
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
कथा आई तुळजाभवानी च्या पलंगाची – The story of Mother Tulja Bhavani’s bed
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी आई तुळजाभवानीचे स्थान एकदम वेगळे असून, शेकडो वर्षापासून वेगवेगळ्या परंपरा आणि रीतीरिवाज चालत आलेले आहेत. जुन्या काळात दळणवळणाची कुठलीही साधने उपलब्ध नसताना, पूर्वीच्या वारकऱ्यांनी किती कष्ट घेतले असतील, हे आपल्या कल्पनेच्या पलिकडचे आहे
आई तुळजाभवानीचे मानपान म्हटले की पलंग, पालखीवाले, बुधलीवाले, भुते, माया, प्रताप या सर्व बाबींचा त्यात समावेश होतो. या सेवा देणारे मानकरी मंडळी आज पण नगर, नाशिक , सोलापूर, पुणे अशा दूरदूरच्या प्रांतातून येऊन या सेवा अखंडपणे देत असतात या ठिकाणी एक विशेष बाब समाविष्ट करावे वाटते की, देवीचे पालखी आणि पलंग, हे देवीच्या मिरवणुकीसाठी आणि निद्रा घेण्यासाठी पवित्र समजले जातात ! परंतु ते बनविणारे हात इतके लहान आहेत की, सर्वसामान्यांना काय पण मंदिर समितीच्या पण कित्येक सदस्यांना याची माहिती नाही.
याचे एक कारण म्हणजे, सेवा देण्याच्या कारणावरून झालेली गुंतागुंत ! तसे पाहिले तर पालखी म्हणा किंवा पलंग म्हणा देवीच्या दोन्ही गोष्टी धार्मिकदृष्ट्या पवित्र असल्याने, त्यांचा वापर झाल्यानंतर मंदिरातच एखाद्या ठिकाणी सुव्यवस्थित ठेवल्या जातात. जमदग्न माता आई तुळजाभवानीच्या बाबतीत मात्र पलंग आणि पालखी या दोन्ही गोष्टी पुन्हा वापरत नाही !. देवीचा उत्सव झाला की त्याच होमात सन्मानपूर्वक तोडून मोडून टाकल्या जातात.
आई तुळजा भवानीच्या सर्व प्रथा आणि परंपरा इतर देवस्थानापेक्षा अतिशय भिन्न आहेत. आई तुळजाभवानीची मूर्ती प्रत्यक्ष पालखीत बसून मंदिराभोवती प्रदक्षिणा मारतात . एक वर्षात तीन वेळेस देवीला तिच्या मूळ सिंहासनावरून उठवून पलंगावरती निद्रिस्त करण्यात येते.
अशी एक आख्यायिका आहे की, आई तुळजाभवानी ही तेली कन्या असल्याने तुळजापुरात कुठलाही तेलघाना चालत नाही. मात्र पालखी आणि पलंग हे पुरविण्याचा मान अहमदनगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील तेली कुटुंबाला आहे. आपण तुळजाभवानी मंदिरात गाभार्यात गेल्यानंतर, उजव्या हाताला ओवरीत देवीचा पलंग दिसतो. भाद्रपद वद्य अष्टमी ते अमावस्या, अश्विन शुद्ध एकादशी ते पौर्णिमा आणि पौष शुद्ध प्रतिपदा ते अष्टमी, या कालावधीत आई तुळजाभवानीची मूळ मूर्ती या पलंगावर निद्रीस्त केली जाते.
यालाच देवीची “घोर निद्रा”, “श्रम निद्रा”, आणि “भोग निद्रा” असे म्हटले जाते. विजया दशमी (दसऱ्या ) नंतर येणाऱ्या पौर्णिमेच्या दिवशी सन्मानपूर्वक मोडतोड करून , जुना पलंग होमात टाकला जातो आणि नवीन पलंगाची स्थापना करण्यात येते. तुळजापुरातील एक घराणे पिढ्यानपिढ्या ही सेवा देत असल्याने त्यांना “पलंगे” आडनावाने ओळखतात.

पालखी आणि पलंग पुरविण्याचा मान हा नगर आणि पुणे जिल्ह्यातील तेली कुटुंबाचा असला तरी, या वस्तू तुळजापूर पर्यंत पोहोचवण्याचा एक अनोखा प्रवास आहे. पलंग बनविण्याचे काम पुणे जिल्ह्यातील घोडेगाव येथील ठाकूर कुटुंबाचे आहे. श्रद्धापूर्वक पलंग बनविल्या नंतर ठाकुर कुटुंबाचे काम संपते. असे असले तरी एकदा हाच पलंग तुळजापुरात पोहोचला की, हेच कुटुंब त्या पलंगाला हात पण लावू शकत नाही.
पलंग बनवल्यानंतर, तो घोडेगाव येथील तेली समाजातील भगत कुटुंबाकडून, इतर भक्तासह , वाजत गाजत जुन्नर- नारायणगाव- आळेफाटा – पारनेर मार्गे अश्विन शुद्ध प्रतिपदेला, घटस्थापनेच्या दिवशी अहमदनगर येथील तुळजाभवानीच्या मंदिरात दाखल होतो !. तिसऱ्या दिवशी हाच पलंग नगर जवळील भिंगार येथील मंदिराकडे प्रस्थान करतो. याच वेळेस राहुरी येथे तयार केलेली देवीची पालखी पण भिंगार मध्ये दाखल होते !. अतिशय भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात पालखी आणि पलंग भेट हा नयनरम्य सोहळा संपन्न होतो.
येथून पुढे, पालखी आणि पलंग तुळजापुरला घेऊन जाण्यासाठी, नगर जिल्ह्यातील खुंटेफळ – चिंचोडी पाटील – सय्यद पीर आणि कुंडी या चार गावचे लोक मानकरी म्हणून सोबत असतात. असा हा सुरु झालेला प्रवास नगर – भिंगार – जामखेड – आष्टी – भूम – चिलवडी – आपसिंगा मार्गे अश्विन शुद्ध नवमीला तुळजापुरात दाखल होतो. दसऱ्याच्या दिवशी आई तुळजा भवानीच्या मूळ मूर्तीला सीमोल्लंघन खेळण्याकरिता पालखीत बसून मंदिराभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात !. ही पालखी आणण्याचा मान नगर जवळील भिंगार येथील भगत या तेली कुटुंबाचा आहे.
ही पालखी बनवण्याची पण एक कथा सांगितली जाते.
अगोदर ही पालखी नगर जवळील हिंगणगाव येथे बनवली जात होती. अहिल्याबाई होळकर यांच्या कारकिर्दीत राहुरी येथील घोगरे हे अहिल्याबाईंचे विश्वासू सरदार होते . राहुरी हे जहागीर असल्याने हा मान घोगरे कुटुंबाने आपल्याकडे ठेवून घेतला . या पालखीसाठी लाकूड पुरवण्याचे काम आणि सन्मान भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला म्हेत्रे आणि माळी कुटुंबाकडे आहे..
पालखीला उभे खांब म्हणजे शिपाई पुरविण्याचा मान कदम कुटुंबाकडे आहे. पालखीच्या खालचा भाग बोरीच्या लाकडाचा असून बाकी सर्व लाकूड सागवान असते ! पालखीचा मुख्य आडवा दांडा हा जुन्या सागवानी लाकडाचा असतो. अशाप्रकारे लाकडांची पूर्तता झाल्यानंतर पालखी बनवण्याचा मान राहुरी येथील कै उमाकांत सुतार यांच्या घराण्याला आहे. पालखीचे लाकूड कतईचा मान धनगर समाजातील भांड या कुटुंबाकडे आहे . पालखीच्या खिळापट्टीचे काम लोहाराचे रणसिंग नामक कुटुंब करते
अशा रीतीने वेगवेगळे मानपान देऊन पालखी तयार होते. सुताराच्या घरी विधीवत पूजा करून , तेली समाजातील धोत्रे हे कुटुंब पालखीला राहुरी येथील तुळजाभवानीच्या मंदिरात आणतात. यावेळी कुंभार समाजाचे मानकरी तेलाचे दिवे पुरवितात तर तेली समाजातील मानकरी तेल पुरवतात .
राहुरीतील तुळजाभवानी मंदिर हे श्री धोंडी घोगरे यांनी दान दिलेल्या जागेवर बांधण्यात आले आहे. येथील देवीची पूजा पण घोगरे तेली कुटुंबच करते. भाद्रपद पौर्णिमेला, या पालखीचा प्रवास नगर जवळील भिंगार गावाकडे सुरू होतो. पालखी नदी पार करून देण्याचा मान कोळी समाजाकडे आहे तर मशाल धरण्याचा मान रोहिदास समाजाकडे आहे.
सुपा – पारनेर – हिंगणगाव – नगर मार्गे ४० गावातून पालखी अश्विन शुद्ध तृतीयेला भिंगार येथे दाखल होते. त्याच दिवशी घोडेगाव येथून आलेला पलंग पण दाखल होतो.
येथे पलंग आणि पालखी ची अभूतपूर्व भेट म्हणजे एक नयनरम्य सोहळाच असतो पालखी आणि पलंगा साठी तुळजापुरात शुक्रवार पेठेत एक स्वतंत्र मोठा बनविलेला आहे रात्री पलंग आणि पालखी ची एकत्रित भव्य मिरवणूक निघून पहाटे आई तुळजाभवानीच्या मंदिरात दाखल होतात. देवीचे सीमोल्लंघन हे दसऱ्याच्या दिवशी सूर्योदयाबरोबर होत असल्याने, मंदिरात अफाट भक्तांचा सागर उसळतो
यावेळेस भोपे पुजारी देवीला १०८ साड्या नेसवून पालखीत बसवतात. बार्शी तालुक्यातील आगळगाव व गोमाळ्याचे भक्त मानकरी पालखीला खांदा देतात ! अपसिंगाचे डांगे कुटुंब देवी वरती छत्री धरतात ! क्षीरसागर तेली आणि कर्जतचा सुतार दिवटी घेऊन देवीच्या पालखी पुढे चालतात ! त्याच वेळेस राहुरीचे मुस्लिम बांधव हे वाजत गाजत पलंग देवीच्या मंदिरासमोर घेऊन येतात .
देवीची प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर देवीला पलंगावर निद्रीस्त करण्यात येते तेव्हा हा पलंग देवीच्या मुख्य गाभार्यात ठेवण्यात येतो . पालखीची मिरवणूक झाली की विधीवत दांडे काढून पालखीचे मोडतोड करून होमात टाकण्यात येते. देवी अश्विन शुद्ध पौर्णिमेपर्यंत म्हणजे चार दिवस पलंगावर निद्रित असते. पौर्णिमेच्या दिवशी पुन्हा विधीवत पूजा करून देवीला तिच्या मूळ सिंहासनावर प्राणप्रतिष्ठा करून आरुढ केले जाते. नंतर जुना पलंग पण विधीवत मोडतोड करून होमात टाकला जातो.
अशाप्रकारे पुणे आणि नगर येथून सन्मानपूर्वक सुरू झालेला पालखीचा आणि पलंगाचा प्रवास मंदिरात समाप्त होतो
फक्त देवीची सेवा म्हणून आज पण नगर आणि भिंगार येथील तेली अखंडित, निशुल्क आई तुळजाभवानी ची सेवा करीत आहे.