श्री क्षेत्र बसवकल्याण (Shri Kshetra Basavakalyan)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

श्री क्षेत्र बसवकल्याण (Shri Kshetra Basavakalyan)

बसवकल्याण हे क्षेत्र सोलापूरपासून ११० कि. मी. अंतरावर हैदराबाद मार्गावर सस्तापूर फाटय़ाजवळ आहे… हे एक अत्यंत पुरातन असे श्रीदत्त क्षेत्र आहे. या मंदिराला भुयारी समाधी मंदिर असेच म्हणावे लागेल. या दत्त संप्रदायाला आनंद संप्रदाय असे म्हणतात…..

असे सांगितले जाते की द्वापारयुगाच्या समाप्तीनंतर जेव्हा कलियुगाची सुरुवात झाली तेव्हा पाच पांडव द्रौपदीसह बद्रीनाथकडे निघून गेले… अभिमन्युचा मुलगा परीक्षित आणि त्याचा मुलगा जन्मेजय याने एक मोठा यज्ञ केला. तेव्हा त्या यज्ञातून एक बालक बाहेर पडले. ते अत्यंत हसतमुख आणि अतिशय आनंदी वृत्तीचे होते. त्यांच्या सतत आनंदी राहण्याच्या वृत्तीने त्यांना सदानंद असे म्हणू लागले…..

श्रीदत्तप्रभूंनीच कलियुगाच्या प्रारंभी श्रीसदानंद या रूपाने जन्म घेतला अशी श्रद्धा आहे… या सदानंदांनी बालपणीच अतिशय उग्र तपश्चर्या करून श्रीशंकराला प्रसन्न करून घेतले. त्यानंतर शंकरांनी त्याला आज्ञा केली तू पश्चिमेकडे जा. तुझी अवधूतांबरोबर भेट होईल. तेच तुझे गुरू आणि मार्गदर्शक होतील. तेव्हा सदानंदाने विचारले की, मी त्यांना कसे ओळखू शकेन? तेव्हा त्यांनी सांगितले की, तू प्रत्येक हजार पावले टाकल्यावर ‘अहो, श्रीदत्ता’ अशी गर्जना कर. ज्या ठिकाणी तुला प्रतिसाद मिळेल त्या ठिकाणी तू तपश्चर्येला बस. तिथेच तुला अवधूतांचे दर्शन होईल.

शंकराच्या आज्ञेप्रमाणे श्रीसदानंद पश्चिमेकडे मजल दरमजल करीत चालू लागले… प्रत्येक हजार पावलांवर ते दत्तात्रेयांचा गजर करीत होते. असे फिरत फिरत ते बसवकल्याण नगरीत आले. या ठिकाणी श्रीदतात्रेयांचा त्यांना प्रतिसाद मिळाला. अशी कथा सांगितली जाते. त्यांनी तिथे तपश्चर्या सुरू केली. तिथेच त्यांना श्रीदत्तात्रेयांचे दर्शन झाले आणि त्यांनी सदानंदांवर पूर्ण कृपा केली अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यांनी कल्याण येथे आनंद संप्रदायाची स्थापना केली…..

श्रीसदानंदांचे शिष्य श्रीरामानंद यांनी हा संप्रदाय पुढे वाढवला आहे… ती परंपरा अजूनही सुरू आहे. या संप्रदायाची गुरू परंपरा, विष्णू – विधी – अत्री – दत्त – सदानंद – रामानंद अशा प्रकारे पुढे सांगतात…..

श्री बसवकल्याण हे एक विलक्षण दत्तक्षेत्र असून तेथे ४८ समाधी आहेत आणि इतर ठिकाणी असलेल्या ३० अशा एकूण ७८ मठाधीशांच्या समाधी आहेत… एकूण नऊ भुयारे आहेत. एखाद्या गढीसारखे हे मंदिर असून प्रत्येक भुयारामध्ये अनेक मठाधीशांच्या समाधी आहेत. या भुयारांमध्ये आत उतरून गेल्यावर त्या समाध्या पाहून अक्षरश: थक्क व्हायला होते. अतिशय आनंद होतो आणि विलक्षण अनुभूती येतात. या क्षेत्राचे विशेष म्हणजे येथे सदानंद महाराजांची संजीवन समाधी आहे. तसेच येथे श्रीदत्त पीठ आणि श्रीसरस्वती पीठ एकाच ठिकाणी आहे…..

अतिशय जागृत असे हे सरस्वती पीठ असून सरस्वती माता पूर्वी बोलत असे… शंकराचार्य जेव्हा येथे आले आणि त्यांनी तिचे दर्शन घेतले तेव्हा तिने त्यांच्यावर पूर्ण कृपा केली. त्यानंतर तिचे बोलणे थांबले आणि श्रीशंकराचार्यानी प्रचंड लिखाण केले, अशी आख्यायिका आहे…..

या ठिकाणी श्रीगणपतीची एक ‘सुमुख गणेशमूर्ती’ आहे… श्रीगणेशाच्या जन्म कथेनुसार शंकराकडून त्याचा शिरच्छेद झाला आणि तेथे नंतर हत्तीचे मुख लावण्यात आले. शिरच्छेदापूर्वीची श्रीगणेशाची विलक्षण सुंदर मूर्ती येथे आहे. श्रीदत्तात्रेयांचे पीठ ही असून तेथे श्रीदत्तपादुका आहेत. मुख्य मंदिरामागे औदुंबराचा वृक्ष असून भुयारामध्ये अत्यंत विलक्षण अशा ‘श्रीशेषदत्त पादुका’ आहेत. शेषनागाच्या उदरामध्ये पादुका असे कदाचित हे एकमेव क्षेत्र आहे. या पादुका उत्तम अवस्थेमध्ये असून त्यांच्या दर्शनाने मन तृप्त होते

या क्षेत्रातील मठाधीश पूर्णत: प्रसिद्धिपराङ्मुख असून या क्षेत्राची फारसी माहिती दत्तभक्तांना नाही… प्रत्येक दत्तभक्ताने येथे जाऊन दर्शन घेतले पाहिजे. या ठिकाणी राहण्यासाठी भक्तनिवास आणि भोजनप्रसादाची नि:शुल्क व्यवस्था आहे…..

हे आनंद संप्रदायाचे एक मुख्य पिठ आहे.

Recent Post

श्री नृसिंहसरस्वती स्वामी दत्त देवस्थान नरसोबा वाडी (श्री दत्तांची राजधानी नृसिंहवाडी) Shri Nrusimha Saraswati Swami Datta Devasthan Narasoba Wadi

उजनी धरणातील लपलेले रत्न – पळसनाथ मंदिर (Palasnath Mandir)

काळाराम मंदिर पंचवटी (Kalaram Temple Panchavati)

शिखर शिंगणापूर (shikhar shingnapur)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )