वडापाव (Ek Vadapav)_________बोधकथा

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

वडापाव (Vadapav) :

बाहेर दंगल चालू झाल्याची बातमी बंड्याच्या ऑफिसमध्ये धडकली आणि ताबडतोब घरी निघा अशी ऑर्डर निघाली.

हे नेहमीच झालंय. या मुंबईत एकही दिवस सुखाने जात नाही”असे पुटपुटत बंड्याने आवरायला सुरवात केली. आपत्कालीन स्थितीत काय करायचे, हे त्याच्या ऑफिसने ठरवूनच दिले होते. त्याप्रमाणे आपला मोबाईल फुल चार्ज केला. कॅन्टीनमधून चार वडापाव पार्सल.. एक पाण्याची बाटली घेऊन बाहेर पडला. स्वतःच्या गाडीचा वापर करायचा नाही असे नक्की करून तो चालतच निघाला.

अचानक दहा पंधराजणांचा जमाव रस्त्यावर धावत आला ते पाहून तो एक बोळात घुसला आणि बंद घराच्या आडोश्याला उभा राहिला.

चेहऱ्यावरचा घाम पुसता पुसता त्याची नजर त्या म्हाताऱ्यावर गेली. मध्यम उंचीचा .. काळसर वर्णाचा.. कपाळावर उभे गंध, सदरा आणि खाली ढगळ पॅन्ट अश्या अवतारात तो उभा होता. नजरानजर होताच ते हसले.

” काय ….? तुम्ही ही अडकलात का बाबा ….?? नेहमीप्रमाणे बंड्यातील माणूस जागा झाला.

“नाही हो ….!! सहज फिरायला बाहेर पडलोय. इथे उभे राहून काहीतरी जाळपोळ पाहायला मिळेल म्हणून थांबलोय. त्याने तिरसटासारखे उत्तर दिले. म्हातारा चिडलाय म्हणून बंड्या गप्प बसला.

“तुम्हाला कुठे जायचे आहे ……??? परत बंड्याने विचारले.

“वैशाली नगर … त्याने उत्तर दिले.

“चला जाऊ दोघे ….असे म्हणतात तो मुकाट्याने बंड्या बरोबर चालू लागला.

“काय झाले …..?? अचानक ही दंगल जाळपोळ का…?? म्हाताऱ्याने बंड्याला विचारले.

” काय माहीत ..?? काहीतरी हवे असेल कोणाला … नाहीतर काहीतरी लपवायचे असेल कोणापासून तरी … हल्ली रोजचेच आहे. अगदी सहजपणे बंड्या उत्तराला.

“अरे हे सर्व 1942 पासून व्हायचे आम्ही रोज काही असेच करायचो .. पण ते सर्व स्वातंत्र्यासाठी … आता कशाला…..? म्हातारा म्हणाला.

“माहीत नाही अजून काय हवे त्यांना ..? बंड्याने सांगितले.

” तू नाही त्यांच्यात… ?? तुला काही नको का… ?? तो म्हातारा छद्मीपणे म्हणाला.

“नको मी आहे तोच बरा आहे” बंड्याने हसत उत्तर दिले.

“तुझी जात कोणती .. ?? म्हातारा काही पिच्छा सोडत नव्हता.

“माहीत नाही …. बाबांनी कधी सांगितली नाही आणि मी कधी विचारली नाही … तुम्हाला काय करायचे आहे ..??? बंड्या चिडून म्हणाला.

अचानक त्यांच्यासमोर जमावाने एका बसला आग लावली आणि पळून गेले. तेव्हा इतर लोक बसमधील लोकांना वाचवायला बाहेर आले. बंड्याही धावत मदतीला गेला. थोड्यावेळाने परत तो म्हातारा बंड्याबरोबर चालू लागला.

“बाबा भूक लागली का …?? हा घ्या वडापाव …

” तुला रे ….?? म्हातारा काळजीने बोलला.

” माझे पोट भरले आहे तुम्ही घ्या … म्हाताऱ्याने वडापाव खाल्ला “छान आहे रे .. कोणी बनविला..??

“दत्तूमामाने….” बंड्याने कंटाळून उत्तर दिले.

” कोणत्या जातीचा आहे तो….?? म्हाताऱ्याचे प्रश्न चालूच.

“माहीत नाही हो….. बंड्याने वैतागून उत्तर दिले.

इतक्यात त्याच्या कानावर परिचित हाक पडली.

“अरे अव्या ….? आज येथे बंदोबस्त का ..?? सब इन्स्पेक्टर अविनाशला पाहून बंड्या ओरडला. दोघांनी आनंदाने एकमेकांना मिठ्या मारल्या.

“अरे तीन दिवस अडकलोय इथे. साला टॉयलेटला जायला वेळ नाही मी आणि चार पोलीस सांभाळतोय इथे. मोबाईल चार्जिंग करायला ही चान्स नाही कुठे”. अविच्या तोंडाचा पट्टा चालू झाला.

“हे बाबा कोण..” ??

” माहीत नाही … आपल्या इथेच राहतात. म्हटले दोघे एकत्र जाऊ बंड्या सहज म्हणाला.

“बघ रे बाबा … सांभाळून … नाहीतर मध्येच काही झाले, तर तुलाच करावे लागेल सगळे. आता बॉडी ताब्यात मिळायलाही तीन दिवस लागतील. खूप गंभीर परिस्थिती आहे शहरात” अवि गंभीरपणे म्हणाला.

“हो रे …. माहितीय चल निघतो.., हा वडापाव खा ..”. असे म्हणून बंड्याने त्याला वडापाव दिला.

“अरे खरेच बरे वाटले. सगळेच वांधे झालेत इथे “थोडा वेळ अवि त्या वडापावकडे पाहत राहिला “बंड्या एक काम करशील …. अनिताला सांगशील मी इथे सुखरूप आहे ते. तीन दिवस झाले तिला पाहिले नाही रे. आणि आमच्या पिल्लूची पण खूप आठवण येते. परवा वाढदिवस आहे तिचा. माहीत नाही साजरा करायला मिळेल की नाही. फोनवर बोलायलाही कसेतरी वाटते बघ. बोललो तर नाही रोखू शकणार स्वतःला”अवीच्या डोळ्यात अश्रू होते.

“अरे काळजी करू नकोस .. मी सांगेन वहिनीला” पुन्हा एकदा मिठी मारून बंड्या पुढे निघाला.

“ह्याची जात कोणती ..?? म्हाताऱ्याने खवटपणे प्रश्न विचारला.

“माहीत नाही हो बाबा …. तोच तोच प्रश्न काय विचारता..?? माझा बालपणीचा मित्र आहे तो. आम्हाला कधीच हे प्रश्न पडले नाहीत”.

पुढे बस स्टँड जवळ येताच त्यांना नेहमीपेक्षा वेगळी शांतता जाणवली. “अरे आज बसही सुटणार नाहीत का.. ??? बंड्या संतापाने उद्गारला.

स्टँड च्या एका बाकड्यावर ते दोघे बसून होते. मध्यमवर्गीय नवरा बायकोच असावे. बाहेरच्या राज्यातलेच होते. चेहऱयावर प्रचंड भीती. त्या दोघांना पाहून त्यांच्या जीवात जीव आला. बोलता बोलता कळले की पूर्वेकडून आले होते. मुंबई पाहायला बाहेर पडले आणि अडकले. बंड्याने आपल्याकडील वडापाव त्यांच्या हातात दिले. भावनिक होऊन त्यांनी बंड्याला हात जोडले. अविला फोन करून बंड्याने त्याला सर्व कल्पना दिली आणि त्यांना अविकडे पाठविले.

“अरे कोण होती ती …?? कोणत्या जातीची ….??

तसा बंड्या खवळला “ओ बाबा… वयाचा मान राखतोय म्हणून काहीही बोलता का… ??? अडचणीत असलेल्या माणसांची त्यांना जात विचारून मदत करू का …??? तसा म्हातारा हसला.

इतक्यात वैशाली नगर आले. एका देवळापाशी आल्यावर म्हातारा थांबला. “आले माझे घर .. इथेच राहतो मी ….

“इथे या देवळात …??? बंड्या आश्चर्याने म्हणाला.

“काय हरकत आहे ..??? मी इथेच राहतो. कधी कधी बाहेर पडतो तेव्हा तुझ्यासारखी माणसे भेटतात. निस्वार्थीपणे मदत करणारी… मग वाटते, या जगात अजूनही माणुसकी शिल्लक आहे. बघ ना इथे एक जण आग लावतो, तर दहाजण विझवायला येतात. एक जण रस्त्यावरील दुकाने बंद करून लोकांचे खायचे वांधे करतो, तर दुसरा स्वतःचे अन्न दुसर्यांना देतो. एकजण दुसऱ्यांची घरे जाळायला येतो, तेव्हा दुसरा स्वतःचे घर सोडून ते वाचवायला येतो. आणि मुख्य म्हणजे कोणी कोणाची जात विचारात नाही. हे खूपच आशादायी चित्र आहे ना …??? असे बोलून बंड्याच्या डोक्यावर हात ठेवून तो मंदिरात शिरला.

तीन बिस्किटांचा नियम…..(Teen Biscuitacha Niyam) बोधकथा

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )