जाणून घ्या झेंडू लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Zendu Lagwad Mahiti Zendu Sheti) – Marigold Farming

झेंडू लागवड । Zendu Lagwad | Zendu Sheti | झेंडू लागवडीचे महत्त्व । झेंडू लागवडी खालील क्षेत्र । झेंडू उत्पादन ।झेंडू पिकास योग्य हवामान । झेंडू पिकास योग्य जमीन । झेंडूच्या उन्नत जाती । झेंडूच्या प्रचलित जाती । झेंडू पिकाची अभिवृद्धी । झेंडू पिकाची लागवड पद्धती । झेंडू पिकास लागवड योग्य हंगाम । झेंडू पिकास योग्य लागवडीचे अंतर । झेंडू पिकास वळण । झेंडू छाटणीच्या पद्धती । झेंडू पिकास खत व्यवस्थापन । झेंडू पिकास पाणी व्यवस्थापन । झेंडू पिकातील आंतरपिके । झेंडू पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । झेंडू पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । झेंडूच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । झेंडूच्या फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

अनुक्रम दाखवा

झेंडू लागवड । Zendu Lagwad | Zendu Sheti |

झेंडूचे पीक अनेक प्रकारच्या जमिनींत आणि निरनिराळ्या प्रकारच्या हवामानांत उत्तम प्रकारे घेता येते. दसरा-दिवाळी या सणांच्या काळात झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. झेंडूचे झाड 15 सेंटिमीटर ते 1 मीटर उंचीपर्यंत वाढते. झेंडूचे खोड गोल, ठिसूळ असून त्यावर तंतुमय मुळे असतात. खोडावर अनेक फांद्या व उपफांद्या फुटतात. फांद्यांच्या टोकाला फुले लागतात. झेंडूची फुले अनेक प्रकारची असून त्यांना विविध रंग व आकार असतात. काढणीनंतरही ही फुले चांगली टिकतात.

झेंडू लागवडीचे महत्त्व । Importance of marigold cultivation.

कमी दिवसांत, कमी खर्चात, कमी त्रासात पण खात्रीने फुले देणारे पीक म्हणून झेंडूचा उल्लेख केला जातो. कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीतही हे पीक तग धरून वाढते. झेंडूच्या फुलांत अनेक प्रकार असून रंगांत आणि आकारांतही विविधता आहे. झाडावर तसेच झाडावरून तोडल्यानंतरही झेंडूची फुले चांगली टिकतात. या फुलांना थोडा उग्र स्वरूपाचा वास असतो. झेंडूच्या फुलांना नेहमीच मागणी असते. मात्र दसरा-दिवाळी या सणांच्या काळात झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी असते. उन्हाळ्यात लग्नसराईत इतर फुले दुर्मिळ असताना झेंडूच्या फुलांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. झेंडूच्या फुलांचा उपयोग प्रामुख्याने हारांसाठी आणि फुलदाणीत ठेवण्यासाठी केला जातो. पुणे बाजारपेठेचा अभ्यास केला असता असे दिसून आले आहे की, तेथे वर्षातून सर्वांत जास्त उलाढाल झेंडूची होते व त्यापासून दीड कोटी रुपयांचा व्यवहार होतो.
झेंडूच्या पिकाचा दुसरा फायदा म्हणजे झेंडूच्या पिकामुळे जमिनीतील सूत्रकृमींचा (निमॅटोड) त्रास कमी होतो. विशेषतः भाजीपाला व फळझाडांत झेंडू हे आंतरपीक घेतल्यास निमॅटोडचा उपद्रव फार कमी होतो. फळझाडांच्या बागेतही सुरुवातीच्या काळात झेंडूची आंतरपीक म्हणून लागवड करता येते. म्हणजेच झेंडूची लागवड तीन प्रकारे करता येते. एक म्हणजे झेंडूची स्वतंत्र लागवड, दुसरी म्हणजे भाजीपाल्याच्या पिकात मिश्र पीक म्हणून झेंडूची लागवड आणि तिसरा प्रकार म्हणजे फळबागांत आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड. आपल्याकडील हवामानात झेंडूच्या पिकाला वर्षभर फुले येऊ शकतात. म्हणूनच वर्षभरात केव्हाही झेंडूची लागवड करता येते. अधिक उत्पादन देणाऱ्या नवीन, आकर्षक फुलांच्या सुधारित जातींमुळे झेंडूच्या पिकाची लागवड फायदेशीर होऊ लागली आहे. भरपूर मागणी, चांगला भाव, कमी खर्च आणि खर्चाच्या तुलनेत भरपूर उत्पादन यांमुळे झेंडू पिकाच्या लागवडीस आपल्या भागात भरपूर वाव आहे.

झेंडू लागवडी खालील क्षेत्र । झेंडू उत्पादन । Area under marigold cultivation. Marigold production.

झेंडूची लागवड पुणे, अहमदनगर, नाशिक, सातारा, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, नागपूर, अकोला, इत्यादी जिल्ह्यांतून कमी-जास्त प्रमाणात केली जाते. पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, खेड, हवेली, पुरंदर, दौंड, इत्यादी तालुक्यांत; अहमदनगर जिल्ह्यात नगर व पारनेर तालुक्यात आणि कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांतील कमी पावसाच्या प्रदेशातसुद्धा झेंडूची लागवड केली जाते. महाराष्ट्रात झेंडू लागवडीखाली सुमारे 200 हेक्टर क्षेत्र आहे.

झेंडू पिकास योग्य हवामान । झेंडू पिकास योग्य जमीन । Suitable climate for marigold crop. Land suitable for marigold crop.

महाराष्ट्रातील हवामानात झेंडूचे पीक वर्षभर घेता येते. झेंडूचे पीक उष्ण कोरड्या तसेच दमट हवामानात चांगले वाढते. जोराचा पाऊस, कडक ऊन आणि कडक थंडी या पिकाला मानवत नाही. अती थंडीमुळे झाडाचे आणि फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. अती तापमानामुळे झाडाची वाढ खुंटते. फुलांच्या उत्पादनप्रक्रियेवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. फुलांचा आकार अतिशय लहान होतो. अलीकडच्या काळात झेंडूच्या काही संकरित बुटक्या जाती विकसित करण्यात आल्या असून त्या थंड हवामानात उत्तम वाढतात.
झेंडूचे पीक अनेक प्रकारच्या जमिनींत उत्तम वाढू शकते. हलकी ते मध्यम जमीन झेंडूच्या पिकास मानवते. भारी आणि सकस जमिनीत झेंडूची झाडे खूप वाढतात. परंतु फुलांचे उत्पादन फारच कमी मिळते. तसेच फुलांचा हंगामही उशिरा मिळतो. झेंडूच्या पिकासाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असलेली, पाण्याचा चांगला निचरा होणारी आणि 7 ते 7.5 पर्यंत सामू असलेली जमीन चांगली मानवते. शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेला जी मोकळी जागा असते तेथे गाजर गवत या तणाचा फैलाव दिसतो, अशा ठिकाणी कमी श्रमांत व कमी खर्चात झेंडूचे पीक घेता येईल व त्यामुळे तणांचा उपद्रवही कमी होईल.

झेंडूच्या उन्नत जाती । Advanced varieties of marigold.

झेंडूमध्ये अनेक प्रकार आणि जाती उपलब्ध आहेत. झेंडूच्या झाडाची उंची, झाडाची वाढीची सवय आणि फुलांचा आकार यांवरून झेंडूच्या जातींचे आफ्रिकन प्रकार आणि फ्रेंच प्रकार असे दोन प्रकार पडतात.

आफ्रिकन झेंडू ।

या प्रकारातील झेंडूची झाडे 100 ते 150 सेंटिमीटर उंच वाढतात. फुले टपोरी असून फुलांना केशरी आणि पिवळया रंगां च्या छटा असतात. या प्रकारात पांढरी फुले असलेली जाती विकसित करण्यात आली आहे. या प्रकारातील फुले मोठ्या प्रमाणात हारासाठी वापरली जातात.

या प्रकारातील प्रमुख जाती पुढीलप्रमाणे आहेत : (1) क्रॅकर जॅक, (2) आफ्रिकन टॉल डबल मिक्स्ड, (3) यलो सुप्रीम, (4) गियाना गोल्ड, (5) स्पॅन गोल्ड, (6) हवाई, (7) अलास्का, (8) आफ्रिकन डबल ऑरेंज, (9) सन जाएंट.

फ्रेंच झेंडू ।

या प्रकारातील झाडे बुटकी, 30 ते 40 सेंटिमीटर उंचीची आणि झुडपासारखी वाढतात. फुलांचा आकार लहान ते मध्यम असून रंगांत मात्र विविधता असते. या प्रकारातील प्रमुख जाती पुढीलप्रमाणे आहेत : (1) स्पे, (2) बटरबॉल, (3) फ्लॅश, (4) लेमन ड्रॉप्स, (5) फ्रेंच डबल मिक्स्ड. या प्रकारातील जातींची रोपे प्रामुख्याने उद्यानातील फुलांच्या ताटव्यांमध्ये लावतात.

फ्रेंच हायब्रीड ।

या प्रकारातील झाडे मध्यम उंचीची, परंतु भरपूर फुले देणारी असतात. थंडीचा काळ वगळता इतर हंगामांत या प्रकारातील झेंडू चांगला फुलतो.

या प्रकारातील काही महत्त्वाच्या जाती पुढीलप्रमाणे आहेत : (1) पेटीट, (2) जिप्सी, ( 3 ) हार्मनी हायब्रीड, (4) रेड हेड, (5) कलर मॅजिक, (6) क्वीन सोफी, (7) हार बेस्टमून.

झेंडूच्या प्रचलित जाती । Common Varieties of Marigold.

मखमली :

ही जात बुटकी असून फुले लहान आकाराची असतात. या जातीची फुले दुरंगी असतात. ही जात कुंडीत लावण्यासाठी अथवा बागेच्या कडेने लावण्यासाठी चांगली आहे.

गेंदा :

या जातीमध्ये पिवळा गेंदा आणि भगवा गेंदा असे दोन प्रकार आहेत. या जातीची झाडे मध्यम उंच वाढतात. फुलांचा आकार मध्यम असून हारासाठी या जातीच्या फुलांना चांगली मागणी असते.

गेंदा डबल :

यामध्येही पिवळा आणि भगवा असे दोन प्रकार आहेत. या जातीची फुले आकाराने मोठी आणि संख्येने कमी असतात. कटफ्लॉवर म्हणून या जातीला चांगला वाव आहे.

झेंडू पिकाची अभिवृद्धी । झेंडू पिकाची लागवड पद्धती । Marigold crop growth. Cultivation method of marigold crop.

झेंडूची लागवड बी पेरून रोप तयार करून केली जाते. बियांपासून रोपे तयार करण्यासाठी 2 x 1 चौरस मीटर आकाराचे गादीवाफे तयार करावेत. या वाफ्यांत कुजलेले खत चांगले मिसळून घेऊन 2.5 सेंटिमीटर अंतरावर बी पेरावे व ते मातीत झाकावे. बी हाताने दाबण्यापेक्षा त्यावर बारीक माती व राख यांचे मिश्रण टाकावे व हाताने सारखे करून नंतर झारीने पाणी द्यावे. बी उगवेपर्यंत सकाळ-संध्याकाळ झारीने पाणी द्यावे व नंतर वाफ्यातून पाटाने पाणी द्यावे. रोपे उगवून आल्यावर कमकुवत आणि दाट रोपांची विरळणी करून घ्यावी.
बी तयार करण्यासाठी चांगली उमललेली, एकाच रंगाची, सारख्या आकाराची व एकाच जातीची फुले आणावीत व ती सुकवून घ्यावीत. फुले सुकल्यानंतर हाताने कुस्करून बी मोकळे करावे. एक बाजू काळे असणारे बी चांगले उगवते. बी तयार करणे शक्य नसल्यास खात्रीच्या ठिकाणाहून बी अथवा रोपे आणावीत. झेंडूमध्ये पर- परागीकरण होत असल्यामुळे बी राखणे आणि निवडणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी आपल्या शेतातच बी धरणे योग्य होय. त्यासाठी झेंडूचे पीक फुलावर असताना निवडक झाडांवर न उमललेल्या फुलास कापडी पिशवी बांधावी. ही संरक्षित फुले झाडावर पूर्ण तयार होऊन उमलल्यावर तोडून त्यांचा हार करून सुरक्षित ठिकाणी वाळवावा. नंतर फुले कुस्करून बी मोकळे करून ते कापडी पिशवीत बांधून ठेवावे. असे बी पुढील हंगामात रोपे तयार करण्यासाठी वापरावे. झेंडूचे बी लांबट आणि वजनाने हलके असते. एक ग्रॅम वजनात झेंडूच्या सुमारे 350 बिया असतात. एक हेक्टर लागवडीसाठी 750 ते 1250 ग्रॅम बियाणे पुरेसे होते. लागवडीसाठी निवडलेले बियाणे शक्यतो मागील हंगामातील असावे. फार जुने म्हणजे दोन हंगामांपूर्वीचे बियाणे चांगले उगवत नाही.
रोपांना 5-6 पाने आल्यावर म्हणजे हंगामाप्रमाणे पेरणीनंतर 3-4 आठवड्यांनी रोपांची शेतात पुनर्लागवड करावी. झेंडू फुलांचा हंगाम निवडताना फुलांना मागणी असलेल्या काळात फुले निघतील या हिशेबाने लागवड करावी.

झेंडू लागवडीसाठी पुढीलपैकी एक पद्धत वापरावी : (1) नवीन फळबागेत आंतरपीक म्हणून पट्टा पद्धत, (2) भाजीपाल्याच्या पिकात मिश्र पीक म्हणून, (3) कोरडवाहू पीक म्हणून अन्य पिकांबरोबर, (4) झेंडूची स्वतंत्र लागवड.
झेंडूची स्वतंत्र लागवड करताना जमीन हलकी नांगरून घ्यावी. नंतर दर हेक्टरी 25 गाड्या शेणखत जमिनीत मिसळून सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून या वाफ्यांमध्ये रोपांची लागवड करावी.

झेंडू पिकास लागवड योग्य हंगाम । झेंडू पिकास योग्य लागवडीचे अंतर । Suitable season for planting marigold crop. Suitable planting distance for marigold crop.

लागवडीपूर्वी जमिनीची मशागत करून हेक्टरी 25 गाड्या शेणखत आणि 25 किलो 10% लिंडेन अथवा कार्बारिल मातीत मिसळून सपाट वाफे अथवा सरी वाफे तयार करून घ्यावेत. जातीनुसार तसेच हंगामानुसार झेंडू लागवडीसाठी दोन ओळींत आणि दोन झाडांत पुढीलप्रमाणे अंतर राखावे.

हंगामप्रकारलागवडीचे अंतर
पावसाळीउंच
मध्यम उंच
60 x 60 सेंटिमीटर
60 x 45 सेंटिमीटर
हिवाळीउंच
मध्यम उंच
बुटका
60 x 45 सेंटिमीटर
45 x 30 सेंटिमीटर
30 x 30 सेंटिमीटर
उन्हाळीउंच
मध्यम उंच
45 x 45 सेंटिमीटर
45 x 30 सेंटिमीटर
हंगामानुसार झेंडू लागवडीचे अंतर

लागवड करताना प्रत्येक ठिकाणी निवडक असे एकच रोप लावावे.

झेंडू पिकास वळण । झेंडू छाटणीच्या पद्धती । Turn the marigold crop. Marigold pruning methods.

झेंडूच्या पिकास वळण देण्याची अथवा छाटणी करण्याची आवश्यकता नसते. परंतु लागवडीनंतर चार आठवड्यांनी शेंडाखुडीचे काम केल्यास बाजूला अनेक फांद्या फुटतात. टिबा (टी.आय.बी.ए.) किंवा एम. एच. 40 या संजीवकाचे 50 पीपीएम तीव्रतेचे द्रावण फवारल्यास पिकाची वाढ थांबून फांद्या फुटतात आणि फुलांची संख्या वाढते.

झेंडू पिकास खत व्यवस्थापन । झेंडू पिकास पाणी व्यवस्थापन । Fertilizer management for marigold crop. Water management for marigold crop.

फुलांचे एकसारखे आणि भरपूर उत्पादन मिळविण्यासाठी वरखते देणे आवश्यक आहे. पहिली खुरपणी झाल्यानंतर झेंडूच्या पिकाला हेक्टरी 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश द्यावे आणि झाडांना मातीची भर घालावी. फक्त नत्रयुक्त खत अथवा अधिक नत्र वापरल्यास पिकाची पालेदार वाढ जास्त होते आणि फुलांच्या उत्पादनात घट
येते.
झेंडूच्या पिकाला पावसाळ्यात आवश्यकतेनुसार 15 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. झाडांना कळया आल्यापासून तोडणी संपेपर्यंत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. तसेच याच काळात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी देऊ नये. उन्हाळयात 5 ते 7 दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे.

झेंडू पिकातील आंतरपिके । Intercropping in marigold crop.

झेंडूचे पीक स्वतंत्र किंवा इतर पिकांत मिश्र पीक म्हणून घेता येते. विशेषतः फळपिकांमध्ये झेंडूचे पीक आंतरपीक म्हणून घेता येते. काही प्रयोगांवरून असे दिसून आले आहे की, द्राक्षबागेत आणि पपईच्या पिकात झेंडूचे आंतरपीक घेणे फारच उपयुक्त ठरते. महाराष्ट्रात अनेक द्राक्षबागांतून सूत्रकृमींचा (निमॅटोड) उपद्रव वाढत आहे. निमॅटोडसाठी औषधे वापरणे खर्चाचे व अवघड काम आहे. अशा ठिकाणी झेंडू पीक घेतल्यास निमॅटोडचा उपद्रव कमी होतो. नवीन द्राक्षबागांतून सुरुवातीस 1-2 वर्षे वेलींमधील मोकळया जागेत हे पीक घेता येते. द्राक्षबागेतून झेंडूचे पीक पावसाळयात घेतल्यास फुलांचा हंगाम दसरा सणापर्यंत संपविता येतो. त्यामुळे द्राक्षाची ऑक्टोबर छाटणी करावयास अडचण येत नाही. झेंडूच्या पाना- फुलांत असणाऱ्या काही विशिष्ट गुणधर्मांमुळे या पिकाला किडींचा त्रास होत नाही, म्हणून पपईच्या शेतातही झेंडूची लागवड करण्याचा कल आता वाढू लागला आहे. मिश्र पीक म्हणून लागवड करताना झेंडूच्या बुटक्या व हलक्या जाती निवडणे आवश्यक आहे.

झेंडू पिकावरील महत्त्वाच्या किडी आणि त्यांचे नियंत्रण । Important pests of marigold crop and their control.

लाल कोळी (रेड स्पायडर माईट) :

या किडीचा उपद्रव साधारणपणे फुले येण्याच्या काळात होतो. ही कीड पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे झाडाची पाने धुरकट, लालसर रंगाची दिसतात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक (80%) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

केसाळ अळी (हेअरी कॅटरपीलर) :

ही अळी झाडाची पाने कुरतडून खाते, त्यामुळे पानाच्या फक्त शिराच शिल्लक राहतात.
उपाय : या अळीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 12 मिलिलीटर एन्डोसल्फान (35% प्रवाही) अथवा 20 मिलिलीटर क्विनॉलफॉस ( 25% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

तुडतुडे (लीफ हॉपर) :

या किडीची पिले आणि प्रौढ कीड पानांतील रस शोषून घेते. त्यामुळे पाने वळतात आणि नंतर सुकतात. कोवळ्या फांद्यांमधील रस शोषून घेतल्यामुळे फांद्या टोकांकडून सुकत जातात.
उपाय : या किडीच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 15 मिलिलीटर मॅलॅथिऑन (50% प्रवाही) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

झेंडू पिकावरील महत्त्वाचे रोग आणि त्यांचे नियंत्रण । Important diseases of marigold crop and their control.

मूळकुजव्या :

झाडाच्या मुळांवर बुरशीची लागण झाल्यामुळे झाडाची मुळे कुजतात, मुळांवर तपकिरी रंगाचे डाग पडतात. मुळांवर सुरू झालेली कूज खोडाच्या दिशेने वाढत जाते. त्यामुळे रोपे कोलमडतात आणि मरतात.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 25 मिलिलीटर कॉपर ऑक्सिक्लोराईड या प्रमाणात मिसळून रोपांच्या मुळांभोवती जमिनीत ओतावे.

पानांवरील ठिपके :

या बुरशीजन्य रोगामुळे पानांवर तपकिरी रंगाचे गोलसर ठिपके पडतात. या ठिपक्यांचा आकार वाढत जाऊन ते एकमेकांत मिसळतात. त्यामुळे पानांवर काळसर तपकिरी रंगाचे वेडेवाकडे डाग दिसतात. काही वेळा पानांच्या देठावर आणि फाद्यांवरही बुरशीची लागण दिसून येते.
उपाय : या रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लीटर पाण्यात 20 ग्रॅम डायथेन एम-45 (75% पाण्यात मिसळणारी पावडर) या प्रमाणात मिसळून पिकावर फवारावे.

झेंडूच्या फुलांची काढणी, उत्पादन आणि विक्री । Harvesting, production and sale of marigold flowers.

जून महिन्यात लावलेल्या झेंडूच्या पिकाच्या फुलांची तोडणी सप्टेंबर महिन्यात तर जानेवारी महिन्यात लावलेल्या झेंडूच्या पिकाच्या फुलांची तोडणी एप्रिल महिन्यामध्ये सुरू होते. झेंडूची पूर्ण उमललेली फुले देठाजवळ तोडून वेचणी करावी. हारांसाठी देठविरहित फुले तसेच गुच्छ किंवा फुलदाणीसाठी देठासह फुले तोडावीत. फुलांची तोडणी दुपारनंतर करावी. फुले तोडताना कळया व कोवळ्या फांद्या यांना इजा करू नये. तोडलेली फुले सावलीच्या ठिकाणी गारव्याला ठेवावीत. कटफ्लॉवर्ससाठी 6 ते 9 फुलांच्या जुड्या बांधून त्या कागदी खोक्यांतून विक्रीसाठी पाठवाव्यात.
झेंडूच्या पावसाळी पिकाचे उत्पादन हेक्टरी 6 ते 8 टन आणि उन्हाळी पिकाचे उत्पादन हेक्टरी 3 ते 5 टन मिळते.

झेंडूच्या फुलांचे पॅकेजिंग आणि साठवण । Packaging and storage of marigold flowers.

फुलांच्या काढणीनंतर त्यांचा रंग, आकार व जातीनुसार फुलांची प्रतवारी करावी व नंतर फुले बांबूच्या करंड्यात भरावीत. फुले भरताना फुलांच्या पाकळया चुरगळणार अथवा गळणार नाहीत याची काळजी घ्यावी. फुले बाजारात विक्रीसाठी पाठविताना पॉलिथीन पिशव्यांत अथवा पोत्यांत भरून पाठवावीत. कटफ्लॉवर्ससाठी फुलांच्या जुड्या बांधून वर्तमानपत्रात गुंडाळून फुले कागदी खोक्यांत भरावीत. झेंडूची तोडणी केलेली फुले पॉलिथीनच्या पिशवीत थंड जागी ठेवल्यास 6 ते 7 दिवसांपर्यंत चांगली राहतात.

सारांश ।

झेंडूचे पीक हे कमी दिवसांत, कमी खर्चात आणि कमी त्रासात येणारे परंतु खात्रीने फुले देणारे फुलपीक आहे. झेंडूच्या फुलांना वर्षभर आणि प्रामुख्याने दसरा-दिवाळी या सणांच्या काळात प्रचंड मागणी असते. अलीकडच्या काळात कटफ्लॉवर म्हणून फुलदाणीत फुले ठेवण्यासाठी झेंडूच्या फुलांचा उपयोग केला जातो.
झेंडूच्या पिकाची लागवड स्वतंत्र पीक, मिश्र पीक आणि आंतरपीक म्हणून केली जाते. झेंडूचे पीक वर्षभर घेता येते. हे फुलपीक उष्ण, कोरड्या तसेच दमट हवामानांतही चांगले येते आणि अनेक प्रकारच्या जमिनीत वाढते. झेंडूची लागवड बियांपासून रोपे तयार करून केली जाते. रोपांची लागवड सरी वाफे अथवा सपाट वाफे तयार करून केली जाते. रोपांची लागवड सर्वसाधारणपणे 45x 45 सेंटिमीटर ते 60x 60 सेंटिमीटर अंतरावर केली जाते.
झेंडूच्या पिकाला हेक्टरी 25 किलो नत्र, 25 किलो स्फुरद आणि 25 किलो पालाश या प्रमाणात खतांच्या मात्रा द्याव्यात. झेंडूच्या पिकाला कळया आल्यापासून ते काढणी होईपर्यंतच्या काळात पाण्याचा ताण पडू देऊ नये; मात्र पिकाला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणीही देऊ नये. रोपांच्या लागवडीनंतर साधारणपणे अडीच ते तीन महिन्यांनी फुले काढणीसाठी तयार होतात. हार तयार करण्यासाठी झेंडूची पूर्ण उमललेली फुले देठाजवळ तोडून काढणी करावी. गुच्छ करण्यासाठी अथवा फुलदाणीत ठेवण्यासाठी देठांसहित फुलांची काढणी करावी. पावसाळ्यात झेंडूच्या पिकाचे उत्पादन हेक्टरी 6 ते 8 टन इतके मिळते तर उन्हाळयात हेक्टरी उत्पादन 3 ते 5 टन इतके मिळते.

जाणून घ्या लिली लागवड बद्दल संपूर्ण माहिती तेही एका क्लीक मध्ये (Lily Lagwad Mahiti Lily Sheti) – Lily Farming

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )