अंबाजोगाईची श्री योगेश्वरी देवी मंदिर

श्री योगेश्वरी । अंबाजोगाईची श्री योगेश्वरी देवी मंदिर ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

श्री योगेश्वरी

महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यात जयंती नदीच्या काठी बसलेले एक गाव म्हणजे आंबाजोगाई… कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहुरची रेणुका ही आदिशक्तीची पूर्ण पीठे, तर वणीची सप्तशृंगी हे अर्धे पीठ. काही लोकांच्या मते अंबाजोगाईची योगेश्वरी, हे अर्धे पीठ. मराठीचे आद्य कवी, ‘विवेकसिंधु’कर्ते मुकुंदराज आणि दासोपंतांचा अधिवास लाभलेले हे स्थान…..

श्री योगेश्वरी देवीचा अवतार स्वयंभु असून जागृत देळस्थान आहे… श्री योगेश्वरी देवी कुमारिका आहे. दंतासुर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी मार्गशीष पौर्णिमेला अवतार घेतला आहे. देवी कोकण वासीयांची कुलस्वामिनी असून अंबाजोगाईतील लोकांची ग्रामदैवत मानले जाते…..

ध्यानाचा श्लोक.


देवीं भक्तजनप्रियां सुवदनां खड्गं च पात्रं तथा। स्वर्णालंकृतलांगलंसुमुसलंहस्तैर्दधानां श्रियं | विद्युत्कोटीराविन्दुकांतिधवलां दंता सुरोन्मूलिनीम ब्रम्हेंद्राद्यभिवंन्दितां च वरदां योगेश्वरी संभजे ||

प्रार्थना.


देवी योगेश्वरी स्वामिनी, अज्ञ बाल मी तुझाच म्हणुनी लाज राख तु माझी जननी देवी योगेश्वरी स्वामिनी तुजवीण मज नच त्रिभुवनी मिळो आसरा तुझा निशिदिनी हीच प्रार्थना अखंड चरणी देवी योगेश्वरी स्वामिनी.

देवी योगेश्वरी हे साक्षात आदिमाया आदिशक्तीने घेतलेले रूप… ही देवी अंबाजोगाई येथे वास्तव्यास आहे. दांतसूर नावच्या एका राक्षसाने प्रचंड उन्माद माजवला होता. त्याचा वध करण्यासाठी देवीने योगेश्वरीचे रूप घेतले आणि त्याचे पारिपत्य केले. दांतसूरचा वध केल्यानंतर देवी एका आंब्याच्या झाडाखाली विसावली, म्हणून या जागेस जोगाईचे आंबे आणि पुढे आंबेजोगाई, असे नाव प्रचलित झाले. दांतसूरचा वध केला म्हणून ही देवी दांतसूरमर्दिनी झाली…..

अमूर्त अनघड अशा तांदळ्याच्या रूपातली ही योगेश्वरी कुमारिका आहे… त्यामागे एक कथा सांगितली जाते, परळीच्या वैजनाथांचा योगेश्वरीशी विवाह निश्चित करण्यात आला. कोकणातून देवी आणि वऱ्हाडी मंडळी परळीला निघाले. लग्नाचा मुहूर्त ठरला; पण तो मुहूर्त टळून गेला आणि देवीचा विवाह झाला नाही. यामुळे देवी कुमारिकाच राहिली आणि परत कोकणात न जाता, देवी ज्या ठिकाणी राहिली, ते आजचे आंबाजोगाई. ११व्या शतकाच्या सुमारास कोरल्या गेलेल्या हत्तीखाना लेणी किंवा शिवलेणी, हे जोगाईचे माहेर म्हणून ओळखू जाऊ लागले…..

देशावरची ही देवी कोकणातील चित्पावन ब्राह्मणांची कुलदेवता आहे… हा संबंध सांगणारी कथा भगवान परशुरामांशी निगडित आहे. परशुरामांनी अपरांत, म्हणजे कोकण भूमीची निर्मिती केल्यावर, त्या भूमीवर वास्तव्य करण्यासाठी काही कुटुंबे कोकणात नेली. तिथे समुद्र किनाऱ्यावर अर्धमृत अवस्थेत पडलेल्या १४ व्यक्तींना परशुरामांनी संजीवनी दिली. या १४ व्यक्तींचा विवाह करण्यासाठी भगवान परशुरामांनी अंबाजोगाईतून वधू नेल्या. वधू नेताना योगेश्वरीने एक अट घातली, ज्यांच्याशी या मुलींचा विवाह होईल, त्यांच्या कुलाची योगेश्वरी ही कुलदेवता असेल.

अंबाजोगाई हे क्षेत्र फार प्राचीन आहे… यादव राजवटीत हे एक समृद्ध शहर होते. चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, नंतर निजाम अशा विविध राजयकर्त्यांनी या भूमीवर राज्य केले आहे. जयंती नदीच्या पश्चिम तटावर अंबेचे मंदिर आहे. मंदिराला तटबंदी असून उत्तर, दक्षिण आणि पूर्व दिशांना दरवाजे आहेत. मंदिराच्या प्रांगणात दोन दीपमाळा आहेत. देवीचे मंदिर यादवकाळात बांधलेले असून त्याचा जीर्णोद्धारही झालेला दिसतो. एका यादवकालीन शिलालेखानुसार या मंदिराला तीन कळस होते. मुख्य मंदिर दगडी असून, एका छोट्या गभाऱ्यात चबुतऱ्यावर अंबिकेचा मुखवटा आहे आहे. देवी उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या सभामंडपात गणपती आणि देवीची उत्सवमूर्ती आहे. मंदिराच्या बाहेर उत्तर दिशेस होमकुंड असून, उत्सवाच्या दरम्यान होणाऱ्या शतचंडीचा होम केला जातो. मंदिर परिसरात नगारखान्याजवळ दांतसुराची मूर्ती आहे. मंदिरावर असलेला पाच मजली कळस आहे. उत्तम कलाकृती असलेला मराठा शैलीतील या कळसावर अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. अठरा हातांच्या गणेशाची स्त्री रूपातील मूर्ती, ही एक अद्वितीय गोष्ट कळसावर आहे…..

देवीला रोज पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, तसेच तांबुलाचाही प्रसाद असतो… देवीचा मुख्य उत्सव हा मार्गशीर्ष महिन्यात पौर्णिमेला, म्हणजेच दत्त जयंतीला साजरा केला जातो. अश्विन महिन्यातील शारदीय नवरात्र उत्सवही तितक्याच मोठ्या प्रमाणात साजरे केले जाते.

हिंदू धर्मातील शनी देवाचे ( शनैश्‍चर ) देवाचे माहात्म्य

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )