शेगावीचा योगीराणा संत गजानन महाराज (Yogirana Sant Gajanan Maharaj of Shegavi)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

गजानन महाराजांचे प्रकटदिन – Gajanan Maharaj Prakatdin

वऱ्हाडातील शेगाव हे गाव प्रसिद्ध झाले ते श्रीसंत गजानन महाराजांचे पुनीत वास्तव्यामुळे. शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव. सध्या तालुक्याचे ठिकाण असून पूर्वी खामगाव तालुक्यातील प्रमुख शहर म्हणून प्रसिद्ध होते. फार पूर्वी या गावाचे नाव शिवगाव असे होते. पुढे त्याचा अपभ्रंश होऊन ‘शेगाव’ असे नाव रूढ झाले. संत गजानन महाराज शेगावात माघ महिन्यात वद्य सप्तमी दिवशी भक्तांच्या कल्याणासाठी सर्वप्रथम प्रकटले. तो दिवस होता शके १८०० म्हणजेच २३ फेब्रुवारी १८७८ रोजीचा. श्री. देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले.
“गण गण गणात बोते” हे अहर्नीश त्यांचे भजन चालत असल्यामुळे लोकांनी त्यांना श्री गजानन महाराज हे नाव दिले. सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. ते सिद्धयोगी पुरुष होते. अद्वैत ब्रह्माचा सिद्धांत महाराजांच्या “गण गण गणात बोते” या सिद्धमंत्रात व्यक्त झाला आहे.

कुत्रा, गाय, घोडा ह्यांना वश करून चराचरात भगवंत भरून राहिला आहे हेही त्यांनी सोदाहरण दाखविले. भक्तास प्रत्यक्ष पांडुरंगाचे दर्शन त्यांनी घडविले. महाराजांच्या तीर्थानेच जानराव देशमुख मरणोन्मुख स्थितीतून बरे झाले. अनेकांचे गर्वहरणही त्यांनी केले. श्री गजानन महाराज हे दिगंबर वृत्तीतील सिद्धकोटीला पोचलेले महान संत होते. मिळेल ते खावे, कोठेही पडून रहावे, कोठेही मुक्त संचार करावा, महाराजांच्या या अशा अवलिया स्वभावामुळेच सर्व भक्त बुचकळ्यात पडायचे.

शेगावीचा योगीराणा – संत गजानन महाराज यांचा कार्यकाळ: १८७८ ते १९१० हा आहे. श्री देविदास पातूरकर यांच्या घराबाहेर टाकलेल्या उष्ट्या पत्रावळीतील अन्नाचे कण वेचून खात असताना व गाईगुरांना पिण्यास ठेवलेल्या ठिकाणचे पाणी पिताना ते बंकटलाल अग्रवाल यांना सर्वप्रथम दृष्टीस पडले. श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते. ते परमहंस संन्यासी होते. त्यांची अवधूत अवस्था असल्यामुळे त्यांना दंड, भगवी वस्रे अथवा कोणत्याही अन्य लक्षणांची आवश्यकता नव्हती. त्यांनी स्वत:च्या ह्या संन्यासाश्रमाचा उच्चार अनेकवेळा करुनही दाखविला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी परमहंस संन्याश्याच्या रुपाने आपल्या भक्तांना दर्शन दिल्याचेही अनेक उल्लेख श्रीगजाननविजय ह्या पोथीमध्ये आलेले आहेत.

एक दिवस बालअवस्थेतील गजानन महाराज पहाटेच्या वेळीअक्कलकोटला स्वामी समर्थाच्या आश्रमात पोचले. त्यावेळी अक्कलकोट स्वामी भक्तांना उपदेश करीत होते. महाराज स्वामींना भेटताक्षणी त्यांनी एकमेकांना परस्पर ओळखले. स्वामींनी बाल गजाननाची मूर्ती न्याहाळली, सिध्दपुरुष होण्याचा आशिर्वाद दिला. त्या दिवसापासून बाल गजानन स्वामींच्या आश्रमी राहू लागले. दिगंबर अवस्थेतील बाल गजाननाची मूर्ती आणि त्यांची तेजस्वी मुद्रा बघून दर्शनार्थी भक्त स्वामींबरोबर बाल गजाननाच्या पाया पडत. अशाप्रकारे स्वामींनी बाल गजाननास आपल्याजवळ ठेवून त्यांना आध्यात्मिक ज्ञानाचे धडे दिले नंतर स्वामींनी बाल गजाननास नाशिकला देव मामलेदारांकडे जावे, असे सांगितले व त्यानंतर, तु आकोटला नरसिंग महाराजाकडे आणि तेथुन शेगावला जाऊन भक्तांचा उध्दार करावा व तेथेच देह सोडावा, असे सांगितले.

त्यानंतर ते नाशिकला देव मामलेदारांच्या दर्शनाकरिता गेले. दोन्ही संतांची भेट झाली. त्यांनी बाल गजाननास आपल्याकडे ठेवून घेतले. देव मामलेदारांनी देह सोडण्याअगोदर संत गजाननास सांगितले की, स्वामी समर्थाच्या वचनानुसार विदर्भातील शेगाव या गावी जाऊन तू भक्तांचा उध्दार करावा व तिथेच देह सोडावा हे विसरू नको. त्यानंतर ते कावनाई गावातील सुप्रसिध्द कपिलधारा तीर्थावर आले व १२ वर्षे तपश्चर्या केली. त्यावेळी त्यांना रघुनाथदास या महंतांनी योगसिध्दी दिली. या योगसिध्दीनंतर ते महंताच्या आदेशानुसार नाशिकला आले व एका वटवृक्षाखाली राहू लागले. त्यावेळी नाशिकला विशाल संतमेळा भरला होता. त्या संतमेळाव्यात विदर्भातील लाड कारंजा या गावचे बाळशास्त्री गाडगे आले होते. त्यांची नजर तेजपुंज अशा बाल गजाननावर गेली आणि त्यांनी त्यांना आदरपूर्वक प्रार्थना करुन लाड कारंजा या गावी आपल्या घरी आणले. येथे बाल गजाननास बघण्यास व त्यांची पूजाअर्चा करण्यास गर्दी होऊ लागली व लोक त्यांना कपडे, अलंकार व भेटवस्तू देऊ लागले. बाल गजानन या उपाधीला कंटाळून कपडे, अलंकार सर्व तिथेच टाकून बाळशास्त्री गाडगे यांच्या घरून बग्गी जावरा या गावी मणिरामबाबांजवळ आले व ४- ५ दिवस तेथे राहिले.गजानन महाराज मणिरामबाबांकडे आल्याची आठवण म्हणून मणिरामबाबांनी तिथे गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली. या दिवसात गजानन महाराज आणि मणिरामबाबांची आध्यात्मिक चर्चा झाल्याचा उल्लेख आहे. या चर्चेच्यावेळी मणिरामबाबांनी संत गजाननास आकोटला नरसिंग महाराजांकडे जाण्याची आठवण करून दिली. त्याप्रमाणे संत गजानन महाराज आकोटला नरसिंग महाराजांकडे आले व त्यांना भेटले. दोघांनीही अंतरज्ञानाने परस्परांना ओळखले. गजानन महाराज नरसिंग महाराजांना म्हणाले कि, मी आजपर्यंत अक्कलकोट स्वामी समर्थाजवळ होतो. त्यांच्या आज्ञेवरून आपल्याकडे आलो आहे. भेट झाल्यावर नरसिंग महाराजांनी आपण समाधी घेणार असल्याचे गजाननास सांगितले. त्यानंतर तू माझे किर्याकर्म करून शेगांवला भक्तांचा उध्दार करण्याकरिता जावे असे सुचविले. नरसिंग महाराजांनी समाधी घेण्याअगोदर गजाननास अष्टसिध्दीप्राप्ती शिकविली व आपल्या काही शक़्ती त्यांच्यात संप्रेरित केल्या. अशाप्रकारे गजानन नरसिंग महाराजांच्या विनंतीवरून शेगांवला आले.

सुमारे ३२ वर्षे गजानन महाराजांनी भक्तजनांना या परिसरातून मार्गदर्शन केले. चैतन्यमय देहाने सर्वत्र संचार केला. दिगंबर वृत्तीच्या या अवलिया गजाननांनी विविध चमत्कार करून अनेकांना साक्षात्कार घडविला. त्यावेळी त्यांनी लोकांना भक्तिमार्गाचे महत्त्व पटवून सांगितले. महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, पिठीसाखर, हिरव्या मिरच्या अतिशय आवडत असत, म्हणूनच आजही गजानन महाराजांच्या भंडाऱ्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात.

गण गण गणात बोते हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड जप करित किंबहुना त्यामुळेच त्यांना गिणगिणे बुवा वा गजानन महाराज अशी नावे पडली. दि. ०८ सष्टेबर १९१० रोजी श्री गजानन महाराज शेगावी समाधीस्त झाले. श्री गजाननाच्या वास्तव्याने शेगाव अलौकिक चैतन्याचे प्रभावी संतपीठच बनले .

‘मानवी जीवनात संकट आल्यावर ईश्र्वरावाचून कोणीही तारणहार नाही,’ हे ईश्र्वरीतत्त्व जाणण्यासाठी शास्त्रात कर्म, भक्ती, योग हे तीन मार्ग सांगितले आहेत. या तिन्ही मार्गांचे बाह्य स्वरूप जरी भिन्न असले तरी फलप्राप्ती एकच आहे. हे या संतांच्या शिकवणीतून दिसून येते. गजानन महाराज त्रिकालज्ञ होते. भूत, भविष्य आणि वर्तमान याविषयी ते अगोदरच जाणून असायचे. कारण ते ईश्र्वराचे निस्सीम भक्त होते. यामुळे ईश्र्वरी सहाय्यानेच महाराजांनी अनेक रंजले गांजलेल्यांना मार्गदर्शन केले व सन्मार्ग दाखविला. परमार्थात खोटेपणाला मुळीच थारा नसतो.

परब्रह्म, परमात्म्याला कोणती जातगोत, कुलगोत्र, जन्मगाव, देशविदेश जोडता येते का? महाराज कोण होते, कोठून आले?. माघ वद्य ७ शके १८००, २३ फेब्रुवारी १८७८ या दिवशी ऐन तारुण्यात ते शेगांव जि. बुलढाणा येथे दिगंबरावस्थेत दृष्टीस पडले. त्या वेळी ते देवीदास पातुरकरांच्या मठाबाहेर उष्ट्या पत्रावळीतील शिते उचलून खात होते. ह्या संदर्भात दासगणूंनी लिहिले आहे,

“कोण हा कोठीचा काहीच कळेना | ब्रह्माचा ठिकाणा कोण सांगे | साक्षात ही आहे परब्रह्ममूर्ती | आलीसे प्रचिती बहुतांना ||

जसा कुशल जवाहीर कोळशाच्या तुकड्यांमधून अनमोल हिरा शोधून काढतो त्याप्रमाणे बंकटलाल आगरवाल ह्याने त्यांचे महत्त्व ओळखले. त्याला महाराजांचे प्रथम दर्शन झाले ते असे,

“दंड गर्दन पिळदार | भव्य छाती दृष्टी स्थिर | भृकुटी ठायी झाली असे ||”

जेव्हा बंकटलालने त्यांना जेवणाविषयी विचारले त्यावेळी महाराजांनी नुसतेच शून्य दृष्टीने त्याच्याकडे पाहिले. कारण महाराज त्यावेळी तुर्या (जागृति म्हणजे जागे असणे, सुषुप्ति म्हणजे झोपणे आणि स्वप्नावस्था ह्या तीन अवस्थांच्या पलीकडील स्थितीस तुर्या अवस्था अथवा व्रह्मस्थिति अथवा सहजसमाधि असे म्हणतात) अवस्थेत होते. महाराज एक महान आणि असामान्य असे योगी आहेत ह्याची बंकटलालला तत्काळ आणि मनोमन खात्री पटली. त्या महान भक्ताने त्यांचे श्रेष्ठत्व ओळखून त्यांना स्वगृही आणले.

जेथे संतांचा वास तेथेच भगवंताचा निवास ह्या उक्तीप्रमाणे,

“बंकटलालाचे घर | झाले असे पंढरपूर | लांबलांबूनीया दर्शनास येती | लोक ते पावती समाधान ||”

बंकटलालाचे घर भक्तांनी दुमदुमून गेले. जरी पहिले काही महिने श्री गजानन महाराज बंकटलालाकडे राहिले तरीदेखिल सच्च्या परमहंस संन्याशाप्रमाणे काही कालानंतर त्यांनी त्यांचे वास्तव्य तिथून बदलून गावातील मारुतीच्या मंदिरात स्थिर केले. संत हे उपाधिरहित असल्याकारणाने गजानन महाराजदेखिल उपाधिपासून दूर राहण्याकरिता अनेक वेळा मठ सोडून कुठेतरी भटकंती करण्यास निघून जात.

श्रीगजानन विजयमध्ये वर्णिलेले चमत्कार हे एका दृष्टीने अद्भुत असले तरी सर्वस्वे अद्भुत नाहीत. तसे चमत्कार अन्य साधुपुरुषांच्या, मुक्तपुरुषांच्या चरित्रात अनेकदा आढळून येतात. विविध धर्मग्रंथातही त्यांचा उल्लेख सापडतो. उदाहरणार्थ- पंढरपूर मुक्कामी असताना बापूराव नामक महाराजांचा भक्त स्वत: विठ्ठल मंदिरात जाऊ शकला नाही. श्रीगजानन महाराजांनी त्याला विठोबाचे दर्शन घडवून दिले. इतरांना जेव्हा ही गोष्ट कळली, तेव्हा त्यांनीही महाराजांकडे दर्शनाचा आग्रह धरला. तेव्हा अगोदर बापूरावांसारखे निरागस व शुद्ध मनाचे व्हा, असे महाराज म्हणाले, पंढरपुरात कॉलऱ्याने ग्रस्त झालेल्या एका सोबत्याला सोडून जेव्हा इतर लोक जाऊ लागले, तेव्हा श्रीगजानन महाराजांनी स्वत: त्या आजारी माणसाचा पत्कर घेतला. तो बरा होईपर्यंत त्यांनी जाणे तहकूब केले. बाळापूर येथील बाळकृष्णपंत व पुतळाबाई वृद्धावस्थेत शेवटीशेवटी दरवर्षीप्रमाणे सज्जनगडावर जाऊ शकत नव्हती. स्वप्नातील दृष्टान्ताप्रमाणे बाळकृष्ण उत्सवाच्या दिवशी समर्थांची वाट पाहत होते. खरोखरच समर्थांची जय जय रघुवीर समर्थ अशी वाणी ऐकू आली आणि समर्थ बाळकृष्णासमोर उभे ठाकले. पाहता पाहता क्षणात समर्थ व क्षणात गजानन महाराज अशी दोन्ही रूपे बाळकृष्णांना दिसू लागली. एका दृष्टीने हा चमत्कार म्हणता येईल, पण दुसऱ्या दृष्टीने हा चमत्कार नाही. अशाच प्रकारचे दर्शन श्री मथुरबाबू यांना घडले असल्याचा उल्लेख श्रीरामकृष्ण-लीलाप्रसंग या ग्रंथात आहे. श्रीरामकृष्ण व्हरांड्यात फिरत होते. मथूरबाबूंचे त्यांच्याकडे लक्ष होते. पाहता पाहता मथूरबाबूंचा आपल्या डोळ्यांवर विश्र्वास बसेना. कारण एकदा शिव व एकदा श्रीरामकृष्ण असे त्यांना दर्शन घडले.

श्रीगजानन महाराजांनी गंगायमुनेचे स्मरण करताच भास्कर पाटलांच्या शेतातील कोरडी विहीर तुडुंब भरून जाणे, नर्मदेची स्मृती करताच बुडणारी नाव तरून जाणे या चमत्कारांमागेही श्रीमहाराजांची इच्छाशक्तीच होती. ही इच्छाशक्ती लोकमान्य टिळकांच्याही पाठीशी उभी राहिल्याचा उल्लेख ‘श्री गजानन विजय’मध्ये आहे. लोकमान्य टिळक, दादासाहेब खापर्डे, त्यांचे चिरंजीव बाबासाहेब यांच्यासारख्या बुद्धिनिष्ठ व्यक्तीनांही श्रीगजाननमहाराजांबद्दल नितांत आदर होता, ही गोष्टही चमत्कारांमधील कार्यकारणसंगती दर्शवून जाते. गंगाभारतीचा सर्वांगावर उतलेला कुष्ठरोग श्रीगजाननमहाराजांनी नष्ट केला. महापुरुषांचा स्पर्शामुळे घडून आलेल्या अशा घटनांचा उल्लेख अन्य वाङ्मयांतही आढळून येतो.

श्री गजानन महाराज हे अत्यंत परमोच्च स्थितीला पोहोचलेले असे ब्रह्मवेत्ते महान संत होते आणि त्यांचे जीवन हे एक मोठे गूढच होते. ते विदेही स्थितित वावरणारे असे परमहंस संन्यासी असून जीवनमुक्त होते. भक्तांचा उद्धार करण्याची त्यांची स्वतःचीच एक विशिष्ट अशी शैली होती. काहीच न बोलता ते सर्व काही बोलून जात आणि काहीच न सांगता ते सर्व काही सांगून जात, असा त्यांच्या भक्तांचा अनुभव होता. भक्तांवर असीम अशा कृपेचे छत्र धरून ते भक्तांच्या ह्रदयात घर करत असा सर्व भक्तांचा अनुभव होता. “गण गण गणात बोते,” हा त्यांचा आवडता मंत्र, ज्याचा ते अखंड ते जप करित. या मंत्राशिवाय ते उभ्या आयुष्यात काहीही बोलले नाहीत. त्यामुळेच त्यांना ‘गिणगिणेबुवा’ ‘गजानन महाराज’ अशी नावे पडली. वर्हाडातील भक्त त्यांना प्रेमाने ‘गजानन बाबा’ म्हणतात. दासगणूंनी ह्या संदर्भात लिहिले आहे,

“मना समजे नित्य | जीव हा ब्रह्मास सत्य | मानू नको तयाप्रत | निराळा त्या तोचि असे ||.”

ह्या मंत्राचा अर्थ असा आहे की जीव आणि ब्रह्म हे एकच आहेत आणि त्यांना निराळे समजू नये. महाराजांना झुणका भाकरीसोबतच मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर अतिशय आवडत असे. कधी कधी अमर्यादपणे चित्रविचित्र खावे तर कधी तीन-चार दिवस उपाशी राहावे अशी त्यांची रीत होती. भक्तांकडून येणारे पंचपक्वान्नाचे ताट असो वा कुणी कुत्सितपणे दिलेला वाटलेल्या मिरच्यांचा गोळा असो, प्रसन्न भावाने त्याचेही ते सेवन करीत. गरीबाघरी जे अन्न सहजपणे उपलब्ध होऊ शकेल अशाच प्रकारचे अन्न म्हणजे ज्वारीची भाकरी, अंबाडीची भाजी, पिठले असे पदार्थ महाराज आवडीने खात. म्हणूनच आजही महाराजांच्या भंडार्यासाठी इतर पक्वांनांव्यतिरिक्त ज्वारीची भाकरी, पिठले आणि अंबाडीची भाजी अवश्य करतात. कुठेही बेधडकपणे घुसून पाणी प्यावे, नाहीतर ओहोळातच ओंजळी ओंजळीने पाणी पिऊन तहान शमवावी, असे त्यांचे वर्तन असे.

मुळ्याच्या शेंगा, हिरव्या मिरच्या, पिठीसाखर हे पदार्थ कोणी आणून दिले की ते लहान बालकाप्रमाणे हरखून जात. मग या पदार्थांचे ढीग रचणे वा त्यांचे लहानलहान वाटे करणे यासारख्या बाललीलांमध्ये ते गुंग होऊन जात. महाराजांना चहाविषयी विलक्षण प्रेम होते. चांदीच्या मोठ्या वाडग्यातून मिळणारा गरमागरम चहा पाहून ते खुलत असत महाराज हे शुद्ध ब्रह्म होते, एक परमहंस संन्यासी होते. ज्याला ब्रह्माचे पूर्णपणे ज्ञान झालेले आहे, जेथे जीव-शिवाचे मिलन झालेले आहे अशा जीवनमुक्तांना देहाचे भान राहात नाही असे असताना तो देह कपड्यात गुंडाळण्याकडे लक्ष तरी कुठे असणार? महाराज अशा पराकोटीचे जीवनमुक्त संत होते म्हणूनच ते बहुश: दिगंबर अवस्थेतच असत. नग्न राहतात अशा आरोपाखाली जेव्हा जठारसाहेबांनी त्यांना त्यांच्या दिगंबर अवस्थेबद्दल विचारताच महाराज म्हणाले,

“तुला काय करणे यासी|चिलिम भरावी वेगेसी|नसत्या गोष्टीशी|महत्त्व न यावे निरर्थक||.”

महाराजांना कपड्याचे आकर्षण वा सोस असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणी अंगावर शाल पांघरली तर मनात असेल तोपर्यंत ठेवत नाहीतर ती फेकून देत असत.पादुका,पादत्राणे त्यांनी कधी वापरलीच नाहीत. बरेचसे भक्त विकत आणलेल्या पादुका महाराजांच्या पायाला लावत आणि मग घरी त्यांची स्थापना करीत. मात्र महाराजांच्या नित्य वापरातल्या वस्तूंमध्ये पादुका नव्हत्या. इतकंच काय त्यांना चिलीम ओढण्याचीही फारशी सवय नव्हती. क्वाचितच ते चिलीम ओढीत असत. पण ३२ वर्षांच्या कालखंडात त्यांनी फार कमीवेळा चिलिमीला स्पर्श केला.

देहत्याग करण्यापूर्वी महाराज म्हणाले,

“मी गेलो ऐसे मानू नका | भक्तित अंतर करू नका | कदा मजलागी विसरु नका | मी आहे येथेच ||.”

यावरून महाराजांचे भक्तांवरील अपरंपार प्रेमच दिसून येते. महाराजांनी भक्तांना सांभाळण्याचे वचन दिले आहे; ते समाधि घेण्यापूर्वी म्हणाले,

“दु:ख न करावे यत्किंचित | आम्ही आहोत येथेच | तुम्हा सांभाळण्यापरी सत्य | तुमचा विसर पडणे नसे ||.”

देह त्यागून महाराज ब्रह्मीभूत झाल्याकारणाने ते आता जगदाकार झाले आहेत. त्यायामुळे लाखो भक्तांना आजही त्यांची कृपा, प्रेम, आशीर्वाद आणि मार्गदर्शन लाभत आहे.

गण गण गणात बोते । हे भजन प्रिय सद्गुरुते ।। या श्रेष्ठ गजानन गुरुते । तुम्ही आठवीत राहायाते ।।

हे स्तोत्र नसे अमृत ते । मंत्राची योग्यता याते ।। हे संजीवनी आहे नुसते । व्यावहारिक अर्थ न याते ।।

|| अनंत कोटी ब्रम्हांड नायक, महाराजाधिराज योगीराज, सद्गुरू श्री गजानन महाराज की जय ||

प.प गजानन महाराजांना आवडणारे पदार्थ – Gajanan Maharaj’s favorite food

१) बेसन भाकर – शेगांवला श्री. म.ना. मोहळकर हे हेडमास्तर होते ते व त्यांचे बंधु अनंतराव, काकु रमाबाई व लहान पुतण्या दत्तात्रेय हे महाराजांच्या दर्शनाला मठात जात असत. एकदा महाराज रमाबाईला म्हणाले, मायबाई उद्या चून (बेसन) भाकर घेऊन येजो. तिला वाटले एवढ्या मोठ्या संताला हे काय जेवू घालायचे. तिने पुरणपोळी करुन दुसरे दिवशी महाराजांकडे मठात आणली. महाराजांनी तेच ताट तिला फेकून मारले व चून भाकर चून भाकर सारखे म्हणाले. तिने सोबत असलेल्या लहानग्या दत्तात्रेय यास घरी जावुन चून भाकर कांदा घेवुन येण्यास सांगितले. त्याने घरी जाऊन चून, भाकर, कांदा आणला. तो महाराजांना दिला. महाराजांनी मोठ्या आनंदाने तो खाल्ला. या संबंधीची गजानन विजय ग्रंथात अ. क. १६ मध्ये असलेली डॉ. भाऊ कवर यांची घटना आपल्या सर्वास ठाऊक आहेच.

२) अंबाडीची भाजी आणि भाकर – एकदा मंगरूळपीर तालुक्यातील कुपटे गावच्या देशमुखाने महाराजांना कोंडोलीहून आपल्या घरी वाड्यात आणले. या देशमुखाच्या वाड्या शेजारी देशमुखांकडे काम करणारे दिवाणजी, महाजन राहात. महाराज आपल्याकडे आले म्हणून देशमुखांनी महाराजांकरिता पंचपक्वान्नाचा स्वयंपाक तयार केला. आता जेवणाचे पान वाढणार तेवढ्यात सायंकाळी ६ वाजता महाराज एकटेच वाड्याच्या बाहेर पडले आणि भटकत भटकत दिवाणजी महाजन यांच्या घरी आले आणि अंबाडीची भाजी आणि भाकर जेवायला मागु लागले .दिवाणजी यांचेकडे दुपारची अंबाडीची भाजी व भाकर होती ती महाराजांनी खाल्ली आणि ते निघून गेले . शेगावला महाराज कोणत्या बाईच्या शिदोरीत अंबाडीची भाजी आणि ज्वारीची भाकर आहे हे अंतर्ज्ञानाने जाणून घेत व भास्कराकरवी ते पदार्थ मागून घेत.

३) पेढे – गजानन महाराज श्रीमंताची पंचपक्वान्ने दूर सारीत पण सुदाम्याचे पोहे खात. महाराजांना पेढ्याचा नैवेद्य खूप येई त्यातील एखादा पेढा महाराज खात आणि बाकीचे सर्व पेढे लहान मुलांना वाटून देत.

४) मिरचीचे वरण – मुंडगावच्या बायजाबाई महाराजांना मिरचीचे वरण आणि ज्वारीची भाकर खावू घाली.

५) चहा – महाराज सकाळी चहा पित, चहा पिण्यासाठी महाराजांना एका भक्तांनी चांदीचा लोटा दिला होता. त्या लोट्यातून महाराज चहा पित. महाराजांची जेव्हा प्रकृती बिघडली त्यावेळी डॉ. भाऊ कंवर महाराजांवर उपचार करीत. ज्यावेळी महाराज डॉ. भाऊ कंवरांनी दिलेल्या औषधीच्या गोळ्या खात नसे. त्यावेळी डॉ. कंवर श्रींच्या चहात त्यांच्या न कळत औषधी टाकीत पण अंतर्ज्ञानी श्रींना ते माहीत होत व ते चहा न पिता खाली टाकून देत.

६) खिचडी – मुंडगांवचे पुंडलिक भोकरे हे पायी प्रवास करावयाचे त्यांचा भक्तीभाव पाहून महाराजांनी त्यांची प्लेगची गाठ दूर केली होती. हेच पुंडलिक भोकरे मुंडगांवला असतांना आईला म्हणाले, आई आज मला खिचडी खाविशी वाटते. आई म्हणाली उद्या धुंधुरमास आहे उद्या करिन. पुंडलिक रागाने घरून निघाला आणि शेगांवला आला. बायजा मठातच होती तिने पुंडलिकास विचारले. कवा निघाला जेवला का नाय. पुंडलिक जरा रागातच होता. त्याने उत्तर देण्याचे अगोदर महाराज बायजाबाईस म्हणाले, बायजे मघाची माझी राहिलेली खिचडी या पुंडलिकास दे, ती त्याच्यासाठीच ठेवली आहे. ती अजून गरम आहे. सकाळी केलेली खिचडी तरी ती गरमच होती. ती पुंडलिकाने खाल्ली आणि म्हणाला, कशी महाराजांनी माझी इच्छा अंतर्ज्ञानाने जाणली. वरील प्रसंगावरून हे लक्षात येते की महाराज खिचडी खात आणि त्यांच्या करिता बायजाबाई आणि साळुबाई स्वयंपाक करीत असे.

स्वामी समर्थांचे गजानन महाराजांना मार्गदर्शन – Swami Samarth’s guidance to Gajanan Maharaj

अक्कलकोट स्वामीनी गजानन महाराजांना सांगितलं “तू विदर्भात जा आणि शेगाव या गावी प्रकट हो. तिकडच्या लोकांना नामस्मरणाचे महत्व पटवून दे. नामस्मरण हे एक चिलखत आहे. नियतीने कितीही वर केले तरी आत कुठेही जखम होत नाही. शेगावला जाण्यापूर्वी नाशिकला जा, तिथे श्रीरामाचे दर्शन घे आणि तिथल्या देव मामेलदारला भेट आणि मग पुढे जा.”

स्वामींचा आदेश घेऊन महाराजानी श्रीराम मंदिरी जाऊन दर्शन घेतले. तिथे उबंरठव्यावरती डोके ठेवले तर मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. हे पाहून मंदिरातील पुजारी घाबरला त्याला वाटलं “हि भुताटकी आहे काय? पण प्रत्यक्ष श्रीराम मंदिरात भुतावळींना श्रीरामांच्या आज्ञेशिवाय प्रवेश नाही. मग असं भलतंच काय होतंय ?” असं मनात म्हणत त्याने श्रीराम प्रभूंसमोर हात जोडले. तेवढ्यात श्रीराम चरणी वाहिलेली फुले गजानन महाराजांच्या मस्तकावर येऊन पडली. ते पाहून पुजारी गाभाऱ्यातून बाहेर आला आणि ते दृश्य पाहून मनोमन विचार केला हि कोणी साधारण व्यक्ती नाही आणि त्याने महाराजांच्या चरणी लोटांगण घातले.

महाराज त्याच्या डोक्यावरून आईच्या ममतेने हात फिरवून म्हणाले “अरे तुझे जीवन पिंजऱ्यातल्या पोपटासारखे झाले आहे. तुझ्या अंतरी अजूनही षडरिपु पशु बनून राहिलेले आहेत त्यांना दूर कर. अखंड श्रीराम नाम घे आणि मुक्त होऊन जा.”

पुजारी गहिवरून आला आणि त्याने वरती पहिले तर तिथे कोणीच नव्हते. त्याने इकडे तिकडे बरेच शोधाशोध केली पण ती दिव्य विभूती त्याला काही भेटली नाही. पण आता तो अंतर्बाह्य शुद्ध झाला होता. इतके दिवस पोटभऱ्या पुजारी म्हणून तो रामाची सेवा करीत होता पण यापुढे तो श्रीरामचरणी मुक्ततेचा आनंद लुटणार होता.

गोपाळ मुकींद बुटी यांचा वाडा, नागपुर

शेगांवचे श्री गजानन महाराज येथे वास्तव्यास होते. हरी पाटील त्यांना येथुन पुन्हा शेगांवला घेऊन जाण्यासाठी आले होते. तेंव्हा महाराज पाटील यांच्या समवेत शेगांवला गेले. मात्र बुटी यांच्या पत्निला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद, आणि बुटी यांना तुझ्या कुटुंबाला कधिही काही कमी पडणार नाही, असा आशीर्वाद देऊन गजानन महाराज शेगांवला गेले. श्री गजानन विजय ग्रंथात पोथीत हा उल्लेख आहे. शंभर वर्षापुर्वीचा वाडा आता पुर्वी सारखा कसा असेल. वाड्याच्या निम्म्या भागात बुटी यांच्या वंशजांनी नव्याने बांधकाम केले आहे. वाड्यात पुर्वी दवाखाना होता. आता वयस्कर आजी राहतात. असे आजुबाजुच्या नागरीकांनी सांगितले. वाड्यात प्रवेश केला आणि भव्य सभामंडप दृष्टीस पडला. महाराजांच्या काळची आठवण देणारा हा प्रासादिक वाडा आहे.

संत गजानन महाराजांची दुर्मीळ चिलीम आकोटात – Rare Chillim of Sant Gajanan Maharaj

शेगाव येथील श्रीसंत गजानन महाराज यांनी विस्तवाविना पेटवून दाखवल्याचे सांगितले जाणारी दुर्मीळ चिलीम आकोट येथील यात्रा चौकातील रहिवासी नंदकिशोर वडाळकर यांनी श्रद्धापूर्वक जपून ठेवल्याची माहिती मिळाली आहे. संत गजानन महाराज हे सन १९०९ मध्ये आकोट तालुक्यातील मुंडगाव येथे झ्यामसिंह राजपूत यांच्या घरी थांबले होते. तेव्हा महाराजांच्या सेवेत तल्लीन झालेल्या सेवेकरी भक्त विष्णुपंत गोविंद पाठक (मुंडगाव) यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन महाराजांनी प्रसादाच्या रूपात आपली चिलीम भेट दिली, असे ग्रंथात म्हटले आहे. ही चिलीम पाठक यांनी आपला देह सोडण्यापूर्वी आपले विश्‍वासू सहकारी त्र्यंबकराव वडाळकर यांना देखभाल करण्यासाठी भेटस्वरूपात १९७८ मध्ये सोपविली होती. ही चिलीम साडेसहा इंच लांब असून त्यावर अष्टधातूचे वेष्टण आहे. बारीक रंगीत तारेचे सुंदर नक्षीकामसुद्धा केले असल्याचे चिलीम सांभाळणारे नंदकिशोर वडाळकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. त्यांच्या घरामध्ये ही चिलीम तसेच त्यावेळी मुंडगाव गजानन महाराजांचे सेवेकरी असल्याचा चांदीचा बिल्ला तसेच त्र्यंबकराव वडाळकर यांची आई कृष्णामाई यांनी श्रींना चरणस्पर्श करून घेतलेल्या चांदीच्या लहान पादुका एका काचेच्या पेटीमध्ये जतन करून ठेवल्या आहेत. विशेष म्हणजे या चिलीमचा फोटोसह संदर्भ ‘दास भार्गव’ यांनी श्री गजानन महाराज चरित्रकोशामध्ये संशोधन व लेखन करताना ही चिलीम त्र्यंबकराव वडाळकर यांच्याकडे असल्याचा पान क्र. १५ वर उल्लेख केला असल्याची माहिती देण्यात आली. श्रींची दुर्मीळ चिलीम घरात आल्याने वडाळकर कुटुंबाने ती जीवापाड जपली आहे. दर गुरुवारी या चिलीमची पूजाअर्चा, अभिषेक करण्यात येतो.

श्री संत गजानन महाराज लीला (श्री गजानन विजय ग्रंथाच्या आधारे) – Shri Sant Gajanan Maharaj Leela

१) बार्शीटाकळी येथील श्री गोविंद महाराज टाकळीकर हे शेगांवातील मोटे यांच्या श्री महादेवाच्या मंदिरात कीर्तन करीत असताना त्यांना श्री गजानन महाराज हे सिध्दपुरुष आहेत हे जाणवले.
महाराजांनी टाकळीकरांच्या बेफाम घोड्याला शांत केले.
२) कीर्तन सुरू होण्याआधी बंकटलाल आणि पितांबरने ‘श्री’ ना झुणका भाकर आणून दिली. त्या नंतर ‘श्रीं च्या आज्ञेवरून पितांबराने नाल्यात तुंबाबुडवून त्यांच्यासाठी पाणी आणले. आणि आश्चर्य म्हणजे तुंब्यातील पाणी स्वच्छ झाले होते.
३) बंकटलालांना ‘श्रीं’ च्या बद्दल आत्मीयता, आदर वाटल्याने त्यांनी ‘श्रीं’ ना त्यांच्या घरी नेऊन आंघोळ घालून त्यांची पूजा केली. पुढे बंकटलालचे चुलत भाऊ इच्छाराम हे सुद्धा श्री गजानन महाराजांचे परम भक्त झाले. त्यांनीसुद्धा ‘श्रीं’ ना आपल्या घरी नेऊन त्यांची यथाशक्ती पूजा केली.
४) एकदा श्री गजानन महाराजांना पहाटे चिलीम पेटवण्यासाठी विस्तव हवा होता. त्यांनी जानकीराम सोनाराकडे विस्तवाची मागणी केल्यावर सोनाराने मुलांना नकार दिला. तेव्हा श्री महाराजांनी विस्तवाविना चिलीम पेटवली.
५) अक्षय तृतीयेच्या दिवशी जानकीरामच्या घरी आलेल्या अतिथींच्या पानात वाढलेल्या चिचवणीत अळ्या आढळल्याने सर्व अतिथी पानावरून उठून गेले.
श्री गजानन महाराजांस चिलीम ओढण्यासाठी विस्तव न दिल्याने ही घटना घडली हे जाणून जानकीरामने आपली चूक कबूल केली व महाराजांची क्षमा मागितली व तत्क्षणी चिचवणीतील अळ्या नाहीशा झाल्या.
अशा प्रकारे श्री गजानन महाराजांच्या लिलांचा अनुभव अनेकांना आला.
७) अकोली, अडगांव जवळ कोरड्या विहिरीत जलाशय निर्माण करून भास्कर पाटील आणि गावकऱ्यांना महाराजांनी थक्क केले.
८) बंकटलालने कणसे खाण्यासाठी महाराजांना आणि काही गावकऱ्यांना मळ्यात नेले असताना कणसे भाजण्यासाठी आग पेटविल्यामुळे मधमाशा पोळयातून बाहेर पडल्याने सगळ्यांनी धूम ठोकली. मात्र महाराज शांतपणे त्याच जागी बसले. शरीराला यत्किंचितही इजा झाली नाही.
९) श्री. हरी पाटलांसारख्या श्रेष्ठ कुस्तीगिराच्या शक्तीचे महाराजांनी गर्वहरण केले.
१०) मारुती मंदिरात पाटलाच्या मुलांनी पाठीवर उसाचा मार दिला असता महाराजांनी हातानी रस काढला आणि सर्वांना प्यायला दिला.
११) महाराजांच्या आशीर्वादाने अनेक वर्षे संतती नसणाऱ्या खंडू पाटलाला पुत्ररत्न प्राप्त झाले.
१२) जानरावाचा आजार महाराजांचे तीर्थ ग्रहण करून बरा झाला तर कारंजाच्या लक्ष्मण घुडेंनी महाराजांनी दिलेला आंबा खाल्यावर त्यांची व्याधी दूर झाली.
१३) प्लेगची साथ आली असताना प्लेगची लागण झालेल्या पुंडलीक भोकरेच्या काखेत महाराजांनी आपला अंगठा लावताच आरोग्यात सुधारणा व्हायला लागली आणि पुंडलीक दोन दिवसात बरे झाले.
१४) पुंडलीक भोकरे सारख्या निस्सिम सेवक भक्ताला आपल्या पादुका दिल्या.
१५) बाळापूरला समर्थ रामदासी परम भक्त बाळकृष्ण आणि पुतळाबाईना श्रींनी समर्थांच्या स्वरूपात दर्शन दिले.
१६) अमरावतीच्या गणेशआप्पा नावाच्या गरीब भक्तास महाराजांनी त्याच्या घरी जाऊन त्याला भेट दिली.
१७) पंढरपूरला बापुना काळेंना आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठलाचे रूप धारण करून दर्शन घडवले.
१८) सोमवती अमावस्येच्या दिवशी काही भक्तांसमवेत श्री महाराज नर्मदास्नानासाठी व ओंकारेश्वर दर्शनासाठी गेले होते. नर्मदेच्या जलप्रवासात नावेत पाणी शिरले. तेव्हा महाराजांच्या कृपेने नर्मदेने एका कोळिणीचे रूप धारण करून नाव काठास लावली व त्यांना वाचविले.
१९) बंडू तात्याला गुप्त धनाची वर्दी देऊन त्याला आत्महत्या करण्यापासून परावृत्त केले.
२०) श्रींनी सुकलालच्या व्दाड गाईला शांत केले,
२१) ब्रह्मगिरी पंडित आपले ज्ञान पाजळायला लागल्यावर पेटलेल्या पलंगावर बसून महाराजांनी गोसाव्यास त्याच पलंगावर बसायला सांगितले. भयभीत झालेल्या ब्रह्मगिरीचे गर्वहरण झाले.
२२) शिवजयंतीच्या प्रीत्यर्थ भरवलेल्या सभेत लोकमान्य टिळक आणि श्री गजानन महाराज एकत्र आले. त्या सभेत महाराजांनी असे भाकीत वर्तवले की लोकमान्यांना कारावास भोगावा लागेल आणि प्रत्यक्षात खरंच लोकमान्यांना मंडालेच्या तुरूंगात जावे लागले. तेथे ‘गितारहस्य‘ हा ग्रंथ लिहिला गेला.

या सर्व घटनाव्यतिरीक्त कुष्ठरोग बरा होणे, भाकरी प्रसादाने महान कामगिरी होणे. स्त्रियांच्या डब्यातून रेल्वेप्रवास करणे, मृत कुत्रा जिवंत होणे या लिलांव्दारे महाराजांची थोरवी सर्वांना जाणवत होती.
(अधिकृत श्री गजानन विजय ग्रंथाच्या आधारे)

श्री गजानन महाराजांची समाधी प्रसंग (अशी घेतली श्रीं नी शेगावी समाधी) – Shree Gajanan Maharaj’s Samadhi

श्री संत गजानन महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी ऋषिपंचमीच्या दिवशी शेगांवी समाधी घेतली. समाधी घेण्याच्या २ वर्षा आधीच महाराजांनी आपल्या समाधीची जागा, आपले लाडके भक्त हरी पाटील यांना बोटाने दाखवून म्हटले होते. ‘हरी इथै राहिन रे मी!’ ज्या जागेचा महाराजांनी निर्देश केला होता ती गाढव मळ्यांची जागा होती व त्या ठिकाणी हरी पाटलांनी एक काळा दगड गाडून ठेवला होता. त्याच जागेवर आज महाराजांची समाधी आहे.

इ.स. १९१० च्या आषाढी एकादशीच्या यात्रेला श्री. हरी पाटील, बाळाभाऊ , बापूना काळे, जगू आबा आणि इतर भक्तांसोबत पंढरपूरला जाण्यास निघाले. गोमाजी महाराजांचे दर्शन घेऊन नागझरीवरुन आगगाडीने पंढरपुरात आले व कुकाजी पाटलाच्या वाड्यात श्री सोबत उतरले. आषाढी नवमी दिवस होता. ‘जय जय रामकृष्ण हरी’ भजनाने सर्व पंढरपूरचा परिसर दुमदुमून गेला होता. तुळशी फुलांचा व बुक्क्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. सर्व दिंड्या पंढरीरायासं प्रदक्षिणेच्या आनंदात तल्लीन झाल्या होत्या. अशा वातावरणात श्रीसोबत आलेले भक्तगण पांडूरंगाचे दर्शन घेऊन शेगावला श्रीसोबत परत आले. तेव्हा श्री आजारीच होते. श्रावण महिन्याच्या शेवटी श्रींची प्रकृती आणखीनच बिघडली. श्रींची प्रकृती जास्तच बिघडत आहे, हे माहीत होताच डॉ. कवर आठ दिवसांची रजा घेऊन शेगांवला आले व उपचार करु लागले. ५ सप्टेंबर १९१० ला श्रींच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. हे बघून डॉ. कंवर यांनी श्रींना वर्धेस जाण्याची परवानगी मागितली. श्रींनी ती दिली. डॉ. कवर इकड़े वर्धेस जाण्यास निघाले आणि तिकडे श्रींना पुन्हा ताप चढला. तो इतका वाढला की, ६ सप्टेंबरला श्री बेशुद्ध झाले. त्यानंतर संध्याकाळी श्री शुद्धीवर आले. श्री शुद्धीवर आले म्हणून सर्व भक्तांना आनंद झाला. दीड महिन्याच्या आजाराने श्रीं चे शरीर फार क्षीण झाले होते.

७ सप्टेंबरला गणेश चतुर्थी होती. त्या दिवशी संध्याकाळच्या आरतीसाठी , हरी पाटील, बंकटलाल अग्रवाल, रामचंद्र कृष्णाजी पाटील, बापूना काळे, रामदेव सुखदेव मोदी आदी भाविक मंडळी जमली होती. आरतीला वेळ असल्यामुळे सर्व मंडळी श्रीसमोर जाऊन बसली. त्याच ठिकाणी बाळाभाऊ आले व अशृपूर्ण नयनांनी सर्वांना सांगू लागले की, काल रात्री मला जाग आली व मी जामकरांना जागे केले व म्हणालो की, श्री करुणामय आवाजात स्वगत काहीतरी बोलत आहेत ते आपण गुपचूप ऐकू. मग आम्ही दोघेही श्रींचे शब्द कान देऊन ऐकू लागलो. श्री म्हणत होते.’हे पांडूरंगा विठ्ठला, माझे अवतार कार्य संपले, म्हणून हे दयाधना विठ्ठला मला जाण्याचा हुकूम द्या. माझी अशी इच्छा आहे की, भाद्रपद महिन्याच्या ऋषिपंचमीच्या दिवशी सुर्योदयानंतर वैकुंठधामी आपणाजवळ यावे. ‘ असे श्रींच्या समाधीसंबंधीचे बोलणे बाळाभाऊंनी हरी पाटील आणि उपस्थितांना सांगितले. लगेच दुसऱ्या दिवशी ऋषिपंचमी होता. त्यामुळे श्री उद्या आपल्यातून जाणार म्हणून सर्व भक्त दुःखाने व्याकूळ झाले होते. हे बाळाभाऊंचे बोलणे ऐकून हरी पाटलांनी श्रींना विचारले की, बाळाभाऊ सांगतो आहे हे खरे आहे काय ? त्यावर श्री हरी पाटलास म्हणाले की, जेव्हा मी तुझ्यासोबत पंढरपूरला आलो होतो तेव्हापासून माझे मन व ध्यान पांडूरंगाच्या चरणी लीन झाले व मी पांडूरंगाशेजारी पंढरपूरलाच देह ठेवण्याचा निश्चय केला होता. परंतू पांडुरंगास हे रुचले नाही. म्हणून मी शेगांवला परत आलो. श्री सर्व भक्तांना म्हणाले, तुम्ही शेगांवास पुण्यक्षेत्र समजा. माझ्यावर पूर्वीसारख्याच श्रद्धेने’ भाव ठेवा. तुम्हास काहीच कमी पडणार नाही. आता सर्वजण आरती करा. “दुःखद वातावरणात कशीतरी संध्याकाळची आरती आटोपली. मग सर्वांचे सात्वंन करीत श्री म्हणाले ‘उद्या सकाळी मी निजधामी जात आहे म्हणून यत्किंचितही दुःख करु नका, मी येथेच आहे असे समजा. आता रात्र झाली आहे. सर्वजण आपापल्या घरी जा व उद्या सकाळी येथे या.

महाराजांच्या तोंडून वारंवार समाधीची भाषा ऐकून उपस्थित भक्त मंडळी दुःखाने व्याकूळ झाली होती. काही भक्त मंडळी समर्थांना साष्टांग नमस्कार करुन रात्री घरी परत गेली. तर बाळाभाऊ, नारायण माहराज, पुंडलिक भोकरे, बायजाबाई, रामप्रसाद जामकर अशी ही पाच भक्तमंडळी गणेश चतुर्थीच्या रात्रीपासून तर षष्ठीच्या दिवशी, समाधी घेण्याच्या वेळेपर्यंत, श्रीजवळच बसून होती.

शेगांवचे गजानन महाराज उद्या सकाळी समाधी घेणार, ही वार्ता, शेगांव आणि आजूबाजूच्या खेड्यात वाऱ्यासारखी पसरली. डॉ. कवर, श्रीमंत दादासाहेब खापर्डे, गोपाळराव बुटीसारख्या भक्तांना तारा करून सांगण्यात आले. कोणी मोटारने, कोणी रेल्वेने तर कोणी बैलबंडीने, तर कोणी पायीच शेगावला पोहोचू लागले. रेल्वेत तर पाय ठेवण्यास जागा नव्हती. इंग्रजांनी लोकहितास्तव खामगांव ते शेगावं हा रेल्वेचा प्रवास विनातिकिट केला होता तसेच शहरातील व आजूबाजूच्या परिसरातील शाळा, कॉलेज, दुकाने व सर्व व्यवहार बंद होते. त्या दिवशी कोणीही शेतकरी किंवा मजूर शेतात काम करण्यास गेला नव्हता. रात्रीपासूनच मंदीर परिसरात भक्ताची गर्दी वाढू लागली. पहाटे वाद्यांचा गजर सुरू झाला. श्रींनी सुचविलेल्या व हरी पाटलांनी दगड गाडून ठेवलेल्या जागी अगोदरच समाधीसाठी एक चौकोनी खड्डा तयार करण्यात आला होता. त्याच्या शेजारी जाड काळसर मिठाने भरलेल्या बैलगाड्या ठेवल्या होत्या व बाजूलाच रिकाम्या द्रोणाच्या थप्पा ठेवल्या होत्या. जेणेकरुन प्रत्येक भाविकास श्रींचे दर्शन घेताना एक द्रोण मीठ भरुन श्रींच्या समाधिस्थानी अर्पण करता येईल.

८ सप्टेंबर १९१० गुरुवार, ऋषिपंचमीचा दिवस उजाडला. जागा स्वच्छ करून धुवून काढण्यात आली. श्रीचे दर्शन सर्वांना व्हावे म्हणून श्रींना उच्चासनावर बसविण्यात आले. सकाळी ७ नंतर तर लोकांची गर्दी इतकी वाढली की, उंचासनावर विराजमान श्री अनेकांना गर्दीमुळे दिसेनासे झाले. श्रींच्या समाधीचे हे दृश्य पाहून मंदिराचा परिसर करुणामय झाला होता. आरती घेऊन आलेल्या स्त्रियांना गर्दीमुळे दुरूनच आरती करावी लागली.थोड्याच वेळात टाळ मृदूंगाचा ध्वनी आसमंतात घुमू लागला.

काही क्षण श्रींनी भक्तांकडे डोळे भरून पाहिले आणि मुखाने हरीनामाचा उच्चार करून श्री सच्चिदानंदी लीन झाले. मंदिर परीसरात आक्रोशाचा एकच कल्लोळ उठला. त्यावेळी सकाळचे आठ वाजले होते. शेगांवला पंढरपूर चे रूप आले होते. देवस्थान नोंदीनुसार एकूण ७४ भजन मंडळी शेगावी आली होती. जास्तीत जास्त भक्तांना श्रीं चे दर्शन घेता यावे म्हणून भक्तांनी श्रींना दुसऱ्या दिवशी षष्ठीस समाधी देण्याचा निर्णय घेतला व पंचमीच्या रात्री संपूर्ण शेगावातून श्रींची मिरवणूक काढण्याचे ठरले. मिरवणूकीसाठी एक उंच रथ फुलांनी सजविण्यात आला. मिरवणुकीच्या मार्गावर स्त्रियांनी सडे व रांगोळ्या काढल्या होत्या. रस्त्यावर दिव्यांची रोशनाई करण्यात आली होती. श्रींचे कलेवर बैठया स्थितीत उंचावर ठेवण्यात आले. भजनी दिंड्यांच्या गजरात श्रींची मिरवणूक सुरू झाली. दीड लाखांच्या वर भक्त शोकग्रस्त अवस्थेत मिरवणुकीसोबत चालत होते.

पंचमीच्या रात्री सुरु झालेली श्रीची मिरवणूक षष्ठीच्या सकाळी मंदिर परिसरात पोहोचली. श्रींना रथातून उतरवून बंगईत बसवून भक्तांनी न्हाऊ घातले. त्यानंतर समाधीकरीता ज्या ठिकाणी चौरस खड्डा करण्यात आला होता त्या ठिकाणी श्रींचे कलेवर ठेवून रुद्राभिषेक करण्यात येऊन आरती करण्यात आली आणि प्रत्येक भाविकाला जवळून श्रीच्या दर्शनाची संधी देण्यात आली. त्यावेळी प्रत्येकजण बैलबडीतील एक द्रोण मीठ घेऊन श्रींच्या समाधीस्थानाच्या खाली जागेत अर्पण करून नमस्कार करून दुःखी अंतकरणाने जात होता. अशाप्रकारे श्रींचे समाधिस्थान मिठाने भरण्यात आले व श्री गजानन महराज की जय च्या गगनभेदी आवाजात श्रींच्या समाधिस्थानावर शिळा ठेवण्यात आली.

अशाप्रकारे श्री प्रभुरामचंद्रांच्या चरणी संजीवनी समाधी अवस्थेत लीन झाले. ज्यावेळी श्रींना समाधी देण्यात आली त्यावेळी लोकांचा जनसमुदाय अडीच लाखापर्यंत होता. तर त्या दिवशी जो भंडारा झाला त्यावेळी १७४ पोते गहू लागला होता. अशी शेगावं देवस्थानात नोंद आहे. रामचंद्र कृष्णाजी पाटलाचे नातू सांगत की, श्रींनी समाधी घेतल्यापासून दीड वर्षांनी हरी पाटलास श्रींच्या दर्शनाची अनावर इच्छा झाली ती इच्छा इतकी तीव्र होती की, त्यांनी समाधीवरील शिळा बाजूला करून श्रींचे दर्शन घेतलेच. समाधीच्या वेळी श्री जसे बसले होते तसेच हरी पाटलांना दिसले, कारण संजीवनी समाधीच होती ती!

श्री संस्थेचा इतिहास (श्री गजानन महाराज संस्थानची स्थापना) – History of Sri Sansthan (Establishment of Sri Gajanan Maharaj Sansthan)

सदरहू माहिती संस्थेच्या मूळ कागदपत्रांवरून देत आहोत. श्रींचे स्मारक व्हावे म्हणून १२/०९/१९०८ रोजी १२ विश्वस्तांची विश्वस्त संस्था एकमताने श्रींच्या समक्षच स्थापन झाली. या संस्थेचे विशेष म्हणजे “श्री” हयात असताना सन १९०८ मध्येच, हे संस्थान स्थापन झाले, कारण श्रींनी ज्या जागी सध्या श्रींची समाधी आहे त्या जागेचा निर्देश करून “या जागी राहील रे” असे सांगून आपला समाधिदिवस सुद्धा सांगितला होता. श्रींचे समक्ष श्री गजानन महाराजांचे संस्थानातील व्यवस्था करण्याबद्.दल श्रींच्या परमभक्तांव्दारा शेगांव येथील कै. नारायण कडताजी पाटील, यांच्या अडत दुकानावर श्रींचे भक्त, गावकरी व व्यापारी याची एक संयुक्त सभा ‘श्रीं’ च्या निर्देशानूसार संवत १८८५ आश्विन शु.१ दि.१२/०४/१९०९ रोजी आयोजित करण्यात आलेली होती व संस्थेचे पहिले कार्यकारी मंडळ स्थापन झाले. वाडेगांव-बाळापूर परिसरामधून काळा दगड आणून अत्यंत कलाकुसर पूर्ण मंदिराची निर्मिती शिल्पकार- कै. किसन मिस्त्री व कै. खंडू मिस्त्री, नागपूर यांनी केली. समाधी शताब्दी महोत्सवानिमित्त संगमरवरी पाषाणांत मंदिराचे नूतनीकरण व रुंदिकरण करण्यात आले.

२१ दुर्वांकुर (श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र) (21 Durvankur)

शेगांव ग्रामीं वसले गजानन । स्मरणें तयांच्या हरतील विघ्न ।
म्हणुनी स्मरा अंतरी सद्गुरुला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१॥
येऊनी तेथे अकस्मात मूर्ति । करी भाविकांच्या मनाचीच पूर्ती ।
उच्छिष्ट पात्राप्रती सेवियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२॥
उन्हा तहानेची नसे त्यास खंत । दावियलें सत्य असेचि संत ।
पाहूनी त्या चकित बंकटलाल झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥३॥
घेऊनी गेला आपुल्या गृहासी । मनोभावे तो करी पूजनासी ।
कृपाप्रसादे बहु लाभ झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥४॥
मरणोन्मुखीं तो असे जानराव । तयांच्या मुळे लाभला त्यास जीव ।
पदतीर्थ घेता पूनर्जन्म झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥५॥
पहा शुष्कवापी भरली जलाने । चिलिम पेटविली तये अग्निविणें ।
चिंचवणें नाशिले करीं अमृताला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥६॥
ब्रह्म गिरीला असे गर्व मोठा । करि तो प्रचारा अर्थ लावूनि खोटा ।
क्षणार्धा त्याचा परिहार केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥७॥
बागेतली जाती खाण्यास कणसं । धुरामुळे करिती मक्षिका त्यास दंश ।
योगबळे काढिलें कंटकाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥८॥
भक्ताप्रती प्रिती असे अपार । धावुनी जाती तया देती धीर ।
पुंडलिकाचा ज्वर तो निमाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥९॥
बुडताच नौका नर्मदेच्या जलांत । धावा करिती तुमचाचि भक्त ।
स्त्री वेष घेऊनी तिने धीर दिला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१०॥
संसार त्यागियला बायजाने । गजानना सन्निध वाही जिणे ।
सदा स्मरे ती गुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥११॥
पितांबरा करी भरी उदकांत तुंबा । पाणि नसे भरविण्यास नाल्यास तुंबा ।
गुरुकृपेने तो तुंबा बुडाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१२॥
हरितपर्ण फुटले शुष्क आम्रवृक्षा । पितांबराची घेत गुरु परीक्षा ।
गुरुकृपा लाभली पितांबराला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१३॥
चिलीम पाजावी म्हणून श्रीसी । इच्छा मनी जाहली भिक्षुकासी ।
हेतू तयाचा अंतरी जाणियेला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१४॥
बाळकृष्न घरी त्या बालापुरासी । समर्थरुपे दिले दर्शनासी ।
सज्जनगडाहूनी धावुनी आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१५॥
नैवेद्य पक्वान्न बहु आणियेले । कांदा भाकरीसी तुम्ही प्रिय केले ।
कंवरासी पाहुनी आनंद झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१६॥
गाडी तुम्ही थांबविली दयाळा । गार्डप्रति दावियेली हो लिला ।
शरणांगती घेऊनी तोही आला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१७॥
जाति धर्म नाही तुम्ही पाळियेला । फकिरा सवे हो तुम्ही जेवियेला ।
दावूनी ऐसे जना बोध केला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१८॥
अग्रवालास सांगे म्हणे राममूर्ति । अकोल्यास स्थापुनी करी दिव्यकीर्ती ।
सांगता क्षणीं तो पहा मानिएला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥१९॥
करंजपुरीचा असे विप्र एक । उदरी तयाच्या असे हो की दु:ख ।
दु:खातुनी तो पहा मुक्त झाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२०॥
दुर्वांकुरा वाहुनी एकवीस । नमस्काररुपी श्रीगजाननास ।
सख्यादास वाही श्रीगुरुच्या पदाला । नमस्कार माझा श्रीगजाननाला ॥२१॥

गजानन बावनी (Gajanan Bavanni)

जय जय सदगुरू गजानना | रक्षक तूची भक्तजना ||१|| निर्गुण तू परमात्मा तू | सगुण रुपात गजानन तू ||२|| सदेह तू, परी विदेह तू | देह असून देहातीत तू ||३|| माघा वैद्य सप्तमी दिनी | शेगावात प्रगटोनी ||४|| उष्ट्या पत्रावालीनिमित्त | विदेह्त्व तव हो प्रगट ||५|| बंकट लालावारी तुझी | कृपा जाहली ती साची ||६|| गोसाव्याच्या नवसासाठी | गांजा घेसी लावून ओठी ||७|| तव पद तीर्थे वाचविला | जानराव तो भक्त भला ||८|| जानाकीरामा चिंच वणे | नासावोनी स्वरूपी आणणे ||९|| मुकीन चंदूचे कानवले | खाउन कृतार्थ त्या केले ||१०|| विहिरी माजी जलविहीना | केले देवा जल भरणा ||११|| मध माश्यांचे डंख तुवा | सहन सुखे केले देवा ||१२|| त्यांचे काटे योगबले | काढुनी सहजी दाखविले ||१३|| कुस्ती हरीशी खेळोनि | शक्ती दर्शन घडवोनी ||१४|| वेद म्हणुनी दाखविला | चकित द्रविड ब्राह्मण झाला ||१५|| जळत्या पर्याकावरती | ब्रह्म्हगीरीला ये प्रचीती ||१६|| टाकळीकर हरिदासाचा | अश्व शांत केला साचा ||१७|| बाळकृष्ण बाळापुराचा | समर्थ भक्ताची जो होता ||१८|| रामदास रूपे तुला | दर्शन देवोनी तोषविला ||१९|| सुकुलालाची गोमाता | द्वाड बहु होती ताता ||२०|| कृपा तुझी होताच क्षणी | शांत जाहली ती जननी ||२१|| घुडे लक्ष्मण शेगावी | येता व्याधी तू निरवी ||२२|| दांभिकता परी ती त्याची | तू न चालवोनी घे साची ||२३|| भास्कर पाटील तव भक्त | उद्धरलासी तू त्वरित ||२४|| आज्ञा तव शिरसावंद्य | काकाही मानती तुज वंद्य ||२५|| विहिरीमाजी रक्षियला | देवा तू गणू जवरयाला ||२६|| पिताम्बराकार्वी लीला | वठला आंबा पल्लवीला ||२७|| सुबुद्धी देशी जोश्याला | माफ करी तो दंडाला ||२८|| सवडत येशील गंगाभारती | थुंकून वारिली रक्तपिती ||२९|| पुंडलिकाचे गंडांतर | निष्टा जाणून केले दूर ||३०|| ओंकारेश्वरी फुटली नौका | तारी नर्मदा क्षणात एका ||३१|| माधवनाथा समवेत | केले भोजन अदृष्ट ||३२|| लोकमान्य त्या टिळकांना | प्रसाद तूची पाठविला ||३३|| कवर सुताची कांदा भाकर | भक्शिलास तू त्या प्रेमाखातर ||३४|| नग्न बैसोनी गाडीत | लीला दाविली विपरीत ||३५|| बायजे चित्ती तव भक्ती | पुंडलीकावारी विरक्त प्रीती ||३६|| बापुना मनी विठल भक्ती | स्वये होशी तू विठ्ठल मूर्ती ||३७|| कवठ्याच्या त्या वारकऱ्याला | मरीपासुनी वाचविला ||३८|| वासुदेव यती तुज भेटे | प्रेमाची ती खुण पटे ||३९|| उद्धट झाला हवालदार | भस्मीभूत झाले घरदार ||४०|| देहान्ताच्या नंतरही | कितीजना अनुभव येई ||४१|| पडत्या मजूर झेलीयेले | बघती जन आश्चर्य भले ||४२|| अंगावरती खांब पडे | स्त्री वांचे आश्चर्य घडे ||४३|| गजाननाच्या अद्भुत लीला | अनुभव येती आज मितीला ||४४|| शरण जाऊनी गजानना | दुक्ख तयाते करी कथना ||४५|| कृपा करी तो भक्तांसी | धावून येतो वेगेसी ||४६|| गजाननाची बावन्नी | नित्य असावी ध्यानी मनी ||४७|| बावन्न गुरुवार नेमे | करी पाठ बहु भक्तीने ||४८|| विघ्ने सारी पळती दूर | सर्व सुखांचा येई पूर ||४९|| चिंता सारया दूर करी | संकटातूनी पार करी ||५०|| सदाचार रत साद भक्ता | फळ लाभे बघता बघता ||५१|| सुरेश बोले जय बोला | गजाननाची जय बोला || जय बोला हो जय बोला | गजाननाची जय बोला ||५२||

Related Post

संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज देहू (Sant Tukaram Maharaj Dehu)

विठ्ठल भक्तीची अनोखी गाथा संत सखूबाई | Sant Sakhubai |

संत रामदास स्वामी यांच्या जीवन यात्रेचा प्रवास कसा होता ?

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )