टोमॅटो लागवड, Tomato Lagvad । टोमॅटो लागवडी साठी योग्य हवामान । टोमॅटो पिकाच्या काही मुख्य जाती । टोमॅटोची रोपे तयार करणे । टोमॅटो लागवड पद्धत । टोमॅटो पिकाचे पाणी व्यवस्थापन । टोमॅटो फळाची तोडणी । टोमॅटो पिकाची फुलगळ का होते कशी थांबवावी । टोमॅटो पिकावर येणारे रोग ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
टोमॅटो ( Tomato ) :
टोमॅटोला भारतातील बाजारपेठेत वर्षभर मागणी असते नाशिक, पुणे, अहमदनगर, नागपूर, सांगली हे महाराष्ट्रातील टोमॅटो पिकवणारे महत्वाचे जिल्हे आहेत.खरीप, रब्बी, उन्हाळी या तीनही हंगामात टोमॅटो पिकाची लागवड करता येते. टोमॅटो मध्ये अ, ब,आणि क जीवनसत्व, कॅल्शियम, फास्फोरस तसेच लोह इत्यादी पोषक अन्नद्रव्येही टोमॅटो मध्ये पुरेशा प्रमाणात असतात.टोमॅटोच्या पिकलेल्या फळापासुन सुप, सॉस, केचप, जाम, ज्युस, चटणी इत्यादी पदार्थ बनविता येतात. यामुळे टोमॅटोचे औद्योगिक महत्व वाढलेले आहे. लाल हे खाण्यास स्वादिष्ट तसेच पौष्टिक असते याच्या आंबट स्वाद चे कारण आहे की यात साइट्रिक एसिड आणि मैलिक एसिड असते ज्यामुळे एंटासिडच्या रूपात काम करते. टोमॅटोची प्रगत लागवड करून अनेक शेतकरी चांगले उत्पन्न मिळवतात परंतु काही शेतकऱ्यांना अजूनही टोमॅटोची लागवड करण्याची योग्य पद्धत माहित नाही. योग्य लागवडीमुळे तुम्ही बाजारात चढ्या भावाने विकू शकता आणि चांगले पैसे कमवू शकता.
टोमॅटो लागवडी साठी योग्य हवामान :
टोमॅटो हे पिक उष्ण हवामानातील असले तरीही उत्तर भारतातील मैदानी प्रदेशातील सौम्य हवामान त्याच्या लागवडीसाठी सर्वोत्तम मानले जाते. महाराष्ट्रात टोमॅटोची लागवड वर्षभर केली जाते. अतिवृष्टीमुळे टोमॅटो पिकाचे नुकसान होते, अति थंडी पडल्यास टोमॅटोच्या झाडाची वाढ खुंटते.टोमॅटो पिकास स्वच्छ, कोरडे,कमी आर्द्रता असलेले व उष्ण हवामान चांगले असते. १८ अंश ते २७ अंश सेल्सिअस तापमानात हे पिक चांगले येते. जास्त तापमान , कमी आर्द्रता व कोरडे वारे असले तर पिकाची फुलगळ होते.उष्ण तापमान व भरपूर सूर्यप्रकाश असल्यास टोमॅटो फळांची गुणवत्ता चांगली असते.व फळांचा रंगही आकर्षक येतो.
टोमॅटो पिकाच्या काही मुख्य जाती
भाग्यश्री : ह्या जातीचे टोमॅटो मध्ये लायकोपीन या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असून, बियांचे प्रमाण कमी आहे. फळे लाल गर्द रंगाची भरपूर गर असलेली प्रक्रिया उद्योगास चांगली आहेत. या जातीचे सरासरी उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्टर मिळते.
धनश्री : ह्या जातीचे टोमॅटो मध्यम गोल आकाराची नारंगी रंगाची असतात. या जातीचे सरासरी उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्टर मिळते. ही जात स्पॉटेड विल्ट आणि लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी प्रमाणात बळी पडते.
राजश्री : ह्या जातीचे टोमॅटो नारंगी लाल रंगाची असतात व या संकरीत वाणाचे उत्पादन ५० ते ६० टन प्रतिहेक्टर मिळते. ही संकरीत जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते.
फुले राजा : ह्या जातीचे टोमॅटो नारंगी, लाल रंगाची असतात. ही संकरीत जात लीफकर्ल व्हायरस या विषाणूजन्य रोगास कमी बळी पडते. उत्पादन ५५-६० टन प्रतिहेक्टर मिळते.
टोमॅटोची रोपे तयार करणे :
एक हेक्टर क्षेत्रासाठी ३ गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करावी.
टोमॅटोच्या संकरीत वाणांसाठी १३५ ग्रॅम बियाणे एक हेक्टर क्षेत्रासाठी पुरेसे असते.
रोपवाटिकेची जमीन २ वेळा उभी-आडवी नांगरावी घ्यावी. ३ मी. x १ मी. x १५ सें.मी. आकाराचे वाफे तयार करावेत. गादीवाफ्यामध्ये ५ किलो कुजलेले शेणखत, १०० ग्रॅम १९ः१९ः१९ किंवा १०० ग्रॅम १५ः१५ः१५ चांगले एकसारखे मिसळावे.
बीजप्रक्रिया करण्यासाठी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा २.५ ग्रॅम प्रतिकिलो आणि त्यानंतर ॲझोटोबॅक्टर २.५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चोळावे, त्यामुळे मर, रोपे कोलमडणे, कॉलर कुज हे रोगनियंत्रणात राहतात.
त्यानंतर हाताने २० सें.मी. अंतरावर रेषा ओढून त्यामध्ये २ सें.मी. अंतरावर एक एक बी पेरावे. झारीने हलकेच पाणी द्यावे. त्यानंतर गादीवाफे आच्छादनाने झाकून घ्यावेत.
साधारणपणे ५ ते ८ दिवसांत बी उगवते. बी उगवल्यावर आच्छादन काढून टाकावे.
जमिनीच्या वाफश्यावर पाणी द्यावे. रोपे उगवल्यावर नायलॉनच्या जाळीने ती झाकून द्यावीत, यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
रोपवाटिकेत वेगवेगळ्या रोगांचे व किडींचे वेळीच नियंत्रण करावे. त्यासाठी २५ ते ३० ग्रॅम फोरेट १२ दिवसानंतर गादी वाफ्यात टाकावे. तसेच मातीमध्ये कार्बेन्डाझीम २ ते ३ ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
रोपे २५ ते ३० दिवसांनंतर उपटून त्यांची पुनर्लागवड करावी. रोपे उपटण्यापूर्वी त्यांना आदल्या दिवशी पाणी द्यावे.
टोमॅटो लागवड पद्धत :
नांगराच्या साहाय्याने शेताची चांगली नांगरणी करावी.यानंतर शेतकऱ्याच्या साहाय्याने तिरपे नांगरणी करावी, यामुळे जमीन भुसभुशीत होईल.माती परीक्षण केल्यानंतर शेणखत आणि नायट्रोजन, स्फुरद, पालाश ही खते योग्य प्रमाणात जमिनीत मिसळावीत. पेरणीसाठी 3 मीटर लांबीचा आणि 1 मीटर रुंदीचा बेड तयार करा.जमिनीपासून बेडची उंची 30 सें.मी. ठेवणे पुरेसे आहे रोपांची लागवड योग्य शेतात 75 सें.मी. ओळीतील अंतर ठेवून ६० सेमी अंतरावर रोपांची लागवड करावी.
टोमॅटो पिकाचे पाणी व्यवस्थापन :
पाणी व्यवस्थापन करताना जमिनीची क्षमता व हवामान या गोष्टी विचारात घ्याव्यात.हलक्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या जास्त द्याव्यात व त्यामानाने चांगल्या जमिनीत पाण्याच्या पाळ्या कमी द्याव्यात.लागवडीनंतर लगेच पाणी द्यावे. त्यानंतर आंबवणीचे पाणी द्यावे.पिकांच्या सुरवातीच्या काळात पाणी जास्त झाल्यास पानांची व फांद्यांची वाढ जास्त होते. म्हणून फुलोरा येईपर्यंत लागवडीपासून अंदाजे ६५ दिवसांपर्यंत पाणी बेताने द्यावे. ठिबक सिंचना द्वारे पाणी देताना पिकाची दैनंदिन पाण्याची गरज निश्चित करून तेवढेच पाणी मोजून द्यावे. फुले लागण्याच्या काळात पाण्याचा ताण पडल्यास फुले व फळे गळणे, या समस्या निर्माण होतात. पाणी सतत आणि जास्त दिल्यास मुळांना हवेचा पुरवठा होत नाही. झाडाची पाने पिवळी पडतात व उत्पादनात घट येते.
पावसाळ्यात पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी द्यावे. हिवाळ्यात ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळ्यात ५ ते ७ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.
टोमॅटो फळाची तोडणी :
बाजारासाठी लागणारी फळे निम्मी लाल व निम्मी हिरव्या रंगाची तोडावी.फळाची तोडणी शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी तापमान कमी असताना करावी. तोडणी अगोदर 3 ते 4 दिवस किटकनाशकाची फवारणी करू नये.काढलेली फळे सावलीत आणावी व त्याची आकारा व गुणवत्ता नुसार वर्गवारी करावी.तडा गेलेली, खराब फळे बाजुला काढावीत.
टोमॅटो पिकाची फुलगळ का होते कशी थांबवावी :
टोमॅटो पिकाची फुलगळ प्रामुख्याने जास्त तापमान, जास्त आर्द्रता, मंद प्रकाश, वेगवान व कोरडे वारे, पाण्याचा ताण, रोग व किडींचा प्रादुर्भाव तसेच पिकांमधील वाढसंप्रेरकांत होणारे बदल या कारणांमुळे होते. टोमॅटोची फुलगळ टाळण्यासाठी वरील सर्व बाबींचे योग्य व्यवस्थापन व नियंत्रण करणे गरजेचे आहे. ४ सीपीए या वाढ संप्रेरकाची ५० ते १०० मिली ग्रॅम प्रतिलिटर पाण्यातून फक्त फुलोऱ्यावर फवारणी करावी.
टोमॅटो पिकावर येणारे रोग :
मर : हा बुरशीजन्य रोग असून, झाडे अचानक वाळू लागतात. उपटलेल्यानंतर मुळे कुजलेली दिसतात. रोपवाटिकेत प्रादुर्भाव झाल्यास रोप मरगळलेली, माना पडलेली दिसतात.
नियंत्रण : रोपांच्या मुळांजवळ खुरप्याने रेघा ओढून कॉपर ऑक्सिक्लोराइड २५ ग्रॅम प्रति १० लिटर या द्रावणांची जिरवण करावी. लागवडीनंतर कॉपर ऑक्सिक्लोराईड ३० ग्रॅम प्रति १० लिटर या द्रावणांची प्रतिझाड ५० ते १०० मि.लि. प्रमाणे जिरवण करावी. पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.
करपा : या रोगामध्ये लवकर येणारा व उशिरा येणारा, असे दोन प्रकार आहेत. पानांवर पिवळसर डाग पडून नंतर गोल काळे तपकिरी ठिपके दिसतात. नंतर पाने वाळतात.
नियंत्रण : मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रति १० लिटर किंवा टेब्युकोनॅझोल १० मि.लि. प्रति १० लिटरप्रमाणे फवारणी करावी. पुढील फवारणी तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावी.