जाणून घ्या सीताफळ लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Sitaphal Lagwad Mahiti Sitaphal Sheti) – Sitaphal Farming

सीताफळ लागवड । Sitaphal Lagwad । Sitaphal Sheti । सीताफळ पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । सीताफळ लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन । सीताफळ लागवडीस हवामान । सीताफळ लागवडीस जमीन । सीताफळ पिकाच्या सुधारित जाती । सीताफळ पीक अभिवृद्धी । सीताफळ पीक लागवड पद्धती । सीताफळ पिकाचा हंगाम आणि सीताफळ पिक लागवडीचे अंतर । सीताफळ पिकास वळण । सीताफळ पिकास छाटणीच्या पद्धती । सीताफळ पिकास खत व्यवस्थापन । सीताफळ पिकास पाणी व्यवस्थापन । सीताफळ पिकातील आंतरपिके व सीताफळ पिकातील तणनियंत्रण । सीताफळ पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । सीताफळ पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । सीताफळ पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री । सीताफळ पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

सीताफळ लागवड : Sitaphal Lagwad : Sitaphal Sheti :

सीताफळ हे अत्यंत काटक फळझाड आहे. या फळझाडाचे एक वैशिष्ट्य म्हणजे शेळ्या, मेंढ्या, जनावरे किंवा इतर कोणतेही प्राणी या झाडाची पाने खात नसल्यामुळे संरक्षण न करताही या फळझाडाची जोपासना सहज होऊ शकते. त्यामुळे बागेत कुंपणाच्या बाजूने या फळझाडांची लागवड करणे फायदेशीर ठरते. या झाडाचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे या झाडावर नुकसानकारक रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात होतो. तसेच हे झाड उभट वाढणारे आणि आकाराने लहान असल्यामुळे हेक्टरी झाडांची संख्या जास्त राहून उत्पादनही जास्त मिळते. शहरी बाजारपेठेत सीताफळाला चांगली मागणी आहे. या फळझाडाला सुरुवातीच्या एक-दोन वर्षांच्या काळात पाणी दिल्यानंतर पुढे केवळ पावसाच्या पाण्यावर या झाडाची वाढ चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे उष्ण आणि कोरडे हवामान असणाऱ्या भागात अथवा दुष्काळी भागात हलक्या, बरड आणि डोंगर- उताराच्या जमिनीत सीताफळाच्या लागवडीस भरपूर वाव आहे.

सीताफळ पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार :

भारतात सीताफळाची लागवड फार पुरातन काळापासून होत आहे. ऐन-ए-अकबरीत सीताफळाचा उल्लेख आहे. अजंठा व वेरूळ येथील लेण्यांमधील या फळांच्या नक्षीकामावरून आणि संस्कृत वाङ्मयातील या फळांच्या उल्लेखावरून असे दिसून येते की, ही फळे भारतात प्राचीन काळापासून ओळखली जातात. परंतु या फळांचे उगमस्थान दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील उष्ण कटिबंधीय भागातील आहे.
सीताफळ हे गोड फळ असून या फळामध्ये शर्करा, प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते. सीताफळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालीलप्रमाणे अन्नघटक असतात.

अन्नघटकप्रमाण (%)अन्नघटकप्रमाण (%)
पाणी71.0चुना (कॅल्शियम)0.02
शर्करा (कार्बोहायड्रेट्स)24.0स्फुरद (फॉस्फरस)0.05
प्रथिने (प्रोटीन्स)1.6लोह0.002
स्निग्धांश (फॅट्स)0.4जीवनसत्त्व ‘क’0.04
खनिजे0.9उष्मांक (कॅलरी)104
तंतुमय पदार्थ3.1
सीताफळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागातील अन्नघटकांचे प्रमाण

ताजी पक्व सीताफळे खाण्यासाठी वापरतात. सीताफळातील शुभ्र पांढऱ्या रंगाच्या गराचा उपयोग आइस्क्रीममध्ये करतात. सीताफळापासून जाम, जेली, इत्यादी टिकाऊ पदार्थ तयार करता येतात.
सीताफळाच्या पानांमध्ये अँकोरिन आणि अनोनीन ही कीटकनाशक अल्कलॉईड द्रव्ये असतात. या झाडाच्या अवयवांत हायड्रोसायनिक आम्ल असते. त्यामुळे सीताफळाच्या झाडाला वाळवी लागत नाही. सीताफळाच्या बियांपासून तेल काढतात. या तेलाचा उपयोग साबण बनविण्यासाठी करतात. सीताफळाच्या बियांपासून निघालेल्या पेंडीचा ( ढेपेचा) वापर खत म्हणून करतात.
सीताफळाची लागवड ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, म्यानमार, चिली, इजिप्त, इस्त्राईल, मेक्सिको, फिलिपाईन्स, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, अमेरिका, भारत, इत्यादी देशांमध्ये केली जाते.

भारतामध्ये आसाम, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि बिहार ह्या राज्यांत व्यापारी तत्त्वावर सीताफळाची लागवड केली जाते. महाराष्ट्रात जळगाव, बीड, नगर, परभणी, औरंगाबाद, नाशिक, सोलापूर, पुणे आणि भंडारा या जिल्ह्यांत सीताफळाची लागवड दिसून येते. विदर्भ विभागात पवनी, भंडारा, गोंदिया, वाशीम, माहूर, इत्यादी भाग सीताफळांकरिता प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातील धारूर आणि बालाघाट ही गावे सीताफळासाठी प्रसिद्ध आहेत. पुणे जिल्ह्यात दिवा, फुरसुंगी, सासवड, थेऊर या भागात उत्कृष्ट सीताफळांच्या बागा आहेत.

सीताफळ लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन :

भारतात सीताफळाच्या पिकाखाली एकूण 45,000 हेक्टर क्षेत्र असून सर्वांत जास्त क्षेत्र आंध्र प्रदेशात असून आंध्र प्रदेशातील एकट्या हैद्राबाद विभागातील सीताफळाखालील क्षेत्र 40,000 हेक्टर आहे. त्यानंतर महाराष्ट्र (500 हेक्टर), मध्य प्रदेश, कर्नाटक आणि आसाम या राज्यांचा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात अहमदनगर, पुणे, चंद्रपूर, नागपूर आणि औरंगाबाद या जिल्ह्यांत प्रामुख्याने सीताफळाची लागवड आहे. महाराष्ट्रातील सीताफळाची उत्पादकता हेक्टरी 5.5 टनांची आहे.

सीताफळ लागवडीस हवामान आणि सीताफळ लागवडीस जमीन :

सीताफळाच्या झाडाला उष्ण व कोरडे हवामान आणि मध्यम अथवा कमी हिवाळा मानवतो. अशा हवामानात सीताफळाच्या झाडाची वाढ चांगली होऊन फळांची गोडी वाढते. दमट हवामान असलेल्या कोकण भागातही सीताफळाचे झाड चांगले वाढते. परंतु अशा हवामानात डिसेंबर ते फेब्रुवारी ह्या काळात सीताफळाच्या झाडाची पानगळ होऊन झाड सुप्तावस्थेत जाते. दमट हवामानात सीताफळाच्या झाडाची पानगळ होत नाही. मात्र कडक थंडी आणि धुके सीताफळाच्या झाडाला सहन होत नाही. सीताफळाच्या झाडाला फुले येण्याच्या काळात कोरडी हवा आवश्यक असते. सीताफळाचे झाड दुष्काळी भागातसुद्धा चांगले तग धरून राहू शकते.
सीताफळाचे झाड कोणत्याही जमिनीत चांगले वाढते. या झाडाची लागवड लाल, रेताड, खडकाळ, वाळूमय आणि गाळवट रेताड जमिनीत करता येते. भारी काळ्या आणि पाणी साठून राहणाऱ्या अल्कलीयुक्त जमिनीत सीताफळाची लागवड करू नये.

सीताफळ पिकाच्या सुधारित जाती :

सीताफळाची लागवड प्रामुख्याने बियांपासून केली जात असल्यामुळे सीताफळाच्या रोपांमध्ये विविधता दिसून येते. त्यामुळे सीताफळाच्या ठारावीक जाती उपलब्ध नाहीत. सीताफळाचे हिरवट पिवळसर आणि लालसर असे दोन प्रकार आहेत. हिरवट पिवळसर सीताफळाच्या बाळानगर, वॉशिंग्टन, बार्बाडोझ, मेमॉथ, इत्यादी नवीन सुधारित जाती फळ संशोधन केंद्र, संगारेड्डी (आंध्र प्रदेश) येथे उपलब्ध आहेत. या जातीची फळे आकाराने मोठी असून फळात गराचे प्रमाण जास्त तर बियांचे प्रमाण कमी असते. त्याचप्रमाणे गरामध्ये साखरेचे प्रमाण जास्त आहे. महाराष्ट्रात बाळानगर ह्या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. अलीकडेच राहुरी कृषी विद्यापीठात बुलक हार्ट ही जात चाचणीदाखल लागवड केली असून या जातीस चांगला वाव राहील असे वाटते.

सीताफळ पीक अभिवृद्धी आणि सीताफळ पीक लागवड पद्धती :

सीताफळाची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून केली जाते किंवा शाखीय पद्धतीनेही करता येते. बियांपासून तयार केलेल्या रोपांचे गुणधर्म एकसारखे नसतात, तसेच या रोपांपासून मिळणाऱ्या फळांची गुणवत्ता आणि उत्पादन यांमध्ये फरक दिसून येतो. शाखीय पद्धतीने भेटकलम करून किंवा डोळे भरून सीताफळाची अभिवृद्धी करता येते. भेटकलम करण्यासाठी रामफळ हा खुंट वापरावा. डोळे भरण्यासाठी देशी सीताफळाचा खुंट वापरावा. बियांपासून लागवड करताना उत्कृष्ट दर्जाची, भरपूर आणि मोठ्या आकाराची फळे देणारी झाडे निवडावीत. अशा निवडक झाडांच्या मोठ्या आकाराच्या फळातील बी काढून घेऊन पावसाळा सुरू झाल्यावर पेरावे. बियांची पेरणी करण्यापूर्वी बी 3 दिवस पाण्यात भिजत ठेवावे. त्यामुळे बियांची उगवण लवकर होते. फळांतून काढल्यानंतर बियांची लगेच पेरणी केल्यास 15 दिवसांत बियांची उगवण होते. परंतु बियांची 3 ते 4 महिन्यांनंतर पेरणी केल्यास उगवणीसाठी 30 दिवसांचा कालावधी लागतो. प्रत्येक खड्ड्यात 10 सेंटिमीटर अंतरावर 3 ते 4 बिया लावाव्यात. रोपे मोठी झाल्यावर प्रत्येक खड्ड्यात एकच जोमदार वाढणारे रोप ठेवून बाकीची रोपे हळूवारपणे उपटून टाकावीत. पॉलिथीन पिशवीत फेब्रुवारी महिन्यात बिया टाकून रोपे तयार करता येतात. पावसाळयाच्या सुरुवातीला या रोपांची कायम जागी लागवड करावी. वाफ्यामध्ये रोपे तयार करून सीताफळाची लागवड करता येणे शक्य आहे.

सीताफळ पिकाचा हंगाम आणि सीताफळ पिक लागवडीचे अंतर :

सीताफळाच्या लागवडीसाठी पावसाळ्यापूर्वी 0.5 x 0.5 x 0.5 मीटर आकाराचे खड्डे घ्यावेत. सीताफळाच्या दोन झाडांमधील आणि झाडांच्या दोन ओळींमधील अंतर जमिनीच्या मगदुराप्रमाणे कमी-जास्त ठेवावे. नापीक, खडकाळ, माळरान किंवा ओसाड जमिनीत 3 x 3 मीटर अंतरावर, काही प्रमाणात खरीप पिके घेता येतील अशा माळरान जमिनीत 3.5 x 3.5 मीटर अंतरावर, वरच्या 15 सेंटिमीटरपर्यंत थरात माती आणि त्याखाली मरूम असलेल्या जमिनीत 4×4 मीटर अंतरावर, कसदार मध्यम किंवा भारी जमिनीत 4.5 x4.5 मीटर अंतरावर सीताफळाची लागवड करावी. लागवडीपूर्वी खड्डे शेणखत, पोयटा माती, पालाचोळा अधिक 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट यांच्या मिश्रणाने भरून घ्यावेत. प्रत्येक खड्ड्यात 100 ग्रॅम पावडर (10%) मिसळावी. नंतर एकदोन पाऊस पडल्यानंतर रोपे खड्ड्यात लावावीत आणी रोपांना पाणी द्यावे.

सीताफळ पिकास वळण आणि सीताफळ पिकास छाटणीच्या पद्धती :

सीताफळाच्या झाडांना नियमित छाटणी करण्याची आवश्यकता नसते. परंतु झाडाला योग्य वळण देण्यासाठी झाडाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात हलक्या छाटणीची आवश्यकता असते. सुरुवातीलाच झाडाची छाटणी न केल्यास जमिनीपासून अनेक फांद्या निघून झुडूप तयार होते. म्हणून मुख्य खोड ठेवून जमिनीपासून निघणारे फुटवे काढून टाकावेत. झाडाची छाटणी करताना जमिनीपासून 1 मीटरपर्यंत खोडावरील फुटवे काढून त्याच्या वर चारी दिशांना फांद्या विखुरलेल्या राहतील अशा ठेवाव्यात. जुन्या, वाळलेल्या, अनावश्यक आणि दाटी करणाऱ्या फांद्या काढून टाकाव्यात. बागेत भरपूर सूर्यप्रकाश आणि खेळती हवा राहील याची काळजी घ्यावी.

सीताफळ पिकास खत व्यवस्थापन आणि सीताफळ पिकास पाणी व्यवस्थापन :

सीताफळाच्या झाडाला सर्वसाधरणपणे नियमित खते दिली जात नाहीत; मात्र मोठ्या आकाराची फळे आणि भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी पावसाळा सुरू होताच सीताफळाच्या प्रत्येक झाडाला उपलब्धतेनुसार 10 ते 15 किलो चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत द्यावे. लागवडीनंतर पहिली 4 ते 5 वर्षे सीताफळाच्या प्रत्येक झाडाला 75 ते 100 ग्रॅम युरिया द्यावे. पाच वर्षांनंतर प्रत्येक झाडाला 50 किलो शेणखत, 250 ग्रॅम नत्र, 125 ग्रॅम स्फुरद आणि 125 ग्रॅम पालाश द्यावे. पावसाळ्यात हिरवळीचे खत घेऊन ते पीक फुलावर येताच मातीत गाडावे.

सीताफळच्या झाडाला लागवडीनंतर सुरुवातीलाच तीन-चार वर्षे उन्हाळयात पाणी द्यावे. त्यानंतर झाडाला पाणी देण्याची आवश्यकता नसते. नियमित आणि भरपूर उत्पादनासाठी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये सीताफळाच्या झाडाला फळधारणेनंतर पाण्याच्या 1 ते 2 पाळ्या देणे फायदेशीर ठरते. त्यामुळे फळे आकाराने मोठी होतात. फळांची वाढ होत असताना पावसाचा ताण पडून नंतर भरपूर पाऊस झाल्यास फळांना तडे पडतात. पूर्ण वाढ न झालेली, अपक्व फळे काळी पडून टणक बनतात. अशा वेळी पिकाला पाण्याचा योग्य पुरवठा करावा.

सीताफळ पिकातील आंतरपिके व सीताफळ पिकातील तणनियंत्रण :

सीताफळाची लागवड हलक्या जमिनीत केली जात असल्यामुळे अशा जमिनीचा पोत व कस टिकविण्यासाठी लागवडीनंतर सुरुवातीलाच दोन-तीन वर्ष खरीप हंगामात तूर, चवळी, भुईमूग, सोयाबीन, श्रावण घेवडा, कुळीथ, हरबरा, जवस, स्टायलो यांसारखी आंतरपिके घेणे फायदेशीर ठरते. मात्र सीताफळाच्या झाडापेक्षा उंच वाढणारी मका, ज्वारी, बाजरी यांसारखी पिके आंतरपिके म्हणून घेऊ नयेत.

बागेतील तण हे अन्नद्रव्ये, पाणी, सूर्यप्रकाश, हवा यांसाठी सीताफळाच्या झाडांशी स्पर्धा करते. त्यामुळे सीताफळांचे उत्पादन कमी होते. म्हणून वेळोवेळी खुरपणी करून तणे काढून टाकावीत. ताग, धैंचा यांसारखी पिके सीताफळाच्या झाडांमधील मोकळया जागेत घेतल्यास तणांच्या वाढीस प्रतिबंध होतो आणि या पिकांचा हिरवळीची खते म्हणूनही उपयोग होतो. आच्छादन आणि तणनाशके वापरूनही तणनियंत्रण करता येते.

सीताफळ पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण :

सीताफळाचे झाड काटक असल्यामुळे आणि सीताफळाच्या झाडामध्ये कीटकनाशक अल्कलाइड द्रव्ये असल्यामुळे सीताफळाच्या झाडांवर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात होतो.

पिठ्या ढेकूण (मिलिबग्ज) :

ही कीड पाने, कोवळ्या फांद्या, कळया आणि कोवळी फळे यांतून रस शोषून घेते. त्यामुळे पानांचा व फळांचा आकार वेडावाकडा होतो. कळ्यांची आणि फळांची गळ होते. सीताफळाच्या फळांची वाढ होत असताना पृष्ठभागांच्या भेगांमध्ये किडीचा प्रादुर्भाव झाल्यास ही कीड फळातील रस शोषून घेते. अशा फळांना बाजारात किंमत मिळत नाही. पावसाळयानंतर या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या किडीच्या अंगातून स्रवणाऱ्या मधासारख्या चिकट पदार्थावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे झाडाची पाने काळी पडून पानांची प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते.

उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 10 मिलिलीटर मॅलेथिऑन (50% प्रवाही) अथवा 3 मिलिलीटर फॉस्फोमिडॉन (डिमेक्रॉन 100 % प्रवाही) या प्रमाणात मिसळून फवारावे.
जून-जुलै महिन्यात या किडीची पिले खोडावरून झाडावर चढतात. अशा वेळी 15 ते 20 सेंटिमीटर रुंदीची प्लॅस्टिकची पट्टी घेऊन त्याला ग्रीस लावावे. ही पट्टी ग्रीस वरच्या बाजूला लावून सर्व बाजूंनी बांधून घ्यावी; त्यामुळे खालून वर चढणारे किडे ग्रीसला चिकटून मरून जातात.

सीताफळ पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण :

पानावरील ठिपके :

सीताफळावर या रोगाचा प्रादुर्भाव प्रामुख्याने नोव्हेंबर महिन्यात दिसून येतो. या रोगामुळे पानांवर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. पानांची पूर्ण वाढ होण्यापूर्वीच पाने गळून पडतात.

उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 ग्रॅम बेनोमील 10 लीटर पाण्यात या प्रमाणात मिसळून फवारावे.

सीताफळ पिकावरील शारीरिक विकृती आणि त्यांचे नियंत्रण :

फळे काळी पडणे :

सीताफळाची फळे झाडावरच काळी पडून वाळतात. ही फळे पिकत नाहीत, त्यामुळे बरेच नुकसान होते. उत्तम मशागत आणि भरपूर सेंद्रिय खतांचा पुरवठा केल्यास या विकृतीचे प्रमाण कमी होते. रोगाचे प्रमाण जास्त आढळून आल्यास झाडावरील रोगट फळे काढून टाकावीत आणि झाडावर 50% ताम्रयुक्त औषधांची फवारणी 3 आठवड्यांच्या अंतराने 2-3 वेळा करावी.

फळे कडक होणे (स्टोन फ्रुट्स् ) :

या विकृतीमध्ये सीताफळाच्या फळांची पूर्ण वाढ होत नाही. अशी पूर्ण वाढ न झालेली फळे आकाराने लहान राहतात, कडक होतात आणि त्यांचा रंग काळसर तपकिरी होतो. ही फळे, इतर फळांची काढणी पूर्ण होऊन झाड सुप्तावस्थेत गेल्यानंतरही झाडावर तशीच राहतात. या विकृतीचे निश्चित कारण आणि त्यावरील उपाययोजना याबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. परंतु फळवाढीच्या काळात फळे अन्नरसासाठी एकमेकांशी स्पर्धा करतात. त्यामुळे अन्नरसाचा तुटवडा भासणाऱ्या फळांमध्ये ही विकृती निर्माण होते. म्हणूनच फळवाढीच्या काळात झाडाला योग्य प्रमाणात खते आणि पाणीपुरवठा करावा.

कमी फळधारणा होणे :

सीताफळवर्गीय फळझाडांमध्ये फळधारणा न होणे हा एक महत्त्वाचा दोष आढळून येतो, किंवा काही वेळा अतिशय कमी प्रमाणात फळधारणा होते. सीताफळामध्ये फेब्रुवारीपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत फुलांचे बहार येत असतात. परंतु त्यातील फारच थोड्या फुलांमध्ये फळधारणा होते. सीताफळामध्ये नैसर्गिक फळधारणा पाऊस पडल्यानंतर म्हणजेच जून महिन्यात सुरू होते. सर्वसाधारणपणे 20 ते 30% नैसर्गिक फळधारणा होते. फळधारणेनंतर होणारी फळगळ लक्षात घेता फारच थोडी फळे काढणीसाठी तयार होतात.

कमी फळधारणेचे प्रमुख कारण म्हणजे सीताफळाच्या फुलांतील पुंकेसर आणि स्त्री-बीजांड एकाच वेळी तयार होत नसल्यामुळे स्वतंत्र फुलात स्वपरागसिंचन होऊ शकत नाही. सीताफळाच्या फुलातील अनेक परागकण वांझ असतात, त्यामुळे त्यांचा उपयोग फलधारणेसाठी होत नाही. जास्त उष्णता आणि कमी आर्द्रतेच्या हवामानात वांझ परागकणांचे प्रमाण जास्त असते. याच कारणामुळे उन्हाळयात या फळझाडांना जरी फुले येत असली तरी फळधारणा होऊ शकत नाही. सीताफळाच्या फुलांना वास आणि आकर्षक रंगही नसतो. म्हणून परागसिंचनासाठी मदत करणारे कीटक या फुलांकडे आकर्षित होत नाहीत. यावर उपाय म्हणून परागीकरणासाठी बागेत मधमाश्यांच्या पेट्या ठेवाव्यात त्यामुळे फळधारणा वाढविता येते. सीताफळाची फळगळ होऊ नये म्हणून फुले येण्यास सुरुवात झाल्यानंतर 10 पी. पी. एम. तीव्रतेच्या प्लॅनोफिक्स या संजीवकाचे द्रावण फवारावे.

सीताफळ पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री :

सीताफळाच्या कलमी झाडांना लागवडीनंतर चौथ्या वर्षी फळे लागतात तर बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडांना लागवडीनंतर सहाव्या वर्षापासून फळे लागतात. सुरुवातीच्या दोन-तीन वर्षांत झाडाला कमी फळे लागतात. जसजसे झाडाचे वय वाढते तसतसे उत्पादनही वाढते. सर्वसाधारणपणे 6 ते 7 वर्षे वयाच्या झाडाला 50 ते 60 फळे लागतात तर 9 ते 10 वर्षांनंतर प्रत्येक झाडाला सरासरी 100 ते 150 फळे येतात.

सीताफळाच्या झाडांना जून-जुलैमध्ये फुले येण्यास सुरुवात होते. फुले आल्यापासून फळे तयार होण्यास साधारणपणे 5 महिन्यांचा कालावधी लागतो. फळे सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये तयार होतात. सीताफळाची योग्य वेळी काढणी करावी. पक सीताफळे झाडावर जास्त काळ राहू दिल्यास फळांना तडे पडतात आणि फळे कुजू लागतात. स्थानिक जातीच्या सीताफळाचे दोन प्रकार आढळतात. एका प्रकारच्या सीताफळाच्या पृष्ठभागावर भेगा आणि आतील गर पिवळसर रंगाचा असतो

तर दुसऱ्या प्रकारच्या सीताफळाच्या पृष्ठभागावरील भेगा आणि गर पांढऱ्या रंगाचा असतो. यापैकी पिवळसर गर असलेले सीताफळ उत्कृष्ट समजले जाते. सीताफळाच्या फळांचे डोळे उघडून दोन डोळ्यांमधील भाग पिवळसर रंगाचा दिसू लागल्यावर फळे काढणीस तयार झाली असे समजावे. फळांची काढणी केल्यानंतर फळे 3-4 दिवसांत नरम पडून खाण्यायोग्य होतात. सीताफळाची फळे नाशवंत असल्यामुळे काढणीनंतर जास्त दिवस टिकत नाहीत. म्हणूनच काढणीनंतर शक्य तितक्या लवकर फळांची विक्री करावी.

सीताफळ पिकाच्या फळांची साठवण आणि पिकविण्याच्या पद्धती :

सीताफळाची फळे काढणीनंतर 3 ते 4 दिवस टिकतात. फळांच्या काढणीनंतर फळांची प्रतवारी करावी. त्यानंतर बांबूच्या करंड्यंत खालीवर कडूलिंबाचा पाला घालून त्यांत फळे व्यवस्थित भरून विक्रीसाठी पाठवावीत.
शीतगृहात सीताफळे साठविल्यास फळांची साल तपकिरी काळपट होऊन फळांचा दर्जा कमी होतो. म्हणून सीताफळांची शीतगृहात साठवण करू नये. सीताफळाच्या फळांना 6% मेणाचा लेप दिल्यास सीताफळे 7 दिवसांपर्यंत चांगली राहतात.

सारांश :

सीताफळाची फळे फार पूर्वीपासून भारतात प्रचलित आहेत. सीताफळाच्या फळांना अतिशय चांगला स्वाद आणि चव असते. सीताफळाचे झाड अत्यंत काटक असून कोणत्याही प्रकारच्या जमिनीत सीताफळाची लागवड करता येते. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत सीताफळाची लागवड केली जाते. सीताफळाच्या झाडावर रोग आणि किडींचा प्रादुर्भाव अतिशय कमी प्रमाणात होतो आणि फळांचे उत्पादनही भरपूर मिळते. सुरुवातीच्या काळात सीताफळाच्या झाडाला हलक्या छाटणीची आवश्यकता असते. सीताफळाची फळे नाशवंत असल्यामुळे काढणीनंतर फळांची लगेच विक्री करावी. सीताफळाची फळे जास्त दिवस साठवून ठेवता येत नाहीत.

जाणून घ्या अंजीर लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Anjir Lagwad Mahiti Anjir Sheti) – Anjir Farming

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )