तळपायाच्या भेगा_______(बोधकथा)

।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।

तळपायाच्या भेगा

वडिल खेडेगावातल्या साखर कारखान्यात कामाला होते. मुळ गाव सोडून या गावात कामासाठी विस्थापित झालेले. अचानक काही स्वार्थी नेत्यांमुळे हा साखर कारखाना बंद पडला. माझी बारावी नुकतीच संपलेली. Engg ला माझं एडमिशन करताना वडलांसमोर दोन ऑप्शन होते. आहे ते सगळं शेत विकणे किंवा Engg ला माझं एडमिशन करणे.(आता आम्हाला शेत नाही.)

कारखाना बंद, वडलांकडे दुसरा खात्रीशीर इनकम नाही, म्हणून बँकेने ‘एजुकेशनल लोन’ ही नाकारलं. अशात पगार नसल्याने अन माझ्या Engg च्या सगळया फीस भरायच्या असल्याने, एकुणच ‘हतबल प्रकारच्या वडलांना’ पैसे वाचवण्यायासाठी करावे लागणारे सगळे त्याग माझ्याही वडलांना करावे लागले – , आईचं होतं नव्हतं ते सगळं सोनं विकणे, घरात पराकोटीची काटकसर करणे, दिवाळीला ‘हा शिकतोय’ म्हणून फक्त मलाच कपडे घेणे, 2 रुपये सुद्धा वाचावे म्हणून 10 किंवा 20 किलोमीटर असा जमेल तितका प्रवास ‘चालतच’ करणे… वगैरे.

Engg च्या परीक्षेच्या काही दिवस आधी, PL चालु असतानाच दिवाळीची सुट्टी यायची. तेव्हा त्या दिवसाचं कॉलेज संपवून संध्याकाळी साधारण 5 वाजता बारामती वरून, वैराग ला यायला निघायचो. सहा महिन्यानंतर घरी जाणं असायचं ते. बारामती – भिगवन – टेंभुंर्णी – बार्शी अन शेवटी वैराग, असा ST बदलत-बदलत अगोदरच दुर असलेला प्रवास अजुनच जास्त दुर वाटायचा.

त्यामुळं घरी पोचायला रात्री 11 वाजायचे. दिवसभर चालून-चालून थकलेले वडील वाट पाहून अन जागायचा प्रयत्न करूनही शेवटी तसेच दरवाजाताच झोपी जायचे. आई मात्र ‘आई लोकं असतात’ तशी कितीही उशीर झाला तरी जागीच असायची. पोचल्यावर दरवाजा उघडल्या- उघडल्या जमिनीवर झोपलेले वडिल दिसायचे.

तेव्हा पहिलं लक्ष जायचं ते त्यांच्या तळपायाकडे_________

सीमेंटची वीट बनवताना ती वीट ओली असली की त्यावर खिळ्याने वगैरे रेषा ओढता येतात, अशी खुप साऱ्या रेषा ओढलेली वीट- पूर्ण सुकल्यावर, वाळल्यावर, कडक झाल्यावर जशी दिसेल तसे कित्येक दिवस चालून-चालून वडलांचे ‘तळपाय’ झालेले असायचे. “सगळया तळपायावर वाळलेल्या सीमेंटच्या वीटेसारख्या भेगा दिसायच्या.” मग आईला जेवण वाढून झोप म्हणायचो. त्या रात्री चेहरा निश्चल असायचा पण घास चावताना डोळयात्न मात्र प्रचंड पाणी ओघळायचं. फोनवर बोलताना “सगळं काही ठीक चाल्लय” असं सांगणारया वडलांच्या त्या ‘ठीक’ चा खरा अर्थ, असं त्यांच्या पायाच्या या भेगा सहा महिन्यानंतरच्या एका रात्री गुपचूप सगळे झोपले असताना सांगायच्या…

ती दिवाळीची सुट्टी संपवुन परत VPCOE च्या कॉलेजच्या लायब्ररीत अभ्यासाला बसलं अन पुस्तकात लक्ष लागलं की सुरुवातीला दोन-तीन दिवस डोळ्यासमोर फक्त अन फक्त त्या भेगा दिसायच्या अन मग छाती, डोळे, मन सगळं काही प्रचंड भरुन यायचं.

मग स्वत:वर, अभ्यास न करण्यावर- खुप चिडचिड व्हायची अन नंतर एका अनामिक जाणीवेनं मात्र अभ्यासात प्रचंड मन लागायचं. त्या तळपायाच्या भेगात लपलेलं वडलांचं दु:ख आपोआप मेंदूत शिरायचं. Engg च्या चारीही वर्षांच्या माझ्या आठही परिक्षा अशाच गेल्या. पण शेवटी या कारणांनीच चांगला अभ्यास झाला. मार्क्स चांगले मिळाले. प्लेसमेंट झाली.

अन आता खुप छान म्हणावं इतका सेटल झालोय. पण ती पाहिलेल्या, जवळुन अनुभवलेल्या दु:खाची जाणीव मात्र आज सुद्धा ह्रदयानं खोलवर जपून ठेवलीय. आजही वडील तेवढेच कष्ट करतात.

आजही मी Depress झालो, कशात हरल्यासारखं वाटलं की त्या भेगा डोळयासमोर रेषा ओढतात. एका स्फुट बिंदुत आयुष्ययभराचं दु:ख सामावलेल्या भेगा. त्या भेगा मी काहीही केलं तरी तेव्हा बुजवु शकलो नाही, ते माझ्या हातातही नव्हतं, पण आज मात्र मनापासून त्यांची काळजी घेतो. मी आयटी मधे आहे. Onsite माझ्यासाठी आता नविन नाही. पण त्यांचं सगळं आयुष्य खेड्यात गेलं. कोणाला- मुलगा परदेशात आहे म्हणून सांगताना त्यांच्या चेहरयावर दिसणारा आनंद- मी त्या भेगा काही प्रमाणात बुजवु शकल्याचं समाधान देतात.

आज जे काही मिळवलं त्याचं सगळंच्या- सगळं श्रेय – वडलांच्या त्या “तळपायांच्या भेगांचं” आहे “जगातल्या सगळयाच वडिलांनी आपल्या ह्रदयात स्वत:च्या मुलांसाठी केलेले अन कोणालाही न सांगितलेले काही त्याग लपवलेले असतात.

माझ्याकडे देव माझा पाहतो आहे (Mazyakade Dev Pahat Aahe)________(बोधकथा)

Leave a Comment

error: ।। नमस्कार जय महाराष्ट्र ।। ( क्षमा करा हे चुकीचे काम होणार नाही )