तुम्हाला माहित आहे का संत तुकाराम महाराजांना झालेले श्री दत्ताचे दर्शन ।

संत तुकारामांची दत्तभक्ती , श्री दत्ताचे दर्शन

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

संत तुकारामांची दत्तभक्ती

जगद्गुरु संत तुकाराम महाराजांना, श्रीदत्तात्रेयांनी भामा डोंगरावर दर्शन दिले. महाराजांना खूप आनंद झाला. महाराजांनी भावनावेगाने श्रीदत्तात्रेयांचे चरण घट्ट धरले. आनंदाश्रूंनी दत्तगुरूंची पाद्यपूजा केली. त्या अपूर्व अशा सगुण साकार दर्शनाने तुकाराम महाराज तृप्त झाले. महाराजांनी श्रीदत्तात्रेयांच्या या साक्षात्कारी दर्शनाला आपल्या अभंगओळीमधून अक्षररूपात साकार केले. महाराजांच्या मुखातून अभंग पाझरू लागला.

तीन शिरे सहा हात। तया माझा दंडवत। काखें झोळी पुढे श्वान। नित्य जान्हवीचें स्नान।। माथा शोभे जटाभार। अंगी विभूति सुंदर। शंख चक्र गदा हातीं। पायी खडावा गर्जती।। तुका म्हणे दिगंबर। तया माझा नमस्कार।।

तुकाराम महाराज म्हणतात, ` या भामा डोंगरावरच्या विस्तीर्ण पठारावर पठारावर श्रीदत्तात्रेयांचे अभूतपूर्व दर्शन झाले. तीन मुखांचा, सहा बाहू असलेला, काखेत झोळी अडकवलेल्या अवधुत दत्तगुरुंनी मजवर कृपेचा मेघ धरला. मी त्यांना साष्टांग दंडवत घातले. त्यांच्या पुढे चार श्वान होते. जान्हवी नदीमध्ये स्नान करून शुचीभूर्त झालेल्या दत्तात्रेयांच्या माथ्यावर जटाभार शोभून दिसत होता. सर्वांगावर विभूती सुंदर शोभून दिसत होती. हातामध्ये शंख, चक्र, गदा ही आयुधे होती. पायात खडावा होत्या. दिशांचे वस्त्र पांघरलेल्या दिगंबर दत्तात्रेयांना मी वारंवार नमस्कार करतो. त्याच्याच नामात गर्क होतो.’ श्रीदत्तात्रेयांचे वर्णन करताना महाराजांच्या साक्षात्कारी वाणीला बहर आला होता. दत्तात्रेयांनी सुंदर दर्शन दिले आणि तो परमानंदाचा सोहळा आपल्या दृष्टीत साठवत असतानाच दत्तात्रेय अचानकपणे गुप्त झाले. महाराज व्याकूळ झाले. त्यांनी दत्तात्रेयांचा धावा करायला सुरुवात केली.
नमन माझें गुरुराया। महाराजा दत्तात्रेया।। तुझी अवधूत मूर्ति। माझ्या जीवाची विश्रांती।।
जीवींचे साकडे। कोण उगवील कोडें।। अनसूया सुता । तुका म्हणे पाव आतां।।

दत्तगुरुंची आळवणी करताना महाराजांचा स्वर आकाशव्यापी झाला. दत्तात्रेय लुप्त झाले याचे दुःख त्यांच्या स्वरांमधून प्रकट होऊ लागले. त्यांना श्रीदत्तगुरुंच्या दर्शनाची विलक्षण ओढ लागली. महाराजांचा व्याकूळ स्वर ब्रह्मांडभर घुमू लागला. त्या स्वरांनी अवघा भामा डोंगर चंद्रप्रकाशासारखा उजळून निघाला. दत्तगुरुंनी आपल्या भक्ताची आर्त साद ऐकली आणि त्यांनी आपल्या या लाडक्या भक्ताला पुन्हा दर्शन दिले. दत्तात्रेयांनी प्रकाशरूपात आपले दर्शन महाराजांना घडवले होते. श्री दत्तगुरु आपल्या प्रत्येक भक्ताला आपले कृपावैभव अर्पण करतात. श्रीगुरुचरित्राच्या मंगल पारायणाच्यावेळी जसा दत्तवर्णन करणारा संस्कृत श्लोक म्हणतात, तसाच तुकाराम महाराजांचा हा प्रत्यक्ष अनुभूती देणारा, स्वरूप वर्णन करणारा अभंग म्हटला तर मनामध्ये चंदनगंधासारखी विलक्षण लाट उसळते. तुकाराम महाराजांनी जशी श्रीदत्तगुरुंना साद घातली ती आर्तता प्रत्येक दत्तभक्ताच्या मुखातून प्रकट होणे आवश्यक असते. मन शांत झाल्यावर आणि दत्तगुरुंचे प्रत्यक्ष दर्शन घडण्यासाठी `श्रीगुरुचरित्राचे पारायण करावे. असा एक शुभसंकेत आहे. श्रद्धा आणि पावित्र्य दत्तात्रेयांचे निश्चितपणे दर्शन घडविते.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )