जाणून घ्या स्ट्रॉबेरी लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Strawberry Lagwad Mahiti Strawberry Sheti) – Strawberry Farming

स्ट्रॉबेरी लागवड | Strawberry Lagwad | Strawberry Sheti | स्ट्रॉबेरी पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार | स्ट्रॉबेरी पिक लागवडीखालील क्षेत्र | स्ट्रॉबेरी पिक उत्पादन | स्ट्रॉबेरी पिकासाठी योग्य हवामान | स्ट्रॉबेरी पिकासाठी योग्य जमीन | स्ट्रॉबेरी पिकाच्या सुधारित जाती | स्ट्रॉबेरी पिकाची अभिवृद्धी, रोपांची निवड | स्ट्रॉबेरी पिकाची लागवड पद्धती | स्ट्रॉबेरी पिकासाठी योग्य हंगाम | स्ट्रॉबेरी पिकासाठी लागवडीचे अंतर | स्ट्रॉबेरी पिकास खत व्यवस्थापन | स्ट्रॉबेरी पिकास पाणी व्यवस्थापन | स्ट्रॉबेरी पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण | स्ट्रॉबेरी पिकावरील महत्त्वाच्या विकृती आणि त्यांचे नियंत्रण | स्ट्रॉबेरी पिकातील आंतरमशागत | स्ट्रॉबेरी पिकातील तणनियंत्रण | स्ट्रॉबेरी पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री | स्ट्रॉबेरी पिकाच्या फळांची साठवण | स्ट्रॉबेरी फळे पिकविण्याच्या पद्धती | स्ट्रॉबेरी पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण |

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

स्ट्रॉबेरी लागवड | Strawberry Lagwad | Strawberry Sheti |

स्ट्रॉबेरीची लागवड पूर्वी मर्यादित क्षेत्रावर आणि ठरावीक ठिकाणीच होत असे. पण अलीकडेच या पिकाची लागवड इतर ठिकाणीही होऊ लागली आहे. महाराष्ट्रात स्ट्रॉबेरीच्या फळाभोवती आकर्षणाचे वलय निर्माण झाले आहे; कारण या फळाचे नावीन्य, या फळातील पोषणमूल्ये आणि आपल्या देशात आणि देशाबाहेर या फळाला असलेली मागणी यांमुळे सर्वसामान्य शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळू लागले आहेत. स्ट्रॉबेरीच्या फळझाडाची उत्पादकता आणि फळांची काढणीनंतर टिकून राहण्याची क्षमता कमी आहे.

स्ट्रॉबेरी पिकाचे उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार |

समशीतोष्ण कटिबंध हे स्ट्रॉबेरीचे उगमस्थान मानले जाते. युरोपातील जंगली भागात स्ट्रॉबेरीची झाडे प्रथम दिसून आली. 30 सेंमी. पेक्षा कमी उंच वाढणाऱ्या, खोड आणि बुंधा जवळजवळ नसलेल्या झाडाला आकर्षक लाल रंगाची आणि आंबट-गोड स्वादिष्ट फळे येतात. स्ट्रॉबेरीच्या काही जाती कॅनडा, व्हर्जिनिया आणि चिली या देशांमध्येही आढळून येतात. स्ट्रॉबेरीचा प्रसार कॅलिफोर्निया, कॅनडा, मेक्सिको, फ्रान्स, इंग्लंड, जर्मनी, स्पेन, रशिया, नॉर्वे, नेदरलँड, ऑस्ट्रेलिया, हंगेरी, इत्यादी देशांत मोठ्या प्रमाणावर झाला आहे. बहुतेकजण स्पेन हे उगमस्थान मान्य करतात.
भारतामध्ये नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेता येते. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या ताज्या फळांना युरोपीय देशांत निर्यातीसाठी भरपूर वाव आहे.
स्ट्रॉबेरीच्या फळामध्ये कार्बोहायड्रेट्स्, जीवनसत्त्व ‘क’, ‘ब’ आणि कॅल्शियम, लोह, स्फुरद, इत्यादी अन्नघटक भरपूर प्रमाणात असतात. स्ट्रॉबेरीच्या फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात खालीलप्रमाणे अन्नघटक असतात.

अन्नघटकप्रमाण (%)अन्नघटकप्रमाण (%)
पाणी89.0शर्करा (कार्बोहायड्रेट्स्)9.0
प्रथिने (प्रोटीन्स)0.9स्निग्धांश (फॅट्स्)0.4
चुना (कॅल्शियम)0.03लोह0.001
स्फुरद0.03जीवनसत्त्व ‘ब-1’0.00003
जीवनसत्त्व ‘ब-2’0.0001जीवनसत्त्व ‘क’0.06
नियॅसीन0.0004
स्ट्रॉबेरीच्या फळाच्या 100 ग्रॅम खाण्यायोग्य भागात असणारे अन्नघटक

स्ट्रॉबेरीच्या पक्व फळांचा उपयोग खाण्यासाठी करतात अथवा स्ट्रॉबेरीच्या पक्व फळांपासून जॅम, जेली, रस, वाईन, आइस्क्रीम, डबाबंद स्ट्रॉबेरी, इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात. स्ट्रॉबेरीचे झाड औषधी म्हणूनही ओळखले जाते. निरनिराळया रोगांवर स्ट्रॉबेरीच्या झाडाच्या पानांचा रस आणि फळे यांचा उपयोग करतात.

स्ट्रॉबेरी पिक लागवडीखालील क्षेत्र | स्ट्रॉबेरी पिक उत्पादन |

जगभरात स्ट्रॉबेरीच्या पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. जगामध्ये अमेरिका, पोलंड, कोरिया, स्पेन, जर्मनी, रशिया, मेक्सिको, लेबेनॉन, फ्रान्स, इंग्लंड, युगोस्लाव्हिया, झेकोस्लाव्हिया, कॅनडा, नेदरलँड, नॉर्वे, हंगेरी, ऑस्ट्रेलिया, इत्यादी देशांमध्ये स्ट्रॉबेरीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.
भारतात स्ट्रॉबेरीची लागवड प्रामुख्याने जम्मू काश्मीर, निलगिरी पर्वतातील परिसर, नैनीताल, डेहराडून, फैजाबाद, मीरत, मुझफ्फरनगर, सहारनपूर, उटी, पांचगणी, महाबळेश्वर, इत्यादी थंड हवामानाच्या प्रदेशात केली जात असे. मात्र आज महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश ही राज्ये स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळू लागली आहेत. महाराष्ट्रात 400 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, सातारा, नाशिक, अहमदनगर, इत्यादी जिल्ह्यांत स्ट्रॉबेरीची लागवड होऊ लागली आहे.

स्ट्रॉबेरी पिकासाठी योग्य हवामान | स्ट्रॉबेरी पिकासाठी योग्य जमीन |

स्ट्रॉबेरीचे पीक विविध प्रकारच्या हवामानात येऊ शकते. परंतु या पिकाला समशीतोष्ण हवामान चांगले मानवते. स्ट्रॉबेरी पिकाच्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश असलेले दिवस आणि साधारणपणे 10 ते 25 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोषक ठरते. स्ट्रॉबेरीच्या झाडाला फुले येण्यासाठी विशिष्ट तापमान आणि सूर्यप्रकाशाचा ठरावीक कालावधी मिळणे आवश्यक असते. स्ट्रॉबेरीच्या काही जातींमध्ये दिवस कितीही लहान अथवा मोठा असला तरी त्याचा या जातींच्या वाढीवर परिणाम होत नाही. अशा जातींना वर्षभर फुले येतात. या जातींना ‘डे न्यूट्रल’ जाती म्हणतात. परंतु स्ट्रॉबेरीच्या काही जातींमध्ये दिवस लहान असतानाच फुले येतात. सूर्यप्रकाशाचा कालावधी ठरावीक कालावधीपेक्षा जास्त झाल्यास या जातींना फुले येत नाहीत. झाडाची केवळ शाखीय वाढ होते. या जातींना ‘शॉर्ट डे’ जाती असे म्हणतात. या ‘शॉर्ट डे’ जातींमध्ये दिवस हा दहा तासांपेक्षा लहान असताना आणि तापमान साधारणपणे 15 अंश सेल्सिअस असताना फुले येऊन फलधारणा होते. दिवसाचा कालावधी 14 तासांपेक्षा कमी असताना आणि तापमान 7 अंश सेल्सिअसच्या खाली गेल्यास स्ट्रॉबेरीची झाडे सुप्तावस्थेत जातात. तापमान पुरेसे वाढल्यानंतर झाडाची वाढ पुन्हा सुरू होते.
स्ट्रॉबेरीच्या झाडावर खोडामध्ये किंवा फुटव्यांमध्ये रूपांतर होणाऱ्या डोळयांची किंवा फुलांमध्ये रूपांतर होणाऱ्या डोळयांची निर्मिती झाल्यानंतर हे दोन्ही प्रकारचे डोळे सुप्तावस्थेत जातात. फुटव्यांमध्ये रूपांतर होणाऱ्या डोळयांपासून स्ट्रॉबेरीच्या रोपांना नवीन फूट येते तर फुलांमध्ये रूपांतर होणाऱ्या डोळयांपासून स्ट्रॉबेरीच्या झाडांना फुले येऊन फलधारणा होते. या दोन्ही प्रकाराच्या डोळयांची सुप्तावस्था नष्ट करण्यासाठी स्ट्रॉबेरीच्या झाडाला ठरावीक कालावधीसाठी अतिशय थंड तापमानाची आवश्यकता असते, यालाच स्ट्रॉबेरीचे चिलिंग असे म्हणतात.
स्ट्रॉबेरीच्या झाडाला फुटव्यांमध्ये रूपांतर होणाऱ्या डोळयांची सुप्तावस्था घालविण्यासाठी लागवडीपूर्वी आणि फुलांमध्ये रूपांतर होणाऱ्या डोळयांची सुप्तावस्था घालविण्यासाठी लागवडीनंतर असे दोनदा चिलिंग करणे आवश्यक असते. ऑगस्ट महिन्यात लागवड केलेल्या स्ट्रॉबेरीच्या झाडांचे नोव्हेंबर महिन्यात पडलेल्या थंडीमुळे आपोआपच चिलिंग होऊन डोळयांची सुप्तावस्था मोडून फुले येतात. स्ट्रॉबेरीची नर्सरीत तयार केलेली रोपे दोन आठवडे शीतगृहात 1 ते 2 अंश सेल्सिअस तापमानाला ठेवून नंतर लागवडीसाठी वापरल्यास त्यांना पुरेसे चिलिंग मिळते. अशा रोपांना फ्रेश चिल्ड रोपे असे म्हणतात. काही वेळा स्ट्रॉबेरीची रोपे 8 ते 9 महिने शीतगृहात उणे दोन अंश सेल्सिअस तापमानाला ठेवून नंतर लागवडीसाठी वापरतात. अशा रोपांना फ्रिगो चिल्ड रोपे असे म्हणतात. स्ट्रॉबेरीच्या रोपांच्या लागवडीनंतर शाखीय वाढ पूर्ण झाल्यावर झाडांना हिवाळयातील थंडीचा पुरेसा फायदा मिळाल्यानंतर फुले येऊन फलधारणा होते.
महाराष्ट्रातील हवामानात पावसाळा संपल्यावर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीची रोपे लावल्यास हिवाळा सुरू होईपर्यंत स्ट्रॉबेरीच्या रोपांची भरपूर शाखीय वाढ होते. हिवाळयाची पुरेशी थंडी मिळाल्यांनतर या पिकाला फुले येऊन डिसेंबरपर्यंत फलधारणा होते आणि मार्चपर्यंत उत्पादन मिळत राहते.
स्ट्रॉबेरीचे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेतले जाते. परंतु स्ट्रॉबेरीच्या पिकाच्या योग्य वाढीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी, मुरमाड किंवा रेताड पोयटायुक्त जमीन लागते. स्ट्रॉबेरीचे पीक जमिनीतील क्षारांना अतिशय संवेदनक्षम असते. जमिनीत क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास रोपांची वाढ खुंटते आणि रोपे वाळून जातात. जमिनीत चुनखडीचे प्रमाण जास्त असल्यास रोपांची पाने पिवळी पडतात. स्ट्रॉबेरीच्या पिकाच्या योग्य वाढीसाठी जमिनीचा सामू 6.5 ते 7 असावा. रोपांच्या लागवडीपूर्वी जमिनीचे रासायनिक पृथक्करण करून घ्यावे लागते. जमिनीचा सामू 6.5 ते 7 या मर्यादेपेक्षा कमी अथवा जास्त असल्यास कॅल्शियम ऑक्साईड किंवा कॅल्शियम सल्फेट या रसायनांचा वापर करून जमिनीचा सामू योग्य पातळीवर आणावा. स्ट्रॉबेरीच्या झाडांची मुळे जमिनीच्या वरच्या 15 ते 20 सेंटिमीटर पर्यंतच्या थरातच वाढतात. त्यामुळे मुळांच्या योग्य वाढीसाठी वरच्या थरातील जमीन मऊ आणि भुसभुशीत असावी.

स्ट्रॉबेरी पिकाच्या सुधारित जाती :

1.’शॉर्ट डे’ जाती
डग्लस स्ट्रॉबेरी :

स्ट्रॉबेरीची ही जात ‘शॉर्ट डे’ प्रकारातील असून 1979 मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठाने विकसित केली आहे. हिवाळी हंगामात लागवड केल्यास या जातीला लवकर आणि भरपूर फळे येतात. उष्ण हवामानात या जातीच्या झाडांची फळे मऊ पडतात आणि अशा फळांचा टिकाऊपणा अतिशय कमी असतो. महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात या जातीची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळते. या जातीच्या फळांचा आकार लांबोळा कोनासारखा असून रंग आकर्षक लाल असतो. या जातीच्या काही फळांना दोन्ही बाजूंना कडा असतात. या जातीच्या फळांना भरपूर बिया असतात. म्हणून ताजी फळे म्हणून खाण्यास अथवा प्रक्रिया उद्योगात या जातीच्या फळांना कमी मागणी असते. या जातीच्या झाडांवर अनेक वेळा पांढऱ्या रंगाची अल्बिनो फळे दिसून येतात.

चँडलर स्ट्रॉबेरी :

कॅलिफोर्नियात 1983 साली विकसित करण्यात आलेली स्ट्रॉबेरीची ही जात ‘शॉर्ट डे’ या प्रकारातील आहे. या जातीच्या झाडांना डग्लस जातीप्रमाणे लवकर फळे येत नाहीत. या जातीची फळे लांबोळी, शंकूच्या आकाराची असतात. काही फळांना कडा असतात. या जातीच्या फळांचा रंग तांबडा लाल असतो. या जातीची फळे डग्लस जातीच्या फळांपेक्षा टणक असतात. या जातीची फळे जास्त काळ टिकतात. परंतु या जातीच्या फळांची साल पातळ असते; त्यामुळे या जातीच्या फळांची हाताळणी आणि वाहतूक फार काळजीपूर्वक करावी लागते. स्ट्रॉबेरीच्या या जातीच्या फळांत इतरांच्या तुलनेत कमी बिया असतात. त्यामुळे या जातीच्या फळांना ताजी फळे म्हणून खाण्यास अथवा प्रक्रिया उद्योगात चांगली मागणी आहे.

पाजारो स्ट्रॉबेरी :

उत्तर कॅलिफोर्नियात 1979 पासून या ‘शार्ट डे’ जातीची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कॅलिफोर्नियात उन्हाळी लागवडीसाठी ही जात वापरली जाते. आपल्याकडील हवामानात ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये या जातीची लागवड केल्यास भरपूर उत्पादन मिळते. या जातीच्या झाडाची फळे गर्द लाल रंगाची असतात. फळांचा आकार मोठा आणि शंकूसारखा असतो. स्ट्रॉबेरीच्या इतर जातींच्या फळांच्या तुलनेत या जातीची फळे लांबच्या वाहतुकीसाठी जास्त योग्य आहेत.

ओसो ग्रॅन्डी स्ट्रॉबेरी :

स्ट्रॉबेरीची ही ‘शॉर्ट डे’ जात 1987 मध्ये कॅलिफोर्नियात प्रसारित करण्यात आली. या जातीची फळे कॅलिफोर्नियातील स्ट्रॉबेरीच्या इतर कोणत्याही जातीपेक्षा आकाराने मोठी असतात. ही जात भरपूर उत्पादन देणारी असून चँडलर जातीच्या तुलनेत या जातीचे उत्पादन उशिरा मिळते. या जातीच्या फळांचा आकार शंकूसारखा असतो; तर रंग मध्यम ते गर्द लाल असतो. फळांचा स्वाद अतिशय उत्तम असतो. या जातीची फळे टणक असल्यामुळे लांबच्या वाहतुकीत ही फळे इतर जातीच्या फळांपेक्षा जास्त चांगली टिकतात. या जातीच्या फळांमध्ये पांढरी अल्बिनो फळे आणि दुभंगलेली फळे (स्प्लिट फ्रुट) या दोन विकृती आढळतात.
या जातींशिवाय कॅलिफोर्नियात पार्कर आणि न्यूझीलंडमध्ये लिंकन या ‘शॉर्ट डे’ जाती विकसित करण्यात आल्या आहेत.

2. ‘डे न्यूट्रल’ जाती :
सेल्वा स्ट्रॉबेरी :

स्ट्रॉबेरीची ही ‘डे न्यूट्रल’ जात 1983 मध्ये कॅलिफोर्नियात विकसित करण्यात आली. कॅलिफोर्नियामध्ये या जातीच्या झाडांना वर्षभर फळे येतात. या जातीची झाडे जोमदार वाढतात. या जातीची फळे टणक आणि लाल रंगाची असतात. फळे टणक असल्यामुळे लांबच्या वाहतुकीसाठी ही जात चांगली आहे. या जातीच्या फळांना फारसा चांगला स्वाद नसल्यामुळे या जातीच्या फळांना मागणी कमी आहे. ही जात भुरी रोगाला आणि कोळी या किडीला लवकर बळी पडते.

फर्न स्ट्रॉबेरी :

स्ट्रॉबेरीची ‘डे न्यूट्रल’ प्रकारातील ही जात 1983 मध्ये कॅलिफोर्नियात प्रसारित करण्यात आली. या जातीची झाडे आकाराने लहान असतात; तसेच या झाडांना लहान आकाराची भरपूर फळे येतात. कॅलिफोर्नियात या जातीच्या फळांना अतिशय कमी मागणी असून परदेशी बाजारपेठेतील काही विशिष्ट ठिकाणीच या जातीच्या फळांची निर्यात होते.

आयर्विन स्ट्रॉबेरी :

आयर्विन ही 1989 मध्ये कॅलिफोर्नियात प्रसारित झालेली ‘डे न्यूट्रल’ जात आहे. या जातीच्या फळांचा आकार शंकूसारखा असतो. या जातीची फळे ओसो ग्रॅन्डी या जातीच्या फळांपेक्षा लहान असतात.
वरील जातींशिवाय स्ट्रॉबेरीच्या स्वीट चार्ली, टिओगा, टफ्टस्, आईको, योलो, अंक, सी स्केप, शास्त्रा, ब्लॅकमोर, क्लोनमोर, फ्लोरिडा – 90, इत्यादी कॅलिफोर्नियन जाती उपलब्ध आहेत. ‘भारतीय कृषि अनुसंधान संस्था, नवी दिल्ली’, यांनी ‘पुसा अर्ली ड्वार्फ ‘ नावाची स्ट्रॉबेरीची डे न्यूट्रल या प्रकारातील जात विकसित केली आहे.

स्ट्रॉबेरी पिकाची अभिवृद्धी, रोपांची निवड | स्ट्रॉबेरी पिकाची लागवड पद्धती |

स्ट्रॉबेरीची अभिवृद्धी बियांपासून रोपे तयार करून आणि फुटव्यांपासून अथवा धावत्या खोडापासून रोपे तयार करून केली जाते. स्ट्रॉबेरीच्या फळांच्या सालीमध्ये रूतून बसलेल्या लहानलहान आकाराच्या पिवळसर काळपट किंवा लाल रंगाच्या बियांपासून स्ट्रॉबेरीची रोपे तयार करतात. परंतु या रोपांचे गुणधर्म मातृवृक्षासारखे राहत नाहीत. मात्र फुटव्यांपासून आणि धावत्या खोडांपासून तयार केलेल्या रोपांपासून भरपूर आणि चांगले उत्पादन मिळते. स्ट्रॉबेरीच्या दोन जातींचा संकर करून नवीन जात निर्माण करावयाची असल्यास बियांपासून रोपे तयार केली जातात.
बियांपासून रोपे तयार करण्यासाठी स्ट्रॉबेरीची चांगली जोमदार वाढणारी आणि भरपूर उत्पादन देणारी रोपे निवडावीत. स्ट्रॉबेरीची मोठ्या आकाराची, आकर्षक लाल रंगाची, कीड आणि रोगमुक्त फळे बी काढणीसाठी निवडावीत. अशा फळांची काढणी केल्यानंतर दोन ते तीन दिवस सावलीत ठेवावीत. त्यांनतर फळाचा गर काढून बी वेगळे करावे. बी प्लॅस्टिक ट्रेमध्ये सावलीत वाळविण्यासाठी ठेवावे. स्ट्रॉबेरीचे बी तीन महिने ठेवल्यानंतर लागवडीसाठी वापरावे. स्ट्रॉबेरीच्या एक किलो फळापासून साधारणपणे 2,000 ते 2,500 चांगल्या प्रतीच्या बिया मिळतात. बियांची पेरणी गादीवाफ्यावर करावी. पोयट्याची माती आणि चांगले कुजलेले शेणखत यांचे समप्रमाणात मिश्रण करून गादीवाफे तयार करावेत. गादीवाफ्यांवर बाविस्टीन किंवा फॉरमॅल्डिहाईच्या 0.3 % द्रावणात फवारा करून मातीचे निर्जंतुकीकरण करावे. यासाठी 10 लीटर पाण्यात 30 ग्रॅम बाविस्टीन किंवा 30 मिली. फॉरमॅल्डिहाईड मिसळावे. पावसाळा सुरू झाल्यानंतर स्ट्रॉबेरीच्या बिया गादीवाफ्यावर दोन ओळींत 15 सेंटिमीटर अंतर ठेवून पेराव्यात. गादीवाफ्यांना दररोज झारीने पाणी द्यावे. गादीवाफ्यांमध्ये पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी. स्ट्रॉबेरीच्या बियांची पेरणीनंतर 10 ते 12 दिवसांत उगवण होते. रोपे तीन महिन्यांची झाल्यानंतर त्यांचा लागवडीसाठी उपयोग करावा. स्ट्रॉबेरीच्या बिया अतिशय लहान आकाराच्या आणि नाजूक असल्यामुळे पावसापासून स्ट्रॉबेरीच्या बियांचे आणि रोपांचे संरक्षण करण्यासाठी पॉलिहाऊसमध्ये किंवा जाळी उभारून स्ट्रॉबेरीची रोपे तयार करावीत.
स्ट्रॉबेरीची अभिवृद्धी रोपाच्या बुंध्याजवळ येणाऱ्या फुटव्यांपासून करता येते. स्ट्रॉबेरीच्या एका रोपाला चार ते पाच फुटवे येतात. प्रत्येक फुटव्यापासून स्ट्रॉबेरीचे एक नवीन झाड तयार होते. या फुटव्यापासून घेतलेल्या पिकास मातृवृक्षासारखीच फळे येतात. मात्र या झाडांची फलधारणाक्षमता मातृवृक्षापेक्षा थोडीशी कमी असते. अशा फुटव्यांपासून घेतलेले पीक किडी व रोगांना लवकर बळी पडू शकते.
धावत्या खोडांपासून स्ट्रॉबेरीच्या झाडाची अभिवृद्धी केली जाते. स्ट्रॉबेरीच्या प्रत्येक झाडाला शाखीय वाढ पूर्ण होऊन फळांची काढणी झाल्यावर धावती खोडे ( रनर्स) येतात. स्ट्रॉबेरीच्या प्रत्येक झाडाला साधारणपणे 8 ते 10 धावती खोडे येतात. प्रत्येक झाडाला भरपूर रनर्स येण्यासाठी फळांची काढणी झाल्यानंतर पिकाची वाळलेली पाने आणि पिकातील तण काढून शेत स्वच्छ करावे. प्रत्येक झाडाभोवतीची जमीन खुरपीने भुसभुशीत करावी. प्रत्येक झाडास एक किलो चांगले कुजलेले शेणखत झाडाभोवती रिंगण पद्धतीने द्यावे. शेणखतामध्ये दर हेक्टरी 5 किलो बाविस्टीन चांगले मिसळावे. पिकाला रोज पाणी द्यावे. जमिनीत पाण्याचा योग्य निचरा होईल याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे काळजी घेतलेल्या प्रत्येक झाडास भरपूर प्रमाणात रनर्स येतात. या रनर्सच्या कांड्यांवर माती टाकून ते झाकावेत. यामुळे त्यांना लवकर मुळे फुटतात. मुळे फुटल्यानंतर रनर्सपासून रोप वाढण्यास सुरुवात होते. या रोपाला तीन ते चार पाने आल्यावर धावणारे खोड मातृवृक्षापासून कापून रोपाला स्वतंत्र वाढू द्यावे. ही रोपे उपटून नवीन लागवडीसाठी वापरावीत. रनर्सपासून तयार केलेल्या रोपांचे उत्पादन मातृवृक्षापेक्षा काही प्रमाणात कमी येते कारण एकाच पिकापासून तयार होणाऱ्या रनर्सपासून वर्षानुवर्षे रनर्स घेतल्यामुळे त्यापासून तयार केलेल्या रोपांची उत्पादनक्षमता कमी होते. म्हणून दरवर्षी शास्त्रीय पद्धतीने तयार केलेल्या रोपांची लागवड करणे आवश्यक आहे. स्ट्रॉबेरीच्या झाडाच्या शेंड्याच्या किंवा खोडाचा काही भाग वापरून ऊतिसंवर्धनामार्फत (टिश्यू कल्चर) रोपे तयार केल्यास मातृवृक्षाचे गुणधर्म असणारी आणि किडी आणि रोगमुक्त रोपे मिळतात.
स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी निवडलेली जमीन 3 ते 4 वेळा उभी, आडवी, खोल नांगरून घ्यावी. जमिनीतील मोठे दगड, इतर पिकांच्या आणि झाडांच्या मुळया वेचून जमीन स्वच्छ करावी. ढेकळे फोडून जमिनीच्या वरच्या 20 ते 30 सेंटिमीटर थरातील माती भुसभुशीत करावी. मातीत दर हेक्टरी 30 ते 40 टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत मिसळावे.
रोपांची लागवड गादीवाफ्यांवर करावी. गादीवाफे 3 फूट रुंद आणि 50 ते 60 सेंटिमीटर उंचीचे तयार करावेत. दोन गादीवाफ्यांमध्ये एक फूट अंतर ठेवावे. गादीवाफे तयार करण्यापूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे. जमिनीच्या निर्जंतुकीकरणासाठी ‘मिथिल ब्रोमाईड’ आणि ‘क्लोरोपिक्रीन’ या रसायनांचा वापर केला जातो. जमिनीचे निर्जंतुकीकरण करणे शक्य नसल्यास गादीवाफे तयार केल्यानंतर जमिनीवर ‘फॉरमॅल्डिहाईड आणि बाविस्टीन यांच्या मिश्रणाच्या 0.3 % द्रावणाचा फवारा मारावा. यासाठी 10 लीटर पाण्यात 30 मिलिलीटर फॉरमॅल्डिहाईड आणि 30 ग्रॅम बाविस्टीन या प्रमाणात मिसळून द्रावण तयार करावे.

स्ट्रॉबेरी पिकासाठी योग्य हंगाम | स्ट्रॉबेरी पिकासाठी लागवडीचे अंतर |

स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा अशा तिन्ही हंगामांत करता येते. परंतु महाराष्ट्रातील हवामानात स्ट्रॉबेरीचे उत्पादन नोव्हेंबर ते मार्च या कालावधीतच मिळते.

उन्हाळी लागवड :

एप्रिल – मे महिन्यात स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केल्यास पावसाळा संपेपर्यंत रोपांची शाखीय वाढ होते आणि या पिकापासून ऑक्टोबर – नोव्हेंबरनंतर फळांचे उत्पादन सुरू होते. परंतु या पिकाचे कडक उन्हापासून संरक्षण करावे लागते आणि पिकाला पुरेसे पाणी द्यावे लागते.

हिवाळी लागवड :

या पिकाची लागवड जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात करतात. या पिकाला सप्टेंबरपर्यंत भरपूर फुटवे आणि रनर्स येतात. हे फुटवे आणि रनर्स सप्टेंबरमधील लागवडीसाठी वापरता येतात. या पिकाला डिसेंबरमध्ये फुले येऊन मार्चपर्यंत फळे येतात.

पावसाळी लागवड :

पावसाळयाच्या शेवटी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात रोपांची लागवड केल्यास रोपांची नोव्हेंबरपर्यंत चांगली शाखीय वाढ होते आणि डिसेंबर ते मार्च या कालावधीत फळे काढणीस येतात.
गादीवाफ्यावर रोपांची लागवड करताना दोन रोपांमधील अंतर एक फूट आणि रोपांच्या दोन ओळींमधील अंतर दोन फूट ठेवावे. 2 फूट X 1 फूट या अंतरावर लागवड केल्यास स्ट्रॉबेरीच्या दर हेक्टरी 54,450 रोपे लागतात. रोपांची गादीवाफ्यांवर लागवड करताना प्रत्येक रोपाला 5 ग्रॅम नत्र, स्फुरद आणि पालाशयुक्त मिश्रखत (19 19 19 ) द्यावे. रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपे 0.1% बाविस्टीनच्या द्रावणात बुडवून नंतर लागवड करावी. यासाठी 10 लीटर पाण्यात 10 ग्रॅम बाविस्टीन मिसळावे. लागवड करताना रोपांची मुळे सरळ राहतील आणि रोपांच्या शेंड्यांवर माती पडणार नाही याची काळजी घ्यावी.

स्ट्रॉबेरी पिकास खत व्यवस्थापन | स्ट्रॉबेरी पिकास पाणी व्यवस्थापन |

स्ट्रॉबेरीच्या पिकापासून भरपूर उत्पादन मिळण्यासाठी पिकाला योग्य प्रमाणात खतांच्या मात्रा देणे आवश्यक आहे. स्ट्रॉबेरीच्या पिकाला नत्र, स्फुरद आणि पालाश ही मुख्य अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात आणि कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर, मँगनीज, लोह, कॉपर, बोरॉन, मॉलिब्डेनम ही सूक्ष्म अन्नद्रव्ये निरनिराळ्या प्रकारच्या जमिनींत निरनिराळ्या प्रमाणात उपलब्ध असतात. काही प्रकारच्या जमिनींमध्ये काही विशिष्ट मुख्य किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असते किंवा ही अन्नद्रव्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात उपलब्ध असतात. अशा जमिनींमध्ये स्ट्रॉबेरीच्या पिकावर पाने पिवळी पडणे, शेंडे जळणे, यांसारखी अन्नद्रव्यांची कमतरता असणारी लक्षणे दिसतात. अशा वेळी ही लक्षणे कोणत्या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे निर्माण झाली आहेत हे निश्चित करून त्याप्रमाणे उपाययोजना टाळण्यासाठी पिकाची लागवड करण्यापूर्वी लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचे रासायनिक पृथक्करण करून या जमिनीत कोणती अन्नद्रव्ये किती प्रमाणात आहेत हे समजून घ्यावे आणि त्याप्रमाणे पिकाला द्यावयाच्या खतांच्या मात्रा ठरवाव्यात.
सर्वसाधारणपणे स्ट्रॉबेरीच्या पिकाला दर हेक्टरी 40 ते 50 टन शेणखत, 120 ते 150 किलो नत्र, 100 ते 120 किलो स्फुरद आणि 75 ते 80 किलो पालाश या प्रमाणाच्या खताच्या मात्रा द्याव्यात. या खतांपैकी स्फुरदाची संपूर्ण मात्रा लागवडीच्या वेळी द्यावी. नत्र खत तीन समान हप्त्यांत विभागून लागवडीच्या वेळी, लागवडीनंतर 45 दिवसांनी आणि त्यानंतर फळे तोडणीस सुरुवात झाल्यानंतर द्यावे. पालाशाची अर्धी मात्रा लागवडीच्या वेळी आणि उरलेली अर्धी मात्रा नत्राच्या दुसऱ्या हप्त्याबरोबर द्यावी.
स्ट्रॉबेरीची झाडे जमिनीतील क्षारांना अतिशय संवेदनक्षम असतात. स्ट्रॉबेरीच्या मुळांची वाढ जमिनीच्या वरच्या 20 ते 30 सेंटिमीटर थरात होते. या थरात क्षारांचे प्रमाण जास्त झाल्यास स्ट्रॉबेरीच्या रोपांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो, रोपांची वाढ खुंटते. स्ट्रॉबेरीच्या पिकाला पाणीपुरवठा करावयाच्या पाण्यात सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारख्या क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते. म्हणूनच स्ट्रॉबेरीच्या पिकाला पाण्याचा पुरवठा करण्यापूर्वी या पाण्याचे रासायनिक पृथक्करण करून घ्यावे लागते. पाण्यामध्ये अशा क्षारांचे प्रमाण ठरावीक पातळीपेक्षा जास्त असल्यास अशा पाण्याचा स्ट्रॉबेरीच्या पिकासाठी वापर करू नये.
स्ट्रॉबेरीच्या पिकाला योग्य प्रमाणात पाणी देणे आवश्यक असते. रोपांच्या लागवडीनंतर सुरुवातीचे तीन आठवडे रोपांना रोज पाणी द्यावे आणि त्यानंतर तीन दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. लागवडीनंतर पहिले तीन आठवडे पिकाला तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. या काळात पावसाच्या हलक्या सरी वारंवार पडत असतील तर तुषार सिंचनाने पाणी देण्याच्या वेळा आणि प्रमाण नियंत्रित करावे. फुले येण्याच्या वेळी पिकाला ठिबक सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. प्रत्येक झाडाला रोज सरासरी पाच ते सहा लीटर पाणी मिळण्यासाठी ठिबक सिंचन संच रोज किमान दोन तास चालवावा.
स्ट्रॉबेरीच्या पिकाला पाणी कमी अथवा जास्त झाल्यास पिकाच्या वाढीवर, उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. प्रामुख्याने फळधारणेच्या काळात पिकाला पाणी कमी पडणार नाही याची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. फुले आल्यानंतर आणि फलधारणा झाल्यानंतर पिकाला तुषार सिंचन पद्धतीने पाणी देऊ नये. तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास फुलातील परागीभवनाच्या क्रियेत अडथळा निर्माण होतो, फलधारणा होऊन वाढणाऱ्या फळांवर पाणी पडल्यामुळे पांढऱ्या रंगाच्या अल्बिनो फळांचे प्रमाण वाढते. अलीकडच्या काळात सूक्ष्म तुषार सिंचन पद्धत वापरली जात आहे. या पद्धतीने पाणीपुरवठा केलेल्या शेतांमध्ये जास्त उत्पादन मिळत असल्याचे दिसून आले आहे.

स्ट्रॉबेरी पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण |

मावा (अॅफिड्स) :

स्ट्रॉबेरीच्या पिकावर येणारी मावा ही कीड 1 ते 2 मिलिमीटर लांबीची असून या किडीची पिल्ले पिवळट हिरव्या रंगाची असतात. प्रौढ मावा कीड काळसर तपकिरी रंगाची असते. या किडीची पिल्ले आणि प्रौढ कीड स्ट्रॉबेरीच्या रोपांच्या पानांच्या मागील बाजूस राहून कोवळ्या पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पाने पिवळी पडतात. किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास पाने मरतात आणि गळून पडतात. या किडीच्या अंगातून पातळ, गोड नाव बाहेर पडतो. या पदार्थाचा थर पानांवर आणि फळांवर बसतो. या चिकट गोड पदार्थावर काळी बुरशी वाढते. त्यामुळे पाने आणि फळांवर काळ्या रंगाचा थर दिसतो. पानांवर काळया बुरशीचा थर वाढल्यामुळे पानांची प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते, फळांची कूज होते. मावा किडीमार्फत स्ट्रॉबेरीच्या पिकावर विविध विषाणुजन्य रोगांचा प्रसार होतो.

नियंत्रण : मावा या किडीच्या नियंत्रणासाठी 15 मिलिलीटर डायमेथोएट (30% प्रवाही) 10 लीटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारावे.

दोन ठिपके असलेला कोळी (टु स्पॉटेड स्पायडर माईट) :

ही कीड अर्धा मिलिमीटर लांबीची असून या किडीच्या शरीराच्या दोन्ही बाजूंवर काळया रंगाचे ठिपके असतात. या किडीचा रंग लालसर पिवळा किंवा फिकट हिरवा असतो. या किडीची पिल्ले आणि प्रौढ कीड स्ट्रॉबेरीच्या पानांवर ओरखडे पाडून पानांतील रस शोषून घेतात. किडीने खाल्लेल्या भागावर पानांच्या वरच्या बाजूस पिवळे ठिपके दिसतात. पानांचा खालचा भाग वाळलेला आणि तपकिरी रंगाचा दिसतो. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास झाडाची वाढ खुंटते आणि बऱ्याच वेळा संपूर्ण झाड वाळलेले दिसते.

सायक्लामेन माईट :

या किडीमुळे स्ट्रॉबेरीच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. ही कीड आकाराने अतिशय लहान असून नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही. या किडीचा रंग गुलाबी-नारिंगी असतो. ही कीड झाडाच्या शेंड्यावरील कोवळ्या पानांमधून रस शोषून उपजीविका करते. त्यामुळे नवीन येणारी पाने आकाराने लहान आणि वेडीवाकडी होतात. फुले सुकतात. झाडाची वाढ खुंटते, फळे आकाराने लहान येतात.

नियंत्रण : स्ट्रॉबेरीच्या पिकावर या किडींचा उपद्रव दिसून येताच पाण्यात विरघळणाऱ्या गंधकाचा 0.2% तीव्रतेचा फवारा द्यावा. यासाठी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम गंधक मिसळावे.

हिरवे तुडतुडे (जासिड्स) :

ही कीड एक ते दोन मिलिमीटर लांबीची आणि फिकट हिरव्या रंगाची असते. ही कीड तिरप्या दिशेने चालते. या किडीची पिल्ले आणि प्रौढ तुडतुडे स्ट्रॉबेरीच्या कोवळ्या पानांतून रस शोषून घेतात. या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्यास पाने पिवळी पडून सुकतात. त्यामुळे फळांचे उत्पादन कमी येते.

नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी 12 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस (40%) 10 लीटर पाण्यात या प्रमाणात मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारावे.

फुलकिडे (थ्रिप्स) :

ही कीड अत्यंत लहान असून 1 मिलिमीटर लांबीची असते. या किडीच्या पिल्लांचा रंग पांढरट पिवळसर असतो. प्रौढ किडीचा रंग पिवळा किंवा गडद तपकिरी असतो. या किडीची पिल्ले आणि प्रौढ किडी स्ट्रॉबेरीच्या पानांवर ओरखडे पाडून बाहेर येणारा रस शोषून घेतात. कोवळ्या पानांतील रस शोषून घेतल्यामुळे ही पाने चुरगळल्यासारखी वाकडीतिकडी होतात आणि आकाराने लहान राहतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. ही कीड फुलातील स्त्रीकेसर आणि पुंकेसर यांमधील रस शोषून घेते. त्यामुळे स्त्रीकेसर आणि पुंकेसर तपकिरी रंगाचे होऊन सुकून जातात. यामुळे फलधारणा कमी प्रमाणात होते. काही वेळा या किडीचा उपद्रव फळांवर होतो. त्यामुळे देठाजवळचा भाग तपकिरी करड्या रंगाचा होतो आणि फळांची प्रत खराब होते.

नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी 2 मिलिलीटर फॉस्फॉमिडॉन ( 85 % ) किंवा 12 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस (40%) 10 लीटर पाण्यात मिसळून 8-10 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 वेळा फवारावे.

कातरकिडा (कटवर्म) :

या किडीचा पतंग मोठ्या आकाराचा, 25 ते 30 मिलिमीटर लांबीचा आणि तपकिरी करड्या रंगाचा असतो. या किडीची पूर्ण वाढलेली अळी 18 मिलिमीटर लांबीची असून अळीचा रंग काळसर करडा असतो. या अळीला स्पर्श करताच अळी शरीराची इंग्रजी सी (C) आकाराची गुंडाळी करते. या किडीच्या अळया रात्रीच्या वेळी झाडाचे नुकसान करतात. दिवसा अळया झाडाजवळ जमिनीमधील भेगांमध्ये किंवा वरच्या भुसभुशीत थरात लपून बसतात. रात्रीच्या वेळी या अळ्या बाहेर पडून झाडाची पाने, पानांचे देठ आणि झाडांचे खोड कुरतडून, बारीक तुकडे करून खातात. त्यामुळे पिकाचे नुकसान होते. अळयांनी झाडाचा शेंडा खाल्ल्यामुळे झाडाची वाढ खुंटते. फलधारणा होत नाही. फळे पिकून तयार होण्याच्या काळात या किडीचा उपद्रव झाल्यास किडीच्या अळया स्ट्रॉबेरीची पिकलेली फळे पोखरतात; त्यामुळे फळे कुजतात.

नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी स्ट्रॉबेरीचे शेत स्वच्छ ठेवावे. शेतातील तणे वेळोवेळी काढून नष्ट करावीत. पिकाची खुरपणी करून जमिनीत लपून बसलेल्या अळया वेचून नष्ट कराव्यात. किडीच्या नियंत्रणासाठी 5% क्लोरडेन किंवा हेप्टाक्लोर भुकटी दर हेक्टरी 50 किलो या प्रमाणात जमिनीत मिसळावी.

पाने खाणारी अळी (लीफ इटिंग कॅटरपिलर) :

या किडीचा पतंग पांढरट असून त्याचे पोट पिवळसर रंगाचे असते. या किडीच्या अळया काळया रंगाच्या असतात. अळयांच्या अंगावर पिवळ्या, काळ्या आणि पांढरट रंगाच्या केसांचे पुंजके दिसतात. या अळीला स्पर्श केल्यास ही अळी शरीराची गुंडाळी करून घेते. या किडीच्या अळया लहान असतात. पानांच्या खालच्या बाजूने पुंजक्याने राहतात आणि पाने खातात. अळीने खाल्लेल्या पानांच्या फक्त शिराच शिल्लक राहतात आणि पानांची चाळणी होते. अळया मोठ्या होऊन पानांचा जास्त भाग खातात. त्यामुळे पानांना मोठ्या आकाराची छिद्रे पडतात.

नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी किडीच्या अळया तसेच अंड्यांचे पुजके वेचून नष्ट करावेत. लिन्डेन पावडर (10%) दर हेक्टरी 20 किलो या प्रमाणात रोपांवर धुरळावी किंवा 12 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस (40%) 10 लीटर पाण्यात या प्रमाणात मिसळून फवारणी करावी.

पाने गुंडाळणारी अळी (लीफ रोलर) :

या किडीचा पतंग लालसर तपकिरी रंगाचा असतो. पंखावर पांढऱ्या रंगाच्या रेषा असतात. या किडीच्या अळया फिकट हिरव्या रंगाच्या असतात. अळयांचे डोके गर्द तपकिरी रंगाचे असते. या किडीच्या अळया स्ट्रॉबेरीच्या पानांच्या दोन्ही कडा गुंडाळून जाळी तयार करतात आणि या गुंडाळीत राहून आतील भाग फस्त करतात. या किडीचा उपद्रव मोठ्या प्रमाणात असल्यास स्ट्रॉबेरीची अनेक पाने एकत्र गुंडाळून जाळी तयार केली जाते. यामुळे पानांचा रंग तपकिरी होतो आणि पाने वाळून जातात.
नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी किडीचा उपद्रव दिसू लागताच दर हेक्टरी 10 किलो कार्बारिल पावडर (10%) आणि 10 किलो लिंडेन पावडर (10%) एकत्र मिसळून पिकावर धुरळावी.

पांढरी हुमणी (व्हाईट ग्रब) :

या किडीचे प्रौढ भुंगेरे 6 ते 9 मिलिमीटर लांब आणि पांढरट तपकिरी रंगाचे असतात. या किडीच्या अळया 3 ते 5 सेंटिमीटर लांबीच्या असून त्यांचा रंग करडा किंवा पांढरा असतो. या किडीच्या अळीला पायांच्या तीन जोड्या असतात. जमिनीत इंग्रजी सी (C) आकारात पडून असतात. या अळया स्ट्रॉबेरीच्या झाडाच्या मुळचा कुरतडून खातात; त्यामुळे झाडाची वाढ खुंटते.

नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी खुरपणी करून जमिनीतील अळया वेचून नष्ट कराव्यात. हुमणीचा उपद्रव दिसताच 10% लिंडेन पावडर दर हेक्टरी 25 किलो या प्रमाणात शेतातील मातीत मिसळावी. या किडीच्या भुंगेऱ्याचे नियंत्रण करण्यासाठी 15 मिलिलीटर एन्डोसल्फॉन ( 35% प्रवाही) 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पिठ्या ढेकूण (मिलिबग) :

ही कीड पांढरट पिवळया रंगाची असून चपटी आणि अंडाकृती आकाराची असते. या किडीच्या अंगावर पांढरा चकाकणारा मेणाचा थर असतो. या किडीच्या अंगातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर पडतो. हा पदार्थ झाडावर पसरून त्यावर काळी बुरशी वाढते; त्यामुळे झाडाची प्रकाशसंश्लेषणामार्फत अन्ननिर्मिती करण्याची प्रक्रिया मंदावते. या किडीची पिल्ले तसेच प्रौढ कीड स्ट्रॉबेरीच्या पानांतील, देठांतील आणि खोडातील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते.

नियंत्रण : या किडीच्या नियंत्रणासाठी 12 मिलिलीटर मोनोक्रोटोफॉस ( 40%) 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

स्ट्रॉबेरी पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण |

1. फळकूज :

फळकूज हा रोग फळांवर विविध प्रकारच्या बुरशींची लागण झाल्यामुळे होतो. शेतातील जमिनीत, कुजणाऱ्या कंपोस्टमध्ये किंवा शेतातील पालापाचोळयामध्ये ही बुरशी वाढते. कालांतराने ही बुरशी स्ट्रॉबेरीच्या कच्च्या आणि पक्व फळांवर पसरते. हवेतील जास्त आर्द्रता बुरशीच्या वाढीला पोषक ठरते. विविध प्रकारच्या बुरशींचा उपद्रव झाल्यामुळे फळांवर फळकुजीची निरनिराळी लक्षणे दिसतात.

ग्रे मोल्ड फळकूज :

हा रोग बॉट्रिटीस सिनेरिया या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. फळे लहान असताना, पक्व फळांवर, फळांच्या काढणीनंतर आणि फळांच्या साठवणुकीत या रोगाचा उपद्रव दिसून येतो. बुरशीची लागण संपूर्ण फळावर होते; परंतु सुरुवातीला प्रामुख्याने फळांच्या देठाकडील भागावर बुरशी वाढते. फळांवर फिकट तपकिरी रंगाचे डाग दिसतात. हे डाग संपूर्ण फळावर पसरून फळे कुजतात. कुजलेली फळे मऊ न पडता टणक बनतात, फळे फुटत नाहीत किंवा सुकत नाहीत किंवा फळांमधून पातळ स्राव बाहेर येत नाही, फळे ‘सुकतात.

रायझोपस फळकूज :

रायझोपस नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. हा रोग प्रामुख्याने फळांच्या काढणीनंतर साठवणुकीत दिसून येतो. बुरशीची लागण झालेली फळे फिकट तपकिरी रंगाची होतात, मऊ पडतात आणि फळांमधून पातळ रस बाहेर येतो.

म्यूकर फळकूज :

म्यूकर नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. या बुरशीची लागण पक्व फळांना होते. फळांचा रंग काळसर पडतो. फळांवर बुरशीची पांढरी वाढ दिसून येते. या रोगाची लक्षणे रायझोपस फळकुजीसारखी दिसतात.

अन्थँक्नोज फळकूज :

हा रोग कोलीटोट्रिकम नावाच्या बुरशीमुळे होतो. बुरशीची लागण झालेल्या भागावर सुरुवातीला फिकट तपकिरी रंगाचे गोलाकार चट्टे पडतात. कालांतराने हे चट्टे गर्द तपकिरी काळसर रंगाचे होतात. बुरशीचा प्रादुर्भाव झालेला फळांचा भाग टणक होतो आणि सुकतो.

फोमॉप्सीस फळकूज :

फोमॉप्सीस या बुरशीची लागण झाल्यामुळे हा रोग होतो. फळे पिकण्याच्या काळात या बुरशीची लागण होते. फळांवर सुरुवातीला गोलाकार गुलाबी रंगाचे चट्टे पडतात. नंतर हे चट्टे गर्द तपकिरी रंगाचे होतात. या चट्ट्यांच्या कडा फिकट तपकिरी रंगाच्या असतात. चट्ट्यांच्या मध्यभागी काळे ठिपके दिसतात.

टॅन ब्राऊन फळकूज :

हेनेसिया लिथ्री नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. कच्च्या आणि पक्व फळांवर हा रोग आढळतो. बुरशीचा प्रादुर्भाव झालेला भाग काळसर तपकिरी रंगाचा आणि स्पंजासारखा होतो. हा भुसभुशीत झालेला भाग फळामध्ये खोलवर पसरलेला आढळतो. हा भाग फळामधून ओढून बाहेर काढल्यास चटकन बाहेर निघतो.

लेदर फळकूज :

फायटोप्थोरा या बुरशीच्या उपद्रवामुळे हा रोग होतो. या बुरशीच्या उपद्रवामुळे कच्च्या फळांवर तपकिरी रंगाचे चट्टे पडतात. पक्व फळांचा लाल रंग जाऊन फळे फिकट पांढरट, रंगहीन होतात अथवा गुलाबी, जांभळया रंगाची दिसतात. बुरशीची लागण झालेला भाग टणक होतो आणि चवीला कडवट लागतो.

नियंत्रण : फळकूज या रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रॉबेरीचे शेत स्वच्छ ठेवावे. शेतातील पालापाचोळा, स्ट्रॉबेरीची जुनी पाने, कुजलेली फळे गोळा करून नष्ट करावीत. जमिनीत वाढणारी बुरशीची बीजे नष्ट करण्यासाठी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे. फळांचा जमिनीशी संबंध येऊ नये म्हणून जमिनीवर प्लॅस्टिकचे आच्छादन अंथरावे. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यास ‘संरक्षणात्मक’ बुरशीनाशकांचा फवारा द्यावा. 25 ग्रॅम बाविस्टीन, कॅप्टान किंवा थायरम 10 लीटर पाण्यात मिसळून 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे. फळे पिकल्यानंतर फळांची काढणी सुरू झाल्यानंतर फळकूज रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास सर्व पिकलेली आणि पिकण्यास सुरुवात झालेली फळे काढून पिकावर 80% प्रवाही गंधकाच्या 0.2% तीव्रतेच्या द्रावणाची फवारणी करावी.

2. पांढरी भुरी :

हा बुरशीजन्य रोग स्ट्रॉबेरीच्या पानांवर तसेच फुलांवर आणि फळांवर मोठ्या प्रमाणात आढळतो. बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या पानांच्या वरच्या बाजूला बुरशीचे पांढऱ्या रंगाचे ठिपके दिसतात. हे ठिपके वाढत जाऊन संपूर्ण पानावर बुरशीची पांढरी पावडर दिसते. बुरशीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाल्यास फुलांवर, कच्च्या आणि पक्व फळांवर पांढरी बुरशी वाढते. फुलांवर बुरशी वाढल्यामुळे फुलांचा आकार वेडावाकडा होतो आणि फळधारणा कमी प्रमाणात होते. कच्च्या हिरव्या फळांवर बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यास फळे टणक बनतात, फळे पिकत नाहीत. पक्व फळे मऊ होतात आणि फळांवर पांढऱ्या रंगाची पावडर दिसते.
नियंत्रण : या रोगाच्या नियंत्रणासाठी 25 ग्रॅम गंधकाची भुकटी किंवा 10 ग्रॅम बाविस्टीन 10 लीटर पाण्यात मिसळून 10 दिवसांच्या अंतराने दोन ते तीन वेळा फवारावे.

3. पानावरील ठिपके :

स्ट्रॉबेरीच्या झाडाच्या पानांवर निरनिराळया प्रकारच्या बुरशींमुळे विविध रंगांचे आणि आकारांचे ठिपके पडतात; त्यामुळे झाडाची वाढ खुंटते.

जांभळ्या रंगाचे ठिपके :

हा रोग मायकोस्फॅरेला नावाच्या बुरशीमुळे होतो. पानांवर जांभळ्या रंगाचे लहान ठिपके पडतात. हे ठिपके नंतर तपकिरी रंगाचे होतात.

फोमॉप्सीस लीफ ब्लाईट :

फोमॉप्सीस नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. पानांवर लालसर जांभळ्या रंगाचे ठिपके दिसतात. ठिपक्यांचा आकार वाढल्यानंतर ठिपक्याचा मध्यभाग राखाडी रंगाचा होतो.

अल्टरनेरिया लीफ स्पॉट :

हा रोग अल्टरनेरिया नावाच्या बुरशीमुळे होतो. बुरशीची लागण झालेल्या पानाच्या वरील पृष्ठभागावर तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. या ठिपक्यांच्या कडा लालसर जांभळया असतात. पानांची खालील बाजू तपकिरी करड्या रंगाची होते.

अँग्युलर लीफ स्पॉट :

हा रोग झान्थोमोनास नावाच्या जिवाणूंमुळे होतो. पानांच्या खालच्या बाजूला लहान फिकट हिरव्या रंगाचे ठिपके पडतात. ठिपके वाढत जातात. पानांवरील शिरांमुळे ठिपक्यांना कोनासारखा आकार येतो. ही पाने प्रकाशात धरल्यास ठिपके पारदर्शक दिसतात. कालांतराने पानांच्या वरील पृष्ठभागावर लालसर तपकिरी रंगाचे वेड्यावाकड्या आकाराचे ठिपके दिसतात. या ठिपक्यांच्या कडा पिवळ्या रंगाच्या असतात.

नियंत्रण : पानावरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी जमिनीत वाढणारी निरनिराळ्या बुरशींची आणि जिवाणूंची बीजे नष्ट करणे आवश्यक आहे. यासाठी स्ट्रॉबेरीच्या रोपांच्या लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.

4. शेंडामर (फायटोप्थोरा क्राऊन रॉट) :

हा रोग फायटोप्थोरा नावाच्या बुरशीमुळे होतो. बुरशीचा उपद्रव झालेल्या झाडाची नवीन कोवळी पाने सुकतात आणि निळसर हिरव्या रंगाची होतात. संपूर्ण झाड झपाट्याने सुकते आणि कोलमडून पडते. रोगट झाड वर उचलल्यास झाडाचा कुजलेला शेंडा झाडापासून वेगळा होतो, झाडाची मुळे जमिनीत राहतात. रोगट शेंडाकूज उभा कापून पाहिल्यास मध्यभागी तपकिरी रंग दिसतो. शेंडाकूज रोग शेंड्यापासून मुळांपर्यंत पसरतो. त्यामुळे झाडाची मुळे कुजतात व झाड कोलमडते.
नियंत्रण : शेंडेमर या रोगाच्या बुरशीची बीजे जमिनीतून झाडात प्रवेश करतात. ही बीजे नष्ट करण्यासाठी लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे. जमिनीत पाणी साचून राहू नये यासाठी पाण्याचा योग्य निचरा करावा. रोगाचा प्रादुर्भाव न झालेली निरोगी रोपे लागवडीसाठी वापरावीत.

5. करपा (अँथँक्नोज) :

करपा रोग कोलीटोट्रिकम नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची लक्षणे झालेल्या झाडाच्या धावत्या खोडावर आणि पानांच्या देठांवर काळसर

तपकिरी रंगाचे चट्टे दिसतात. या चट्ट्यांचा आकार वाढत जाऊन संपूर्ण खोडावर आणि पानांच्या देठांवर पसरतात. त्यामुळे झाडाचे खोड आणि देठ सुकतात. पानाचे देठ सुकल्यामुळे पाने सुकून मरतात. काही वेळा हा रोग पानांवर पसरतो. पानांवर लहान, गोलाकार, काळसर, करड्या रंगाचे ठिपके दिसतात. बुरशीचा प्रादुर्भाव झाडाच्या शेंड्यावर झाल्यास नवीन येणारी कोवळी पाने लालसर तपकिरी रंगाची होतात. शेंडा कुजतो आणि रंगहीन होतो. शेंड्याचा भाग उभा कापल्यास मध्यभागी लालसर रंगाची छटा दिसते. बुरशीचा प्रादुर्भाव फळावर झाल्यास फिकट काळसर, तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. हे ठिपके खोलगट आणि काळया रंगाचे होऊन संपूर्ण फळावर पसरतात.

नियंत्रण : जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे, पाण्याचा योग्य निचरा करावा. लागवडीसाठी रोगमुक्त रोपे वापरावीत.

6. विषाणू आणि मायकोप्लाझ्माजन्य रोग :

स्ट्रॉबेरीच्या झाडावर आणि फळांवर विविध विषाणू, मायकोप्लाझ्मा अथवा मायकोप्लाझ्मासदृश जंतूंमुळे निरनिराळे रोग होतात. या रोगांचा प्रसार प्रामुख्याने स्ट्रॉबेरीवर आढळणाऱ्या मावा या किडीमार्फत होतो.

फीर लीफ :

या विषाणुजन्य रोगामुळे स्ट्रॉबेरीच्या झाडाच्या पानांचा आकार अरुंद पट्टीसारखा होतो. पाने ओबडधोबड दिसतात आणि पानांच्या कडा दातेरी होतात.

स्ट्रॉबेरी मॉटल :

या विषाणुजन्य रोगाचा प्रसार मावा किडीमार्फत होतो. या रोगामुळे झाडाच्या पानांचा आकार लहान होतो, पाने वेडीवाकडी होतात, पानांच्या कडा पिवळया रंगाच्या होतात.

स्ट्रॉबेरी क्रिंकल :

या विषाणुजन्य रोगामुळे पानांचा आकार लहान आणि वेडावाकडा होतो. पाने चुरगळलेली दिसतात. पानांच्या कडा पिवळसर रंगाच्या दिसतात. काही वेळा पानांवर पिवळे ठिपके दिसतात. या रोगाचा प्रसार स्ट्रॉबेरीवर आढळणाऱ्या मावा किडीमार्फत होतो.

माईल्ड यलो एज :

या विषाणुजन्य रोगामुळे स्ट्रॉबेरीच्या पानांच्या कडा पिवळया रंगाच्या होतात. जुनी पाने लाल रंगाची होतात. पानांच्या देठांची लांबी कमी होते. त्यामुळे संपूर्ण झाडाची वाढ खुंटल्यासारखी दिसते. झाडाचे उत्पादन कमी येते.

व्हेन बँडिंग :

या विषाणुजन्य रोगामुळे स्ट्रॉबेरीच्या पानांच्या मुख्य शिरा पिवळया पडतात. पानांच्या मुख्य तसेच दुय्यम शिरांभोवती पिवळे पट्टे दिसतात. पाने वळतात, पानाचा आकार लहान राहतो. झाडाची जुनी पाने तपकिरी रंगाची होतात.

लिथल डिक्लाईन :

हा रोग मायकोप्लाझ्मामुळे होतो. या रोगाचा प्रसार पानांवरील तुडतुड्यांमुळे होतो. या रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडाच्या कोवळ्या पानांची वाढ खुंटते, ही पाने पिवळी पडतात. पानांच्या कडा वरच्या बाजूला वळतात. जुन्या पानांचा वरचा पृष्ठभाग फिकट तपकिरी – हिरव्या रंगाचा होतो, पानाची खालची बाजू जांभळया किंवा लालसर रंगाची होते. हळूहळू संपूर्ण झाडाची वाढ खुंटते आणि झाडे मरतात.

ग्रीन पेटल :

मायकोप्लाझ्मामुळे होणाऱ्या या रोगाचा प्रसार पानांवरील तुडतुड्यांमुळे होतो. रोगट झाडांच्या फुलांच्या पाकळया हिरव्या रंगाच्या असतात; त्यामुळे या पाकळया छोट्या पानांसारख्या दिसतात. अशा फुलांमध्ये फलधारणा होत नाही. फलधारणा झाल्यास फळांची वाढ होत नाही. या फळांच्या बिया मोठ्या मोठ्या आणि हिरव्या रंगाच्या असतात. बिया संपूर्ण फळावर विखुरलेल्या न राहता एकत्र वाढतात. झाडाची नवीन पाने आकाराने अतिशय लहान राहतात. पानांच्या कडा पिवळया रंगाच्या होतात.

नियंत्रण : या रोगांच्या नियंत्रणासाठी रोगाचा प्रसार करणाऱ्या मावा, तुडतुडे यांसारख्या किडींचा बंदोबस्त करावा. रोगाचा प्रादुर्भाव झालेली झाडे लागवडीसाठी वापरू नयेत.

स्ट्रॉबेरी पिकावरील महत्त्वाच्या विकृती आणि त्यांचे नियंत्रण |

पांढरी फळे (अल्बिनिझम) :

पांढरी फळे ही स्ट्रॉबेरीमध्ये आढळणारी सर्वांत महत्त्वाची विकृती असून स्ट्रॉबेरीच्या अनेक जातींमध्ये ही विकृती दिसून येते. स्ट्रॉबेरीच्या काही जाती या विकृतीला प्रतिकारक्षम आहेत. परंतु या प्रतिकारक्षम जातींमध्ये पांढऱ्या फळांची विकृती कधीकधी उद्भवते. अल्बिनिझम या विकृतीमध्ये फळांचा आकार सर्वसाधारण असतो. मात्र फुलांची वाढ पूर्ण झाल्यानंतरही फळांना लाल रंग न येता फळे पांढऱ्या रंगाची, मऊ आणि बेचव होतात. काही फळांमध्ये फळांवरील बियांभोवतीचा भाग लाल रंगाचा असतो आणि फळे चवीला आंबट पानचट लागतात. ही फळे मऊ असल्यामुळे काढणीनंतर जास्त काळ टिकत नाहीत. अशा पांढऱ्या फळांना बाजारात मागणी नसते. स्ट्रॉबेरीची फळे पिकण्याच्या काळात फळामध्ये साखरेची कमतरता निर्माण होणे हे या विकृतीचे प्रमुख कारण आहे. स्ट्राबेरीच्या फळांमध्ये साखरेची कमतरता निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. फळे पिकवण्याच्या काळात ढगाळ हवामान आणि कमी सूर्यप्रकाश असल्यास फळांमध्ये कमी प्रमाणात साखर तयार होते आणि फळे पांढऱ्या रंगाची राहतात. स्ट्रॉबेरीच्या झाडांना नत्राचा जास्त प्रमाणात पुरवठा केल्यास अशा झाडांची वाढ जोमाने होते आणि झाडामध्ये तयार होणारी साखर मोठ्या प्रमाणात शाखीय वाढीसाठी वापरली जाते. अशा झाडांमध्ये साखरेची कमतरता निर्माण होऊन फळे पांढऱ्या रंगाची राहतात. बऱ्याच वेळा झाडाचे चिलिंग अपूर्ण राहिल्यामुळे झाडाची शाखीय वाढ कमी होते आणि अशा झाडांमध्ये साखरेचे प्रमाण अतिशय कमी असतानाही झाडावर मोठ्या प्रमाणात फलधारणा झाल्यास पांढऱ्या फळांचे प्रमाण वाढते. फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे अल्बिनो फळांचे प्रमाण वाढलेले दिसते. लागवडीचे अंतर अतिशय कमी असणाऱ्या झाडांवर ही विकृती नेहमी आढळते. काही वेळा स्ट्रॉबेरीच्या झाडांवर रोग किंवा किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास पानांची प्रकाशसंश्लेषणाची क्रिया मंदावते. अशा झाडांमध्ये कमी साखरनिर्मिती झाल्यामुळे अल्बिनो फळे तयार होण्याचे प्रमाण वाढते.

नियंत्रण : अल्बिनिझम विकृतीच्या नियंत्रणासाठी स्ट्रॉबेरीच्या झाडाची शाखीय वाढ आणि फळांचे उत्पादन यांमध्ये योग्य संतुलन राखणे अतिशय महत्त्वाचे आहे. यासाठी पिकाला योग्य प्रमाणात नत्र आणि इतर अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. पिकाचे इतर व्यवस्थापन प्रामुख्याने लागवडीच्या वेळी, लागवडीपूर्वी रोपांचे पुरेसे चिलिंग, पाणी व्यवस्थापन आणि रोग आणि किडींचे नियंत्रण शास्त्रीय पद्धतीने करावे.

कॅट फेस विकृती :

या विकृतीमध्ये फळाचा शेंड्याकडील भाग मांजरीच्या तोंडासारखा दिसतो. फळाची वाढ होत असताना फळाचा काही भाग जास्त वाढतो यामुळे फळाचा आकार वेडावाकडा दिसतो. लागवडीसाठी वापरलेली रोपे अनेक वर्षे उत्पादन केलेल्या स्ट्रॉबेरीच्या खोडापासून तयार केलेली असल्यास अशा झाडांवर कॅट फेस ही विकृती असलेली फळे मोठ्या प्रमाणात तयार होतात. स्ट्रॉबेरीच्या फुलांच्या परागीभवनाच्या काळात अति उष्ण तापमान किंवा अतिथंड तापमान, अन्नद्रव्यांचा असमतोल अथवा लायगस बग, कोळी, इत्यादी किडींच्या उपद्रवामुळे स्ट्रॉबेरीच्या फळांमध्ये कॅट फेस ही विकृती निर्माण होते.

नियंत्रण : या विकृतीच्या नियंत्रणासाठी लायगस बग, कोळी, इत्यादी किडींचा वेळेवर बंदोबस्त करावा. अतिउष्ण तापमान अथवा अतिथंडीपासून फळांचे संरक्षण करण्यासाठी झाडांना तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे.

फळांचा हिरवा शेंडा-पांढरा खांदा विकृती (ग्रीन टिप अँड व्हाईट शोल्डर) :

या विकृतीमध्ये फळाचा शेंड्याकडील भाग आणि देठाकडील भाग न पिकल्यामुळे या भागाला लाल रंग येतो. या विकृतीमध्ये फळाचा शेंड्याकडील भाग हिरवा दिसतो तर देठाकडील भाग पांढरट दिसतो. या विकृतीमुळे फळांचा आकार आणि स्वाद हा सर्वसाधारण असतो. ही विकृती प्रामुख्याने फळे पिकण्याच्या काळात तापमान कमी-जास्त झाल्यामुळे निर्माण होते.

बोरॉन कमतरता विकृती :

या विकृतीमुळे फळांचा आकार लांबट आणि वेडावाकडा होतो. फळांचा काही भाग पूर्ण वाढल्यामुळे खोलगट राहतो. अशी फळे पिकल्यानंतर पूर्ण वाढ झालेल्या भागाचा रंग गर्द लाल होतो; तर वाढ न झालेला भाग पांढरट राहतो. बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे स्ट्रॉबेरीच्या पानांवर फवारा मारून अथवा जमिनीतून अथवा पाण्यामार्फत बोरॉनचा पुरवठा केल्यास या विकृतीचे नियंत्रण होऊ शकते.

अति लहान फळे येणे :

काही वेळा स्ट्रॉबेरीच्या झाडांवर अतिशय लहान आकाराची फळे येतात. या लहान आकाराच्या, पूर्ण वाढ न झालेल्या फळांना लाल रंग येतो. ही फळे नंतर सुकून जातात आणि त्यांचा आकार आणि रंग मनुक्यासारखा दिसतो. स्ट्रॉबेरीच्या पिकाला पाणी कमी पडल्यास अथवा जमिनीतील पाण्याचा योग्य निचरा न झाल्यास अथवा जमिनीत क्षारांचे प्रमाण वाढल्यास किंवा पिकाला अन्नद्रव्य पुरवठ्याचा असमतोल निर्माण झाल्यास फळे लहान राहण्याची आणि लहान फळे पिकण्याची विकृती निर्माण होते. या विकृतीच्या नियंत्रणासाठी झाडाची गरज ओळखून आवश्यक ती अन्नद्रव्ये आणि पाणी यांचा योग्य प्रमाणात पुरवठा करावा.

पाने पिवळी पडणे :

नत्र, सल्फर आणि मॉलिब्डेनम या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पानांचा रंग पिवळा होतो. नत्राच्या कमतरतेमुळे प्रथम पानांचा रंग फिकट हिरवा होतो. पाने लहान आकाराची होतात. पाने पिवळी पडतात. नत्राच्या कमतरतेचे प्रमाण वाढल्यास परिपक्व पानांच्या आणि पानांच्या देठांचा रंग लालसर होतो. पाने शेंड्याकडून वाळत जातात. मॉलिब्डेनम या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे प्रथम पाने पिवळी पडतात. कमतरता वाढल्यास पाने वाळतात किंवा जळाल्यासारखी दिसतात. पानांच्या कडा वरच्या अंगाला वळतात. सल्फरच्या कमतरतेमुळे झाडाची पाने पिवळी होतात, पानांवर वाळलेले भाग दिसतात. नत्राच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यावर दर हेक्टरी 40 ते 50 किलो नत्राचा पुरवठा करावा. मॉलिब्डेनम या अन्नद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास 15 ग्रॅम अमोनियम मॉलिब्डेट किंवा सोडियम मॉलिब्डेट 10 लीटर पाण्यात या प्रमाणात मिसळून फवारणी करावी. गंधकाच्या कमतरतेची लक्षणे दिसून आल्यास पिकाला दर हेक्टरी 500 ते 1,000 किलो जिप्सम द्यावे.

पानांच्या शिरा हिरव्या राहून पाने पिवळी पडणे :

लोह, झिंक, मँगेनीज, कॉपर या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे स्ट्रॉबेरीच्या पानांचा रंग पिवळा पडतो परंतु पानांच्या शिरा हिरव्या राहतात; लोहाच्या कमतरतेमुळे पानांचा रंग गर्द पिवळा होतो, मुळांची वाढ खुंटते, फळांचा आकार लहान होतो, फळांची संख्या कमी होते. लोहाच्या कमतरतेची लक्षणे दिसू लागल्यास 1 ते 2 ग्रॅम फेरस सल्फेट किंवा चिलेटेड आयर्न 1 मीटर झाडांच्या रांगेला जमिनीतून द्यावे. झिंक या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानाच्या कडा हिरव्या राहतात; मात्र पानाचा आतील भाग पिवळा होतो. या विशिष्ट प्रकारास ‘ग्रीन हॉलो’ असे म्हणतात. झिंक या अन्नद्रव्याची कमतरता लक्षणे दिसून आल्यास 1 ते 3 ग्रॅम झिंक सल्फेट एक मीटर झाडांच्या रांगेला जमिनीत द्यावे. मँगेनीजच्या कमतरतेमुळे पानांच्या शिरा हिरव्या राहून शिरांमधील पानाचा भाग पिवळा होतो. पाने कडांच्या बाजूंनी वाळतात, फळांचा आकार लहान होतो. मँगेनीजची कमतरता लक्षणे दिसून आल्यास 1 ते 2 ग्रॅम मँगेनीज सल्फेट पिकाला एक मीटर लांब रांगेत द्यावे किंवा 1.6 ग्रॅम मँगेनीजयुक्त क्षार 10 लीटर पाण्यात या प्रमाणात मिसळून फवारावे. कॉपर या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे स्ट्रॉबेरीची कोवळी पाने फिकट हिरव्या रंगाची होतात. त्यानंतर पानांच्या शिरांमधील भाग एकदम फिकट हिरवट ते पिवळसर रंगाचा होतो. जुनी पाने पांढरट होतात. परंतु त्यांच्या शिरा गर्द हिरव्याच राहतात. कॉपर या अन्नद्रव्याची कमतरता लक्षणे दिसून आल्यास 1 ते 2 ग्रॅम कॉपर सल्फेट किंवा कॉपर चिलेट पिकाला एक लांब रांगेत जमिनीमधून द्यावे.स्ट्रॉबेरीच्या झाडाला सूक्ष्म अन्नद्रव्यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता दिसून आल्यास स्ट्रॉबेरीच्या पिकावर सूक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी करावी.

शेंडा जळणे (टिप बर्न) :

कॅल्शियम आणि बोरॉन या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे झाडांचे शेंडे जळाल्यासारखे दिसतात. या विकृतीला टिप बर्न असे म्हणतात. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे झाडाच्या शेंड्याकडील भाग काळपट होऊन पाने चुरगळल्यासारखी दिसतात. पानाच्या देठातून आणि पानाच्या मागील बाजूच्या शिरांमधून चिकट द्रव बाहेर पडलेला दिसतो. फळांचा आकार लहान होतो. फळांमध्ये बियांचे प्रमाण प्रचंड वाढते. फळे कडक आणि चवीला आंबट लागतात. कॅल्शियमची कमतरता लक्षणे दिसून आल्यास पिकाला दर हेक्टरी 500 ते 1,000 किलो जिप्सम जमिनीमधून द्यावे. बोरॉनच्या कमतरतेमुळे कोवळी पाने ‘चुरगळतात, पानांचा रंग फिकट हिरवा होतो आणि कडा पिवळसर दिसतात फुलांचा आकार लहान होतो. फळातील बियांची संख्या प्रचंड वाढते, बियांमधील अंतर कमी असते. फळावर बियांची गर्दी होते. बोरॉनची कमतरता लक्षणे दिसून आल्यास 2 ते 3 ग्रॅम बोरॅक्स पावडर 10 लीटर पाण्यात या प्रमाणात मिसळून झाडांवर फवारणी करावी.

पाने जळणे :

पोटॅशियम आणि मॅग्नेशियम या अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे स्ट्रॉबेरीची नवीन परंतु पूर्ण वाढ झालेली पाने काळपट विटकरी रंगाची होतात. पानांचा बराचसा भाग वाळलेला किंवा जळालेला दिसतो. पानांच्या देठावर काळपट विटकरी रंगाचे डाग दिसतात. ही लक्षणे दूर करण्यासाठी पोटॅशियम सल्फेट 90 ते 95 किलो दर हेक्टरी द्यावे. मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे स्ट्रॉबेरीच्या झाडाच्या पक्क पानांच्या वरच्या कडा सुरुवातीला पिवळसर तपकिरी रंगाच्या होतात. पाने वरच्या कडांपासून देठाकडे वाळत जातात; परंतु देठाजवळील भाग हिरवा राहतो. मॅग्नेशियमच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास मॅग्नेशियम सल्फेट 50 ते 100 किलो दर हेक्टरी जमिनीमधून द्यावे.

स्फुरदाची कमतरता विकृती :

स्फुरदाच्या कमतरतेमुळे स्ट्रॉबेरीची पाने लहान आकाराची होतात; मात्र पानांचा रंग हिरवाच असतो. पानांवर वरच्या बाजूला काळचा बुटपॉलिशसारखी मेटॅलिक चकाकी येते. पानांच्या खालच्या बाजूला लालसर छटा दिसते. फुलांचा आणि फळांचा आकार लहान होतो. फळे पांढऱ्या रंगाची होतात. स्फुरदाच्या कमतरतेची लक्षणे दिसल्यास 50 किलो स्फुरद दर हेक्टरी जमिनीमधून द्यावे.

स्ट्रॉबेरी पिकातील आंतरमशागत | स्ट्रॉबेरी पिकातील तणनियंत्रण |

स्ट्रॉबेरीच्या पिकापासून भरपूर उत्पादन मिळण्यासाठी स्ट्रॉबेरीच्या पिकात आंतरमशागत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्ट्रॉबेरीच्या पिकामध्ये दोन रोपांतील मोकळया जागेत गहू अथवा भाताचे तूस किंवा काड अथवा निरनिराळ्या प्रकारच्या पॉलिथीन कागदाचे आच्छादन अंथरतात. आच्छादनामुळे जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकून राहतो. शेतातील तणांचे नियंत्रण होते. स्ट्रॉबेरीची फुले आणि फळे नाजूक असल्यामुळे मातीशी त्यांचा संपर्क आल्यास फळांची प्रत खराब होते. फळकूज रोगाचे प्रमाण वाढते. आच्छादनामुळे फळांचा मातीशी संपर्क येत नसल्यामुळे फळांची प्रत चांगली राहते. स्ट्रॉबेरीच्या पिकामध्ये लागवडीनंतर 40 ते 50 दिवसांनी फळे येतात. त्या वेळी पिकामध्ये आच्छादन अंथरावे. लागवडीनंतर काही दिवसांनी लगेच आच्छादन अंथरल्यास आच्छादनाखाली किडी वाढतात आणि या किडींचे नियंत्रण करणे नंतर कठीण जाते. आच्छादन करताना पिकामध्ये पाणी देण्यासाठी ठिबक सिंचनाची व्यवस्था असल्यास ठिबक सिंचनाची नळी आच्छादनाखाली राहील याची काळजी घ्यावी. आच्छादन अंथरताना स्ट्रॉबेरीच्या रोपांचे शेंडे, फुले आणि फळांचे गुच्छ झाकले जाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
स्ट्रॉबेरीच्या पिकाला नत्राचा पुरवठा जास्त प्रमाणात केल्यास झाडाला भरपूर पाने येतात; मात्र फलधारणा उशिरा होते आणि फळे कमी येतात. झाडामधील साखरेचा उपयोग शाखीय वाढीसाठी झाल्यामुळे फळांमध्ये साखरेचे प्रमाण कमी होते. त्यामुळे पांढरी फळे (अल्बिनो फळे) तयार होतात. अल्बिनिझम ही विकृती टाळण्यासाठी प्रत्येक झाडाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून खालची जुनी पाने खोडापासून काढून टाकावीत. यालाच स्ट्रॉबेरीचे प्रूनिंग असे म्हणतात. पाने काढून टाकताना रोपांच्या मुळांना इजा होणार नाही आणि रोप बिनपानाचे होणार नाही याची काळजी घ्यावी.
एप्रिल-मे महिन्यात अतिउष्णतेमुळे स्ट्रॉबेरीची झाडे सुकतात. झाडे सुकून जाऊ नये म्हणून अतिउष्णता असताना रोपांवर सावली करण्यासाठी जाळी (शेडिंग नेट) लावावी. जाळीसाठी अल्ट्रा व्हायोलेट स्टॅबिलाईज्ड पॉलिथीन फिल्मचा वापर करावा.

तणनियंत्रण :

तणे अन्नद्रव्ये, पाणी आणि सूर्यप्रकाश यांसाठी स्ट्रॉबेरीच्या पिकाशी स्पर्धा करतात. स्ट्रॉबेरीची झाडे उंचीला अतिशय लहान असून त्यांची मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरलेली असतात. त्यामुळे स्ट्रॉबेरीची झाडे तणांशी स्पर्धा करू शकत नाहीत. स्ट्रॉबेरीच्या पिकाला वारंवार पाणी द्यावे लागते. प्रामुख्याने तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिलेल्या पिकामध्ये तणांची वाढ जोमाने आणि मोठ्या प्रमाणावर होते. स्ट्रॉबेरीच्या पिकामध्ये घोळू, दुधाणी, चिमणचारा, पांढरी फुली, शिंपी, कुरडू, इत्यादी हंगामी तणे आणि हरळी आणि लव्हाळा ही बहुवर्षीय तणे वाढतात. खुरपणी करून अथवा रासायनिक तणनाशकांचा वापर करून स्ट्रॉबेरीच्या पिकातील तणांचे नियंत्रण करता येते. परंतु पिकामध्ये तणांची वाढ होऊ नये म्हणून जमिनीचे निर्जंतुकीकरण, धुरीकरण अथवा आच्छादनाचा वापर या उपाययोजना जास्त फायदेशीर ठरतात.
जमिनीच्या निर्जंतुकीकरणासाठी ‘मिथिल ब्रोमाईड’ अथवा ‘क्लोरोपिक्रिन’ या दोन विषारी रसायनांचा उपयोग केला जातो. विशिष्ट यंत्राचा उपयोग करून ही दोन रसायने जमिनीमध्ये 15 ते 20 सेंटिमीटर खोलीवर सोडली जातात आणि नंतर जमिनीवर जाड पॉलिथीनचा कागद (हाय डेन्सिटी पॉलिथीन फिल्म ) अंथरतात. या धुरीकरणामुळे जमिनीतील सर्व रोगजंतू, बुरशी आणि किडी यांचा नाश होतो. जमिनीत असणाऱ्या तणांच्या बियांची उगवणशक्ती नष्ट होऊन पिकामध्ये तणांची वाढ होत नाही. सुरुवातीपासूनच तणांची वाढ न झाल्यामुळे स्ट्रॉबेरीची झाडे जोमाने वाढतात. स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड केल्यानंतर जमिनीवर काळया किंवा काळ्या-पांढऱ्या रंगाचे आच्छादन केल्यास तणांचा उत्तम बंदोबस्त होतो. आच्छादनासाठी भाताचे किंवा गव्हाचे तूस, काड अथवा पालापाचोळा यांचाही वापर केला जातो.
स्ट्रॉबेरीच्या पिकामधील हंगामी तणांचा नाश करण्यासाठी खुरपणी करून तणे काढून टाकावीत. हरळी आणि लव्हाळा या बहुवर्षीय तणांचा बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक तणनाशकांचा वापर करावा. यासाठी ग्लायफोसेट किंवा वीडॉफ हे तणनाशक 10 लीटर पाण्यात 100 मिलिलीटर या प्रमाणात मिसळून तण वाढलेल्या भागात फवारावे. तणनाशक स्ट्रॉबेरीच्या पिकावर उडाल्यास स्ट्रॉबेरीची झाडे मरतात. यासाठी तणनाशक स्ट्रॉबेरीच्या पिकावर उडणार नाही याची काळजी घ्यावी. विशिष्ट प्रकारच्या फवाऱ्याचा नोझल वापरून तणनाशकाची फवारणी करावी.

स्ट्रॉबेरी पिकाच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री |

स्ट्रॉबेरीच्या झाडाला फुले आल्यानंतर 45-50 दिवसांनी फळे काढणीस तयार होतात. जानेवारी ते मार्च हा फळांचा हंगाम असतो. फळे पिकण्यास सुरुवात झाल्यावर फळावर गुलाबी छटा येते. स्ट्रॉबेरीचे पूर्ण पिकलेले फळ आकर्षक गर्द लाल रंगाचे दिसते. फळे पूर्ण पिकल्यानंतरही काही फळांमध्ये फळाचा देठाकडील भाग हिरवट पांढुरका राहतो. जवळच्या बाजारपेठेसाठी फळे पूर्णपणे गर्द लाल रंगाची झाल्यावर तोडावीत. लांबच्या बाजारपेठेसाठी देठाकडील भाग थोडासा पांढरा असलेली आणि बाकी सर्व भाग गर्द लाल झालेली फळे काढावीत.
स्ट्रॉबेरीची फळे जसजशी पिकतील तसतशी काढावीत. स्ट्रॉबेरीची फळे काढताना फळाच्या देठाकडील भागावर असणारी हिरवी टोपी (कॅलेक्स) फळे पिकल्यानंतरही हिरवीच राहते. स्ट्रॉबेरीची फळे काढताना ही टोपी फळाबरोबरच राहील अशा रितीने स्ट्रॉबेरीची फळे तोडून फळांची काढणी करावी. त्यामुळे फळे काढणीनंतर अधिक काळ टिकतात. फळे तोडताना फळांना हात लागणार नाही याची काळजी घ्यावी. फळांची तोडणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी करावी. फळांची काढणी करताना फळांचा आकार आणि रंगाप्रमाणे फळांची प्रतवारी करावी.
फळांची काढणी आणि प्रतवारी केल्यानंतर फळांचे पॅकिंग करून फळे विक्रीसाठी पाठवावीत. स्ट्रॉबेरीच्या फळांच्या वजनाप्रमाणे फळांचे वेगवेगळया प्रकारे पॅकिंग केले जाते. 250 ते 500 ग्रॅम वजनाची फळे बसू शकतील अशा प्लॅस्टिकच्या डब्यांना पनेट असे म्हणतात. 2 ते 5 किलो फळांचे पॅकिंग करण्यासाठी कागदी पुट्ट्यांचे बॉक्सेस वापरतात. स्ट्रॉबेरीच्या पिकापासून दर हेक्टरी 25 ते 30 टन फळांचे उत्पादन मिळते. स्ट्रॉबेरीच्या एका झाडापासून एका हंगामात सर्वसाधारणपणे अर्धा किलो फळे मिळतात.

स्ट्रॉबेरी पिकाच्या फळांची साठवण | स्ट्रॉबेरी फळे पिकविण्याच्या पद्धती |

स्ट्रॉबेरीची फळे पक्व झाल्यानंतरच काढली जातात. त्यामुळे फळांच्या काढणीनंतर फळे पिकविण्याच्या स्वतंत्र पद्धती नाहीत. काढणी केलेल्या स्ट्रॉबेरीच्या फळांचे तापमान वातावरणाच्या तापमानाइतके किंवा शेतातील उष्णतेइतके (फिल्ड हीट) असते. स्ट्रॉबेरीची फळे याच तापमानाला साठविल्यास फळे लवकर खराब होतात आणि एक ते दोन दिवसांपेक्षा जास्त काळ टिकत नाहीत; म्हणूनच फळांची काढणी केल्यानंतर फळांचे तापमान लगेच कमी करणे आवश्यक असते. यालाच स्ट्रॉबेरीच्या फळांचे प्रीकूलिंग असे म्हणतात. यासाठी फळे एकदम कमी तापमानाला ठेवून थंड वारे फळावरून सोडून फळातील उष्णता काढून घेतली जाते. स्ट्रॉबेरीच्या फळांचे काढणीनंतरचे तीन तासांच्या आत शून्य अंश सेल्सिअसपर्यंत तापमान आणण्यासाठी प्रीकूलिंग करावे. या तापमानाला फळे तीन तास ठेवावीत. अशा प्रकारे प्रीकूलिंग करावे. अशा प्रकारे प्रीकूलिंग केलेली फळे आठ दिवस चांगली राहू शकतात.

सारांश |

स्ट्रॉबेरी हे समशीतोष्ण कटिबंधातील पीक असून या पिकाला फुले येण्यासाठी सूर्यप्रकाशाचा ठरावीक कालावधी आणि विशिष्ट तापमानाची आवश्यकता असते. यावरूनच स्ट्रॉबेरीच्या जातींचे ‘शॉर्ट डे’ आणि ‘डे न्यूट्रल’ असे दोन प्रकार पडतात. डग्लस, चँडलर, पाजारो, ओसो ग्रैंडी या स्ट्रॉबेरीच्या प्रमुख शॉर्ट डे जाती आहेत. तर सेल्वा, फर्न, आयर्विन या डे न्यूट्रल जाती आहेत.
स्ट्रॉबेरीची अभिवृद्धी निरनिराळ्या पद्धतीने करता येते; परंतु फळांचे उत्पादन घेण्यासाठी स्ट्रॉबेरीची लागवड करताना स्ट्रॉबेरीच्या धावत्या खोडांपासून अभिवृद्धी करावी. बियांपासून अभिवृद्धी केलेल्या रोपांपासून मातृवृक्षाचे सर्व गुणधर्म येत नाहीत. मात्र दोन जातींचा संकर करून नवीन जाती निर्माण करण्यासाठी बियांपासूनच अभिवृद्धी करावी लागते. ऊतिसंवर्धनाद्वारे (टिश्यू कल्चर) तयार केलेली रोपे लागवडीसाठी वापरून रोगमुक्त आणि अधिक जोमदार पीक घेता येते.
स्ट्रॉबेरीची झाडे जमिनीतील क्षारांना अतिशय संवेदनक्षम आहेत. त्यामुळे स्ट्रॉबेरीच्या लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचे तसेच पाण्याचे रासायनिक पृथक्करण करून घेणे अत्यंत आवश्यक असते. स्ट्रॉबेरीच्या पिकाला लागवडीनंतर सुरुवातीचे तीन आठवडे दररोज तुषार सिंचन पद्धतीने पाणी द्यावे. त्यानंतर पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. जमिनीत उपलब्ध असलेल्या अन्नद्रव्यांच्या प्रमाणावरून स्ट्रॉबेरीच्या पिकाचे खत आणि पाणी व्यवस्थापन, रोग आणि किडींचा बंदोबस्त, तणांचे नियंत्रण, आंतरमशागतीची कामे आणि इतर व्यवस्थापन योग्य प्रकारे केल्यास स्ट्रॉबेरीच्या पिकाचे भरघोस उत्पादन मिळते. स्ट्रॉबेरीच्या एका झाडापासून सर्वसाधारणपणे अर्धा किलो फळे मिळतात. स्ट्रॉबेरीच्या फळांना देशांतर्गत आणि देशाबाहेरील बाजारपेठेत असलेली प्रचंड मागणी लक्षात घेता स्ट्रॉबेरीच्या लागवडीस भरपूर वाव आहे. विशेषतः ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत युरोपीय देशांमध्ये हवामानाच्या प्रतिकूलतेमुळे स्ट्रॉबेरीच्या उत्पादनावर पडणाऱ्या मर्यादा आणि तरीही याच काळात ख्रिसमस, न्यू इयर यांसारख्या प्रमुख सणांमुळे स्ट्रॉबेरीच्या ताज्या फळांना तेथे असलेली मागणी आणि नेमक्या याच काळात भारतात मिळणारे स्ट्रॉबेरीचे उत्पादन या गोष्टी लक्षात घेता भारतातून स्ट्रॉबेरीची अतिशय मोठ्या प्रमाणावर निर्यात करता येणे शक्य आहे.

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )