।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
पहिला पाऊस
बबनरावांनी हातातल्या फायली बाजूला केल्या. घड्याळात तीन वाजलेले. त्यांनी बेल दाबताच शिपायानं काॅफी आणून दिली. खिडकीतून नजर बाहेर जाताच जोराचा पाऊस बबनरावांना दिसला. एसीत उकाडा जाणवत नसला, तरी आज सकाळपासूनच उकडत होतं नी बरोबर अडिच -तीनला दमदार पाऊस बरसत होता. बबनराव काॅफीचे घोट घेता घेता भूतकाळात रमले. त्यांना गुडगावमध्ये खानदेश, खानदेशचा पहिला पाऊस व माला सोबत अंगावर झेललेला पहिला मृण्मयी पाऊस आठवू लागला.
हातातल्या फाईलीचा निपटारा झालाच होता. त्यांनी काॅफी संपवत खुर्चीवर सैलपणे रेलत पडणाऱ्या पावसाच्या प्रवाहासोबत भूतकाळात वाहत जाणं पसंत केलं व त्या मृण्मयी सयीत ते मातीच्या ढेकळागत विरघळत आपली सुध हरपले.
जालन्यात झेड.पी. त सार्व. बांधकाम विभागात लागायला तीन चार महिने होताच आईनं आपल्याला मामानं आजोळी बोलावल्याचं पत्र पाठवून आजोळी जाऊन यायला सांगितलं होतं. नोकरी लागल्याबरोबर मामा पंधरा वर्षांपासूनचं वैर विसरून जळगावला इंजिनिअरींगच्या फायनल वर्षाला असणाऱ्या मालेला आपल्याला देऊ पाहत होता. पंधरा वर्षापूर्वी वडिलांशी काही तरी बिनसलं. त्यामुळं आईचं माहेर व आपलं आजोळ तुटलं. नववीपासुन आपण गेलोच नव्हतो. आताही ती अढी मनात होतीच. पण आजी आजोबांच्या आग्रहाखातर फक्त जाऊन यावं व नंतर नकार कळवावा असं आपण पक्कं ठरवलं. आई-बाबांची देखील तशीच सुप्त इच्छा होती.
दहा जूनला रेल्वेनं आपण जळगाव गाठलं. तेथून भुसावळ -सुरत पॅसेंजर पकडत मामाच्या गावापासुन पंधरा-वीस किमी अंतरावरील स्टेशनावर पाचच्या सुमारास उतरलो. आकाशात काळ्या मेघांनी दाटी केली होती. अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. येत असल्याचं मामाला आधीच कळवल्यानं मामानं सदाबाला छकडा गाडी घेऊन पाठवलं होतं. गाडीतनं उतरून स्टेशनातून मागच्या बाजूनं पायऱ्याजवळ येताच सदाबा घाईगडबडीनं आला.
सदाबा आजोबाचा विश्वासाचा माणुस. कित्येक वर्षांपासून राबतोय. आपण लहानपणी यायचो तेव्हा ऐन उमेदीत होता. आता तो पूर्ण थकला होता. आपल्याला पाहताच अचूक ओळखत “चल दादा “म्हणत तो छकड्याकडं घेऊन गेला. गावकुसातली ही माणसं कुणाला सहजासहजी विसरत नाही. नात्याची अगदी घट्ट वीण विणतात. छकड्यात मालाही त्याच गाडीतनं जळगावहून आली होती व बसली होती. मालाला आपण पंधरा वर्षानंतर पाहत होतो. परकरातली शेंबडी माली गायब होऊन साडीतली माला समोर होती. लिंबू कलरची साडी चोपून चापून नेसून माला आधीच छकड्यात बसली होती. आपल्याला पाहताच मंद हास्य करत बाजुला सरकत तिनं जागा दिली, पण आपण अढी ठेवत तसाच मख्ख.
सदाबानं जांभळाच्या झाडाला बांधलेले गोऱ्हे सोडून छकडा धुरवला. व पडलेला वारा सुरू झाला. जांभळाचं झाड अचानक नव्या नवतीतल्या पोरीनं लाजून गिरकी घ्यावी तसं वाऱ्यानं उलटसुलट गिरक्या घेऊ लागलं. तशी पिकलेली जांभळं व कच्ची हिरवी जांभळं पडू लागली. सदाबानं धुरवलेल्या गाडीचे तरणेबांड गोऱ्हे पाठीवर जांभळं पडताच थयथयाट करू लागली. आपण बसताच गाडी धावू लागली. वाऱ्यानं आता सोसाट्याचं रूप धारण केलं तसं आकाशातले काळे मेघ अधिकच दाटी करत जवळ जवळ येऊ लागले. गाडीवाटेचा धुराडा उंच उडत मध्येच गोल गोल फिरू लागला. आजुबाजुला शेतात ज्वारी, वायवनची धूळपेरणी करणारे, काडीकचरा वेचणारे हात घाई करू लागले. पहाडातल्या डोंगरात चरावयास गेलेली गुरं शेपट्या वरती करत चौखूर उधळत रानवारा पिऊन घराकडं परतू लागली.
सदाबा गोऱ्ह्यांची शेपटी मुरडत गाडी दामटू लागला. ढगांनी नभात गडगडायला सुरुवात केली. तोच दूर क्षितीजाकडं सातपुड्यात लख्ख विजेची काकरी उमटली व नंतर कडकडकड जोराच्या आवाजांनी कानठळ्या बसल्या. आवाजानं इतक्या वेळपासुन सुरक्षित अंतर राखायला लावणारी माला जवळ सरकली. टपोरे थेंब टपटप आवाज करत चहू बाजूंनी नाचत येऊ लागले. पुढच्या काही क्षणात वारा, ढग, कडकड, चमचम, थेंब यांचा एकच गजबाजला उडाला. रानातली माणसं औत, गाडी धुरवत घराकडं परतू लागली तोच धारा बरसू लागल्या व स्वर्गीय मृदगंंध उठला. झाडे, पशु, पक्षी ओलीचिंब होत त्या वासात बेधुंद होऊ लागली. मातीला तर जणू न्हाणंच आलं. पुढं खेडंगाव लागलं. लहान लहान चिल्लीपिल्ली पावसाच्या धारा अंगावर घेत चार महिन्यांपासून उकाड्यानं होणारी जिवाची काहिली मिटवत होते. घरचेही अंगावरच्या घामोळ्या पहिल्या पावसानं जातील म्हणुन मनसोक्त ओलं होऊ देत होती. रानातून ओली होऊन कामाची माणसं पडत्या पावसात आपापली कामं उरकत होती तर बाया घरात घुसत इतर कामं आवरत होत्या. सदाबाच्या गाडीनं गाव ओलांडत नाला गाठला. नाल्याला चहाच्या रंगाची पान्हाळी फुटत होती. तो प्रवाह नागिणीगत रेतीतून धावत होता. पावसाच्या गारव्यानं, झडीनं आपण व माला बाहेरच्या अंगानं भिजत चाललो होतो तसतसं सुरक्षित अंतर कमी होत नाहिसं झालं होतं.
आपलं अढी भरलेलं मन आता अनामिक ओढीनं वेधलं जाऊ लागलं. तोच मालाचा हात चाचपडत पुढं सरकत आपल्या हाताचा मागोवा घेऊ लागला. आता पाऊस जसा मातीत मुरत झिरपत होता तसाच स्पर्श एकरूप होत मनोसंवेदना प्रफुल्लीत करत होता. जशी सौदामिनीची काकरी नभ चिरत होती तशीच मालेची झुकलेली नजर उन्मत होतांना काळीज चिरत होती. अंधार पडत वाढायला लागला तशी वाऱ्यानं पड खाल्ली मात्र पाऊस खवळला.
ओहोळ, वगळी, नाले तट्ट फुगू लागले. आडवी आलेली नदी गाडीला उतरू देईना. सातपुड्यात उगम पावलेल्या नदी नाल्यांना खूपच ओढ असल्यानं सदाबानं काठावर थोडा वेळ थांबणच पसंत केलं. पुरती ओली झालेली माला छकड्यातून खाली उतरली. वीज चमकताच ती जवळ सरकली. प्रकाशात ओलेतं भिजलेलं रूप पाहुन शहारा उठला. पिवळे पिवळे बेडूक वर येत डराव डराव ओरडत होते. रातकिडे किरकिरत होते. नाल्याकाठनं एक पावसानं भेदरलेला कोल्हा झुबकेदार शेपटी उडवत जवळून जाताच माला घाबरत पहिल्यांदाच आपणास बिलगली. अष्टमीचा चांद पांढऱ्या होत आलेल्या ढगातून डोकावू लागला. तो पर्यंत सदाबानं नदीचा उतार शोधला व छकडा धुरवला. आता थंडीनं थुडथुडणारी माला आपणास खेटुनच बसली. जाणत्या सदाबानं चांदाच्या उजेडात पाहुन न पाहिल्यागत करत तो ही रखमाच्या आठवणीत गाडी दामटू लागला. ढग राहून राहून गुरगुरत होते पण त्यांचं गुरगुरणं आता आपल्या व मालेच्या श्वासापुढं फिकं वाटत होतं. मालेचा सुवास व मृदगंध यानं आपणास धुंदी चढू लागली, व गारवा पार रफू चक्कर झाला. मालाच्या ओल्या कुंतलात बोटं फिरत असतांना ती आपसुक मिठीत विसावली होती.पहिल्या पावसानं तप्त धरा तृप्त झाल्यागत. आजोळ जवळ येऊ लागताच पाऊस पडल्याच्या हारीखानं विठ्ठल मंदिरात भजन सुरू झालेलं असावं. भजनाचे सुर कानावर येऊ लागताच माला व आपण भानावर येऊ लागलो.
दुसऱ्या दिवसापासून मामा कोणतेच सोपस्कार न करता लग्नाच्या तयारीला लागला. आई-बाबा मात्र आपणास शिव्याची लाखोली वाहतच लग्नास आली.
बबनरावांना सारं आठवलं, तोच सेलफोन वाजत असल्याचं लक्षात आलं. त्यांनी फोन उचलताच पलिकडून मालिनीचा आवाज ऐकू आला. “अहो लवकर निघा, पहिल्या पावसाचं ओलं होऊ नका” हे ऐकताच बबनरावांना हसू आलं.