झेंडू । झेंडू पिकासाठी हवामान । झेंडू च्या जाती । झेंडू पिकाचा शेंडा खुडणे । झेंडू पिकाची लागवड पद्धत । झेंडू पिकाचे पाणी नियोजन । झेंडू पिकाचे खत व्यवस्थापन । झेंडू पिकाचे किडीपासून संरक्षण कसे करावे आणि झेंडू पिकाचे बुरशीपासून संरक्षण कसे करावे । झेंडू च्या फुलांची काढणी ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
झेंडू
झेंडू हे फक्त राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात महत्वाचे फुलपिक आहे. या फुलांचा उपयोग फुलांच्या हार करणे, पूजेसाठी निरनिराळ्या कार्यक्रमांत साज सजावटी साठी मोठ्या प्रमाणावर केला जातो. याशिवाय निरनिराळया पुष्प रचनेमध्ये, बगीच्यांमध्ये रस्त्यालगत, झेंडूचे पीक राज्यात तिन्ही हंगामात घेतले जाते व त्यास मोठ्या प्रमाणावर मागणी असते. झेंडूचा उपयोग मुख्यत्वे करून सुट्या फुलान्साठीच केला जातो.
झेंडू पिकासाठी हवामान
झेंडू हे मुख्यत्वाने थंड हवामानाचे पिक आहे. थंड हवामानात झेंडूची वाढ व फुलांचा दर्जा चांगला असतो. वातावरणाच्या परिस्थितीनुसार झेंडूची लागवड पावसाळी, हिवाळी व उन्हाळी या तीनही हंगामात केली जाते.
झेंडू च्या जाती
आफ्रिकन झेंडू
आफ्रिकन झेंडूची लागवड फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यापूर्वी केल्यास उत्पादनावर आणि फुलांच्या दर्जावर चांगला परिणाम होतो. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून १५ दिवसाच्या अंतराने लागवड केल्यास ऑक्टोबर ते एप्रिल या कालावधीत भरपूर व दर्जेदार उत्पादन मिळते. परंतु सर्वात जास्त उत्पादन सप्टेंबर मध्ये लागवड केलेल्या झेंडूपासून मिळते.झेंडू या पिकांस भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक आहे. सावलीमध्ये झाडांची वाढ चांगली होते परंतु फुले येत नाहीत.
या प्रकारची झेन्दुंची झुडुपे उंच वाढतात. झुडूप काटक असते. पावसाळी हवामानात झुडुपे १०० ते १५० से. मी. पर्यंत उंच वाढतात. फुलांचा रंग पिवळा, फिकट पिवळा, नारंगी असतो. या प्रकारांमध्ये पुढीलप्रमाणे जातींचा समावेश होतो. जायंट डबल, आफ्रिकन यलो, ऑरेंज, अर्ली यलो, अर्ली ऑरेंज, गियाना गोल्ड, क्रॅकर जॅक, ऑरेंज ट्रेझंट, बंगलोर लोकल, दिशी सनशाईन, आफ्रिकन टॉल डबल, मिक्स्ड, यलो सुप्रीम, हवाई, स्पॅन गोल्ड, अलास्का, इत्यादी
फ्रेंच झेंडू
या प्रकारातील झेन्डूंची झुडुपे उंचीला कमी असतात व झुडुपासारखी वाढतात. झुडुपांची उन्ह्ची ३० ते ४० से. मी. असते. फुलांचा आकार लहान मध्यम असून अनेक रंगाची फुले असतात. या प्रकारातील फुलांचा वापर गालीचा तयार करण्यासाठी, हिरवळीच्या कडा सुशोभीकरणासाठी लावतात. या प्रकारामध्ये पुढीलप्रमाणे जातींचा समावेश होतो. यलो बॉय, हार्मोनी बॉय, लिटल डेव्हिल, बायकलर, बटर स्कॉच, स्प्रे, लेमन ड्वार्फ यलो, रेड मारिटा, हार्मोनी, रॉयल बेंगाल, क्विन, सोफिया, इत्यादी.
संकरित झेंडू :
उंच संकरित : झाडे ६० ते ७० सें.मी. उंच असतात. मोठी फुले असतात.
सेमी टॉल : या प्रकारात दाट व सारख्या आकाराची ५० सें.मी. उंचीपर्यंत वाढणारी झाडे आढळतात. फुले लिंबू तसेच फिक्कट नारंगी रंगाची असतात.
ड्वार्फ मध्यम संकरित : या प्रकारात दाट वाढणारी, एकाचवेळी फुले देणारी, कमी उंचीची झाडे (१४ ते ५० सें.मी.) असतात.
पुसा नारंगी, (क्रॅकर जॅक जर गोल्डन जुबिली) : या जातीस लागवडीनंतर १२३-१३६ दिवसानंतर फुले येतात. झुडुप ७३ से. मी. उंच वाढते व वाढ देखील जोमदार असते. फुले नारंगी रंगाची व ७ ते ८ से. मी. व्यासाची असतात.
पुसा बसंती (गोल्डन यलो जरसन जायंट) : या जातीस १३५ ते १४५ दिवसात फुले येतात. झुडुप ५९ से. मी. ऊंच व जोमदार वाढते. फुले पिवळ्या रंगाची असून ६ ते ९ से. मी. व्यासाची असतात. प्रत्येक झुडुप सरासरी ५८ फुले देते.
एम. डी. यू.१ : झुडुपे मध्यम उंचीची असतात. ऊंची ६५ से. मी. पर्यत वाढते. या झुडुपास सरासरी ९७ फुले येतात व ४१ ते ४५ मे. टन प्रती हेक्टर याप्रमाणे उत्पादन येते. फुलांचा रंग नारंगी असतो
झेंडू पिकाचा शेंडा खुडणे
आफ्रिकन झेंडू हा उंच वाढणारा झेंडू असून त्याची वाढ नियंत्रित ठेवून जास्तीत जास्त फुटवे येण्याच्या उद्देशाने शेंडा खुडला जातो.शेंडा खुडण्याने उंच सरळ वाढणाऱ्या रोपाची वाढ थांबते, भरपूर बगल फुटी फुटतात, त्यामुळे झाडाला झुडपासारखा आकार येतो.शेंडा खुडण्यास फार वेळ झाला तर अपेक्षित परिणाम मिळत नाही.
झेंडू पिकाची लागवड पद्धत
झेंडूची लागवड करताना ६० से. मी. अंतरावर घेतलेल्या सरीच्या मध्यभागी आणि दोन रोपांमधील अंतर ठेवून लागवड करावी. ६० X ३० से. मी. अंतरावर लागवड केल्यास हेक्टरी ४०,००० रोपे लागतात. लागवड करतांना भरपूर पाण्यामध्ये व सायंकाळी ४ नंतर लागवड करावी. म्हणजे रोपांची मर होत नाही.जमीन नांगरून कुळवून तयार करावी. जमीन तयार करताना प्रति हेक्टरी ४० टन शेणखत मिसळावे.जमिनीच्या आणि हंगामा नुसार सपाट वाफ्यावर व सरी वरब्यांमध्ये लागवड करतात. बी पेरल्यापासून ३० ते ३५ दिवसांत रोपे पुनर्लागवडीसाठी तयार होतात. निरोगी, पाच पानावर आलेली, १८ ते २० सेंमी उंचीची रोपे निवडावीत.लागवडीपूर्वी रोपांची मुळे ३० मिनिटे कॅप्टन ०.२ टक्के प्रमाणातील द्रावणात बुडवून लागवड करावी.
झेंडू पिकाचे खत व्यवस्थापन :
झेंडूच्या आफ्रिकन, फ्रेंच आणि संकरित जाती खताला उत्तम प्रतिसाद देतात.जमिनीची मशागत करताना हेक्टरी ३० टन चांगले कुजलेले शेणखत मातीत मिसळावे. माती परीक्षणानुसार १०० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाश या खताची द्यावी. संपूर्ण स्फुरद, पालाश व अर्धी नत्राची मात्रा रोपांची पुनर्लागवड करताना किंवा पुनर्लागवडीनंतर एका आठवड्यांनी द्यावी. उर्वरित अर्धी नत्राची मात्रा ही रोपांच्या पुनर्लागवडीनंतर ३० ते ४० दिवसांनी द्यावी.
नत्राची मात्रा जास्त झाल्यास पिकाची शाखीय वाढ भरपूर होते. फुलांचे उत्पादन कमी मिळते. दर्जेदार उत्पादनासाठी सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा. ठिबक सिंचनाने विद्राव्य खते वापरावीत.
झेंडू पिकाचे पाणी नियोजन
हंगाम झेंडूचे पीक घेतले असल्यास पावसाचा ताण पडल्यास १-२ वेळा १० ते १५ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. हिवाळी हंगामातील पिकासाठी ८ ते १० दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे व उन्हाळी हंगामासाठी ५ ते ७ दिवसांनी पाणी द्यावे.झेंडू पिकाला कळ्या लागल्यापासून फुलांची काढणी होईपर्यंत पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये.
झेंडू पिकाचे किडीपासून संरक्षण कसे करावे आणि झेंडू पिकाचे बुरशीपासून संरक्षण कसे करावे
झेंडू या पिकावर मावा, तुडतुडे, पांढरी माशी, लाल कोळी, नाग अळी, अळी, कटवर्म या किडींचा व करपा, मर या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी पुढीलपैकी कोणतेही एक किताक्नाषक / बुरशीनाशक फवारावे. फवारणी करतांना प्रत्येक फवारणीमध्ये ५ मी. ली. प्रती १० लिटर पाणी या प्रमाणात स्टिकर्स मिसळावे.
अनु .क्रमांक | कीटकनाशक / बुरशीनाशक | पाण्यातील प्रमाण प्रति १० लिटर | किडी / रोग |
1 ) | डायमेथोएट ३० % प्रवाही मोनोक्रोटोफॉस ३६% प्रवाही | २० मि.ली. | मावा / तुडतुडे / पांढरी माशी |
2 ) | डायकोफॉल १८.५ % ई. सी. (केलथेन) गंधक 80% पाण्यात विरघळणारी पावडर | (डायकोफॉल) २० मिली / ली / (गंधक) १५ ग्रॅम | लाल कोळी |
3 ) | क्लोरोपायरीफॉस २०% प्रवाही होस्टॅथिऑन | १५ मिली २ मिली | नाग अळी |
4 ) | क्विनॉलफॉस २५% प्रवाही पॉलीट्रीन | २० मिली / १५ मिली | अळी |
5 ) | क्लोरोथॅलोनील डायथेनएम-४५ | १५ ग्रॅम / २० ग्रॅम | करपा |
झेंडू च्या फुलांची काढणी :
लागवड केल्यापासून ६० ते ६५ दिवसांत फुले काढणीस तयार होतात. फुले पूर्ण उमलल्यानंतर काढणी करावी. उमललेली फुले देठाजवळ तोडून काढावीत. काढलेली फुले थंड ठिकाणी ठेवावीत, काढणी शक्यतो संध्याकाळी करावी.स्थानिक बाजापेठेसाठी बांबूच्या करंड्या किंवा पोत्यात बांधून फुले पाठवावीत.