लोकांचा विसर पडलेले पुण्यातील प्राचीन त्रिशुंड गणपती मंदिर

त्रिशुंड गणपती मंदिर,त्रिशुंड गणपती माहिती ,पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर ,trishund ganpati mandir

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर (trishund ganpati mandir):

गणपती हे अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत… लोकमान्य टिळकांमुळे सार्वजनिक उत्सवाची परंपरा सुरू झाली असली तरी गणेशपूजन ही इथली प्राचीन परंपरा आहे, या गोष्टीचं प्रतीक म्हणजे ठिकठिकाणी असलेली गणेश मंदिरं. ‘लोकप्रभा’ने यावर्षी शंभर वर्षांहूनही अधिक वर्षांची परंपरा असलेल्या गणेश मंदिरांचा आढावा घेतला आहे…..

काही काळ विस्मृतीत गेलेल्या या गणेश मंदिराची रचना वैशिष्टय़पूर्ण आहे… वरवर हे गणेश मंदिर वाटत असले तरी तिथे तळघरात एके काळी हटयोगाची साधना होत असावी. हे मूळ महादेवाचे मंदिर असावे अशी रचना दिसत असल्यामुळे ते गणेश मंदिर कधी झाले असावे, हे कोडेच आहे…..

गणेश उत्सवाच्या धामधुमीत सर्व महाराष्ट्राचे लक्ष असते ते म्हणजे पुण्यातील गणपतींकडे… त्यातही दगडूशेठ हलवाई गणपती, मंडईचा गणपती या प्रसिद्ध अशा मानाच्या गणपतींकडे. यांच्याबरोबरच पुण्यामध्ये गल्लीगल्लीत ऐतिहासिक गणपती आहेत, तेसुद्धा लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरतात. पण याच शहरात १८ व्या शतकात बांधल्या गेलेल्या एका अगदी दुर्मीळ प्रकारच्या गणपतीची मात्र लोकांना अजिबात कल्पना नसते. ‘त्रिशुंड गणपती’ असे नाव धारण केलेल्या गणपतीचे हे मंदिर प्राचीन पुण्याचे अवशेष जपणाऱ्या कसबा पेठेजवळ आहे…..

कमला नेहरू हॉस्पिटल जवळ असलेले हे मंदिर नागझरी नावाच्या एका मोठय़ा ओढय़ाच्या काठावर बांधले आहे… पुणे शहराच्या या पूर्व भागातील परिसरात शहाजी राजांनी एक शहापुरा नावाची पेठ इ. स. १६००मध्ये वसवली..
त्यानंतर १७६५ मध्ये थोरले बाजीराव यांनी याचे नाव सोमेश्वर पेठ असे ठेवले… या परिसरात गोसावी लोकांची खूप वस्ती असल्यामुळे त्याला गोसावीपुरा म्हणत असत. हे गोसावी गृहस्थाश्रमी होते आणि अतिशय सधन होते. ते सोने, रत्ने यांचा व्यापार करीत. ते सावकारीचाही व्यवसाय करीत. त्यांच्या वस्तीच्या जवळच त्यांच्या गुरूंची समाधी असलेले त्यांचे स्मशानही होते. समाध्यांच्या जवळच शिव मंदिरेही उभारण्याची पद्धत आहे. अशाच प्रकारचे एक समाधी मंदिर म्हणजे त्रिशुंड गणेश होय…..

भीमगिरजी गोसावी नावाच्या इंदूरजवळच्या धामपूर गावाच्या एका सधन व्यक्तीने या मंदिराची उभारणी केली… हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या रचनेवर राजस्थानी, माळवा तसेच दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे…..

त्रिशुंड गणेश मंदिर हे त्याच्या समकालीन मंदिरांपेक्षा खूप देखणे आहे… संपूर्णपणे काळ्या पाषाणात केलेले मंदिर पेशवाईतील शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे. मुळातच ते थोडय़ा उंच जोत्यावर बांधले आहे कारण मंदिराखाली मोठे तळघर आहे. त्यामुळे साहजिकच वरच्या मंदिराची उंची वाढवली गेली. मंदिरात प्रवेश करण्याआधी एक मोठे अंगण आहे. त्यानंतर मंडप, पुढे अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आहे…..

मंदिराचे मुखदर्शन बऱ्याच शिल्पाकृतींनी सजवले आहे… मंदिराच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपाल कोरलेले आहेत. त्यांच्या बाजूच्या भिंतींवर उठावातील साखळदंडाने बांधलेला गेंडा आणि त्याच्या बरोबर असलेले काही ब्रिटिश शिपाई दिसतात. त्यांच्या खाली अर्धा उठावातले मोठमोठे हत्ती एकमेकांशी लढताना दाखवले आहेत. तत्कालीन राजकीय परिस्थितीचे हे शिल्पांकन खूप रंजक आहे. १७५७ साली प्लासीच्या युद्धात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने आसाम आणि बंगाल या भागांवर ताबा मिळवला. त्यानंतर ही व्यापारी कंपनी भारताच्या भूभागावर राज्य करू लागली. या परिसरातील जनतेला आणि राजांना या कटू वास्तवाची जाणीव करून देणारी ही शिल्पं खूप महत्त्वाची आहेत. याबरोबरच मंदिराच्या बाह्य़ भिंतीवर बरीच इतर शिल्पं पाहायला मिळतात…..
मंदिराच्या द्वाराशाखेच्या मधोमध म्हणजे ललाटबिंबावरती गणपतीची छोटी मूर्ती कोरली आहे… त्या मूर्तीच्या बरोबर खाली एक गणेश यंत्रही कोरलेले दिसते. द्वारशाखेच्या वरच्या बाजूला असलेल्या अनेक शिल्पांमध्ये दोन्ही बाजूंनी लक्ष्मीला अभिषेक करणारे हत्ती (गजलक्ष्मी), त्यांच्या बाजूने मकरमुखातून बाहेर पडलेली एक महिरप आणि त्यावर पिसारा फुलवलेला मोर आणि त्याच्या बाजूस अजून दोन मोर आहेत…..

महिरपीच्या दोन्ही बाजूला अनेक कपी एकमेकांचे हात धरून उभे आहेत असे दाखवले आहे… पण या महिरपीच्या वरती म्हणजे सर्वात वरच्या पट्टीवर अनेक शिल्पं आहेत त्यामध्ये सर्वात डावीकडे एका साधूने दुसऱ्या साधूला स्वत:च्या डोक्यावर उलटे (खाली डोके वर पाय अशा स्थितीत) पकडले आहे. त्याशिवाय इतर अनेक शिल्पं तिथे कोरली आहेत. हठयोगाची साधना करणारे हे साधू गोसावी परंपरेतील आहेत हे स्पष्टच आहे. याबरोबरच काही यक्ष, किन्नर इ. कोरले आहेत. मुखदर्शनाच्या सर्वात वर शेषशायी विष्णूचे शिल्प कोरले आहे. तसेच बाजूच्या भिंतीवर घट पल्लावासारखी अनेक शुभ चिन्हेही आहेत…..

मंदिराच्या मंडपात शिरताना उंबरठय़ाच्या शेजारील भिंतीतून उजवीकडे आणि डावीकडे तळघरात जाणारे जिने दिसतात… आज जरी ते बंद केले असले तरी त्यांचे दरवाजे स्पष्ट आहेत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी यापकी एक दरवाजा उघडून तळघरातील समाधीच्या दर्शनासाठी जायला भक्तांना मुभा असते. पण एरवी मात्र ते बंद असते. चौरस मंडपाचे छत पडून गेल्यामुळे ते कसे होते हे समजायला आज मार्ग नाही. मंडपाच्या िभतीत कोनाडे आहेत, पण ते सर्व रिकामे आहेत. अंतराळात जायच्या दरवाजाच्या वरच्या बाजूला गजलक्ष्मीचे एक सुबक शिल्प आहे. या शिल्पाजवळ सुरेख पोपटही काढलेले दिसतात…..

अंतराळात प्रवेश केल्यावर डावीकडून आणि उजवीकडून प्रदक्षिणा घालण्यासाठी बाहेर पडण्याचे दोन दरवाजे आहेत… दोन जटाधारी साधू हातात साखळी घेऊन गर्भगृहाच्या दोन्ही बाजूला उभे आहेत असे दाखवले आहे. दरवाजाच्या ललाटबिम्बावर उजव्या सोंडेची गणपतीची मूर्ती कोरली आहे तसेच तिच्या खाली गणेश यंत्रही कोरले आहे. दरवाजाच्या वरती शिव आणि त्याच्या एका मांडीवर पार्वती आणि दुसऱ्या मांडीवर गंगा या स्त्री रूपात बसलेल्या दाखवल्या आहेत. शिवाच्या एका बाजूला त्याचे वाहन नंदी तर दुसऱ्या बाजूला पार्वतीचे वाहन सिंह कोरलेले दिसतात. यावरून हे मूळचे मंदिर शिवाचे असणार होते या तर्काला पुष्टी मिळते. या मूर्तीच्या वरच्या बाजूला तीन शिलालेख कोरलेले दिसतात..

त्यापकी दोन संस्कृत तर एक फारसी आहे. १९४६ सालीच याचे वाचन डॉ. ग. ह. खरे यांनी प्रसिद्ध केले आहे… त्यापकी पहिल्या लेखात २० नोव्हेंबर १७५४ असा कालोल्लेख येतो. तसेच या ठिकाणी ‘महाकाल रामेश्वर’ याची प्रतिष्ठापना केली असा उल्लेख आहे. त्यावरून ते महादेवाचे मंदिर असणार होते हे सिद्ध होते. तसेच या लेखाच्या शेजारच्या दुसऱ्या संस्कृत शिलालेखात शिवाची तसेच कालीची स्तुती आहे आणि शेवटी गीतेतील श्लोक दिला आहे. त्याच्या शेजारी अजून एक शिलालेख आहे, पण तो फारसीमध्ये आहे त्यामध्ये असे म्हटले आहे की, हे फकीर गुरुदेव दत्ताचे घर आहे. या लेखात २६ ऑगस्ट १७५४ अशी तारीखही दिली आहे. यामुळे या सर्व देवांच्या नंतर इथे गणपती कधी आणि कसा आला हे कोडेच आहे…..

या मंदिराच्या गाभाऱ्यात तीन सोंडा असलेली मोरावर बसलेली गणपतीची मूर्ती आहे… मोराच्या चोचीत नाग धरला आहे आणि त्याचा फणा तसेच शेपटी स्पष्ट दिसते आहे. गणपतीच्या मुकुटावरसुद्धा नागाचे वेटोळे दाखवले आहे. मूर्तीच्या महिरपीवर एका ओळीत छिद्र दिसतात. गणपतीच्या कानांनाही छिद्र आहेत. पूर्वी त्यात दागिने घालायची सोय ठेवली असावी. गणपतीला सहा हात आहेत. खालच्या उजव्या हातात मोदकांचे पात्र आहे, मधल्या उजव्या हातात शूल, वरच्या उजव्या हातात अंकुश धारण केलेला आहे. वरच्या डाव्या हातात परशु, मधल्या डाव्या हातात पाश असून खालच्या डाव्या हाताने मांडीवर बसलेल्या देवीला आधार दिला आहे. सुमारे पाऊण मीटर उंचीच्या या गणपतीच्या डाव्या मांडीवर शक्ती बसली आहे…..

त्याची त्या बाजूची सोंड शक्तीच्या हनुवटीपर्यंत जाऊन स्पर्श करताना दाखवली आहे… उजव्या बाजूची सोंड उजव्या हातात असलेल्या मोदकाच्या भांडय़ाला स्पर्श करताना दाखवली आहे. मधली सोंड गणपतीच्या पोटावरून मोराच्या डोक्यावर जाताना दिसते. मोराच्या उजवीकडे एक उंदीर आणि डावीकडे एक स्त्री भक्त दाखवली आहे. गणपतीच्या मागच्या भिंतीवर एक सुबक शेषशायी विष्णूची प्रतिमा कोरली आहे. तिच्या वरच्या बाजूला एक रेखीव गणेश यंत्र कोरले आहे. त्याच्या दोन्ही बाजूस चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत. या गाभाऱ्याच्या उजवीकडच्या भिंतीतून तळघरातील समाधीपर्यंत जाण्याचा मार्ग आहे. पुजारी रोज गणपतीच्या पूजेनंतर या मार्गाने समाधीपाशी असलेल्या गणपतीला दिवा लावतात.

मंदिराच्या बाह्य़ भिंतींवर खूप कोरीव काम नसले तरी काही शिल्पे कोरली आहेत… प्रदक्षिणा घालताना ही पाहता येतात. दक्षिणेकडच्या भिंतीतील देवाकोष्ठामध्ये नटराज ही शिवाची मूर्ती पाहायला मिळते. आकाराने फार मोठी नसली तरी ही बरीच सुबक मूर्ती आहे. पश्चिमेकडच्या देवाकोष्ठात ‘लिन्गोद्भव शिव’ ही पुराणातील शिवाच्या महानतेची कथा सांगणारे शिल्प कोरले आहे. भारतातील अनेक गुहा आणि मंदिरे या ठिकाणी लोकप्रिय असणारे हे शिल्प इथे मात्र वेगळ्याच पद्धतीने कोरले आहे. विष्णू आणि ब्रह्मा यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण असा वाद चालला असताना जेव्हा ते शिवाला हा प्रश्न विचारतात तेव्हा तो त्यांना त्याच्या आदि लिंगाचा उगम आणि अंत पाहायला सांगतो. तेव्हा ब्रह्मा हंसाचे रूप घेऊन आकाशात जातो तर विष्णू वराहाचे रूप घेऊन पाताळात जातो…..

जरा वेळाने ते जेव्हा परत येतात तेव्हा शिवाला ब्रह्मा सांगतो की मला उगम सापडला आणि विष्णू सांगतो की मला अंत नाही सापडला… तेव्हा शिव त्या शिविलगातून प्रकट होऊन ब्रह्माला खोट बोलल्याबद्दल शाप देतो की त्याची पूजा भारतातून बंद होईल. ही सगळी कथा ज्याला माहीत असेल त्यालाच त्या शिल्पाचा अन्वयार्थ लागू शकतो. एका लिंगावर वरच्या टोकाला हंस तर खालच्या टोकाला वराह दाखवले आहेत. या शिल्पाच्या वरच्या बाजूला चतुर्भुज शिव मूर्ती आहे. या दोन्ही पुराव्यांवरून हे मंदिर गणपतीचे नसून शिवाचे होते, हे सिद्ध व्हायला मदत होते. उत्तरेकडच्या देवकोष्ठात एक चतुर्भुज भरवमूर्ती कोरलेली आहे…..

मंदिराचे तळघर…
मंदिराला एक प्रशस्त तळघर आहे… संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे मंदिर पाहायला मिळत नाही. मंदिराच्या सभामंडपात प्रवेश करताना दोन्ही बाजूंच्या भिंतीतून जिने तळघरात जाताना दिसतात. या तळघरातून अनेक मार्ग मंदिराजवळच्या पाण्याच्या साठय़ाकडे नेले आहेत. आज ते भिंत बांधून बंद केल्याने तो मार्ग नेमका कुठे जात असे हे आज कळणे अवघड आहे. अनेक मार्गापकी एक मार्ग मंदिर ज्या नागझरी ओढय़ाच्या काठावर बांधले आहे तिथे जात असे मानले जाते. तसे जवळपासच्या घरांच्या विहिरीपर्यंतही एकदोन मार्ग जात असावेत. हे सगळे मार्ग आज बंद केले असले तरी कोणत्या तरी मार्गाने या तळघरात नेहमी पाणी शिरते आणि त्यामुळे या तळघरात कायमच घोटाभर पाणी साचलेले असते…

हे तळघर वर्षभर बंद असते… पण दर वर्षी गुरुपौर्णिमेला या तळघरात सर्वाना मुक्त प्रवेश असतो. गोसावींच्या गुरूंची पूजा करण्यासाठी या दिवशी पुणेकरांची या मंदिरासमोर रीघ लागते. या तळघरात गोसावी साधू हठयोगाची साधना करत असावेत असे मानले जाते. त्यांची काही प्रकारची साधना स्नान करून लगेच करायची असल्यामुळे बहुतेक विविध प्रकारच्या पाण्याच्या साठय़ांना जाण्यासाठी इथून मार्ग काढले असावेत…..

तसेच ही साधना गुप्तपणे करायची असल्यामुळे तळघरातून जाणारे काही मार्ग साधकांना तळघरातून बाहेर घेऊन जात असावेत… त्यामुळे काही अभ्यासकांचे मत आहे की, जरी वरकरणी हे गणपतीचे मंदिर दिसत असले, तरी खरे तर तळघरात हा एक गोसावी साधकांसाठी मठ होता. अशा प्रकारचे तळघरात मठ आणि वरती मंदिर असे स्थापत्य कुठेही पाहायला मिळत नाही…..

एक गूढतेचे वलय असलेले हे मंदिर काही काळानंतर विस्मृतीत गेलेले होते… पुणेकरांनाच काय, पण या परिसरातील लोकांनाही या मठ-मंदिराचा विसर पडला. काळाच्या ओघात मंदिरावरचे शिखरही नष्ट झाल्यामुळे इथे मंदिर होते हेसुद्धा लोकांना लक्षात येत नव्हते. १९३२ ते १९५२ या काळात तर या मंदिराची अवस्था फारच वाईट होती. सभामंडपात वखार तर पुढच्या अंगणात गोठा आणि कोळसा साठवायची जागा होती…..

तळघर घाण आणि पाणी याने संपूर्ण भरले होते… १९५१ मध्ये ठाण्यातील गणेशभक्त यशवंत अनंत मोरे यांना एकदा नागझरी ओढय़ाच्या काठावरील या मंदिरासंबंधी दृष्टांत झाला व नंतर त्यांनी इथे सगळी साफसफाई करून हे मंदिर वहिवाटीस योग्य केले असे सांगितले जाते. तेव्हापासून या मंदिरात लोकांनी जा-ये सुरू केली. असे असूनही आज अनेक पुणेकरांना या मंदिराच्या अस्तित्वाची जाणीव नाहीये.

स्वामींच्या वास्तव्याने परमपावन झालेली अक्कलकोटातील महत्वाची स्थळे.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )