।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
श्री धोंडीराज महाराज पुण्यतिथी पलुस (Shri Dhondiraj Maharaj Palus)
सांगली जिह्यातील पलूस या गावाची ओळख ज्या सत्पुरुषामुळे सर्वदूर पसरली त्या श्रीधोंडीराज महाराजांची ओळख करून देणारा हा लेख…..
सांगली जिह्यातील कराड-तासगाव मार्गावरील ‘मध्यवर्ती’ तसेच वर्दळीचे ठिकाण म्हणून ‘पलूस’ हे गाव महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे… तसेच ते जगभरात प्रसिद्ध होण्यामागे दोन महत्त्वाच्या व्यक्ती कारणीभूत ठरल्या आहेत. त्यात सर्वप्रथम थोर अवतारी सिद्धसत्पुरुष श्रीधोंडीराज महाराज आणि दुसरे अभिजात गायकीच्या बळावर शास्त्रिय गायन परंपरेला समृद्ध करणारे गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांचे नाव घ्यावे लागेल…..
श्रीधोंडीराज आणि पं. पलूसकर यांच्या आगमनापूर्वी शांत आणि समृद्ध असणारे ‘पलूस’ हे खेडेगाव तेथील आद्य दैवत श्रीकुसुमेश्वर तसेच गावाच्या उत्तरेस असणारी श्रीपद्मावतीदेवी यांच्या अतिप्राचीन आणि स्वयंभू अस्तित्वामुळे सर्वदूर सुपरिचित होते…..
पूर्वापार ‘खरकटवाडी’ या नावाने परिचित असलेले मात्र सद्यकाळात, मिरज तालुक्यातील कांचनपूर या नावाने ओळखले जाणारे खेडेगाव हीच श्रीधोंडीराज महाराजांची जन्मभूमी….. सन १८२० च्या सुमारास धनगर कुटुंबातील जिजाई व बाबाजी या दांपत्याच्या पोटी श्रीधोंडीराज महाराजांचा जन्म झाला. त्यांची आत्या सखूबाई मोरे पलूस येथे राहत असे. एकदा काही कारणाने आत्याबाई कांचनपूर येथे आपल्या माहेरी म्हणजेच त्यांचे बंधू बाबाजी यांच्या घरी आल्या. काही दिवस राहिल्यानंतर त्या सासरी निघाल्या असता धोंडीबाळाने आत्याकडे तिच्यासोबत पलूस येथे जाण्याचा हट्ट धरला…..
दैवयोग म्हणावा, की काय न कळे, मात्र सखूआत्या सोबत पलूस येथे आल्यानंतर श्रीधोंडीराज कधीही त्यांच्या मूळ गावी आई- वडिलांकडे गेले नाहीत. सखूआत्याकडेच राहत असल्याने ते घरातील गुरे राखण्याचे काम करीत असत… त्यांचा बराचसा वेळ जंगलात जात असे. पुढे तर आत्याच्या घरातील गुरांसोबत ते गावातील इतरांची गुरेही राखू लागले. वयाने लहान असल्याकारणाने गावातील कुणीही सांगितलेली कामे करणे, उर्वरित वेळेत घरची तसेच शेतातील कामे करणे, दोर विणणे, घोंगडय़ा तयार करणे अशी अनेक कामे ते करीत असत. आपल्या वयाच्या अन्य मुलांसोबत ते फारसे रमत नसत. एकटय़ानेच शांत-निवांत राहत आपल्याच विचारामध्ये दंग होणे त्यांना अधिक आवडू लागले. अडाणी आणि अशिक्षित मुलांमध्ये त्यांचा जीव रमत असल्याचेही दिसून येत असे…..
जसजसे वय वाढू लागले तसतसा श्रीधोंडीराजांच्या चित्तवृत्तीमध्ये बदल होत गेला… याचीच परिणती म्हणून त्यांनी सखूआत्याच्या घराचाही त्याग करीत बाह्य जगाचा आश्रय घेतला. पलूस गावानजीक ‘दावल मलिक’ दर्गा, कुंडल रोडवरील मायाप्पा मंदिर, सागरेश्वराचा डोंगर आणि गावातील धर्मशाळा अशा मोजक्याच ठिकाणी ते एकटेच राहू लागले. कुठल्या स्थानावर किती दिवस राहावे याचा काही नेम नसे. कुणाशी बोलणे नाही, कुणाचा संपर्क नाही, एकाएकी दूर निघून जावे, परतल्यावर कुणी काही विचारल्यास त्यास प्रतिसाद देऊ नये, असे त्यांचे जगबाह्य वर्तन पाहून घरची मंडळीही चक्रावली…..
एकीकडे श्रीधोंडीराजांचे वय वाढत होते व त्याचवेळी त्यांच्या वृत्तीची निवृत्ती होत होती… त्यांची ही अवस्था पलूसकरांसाठी चिंतेचा तर काही उनाड मंडळींसाठी चेष्टेचा विषय बनली…..
याच सुमारास श्रीधोंडीराजांचा परिचय अक्कलकोटस्थ श्रीस्वामी समर्थ महाराजांशी झाला असावा असे तत्कालीन जाणकारांचे मत आहे, आणि याच कालावधीत श्रीस्वामी समर्थांचे वास्तव्य मंगळवेढा येथे असताना त्यांची श्रीधोंडीराज यांच्यासोबत प्रथम भेट घडली, असाही कयास आहे… श्रीधोंडीराज यांस अनुग्रह प्राप्त झाला आणि त्या नंतरचा काळ त्यांनी केवळ नामस्मरणात व्यतीत केला…..
श्रीधोंडीराज सर्वत्र संचार करीत. मंदिरात मुक्काम करीत व जंगलात एकटेच फिरत… कधी लहर आल्यास गावात परतत आणि एखाद्या वस्ती-वाडीवर जाऊन ‘धोंडय़ाला भाकरी वाढा’ असा पुकारा करीत. कुणी भीक घातल्यास काखेतील झोळीमध्ये स्वीकारत आणि त्यातील सर्व जिन्नस एकत्र करून खात. बऱ्याचदा ते गावाच्या बाहेर जाऊन जेवत असत. त्यावेळी मोकाट कुत्री, गुरे-ढोरे व अन्य जनावरे त्यांच्या बाजूस येऊन बसत त्यांनाही महाराज भिक्षेतील वाटा देत असत…..
खांद्यावर घोंगडी आणि झोळी, तांब्या आणि हातातील काठी एवढाच संग्रह श्रीधोंडीराज बाळगीत असत… त्यांची उन्मनी अवस्था पाहून त्यांची गणना वेडय़ा माणसांमध्ये केली जात असे. बरीच मंडळी त्यांना ‘वेडा धोंडी’ म्हणून चिडवत, दगड-धोंडेही मारत असत, परंतु त्यांच्यातील परमेश्वरी तत्त्वाचा प्रत्यय आल्यानंतर सर्वत्र त्यांना ‘धोंडीबुवा’ किंवा ‘धोंडीराज महाराज’ या नावाने सन्मान मिळू लागला…..
श्रीधोंडीराज महाराजांची जीवनक्रमणा खडतर होती… त्यांनी ऊन-वारा-पाऊस, तहान-भूक यांची कधी पर्वा केली नाही. रामनामाचा जप करणे एवढीच त्यांची साधना होती आणि त्यातच ते दिवस-रात्र रंगून गेल्याचे चित्र पाहावयास मिळत असे. लोक-संग्रह टाळून विरक्तीची परिसीमा गाठत त्यांनी परमार्थ जोडला. अनेक प्रकारच्या सिद्धी त्यांना शरण गेल्या. त्यांच्या वाचासिद्धीतून अनेक चमत्कार घडले. निव्वळ पलूसकरांनाच नव्हे तर पंचक्रोशीतील अनेकांना श्रीधोंडीराज महाराजांमधील देवत्वाचा साक्षात्कार घडला व त्यांची प्रसिद्धी सर्वदूर पसरली…..
श्रीधोंडीराज महाराजांची राहणी अतिशय साधी आणि वृत्ती अयाचित होती. मुक्या प्राण्यांवर, पीडितांवर, दीनदुबळ्यांवर त्यांचे विशेष प्रेम होते… गोरगरीबांना अन्नदान करावे असा आग्रह ते धरीत असत. त्यांच्या दर्शनासाठी येणाऱया भक्तांना ते रामनामाचा जप करण्यास सांगत असत. त्याशिवाय सर्वांनी आपापल्या मर्यादेत राहावे, व्यवसाय अगर नोकरी-धंदा यथायोग्य करावा, कष्ट करण्यास लाजू नये, हव्यास बाळगू नये, लबाडी करू नये, मुक्या प्राण्यांवर दया करावी, दारी येणाऱयास भाकर-तुकडा द्यावा, विनाकारण कुणाचे मन दुखवू नये असा उपदेश ते नित्यनेमाने करीत असत. श्रीधोंडीबुवा कधी कुणाकडून पाया पडून घेत नसत, कुणी तसा प्रयत्न केल्यास हातातील दंडुका त्याच्या पाठीत घालीत असत. त्यांचे बोलणे खेडवळ माणसाप्रमाणे होते…..
श्रीधोंडीबुवांच्या व्यक्तिमत्त्वाचे चित्रण त्यांचे भक्त रायाजी शामराव पाटील व गणेश देवळे यांनी चरित्राच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने केले आहे… हे चरित्र श्रीधोंडीराज महाराज समाधी मंदिर, पलूस येथे उपलब्ध आहे.