गोव्यातील केल्या जाणाऱ्या या विधिनाट्य विषयी माहित आहे का ( जागर ) ?

पेरणी जागर । गावडा जागर हिन्दू । गावडा जागर ख्रिस्ती । शिवोली गावातील जागर ।

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

गोव्यातील विविध जमातींकडून ग्रामदैवताना आणि स्थळदैवतांना जागृत करण्यासाठी सादर केले जाणारे विधिनाट्य. यात चार जमातींचा समावेश होतो. आदीम काळात उगम पावलेला पेरणी या मंदिरसेवक वर्गाचा पेरणी जागर, हिन्दू गावडा जमातीचा आणि ख्रिस्ती गावड्यांचा जागर तसेच शिवोली या उत्तर गोव्यातील गावात ख्रिस्ती आणि हिन्दू एकत्र येऊन केला जाणारा जागर. जागराला कोंकणीत ‘जागोर’ असे म्हणतात.

पेरणी जागर.


पेरणी हा गोमंतक मराठा समाज या ज्ञातीवर्गातील एक अपगट. ग्रामदैवताच्या वार्षिक उत्सवात लाकडी मुखवटे घालून रात्रीच्या वेळी विधीच्या स्वरूपात लोकनाट्या सादर करणे हा त्यांचा पिढीजात पेशा. हे विधिनाट्य आजमितीस फक्त पाच गावातील पेरणी कुटुंबाना माहीत आहे. ही कुटुंबे मळकर्णे (केपे), कोळंब (सांगे), पैंगीण (काणकोण), वाघुर्मे (फोंडा) आणि मयें (डिचोली) भागात राहातात. या गावातील कुटुंबांकडे मुखवट्यांचा प्रत्येकी एक संच वेतापासून बनविलेल्या पेटाऱ्यात जपून ठेवलेला असे. उत्सवाच्यावेळी हा पेटारा डोक्यावर घेऊन आठ-दहा कलाकारांचा चमू दुपारी देवळात जाऊन आपल्या आगमनाची वर्दी ढोल वाजवून देतो. या चमूत एक दोन महिलाही असतात. पूर्वीच्या काळात त्यांच्यावर ‘शेंसविधी’ केल्याने त्या अविवाहीत राहून मंदिरसेवा करीत. त्या जागरात प्रत्यक्ष भाग घेऊन कृष्ण, गवळण, चंडूल अशी पात्रे वठवीत.


या चमूतील प्रमुख पेरण्याला ‘जागर पेरणी’ असे म्हणतात. त्याच्या मार्गदर्शनाखाली ‘पेर्णोटी’ या विशिष्ट जागेवर पेटारा ठेवून त्यातील मुखवटे त्यांच्या प्रवेशक्रमानुसार मांडून ठेवतात. तेथे समई पेटवून गणपतीच्या मुखवट्याजवळ नारळ ठेवून त्याला कुंकूमार्चन करतात. तेथे विडा आणि तांदूळ ठेवले जातात. पुजारी किंवा गुरवाचा शब्द घेऊन रात्री दहाच्या सुमारास जागराला आरंभ करतात. त्यावेळी दिवट्या आणि समया पेटविल्या जातात. जागर पेरणी नमनाचे गायन करून प्रार्थना करतो. त्याला मध्यम आकाराचा ढोल किंवा ढोलके आणि कासाळ्याची साथ असते. पेरणी गळ्यात लाल रंगाच्या फुलांची माळ घालतो आणि एकेक पात्र प्रेक्षकांसमोर येऊन नृत्य करून निघून जाते. काही पात्रे आणताना त्यांच्यासमोर पांढरा पडदा धरतात. पात्र मंचावर येताच पडदा बाजूला करतात. सर्वप्रथम गणपतीचा मुखवटा घातलेले पात्र येते. त्या मागोमाग पावणो, हरीहर, मोर(शारदा), बाळकृष्ण, म्हातारी, महादेव(बसव), धावतो-धुवतो तथा रामराय, धसाधशी (सौदागर), चंडूल, तुळजाय, गवळण, मोनो, जिवानाथ अशी पात्रे सादर केली जातात. काही जागरांतून घोडा, वाघ अथवा वागरो, होळियो, पुतना, बहागिरो, मुंडो अशी पात्रे आणली जातात. पात्रांच्या प्रवेशाचा अनुक्रम गावानुसार बदलतो. परंतु जागराची समाप्ती वाघ किंवा घोड्याचा मुखवटा मंदिराच्या प्राकाराभोवती फिरवून होते.

पैंगीण गावात होणाऱ्या जागरात विविधता असते. त्या जागराची नावेही प्रमुख विधीनुसार असतात. त्यात दैत्यांजागर, चोरांजागर, दिवजांजागर, मालये जागर, भारा सवंग, चंडिका यांचा समावेश होतो. अन्य ठिकाणी गायत्री, कोले, तुणतुण्याजागर, दिसपेन्न, शेंसर अशा विधींचा समावेश असतो. मोरजी या पेडणे तालुक्यातील गावच्या मोरजाई मंदिरात होणाऱ्या कळसोत्सवात ‘पेरणी भरीप’ या नावाने जागर होतो.

या विधीनाट्याचा उगम प्रसवशक्तीच्या उपासनेतून झाला असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. नंतरच्या काळात या नाट्याने वैदिक, पुराणकालीन, शैवपंथी, तांत्रिक संप्रदायाचे प्रभाव स्वीकारले. ‘पेरणी’चा उल्लेख अभिलासितार्थ चिंतामणी किंवा मानसोल्हास, संगीत रत्नाकर, नृत्तरत्नावली आणि संगीत समय सार या ११व्या आणि १२व्या शतकातील संस्कृत ग्रंथांत सापडतो.
मात्र गोव्याच्या मुक्तीनंतरच्या काळात या लोकनाट्याला उतरती कळा लागली. त्याचा परिणाम म्हणून अनेक गावातील मंदिरातून होणारे जागर बंद पडले. आता वार्षिक उत्सवात भोगावळीच्या स्वरूपात जागर सादर केले जातात. प्रसिद्ध जागर कलाकारांमध्ये पेरणी आडनावांचे पोपट, बाबल, मादू, वसंत, राघू, विठ्ठल, येसो, भीम या पुरूषांचा तसेच चंदा, मोगरें, सुंदरें, गुजर या महिलांचा समावेश होतो.

गावडा जागर : हिन्दू


गावडा ही जमात पाणथळ तसेच डोंगराळ भागात शेती, बागाईत आणि मजुरी करून गुजराण करणारी होय. जागर हे या जमातीचे विधिनाट्या दरवर्षी शिगमोत्सवाच्या मागे-पुढे मांडावर सादर करतात. पोर्तुगीजाच्या आगमनानंतर काही गावड्याच्या गावात धर्मान्तरे झाली. ख्रिस्ती धर्म लादलेल्या गावडा जमातीवर मूळ स्वरूपातील जागर सादर करण्यास मनाई करण्यात आली. परंतु ख्रिस्ती धर्मात गेलेल्या गावडा जमातीने वेगळेपणाने आपला जागर चालू ठेवला. त्यामुळे गावडा जमातीच्या मूळ हिन्दू जागराचा थोडा वेगळा प्रकार ख्रिस्ती गावडा जागरात टिकून राहिला.

जागराचा दिवस मांडकार आणि प्रमुख पात्रे सादर करणारे ग्रामस्थ हे चर्चा करून ठरवितात. मांडावर पहिला विधी करण्याचा अधिकार अथवा ज्याला परंपरेने मान प्राप्त झाला आहे त्याला मांडकार म्हणतात. जागराआधी मांड सजविला जातो. मांडकार समई पेटवितो आणि जागरातील नमनाला आरंभ होतो. पहिले नमन भूमी मंडळाला, दुसरे मांडागुरू या दैवताला, नंतर ग्रामदैवतांना, त्यापाठोपाठ पूर्वजांना आणि गुरूसमान व्यक्तींसाठी नमन करतात. मांडाच्या एका बाजूने वादक आणि गायक बसतात आणि घुमट, डोब, कांसाळे, झांज या वाद्यांच्या वादनाने गायनात रंगत आणतात. नमन गाऊन झाल्यावर जागरातील पात्रे आपापल्या क्रमानसार येऊन प्रथम प्रेक्षकांना गमतीदार पद्धतीने आपली ओळख करून देतात. त्यानंतर नृत्य करून निघून जातात.
यात दैवी आणि मानवी पात्रे असे दोन मुख्य प्रकार असतात. धोणे, पावणार, पतरंगी, लव इत्यादी पात्रे अत्यावश्यक मानली जातात. ती ठराविक कुटुंबातील व्यक्तीच सादर करतात. मानवी पात्रांमध्ये निखणदार (शिपाई), पारपती (कर वसूल करणारा), थोंटो (लंगडा), तेंडली (अविवाहीत प्रौढा), गराशेर (रोड रोमिओ), पाखलो (युरोपियन माणूस), खापरी (आफ्रिकन), रणरावत (योद्धा), माळी-माळीण, महार जोडपे आणि मुलगा, मामा-भाचा, गवळी, डॉक्टर इत्यादी सुमारे साठ पात्रे जागरात सहभागी होतात. सर्व पात्रे फक्त पुरूषच रंगवितात. त्यांच्या अंगावर भरजरी पोषाख असतो. यात कोणतेच सलग कथानक नसते. छोटे छोटे प्रसंग असून त्यांचे विषय कौटुंबिक संबंध, वंशावळ, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय प्रसंग आणि ग्रामीण जीवनाचे दर्शन अशा स्वरूपाचे असतात.

मध्यरात्रीच्या सुमारास सुरू झालेले हे विधिनाट्या पहाटेच्या प्रहरी संपते. फोंडा आणि तिसवाडी तालुक्यातील सुमारे १५ ते २० खेड्यातून दरवर्षी जागर सादर करतात.

गावडा जागर : ख्रिस्ती


सासष्टी आणि मुरगाव तालुक्यातील गावडा जमातीतील मजूरवर्ग आणि मच्छीमार वर्ग हा जागर सादर करतात. पोर्तुगीज राजवटीत जेजइट मिशनऱ्यानी गावडा जमातीचे धर्मान्तर केले. त्यावेळेपासून गावडा जमातीच्या मूळ जागरातील हिन्दू संस्कृतीविषयक असलेले सर्व संदर्भ पूर्णतः बदलून ख्रिस्ती धर्माचे आणि संत-संतीणींचे संदर्भ समाविष्ट करण्याचे काम या मिशनऱ्यानी सातत्याने केले. त्याचा परिपोष म्हणून ख्रिस्ती गावड्याचा जागर जुन्या काबीजादीत म्हणजे तिसवाडी, सासष्टी आणि बार्देश भागात कार्निव्हालच्या दिवसात सर्वत्र होत असे. मांडावरील जागर चर्चच्या वार्षिकोत्सवात होऊ लागला. घरप्रवेश आणि अपत्यप्राप्तीच्या निमित्तानेही जागर सादर केला जात असे; परंतु सन १७८४ साली पोर्तुगीज प्रशासनाने जागराला ‘रानटी प्रकार’ म्हणत त्याच्या सादरीकरणावर बंदी आणली. ती १९३० पर्यंत चालू राहिली. मध्यंतरीच्या काळात ख्रिस्ती जागराच्या मांड नामशेष झाला. जागराची जीर्ण संकल्पना तेवढी टिकून राहिली.
चालू काळात हा जागर लाकडी मंचावर नमन, देवाची माया आणि सवंगां (सोंगे/पात्रे) अशा तीन भागात मंचित होतो. सुरवातीस नमन गायले जाते. त्यासाठी दोन-तीन घुमटे, एक म्हादळें आणि कांसाळे या वाद्यांची साथ असते. सर्व गीते आणि संवाद कोंकणीत असतात. ‘देवाची माया’ यात विविध दैवतांचे आणि संतविभूतींचे स्मरण केले जाते. खासकरून गावासाठी उभारलेल्या खुर्साजवळ (क्रॉस) हा जागर होत असल्याने त्या क्रॉसला प्रमुख आवाहन केले जाते. त्यांनतर येणारी पुरूष वस्त्री पात्रे संवाद आणि गीतातून आपले कौटुंबिक जीवन व्यक्त करतात. ही सर्व पात्रे पुरूष वठवितात. यातील छोट्याशा प्रसंगातून सामाजिक व्यंगावर थेट बोट ठेवतात. अशा प्रहारक गीताला झुपाटी असे म्हणतात. झुपाटी बव्हंशी जमातीमधील अनैतिक संबंधांविषयी असते. सर्व पुरूष पात्रे रंगीत बेगडीने बनविलेला कमीज नावाचा अंगरखा घालतात. डोक्यावर विदुषकी पद्धतीचा ‘टोप’ ठेवतात आणि हातात ‘पाव’ नावाची काठी घेऊन गीते गात, दिडक्या चालीने उड्या मारीत तसेच गिरक्या घेत नृत्य करतात.

शिवोली गावातील जागर.


सात ख्रिश्चन कुटुंबे आणि दोन हिन्दू कुटुंबे एकत्र येऊन गुडें-शिवोली या बार्देश तालुक्यातील गावात दरवर्षी ख्रिसमसनंतर येणाऱ्या पहिल्या सोमवारी मांडावर जागर सादर करतात. जागर यो नावाच्या स्थानिक दैवताला जागृत ठेवण्यासाठी हा जागर हिन्दू व ख्रिश्चन एकत्र येऊन साजरा करतात. त्यातील प्रमुख गायक वादक हिन्दू तर पात्रे रंगविणारे ख्रिश्चन पुरूष असतात.

जागरयो दैवताच्या घुमटीजवळ जमून आवाहन केल्यावर या विधिनाट्याला प्रारंभ होतो. त्याच्या बरोबरीने सातेरी, अन्य ग्रामदेवता, सेंट अँथनी, सेंट अन आणि सेंट फ्रांसिस शाव्हिएर यांनाही आवाहन केले जाते. रात्रीच्यावेळी हातात पेटत्या चुडी घेऊन दांडो आणि गुडें या गावातील पथके मिरवणुकीने मांडावर येतात. यावेळी ख्रिस्ती धर्मातील पवित्र त्रिमूर्तीविषयीच्या स्तुतीपर ओव्या गायल्या जातात. या त्रिमूर्तीत ‘देव बापा, देव पुजा आणि इस्तिरीत सांता’ यांचे स्मरण केले जाते. त्यांच्यासोबत गणेश, सातेरी, महादेव, शांतादुर्गा, लक्ष्मी तसेच जागरयो आणि खाजमयो या दैवतांना आवाहन केले जाते.
जागर लोकनाट्याची सुरवात सईद आणि फिरंगी राजा यांच्यामधील विनोदी संवादाने होते. त्यांनतर माळोणी हे पात्र येऊन गेल्यावर जागरयोची भोंवर (गिरक्या) होते. हे जागरातील महत्त्वपूर्ण पात्र आपल्या डोक्याला मोठा बेगडी टोप घालते. पायघोळ झग्यासारखा पोषाख आणि हातात सजविलेली लांब काठी घेऊन गिरक्या घेत नृत्य करून जाते. त्यांनतर महार जोडपे, भरभरय्या, पावलू भुयार, आंतोन पूत इत्यादी पात्रे येऊन संवाद म्हणतात आणि नृत्य करून जातात त्यांना घुमटे, म्हादळे आणि कांसाळे या वाद्यांची साथ-संगत असते. गोव्यातील धार्मिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण म्हणून या उत्सवाकडे पाहिले जाते.

या गावातील जागर परंपरा कशी सुरू झाली याविषयी एक दंतकथा सांगतात. शिवोली गावातील शेतकरी शेती पिकवीत. त्या पिकाला खाऱ्या पाण्यापासून हानी पोचू नये म्हणून शेतकरी शापोरा नदीला बांध घालून पाणी अडवीत. दरवर्षी हा बांध कोसळून पिकाची नुकसानी होई. म्हणून शेतकऱ्यांनी ‘घडघडय्या’ या अतिमानवी शक्तीला गाऱ्हाणे घातले आणि बांधाची राखण केल्यास आपण जागर साजरा करू असे सांगितले. त्या वर्षी बांध सुरक्षित राहिला आणि जागराची परंपरा सुरू झाली या घडघडय्याला जागरयो हे दुसरे नाव आहे. जागरयो हे दैवत खूप शक्तीमान असून संतानप्राप्ती संरक्षण, रोगमुक्ती, सुबत्ता मिळावी म्हणून भाविक त्याच्या घुमटीजवळ तेलवाती आणि मेणवाती पेटवतात. त्याचप्रमाणे त्याला दारू अर्पण करतात.

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )