
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
नैवेद्य Naivedya
|| देवाला ‘निवेदनीय’ असे जे द्रव्य ते द्रव्य म्हणजे नैवेद्य होय.
|| म्हणजे ईश्वराला अर्पण करता येण्यासारखी त्याला देता येण्यासारखी खाद्य वस्तू, खाद्य पदार्थ म्हणजे नैवेद्य असे आपण म्हणू या.
|| तंत्रसार या ग्रंथात पुढे दिल्याप्रमाणे नैवेद्य हा पाच प्रकारचा असावा किंवा असू शकतो.
|| त्यात म्हंटले आहे की जे निवेदनीय असेल ते प्रशस्त आणि पवित्र असावे ते भक्षणाला योग्य असावे आणि पाच प्रकारचे असावे. त्यालाच “नैवेद्य” म्हणतात.
१ } भक्ष्य :—— गिळता येण्यासारखे,
२ } भोज्य :—— चावून खाता येईल असे
३ } लेह्य :—— चाटता येईल असे
४ } पेय :—— पिता येईल असे आणि
५ } चुष्य :—— चोखता येईल
|| असे ते पाच प्रकार आहेत.
|| असा हा पंचविध नैवेद्य देवाची पूजा करून त्याला समर्पावा
तंत्रासारातील मूळ श्लोक पुढील प्रमाणे
|| निवेदनीय यद द्रव्यं, प्रशस्तं प्रयतं तथा | तद भक्ष्यार्हम पंचविधं नैवेद्यमिति कथ्यते ||
|| भक्ष्यं, भोज्यं च लेह्यं च, पेयं चुष्यं च पंचमम | सर्वत्र चैतनैवेद्यमाराध्यास्यै निवेदयेत ||
-:🔹 विष्णूला :—— दुधभात,
-:🔸 शिवाला :—— दहीभात,
-:🔹 गणपतीला :—— मोदक अथवा गूळखोबरे,
-:🔸 सूर्याला :—— गूळभात
-:🔹 देवीला :—— सांजा
|| [ तिखट सांजा नाही. गोडाचा सांजा म्हणजेच शिरा सांज्याच्या साटोऱ्या ] किंवा श्रीखंड प्रिय आहे.
|| दुध आणि फळे सर्व देवांना प्रिय आहेत.
|| नैवेद्य दाखवताना देवापुढे चौकोनी मंडळ करून त्यात पुन्हा X असे चिन्ह करून मग त्याच्या वर नैवेद्याचे ताट, भांडे, पात्र ठेऊन मग नैवेद्य दाखवावा.
|| या पात्रावर तुलसीपत्र ठेऊन मगच तो नैवेद्य देवाला अर्पण करावा.
|| तुलसीपत्र ठेवले की माझा यावरचा अधिकार संपला आहे. आणि आता हे पूर्णत: तुझे आहे हा भाव व्यक्त होतो आणि आपला अधिकार संपतो.
|| सोने, रूपे, तांबे, दगड, कमलपत्र आणि यज्ञीय लाकूड यापैकी एका पात्रात ठेऊन नैवेद्य दाखवावा असे सांगितले गेलेले आहे.
|| नैवेद्य देवाच्या उजव्या हाताला ठेवावा. डाव्या हाताला ठेवल्यास तो अभक्ष्य म्हणजे खाण्यास अयोग्य होतो.
|| तुलसीपत्र, दुर्वा किंवा पुष्प यांनी नैवेद्याचे प्रोक्षण करावे म्हणजे यांनी नैवेद्यावर पाणी शिंपडावे म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास, अर्पण करण्यास योग्य होतो.
|| मग नैवेद्याचे पात्रा भोवती डावीकडून उजवी कडे असे आपल्या उजव्या हाताने पाणी सोडत मंडल करत यावे.
|| नंतर “प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा” असे म्हणत म्हणत नैवेद्याचा घास देवाच्या मुखाकडे न्यावा.
|| त्यावेळी आपला दावा हात आपल्या हृदया जवळ असावा, मान झुकलेली असावी.
|| असे करून झाले की “मध्ये पानीयं समर्पयामि” असे म्हणून उदक द्यावे.
|| म्हणजे पाणी द्यावे म्हणजे पाणी जवळ न्यावे अथवा ताम्हनात सोडावे.
|| मग पुन्हा वरचा हा स्वाहा मंत्र म्हणत म्हणत ज्या देवतेला तो नैवेद्य दाखवायचा असेल त्या देवतेचे नाव घेत “देवताभ्यो नम: नैवेद्यं समर्पयामि” असे म्हणावे आणि ताम्हनात उदक सोडावे.
|| [ उदक म्हणजे पाणी ] महानैवेद्य हा पुरण, वरण, पक्वान्न, भाज्या, कोशिंबिरी इत्यादी षड्रस अन्नाचा असावा.
|| नैवेद्य दाखवून झाल्यावर देवाची आरती करावी.
|| नैवेद्य दाखवून झाला की जो पदार्थ असेल त्याचे “प्रसादात” रुपांतर होते.
|| त्यामुळे मी देवाला प्रसाद दाखवतो आहे असे म्हणता येत नाही तर मी देवाला नैवेद्य दाखवतो आणि तुला त्याचा “प्रसाद” देतो हे योग्य आहे.
|| देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर आपण तो लगेच स्वत:ही खाऊ नये आणि इतरांना लगेच वाटू सुद्धा नये.
|| थोडावेळ तो देवापुढे तसाच ठेवा. हां, पण झुरळे, पाली, उंदीर, माशा, मुंग्या यांचा त्याला उपद्रव होत नाही ना हे पाहणे अगत्याचे आहे हे सांगायला नकोच.
|| आपल्याला जर प्रत्यक्ष नैवेद्य दाखवता येत नसेल तर आपण मानस पूजा करून त्यामध्ये आपल्याला हवा तो नैवेद्य प्रभूला अर्पण करू शकतो.
|| आणि या मानस पूजेमध्ये प्रचंड शक्ती आहे अगदी प्रत्यक्ष पूजेपेक्षाही. कारण आपण त्यावेळेला देवाशी पूर्णत: एकरूप होऊन जातो. मनाला प्रयत्न करून मानस पूजेचे चित्र रंगवावे लागते. आणि मनाला मग हळूहळू असा हा शांतीरूप आकार यायला लागतो. आणि मग आपले जीवनच पवित्र, सुगंधी बनून जाते.
|| आपला देह हा देवाचे मंदिर होतो आणि आत आत्मा परमेश्वर आहे हे कळायला लागते.