसाच्या सरी कोसळून गेल्या की, पक्षी आपले इवलाले पंख झटकून पिलांसाठी चारा आणायला घरट्याबाहेर पडतात. ‘येरे येरे पावसा तुला देतो पैसा’ अशी पावसाची गाणी गुणगुणत पावसाच्या रिमझिम सरी अंगावर घेत लहान मुले चिंब भिजतात आणि आनंदाने उड्या मारतात. लहान मुले कागदाच्या होड्या करून पावसाच्या वाहत्या पाण्यात सोडतात. तसेच कार्यालयात जाणारे येणारे लोक छत्र्या, पिशव्या सांभाळत ऑफिस गाठण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच एखाद्या दिवशी छत्री, रेनकोट सोबत घेतला नाही आणि जर अचानक खूप पाऊस आला तर सर्वांचीच पळता भुई थोडी होते. असा हा लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या आवडीचा ‘श्रावण महिना’ आहे…..
कारण पाऊस पडताच सर्वांना गरमागरम कांदा भाजी व चहा यांची मेजवानी मिळते… जर जास्त पाऊस झाला तर विद्यार्थ्यांना शाळेला सुट्टी मिळते त्यामुळे विद्यार्थीही खूप आनंदात असतात. शेतकरी सुद्धा या महिन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. कारण याच महिन्यात शेतीची बरीच खोळंबलेली कामे त्यांना या महिन्यात पूर्ण करायची असतात. श्रावणसरींच्या स्पर्शाने आपल्या या शेतकरी बांधवाच्या शेतातील पिके आपल्याला आनंदाने डोलताना दिसतात. त्यावेळी आपल्या या शेतकरी बांधवाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच उत्साह आणि आनंद आपल्याला पाहायला मिळतो. श्रावणमास म्हणजे व्रतवैकल्यांचा आणि सणावारांचा महिना…..
श्रावणातील सोमवारांचे खूप माहात्म्य आहे यादिवशी बऱ्याच लोकांचा उपवास असतो… मंगळवारी मंगळागौरीची पूजा केली जाते. तसेच शनिवारी मारुतीची आराधना केली जाते. या श्रावणात माणूस आपल्या उपकारकर्त्या निसर्गबांधवांनाही विसरत नाही. म्हणून तर उंदरांपासून पिकांचे संरक्षण करणाऱ्या नागांची नागपंचमीला पूजा केली जाते. तर नारळीपौर्णिमेला सागराला भक्तिभावाने नारळ अर्पण केला जातो. श्रावणातील अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी स्त्रीपुरुष भाविक उपवास करतात आणि कृष्ण जन्माचा सोहळा साजरा करतात.
श्रावणातील नवमीला बालगोपाल गोपाळकाला, दहीहंडी साजरी करतात… त्यानंतर येतो तो बैलपोळा. यालाच श्रावणी पोळा असेही म्हणतात. शेतकरी आपल्या बैलांच्या गळ्यात घुंगराच्या माळा घालतात त्यांची सजावट करतात. या दिवशी शेतकरी आपल्या बैलाची पूजा करतात त्यांना नैवेद्य दाखवतात आणि सर्व गावकरी मिळून या बैलांची गावामध्ये मिरवणूक काढतात.
श्रावणातीलकावड यात्रा.
श्रावण महिना सुरु झाल्यावर उत्तर भारतातील प्रसिद्ध कावड यात्रा सुरु होते… या कावड यात्रेत लाखो शिवभक्त भगवे कपडे घालून जय भोले! म्हणत आप-आपल्या कावडी घेऊन हरिद्वार, ऋषिकेश आणि काशीच्या दिशेने चालू लागतात. गंगा नदीचे आणि तिच्या पाण्याचे महात्म्य हिंदू धर्मात सगळ्यात मोठे आहे… परंतु गंगा नदी ज्या राज्यांमधून वाहते, त्या राज्यातील लोकांसाठी गंगा जीवनाचा आणि परंपरांचा अविभाज्य अंग आहे. त्यामुळेच गंगेच्या पाण्यावर आधारलेल्या अनेक परंपरा या भागात आहेत…..
त्यातीलच एक परंपरा म्हणजे कावड यात्रा होय… दरवर्षी लाखो भाविक या कावड यात्रेत सहभागी होतात आणि हरिद्वारमधून गंगेचे पाणी शिवलिंगावर चढवतात. कावड यात्रेच्या मुख्यस्थानी असलेली गंगा नदी… हिमालय पर्वतरांगेतील गोमुख येथे भागीरथी नदीचा उगम होतो. पुढे जाऊन गंगोत्री येथे भागीरथीला अलकनंदा येऊन मिळते. या दोन नद्यांच्या संगमातुन गंगा नदीचा जन्म होतो. गंगा नदी गंगोत्रीहून वाहत वाहत उत्तरकाशी आणि देवप्रयाग ओलांडून ऋषिकेशला येते. त्यांनतर काहीच मैल पुढे वाहून हिमालयातील ही महाकाय नदी मैदानात उतरते आणि उत्तरेच्या मैदानाला जीवन देते… गंगा नदी उत्तरेच्या मैदानात शेती, उद्योग, पिण्याचे पाणी या सगळ्या गरज भागवते. त्यामुळे या यात्रेमागे धार्मिक कारण असले, तरी पर्यावरणीय आणि सामाजिक कारणं सुद्धा आहेत.
श्रावण महिना सुरु झाला कि उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, पंजाब आणि हरियाणातील लाखो भाविक आपल्या खांद्यावर कावडी उचलून अनवाणी पायाने उत्तराखंड राज्यातील हरिद्वारला चालत जातात… काही जण हरिद्वारच्या पुढे ऋषिकेशला सुद्धा जातात. हरिद्वार, ऋषिकेश मधून गंगा नदीचे पाणी कावडीतील घड्यांमध्ये भरून मेरठ जवळच्या पुरा येथील नीलकंठ महादेव, काशी विश्वनाथ किंवा आपल्या गावापासून जवळ असलेल्या शिवलिंगावर चढवतात…..
इतक्या दुरून पाणी आणून शिवलिंगावर चढवण्याच्या मागे दोन आख्यायिका आहेत… पहिली आख्यायिका अशी सांगितली जाते कि, समुद्र मंथनांतर अमृताच्या प्याल्यात सर्वात प्रथम हलाहल नावाचे विष निघाले होते. सृष्टीला वाचवण्यासाठी हे विष महादेवाने प्यायले होते. परंतु हे विष महादेवाच्या संपूर्ण शरीरात जाऊ नये यासाठी पार्वतीने महादेवाचा गळा रोखून ठरला. विष गळ्यात रोखले गेल्यामुळे महादेवाचा कंठ निळा झाला आणि महादेव नीलकंठ झाले. परंतु विष गळ्यात असले तरी घातक होते. तेव्हा विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी पार्वतीने महादेवाला गंगेचे पाणी दिले होते. त्यामुळे दरवर्षी कावडीने पाणी आणून शिवलिंगावर चढवले जाते…..
तर दुसरी आख्यायिका महादेवाचा निस्सीम भक्त रावणाची आहे… रावण हा महादेवाचा निस्सीम भक्त होता हे तर आपल्याला माहीतच आहे. परंतु महादेवाने हलाहल प्यायल्यावर रावणाने हरिद्वार येथून गंगेचे पाणी आणून पुरा येथील नीलकंठ महादेवाला अर्पण केले होते. तेव्हापासून कावड यात्रा चालू झाली असे सांगितले जाते….
काही जण या दोन आख्यायिकांव्यतिरिक्त शिवभक्त परशुरामाने दर सोमवारी महादेवाला पाणी वाहिल्यामुळे ही यात्रा सुरु झाली असे सांगतात. कावड यात्रा फक्त हरिद्वारहून पुरा येथील नीलकंठ महादेव मंदिरापर्यंतच चालत नाही… तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या नद्यांचे पाणी सुद्धा ज्योतिर्लिंगांना चढवले जाते. काही यात्रेकरू अयोध्येतून शरयू नदीचे पाणी घेऊन काशी विश्वनाथला चढवतात, तर काही यात्रेकरू शरयू नदीच्या पाण्यासह बिहारच्या सुल्तानगंजमधून गंगा नदीचे पाणी घेऊन, झारखंड राज्यातील देवघर येथील बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाला आणि दुमका जिल्ह्यातील वासुकीनाथाला जलाभिषेक करतात आणि आपली यात्रा पूर्ण करतात…..
नर्मदा नदीचे पाणी महाकालेश्वराला आणि क्षिप्रा नदीचे पाणी ओंकारेश्वराला