जाणून घ्या सुपारी लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Supari Lagwad Mahiti Supari Sheti) – Areca nut Farming

सुपारी लागवड । Supari Lagwad । Supari Sheti । सुपारी पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार । सुपारी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि सुपारी पिकाचे उत्पादन । सुपारी पिकासाठी हवामान । सुपारी पिकासाठी जमीन । सुपारी पिकाच्या सुधारित जाती । सुपारी पिकाची अभिवृद्धी । सुपारी पिकाची लागवड पद्धती । सुपारी पिकाचा लागवड हंगाम । सुपारी पिकाचे लागवडीचे अंतर । सुपारी पिकासाठी खत व्यवस्थापन । सुपारी पिकासाठी पाणी व्यवस्थापन । सुपारी पिकातील आंतरपिके । सुपारी पिकातील तणनियंत्रण । सुपारी पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । सुपारी पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । सुपारीच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री । सुपारीच्या फळांची साठवण आणि हाताळणी ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

सुपारी लागवड : Supari Lagwad : Supari Sheti :

सुपारीस पोफळी, अरेकानट पाम, बीटलनट पाम या नावाने ओळखले जाते. मसाल्याचे तसेच व्यापारी पीक म्हणून फार पूर्वीपासून आपल्याकडे सुपारीची लागवड होत आहे. धार्मिक कार्यात, शुभ कार्यात पैज लावण्यात, शब्द पाळण्यात सुपारीचे फळ वापरले जाते. कोकणात सुपारी लागवड होते. सुपारी फळांची, तसेच सुपारीपासून बनविलेली इतर उत्पादने – सुगंधी सुपारी, गुटखा, दंतमंजन यांची निर्यात केली जाते. महाराष्ट्रात सुमारे 2.500 हेक्टर क्षेत्र या फळाखाली आहे.

सुपारी पिकाचा उगमस्थान, महत्त्व आणि भौगोलिक प्रसार ।

सुपारीच्या मूळस्थानाबद्दल मतभेद आहेत. तथापि, मलाया, मलेशिया हे मूळस्थान बहुतेकजण मान्य करतात.
सुपारी पानाबरोबर, मसाल्यात वापरतात. धार्मिक कार्यात सुपारी फळास फारच महत्त्व आहे. सुपारी फळ फारच टिकाऊ आहे. कदाचित टिकण्यात ते सर्व फळांत अधिक
असावे.
सुपारीचा विस्तार भारत, बांगला देश, म्यानमार, श्रीलंका, मॉरिशस, सिंगापूर, इत्यादी भागांत झालेला आहे. दक्षिण भारतात सुपारी लागवड होते. केरळ, गोवा, कोकण भागात सुपारी लागवड अनेक वर्षांपासून केली जाते.

सुपारी पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र आणि सुपारी पिकाचे उत्पादन ।

भारतात सुपारीखाली 25,000 हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 2,500 हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात आहे. कोकण भागात सुपारीची लागवड अधिक आहे. एका झाडापासून दरवर्षी 3 ते 5 किलो सुपारी मिळते. हेक्टरी उत्पादकता सुमारे 700 ते 750 किलोची आहे.

सुपारी पिकासाठी हवामान । सुपारी पिकासाठी जमीन ।

या पिकास दमट आणि मध्यम तापमान मानवते. सुमारे 20 ते 35 अंश सेल्सिअस तापमानात सुपारीचे चांगले उत्पादन मिळते. सुपारीस समुद्राकाठची, वाळूची, गाळाची जमीन तसेच निचरा होणारी जमीन तसेच बारमाही ओलिताची सोय असावी लागते.

सुपारी पिकाच्या सुधारित जाती ।

श्रीवर्धिनी सुपारी :

ही जात डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाने श्रीवर्धन परिसरातील स्थानिक जातीतून निवड पद्धतीने विकसित केलेली प्रसिद्ध जात आहे. कोकणामध्ये ही जात उत्तम प्रकारे येते. ह्या जातीच्या प्रत्येक झाडापासून प्रतिवर्षी अडीच ते तीन किलो सुपारी मिळते. श्रीवर्धनी रोठा नावाने ही सुपारी विकली जाते. ही सुपारी मोठ्या आकाराची असून तिच्यातील पांढऱ्या गराचे प्रमाण जास्त आहे. ती मऊ आणि चवीला गोड असते.

मंगला सुपारी :

ही जात विदठल या कर्नाटकातील केंद्रावर विकसित झालेली आहे. ही जातही उत्पादनास चांगली आहे. या सुपारीला लवकर म्हणजे पाचव्या वर्षापासून फळे लागतात. पोफळीची उंची मध्यम असते व मध्यम आकाराची फळे येतात.

सुपारी पिकाची अभिवृद्धी । सुपारी पिकाची लागवड पद्धती ।

सुपारीची लागवड रोपापासून करतात. लागवडीसाठी जाड बुंध्याची, जोमदार आणि 15 ते 18 महिने वयाची रोपे निवडावीत. रोपास 4-5 पाने असावीत. दाट सावलीतील उंच व लांब पानांची रोपे लागवडीसाठी निवडू नयेत. निवडलेल्या मातृवृक्षांची पूर्ण पिकलेली, जड आणि मोठ्या आकाराची फळे रोपे करण्यासाठी वापरावीत. अशी ताजी फळे 2 ते 3 दिवसांत गादीवाफ्यावर देठ वर ठेवून 2 सेंमी. खोल पेरावीत. दोन बियांतील अंतर 20 सेंमी. ठेवावे. वाफ्याला दररोज नियमितपणे पाणी द्यावे. पेरणीनंतर 40 दिवसांनी रुजवा सुरू होऊन रोपे वाढू लागतात. नविन रोपांचे उन्हापासून संरक्षण करावे.

सुपारी पिकाचा लागवड हंगाम । सुपारी पिकाचे लागवडीचे अंतर ।

सुपारीची लागवड जून महिन्यात करावी. अधिक पाऊस पडणाऱ्या भागात सप्टेंबर महिना लागवडीस योग्य ठरतो. लागवडीसाठी 60 X 60 X 60 सेंमी. आकाराचे खड्डे 2.7x 2.7 मीटर अंतरावर खोदून व ते खड्डे प्रत्येकी 20 किलोग्रॅम शेणखत 1.5 किलोग्रॅम सुपरफॉस्फेट खताने भरून घ्यावेत.

सुपारी पिकासाठी खत व्यवस्थापन । सुपारी पिकासाठी पाणी व्यवस्थापन ।

सुपारीस खतांचा पहिला हप्ता ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात आणि दुसरा हप्ता डिसेंबर- जानेवारी महिन्यात द्यावा. पहिला हप्ता 1 घमेले शेणखत किंवा कंपोस्ट खत किंवा बायोमिल + 10 किलो हिरवळीचे खत + 75 ग्रॅम नत्र + 75 ग्रॅम पालाश असा द्यावा. एक वर्षाच्या झाडास वरील खताची एकतृतीयांश मात्रा, दोन वर्षे वयाच्या झाडास एकतृतीयांश मात्रा तर तीन वर्षे वयाच्या झाडास वरील पूर्ण मात्रा द्यावी. खते झाडाच्या बुंध्यापासून 1 मीटर अंतरावर 15-20 सेंमी. खोल द्यावीत आणि हवामानानुसार पाण्याच्या पाळया द्याव्यात. उन्हाळयात 4-5 दिवसांनी तर हिवाळयात 7-8 दिवसांनी पाण्याची पाळी द्यावी. पाण्याचा ताण बसल्यास फुलाफळांची गळ होते.

सुपारी पिकातील आंतरपिके । सुपारी पिकातील तणनियंत्रण ।

सुपारीमध्ये काळीमिरी हे आंतरपीक घ्यावे. तणांचा बंदोबस्त खुरपणी करून करावा. सुपारीमध्ये तणनाशकांचा आणि आच्छादनाचा वापर करूनही तणनियंत्रण करता येते.

सुपारी पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण ।

देवी किंवा खवले कीड :

ही कीड सुपारीच्या फळाच्या सालीमधून रस शोषून घेते. त्यामुळे फळांचा आकार लहान राहून ती सुरकुततात आणि प्रादुर्भाव तीव्र असल्यास गळूनही पडतात. या किडीच्या नियंत्रणासाठी 15 मिली. डायमेथोएट (30 टक्के प्रवाही) किंवा 30 मिली. मॅलॅथिऑन (50 टक्के प्रवाही) 10 लीटर पाण्यात मिसळून झाडावर फवारावे.

गेंड्या भुंगा :

हा भुंगा पोफळीच्या शेंड्यामध्ये येणारा नवीन कोंब खातो आणि झाडांचे नुकसान करतो. झाडाची पाने त्रिकोणी कापलेली दिसतात. उपद्रव गंभीर स्वरूपाचा असल्यास झाड सुकते आणि मरते. या किडीच्या नियंत्रणासाठी भुंग्यांनी पोखरलेली छिद्रे व खोबणी यांत वाळू आणि 2 टक्के मिथील पॅरॅथिऑन भुकटी यांचे मिश्रण सम प्रमाणात भरावे. हा उपाय दर तीन महिन्यांनी करावा.

सोंड्या भुंगा :

ह्या किडीच्या अळया पोफळीच्या खोडाचा आतील मऊ भाग खातात आणि खोड पोखरतात. काही दिवसांनी झाड मरते. या किडीच्या नियंत्रणासाठी कीडग्रस्त झाडावरील छिद्रात 2 टक्के मिथील पॅरॅथिऑन भुकटी व वाळू यांचे मिश्रण सम प्रमाणात भरावे किंवा इ.डी. सी. टी. या धुरीजन्य कीटकनाशकात बुडविलेले कापसाचे बोळे झाडावरील छिद्रांमध्ये सोडावेत व ती चिखलाने बंद करावीत.

सुपारी पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण ।

कोळे रोग :

हा बुरशीजन्य रोग आहे. हा रोग ‘फायटोप्थोरो आरेकी’ या बुरशीमुळे होतो. बुरशीचा प्रादुर्भाव फळांच्या देठांवर होतो. त्यामुळे फळांची गळ होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी 1.0% बोर्डो मिश्रण अथवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ( 35 ग्रॅम 10 लीटर पाण्यात) यांच्या फवारण्या पावसाळा सुरू होण्याअगोदर सुरू कराव्यात. तसेच ॲलिएट या बुरशीनाशकांची दोन वेळा मुळांजवळ जिरवणी करावी.

मूळ कूज :

निचरा न होणाऱ्या भागात हा रोग होतो. मुळे कुजल्यावर शेंडा सुकतो व झाड मरते. या रोगाच्या नियंत्रणासाठी मुळाजवळ निचरा सुधारावा, मुळाजवळ 2 टक्के बार्डो मिश्रणाची जिरवणी 2-3 वेळा म्हणजे पावसाळयापूर्वी एकदा आणि नंतर 2 वेळा
करावी.
नवीन लागण झालेल्या झाडांच्या बुंध्याभोवती चर काढून त्यात गंधक व चुना यांची भुकटी 1:1 प्रमाणात प्रत्येकी 1 किलो याप्रमाणे चरातील मातीत मिसळावी. जास्त खत झालेल्या व मेलेल्या झाडांचे अवशेष मुळांसकट काढून त्यांचा नाश करावा. अशा ठिकाणी कमीत कमी सहा महिने नवीन रोपे लावू नयेत.

बांड रोग :

जास्त नत्र, जास्त पाणी व कमी निचरा यामुळे हा रोग होतो. या रोगामुळे पाने आखूड निपजतात. शेंड्याला पर्णगुच्छ आकार येतो. पाने गडद हिरवी होतात. पाने कडमडीत होतात. झाडावर सुपारी लागत नाही. नियंत्रणासाठी जमिनीचा निचरा सुधारावा, खते विशेषकरून एकदम न घालता हप्त्याहप्त्याने घालावीत.

सुपारीच्या फळांची काढणी, उत्पादन आणि विक्री ।

सुपारीची फळे तयार झाल्यावर त्यांचा रंग नारिंगी होतो. फळे तयार झाल्यावर संपूर्ण घड काढावा. ऑक्टोबर ते जानेवारी या काळात फळांची काढणी करावी. एका पोफळीपासून दरवर्षी 3 ते 5 किलो सुकी सुपारी मिळते. सुपारी नीट करून, सुकवून, विक्रीसाठी पाठवावी.

सुपारीच्या फळांची साठवण आणि हाताळणी ।

तयार व वाळलेली सुपारी बरेच दिवस व्यवस्थित राहते. फळावरील काथ्या काढल्यानंतर सुपारी मोकळ्या हवेत पण सावलीत ठेवावी.

सारांश ।

सुपारीची लागवड कोकणात आणि दक्षिण भारतात फार वर्षांपासून केली जाते. सुपारीचे महत्त्व मसाल्यामध्ये तसेच पानमसाल्यात आहे. धार्मिक कार्यातही सुपारीचा वापर होतो. सुपारी फळ हे पुष्कळ टिकते. सुपारीस मध्यम प्रतीचे हवामान आणि निचऱ्याची जमीन लागते. सुपारीच्या एका झाडापासून 3-5 किलो सुक्या सुपाऱ्या मिळतात. सुपारीची लागवड सुपारी फळे लावून करतात. लागवडीनंतर 8-10 वर्षांपासून उत्पादन सुरू होते. वयाच्या 50-60 वर्षांपर्यंत उत्पादन मिळते.

जाणून घ्या जांभूळ लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Jambhul Lagwad Mahiti Jambhul Sheti) – Jambhul Farming

Recent Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )