कथा कसे विठुराया भक्त पुंडलिका साठी दिंडीरवनात म्हणजेच पंढरपुरात स्थायिक झाले

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

कथा विठ्ठल माऊली आणि भक्त पुंडलिकाची (story of lord vitthal and bhakt pundalik)

फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. उत्तर महाराष्ट्रातील एका गावात एक ब्राह्मण जोडपे राहत होते. त्यांना पुंडलिक नावाचा एक मुलगा होता. एकुलत्या एका पुंडलिकाचे माता- पिता फार लाड पुरवीत असत. त्याला कधीच काम सांगत नसत. छान छान कपडे चांगले चुंगले खायला घालून, ते आपल्या मुलाचे संगोपन करीत असत. पुंडलिक मोठा झाला. त्याचे लग्नाचे वय झाले. तो चौदा वर्षांचा झाला. पुंडलिकाच्या वडिलांना पुंडलिकाची आई म्हणाली, काहो ! आता आपल्या पुंडलिकाचे लग्नाचे वय झाले. आपला पुंडलिक चारचौघात उठून दिसणारा देखणा मुलगा. त्याचे आता लग्न करायला हवे.
पुंडलिक आई-वडिलांचा लाडका असला तरी, त्याच्या वडिलांनी त्याला शास्त्रांचे शिक्षण दिले होते. पुंडलिक वेद विद्या, मंत्रपठण, पूजापाठ करण्यात हुशार झाला होता. म्हणून पुंडलिकाच्या वडिलांनी पुंडलिकास शोभेल अशी देखणी, सुशील मुलगी पाहून पुंडलिकाचे लग्न करण्याचे ठरविले.

वधुसंशोधन सुरू झाले. पुंडलिकाचे पिता आजूबाजूच्या पंचक्रोशीतील गावी जात. तेथील ब्राह्मण कुटुंबामध्ये जात असत. कुळगोत्र पाहून मुलगी पाहून येत असत. परंतु त्यांना आपल्या पुंडलिकास साजेसी मुलगी दिसेना. बऱ्याच पायपिटीनंतर पुंडलिकाच्या वडिलांना पुंडलिकाची पत्नी म्हणून साजेसी एक मुलगी आवडली. मुलीच्या वडिलांनाही आपली मुलगी देण्याकरिता, योग्य वर म्हणून पुंडलिक आवडला. आपल्या मुलीचे सासू- सासरे, घरसंसार पसंत पडला. बोलाचाली झाली. तिथी बार ठरवून थाटामाटात लग्न पार पडले. त्याकाळी मोठ्या माणसांनीच मुलामुलींना पहायचे आणि लग्न ठरवायचे, अशी प्रथा असे. लग्न लागल्यानंतर मुखदर्शनाच्यावेळीच पती-पत्नी एकमेकांना पाहत असत. एकदा लग्न लागले, की पती-पत्नी कसेही असोत, पसंत असोत किंवा नसोत, त्यांना एकत्र संसार करावा लागे. तसेच पुंडलिकाचेही लग्न लागले. आणि त्याने आपली पत्नी पाहिली. ती अप्रतिम सुंदर होती. पुंडलिकाला त्याच्या आई-वडिलांनी पसंत केलेली

पत्नी, जन्माची जोडीदारीण, फारच आवडली होती आणि त्याचवेळी त्याने मनोमन ठरबिले, आपली बायको इतकी देखणी आहे, तर आपणही तिला तितकेच चांगले सांभाळायचे, तिला अगदी सुखात ठेवायचे. तिला कसलाही त्रास होऊ द्यायचा नाही कसलीच कमतरता भासू द्यायची नाही. तिला दुःखाचा बाराही लागून द्यायचा नाही, असा निश्चय पुंडलिकाने केला. पुंडलिक आपल्या पत्नीची इच्छा पुरविण्यासाठी काहीही करण्यास तयार असे. बस्, तिच्या तोंडून शब्द निघण्याचा अवकाश असे. दिवस जात होते. पुंडलिकाचा संसार सुखाने चालला होता. पत्नी बोले आणि पुंडलिक चाले, असे चालेले होते. पण पुंडलिकाला मूलबाळ नव्हते. पुंडलिकाचे माता- पिताही आता म्हातारपणामुळे थकले होते. पण पत्नीचा दास झालेला पुंडलिक, म्हाताऱ्या आई-बापांकडे लक्ष द्यायला त्याला वेळ नसे. ते बिचारे जे मिळेल ते, सून देईल ते खाऊन आणि असेल तशी वस्त्रे नेसून दिवस कंठत होते.

पोटी संतान व्हावे म्हणून पुंडलिक व त्याच्या पत्नीने बरेच उपाय केले. परंतू मूल झाले नाही. म्हणून पुंडलिकाच्या पत्नीला कोणीतरी उपाय सांगितला की, तुम्ही पती- पत्नी काशीला जाऊन गंगास्नान करून, काशी विश्वेश्वराचे दर्शन केले तर तुमच्या पूर्वजन्मीच्या पापाचा नाश होऊन, तुम्हाला संतानप्राप्ती होईल. झाले, पुंडलिकाच्या पत्नीने पुंडलिकाच्या मागे सारखीच हुटकन लावली. ती म्हणे, धनी! आपल्याला काशीला जायचे. तुम्ही मला काशीला घेऊन चला. माझी गंगास्नान करून दर्शन घेण्याची खूप इच्छा आहे. तुम्ही माझी एवढी इच्छा पूर्ण करा. पुंडलिक मात्र पत्नीला काहीच न बोलता मनामध्ये विचार करू लागला. त्यावेळी प्रवासाची साधने म्हणजे घोडागाडी, बैलगाडी एवढीच. तीही खूप श्रीमंतांकडे, राजाकडे हत्ती, घोडागाडी, बैलगाडी असे. स्वयंचलित वाहने तर मुळीच नव्हती. साध्या सायकलीचासुद्धा शोध लागायचा होता. पुंडलिकाची परिस्थिती तशी यथातथाच. त्यांच्याकडे वाहन म्हणून घोडा नव्हता की बैल नव्हता. म्हणून पायीच प्रवास करावा लागणार होता. दक्षिण महाराष्ट्रापासून काशी तशी फारच दूर पायी प्रवास करण्यास अनेक महिने लागणार होते. एवढे दिवस प्रवास करावयाचा म्हणजे, रस्त्यात खाण्याजेवण्याची सोय करण्याकरता बरेच पैसे लागणार होते. त्या पैशांची तरतूद कशी करावी, हा प्रश्न पुंडलिकापुढे होता. शिवाय वृद्ध आई-वडिलांना घेऊन काशीला जावे, तर ते एवढ्या दूर चालणार कसे आणि ठेवून जावे तर, त्यांना या वयात एकटे सोडून जावे कसे ? गावकरी काय म्हणतील ? एवढ्या म्हातारपणी आई-वडिलांना काशीचे गंगास्नान करवून आणायचे, तर त्यांना सोडून कसे काय काशीला जायचे ?

पुंडलिकाच्या डोक्यात सतत हे विचार चालेलेले असताना, पुंडलिकाची पत्नी मात्र सारखीच लाडेलाडे पुंडलिकास म्हणत असे, होय हो, सांगाना, आपण काशीला कधी जायचे ? रोजरोजचे पत्नीचे हे विचारणे ऐकून तिला काय उत्तर द्यावे, हे पुंडलिकास कळेना. एकतर पत्नीची इच्छा मोडण्याचे त्याचे धाडस नव्हते. अखेर पुंडलिकाने काशीला जायचे ठरविले. तो तयारीला लागला. म्हाताऱ्या आई-वडिलांना चालत काशीला आपल्याबरोबर न्यायचे पुंडलिकाने ठरविले. जमेल तितकी पुंजी वाटखचींसाठी जमविली आणि एके दिवशी पत्नी व वृद्ध आई-वडिलांना घेऊन पुंडलिक काशीला निघाला. सकाळी उठून जमेल तितकी वाटचाल करावी. दुपारी गाववस्ती, पाणवठा पाहून दुपारचे जेवण करावे, विश्रांती घ्यावी. उन्हे उतरली की पुन्हा संध्याकाळपर्यंत वाटचाल करून, मुक्काम करण्यासाठी पुढचे गाव गाठावे. असा पुंडलिक, त्याची पत्नी व त्याच्या आई-वडिलांचा नित्यक्रम होता. तरुण पुंडलिक, त्याची पत्नी गप्पा – विनोद करीत पुढे चालत असत. पुंडलिकाचे म्हातारे आई-वडील त्यांना जमेल तसे हळूहळू मागून चालत असत,

असा काशीच्या वाटेवरचा पुंडलिकाचा प्रवास चालला असता काही दिवसांनी पुंडलिकाच्या देखण्या सुकुमार पत्नीसही वाटचाल करणे कठीण झाले. तिचे कोमल मुखकमल चालण्याच्या श्रमाने सुकले. पायाला फोड येऊन फुटले. पुंडलिकाला आपल्या प्रिय पत्नीची झालेली ही अवस्था पहावेना. तेव्हा पुंडलिकाने आपल्या लाडक्या पत्नीस खांद्यावर उचलून घेतले व तो वाटचाल करू लागला. खांद्यावर पत्नी, मागून चालणारे आई-वडील, बखोट्याला बायकोच्या व आपल्या सामानाचे ओझे. आई-वडिलांच्या सामानाचे ओझे, आई-वडिलांच्याच बखोट्याला अडकविलेले, असा हा पुंडलिकाचा ताफा काशीच्या मार्गाने निघाला होता.
एके दिवशी चालून चालून पुंडलिकाच्या पायातील चप्पल तुटली. पुढे एक गाव लागले. तुटलेली चप्पल शिवण्यासाठी पुंडलिक त्या गावामध्ये थांबला. आई-वडील व पत्नीस, सामानासह धर्मशाळेत ठेवून, पुंडलिक गावकऱ्यांना विचारीत विचारीत चर्मकारवाड्यात आला. चर्मकारवाड्यातील एका चर्मकाराच्या घरी पुंडलिक येऊन

थांबला. त्या चर्मकाराच्या घरातील दृश्य पाहून पुंडलिक आश्चर्यचकित झाला. तो चर्मकार घराच्या पडवीत चपला शिवण्यात मग्न होता. पुंडलिक त्याचे निरीक्षण करीत होता. सतेज, गव्हाळ वर्ण, प्रसन्न मुद्रा, कपाळी गंधाचा टिळा मध्यम बांधा, प्रौढ वय, अंगात बंडी, धोतर घातलेले आणि एक नवलाची गोष्ट म्हणजे त्या चर्मकाराच्या लांबलचक शेंडीला पाळण्याची दोरी बांधलेली होती; आणि शेंडीला दोरी बांधलेल्या पाळण्यात एक वृद्ध स्त्री आणि एक वृद्ध पुरुष सुखाने बसले होते. पुंडलिकाने अंदाजाने जाणले की, ते वृद्ध बहुधा त्यांचे माता-पिता असावेत. कारण त्या वृद्धांच्या व चर्मकाराच्या चेहऱ्यामध्ये बरेच साम्य होते. असा तो चर्मकार जेव्हा चप्पलला टाका मारण्यासाठी जोराने आरी चप्पलमध्ये घुसवत असे, तेव्हा चर्मकाराच्या मानेला जोराचा हिसका बसत असे, आणि मानेच्या हिसक्याने शेंडीला बांधलेल्या दोरीलाही हिसका बसून पाळणा हालत असे. असा तो चर्मकार आपल्याच कामात मग्न होता आणि पुंडलिक त्याच्या अंगणात उभा राहून, त्यांचे निरीक्षण करीत होता. इतक्यात पाळण्यातील वृद्धाचे पुंडलिकाकडे लक्ष गेले आणि तो वृद्ध त्या चर्मकाराला उद्देशून म्हणाला, बाळ रोहीदास, अरे कुणी वाटसरू येऊन दारात उभा आहे. तुझे त्याच्याकडे लक्षच नाही. तू आपल्याच कामात मग्न आहेस. त्याचे तुझ्याकडे काय काम आहे, ते तरी बघ.

पुंडलिकास त्या वृद्धाच्या बोलण्यावरून समजले की तो चर्मकार त्या वृंद्धाचा मुलगा आहे आणि त्याचे नाव रोहीदास आहे. वडिलांच्या सांगण्यावरून रोहीदासाने ध्यानमग्नतेतून जागे व्हावे, तसे पुंडलिकाकडे पाहिले आणि तो पुंडलिकास म्हणाला, राम राम अतिथी महाराज, काही काम आहे का माझ्याकडे ? म्हणत, पुंडलिकास बसण्याकरिता कांबळीची जवळच असलेली घडी टाकली. पुंडलिक कांबळीच्या घडीवर बसत म्हणाला, माझी चप्पल तुटली; ती दुरूस्त करुन द्याल का ? तेव्हा रोहीदासाने हातातले काम बाजूला सारले व पुंडलिकाची चप्पल दुरुस्त करण्यास घेतली. चप्पल दुरुस्त करीत असताना रोहीदास पुंडलिकास म्हणाला, अतिथी महाराज, तुम्ही आमच्या गावचे तर दिसत नाहीत. कारण आमचे गाव लहान खेडे. या गावातील प्रत्येक माणूस एकमेकांस ओळखतो आणि इथे आलेला नवखा माणूस दुसऱ्या गाव आहे हे ओळखणे कठीण नाही, म्हणून म्हणतो पाहुणे, आपण कोणत्या गावचे ? कुठून आलात ? कुठे निघालात ? रोहीदासाने चप्पल शिवत असतानाच केलेले एबढे प्रश्न ऐकून पुंडलिकाने आपला सर्व वृत्तांत सांगितला व काशियात्रेला निघाल्याचे सांगितले.


पुंडलिक काशियात्रेला निघाल्याचे समजताच, रोहीदासानी पुंडलिकास नमस्कार केला. भाविकपणे कनवटीचा एक पैसा काढून पुंडलिकाच्या हाती दिला व रोहीदास म्हणाले, यात्रेकरू, तुम्ही काशीला निघालाच आहात तर माझा एवढा पैसा घेऊन जा व आठवणीने गंगामातेस अर्पण करा. असे म्हणून, रोहीदासांनी पुंडलिकाची चप्पल दुरुस्त करून दिली. रोहीदासाने दिलेला पैसा, दुरुस्त केलेली चप्पल घेऊन पुंडलिक धर्मशाळेत आला. आई-वडील व बायकोला घेऊन पुन्हा काशीची वाट चालू लागला. मजल दरमजल करीत पुंडलिक आई-वडील, पत्नीला घेऊन काशीक्षेत्री पोहोचला. गंगेत सर्वांनी स्नान केले. विश्वेश्वराचे दर्शन घेतले आणि पुंडलिक काहीकाळ काशीमध्येच मुक्कामी राहिला. असेच एके दिवशी पुंडलिक गंगास्नानास गेला असता, त्याला रोहीदासाने गंगेत अर्पण करण्यास दिलेल्या पैशाची आठवण झाली. पुंडलिक धावत आपला मुक्काम असलेल्या धर्मशाळेत गेला. सामानात बांधून ठेवलेला रोहीदासाचा पैसा घेऊन, तो गंगेच्या पाण्यात उतरला. गंगामातेला नमस्कार करून मनोमन म्हणाला, हे गंगामाते! रोहीदासाने तुला अर्पण करण्यासाठी, माझ्याजवळ पैसा दिला आहे. त्याचा तू स्वीकार कर. असे म्हणून पुंडलिकाने रोहीदासाने दिलेला पैसा गंगेस अर्पण केला. तोच एक नवल घडले. रोहीदासाने दिलेला पैसा घेण्यासाठी गंगामातेने पाण्यातून अप्रतिम, तेजस्वी हात वर केला होता. त्या हातामध्ये हिरे, माणके, पाचूचे जडीव काम केलेले अमूल्य असे सुवर्ण कंकण होते. तो अप्रतिम कंकण घातलेला हात, पुंडलिक आश्चर्यान पाहत होता. तो संभ्रमात पडला होता. इतक्यात आकाशवाणी झाली. हे पुंडलिका, हा गंगामातेचा हात आहे. मी गंगामाता बोलते आहे. रोहीदासाने दिलेल्या पैशाचा मी प्रेमाने स्वीकार केला आहे आणि माझी रोहीदासाला छोटीशी भेट म्हणून, पुंडलिका, तू हे माझ्या हातातील सुंदर कंकण काढून घे व रोहीदासास नेऊन दे. ही आकाशवाणी ऐकून पुंडलिकाने भक्तिभावाने गंगेच्या हातास नमस्कार केला. अलगदपणे हातातील कंकण काढून कमरेच्या शेल्यात गुंडाळून ठेवले. तसा गंगामातेचा हात अदृश्य झाला.

पुंडलिकाने ते कंकण पत्नी, माता-पिता कुणालाही न दाखविता जपून ठेवले. काशीची यात्रा संपवून पुंडलिक, पत्नी, माता-पित्यासह पुन्हा आपल्या गावी निघाला. प्रवासाला निघून बरेच महिने उलटले होते. पुंडलिकाच्या जवळची वाटखर्चाची पुंजी संपली होती. खाण्याजेवणाचे हाल होऊ लागले होते. सोने नाणे जेवढे मोडण्यासारखे होते ते मोडले. पण तेवढ्याने काय होणार ? पुंडलिकाच्या कुटुंबाची उपासमार होऊ लागली. अखेर उदरनिर्वाहाचा काहीच मार्ग उरला नाही, तेव्हा पुंडलिकास गंगामातेने रोहीदासाला देण्यासाठी दिलेल्या अमूल्य कंकणाची आठवण झाली. पुंडलिकाच्या मनात दुराचार निर्माण झाला. पुंडलिकाने ते कंकण मोडून, मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह करण्याचे ठरविले. ते कंकण बहुमूल्य असल्याचे पुंडलिक जाणून होता. ते मोडण्यासाठी मोठ्या नगरात जावे लागणार होते. कारण एवढे मोठे किमती कंकण घेण्यासाठी एवढी मोठी पेढी खेड्यात कोठून असणार ? चालता चालता पुंडलिकास रस्त्यात एक मोठे नगर लागले. त्या नगरात मोठी बाजारपेठ होती. पुंडलिक आपल्या मात्या-पित्यांना व पत्नी धर्मशाळेत बसवून, कंकण मोडण्यासाठी नगरातील बाजारपेठेत गेला.

बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या मोठ्या पेढया होत्या. पुंडलिकाने कमरेच्या शेल्यात गुंडाळून ठेवलेले कंकण काढून पेढीमालकास दिले व म्हणाला, मला हे कंकण विकायचे आहे. याची जेवढी किंमत होईल ती मला द्या. पेढीमालकाने ते मौल्यवान कंकण हातात घेऊन निरखून पाहिले आणि म्हणाला, या कंकणाची किंमत देण्याइतके पैसे माझ्याकडे नाहीत. तेव्हा पुंडलिक दुसऱ्या पेढीवर गेला. त्या पेढीवाल्या मालकानेही तेच उत्तर दिले. सारी बाजारपेठ हिंडून पुंडलिक शेवटच्या पेढीवर गेला. त्यानेही कंकणास देण्याइतके पैसे नसल्याचे सांगितले. पण त्या पेढीवल्याने पुंडलिकास एक सल्ला दिला. तो म्हणाला, हे मुसाफिरा, या कंकणाचे मोल तुला हवे असेल, तर तू राजाकडे जा. तेच तुला या कंकणाचे मोल देऊ शकतील. असा पेढीवाल्याचा सल्ला ऐकून, पुंडलिक त्या नगराच्या राजाकडे गेला. राजाला ते अमूल्य कंकण दाखवले आणि विकावयाचे आहे, असे सांगितले. राजाने ते बहुमूल्य कंकण निरखून पाहिले. राजास ते अत्यंत आवडले. म्हणून राजाने ते कंकण घेण्याचे ठरविले आणि दासीच्या हाती देऊन तिला सांगितले, दासी! राणीमहालात जा. आणि राणीला हे कंकण आवडते का ते विचारून ये. कारण हे कंकण राणीलाच वापरावयाचे आहे. तेव्हा राणीची पसंती महत्त्वाची दासी ते कंकण घेऊन राणीच्या महालात गेली. राणीला ते कंकण दाखविले. राणीने ते कंकण पाहिले आणि पाहताक्षणीच राणीला ते कंकण फार आवडले. म्हणून राणीने ते कंकण आपल्या उजव्या हातात घातले. आणि काय चमत्कार झाला. त्या कंकणाच्या तेजापुढे राणीला सर्व दागिने फिके वाटू लागले. राणी आपला तो कंकण घातलेला उजवा हात न्याहाळू लागली. थोड्याच वेळात राणीचे डाव्या हाताकडे लक्ष गेले आणि राणी दासीला म्हणाली, दासी! तू राजाला जाऊन सांग की, मला हे कंकण फारच आवडले आहे. तेव्हा ह्याच्या जोडीचे कंकण पाठवा आणि हे दोन्ही कंकण माझ्याकरता खरेदी करा.

राणीचा हुकूम होताच दासी राजाकडे गेली. राणीला कंकण आवडल्याचे सांगून, त्या कंकणाच्या जोडीचे कंकण मागू लागली. राजाने तेव्हा कंकण विकण्यास आलेल्या पुंडलिकाकडे, त्याच्या जोडीच्या कंकणाची मागणी केली. तेव्हा पुंडलिकाने त्याच्या जोडीचे कंकण आपणाकडे नसल्याचे सांगितले. ते ऐकून राजाचा प्रधान म्हणाला, महाराज ! हा माणूस नक्की चोर असावा. कारण जो या कंकणाचा मालक असेल, तो आपल्या स्त्रीकरता एक कंकण कसा बनवेल ? तेव्हा या लबाडाने कुणाचे तरी कंकण चोरले आहे आणि ते विकून पैसे करण्याचा याचा बेत आहे. पुंडलिकाने राजास परोपरीने समजून सांगण्याचा प्रयत्न केला की, मी खरोखरच चोर नाही. परंतु राजास व प्रधानास ते काही पटेना. एकवेळ पुंडलिकास वाटले,

रोहीदासाला हे कंकण त्याच्या पैशाच्या बदल्यात गंगामातेने भेट दिल्याचे सांगावे आणि खरी कथा सांगून टाकावी. परंतु पुंडलिकाने विचार केला की, मी ही खरी हकीकत सांगितली, तरीही आपण लबाडच ठरणार. कारण रोहीदासाला गंगेने दिलेले कंकण आपण रोहीदासाच्या परवानगीशिवाय विकण्यास तयार झालो. हीसुद्धा लबाडीच. तेव्हा राजा आपणास शिक्षा करणारच. म्हणून पुंडलिकाने मौन धारण केले. परंतु असे करण्याने पुंडलिकाचे संकट टळले नाही. उलट राजाने पुंडलिकास चोर समजून कैदेत टाकले. अनपेक्षितपणे आलेल्या संकटाने पुंडलिक पुरता घाबरला. तिकडे आई-वडील व पत्नी उपाशीपोटी पुंडलिकाची वाट पाहात धर्मशाळेत तिष्ठत होते. काय करावे, पुंडलिकास काहीच सुचेना. चार दिवस पुंडलिक कैदेतच विचार करीत होता. अखेर त्याने घडलेली सर्व हकिकत राजास सांगण्याचे ठरविले. तसे त्याने कैदेच्या रक्षकास सांगितले.

पुंडलिकाच्या सांगण्यावरून राजाने पुन्हा पुंडलिकास खरी हकिकत सांगण्यासाठी दरबारात आणण्यास सांगितले. दरबारात आणल्यानंतर पुंडलिकाने राजा व प्रधानास, रोहीदासाने गंगेला दिलेल्या पैशाच्या बदल्यात, गंगेने रोहीदासास भेट दिलेल्या कंकणाची हकिकत सांगितली आणि पुंडलिक राजास म्हणाला, महाराज, माझ्याजवळचे सर्व पैसे संपले. माझ्याबरोबर माझी पत्नी व म्हातारे आई-वडील आहेत. उपासमार होऊ लागली म्हणून हे कंकण विकून वाटखर्ची करावी, असा माझ्या मनात विचार आला. म्हाताऱ्या आई-वडिलांस व तरुण पत्नीस धर्मशाळेत सोडून मी कंकण विकण्यासाठी नगरातील सर्व पेढ्यांवर फिरलो. पण या कंकणाचे मोल कोणीच देऊ शकला नाही. अखेर एका पेढीवाल्याने आपणाकडे जाण्याचे सुचविले आणि मजवर हे संकट आले.

राजाने पुंडलिकाची सर्व हकिकत ऐकली आणि राजा शिपायांना व प्रधानास म्हणाला, अरे, खरे तर ह्या सर्व संकटाचे मूळ तर रोहीदास आहे म्हणायचे आणि प्रधानास म्हणाला, प्रधानजी, तुम्ही चार शिपाई घेऊन या पुंडलिकाला हातकड्या घालून त्या रोहीदासाकडे घेऊन जा आणि खरेच त्याने गंगेला अर्पण करण्यासाठी पैसा दिला होता का, ते विचारा आणि ज्या रोहीदासाला भेट म्हणून असे अमूल्य कंकण गंगा देते, तो रोहिदास आहे तरी कसा, ते पहा आणि त्या रोहिदासाला सांगा, तुला हे गंगेने कंकण विले असेल तर, त्या कंकणाच्या जोडीचे कंकणही रोहिदासाला गंगेने द्यायला हवे. अन्यथा रोहिदास व पुंडलिक दोघांनाही बंदी बनवून आणा. कारण आमची राणी शोक महालात रुसून बसली आहे. या कंकणाच्या जोडीचे कंकण आणल्याखेरीज ती तोंडात पाणीही घेणार नाही म्हणतेय. तेव्हा तुम्ही त्वरित रोहीदासाकडे जा. राजाची आज्ञा होताच, सर्व लवाजम्यानिशी पुंडलिकाला बंदीवान बनवून, प्रधान रोहिवासाच्या घरी पोहोचला. सकाळच्या प्रहरी रोहिवास आपल्या माता-पित्यांच्या सेवेत मग्न होता. रोहिदास आपल्या हाताने आई-वडिलांना तेल लावून, अंग चोळून आंघोळ घालत होता.

आई-वडिलांचे कपडे नेसून झाल्यानंतर, त्यांना स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून, आई-वडिलांना आळीपाळीने घास भरवत होता. जेवण झाल्यानंतर तृप्तीची ढेकर देऊन रोहिदासास त्याचे वृद्ध माता-पिता म्हणाले, रोहिदास बाळा, किती रे सेवा करतोस आमची. खरोखर आम्ही काहीतरी पुण्य केले असेल, म्हणूनच म्हातारपणी सर्व शरीर थकलेले असताना सेवा करणारा तुझ्यासारखा मुलगा आमच्या पोटी जन्मला आहे. रोहिदासाने माता-पित्याचे जेवण झाल्यानंतर त्यांना आदराने पाळण्यात बसविले आणि झोका दिला.

रोहिदासाचा हा नित्यक्रम चाललेला पाहून, प्रधान व त्याच्याबरोबर आलेले शिपाई थक्क होऊन पाहतच राहिले. परंतु रोहिदासाचे त्यांच्याकडे लक्षच नव्हते. तो त्याच्याच कामात मग्न होता. त्याचे काम उरकले आणि त्याचे लक्ष दारात आलेल्या लवाजम्याकडे गेले आणि आश्चर्याने रोहिदास म्हणाला, आपण कोण ? कोठून आला ? आपले मजकडे काय काम आहे ? या प्रवाशाला अशा हातकड्या का घातल्यात ? मी तर या माणसाला ओळखतो. हा तर काशियात्रेला निघालेला ब्राह्मणकुमार आहे. हा मजकडे तुटलेली चप्पल दुरुस्त करायला आला होता. मीच तर यांची चप्पल दुरुस्त करून दिली आणि या गृहस्थाकडे मी काशीच्या गंगामातेस अर्पण करण्यासाठी पैसा दिला होता.
रोहिदासाचे हे न विचारताच केलेले वक्तव्य ऐकून प्रधान रोहिदासाला म्हणाला, रोहिदासा, तू तर फारच सदाचारी माणूस दिसतोस, परंतु तू म्हणतोस त्याप्रमाणेच तू गंगेला अर्पण करण्यासाठी दिलेल्या पैशामुळे या पुंडलिकास हातकड्या पडल्या आहेत, असे पुंडलिकाचे म्हणणे आहे. तेव्हा ती हकिकत तू पुंडलिकाच्या तोंडूनच श्रवण कर.

प्रधानाचे विधान ऐकून रोहिदास प्रश्नार्थक नजरेने पुंडलिकाकडे पाहू लागला. तेव्हा पुंडलिक म्हणाला, रोहिदासा, तू दिलेला पैसा मी गंगेला अर्पण केला आणि नबल घडले. गंगामातेने तुझा पैसा घेण्याकरता पाण्यातून आपला सुंदर हात वर केला. त्या हातामध्ये रत्नजडित सुवर्णकंकण होते. मी तो हात आश्चर्याने पहात होतो. इतक्यात आकाशवाणी झाली. ती अशी की, मी गंगा माता बोलते आहे. पुंडलिका, मी रोहिदासाचा पैसा प्रेमाने स्वीकारला असल्याचे तू रोहीदासाला सांग आणि माझ्या हातामध्ये जे कंकण आहे, ते तू काढून घे व माझ्या प्रिय भक्तास, रोहीदासास नेऊन दे. गंगेचे हे वचन ऐकून, मी ते कंकण काढून घेतले. जतन करून ठेवले. परंतु रस्त्यात आमची वाटखचीं संपली. माझे वृद्ध आई-वडील व पत्नीची उपासमार होऊ लागली. तेव्हा भूक भागविण्यासाठी माझ्या मनात पापाचार आला. गंगामातेने तुला दिलेले कंकण विकणे, एवढाच माझ्याजवळ पैसे मिळविण्याचा मार्ग होता. म्हणून मी ते कंकण मोडण्यासाठी एका पेढीवर गेलो. परंतु त्या नगरातील बाजारपेठेत, एकाही पेढीबाल्यास गंगामातेने दिलेल्या कंकणाचे मोल करता आले नाही. अखेर एका पेढीवाल्याने राजाकडे ते कंकण विकण्यास सुचविले.. मी राजवाड्यात गेलो. राजाला ते सुंदर रत्नजडित कंकण दाखविले. राजालाही ते कंकण आवडले पण कंकण विकत घेण्याआधी राजाने ते कंकण राणीला दाखविण्यास अंत:पुरात दासीहाती पाठविले. राणीलाही ते कंकण आवडले. राणीने ते कंकण एका हातात घातले ब दुसऱ्या हातात घालण्याकरिता राणी दुसरे कंकण मागू लागली. आता तूच सांग रोहिदासा, दुसरे कंकण मी कोठून आणणार ? मी दुसरे कंकण माझ्याजवळ नसल्याचे सांगितले. तेव्हा राजाला वाटले की, हे एकच कंकण मी कोठूनतरी चोरले आहे. म्हणून राजाने मला चोर समजून कैदेत टाकले.

रोहिदासास पुंडलिक म्हणाला, रोहिदासा, गंगेने तुला भेट दिलेले कंकण विकण्याचा मी गुन्हा केला आहे. मला क्षमा कर आणि माझी सुटका करण्याचा उपाय कर. कारण माझे म्हातारे आई-वडील, तरुण पत्नी त्या नगरातील धर्मशाळेत माझी वाट पहात असतील. माझ्याशिवाय या जगात त्यांना कुणाचाही आधार नाही. मी फार आशेने तुझ्याकडे आलो आहे. पुंडलिकाची सर्व हकिकत रोहिदासाने शांतपणे ऐकली. पुंडलिकाचे वृद्ध माता- पिता धर्मशाळेत अन्नपाण्याबिना, पुंडलिकाची आतुरतेने वाट पहात, तळमळत असल्याचे ऐकून रोहीदासाचे मन कळवळले आणि तो पुंडलिकास म्हणाला, माझ्यापरीने मी तुला सोडविण्याचा प्रयत्न करून पाहतो. अन्यथा, आपणा दोघांनाही कैद ठरलेलीच आहे. “राजा बोले आणि दल हाले” राजाचा हुकूम कोण मोडणार! असे म्हणून रोहिदासाने, अंगणातील विहिरीतून एक घागर पाणी दोराने ओढून काढले. हर हर गंगे म्हणून, ती पाण्याने भरलेली घागर डोक्यावर उपडी करून स्नान केले.

दुसरी घागर विहिरीतून भरून काढली. चामडे भिजविण्याचा पाण्याचा कुंड (चपला बनविण्यासाठी लागणारे चामडे भिजविण्यास पाणी ठेवण्यासाठी असलेले खोलगट चौकोनी किंवा दगडी भांडे) धुवून स्वच्छ केले. विहिरीतून दुसरी घागर भरून काढली. हर हर गंगे म्हणत, ती घागर रोहिदासाने कुंडात ओतली. धूप, दीप, गंध लावून पुंडलिकाने कुंडातील पाण्याची, गंगा समजून पूजा केली आणि रोहिदास डोळे मिटून मनोमन म्हणाला, हे गंगामाते, मला देव, धर्म, पूजा, अर्चा, मंत्र पठण काहीच माहीत नाही. यातील काहीच मी जाणत नाही. माझ्या गुरूच्या आज्ञेनुसार मी फक्त मनोभावे माझ्या माता-पित्याची सेवा करतो आणि तीच माझी भक्ती आहे. म्हणून, आजवर जर मी माझ्या आई- वडिलांची मनापासून सेवा केली असेल तर हे गंगामाते, तू माझ्यावर प्रसन्न होशील आणि या चपला बुडविण्याच्या कुंडामध्ये तू पुंडलिकाजवळ दिलेल्या जोडीचे कंकणाचे कंकर प्राप्त होईल आणि माझ्यावर आणि पुंडलिकावर आलेले संकट टळेल. अन्यथा, तू मला दिलेली भेट मला, माझ्या कुटुंबीयांना व पुंडलिक, पुंडलिकाच्या कुटुंबीयांना शाप रेड असे म्हणून रोहीदासाने कुंडातील गंगेला साष्टांग नमस्कार केला.

इतक्यात, एवढा वेळ रोहिदासाच्या कृतीचे बारकाईने निरीक्षण करणारे प्रधान शिपाई व पुंडलिक आश्चर्याने किंचाळलेच. रोहिदासानी डोळे उघडून पाहिले तर, चपा बुडविण्याच्या कुंडातील पाण्यात गंगेने दिलेल्या जोडीचे कंकण चकाकत होते. त्या कंकणाच्या तेजाने व त्यात जडवलेल्या रत्नाच्या उजेडाने, रोहीदासाची झोपडी (घर) उजळून निघाली. राजाचा प्रधान तर ते नवल पाहून आवाक् झाला. त्याने रोहिदासाचे पाय धरले आणि क्षमा मागितली. ते कंकण व पुंडलिकाला घेऊन प्रधान राजाकडे निघाला. पण निघण्याआधी रोहीदासाला प्रधान म्हणाला, रोहिदासा, तू महान आहेस. तू कुठे तीर्थयात्रेला गेला नाहीस, तरी गंगेसारखी पवित्र नदी तुझ्या कुंडात प्रकट झाली. कारण तुझे मन गंगेच्या पाण्यासारखेच पवित्र, निर्मळ आहे. आणि प्रधानाच्या तोंडून आपोआपच शब्द निघाले, “मन चंगा तो कठौती में गंगा” आणि तेव्हापासून ही म्हण प्रचलित झाली असावी.

प्रधान पुंडलिकास घेऊन राजाकडे गेला. प्रधानाने रोहिदासाच्या घरी घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. राजालाही आपल्या राज्यात रोहिदासासारखा पुण्यशील माणूस असल्याचे ऐकून धन्यता वाटली. स्वतः राजासुद्धा रोहिदासाच्या भेटीसाठी रोहिदासाच्या घरी गेला. राजाने पुंडलिकासही सन्मानाने सोडून दिले. राजाने कंकणाच्या मोबदल्यात रोहिदासाला अमाप संपत्ती देऊ केली. परंतु रोहिदासाला अजिबात मोह नव्हता. राजाला म्हणाला, महाराज, मी, माझ्या व माझ्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची गरज भागविण्याइतके काम करतो आहे. तेव्हा हे तुमचे धन घेऊन मी काय करू? ते धन तुमच्या खजिन्यातच राहू द्या. रोहिदासाची निरपेक्षता पाहून राजाला आश्चर्य व समाधान वाटले.राजाने पुंडलिकास कैदेतून मुक्त केल्यानंतर पुंडलिक, वृद्ध माता-पिता व पत्नी सोडले होते, त्या धर्मशाळेत गेला. ते बिचारे डोळ्यात प्राण आणून पुंडलिकाची वाट पाहात होते. पुंडलिकाला पाहाताच त्या तिघांना आनंद झाला. पुंडलिकाची पत्नी व आई- बडोल पुंडलिकास, एवढे दिवस कुठे होतास ? काय घडले ? तुम्हास यायला एवढा उशीर का झाला ? असे अनेक प्रश्न विचारू लागले. पुंडलिकाने घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्या तिघांनाही रोहिदासाची कहाणी ऐकून नवल वाटले. त्या रोहिदासाला पाहण्याची त्यांनीही इच्छा प्रकट केली.

पुंडलिकाला तर केव्हा एकदा जातो आणि रोहिदासाच्या चरणाला मिठी घालतो, असे झाले होते. पुंडलिक वृद्ध आई-वडील आणि पत्नीसह रोहिदासाच्या गावी निघाला. रोहिदासाच्या घरी पोहोचल्यानंतर पुंडलिकाने रोहिदासाच्या चरणावर डोके ठेवले आणि पुंडल्लिक, आपल्या डोळ्यातील अश्रूंनीच जणू रोहिदासाचे पाय धुवु लागला. रोहिदासाने पुंडलिकास दोन्ही हात धरून उठविले आणि रडण्याचे कारण विचारले. तेव्हा पुंडलिक म्हणाला, महाराज, तुम्ही महान आहात. तुमच्यामुळे माझे संकट टळले आणि यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या डोळ्यांत ज्ञानाचे अंजन घालून माझे डोळे उघडले आहेत. मी इतक्या दूरवरची पायपीट करून हालअपेष्टा सोसत, उपासमार करीत काशियात्रा केली. पण आम्हाला तीर्थाचे पुण्य घडणे तर दूरच, पण आमची मनोवृत्तीसुद्धा बदलली नाही. महाराज, आपण कुठेही न जाता घरीच आपल्या कामात मग्न असता, तरीही गंगा तुमच्या भेटीसाठी चपलाचे चामडे भिजविण्याच्या कुंडात प्रकट झाली. तेव्हा रोहिदास महाराज, आजपासून तुम्ही गुरू आणि मी तुमचा शिष्य आहे.

पुंडलिकाचे हे भावुकतेचे बोलणे ऐकून रोहिदास म्हणाले, पुंडलिका, तुम्ही तर ब्राह्मण आहात. मी आपला सर्व गावच्या चपला दुरुस्त करून देऊन उदरनिर्वाह चालविणारा, आणि मी तुमचा गुरू आणि तुम्ही माझे शिष्य हे कसे काय ? आणि गुरू शिष्याची ही भानगड मी काही जाणत नाही. तेव्हा पुंडलिक निर्धाराने म्हणाला, रोहिदास महाराज, तुम्ही मला शिष्य माना न माना, मी मात्र तुम्हाला माझे गुरू मानले आहे. आपण जोपर्यंत शिष्य म्हणून माझा स्वीकार करणार नाहीत, तोवर मी येथून हालणार नाही, असे म्हणून पुंडलिकाने रोहिदासांच्या समोर बैठक टाकली. आता मात्र रोहिदासांचा नाइलाज झाला होता. रोहिदास पुंडलिकास म्हणाले, पुंडलिका ! तुझा निश्चय पाहून मी धन्य झालो. आता मलाच माझे भाग्य उदयास आले, असे वाटते. परंतु हे पुंडलिका, तुला अनुग्रह करण्याआधी मी तुला एक कथा सांगणार आहे. ती तू नीट लक्ष देऊन ऐक.

हे पुंडलिका ! मोह हा जिवाच्या कार्यनाशाला कारण असतो. म्हणून साधकाने प्रथम मोह आवरला पाहिजे. अन्यथा, मोहाच्या पाशात अडकलेला जीव अनंत यातना भोगतो. मग त्या यातनातून त्याची सुटका होणे कठीण असते. पण हा मोह इतका बलवान आहे, की त्याला आवरणे योग्यांनासुद्धा कठीण जाते. एकवेळ माणूस खडतर तपातून तरून जाईल. पण त्याला मोह आवरणे जमणार नाही. म्हणून माझी अशी प्रचिती आहे की, ज्या मानवाने मोह आवरला, तो कुठेही न जाता आहे तिथेच राहूनही योगीच झाला, असे मला वाटते. पुंडलिका, मी तुला शिष्यत्व बहाल करण्याआधी जी कथा सांगणार आहे, ती माझीच पूर्वजन्मीची कथा आहे. मी पूर्वजन्मी महान योगी होतो. त्या पुण्यप्रभावामुळे मला पूर्व जन्माचे ज्ञान होत आहे. मी माझे पूर्वजन्माचे कर्म जाणतो. पण पूर्वजन्मी माझेही या मोहाने पतन केले आणि आज मी या मनुष्य योनीत जन्म घेतला आहे. रोहिदास कथा सांगू लागले. ते म्हणाले, पुंडलिका, पुर्वजन्मी मी एक महान तपस्वी होतो. सारे आयुष्य ब्रह्मचर्य व्रताचे मी पालन केले होते. काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार या सहा विकारांना जिंकण्यात मी थोडा यशस्वी झालो होतो. सर्व इंद्रीय माझ्या इच्छेनुसारच कार्य करीत होती.
मी एका नगराबाहेर आश्रमात राहत असे. माझा बराच मोठा शिष्यगण होता. भेदभाव मी मानीत नसे. रोज पहाटे नदीवर स्नान करून ध्यानाला बसण्याचा माझा नेम कधीच चुकत नसे. नदीवर स्नानाला जाण्याची बाट नगराबाहेरून होती. रस्ता तसा सुना व निर्मनुष्य होता. पण रस्त्याच्या कडेला एक सुंदरसा महाल होता. कालांतराने मला शिष्याकडून समजले की, तो महाल एका नर्तकीचा आहे. तिथे तिचा रोज नृत्य गायनाचा कार्यक्रम चालत असे. खरेतर मला त्याच्याशी काहीही कर्तव्य नव्हते. मी माझ्या वाटेने नदीवर जात असे. स्नानसंध्या करून जपसाधना करीत असे.

एके दिवशी मला जरा लवकरच जाग आली. मी माझे साहित्य घेऊन नदीवर स्नानास निघालो होतो आणि त्या नर्तकीच्या महालातील प्रकाश एका झरोक्यातून माझ्यासमोर रस्त्यावर पडला होता. तो प्रकाश पाहून त्या महालाकडे डोकावण्याचा मोह मला आवरता आला नाही. आजूबाजूला अंधाराचे साम्राज्य होते. मला पाहणारे तिथे कोणीच नव्हते. मनात क्षणभर विचार आला. एकदाच महालाकडे नजर फिरवून पाहिले तर काय पाप आहे. त्या नर्तकीच्या महालातून पायातील घुंगरांच्या पदन्यासामुळे होणारा मंजुळ आवाज कानावर पडू लागला आणि मी त्या महालाकडे पाहण्याचा मोह आवरू शकलो नाही. नकळत आपोआप माझी नजर त्या महालाकडे वळली. तेव्हा महालाचा वरवाजा बंद होता. पण महालाच्या दारात पुरुषांच्या चपलांचा खच पडला होता. तो चपलांचा ढीग पाहून मनाला खाद्य मिळाले आणि माझ्या मनात विचार चमकून गेला की, या महालाबाहेर एवढ्या चपलांचा ढीग पडला आहे. म्हणजे एवढ्या परपुरुषांबरोबर ही नर्तकी नाचगाणे म्हणून त्यांचे मनोरंजन करत असेल, असा विचार करीत करीत मी नदीवर पोहोचलो आणि भानावर आलो. नदीत स्नान करून मी ध्यान लावण्याचा प्रयत्न करीत होतो. पण त्यादिवशी काही केल्या माझे चित्त स्थिर होत नव्हते. सारखा राहून राहून त्या नर्तकीच्या दारात पडलेला चपलांचा ढीग माझ्या नजरेसमोर येत होता. असा मनाचा मोह आवरण्याच्या प्रयत्नात उजाडले. ध्यानधारणा न करताच विचलित मनःस्थितीत मी आश्रमात आलो.

सारे आयुष्य योग्याप्रमाणे काढलेला मी तपस्वी, माझ्या तपसाधनेचा मला अभिमान होता. परंतु त्यादिवशी माझ्या साधनेला ग्रहण लागले होते. त्या दिवसापासून नदीवर पहाटे स्नानाला निघालो आणि त्या महालाजवळ आलो की त्या महालाबाहेर पडलेले जोडे पाहण्याचा मोह मला आवरत नसे. मी नदीवर स्नानाला जाण्याचा मार्ग बदलण्याचा प्रयत्न केला. पण तोही निष्फळ ठरला. पुन्हा त्याच रस्त्याने नदीवर जाण्याचा आणि नर्तकीच्या दारातील जोडे पाहण्याचा मोह मला आवरता येत नव्हता. माझे वयही आता झाले होते. माझा शिष्य समुदाय मोठा होता. त्यातील काही शिष्य रोज माझ्या भेटीला येत असत. येताना भेट म्हणून काहीतरी आणत असत. एकदा माझी प्रकृती अचानक बिघडली. अतिसाराचा त्रास होत होता. वैद्याकडून शिष्यांनी औषध आणले. ते प्यायला दिले. मात्रा उगाळून दिल्या. पण गुण आला नाही. अतिसार वाढतच गेला. माझे हिंडणे, फिरणे, उठणे, बसणे बंद झाले. माझे सर्व शिष्य फारच प्रेमळ, गुणी आणि माझी सेवा सुश्रुषा करीत असत. माझा एक चर्मकार शिष्य होता. तो दूरवरून मला भेटण्यास आला होता. त्याने येताना माझ्यासाठी रेशमी कलाकुसरीचे काम केलेले छानसे जोडे आणले होते. तो आला तेव्हा त्याला माझी तब्येत बिघडल्याचे समजले. मी तर जागचा उठूही शकत नव्हतो. माझी प्रकृती फारच बिघडली होती. मी एका ठिकाणाहून उटूही शकत नव्हतो. शिष्याने माझ्यासाठी आणलेले जोडे ठेवलेला कोनाडा माझ्यासमोरच होता. ते जोडे मला झोपल्या जागेवरून स्पष्ट दिसत होते. गुरुसाठी शिष्याने तयार केलेले जोडे अप्रतिम सुंदर होते. ते जोडे एकदातरी पायात घालायला मिळावेत, असा वारंवार मला मोह होत होता. पण मी जागचा उठूही शकत नव्हतो. राहून राहून सारखी माझी नजर त्या जोड्यावर जात होती.

अखेर त्या अतिसाराच्या आजारातून मी काही बरा झालो नाही. वरचेवर माझी प्रकृती खालावत गेली. जन्मभराच्या अभ्यासामुळे मुखाने सतत हरिनाम घेणे चालू होते. तरीही मधूनच त्या जोड्यावर माझी नजर जात होती आणि ते जोडे एकदा तरी पायात घालण्याचा मोह होत होता. अखेर माझा अंतकाळ जवळ आला. मुखाने हरिनामाचा जप चालू होता. पण अखेरच्या क्षणी शिष्याने आणलेल्या त्या रेशमी जोड्यावर माझी नजर पडली. क्षणभरच मनात विचार आला की माझ्या शिष्याने माझ्याकरीता एवढे सुंदर जोडे तयार करून आणले. पण मी ते एकदाही पायात घालू शकलो नाही, असा मनात विचार चालू असताना माझी प्राणज्योत मालवली. माझे योग्याचे जीवन संपले होते. पुन्हा गर्भवास, पुन्हा जन्माला येणे. या दुष्टचक्रात मी अडकलो. पाप-पुण्याच्या यातना, गर्भवासाच्या यातना भोगून पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलो. एका चर्मकार कुटुंबात माझा जन्म झाला होता. पूर्वजन्माच्या तपश्चर्येच्या सामर्थ्याने मला पूर्वजन्माचे संपूर्ण ज्ञान होते. मी मनात विचार केला की, मी तर पूर्वजन्मात एक महान तपस्वी होतो. मरेपर्यंत माझ्या मुखात हरिनामाचा जप चालू होता. असे असतानाही मला पुनर्जन्म का मिळाला ?

एकतर गर्भवासाचे अतोनात कष्ट, यातना सहन करून माझा जन्म झाला होता. आता येथून आपली सुटका कशी होणार, म्हणून मी जन्मल्यापासून टाहो फोडला. जिवाच्या आकांताने आक्रोश करीत होतो. त्या घरातील माझ्या या जन्माच्या नातेसंबंधींना माझ्या जन्माने फार आनंद झाला होता. पण माता-पिता, आजी-आजोबा, काका, काकू, मावशी, मामांना, कुलदीपक मुलगा जन्माला आल्याचा आनंद झाला होता. पण माझ्या सततच्या रडण्याने माझे नातलग हैराण झाले होते. रडून रडून माझ्या तोंडाला कोरड पडली होती. जीभ टाळ्याला चिकटली होती. तरीही माझे रडणे थांबत नव्हते. कुणी वैद्याकडून औषध आणत होते. कुणी मांत्रिकाकडून अंगारे धुपारे आणत होते. जो जे सांगेल ते नाना उपाय केले तरी, माझे रडणे काही थांबत नव्हते. कारण माझ्या रडण्याचे कारण वेगळेच होते. ते मी माझे या जन्मातील नातलगांना सांगूही शकत नव्हतो. माझे पूर्वजन्माचे गाव आणि या जन्माचे गाव जवळजवळच होते. माझा जन्म होऊन दहा दिवस झाले तरी, माझे रडणे काही थांबत नव्हते. आजूबाजूच्या पंचक्रोशीत माझी जन्मापासून अहोरात्र रडण्याची बातमी समजली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे एवढे सतत रडण्यानेही मला काहीच झाले नव्हते. उलट माझ्या रडण्याच्या आवाजाने आजूबाजूचे लोकच त्रस्त झाले होते. माझे रडणे थांबावे म्हणून कुणी काहीही उपाय केला तरी त्याला मुभा होती. दहा दिवस असेच माझ्या अविरत रडण्यात गेले होते. दहाव्या दिवशी माझा जन्म झाला होता, त्या घरी एक स्त्री आली आणि म्हणाली,

मी तुमच्या मुलाचे रडणे थांबवते. पण घरातील सर्व माणसे बाहेर जा. त्या मुलाला एकट्यालाच माझ्याजवळ राहू द्या. माझे रडणे रात्रंदिवस ऐकून वैतागलेले घरचे लोक आतल्या घरात मला एकट्यालाच त्या स्त्रीच्या ताब्यात देऊन बाहेर निघून गेले. त्या स्त्रीने सर्वांना घराबाहेर काढले. आता मी व ती स्त्री आम्ही दोघेच आतल्या घरात होतो. मी त्या स्त्रीला पाहून पुरता घाबरलो होतो. इतक्यात त्या स्त्रीने घराचे दार बंद केले. ती काय करते ते मी पहात होतो. आतल्या घरात दिव्याचा मंद प्रकाश पडला होता. मी त्या स्त्रीकडे पाहिले. रागाने तिचे डोळे लाल झाले होते. उतारवयामुळे त्या स्त्रीचे केस पांढरे झाले होते. चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या होत्या. मी त्या स्त्रीचा एकंदर अवतार पाहून पुरता घाबरलो होतो.

रडण्याचा थोडा सूर कमी करून, ती स्त्री काय करते ते पाहात होतो. ती स्त्री माझ्याजवळ येऊन बसली. माझे रडणे थांबल्याचे पाहून ती स्त्री म्हणाली, “हे पूर्वजन्मीच्या तपस्वी, तू स्वतःला फार ज्ञानी योगी समजत होतास ना ? पूर्वजन्मी तू मला पाहिले नाहीस पण मी तुझी कीर्ती ऐकून होते. मला तू तर कधीच पाहिले नाहीस. तेव्हा तू मला कसा ओळखशील. मी तुझ्या स्नानाला जाण्याच्या वाटेवर असलेल्या महालात राहणारी नर्तकी आहे. हे पूर्वजन्मीच्या तपस्वी, आता तुला माझी ओळख पटली असेल.” हे त्या स्त्रीचे बोलणे ऐकताच बाळरूपातील पूर्वजन्मीचा तपस्वी आश्चर्यचकित झाला. ती स्त्री म्हणाली, तू स्वतःला तपस्वी समजतोस, पण मीही नर्तकी असले तरी पतिव्रता आणि सत्यव्रता आहे. माझीही काही तत्त्वे आहेत. त्या तत्त्वापासून मी माझे कधीच पतन होऊ दिले नाही. म्हणून मलाही भूतकाळाचे व भविष्यकाळाचे ज्ञान आहे. दुसऱ्याच्या मनातील भावना आणि विचार मला कळतात.

येथून जवळच तुझे पूर्वजन्मीचे व माझे आताचे गाव आहे. तुझा पुनर्जन्म झाला. पण मी अजून त्याच जन्मात आहे. तुझे दहा दिवस सततचे रडणे ऐकले आणि मनात विचार केला, तर मी अंतर्ज्ञानाने जाणले की, हा तो पूर्वजन्मीचा तपस्वी असावा आणि मनात म्हणाले, जावे याचे रडणे थांबवायला. फार अभिमान होता ना तुला तुझ्या तपसामर्थ्याचा आणि अपार शिष्यगणाचा ? मग असे पतन का झाले ? त्याचेही कारण तुला सांगते ऐक, मी तर आता म्हातारपणामुळे नाचगाणे बंद केले आहे. फक्त ईश्वरभक्तीत आयुष्य घालवते आहे. तसा माझ्यात आणि तुझ्यात काय फरक आहे ? मी आयुष्यभर एकटीच राहीले. संसारप्रपंच, मूलबाळ काही नाही. पण मी माझे आयुष्य मुक्तपणे जगले. काही मर्यादा पाळून सर्व इच्छा पूर्ण करून जगले मी. तारुण्याचा बहर संपला आणि सर्व तृप्त इच्छांना सोडून देऊन, आता देवाच्या ध्यानात मग्न असते. पण हे तपस्वी, आता मी तुला तुझे पतन का झाले ते सांगते.

पूर्वजन्मी तपस्वी असलेले ते बाळ लक्ष देऊन त्या स्त्रीचे बोलणे ऐकत होते. तीं स्त्री म्हणाली, हे तपस्वीच्या पुनर्जन्मातील बाळा, पूर्वजन्मी तू एवढी तपश्चर्या केलीस मग तू फक्त आपल्या देवाच्या ध्यानातच का राहिला नाहीस? स्नानाला जाताजाता माझ्या दारात पडलेले जोडे पाहण्याची, त्या जोड्याची गणती करण्याची तुला काय गरज होती. आणि आयुष्यभर लाकडी खडावा घालून किंवा अनवाणी पायाने फिरलास आणि आयुष्याच्या अखेरीस अंतःकाळ जवळ आला असताना, शिष्याने आणलेल्या जोडयात तुझा जीव का गुंतला ? तुला माहीत नव्हते का, अंतःकाळी जे मनात चिंतन असते. तसा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. मग भोग आता आपल्याच करणीचे फळ. रडून रडून कोणाला सांगतो आहेस ? इथे तू का रडतोस हे कोणाला समजणार आहे ? असे म्हणून ती स्त्री 2 जाण्यासाठी उठली. इतक्यात ते बाळ बोलू लागले. ते म्हणाले, हे माऊली, मी पूर्वजन्मी तपस्वी होतो; पण माझे सर्व तप व्यर्थ गेले. आता तूच माझा उद्धार कर. तू ज्ञानी आहेस, श्रेष्ठ आहेस. तूच माझी गुरू आहेस. मी तुला मनोमन गुरू मानले आहे. तेव्हा आता मी काय करू, ते तूच सांग तू सांगशील तसा मी वागेन.

हे त्या बालकाचे बोलणे ऐकून ती स्त्री बालकास म्हणाली, हे बालका, तू तर पूर्वजन्मी जप, तप, ध्यान फार केले आहेस. या जन्मी तू फक्त आई-वडिलांची मनोभावे सेवा कर. तुझे कल्याण होईल. तुला सद्गती प्राप्त होईल. असे म्हणून त्या स्त्रीने त्या बालकाच्या मस्तकी हात ठेवून त्याला अनुग्रहित केले आणि त्या स्त्रीने त्या बालकास आपले शिष्यत्व बहाल केले. त्या बालकानेही त्या स्त्रीस गुरू मानले.
दार उघडून ती स्त्री बाहेर आली. बाळाचे रडणे थांबले होते. अनंत उपायांनी बाळाचे रडणे थांबले नव्हते ते त्या स्त्रीने थांबविले होते. तेव्हा सर्वांनी त्या स्त्रीस विचारले की असा कोणता उपाय तुम्ही केला की बाळाचे रडणे थांबले ? यावर ती स्त्री फक्त हसली व निघून गेली. बाळाचे रडणे थांबल्याने घरातील सर्व लोक आनंदित झाले. बाळाचे रडणे थांबण्याचे सारे श्रेय त्या नर्तकी स्त्रीलाच होते. म्हणून मग बाळाचे नाव काय ठेवायचे ते त्या स्त्रीलाच घरातील लोकांनी विचारले. तेव्हा त्या नर्तकीने सांगितले की या मुलाचे नाव रोहिवास ठेवा. घरातील लोकांनी बाळाचे बारसे केले. घुगऱ्या पानाचे विडे बाळाचे रोहिवास नाव ठेबले. रोहिवास विसामासाने वाढू लागला. रोहिदास पाच वर्षांचा झाला. असा मी हळूहळू मोठा झालो.

रोहिवास पुंडलिकाला आपलीच कथा सांगत होते. ते म्हणाले, हे पुंडलिका मला : नर्तकी स्त्रीने बालपणीच सांगितलेला, माता-पित्यांची सेवा करण्याचा मंत्र मी कधीच बिसरलो नाही. हळूहळू मोठा झालो आणि माझ्या आई-वडिलांची सेवा करण्याचे व्रत भी कधीच मोडले नाही. कारण या जन्मी तरी मला माझा उद्धार करून घ्यायचा होता. मी माझ्या मातापित्यांची सेवा तन, मन, धनाने करीत आलो आहे. नुसती त्यांची सेवाच केली नाही, तर त्याशिवाय मी त्यांचा कधी शब्द मोडला नाही किंवा त्यांना दुःख, त्रास होईल असे वागलो नाही. आजवर कोणतीही गोष्ट त्यांच्या सल्ल्याविना केली नाही. आतातर माझे माता-पिता वृद्ध आहेत. म्हणून तर मी त्यांची मनोभावे सेवा करतो. मलाही आता त्यांची सेवा करण्याची जणू सवयच झाली आहे.

अशी ही आपली सविस्तर कथा रोहिदासानी पुंडलिकास सांगितली. आणि पुंडलिकास रोहिदास म्हणाले, हे पुंडलिका, तुझी माझे शिष्यत्व स्वीकारण्याची उत्कट इच्छा पाहून मी धन्य झालो. तेव्हा मी तरी आता तुला वेगळे काय सांगू, माझ्या गुरूंनी मला जे सांगितले तेच मी तुलाही सांगणार, म्हणून मी तुला म्हणतो की, तूही तुझ्या वृद्ध माता-पित्यांची सेवा कर, हीच माझी तुला अनुग्रहाची दीक्षा आहे. आणि आजपासून तू माझा शिष्य आणि मी तुझा गुरू झालो, असे समज. तुझेही माता-पिता वृद्ध आहेत. त्यांची सेवा करणे, म्हणजेच त्या ईश्वराची सेवा करण्यासारखे आहे. प्रत्यक्ष परमेश्वर प्रसन्न होऊन तुझ्या भेटीला आले तरी माता-पित्यांच्या सेवेत खंड पडू देऊ नकोस. मग तीर्थयात्रा किंवा पूजाअर्चा, दानधर्म करण्याची तरी काय गरज आहे ? माता-पित्याच्या सेवेत ही पुण्यकर्माची फलप्राप्ती आपोआप प्राप्त होईल. असे सांगून रोहिदास पुंडलिकास म्हणाले, पुंडलिका, मी तुला काय सांगतो ते नीट लक्ष देऊन ऐक. पुंडलिका, येथून जवळच दिंडीरवन आहे. त्या दिंडीरवनातून भीमा नवी वाहते. ही भीमानदी भीमाशंकर या शिवतीर्थ क्षेत्री उगम पावते. भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. अशा या पुनित पावन भीमानदीला दिंडीरवनात चंद्राप्रमाणे अर्धगोलाकार बळण प्राप्त झाले आहे. म्हणून तिला तेथे चंद्रभागा असे म्हणतात. हे पुंडलिका, तू त्या दिंडीरवनातील चंद्रभागेतीरी जा,

असे सांगून रोहिदासांनी आपल्याजवळची लोखंडाची हस्ती म्हणजे (चपला बनविण्याचे, चामडे बडविण्याचे लोखंडी जड हत्यार म्हणजेच (लोहदंड) पुंडलिकाच्या हातात दिली आणि पुंडलिकास सांगितले, हे पुंडलिका हा लोहदंड (हस्ती) तू चंद्रभागेच्या पाण्यात सोडून बघ आणि ज्या ठिकाणी ही हस्ती (लोहदंड) पाण्यात बुडणार नाही, ही पाण्यावर तरंगेल तेथेच तू मुकाम कर आणि तुझ्या वृद्ध मातापित्यांची तेथेच राहून सेवा कर.
रोहिदास गुरूंचा उपदेश ऐकून पुंडलिक दिंडीरवनामधील भीमा उर्फ चंद्रभागा नदीकडे जाण्यास निघाला. वृद्ध माता-पित्याला त्याने खांद्यावर उचलून घेतले. गुरू रोहिदासाने दिलेली हस्ती (लोहदंड) घेतली. चालत चालत पुंडलिक त्याच्या आई- वडिलांना घेऊन नदीतीरी पोहोचला आणि भीमानदीने जेथे अर्धचंद्रकार वळण घेतले. आहे तेथे पुंडलिक हस्ती पाण्यावर ठेवून पाहू लागला, पण पुंडलिकाने पाण्यावर हस्ती ठेवली की ती बुडत असे. पुन्हा पुंडलिक भीमा उर्फ चंद्रभागेच्या पाण्यात डुबकी मारून ती हस्ती वर काढत असे. थोडे अंतर चालून चंद्रभागेच्या किनाऱ्यावर पुन्हा हस्ती पाण्यावर सोडत असे. असे करत करत पुंडलिक चंद्रभागेच्या अर्धचंद्राकाराच्या मध्यावर आला. त्याने आपले गुरू रोहिदासाचे स्मरण केले. आणि हस्ती (लोहदंड) पाण्या सोडली. आणि पुंडलिक डोळे मिटून उभा राहिला. बऱ्याच वेळा हस्ती पाण्यात बुडल्याचे पाहून पुंडलिकाच्या मनात शंका निर्माण झाली होती की, ही एवढी लोखंडी हस्ती ती पाण्यावर कशी काय तरंगेल ? परंतु पुंडलिकाचे दुसरे मन लगेच उत्तर देत होते. अरे पुंडलिका, ज्या रोहिदासाने काशीची गंगा चामडे बुडविण्याच्या कुंडात आणली, त्यांचे सामर्थ्य महानच असणार आणि त्यांनी दिलेला शब्द खोटा कसा ठरेल ? तेव्हा आपण आपला प्रयत्न का सोडावा ? असा मनाचा निश्चय करून पुंडलिकाने डोळे उघडले आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसला. पुंडलिकाने समोर पाहिले तेव्हा नवल घडले होते, रोहिदासांनी पुंडलिकास दिलेली हस्ती (लोहदंड) भीमा उर्फ चंद्रभागेच्या प्रवाहाच्यामध्ये खोल पाण्यात तरंगत होती. ते पाहून पुंडलिकास अतिशय आनंद झाला.

पुंडलिकाने आपल्या गुरू रोहिदासांच्या नावाचा जयजयकार केला. लोखंडी हस्ती (लोहदंड) पाण्यावर तरंगलेल्या त्या ठिकाणास पुंडलिकाने लोहदंडतीर्थ हे नाव दिले. अजूनही पांडुरंगाच्या पंढरपुरी चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिकाच्या मंदिरासमोर हे लोहदंडाचे तीर्थ आहे. पुंडलिकाचे राहण्याचे ठिकाण लोहदंडतीर्थाच्या ठिकाणी नक्की झाले. भीमानदीच्या किनाऱ्यावर पुंडलिकाने राहण्याकरिता झोपडी तयार केली. तेथे पुंडलिक वृद्ध माता- पित्यासह राहू लागला. उदरनिर्वाहासाठी तेथेच थोडंसं धान्य पिकवावं आणि अहोरात्र माता-पित्यांच्या सेवेत मग्न रहावे असा पुंडलिकाचा नित्यक्रम असे. वृद्ध माता पित्यांना आंघोळ घालावी. त्यांना वस्त्रं नेसवावीत, स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून त्यांना घास भरवून जेवू घालावे. एका मांडीवर आईचं डोकं आणि दुसऱ्या मांडीवर वडिलांचं डोकं ठेवून आई-वडिलांची झोप पूर्ण होईपर्यंत, जराही न हालता तिष्ठत बसून रहावं, असा पुंडलिकाचा नेम असे. एकदा का माता-पिता पुंडलिकाच्या मांडीवर गाढ झोपी गेले की, काही झाले तरी पुंडलिक कणभरही हालत नसे. पुंडलिकास बाटे,

आपण जर थोडीशी हालचाल केली तर आपल्या हालचाल करण्याने, आपल्या माता-पित्याची झोप मोडेल आणि गुरूंची आज्ञा मोडेल. दिवस जात होते. महिने गेले, वर्ष लोटली. पण पुंडलिकाचा माता-पित्यांच्या सेवेत खंड नव्हता. उलट पुंडलिक दिवसेंदिवस अधिकच आई-वडिलांच्या सेवेत मन्न होत होता. आई-वडिलांच्या सेवेमुळे पुंडलिकाच्या पुण्याईमध्ये दिवसेंदिवस अधिकच भर पडत होती. परंतु पुंडलिकास त्याची कल्पनाही नव्हती.
द्वारकेत कृष्ण अवतार धारण केलेल्या विष्णुदेवास पुंडलिकाच्या आई-वडिलांच्या सेवेची बातमी अंतर्मनाने समजली. तेव्हा द्वारकेतील कृष्ण अवतारी विष्णुदेवास चिंता वाटू लागली. कारण पुंडलिक माता-पित्यांच्या सेवेमुळे पृथ्वीतलावर अतिशय पुण्यशील व सामर्थ्यवान झाला होता. द्वारकेत श्रीकृष्ण रुक्मिणीला म्हणाले, रुक्मिणी, दिंडीरवनात माझा एक भक्त महान तपस्वी झाला आहे. त्याला हे पुण्य आई-वडिलांच्या अपार सेवेमुळे मिळाले आहे. तेव्हा माझ्या त्या भक्ताच्या भेटीसाठी मला जायला हवे. असे म्हणून द्वारकेहून निघून कृष्ण दिंडीरवनात आले. दिंडीरवनात आले तेव्हा पुंडलिकाचे माता-पिता पुंडलिकाच्या मांडीवर गाढ झोपले होते.

देव खऱ्या भक्ताची परीक्षा पाहत असतो. त्याखेरीज तो प्रसन्न होत नसतो. श्रीकृष्ण अतिथीचा वेष घेऊन पुंडलिकाच्या दारात आले आणि पुंडलिकास म्हणाले. पुंडलिका, मी तुझ्या दारी अतिथी आलो आहे. तू अतिथीचे स्वागत करणार नाहीस का ? तेव्हा दाराकडे पाठ करून बसलेला पुंडलिक म्हणाला, अतिथी हा देव असतो, परंतु माझ्या आई-वडिलांची झोप पूर्ण होईपर्यंत मी तसूभरही हलू शकत नाही. तेव्हा कृपा करून अतिथीमहाराज, माझ्या आई-वडिलांची झोप पूर्ण होईपर्यंत थांबा. माझ्या माता-पित्यांची झोप पूर्ण झाली की, आपले मी आदराने स्वागत करेन. तुमची सर्वोपचारे सेवा करेन. परंतु तुम्ही थांबा, तुम्हाला मी ओळखले आहे.
पुंडलिकाचे हे बोलणे ऐकून अतिथी रुपातील कृष्णाला राग आला. त्यांनी पुंडलिकाची सत्त्वपरिक्षा घेण्याचे ठरविले. कृष्ण मनात म्हणाले, हा पुंडलिक म्हणतो की कोणीही आले किंवा कसलेही माझ्यावर संकट आले तर, माझ्या आई-वडिलांची झोप पूर्ण होऊन ते जोपर्यंत जागे होत नाहीत, तोवर मी कणभरही जागचा हालणार नाही. तेव्हा पाहू हा पुंडलिक जागचा कसा काय हालत नाही ते, असे म्हणून श्रीकृष्णाने आपल्या ईश्वरी लीलेने एक मोठा भुंगा निर्माण केला आणि त्या भुंग्याला आज्ञा केली की, हे भुंग्या, तू लाकूड पोखरतोस तशी त्या पुंडलिकाची पाठ पोखर; म्हणजे मग तो कसा जागचा हालत नाही ते पाहू. मी प्रत्यक्ष परमात्मा, त्याच्या दारात तिष्ठत उभा असतानासुद्धा, तो म्हणतो की माझ्या आई-वडिलांची झोप पूर्ण झाल्याशिवाय जागचा हालणार नाही. कारण की पुंडलिकाचे आई-वडील पुंडलिकाच्या मांडीवर झोपले आहेत. तेव्हा आता पाहू पुंडलिक कसा जागचा हालत नाही.

देवाची आज्ञा होताच गुंजारव करीत भुंगा पुंडलिकाच्या फुटीत शिरला. त्या भुंग्याचे ते रौद्ररूप आणि त्याचा मोठ्या आवाजातील गुंजारव ऐकून पुंडलिक काळजीत पडला. कारण या भुंग्याच्या गुंजारवाने माझ्या आई-वडिलांची झोप मोडणार नाही ना ? हा भुंगा माझ्या निद्रिस्त माता-पित्यांना काही इजा तर करणार नाही ना, असे वाटत पुंडलिकाने बसल्या जागीच मातृ देवो भव । पितृ देवो भव । असा जप म्हणण्यास सुरुवात केली. पुंडलिकाची पाठ भुंगा पोखरत होता. पुंडलिकास तरीही अतिशय आनंद झाला. कारण त्या भुंग्याला पुंडलिकाच्या पाठीचे खाद्य मिळाले होते. म्हणजे तो भुंगा पुंडलिकाच्या आई-वडिलांना काही इजा करून त्यांची झोपमोड करणार नव्हता आणि पुंडलिकाचे माता-पित्याच्या सेवेचे व्रत मोडणार नव्हते. म्हणून भुंगा पुंडलिकाची पाठ पोखरत होता, तरी पुंडलिक समाधानी व शांतपणे माता-पित्याचे डोके मांडीवर घेऊन बसला होता.

पुंडलिकाचे ते रूप पाहून देव प्रसन्न झाले. ते धावतच पुंडलिकाजवळ आले. परंतु पुंडलिकाने अतिथीच्या रूपातील देवाला हातानेच खूण करुन थांबण्यास सांगितले. तेव्हा देवाने अतिथीचा वेष टाकला आणि मनोहर चतुर्भुज रूप प्रकट केले. पण पुंडलिक तरीही जागचा हालला नाही. पुंडलिकाने माता-पित्याचे डोके मांडीवर घेऊन बसल्या जागेवरूनच भक्तीभावाने देवास नमस्कार केला. देवाने चतुर्भुज रूप धारण केल्याबरोबर पुंडलिकाची पाठ पोखरणारा भुंगाही गायब झाला. पुंडलिकाची पाठ पुन्हा पहिल्यासारखी झाली. जसे की काही झालेच नव्हते. देवाचे मनमोहक रूप पाहून पुंडलिक देवाला म्हणाला, देवा, तुम्ही आलात. तुमचे दर्शन झाले. माझ्या जन्माचे सार्थक झाले. तुमचे हे मनोहर रूप पाहून माझे नेत्र तृप्त झाले. पण तरीही तुमच्या स्वागताकरिता मी उठू शकत नाही, याचे मला दुःख वाटते. कारण गुरूच्या आज्ञेनुसार मी माता-पित्यांच्या सेवेत व्यत्यय आणू शकत नाही. माझ्या या पितृ सेवेच्या कार्यात बाधा आली, तर गुरूची आज्ञा मोडण्याचे मला पातक लागेल. पुंडलिकाची ती तीव्र भक्ती, प्रेम, उद्विग्नता व कर्तव्यनिष्ठा पाहून देव संतुष्ट झाले

आणि पुंडलिकास म्हणाले, बा पुंडलिका, तुझी पितृभक्ती पाहून मी संतुष्ट झालो. वसुदेव देवकी आणि नंद यशोदासारखे दोन दोन माता-पित्यांचे प्रेम मिळाल्याने मी धन्य झालो आहे. त्यांची सेवा करण्यात काय आनंद असतो ते मी जाणतो आहे, तेव्हा हे पुंडलिका, तुझ्या माता-पित्यांची झोप मोडून, त्यांना मांडीवरून दूर करून, तू माझ्या स्वागताकरता अजिबात उठू नकोस. कारण तुझ्या माता-पित्यांची झोप होईपर्यंत मीच थांबतो. त्यांची झोप होऊन ते जागे झाले की, तू माझ्या स्वागताकरिता ऊठ. पण हे पुंडलिका, तू माझे एक काम कर. तुझ्या मातापित्यांची झोप पूर्ण होईपर्यंत, मी कुठे थांबू तेवढे तू मला सांग देवाचे हे बोलणे ऐकून पुंडलिक गहिवरला आणि म्हणाला, देवा काय करू! तुम्ही माझ्या घरी आलात, हे माझे परम भाग्य; पण आंधळ्याच्या हातात चिंतामणी यावा व त्याने गारगोटी म्हणून फेकून द्यावा, तशी माझी अवस्था झाली आहे. पण मीही माझ्या तत्त्वापासून विचलित होऊ शकत नाही. तुम्ही मला थांबण्यासाठी जागा विचारली, पण मी तर इतका अभागी आहे, की माझ्याजवळ तुम्हाला बसण्यास देण्याकरिता आसन नाही किंवा तलम वस्त्रसुद्धा नाही. देवा, आता तुला बसण्यासाठी काय देऊ म्हणत, पुंडलिकाने बसल्या जागेवरून आजूबाजूला हात फिरविला आणि जवळच पडलेली एक बीट पुंडलिकाच्या हाताला लागली. ती वीट पुंडलिकाने बसल्या जागेवरूनच भिरकावली आणि देवाला सांगितले, देवा, या एवढ्याशा विटेवर तुला बसता तर येणार नाही आणि आता थोड्याच वेळात माझे आई-वडील जागे होतील आणि मी त्यांचे डोके बाजूला करून तुझ्या सेवेसाठी उठेन, तेव्हा देवा, तू माझ्याकरता क्षणभर या विटेवर उभा रहा.

नदीच्या पात्रातून पुंडलिकाने फेकलेली बीट चंद्रभागा नदीच्या काठावर उंच ठिकाणी जाऊन पडली. भक्तवेडा देव त्या विटेवर जाऊन उभा राहिला. पुंडलिकाच्या भेटीची वाट पाहू लागला. परंतु ईश्वरी इच्छा होती. पुंडलिकाचे आई-वडील पुंडलिकाच्या मांडीवर झोपले ते कायमचेच. ते पुन्हा उठलेच नाहीत. म्हणून पुंडलिकही आई-वडील उठण्याची वाट पहात माता-पित्यांचे डोके मांडीवर घेऊन तिष्ठत राहिला आणि पुंडलिकाच्या आज्ञेची वाट पाहत देवही विटेवर उभे राहिले, ते कायमचेच. उभे राहून कंटाळा येऊ नये म्हणून देवाने कमरेवर हात ठेवले. पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर देव उभे राहिले, म्हणून विटेवर उभे असलेल्या देवाचे नाव, विठ्ठल असे झाले.
तिकडे द्वारका सोडून पुंडलिकाच्या भेटीस गेलेले श्रीकृष्ण परत द्वारकेला आले नाहीत, म्हणून श्रीकृष्णाची पट्टराणी रुक्मिणी व राही, सत्यभामा आणि कृष्णाच्या पत्न्या कृष्णाची वाट पाहून थकल्या. कृष्ण परत द्वारकेला येत नाहीत, असे दिसताच त्या सर्वजणी कृष्णाच्या शोधार्थ निघाल्या. शोधत शोधत अखेर त्या चंद्रभागेतीरी उभ्या असलेल्या विठ्ठलास भेटल्या. रुक्मिणीने व सत्यभामाने विठ्ठलास परत द्वारकेला येण्यास सांगितले. तेव्हा बिटेबर उभे असलेले विठ्ठल रूपातील कृष्ण म्हणाले,

आता मी माझ्या पुंडलिक भक्ताची आज्ञा मिळाल्याशिवाय द्वारकेला येऊ शकत नाही. तेव्हा देवाच्या राण्या म्हणाल्या, देवा जिथे तुम्ही नाहीत, त्या द्वारकेला जाऊन आम्ही तरी काय करावे ? जेथे तुम्ही तिथे आम्ही. तेव्हा विठ्ठल आपल्या राण्यांना म्हणाले, की जशी तुमची इच्छा. तुम्हाला इथे रहावयाचे असेल तर, तुम्ही खुशाल रहा. पण माझ्याजवळ, माझ्या शेजारी कुणालाही स्थान मिळणार नाही. कारण मीच आधी पुंडलिकाची वाट पाहत तिष्ठत उभा आहे. तेव्हा तुम्ही माझ्या मागच्या बाजूला रहा. तेव्हा विठ्ठलाच्या सर्व राण्या विठ्ठल उभे होते, त्यांच्या पाठीमागे कमरेवर हात ठेवून उभ्या राहिल्या.
पुढे दिंडीरवनाचे पंढरी हे नांव पडले. पंढरीत रहाणारा, म्हणून देवाचे ( विठ्ठलाचेही) पांडुरंग नाव पडले. अजूनही पंढरीत पुंडलिकाच्या मंदिरासमोर चंद्रभागेच्या वाळवंटात लोहदंडतीर्थ आहे. पुंडलिकाच्या माता-पित्यांचे मंदिर आहे आणि पुंडलिकाच्या मंदिराच्या अगदी सरळ रेषेत नदीकिनारी विठ्ठलाचे भव्य मंदिर आहे. मंदिरात विठ्ठल कमरेवर हात ठेवून विटेवर उभे आहेत. विठ्ठल मंदिराच्या मागच्या बाजूस रुक्मिणी व देवाच्या राण्यांची मंदिरे आहेत. त्याही कटीवर हात ठेवून उभ्या आहेत. असे हे पुंडलिकासाठी देव पंढरीला आले. पुढे संतांनी तसा अभंगही लिहिला परब्रह्म आले’. पुंडलिका भेटी

पुढे हे पुंडलिकासाठी पंढरीला आलेले देव, अवघ्या मानवांचे, भाविकांचे लाडके दैवत झाले. विठ्ठल, पांडुरंग कानडा विठ्ठल, विठाई, विठू माऊली, श्रीहरी अशी अनेक नावे बिठ्ठलाच्या लाडक्या भक्तांनी विठ्ठलास देऊ केली. देव दिंडीरवनामध्ये (पंढरपुरी) आले, तेच मुळी भक्त पुंडलिकासाठी आणि नंतर तर या देवाच्या भक्तांचा संत मेळाच जमला. परशुराम, राम, कृष्ण अवतारामध्ये देवांनी दुष्टांचा नाश करण्यासाठी अवतार घेतला असे म्हणतात. पण द्वारकेचे कृष्ण मात्र विठ्ठल रूपात आले, ते त्यांच्या भक्तासाठी. भक्ताच्या प्रेमासाठी. जेव्हा कृष्ण द्वारकेतून पंढरीत आले, तेव्हा गोकुळातील गोप गौळणीही श्रीहरीच्या भेटीसाठी संतरूपात आले असावेत. वेगवेगळ्या ठिकाणी जन्म घेऊन विठ्ठलभक्त झालेला हा संतमेळा, म्हणजे प्रेमभक्तीची उदाहरणे आहेत. या संतांनी ईश्वरभक्ती बरोबरच अडाणी जनांच्या कल्याणासाठी समाजप्रबोधन केले. अभंग, गौळणी, भारुड, ग्रंथ अशा गद्य, पद्य रुपात संतांनी समाजप्रबोधन केले. संत ज्ञानदेव, तुकाराम, नामदेव, दामाजीपंत, चोखोबा, सावतामाळी, गोराकुंभार, नरहरी सोनार, जनाबाई, सखुबाई असे हे सर्व पांडुरंगाचे भक्त (संत) होऊन गेले. म्हणजेच विठ्ठल भक्तीसाठी धर्म, पंथ काहीच आड येत नाही. असा हा विठ्ठल भक्तीचा मळा सर्व संत मंडळींनी गुण्यागोविंदाने फुलविला आणि हासत, नाचत, गात समाजातील अनिष्ट प्रथा दूर करण्याचा संतांनी प्रयत्न केला. म्हणून संत जनाबाई आपल्या एका अभंगात म्हणतात,

विठू माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा

गोरा कुंभार मांडीवरी । चोखा जीवा बरोबरी

निवृत्ती हा खांद्यावरी । सोपानाचा हात धरी

बंका कडियेवरी । नामा करांगुळी धरी

पुढे चाले ज्ञानेश्वर । मागे मुक्ताई सुंदर

जनी म्हणे गोपाळा । करी भक्तांचा सोहळा

विठू माझा लेकुरवाळा । संगे गोपाळांचा मेळा

असा हा पांडुरंगाच्या अंगावर, खांद्यावर, भांडीवर लडिवाळपणा करणारा पांडुरंगाचा ‘संतमेळा’ आहे. अगदी अलिकडच्या काळात गाडगे बाबा, हे विठ्ठलभक्त होऊन गेले. परंतु पांडुरंगाचे भक्त म्हणजेच संत हे सर्व धर्माचे असले तरी त्यांनी आपसात कधीच भेदभाव केला नाही. ते सर्वजण पंढरीच्या विठ्ठल मंदिरात चंद्रभागेतीरी एकत्र जमून किर्तन रंगी रंगून जात असत. कारण त्यांना जणू दाखवून द्यायचे होते की भेदभाव ही मानवानेच रुढ केलेली अनिष्ट प्रथा आहे. याशिवाय नुसते कर्मकांड, पूजाअर्चा, ग्रंथपठण म्हणजे भक्ती नव्हे. आपल्या नित्य कर्मातच भक्ती असते. ते कर्म करून ईश्वराचे चिंतन केले तर भक्ती होते आणि तीच भक्ती देवाला प्रिय आहे. हेही संतांनी दाखवून दिले आहे. संत असे म्हणतात की, जो आपले काम मन लावून करतो आणि तो काम करीत असताना, त्या जगातील सर्व सजीव-निर्जीवाची निर्मिती करणाऱ्या अदृश्य शक्तीचे म्हणजेच ईश्वराचे स्मरण करतो, त्याला त्याच्या कामात मदत करण्यास तो ईश्वर धावून येतो आणि आपली आठवण करणाऱ्या भक्ताला मदत करू लागतो.

असे म्हणतात की, या पंढरीच्या पांडुरंगाने गोरोबा कुंभाराला मडकी घडविण्या मदत केली. जनाबाईंस झाडलोट करू लागला. सखूबाईला दळण करून देऊ लागला. असे हे विठ्ठलाचे लाडके संत सुस्वभावी, सुशील, सोशीक, शरीर व मन निर्मळ असणारे, सद्वर्तनी, शांत व प्रेमळ असे सर्व सद्गुणांचे जणू मूर्तिमंत भांडारच असावे असे होते. संतांना त्रास देणाऱ्यांनासुद्धा संतांनी क्षमा केली. अशा संतांचा सहवास सज्जनांना आनंद देणारा व दुर्जनांना सद्बुद्धी देणारा असतो. त्याशिवाय समाजात पसरलेल्या अनिष्ट रुढी नष्ट करण्याचा संतांनी प्रयत्न केला. म्हणून संतांची चरित्रे वाचून त्यांचे सद्गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया.

FAQ.

  • कृष्णाला विठ्ठल का म्हणतात ?

जो विटेवर उभा आहे (विट – मराठी) तो भगवान विठ्ठल आहे. स्वतः कृष्ण हाच त्याचा प्रिय भक्त पुंडलिकाला भेटायला आला होता आणि पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत व्यस्त असल्याने त्याने भगवान कृष्णाला आपली सेवा संपेपर्यंत थांबण्याची विनंती केली.

  • विठ्ठलाचा जन्म कोणत्या युगात झाला ?

भगवान विठ्ठल/विठ्ठल/विठोबा हे दुसरे कोणी नसून भगवान विष्णू, भगवान नारायण किंवा भगवान कृष्ण आहेत. द्वापार युगाच्या शेवटी श्रावण महिन्यातील गडद पंधरवड्याच्या (हिंदू दिनदर्शिकेनुसार) आठव्या दिवशी भगवान कृष्ण अवतार घेतला असे मानले जाते.

  • पंढरपूर का प्रसिद्ध आहे ?

हे महाराष्ट्रातील एक प्रमुख पवित्र स्थान आहे आणि त्याला महाराष्ट्रात दक्षिण काशी देखील म्हणतात. भीमा नदीच्या काठावर असलेल्या विठ्ठल मंदिरासाठी हे प्रसिद्ध आहे. भीमा नदीला चंद्रभागा म्हणूनही ओळखले जाते कारण ती शहराजवळ चंद्रकोर आकार घेते आणि म्हणूनच तिला हे नाव पडले.

  • विठ्ठल हा शिव आहे का ?

भगवान श्रीकृष्ण हे श्री विष्णूचे रूप आहे आणि विठ्ठल हे श्री कृष्णाचे रूप आहे, तोच देव आहे, पण असे म्हणतात की विठ्ठल रूपात भगवान श्रीकृष्ण आपल्या कपाळावर शिव धारण करतात, म्हणूनच त्यांच्या कपाळावर वेगळेपण आहे. टिळक दुसरे वैष्णव टिळक, भगवान विठ्ठलाचे टिळक हे शिवाच्या वरच्या दृश्यासारखे आहे.

Related Post

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )