श्री क्षेत्र नारायणपूर (Ek Mukhi Datta Mandir Narayanpur) । दिवे घाट । दर गुरुवार चा दत्त गुरूचा महाप्रसाद ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
श्री क्षेत्र नारायणपूर (Ek Mukhi Datta Mandir Narayanpur)
पुण्यापासून अवघ्या ४० किमी अंतरावर असलेल्या पुरंदर किल्याच्या पायथ्याला असलेले संत चांगदेवांचे गाव म्हणजे नारायणपूर. येथेच प्रसिद्ध असे एकमुखी दत्त मंदिर व ऐतिहासिक नारायणेश्वर शंकराचे मंदिर आहे. दत्त मंदिरा शेजारी असलेल्या या पुरातन शिवमंदिराचे नाव नारायणेश्वर मंदिर आहे. मंदिर यादवकालीन आहे.
मंदिराचे दगडी बांधकाम अजूनही सुस्थितीत आहेत. यादवकालीन असलेल्या या मंदिरावरील शिल्पकाम सुंदर आहे. मंदिरा भोवती अंदाजे ५ ते ६ फूट उंच तटबंदी आहे. या तटबंदीत असलेल्या दरवाजातून मंदिराच्या परीसरात आपला प्रवेश होतो.
नारायणपूरचे मूळ नाव पूर. यादव कालखंडात निर्माण झालेल्या अनेक मंदिरांपैकी हे एक कोरीव शिल्प असलेले मंदिर आहे. सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असलेले हे शंकराचे मंदिर आहे. प्रवेशद्वार, स्तंभ, छत, भिंती अशा सर्वच ठिकाणी शिल्पकाम आहे. यक्ष, अप्सरा, द्वारपाल, वैदिक देवतांची शिल्पे आहेत. मंदिरा बाहेर नंदीची मूर्ती असून मूर्तीची इतर मंदिराप्रमाणेच थोडी तोडफोड झाल्याचे दिसून येते. आतमध्ये स्वयंभू शिवलिंग आहे. मंदिराची बांधणी ही हेमाडपंती आहे. सभामंडपाच्या उत्तरेकडील प्रवेशद्वाराने बाहेर पडल्यानंतर दरवाजाच्या द्वारपट्टीवर सुंदर नक्षी आहे.
श्री क्षेत्र नारायणपूरला मार्गशीर्ष शुद्ध चतुर्दशीला सायंकाळी मोठ्या उत्साहात दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. सोहळ्यासाठी नरसोबाची वाडी, औदुंबर तसेच महाराष्ट्रातील दत्तस्थानांवरून दत्तज्योत आणली जाते. प्रवचन, दर्शन कार्यक्रम व महाप्रसाद आदी कार्यक्रम येथे दरवर्षी होतात. गुरुपौर्णिमेच्या दिवशी येथे मोठा उत्स्व साजरा केला जातो. संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच देशभरातून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. येथील विशिष्ट म्हणजे सामुदायिक विवाह सोहळा. महाराष्ट्रभर आजवर शेकडो विवाह येथे पार पाडले आहेत. संत चांगदेवाचे गाव म्हणूनही नारायणपूरला ओळखले जाते. मंदिरा शेजारी नारायणेश्वराचे पांडवकालीन जुने मंदिर आहे. हेमाडपंती बांधकाम असलेले हे मंदिर आहे.
सदर मंदिरात जुनी गुरुचरित्र पारायणाची जागा आहे. पूरातन दत्त पादूका आहेत. परिसरात रहाण्यासाठी भक्त निवास व प्रसादाची व्यवस्था आहे. प्रशस्त सभामंडप आहे. निसर्गरम्य किल्याच्या पायथ्याशी असणारे हे स्थान श्रीगुरुंच्या वास्तव्यांनी अतिशय पवित्र झालेले आहे. “जय जय गुरुदेवदत्ता, अत्री अनुसये सुता” असा मंत्र येथे जपला जातो.
येथील दत्त जन्म सोहळा मार्गशिर्ष शु.१४ सायंकाळी असतो. दत्तजन्म पाळणा हलवून करतात. दत्तजन्माचे किर्तन असते. दुसऱ्या दिवशी उत्सवमूर्ती व पादुका ग्रामप्रदक्षिणेस जातात. ही मिरवणूक सवाद्य गावातील चंद्रभागा कुंडापर्यंत जाते. तेथे मूर्ती व गुरुपादुकांना स्नान घालतात. या मिरवणूकीत हत्ती, घोडे, उंट असा सर्व लवाजमा असतो. दत्तभक्तांचा हा सोहळा पहाण्यासाठी महापूर लोटतो.
सदर ठिकाणी अनेक दु:खी, पिडीत व बाधीत भक्तांच्या समस्यांचे निराकरण झालेले आहे. म्हणून हे जागृत स्थान म्हणून प्रसिध्दीस आले आहे. या ठिकाणी आता विशाल काय मंदिर, पारायणाची जागा, भक्त निवास व भोजनाची व्यवस्था आहे. श्री दत्तजयंती व गुरुपौर्णिमा हे येथे साजरे होणारे महत्वाचे उत्सव आहेत. येथे गुरुवार व प्रत्येक पौर्णिमेस विशेष महत्व आहे.
दिवे घाट :
नारायणपूरला जाणारे दोन तीन मार्ग आहेत. त्यापैकी हडपसरमार्गे सासवडवरून गाडीने जाण्याचा मार्ग
सासवडकडे जाताना वाटेत दिवे घाट लागतो. याच घाटाच्या पायथ्याशी एका कोपºयात पेशव्यांनी बांधलेला मस्तानी तलाव आहे. पेशवाईत या तलावातून पुण्याला पाणी आणण्यात यायचे. पंढरपूरच्या वारीत याच मार्गाने तुकाराममहाराजांची पालखीही जाते. घाट सुरू होण्याआधी भेळेची काही दुकाने आहेत. त्या ठिकाणी आवर्जुन थांबून मटकी भेळ खा व घाट चढा मजा येते. पुण्याची वाढती ‘सुज’ या घाटातून अनुभवयाला मिळते. लांबवर दिसणाºया उंच उंच इमारती, त्यात दिसणारी छोटी शेतजमीन, मस्तानी तलाव, समोर दिसणारा कानिफनाथांचा डोंगर
दर गुरुवार चा दत्त गुरूचा महाप्रसाद
श्रीक्षेत्र नारायणपूरला जाण्याचे आणखी एक कारण म्हणजे येथे मिळणारा प्रसाद (भात व आमटी) पत्रावळीवर देण्यात येणारे हे पोटभर जेवण गरमा गरम व ताजे असते. पुन्हा पुन्हा हा प्रसाद खाण्याचे मन करते. पूर्वी उघड्यावर हे प्रसाद वाटपाचे काम होत असे. आता मोठ्या हॉलमध्ये ही सुविधा देण्यात येते. महिलांसाठी व पुरुषांसाठी वेगवेगळ्या रांगा असून, भारतीय बैठक असते. स्वत:ची पत्रावळ जेवण झाल्यावर ठेवलेल्या कचराभांड्यात नेऊन टाकण्याचे काम प्रत्येकाचे असते. काही लोक खास करून प्रसादासाठी वेगळी भांडी आणून नंतर पुढील प्रवासासाठी हा प्रसाद घेऊन जातात.