तीन बिस्किटांचा नियम…..(Teen Biscuitacha Niyam) बोधकथा

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

तीन बिस्कीटे : (Teen Biscuitacha Niyam)

मला दोन मोठे भाऊ आणि मी असे आम्ही तिघे. आमच्याकडे जसं लाडाचा आणि कामाचा कधी मेळ बसला नाही, तसंच लाड आणि शिस्त याची सरमिसळ झालेली देखील मला कधी आठवत नाही. मला वाटतं, तेव्हा सगळ्याच मध्यमवर्गीय कुटूंबात आई- वडिलांची साधारण सारखीच शिकवण, शिस्त असायची. तरीही प्रत्येक घराचे असे काही विशिष्ट नियम असतात, त्याप्रमाणे आमच्या घराचे देखील काही नियम होते, आणि ते नियम अतिशय कडक होते.

जेवतांना पानात काही टाकायचं तर नाहीच, पण कधी टाकलंच तर आई ते वाटीत काढून ठेवत असे आणि रात्रीच्या जेवणात तेच आधी संपवायचे मगच आई जेवण वाढणार. अर्थातच ह्या धाकामुळे असा प्रसंग क्वचितच घडत असे. संध्याकाळी शुभंकरोती, रामरक्षा वगैरे स्तोत्रे म्हटल्याशिवाय रात्रीचं जेवण मिळणंच दुरापास्त ! असे अनेक नियम होते.

बरं आम्ही तिघे असल्याने घरात आलेल्या वस्तूंचे तीन वाटे होणार दिवाळीत फटाक्यांचे तीन वाटे. ते पण एकदम काटेकोरपणे. तेव्हा नवलाई वाटणाऱ्या काही पदार्थांचे- फळाचे तीन वाटे. त्यातीलच एक शिस्त म्हणजे दुधासोबत (चहा मिळणार नाही) फक्त तीनच बिस्किटं मिळणार.

मला आठवतयं, अगदी लहान होतो तेव्हा आई आम्हाला तीन – तीन बिस्किटं स्वत: देत असे. नंतर जसे मोठे झालो, तसे बिस्किटाचा डबाच आमच्या पुढ्यात ठेवून आई तिच्या कामालाही लागत असे. आईने कधी पाळत वगैरे ठेवली नाही. कारण डब्यात जरी खूप बिस्किटं असली, तरी प्रत्येकाने तीनच घ्यावी हा नियमच होता. आणि आम्ही देखील तीन – तीन बिस्किटं घेऊन डबा बंद करून ठेवायचो.

अगदी कधीतरीच कोणी चार बिस्किटं खाल्ली कि लगेच बाबांजवळ तक्रार लहानपणीची हि सगळ्यात आवडती गोष्ट त्यावर बाबा म्हणायचे, आज घेतलं परत घ्यायचं नाही. एक बिस्किट खातो आपण पोटासाठी, भूक लागली म्हणून. दुसरं ते आवडलं म्हणून. तिसरं बिस्किट म्हणजे आपली चैनच. तशी त्याची आवश्यकता नाही, पण खाल्लं तर त्यातून समाधान मिळायला पाहिजे. चवथं, पाचवं आणि त्यापुढची बिस्किटं म्हणजे पोटाला त्रासच. एकूण काय तर कुठल्याही गोष्टीची हाव बरी नाही.

बाबा म्हणायचे, बिस्किटाचा डबा समोर असतांना देखील आणि त्यात खूप बिस्किटं असून देखील मोह टाळून त्यातून आपल्या गरजेपुरती बिस्किटं घेऊन डबा बंद करून ठेवणं जमलं पाहिजे.

आता माझ्या लक्षात येतं, फक्त तीन बिस्किटांमागे जीवन जगण्याचा किती व्यापक विचार होता. सगळं मिळाल्यावर कुठे थांबायचं, हे आपल्याला कळलं पाहिजे. खरं म्हणजे सगळे उदात्त विचार आपल्याला माहिती असतात , परंतु प्रत्यक्ष वागतांना तीन बिस्किटं खाऊनही चवथ्या, पाचव्या आणि त्यापुढच्या अनेक बिस्किटांचा मोह काही आपल्याला सोडवत नाही.

घर, गाडी, फ्रिज, टिव्ही, मोबाईल आणि हि यादी न संपणारी आहे. छोटं घर, मग मोठं घर, मग बंगला, मग विकेंड होम, मग फार्म हाऊस, एक गाडी, अजून दुसरी गाडी, अजून मोठी गाडी …. असं सगळं अधिक मिळवण्याच्या नादात इकडे आयुष्यच उणे होत चाललयं. चवथं, पाचवं आणि त्यापुढच्या बिस्किटांची खरं तर आपल्याला गरजच नाहीये, त्याने पोटाला अपायच होईल, हे चांगलंच लक्षात येऊनही तीन बिस्किटांनंतर आपल्याला थांबता येत नाहीये. कारण आपण सोयीस्करपणे अशा गोष्टींकडे कानाडोळा करायला सरावलोय.

आणि मग अशावेळी आपले संस्कार निश्चितच कामी येतात. आई-वडिल नुसतेच संस्कार करत नाहीत, तर ते रूजवतात, मनात खोलवर बिंबवतात. अजूनही तीन बिस्किटं खाल्ल्यावर चवथं बिस्किट घेतांना हात कचरला पाहिजे आणि मी बिस्किटाचा डबा बंद केलाच पाहिजे. समाधानाचे तरंग अंतरंगापर्यंत पोहचण्या आधीच अनेक प्रलोभनं समोर असतांना त्यावर यशस्वी मात करता आली पाहिजे. शेवटी तात्पर्य काय तर समाधानी वृत्ती !

समाधानी वृ्त्ती असेल तर “फक्त तीन” हे आपल्याला “फक्त” कधीच वाटणार नाही.

( बोधकथा गुरुवचन……हेच त्रिकाल सत्य )

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )