जेजुरी ,खंडोबा
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
जेजुरीचे श्रीखंडोबा मंदिर.
मणी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्रीमार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे अरिष्ट दूर करण्यासाठी कायम स्वरूपी वास्तव्य केले ते जागृत स्थान म्हणजे जेजुरगड… याठिकाणी श्रीखंडोबाची राजधानी असल्याने इतर स्थानांपेक्षा येथील वैभव भव्यदिव्य आहे.मल्लासूराचा संहार केल्या नंतर त्यने मागितलेल्या वरामुळे देवाच्या अगोदर मल्ला चे नाव घेतले जाते तर मानिसुराला दिलेल्या वरामुळे दोघा दैत्य बंधूंना देवाच्या सानिध्यात राहता आले ते याच जेजुरगडावर… म्हाळसा व बाणाईला विवाह करून आणले, तेहि याच ठिकाणी. अशा श्रीखंडोबा स्थानातील महत्व पूर्ण स्थानाची माहिती करून घेऊ या.
जेजुरी गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर साधारणपणे पंच्याहत्तर मीटर उंचीवर मल्हारी- मार्तंडाचे मंदिर आहे… मंदिराला पूर्व, पश्चिम व उत्तर अशा तीनबाजूनी पायरीमार्गांनी जाता येते. त्यापैकी पूर्व व पश्चिमेकडील पाय-या अरुंद व अर्धवट बांधकाम स्थितील असल्याने त्यांचा वापर सहसा होत नाही. उत्तर दिशेकडील पायरी मार्ग रुंद व रहदारीचा असल्याने या पायरी मार्गाची शोभा अनेक भाविक भक्तांच्या नवस पुर्तीतून निर्माण झालेल्या कमानी व दीपमाळांनी वाढविली आहे. या पायरी मार्गावर तीनशे पंच्याऐंशी पाय-या आहेत तर सुस्थितील चौदा कमानी व छोट्या मोठ्या तीनशे दीपमाळा आहेत.
या मार्गावर अठरा कमानी असल्याचा उल्लेख आढळतो याचाच अर्थ अठरापैकी चार कमानी सव्वाशे वर्षात नाहीशा झाल्या त्यापैकी दोन कमानी भग्न अवस्थेत पहावयास मिळतात… जेजुरगडाला नवलाख पायरीचा उल्लेख अनेक लोकगीतांमधून येत असल्याने अनेक भाविक भक्तांच्या मनात कुतूहल निर्माण होते, परंतु गड बांधणी दरम्यान वारण्यात आलेल्या दगडा संदर्भात हा उल्लेख आलेला आहे.पायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावर आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांचा पुतळा व वीरभद्र, बानुबाई मंदिर, हेगडी प्रधान, यशवंतराव इ. अनेक छोटी मोठी मंदिरे लागतात… महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंचच उंच चार भव्य दीपमाळा व मुख्य श्रीखंडोबा-म्हाळसा मंदिर.
दीपमाळांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तटबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासूर दैत्याची मूर्ती पहावयास मिळते, तर त्याचे समोरच दगडी बांधकामातील गाडी बगाड पहावयास मिळते… त्याच्याच पुढे पश्चिमेकडे मंदिराकडे तोंड असलेल्या नंदीपुढे पितळी कासव दिसते, बहुदा सर्व हिंदू मंदिरात कासव पहावयास मिळते परंतु इतके भव्य सहा मीटर व्यासाचे कासव फक्त जेजुरीतच दिसते.त्यापुढे चार पाया-या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो,प्रथम लागते ती सदर, या ठिकाणी उजव्या हाताला उत्तरेकडे उंचावर दोन घंटा बांधलेल्या आहेत सदरेवरून मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी साडेचार फुट उंचीचा चांदीचा दरवाजा लागतो… मध्य गर्भगृहात उत्तर व दक्षिण दिशेस दोन दगडी घोडे दिसतात पैकी उत्तरेकडील घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबाची मूर्ती दिसते. तसेच उत्तर व दक्षिण बाजूस दोन दरवाजे दिसतात त्यापैकी गर्दीच्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील दरवाजाचा वापर केला जातो. मुख्य गर्भगृहाच्या दरवाजाच्या उजव्या हाताला संगमरवरी यक्षाची मूर्ती दिसते तर डावीकडील बाजूस दगडात कोरलेला गणपती आहे.मुख्य गर्भागृहाम्ध्ये प्रवेश करताना समोर दिसतो तो मेघडंबरीतील भव्य मोठा देव्हारा…
समोर खालील बाजूस श्रीखंडोबा व म्हाळसा स्वयंभूलीग दिसते, श्रीखंडोबा स्वयंभूलिंग हे म्हाळसा स्वयंभू लिंगापेक्षा आकाराने मोठे आहे, त्याला लागुनच पाठीमागील बाजूस बाणाईचे लिंग आहे, त्याच्या बाजूला गणेश मूर्ती, पितळी कुत्रा व श्रीखंडोबा म्हाळसा उत्सव मूर्तीचे दोन जोड आहेत… त्याच्या पाठीमागील कट्ट्यावर श्रीखंडोबा म्हाळसाचे तीन मूर्ती जोड पहावयास मिळतात त्यापैकी दोन मोठे मूर्तीजोड प्रभावळीसह आहेत. डावीकडील चांदीचा मूर्तीजोड नाना फडणविसांनी पेशव्यांना वारस मिळावा म्हणून केलेल्या नवसपूर्तीप्रित्यर्थ अर्पण केलेला आहे तर त्याच्या शेजारील छोटा मूर्तीजोड सातारकर भोसले छत्रपतींनी अर्पण केलेला आहे…..
उजवीकडील मूर्ती जोड तंजावरचे व्यंकोजीराजे भोसले यांच्या वंशातील शरीफजीराजेंनी अर्पण केला आहे… या मूर्तींच्या पाठीमागे भिंतीतील मोठ्या कोनाड्यामध्ये श्रीमार्तंड भैरवाची चतुर्भुज बैठी मूर्ती आहे, यांच्या आसनाखाली मणीसूर व मल्लासुर दैत्यांच्या शिरासोबत घोडा आहे. श्री मार्तंड भैरवाचे दोन्ही बाजूस देवींच्या मूर्ती आहेत. मुख्य गर्भगृहात उत्तर व दक्षिणेकडील बाजूस छोट्या खोली आहेत पैकी दक्षिणेकडील खोलीत देवाचे शेजघर असून त्यामध्ये देवाचा चौपाळा आहे. उत्तरेकडील खोलीमध्ये तळघर असून तेथे श्री खंडोबा बाणाई स्वयंभू लिंगाचे गुप्तमल्लेश्वर स्थान आहे ते फक्त महाशिवरात्रीस खुले असते. मंदिर प्रदक्षिणा मार्गावर त्रेसष्ठ ओव-या आहेत पैकी काही ओव-यांचे अलीकडील काळात बांधकाम करून खोलीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे… मुख्य मंदिराच्या पाठीमागील भिंतीमध्ये कोनाड्यात कार्तिक स्वामींची मूर्ती आहे.प्रदक्षिणा मार्गावर तुळजाभवानी, पंचलिंग, भुलेश्वर, अन्नपूर्णा व साक्षीविनायक मंदिरे आहेत, तसेच गणेश मूर्ती, उमाजी नाईक तालीम, घृतमारी शिळा, मल्हार पद, मारुती आणि बारद्वारीतील देवघर व देवाची पालखी पहावयास मिळते. पंचलिंग मंदिराला लागुनच देवाचे भंडारगृह आहे, याठिकाणी देवाच्या उत्सवमूर्ती दसरा व सोमवती अमावास्येला बसविल्या जातात