
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
कनकादित्य मंदिर – Shri Kanakaditya Temple
श्री कनकादित्य मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी या गावातील प्रसिद्ध सूर्य मंदिर आहे… कशेळी हे गाव रत्नागिरी शहरापासून दक्षिणेस ४० किलोमीटर, पावस पासून दक्षिणेस २४ किलोमीटर आणि राजापूर शहरापासून पश्चिमेस ३२ किलोमीटर अंतरावर कशेळी गाव वसले आहे…..
आख्यायिका
आदित्य म्हणजे सूर्य… संपूर्ण भारतात फारच थोडी सूर्यमंदिरे आहेत. ओडिशा राज्यातील कोर्णाकचे सूर्यमंदिर तर जगप्रसिद्ध आहेच. त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. प्रभासपट्टण म्हणजे भगवान श्रीकृष्णांचे वसतिस्थान होय. (प्रभासपट्टण जवळच बारा ज्योतिरलिंग पैकी एक सोरटी सोमनाथचे प्रसिद्ध मंदिर आहे.) १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजी सौराष्ट्रावर चाल करून आला. त्या वेळी प्रभासपट्टणच्या सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या, जे बारा महिन्याचे प्रतिक होते. हल्ल्याची आगाऊ बातमी मिळाल्यामुळे तेथील पुजाऱ्याने दक्षिणेकडे जाणाऱ्या वेरावळच्या एका व्यापाऱ्याच्या गलबतावर त्यातील काही मूर्ती चढवल्या व तो व्यापारी त्या मूर्ती घेऊन दक्षिणेकडे निघाला. फक्त येथील परिस्थिती शांत झाल्यावर तू त्या मूर्ती परत आण अशी सूचना पुजारीने त्या व्यापाऱ्याला सांगितले. ते गलबत कशेळी गावाच्या समुद्रकिनाऱ्यापाशी आले असता अडकले, पुढे जाईना… भरपूर प्रयत्न केले, पण जहाज काय जागचे हलेना शेवटी त्या व्यापाऱ्याच्या मनात आले की, कदाचित देवाची येथेच राहण्याची इच्छा आहे. म्हणून त्याने एक मूर्ती किनाऱ्यावरील गुहेत आणून ठेवली. त्यानंतर त्याचे जहाज मार्गस्थ झाले…..
कशेळी गावात कनकाबाई नावाची एक सूर्योपासक गणिका राहत होती… तिच्या स्वप्नात याच वेळी ही सूर्य मूर्ती आली आणि भगवान सूर्य नारायनाने कनकेला म्हणाले कि, तू मला येथून ने आणि तुझ्या गावात मंदिर बांध त्यात माझी स्थापना कर. कनकाबाईने ही हकीकत ग्रामस्थांना सांगितली… मग ग्रामस्थांनाच्या मदतीने ती सूर्य मूर्ती गावात आणली गेली व स्थापना केली. त्या कनकाबाई मुळे घडले त्यामुळे कनकेचा आदित्य म्हनून कनकादित्य असे या मंदिराला नाव पडले. किनाऱ्यावर ज्या गुहेत कनकादित्याची मूर्ती सापडली, त्यास ‘देवाची खोली’ म्हणतात. गावातील कोणी माहितगार बरोबर असेल तर येथे न चुकता पोहचता येते. समुद्रापासून साधारण १५ फूट उंचीवर काळ्या पाषाणात ही नैसर्गिक गुहा आहे… जवळजवळ ३०० माणसानं पेक्षा जास्त माणसे यात बसू शकतील एवढी मोठी ही गुहा आहे. याठिकाणी आल्यावर याची भव्यता लक्षात येते… पण नाहक धाडस करू नये. कारण येथे जाणे आणि परत येणे अत्यंत अवघड आहे.
अलिकडे येथे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने सनसेट पॉइंट (सूर्यास्त) पहाण्याची उत्तम व्यवस्था केली आहे.
कनकादित्य मंदिर स्थापत्य. – Kankaditya Temple Architecture
मंदिर साधारण ९०० वर्षे प्राचीन आहे… पूर्णतः अस्सल कोकणी कौलारू स्थापत्य शैली येथे पहायला मिळते. मंदिराचे अंतरंग खूपच सुंदर असून लाकडी खांबावर नक्षी व वेलबुट्टी केलेली आहे… मंदिराच्या भिंतीवर आणि छतावर विविध देव-देवता लाकडावर कोरलेल्या आढळतात. यामध्ये प्रामुख्याने कार्तिक, वरुण, श्रीकृष्ण, वायू, अग्निनारायण, शेषशायी विष्णू तसेच समुद्रमंथन आणि दशावतार या पौराणिक कथा प्रसंग चित्रित केले आहे. “रथसप्तमी उत्सव” येथील खास आकर्षण…
रथसप्तमी उत्सव हे कनकादित्य मंदिरात माघ शु.सप्तमी ते माघ शु.एकादशी असा पाच दिवस असतो… कशेळी आणि आसपासच्या गावातील सर्वात महत्त्वाचा उत्सवाचा हा काळ आहे.
या रथसप्तमी उत्सवात सर्वात आकर्षण म्हणजे कनकादित्य आणि कालिकादेवी यांचा लग्नसोहळा अगदी आवर्जून बघण्यासारखा हा सोहळा असतो. कालिकादेवी ही कशेळी गावापासून अवघ्या ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या काळीकावाडीची. कालिकादेवीला धरून सहा बहिणी… कालिकादेवी, महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती, भगवतीदेवी आणि जाखादेवी. या सर्व देवी कशेळी गावाच्या आसपासच्याच आहेत. यात सर्वात प्रसिद्ध महाकाली मंदिर (अडिवरे) अगदी आवर्जून पाहण्यासारखे मंदिर आहे. कालिकादेवी ही या सर्व बहिणीत धाकटी महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती आणि भगवतीदेवी ह्या कालिकादेवीला जाखादेवी साठी वर संशोधन करायला पाठवतात… पण कनकादित्यला पाहताचक्षणी कालिकादेवी कनकादित्याच्या प्रेमात पडते आणि कनकादित्यही कालिकादेवीच्या प्रेमात पडतो. मग पुढे त्यांचं लग्न ठरतं… जाखादेवीला आपल्या धाकट्या बहिणीचा खूप राग येतो आणि ती तिचं तोंड न बघण्याची प्रतिज्ञा करते. आणि लग्नालाही उपस्थित राहत नाही. रथसप्तमी उत्सवात लग्नसोहळावेळी मोठी बहिण महाकालीला मानाचे सरंजाम पाठवले जाते. भगवतीदेवी पाठराखन म्हणून येते. कालिकादेवीची पालखी ज्यावेळी कशेळीकडे कनकादित्य मंदिराकडे जात असते, त्यावेळी वाटेत जाखादेवीचे मंदिर लागते. मंदिरासमोरून पालखी जात असताना जाखादेवी मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. (कारण जाखादेवीने आयुष्यभर कालिकादेवीचे तोंड न बघण्याची प्रतिज्ञा केली होतीना म्हणून.) यामुळे ही प्रथा आजही पाळली जाते. ह्या लग्न सोहळ्याचं अजून एक खास वैशिष्ट म्हणजे हुंडा पद्धत सर्व साधारणपणे सगळीकडे मुलीकडील मंडळीनी मुलाकडच्या मंडळींना हुंडा देतात. पण येथे उलटे आहे. मुलाकडच्या म्हणजे कनकादित्याकडच्या मंडळींना वधुकडच्या म्हणजे कालिकादेवीच्या मंडळींना हुंडा म्हणून शिधा द्यावा लागतो.
कनकादित्य मंदिराचे काही खास वैशिष्ट्ये. – Some special features of Kanakaditya Temple.
१) मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मंदिराच्या शेजारील विहरीवर हात- पाय धुऊन आत जाण्याची प्रथा आहे… या विहरीवर पाणी काढण्याची जुनी कोकणी पद्धत पहायला मिळते…..
२) मंदिरात कमालीची स्वच्छता असून मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी विश्वस्तापैकी उपस्थित हसत तुमचे स्वागत करतात, जे इतरत्र सहसा पहायला मिळत नाही…..
३) देवासाठी चांदीचा रथ असून तो अत्यंत देखणा आहे… पण तो फक्त उत्सवाच्या वेळीच पहायला मिळतो…..
४) मंदिराचे सभामंडप आणि मंदिरावरील कळसावर तांब्याचा पत्रा मुंबईचे शिल्पकार म्हणून ज्यांना ओळखतात, ते नाना शंकरशेठ यांनी त्यांना पुत्रप्राप्ती झाली म्हणून बांधून दिले…..
५) कनकादित्य मंदिराच्या छतावर ज्या विविध देव- देवतांच्या मूर्ती कोरल्या आहेत, त्यात अग्निनारायणाची मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे… या मूर्तीला सात हात, तीन पाय आणि दोन मुखे आहेत. अग्निनारायण म्हणजे अग्नी. घरातील अग्नीचे स्थान म्हणजे स्वयंपाकघरातील चूल. चूल मांडायची ती तीन दगडांवर म्हणजे पायावर म्हणून तीन पाय. चुलीची अग्निमूखे दोन एक चुलीचे दुसरे वेलाचे म्हणून दोन मुखे. आणि दोन्ही मुखांवर भांडे ठेवण्यासाठी जे छोटे छोटे खूर (उंचवटे) असतात. त्यांमध्ये वैलाचे चार व चुलीचे तीन असे मिळून सात म्हणून सात हात आहेत. संपूर्ण चुलीची जी रचना व तिचे प्रतीकात्मक रूप या अग्निनारायणाच्या मूर्तीत सामावले आहे. (अशा प्रकारची मोठी अग्नीनारायणाची मूर्ती रत्नागिरी शहरातील सत्यनारायण मंदिरात पहायला मिळते…..)
६) कनकादित्य मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याआगोदर दरवाजाच्या वर शेषशायी विष्णूची लाकडात कोरलेली मूर्ती पहायला मिळते… एवढी मोठी आणि तीही लाकडात अन्यत्र पाहयला मिळत नाही. या मूर्तीजवळ गरूड आणि लक्ष्मी आहे. तसेच या मूर्तीच्या वरील बाजूस दशावतार कोरलेले आहेत…..
७) प्रत्यक्ष कनकादित्याची मूर्ती काळ्या पाषाणातील मूर्ती अत्यंत सुभक आणि देखणी आहे… या मूर्तीचे पूर्णरूप पहायचे असेल, तर पहाटेच्या पूजेच्या (काकड आरतीवेळी) पहायला मिळते. आवर्जून पहाण्यासारखे आहे…..
८) कनकादित्य मंदिरात सुमारे ८५० वर्षापूर्वीचा ताम्रपट आहे… सध्या सुरक्षितेच्या कारणामुळे बॕकेच्या लाॕकरमध्ये ठेवण्यात आला आहे. तीन जाड पत्रे एका कडीत ओवलेली ही ताम्रपट आहेत. पहिल्या पत्यावर गाय, वासरू, तलवार आणि चंद्र- सूर्य कोरलेल्या आहेत…. या दानपत्रात द्वितीय भोजराजाचा ४४ ओळीचा संस्कृत लेख कोरलेला आहे. तसेच शिलाहार राजांची वंशावळ दिली आहे. तिसऱ्या पत्राच्या मागील बाजूस मराठीत एक लेख आहे, पण तो अस्पष्ट आहे जाणकार म्हणतात हा लेख बनावट आहे. या ताम्रपटात शिलाहार वंशीय द्वितीय भोजराजाने अट्टविर (अत्ताचे आडिवरे) भागातील कशेळी गाव बारा ब्राम्हणांच्या प्रतिदिन भोजनासाठी दान दिले असा उल्लेख आढळतो…..
९) कशेळी गावाने महाराष्ट्राला अनेक रत्ने दिली आहेत: थोर समाजसुधारक राजाराम शास्त्री भट (प्रसिद्ध कवियत्री दुर्गा भागवत यांच्या आजीचे सख्खे बंधू) प्रसिद्ध इतिहासकार त्रंयबक शंकर शेजवलकर (निजाम- पेशवा संबध, श्री शिवछत्रपती, सर्वात गाजलेले पुस्तक पानिपत:१७६१) थोर साहित्यिक वि.सी.गुर्जर (लाजाळूचे झाड हे कथा संग्रह प्रसिद्ध आहे)