जाणून घ्या स्ट्रेलिटूझिया लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Strelitzia Lagwad Mahiti Strelitzia Sheti) – Strelitzia Farming

स्ट्रेलिटूझिया लागवड । Strelitzia Lagwad | Strelitzia Sheti | स्ट्रेलिटूझिया लागवड महत्त्व । स्ट्रेलिटूझिया लागवडी खालील क्षेत्र । स्ट्रेलिटूझिया उत्पादन । स्ट्रेलिटूझिया लागवडीस योग्य हवामान । स्ट्रेलिटूझिया लागवडीस योग्य जमीन । स्ट्रेलिट्झिया पिकाच्या उन्नत जाती । स्ट्रेलिटूझिया पिकाची अभिवृद्धी । स्ट्रेलिटूझिया पिकाची लागवड पद्धती । स्ट्रेलिटूझिया पिकास खत व्यवस्थापन । स्ट्रेलिटूझिया पिकास पाणी व्यवस्थापन । स्ट्रेलिटूझिया पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । स्ट्रेलिटूझिया पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।स्ट्रेलिटूझिया फुलांची काढणी आणि साठवण ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

स्ट्रेलिटूझिया लागवड । Strelitzia Lagwad | Strelitzia Sheti |

स्ट्रेलिटूझिया या फुलझाडाचे उगमस्थान दक्षिण आफ्रिका हा देश आहे. या फुलझाडाला ‘बर्ड ऑफ पॅराडाईज’ असे म्हणतात. मराठीत याचा अर्थ ‘स्वर्गातील पक्षी’ असा होतो. स्ट्रेलिट्झियाचे पूर्ण उमललेले फूल पक्ष्याच्या डोक्यावरील तुऱ्याप्रमाणे दिसते. म्हणूनच या फुलझाडाला ‘बर्ड ऑफ पॅराडाईज’ असे म्हणतात. या फुलझाडाच्या वैशिष्टयपूर्ण आकारामुळे त्याला कटफ्लॉवर्स म्हणून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. याशिवाय बागेतील एक अभिमानास्पद फुलझाड, त्याचप्रमाणे उद्यानातील एक वैशिष्ट्यपूर्ण घटक म्हणून या फुलझाडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्रातील सौम्य हवामानात स्ट्रेलिट्झिया या फुलझाडाची उघड्या शेतात लागवड करण्यास भरपूर वाव आहे.

स्ट्रेलिटूझिया लागवड महत्त्व । Importance of Strelituzia Cultivation.

स्ट्रेलिट्झिया हे सौम्य हवामानात वाढणारे बहुवर्षायु फुलझाड आहे. या फुलझाडाला जमिनीत कंद असतात. सामान्यपणे झाडाला खोड नसते; परंतु काही वेळा लाकडी उभट खोड वाढते. या फुलझाडाची पाने मोठी आणि लांब दांड्याची असतात. पानाच्या आवरणातून शेंड्यावर किंवा वरील पानाच्या बेचक्यातून फुलोरा निघतो. या फुलोऱ्याला स्केप असे म्हणतात. फुलोऱ्याचे सहपत्र मोठे, बोटीच्या आकाराचे आणि शेंड्याकडे टोकदार असते याला स्पिथ अथवा ब्रॅक्ट असेही म्हणतात. फुलाचे निदलपुंज (कॅलिक्स) मोकळे आणि लांब असतात. फुलाच्या पाकळ्या तेजस्वी नारिंगी रंगाच्या आणि टोकदार असतात. मात्र सर्व पाकळ्या एकसारख्या नसतात. फुलात 5 पुंकेसर असतात. अंडाशय 3 पेशींचे व अनेक बियांचे बनलेले असते.
स्ट्रेलिटूझिया या फुलाच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे व तेजस्वी रंगामुळे ही फुले कटफ्लॉवर्स म्हणून लोकप्रिय झाली आहेत. बागेमध्ये स्ट्रेलिट्झिया हे फुलझाड असणे ही एक अभिमानास्पद बाब मानली जाते. याशिवाय या फुलझाडामुळे बागेला विशेष शोभा येते. ही फुलझाडे झुडपी झाडांच्या किनारीच्या मागे किंवा झुडपासमोर (श्रबरी), तलावाच्या किंवा कमळ असलेल्या तळ्याच्या बाजूला शोभेसाठी लावतात. फुलधारणेच्या काळात ही फुले अतिशय सुंदर दिसतात.

स्ट्रेलिटूझिया लागवडी खालील क्षेत्र । स्ट्रेलिटूझिया उत्पादन । Areas below Strelituzia cultivation. Strelituzia production.

स्ट्रेलिटूझिया या फुलझाडाचे उगमस्थान दक्षिण आफ्रिका हा देश आहे. जगातील अनेक देशांत या फुलझाडांची स्थानिक विक्रीसाठी किंवा परदेशी निर्यातीसाठी लागवड केली जाते. जगामध्ये विशेषतः कॅलिफोर्निया, हवाई, इस्राईल, दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये या फुलझाडाची कटफ्लॉवर्सच्या उत्पादनासाठी व्यापारी तत्त्वावर लागवड करतात. भारतातील मैदानी प्रदेश वगळता इतर ठिकाणच्या सौम्य हवामानात या पिकाची चांगल्या प्रकारे लागवड करता येते.

स्ट्रेलिटूझिया लागवडीस योग्य हवामान । स्ट्रेलिटूझिया लागवडीस योग्य जमीन । Climate suitable for cultivation of Strelituzia. Land suitable for Strelituzia cultivation.

भारताच्या मैदानी प्रदेशात या फुलझाडाची लागवड करणे कठीण असते. सौम्य हवामानात उघड्यावर पूर्णपणे उन्हाळा किंवा किंचित सावलीच्या परिस्थितीत या फुलझाडाची चांगली वाढ होते. थंड हवामानाच्या प्रदेशात पोयटा मातीमिश्रित कुंड्यात ही फुलझाडे वाढवितात. या फुलझाडाच्या वाढीसाठी रात्रीचे तापमान 10 ते 13 अंश सेल्सिअस आणि दिवसाचे तापमान 20 ते 22 अंश सेल्सिअस असावे.
बहुतेक प्रदेशात स्ट्रेलिट्झियाच्या फुलांचे उत्पादन हंगामी असते. कॅलिफोर्नियामध्ये या फुलांचा हंगाम सप्टेंबर ते मे महिन्यांत असतो; परंतु ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात जास्त फुले येतात. दक्षिण आफ्रिकेत स्ट्रेलिट्झियाच्या फुलांचा हंगाम ऑक्टोबर ते डिसेंबर आणि नंतर मार्च – एप्रिल या काळात असतो. इस्राईलमध्ये मार्च – एप्रिल महिन्यांत आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात अशी वर्षातून दोन वेळा फुलधारणा होते. हवाई या देशातील कमी उंचीच्या प्रदेशात जून ते सप्टेंबर महिन्यांत आणि जास्त उंचीच्या प्रदेशात हिवाळ्यात फुलधारणा होते. जसजसे झाडाचे वय वाढत जाते, तसतसे फुलांचे उत्पादन वाढते. हवाईमध्ये जानेवारी-मार्च महिन्यांत फुलांचे उत्पादन कमी मिळते तर जुलै ते सप्टेंबर या काळात फुलांचे सर्वांत जास्त उत्पादन मिळते. त्यानंतर पुन्हा डिसेंबर महिन्यात उत्पादन कमी मिळते. प्रकाशाच्या अवधीचा फुलधारणेवर परिणाम होतो. प्रकाशाची तीव्रता कमी असल्यास सावलीमुळे स्ट्रेलिटूझियाच्या फुलांचे उत्पादन कमी येते.
साधारणपणे स्ट्रेलिटूझियाच्या प्रत्येक पानाच्या बेचक्यातून फूल वाढते. त्यामुळे पानांच्या संख्येवर फुलांचे उत्पादन अवलंबून असते. उबदार पानांची वाढ झपाट्याने होते.

पान निघाल्यापासून काढणीच्या अवस्थेपर्यंत फुलाची वाढ होण्यास हवाईमध्ये एक वर्षापेक्षा कमी काळ लागतो, तर दक्षिण आफ्रिका व कॅलिफोर्नियात एक वर्षापेक्षा जास्त काळ लागतो. हवाई आणि ऑस्ट्रेलियात उन्हाळ्यात फुलाचा देठ दिसल्यापासून फुलाचा विकास होण्यास 8 आठवडे लागतात. तापमान 17 ते 27 अंश सेल्सिअस असल्यास स्ट्रेलिटूझियाच्या फुलांचा विकास एकसमान व झपाट्याने होतो.
या फुलझाडाच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय खताचे भरपूर प्रमाण असलेली पोयटायुक्त प्रकारची जमीन अधिक योग्य असते. उत्तम निचऱ्याच्या खडीच्या जमिनीतही या फुलझाडाची लागवड करता येते. या फुलझाडाची कुंडीत लागवड करावयाची असल्यास कुंडी भरण्याच्या माध्यमात प्रत्येकी एक भाग सेंद्रिय माती, पीट व वाळू हे घटक असावेत.

स्ट्रेलिटूझिया पिकाच्या उन्नत जाती । Improved varieties of Strelitzia plant.

स्ट्रेलिट्झिया या फुलझाडाच्या चार प्रमुख प्रजाती आहेत :

स्ट्रेलिटूझिया रेगीना ।

प्रजाती सर्वाधिक लोकप्रिय आहे. तिलाच ‘बर्ड ऑफ पॅराडाईज’ असे म्हणतात. या प्रजातीचे झाड 90 सेंटिमीटर उंच वाढते. झाडाच्या मुळ्या मोठ्या आणि मजबूत असतात. पानाचा देठ सुमारे 45 सेंटिमीटर लांब असतो. तेवढाच लांब पानाचा पृष्ठभाग असतो. एका मागोमाग येणारी पाने पंख्यासारखी दिसतात. फुले तेजस्वी नारिंगी आणि जांभळ्या रंगाची असतात. बोटीच्या आकाराच्या हिरव्या ब्रॅक्ट अथवा स्पिथमधून फुले निघतात. फुले अतिशय सुंदर व लांब देठाची असतात.

या प्रजातीचे पुढीलप्रमाणे तीन प्रकार आहेत.

(क) ह्युमलिस : या प्रकारातील झाड अतिशय आटोपशीर (कॉम्पॅक्ट) असते.

(ख) ग्लौका : या प्रकारातील झाडांची पाने आकर्षक असतात.

(ग) रूटिलान्स : या प्रकारातील झाडांना अतिशय तेजस्वी रंगाची फुले येतात. पानातील मध्यशीर जांभळट रंगाची असते.

स्ट्रेलिट्झया ऑगस्टा :

या प्रजातीचे झाड पाच मीटरपर्यंत उंच वाढते. झाडाची पाने 60 ते 90 सेंटिमीटर लांब असतात तर पानाचा देठ 120 ते 180 सेंटिमीटर लांब असतो. या झाडाच्या फुलोऱ्यामध्ये दोन स्पिथ असतात. फुले पांढऱ्या रंगाची असतात.

स्ट्रेलिटूझिया किवेनसीस :

ही प्रजाती स्ट्रेलिटूझिया ऑगस्टा आणि स्ट्रेलिट्झिया रेगीना या दोन प्रजातींच्या संकरातून विकसित करण्यात आली आहे. या प्रजातीची झाडे 1.5 मीटर उंच वाढतात. झाडाची पाने 60 सेंटिमीटर लांब आणि 35 सेंटिमीटर रुंद असतात. फुले फिक्कट पिवळ्या रंगाची असतात.

स्ट्रेलिटूझिया निकोलाय :

या प्रजातीची झाडे स्ट्रेलिटूझिया ऑगस्टा या प्रजातीच्या झाडांसारखी असतात. मात्र या झाडाची फुले पिवळ्या रंगाची असतात.

स्ट्रेलिटूझिया पिकाची अभिवृद्धी । स्ट्रेलिटूझिया पिकाची लागवड पद्धती । Growth of Strelituzia crop. Cultivation method of Strelituzia crop.

स्ट्रेलिटूझिया या फुलझाडाची अभिवृद्धी बियांपासून किंवा बुडख्यापासून मुनवे वेगळे करून करतात. बियांपासून अभिवृद्धी केलेल्या झाडापेक्षा शाखीय अभिवृद्धीने तयार केलेल्या झाडांना फुले लवकर लागतात. स्ट्रेलिटूझियाच्या फुलांचे परागीकरण हाताने केले तरच या फुलात बी धरते. हे बी उगवण्यासाठी जास्त तापमान लागते.
मुनव्यापासून लागवड केलेल्या स्ट्रेलिट्झियाच्या झाडाला फुलधारणा होण्यास 3 ते 5 वर्षे लागतात. मात्र फुलझाडाची लागवड आणि खताचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास लागवडीनंतर अडीच वर्षांत फुलधारणा होते. त्यासाठी जमिनीच्या मशागतीपासून फुलधारणा होईपर्यंत या फुलझाडाला योग्य वेळी योग्य प्रमाणात खते द्यावी लागतात. कुंड्यांमध्ये लागवड करण्यापूर्वी कुंड्या चांगल्या प्रकारे स्वच्छ केल्यानंतर त्यांमध्ये आवश्यक प्रमाणात कंपोस्ट खत भरावे. कुंडीच्या मध्यभागी मुनवा लावून पाणी द्यावे. या फुलझाडाच्या मुळ्या कुंडीत पसरत वाढतात. म्हणून लागवड करताना मुळ्या एका जागी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. मुनवे काढून कुंड्यांत लावण्याचे काम मार्च ते मे महिन्यांत करावे. एका कुंडीतून दुसऱ्या कुंडीत लहान झाड बदलण्याचे कामही दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यांत करावे. मात्र त्या वेळी कुंडीचा आकार वाढवावा. स्ट्रेलिटूझियाची लागवड शेतात करण्यासाठी सुरुवातीला 90 सेंटिमीटर x 90 सेंटिमीटर आकाराचे खड्डे खोदावेत. या खड्डयांत माती व सेंद्रिय खताचे मिश्रण भरावे. साधारणपणे एक चौरस मीटर जागेत दोन झाडे लावावीत. यासाठी लागवडीचे अंतर 50 X 50 सेंटिमीटर इतके असावे. या फुलझाडाचा चांगला जम बसण्यास दीर्घ काळ लागतो. त्यामुळे सुरुवातीच्या काळात झाडांचे वारंवार स्थलांतर करू नये.

स्ट्रेलिटूझिया पिकास खत व्यवस्थापन । स्ट्रेलिटूझिया पिकास पाणी व्यवस्थापन । Manure management of Strelituzia crops. Water management for Strelituzia crops.

स्ट्रेलिट्झियाची लागवड करण्यापूर्वी जमिनीत पुरेशी सेंद्रिय खते मिसळल्यास फुलझाडांची समाधानकारक वाढ होते. द्रवरूप खतामुळे फुलझाडांची वाढ आणि फुलधारणा सुधारते. 10 लीटर पाण्यात 60 ग्रॅम सुपरफॉस्फेट व 30 ग्रॅम पोटॅशियम नायट्रेट मिसळून त्या द्रावणाची 10 दिवसांच्या अंतराने झाडांवर फवारणी करावी. ही फवारणी नियमितपणे 3 महिने करावी.
लागवड केल्यानंतर स्ट्रेलिट्झियाच्या फुलझाडाला पहिले पाणी लगेच द्यावे. त्यानंतर झाडांच्या गरजेप्रमाणे आणि भोवतालच्या हवामानानुसार पाणी द्यावे. उन्हाळ्यात या फुलझाडांना जास्त पाणी देण्याची आवश्यकता असते. यासाठी वाफे आठवड्यातून एकदा तरी चांगले भिजवावेत. प्रत्येक वेळी पाणी दिल्यानंतर जमीन मोकळी भुसभुशीत करून घ्यावी. यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्याबरोबरच तणांचे नियंत्रण करता येते.

स्ट्रेलिटूझिया पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । Important pests of Strelituzia crops and their control.

स्ट्रेलिट्झिया हे फुलझाड काटक असल्यामुळे त्यावर रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. या फुलझाडावर पिठ्या ढेकूण (मिलिबग) आणि खवले कीड या दोन प्रमुख किडींचा प्रादुर्भाव होतो. या किडींच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 मिलिलीटर मॅलॅथिऑन ( 50% प्रवाही) किंवा 20 मिलिलीटर डायमेथोएट ( 30% प्रवाही) हे कीटकनाशक मिसळून 15 दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.

स्ट्रेलिटूझिया पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important diseases of Strelituzia crop and their control.

स्ट्रेलिट्झया या फुलझाडाच्या कळ्यांचे नुकसान मुख्यतः फ्युजॅरियम नावाच्या बुरशीने होते. तर फुलांचे नुकसान बोट्रायटीस सिनेरिया नावाच्या बुरशींमुळे होते. या फुलझाडाच्या ‘बी आणि रोपावर मुख्यतः फ्युजॅरियम ही बुरशी आढळते. त्यामुळे रोपांच्या मुळाची कूज होते. मूळकूज या रोगाच्या नियंत्रणासाठी खोलीच्या तापमानात पाण्यात बी भिजवावे. त्यानंतर बी गरम पाण्यात ( तापमान 57 अंश सेल्सिअस) 30 मिनिटे भिजत ठेवावे. जमिनीचे तापमान, सामू आणि सूक्ष्मजंतू यांमुळे या फुलझाडामध्ये महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. स्ट्रेलिट्झियाच्या फुलझाडावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जमीन निर्जंतूक करून घ्यावी.

स्ट्रेलिटूझिया फुलांची काढणी आणि साठवण । Harvesting and storage of Strelituzia flowers.

स्ट्रेलिट्झियाच्या स्पिथमधून बाहेर येणाऱ्या फुलोऱ्यातील पहिले फूल उमलल्यानंतर या फुलांची कापणी करावी. फुलांच्या कळ्या घट्ट अवस्थेत असताना कापणी केल्यास एक महिन्यापर्यंत फुले साठविता येतात. फुले दूरच्या बाजारपेठेत पाठविण्यापूर्वी त्यावर सुक्रोज, 8- हायड्रॉक्सिक्युनोलीन सायट्रेट व सायट्रिक अॅसिडची प्रक्रिया करावी. ह्या रसायनांच्या अनुक्रमे 10%, 250 पीपीएम आणि 150 पीपीएम द्रावणात स्ट्रेलिट्झियाची घट्ट कळीच्या अवस्थेतील फुले 22 अंश सेल्सिअस तापमानात 2 दिवस बुडवून ठेवावीत. स्ट्रेलिटूझियाची लांब दांड्याची फुले फुलदाणीत 7 ते 10 दिवस टिकतात. स्ट्रेलिट्झियाची फुले कमी तापमानाला जास्त काळ साठविता येत नाहीत. स्ट्रेलिटूझियाची फुले 10 अंश सेल्सिअस तापमानाला 4 दिवस साठविता येतात.

सारांश ।

स्ट्रेलिटूझिया या फुलझाडाला ‘बर्ड ऑफ पॅराडाईज’ असे म्हणतात. हे झाड आटोपशीर (कॉम्पॅक्ट) असून सुमारे 1.5 मीटर उंच वाढते. या झाडाला खोड नसते. या फुलझाडाची पाने हिरव्या रंगाची असून त्यावर निळसर करड्या रंगाची छटा असते. पाने लांब देठावर वाढतात. फुले अतिशय सुंदर असून लांब दांड्याची असतात. हिरव्या-लाल किनारीच्या बोटीच्या आकाराच्या ब्रॅक्टमधून फूल निघते. फुलांच्या अनेक पाकळ्या असतात. त्या टोकदार व तेजस्वी नारिंगी रंगाच्या असतात. पूर्णपणे उमललेले फूल उडत्या पक्ष्याप्रमाणे दिसते.
सौम्य हवामानात उघड्यावर किंवा किंचित सावलीच्या परिस्थितीत या फुलझाडाची चांगली वाढ होते. या फुलझाडाच्या लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची, सेंद्रिय खताचे प्रमाण भरपूर असलेली पोयट्याची जमीन योग्य असते. या फुलझाडाची अभिवृद्धी बियांपासून, बुडखाची विभागणी करून व मुनवे वेगळे करून करतात. स्ट्रेलिट्झियाची मुनव्यापासून योजनाबद्ध लागवड करावी आणि सुरुवातीपासून ते फुलधारणा होईपर्यंत पिकाला शिफारशीप्रमाणे खतांचे नियोजन करावे. लागवडीनंतर पहिले पाणी लगेच द्यावे; परंतु त्यानंतर झाडाची गरज आणि भोवतालची परिस्थिती पाहून पाणी द्यावे. या फुलझाडावर पिठ्या ढेकूण व खवले कीड या दोन प्रमुख किडी आढळतात. त्यांच्या नियंत्रणासाठी शिफारशीप्रमाणे मॅलॅथिऑनची फवारणी करावी.
स्ट्रेलिट्झियाच्या फुलझाडावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी लागवडीपूर्वी जमिनीचे निर्जंतुकीकरण करावे. तसेच बियाण्याला गरम पाण्याची प्रक्रिया करावी. सर्वसाधारणपणे पहिले फूल उमलल्यानंतर फुलांची काढणी करावी.
फुलांच्या कळ्या घट्ट अवस्थेत असताना फुलांची काढणी केल्यास एक महिन्यापर्यंत फुले साठविता येतात.

जाणून घ्या अँथुरियम लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Anthurium flower Lagwad Mahiti Anthurium Sheti) – Anthurium Farming

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )