।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
श्री गणेशाची विविध रूपे आणि त्यांची स्थाने (Various forms of Lord Ganesha and their places)
‘संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी ७०० वर्षांपूर्वी वर्णन केले, तो गणेश हे भारतियांचे अत्यंत प्रिय दैवत आहे. आज प्रचलित परंपरागत ‘एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजम् । पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ॥ (अर्थ : ज्याच्या मुखकमलात एकच दात आहे, कान सुपासारखे मोठे रुंद आहेत, तोंड हत्तीचे आहे, चार हात आहेत आणि हातांमध्ये अंकुश अन् पाश धारण केला आहे, अशा श्री सिद्धिविनायकदेवाचे मी ध्यान (चिंतन) करतो.)’, अशी ही गणेशमूर्ती आहे; पण आकार आणि स्वरूप यांतील विविधता गणपतीच्या मूर्तीइतकी अन्य कोणत्या देवतेच्या मूर्तीत आढळत नाही. गणेशाच्या मूर्तीचे आकार आणि प्रकार असंख्य आहेत…..
गणेशमूर्तीमध्ये मुख, हात, आयुधे, वाहन या संदर्भात अनेक प्रकार रूढ आहेत, तसेच नृत्यमूर्ती, उभी मूर्ती, बसलेली मूर्ती किंबहुना झोपलेली गणेशमूर्ती उपलब्ध आहे. पर्वत, वृक्ष, फळ यांतूनही श्री गणेशाचे प्रकटीकरण झालेले आहे. अर्धनारी गणेश, मुरलीधर गणेश आहेत. शुभ्र रंगापासून गडद काळ्या रंगापर्यंत विविध रंगातील श्री गणेशाची विविधता पहायला मिळते. रांगणार्या गणपतीची बालमूर्ती वेलोर किल्ल्यातील ‘जलगंधेश्वर’ मंदिराच्या कल्याण मंडपातील खांबावर आढळते. श्रीशैल मल्लिकार्जुनाच्या मंदिरात श्रीकृष्णाप्रमाणे मुरली वाजवणारा मुरलीधर गणेश आणि हैदराबादचे सालारजंग वस्तूसंग्रहालय येथे तशा मूर्ती आहेत.
१. स्वयंभू गणेश मूर्ती – Swayambhu Ganesh
स्वयंभू मूर्ती, म्हणजे स्वतःच अस्तित्वात आलेली, जागृत आणि विशेष दैवीशक्तीने युक्त अशी मूर्ती. या स्वयंभू मूर्ती प्रचंड शिळेसारख्या असून त्या निराकार असतात. त्यात गणेशाचे वैशिष्ट्य- गंडस्थळ, शुंडा, गजमस्तक असा आकार भासमानही दृश्य असतो. उदाहरणार्थ काश्मीरमधील गणेशबल, हरिपर्वत आणि गणेशघाटी ही ३ पुराणोक्त स्वयंभू गणेश स्थाने सुप्रसिद्ध आहेत.
तमिळनाडू राज्यातील तिरूचेन्द गाट्टंगुडी येथील गणपतीच्या मूर्तीला हत्तीचे मुख नसून मानवाचे मुख आहे त्याचे नाव ‘विघ्नांतक गणपती’…..
३. मातृकांसहित गणेश – Ganesh with matrika
ब्राह्मी, माहेश्वरी, कौमारी, वैष्णवती, वाराही, महेंद्री आणि चामुंडी या सप्तमातृका आहेत. वेरूळ लेण्यांतील सप्तमातृकांच्या डाव्या बाजूला प्रारंभी गणेश आहे. याखेरीज कुंभकोणम, बेलूर अमरकंटक, एहोळे या ठिकाणी मातृकामूर्ती आहेत. पुण्याजवळील यवतेश्वर डोंगरावर लेणी आहे. तेथे मातृकामूर्ती असून त्यातील आठवी मातृकाच ‘गणेशी’ किंवा ‘विनायकी’ म्हणून दाखवलेली आहे. या शिल्पाचा काळ तेराव्या शतकातील मानण्यात येतो. विवाहादी मंगलप्रसंगी मातृकापूजनाचे वेळी गणेशपूजन असतेच.
४. नृत्यगणेश – Nritya Ganesh
८ हातांच्या या नृत्यमूर्तीच्या हातातील आयुधे म्हणजेच पाश, अंकुश, अपूप म्हणजे पानगा, कुर्हाड, दंत, वलय, अंगठी अशी आहेत आणि आठवा हात नृत्यमुद्रा करण्यासाठी मोकळा आहे. कर्नाटकातील होयसळेश्वर मंदिरात (हळेबीड) असलेली नृत्यमूर्ती अतीमनोहर आहे.
५. द्विभुज गणेश – Dwibhuj Ganesh
कलियुगात जेव्हा श्री गणेशाचे अवतरण होईल, ते द्विभुज असेल; पण अखेरच्या टप्प्यात. सध्या मागील युगातील चतुर्भुज गणपतीच सर्वत्र प्रचलित आहे. कलियुगातील गणेशाच्या मूळ स्वरूपाला जाणून काही जाणकार कलाकारांनी द्विभुज मूर्ती बनवल्या आहेत. महाराष्ट्रात तरी त्या बोटावर मोजता येतील इतक्याच आहेत. त्या सर्व मूर्ती अतीप्रचीन आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील भांदक हे सहस्रोे वर्षांपूर्वीचे प्राचीन शहर. भांदक-भद्रावती येथील एका टेकडीवर द्विभुज गणेशाची अतीप्राचीन अशी मूर्ती आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवड येथे अतीप्राचीन द्विभुज गणेश आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातच रेडी येथे वर्ष १९७६ मध्ये सापडलेली अतीप्राचीन द्विभुज मूर्ती गणेशाची मोठी मूर्ती आहे. बहुतेकांना ठाऊक असलेली द्विभुज मूर्ती कर्नाटकातील गोकर्णाची आणि त्यानंतर इडगुंजीची. दक्षिणेत सुंदरेश्वराच्या देवालयातील प्रवेशद्वाराशी द्वारपालाच्या अगदी जवळ एक द्विभुज गणेश कोरलेला आहे. द्विहस्त गणपतीची एक धातूमूर्ती चेन्नईच्या संग्रहालयात आहे. याखेरीज कंबोडिया, जावा, बाली इत्यादी बृहत्तरभारत देशात दोन हातांच्या मूर्ती आहेत. जपानमध्ये दिसणारी प्रसिद्ध कांगितेनमूर्ती द्विहस्तच आहे.
६. चतुर्भुज गणेश – Chaturbhuj Ganesh
४ हातांची ही भारतात आढळणारी सार्वत्रिक मूर्ती आहे. बहुतेक सर्व गणेशस्थानांतील मूर्ती ४ हात असलेल्या दिसतात.
७. षड्भुज गणेश – Six-armed Ganesha.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथाच्या आरंभी ॐकार गणेशाचे स्तवन केले आहे. त्यामध्ये गणेशाला ६ हात असून ‘त्याच्या मागील दोन्ही हातात परशू आणि अंकुश आहे. डावीकडील एका हातात तुटलेला दात आणि एका हातात मोदक आहे. उजव्या बाजूच्या दोन हातांपैकी एका हातात कमळ आणि एक हात अभयहस्त आहे’, असे वर्णन केले आहे. पंजाबमधील काकडा जिल्ह्यातील वैजनाथ मंदिरात षड्भुज गणेशाची मूर्ती आहे.
८. अष्टभुज गणेश – Ashtabhuja Ganesh.
अष्टभुज मूर्ती ही तंत्रमार्गातील असावी. भिंगार (अहिल्यानगर) येथील उत्खननात मिळालेल्या अष्टभुज तांडवमूर्तीचा जारणमारण, विद्येशी संबंध असल्याचा उल्लेख सापडतो. ग्वाल्हेर संग्रहालयात ८ हातांची गणेशमूर्ती असून ती सुमारे ३५० वर्षांपूर्वी गोंड राणी हिराई हिच्या काळातील आहे. याखेरीज भाळवणी, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर; कोरेगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर आणि कारंजा बहिरम, तालुका चांदूरबाजार, जिल्हा अमरावती येथेही अष्टभुज गणपति आहेत.
९. दशभुज गणेश – Dashabhuj Ganesh
हेरंब, उच्छिष्ट आणि वल्लभ ही गणेशाची ध्याने १० भुजांची आहेत. नेपाळमधील हेरंब हा १० हातांचा आहे. महागणपति ध्यानाला बसलेला असा दशभुज गणपति सापडतो. यातील ४ हात गणपतीचे आणि बाकीचे ६ हात ब्रह्मा, विष्णु अन् महेश यांचे मानले जातात. पुणे शहर आणि परिसरात ३ दशभुज गणपति आहेत. पर्वती पायथ्याशी ‘खळदकरांचा गणपति’ हा ‘नर्मदेश्वर’ असल्याचे म्हणतात. पौड फाटा, पुणे आणि जांभूळपाडा येथील गणपति पाषाणाचा आहे. नाशिक येथे श्री दशभुज सिद्धिविनायक मंदिर आहे.
१०. अर्धनारी नटेश्वर रूप आणि दशभुज गणेश – Ardhanari Nateswara Rup and Dashbhuja Ganesh.
श्री गायत्री मंदिर, गोरेगाव, जिल्हा रायगड येथे तांब्याची अगदी छोटी गणपतीची मूर्ती आहे. याला ‘विद्यागणेश’ म्हणतात. हा पंचधातूचा, अर्धनारी नटेश्वर रूपातील, म्हणजे अर्धशरीर स्त्रीरूपी आणि पुरुष रूपातील आहे, असे समजतात. ही मूर्ती फारच लहान असल्याने याचे १० हात नीट दिसत नाहीत. दोन्ही बाजूला वरचे ४ हात एकमेकाला जोडलेले असून खाली सुटा एक एक हात आहे.
११. द्वादशभुजा गणेश – Ganesha is the twelfth arm.
१२ हात असलेली गणेशमूर्ती क्वचितच पहायला मिळतात. औरंगाबाद येथे थोरल्या बाजीरावाने दिलेली मूर्ती १२ हातांची आणि उजव्या सोंडेची आहे. महागणपति मंदिर, काटस गार्डन, बडनेरा, जिल्हा अमरावती येथे ३ नेत्र असलेली आणि १२ हातांची गणपतीची संगमरवरी मूर्ती आहे. सातारा येथे दांडेकर घराण्याच्या देव्हार्यातील १२ हातांच्या गणपतीची तांब्याची मूर्ती आहे.
१२. त्रिशुंड गणपति – Trishunda Ganapati
पुण्यातील ही मूर्ती एकमेव दिसते. सयामी हस्तलिखितात ‘कोकणानेश्वरा’चे गणेशचित्रही त्रिशुंड (३ सोंड) दिसते; परंतु त्या शुंडांप्रमाणे मुखही ३ आहेत. पुण्यातील त्रिशुंड गणपतीला शुंडा तीन असल्या तरी मुख मात्र एकच आहे.
१३. सिंहावर बसलेला गणेश. – Ganesha sitting on a lion.
बजौरा (हिमाचल प्रदेश) येथील गणेशमूर्ती दोन सिंहाच्या बैठकीवर बसलेली असून तिला ४ हात असून त्याच्या हातात अनुक्रमे परशु, एक अस्पष्ट वस्तू, दात आणि मोदकाचे पूर्णपात्र अशा वस्तू आहेत.