वीरगळ (Virgal) । सतीगळ (Satigal) । वाघदेव (Vaghdev) । धेनूगळ (Dhenugal) । गध्देगळ (Gadhegal) ।
।। नमस्कार जय महाराष्ट्र ।।
वीरगळ (Virgal) :
वीरगळ म्हणजे वीर पुरुषांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेला सहसा – दगडांचा अथवा लाकडाचा स्तंभ असतो. यास वीरस्तंभ असेही म्हणतात. महाराष्ट्रात जुन्या देवळांच्या बाहेर वीरगळ आढळतात. वीरगळ परंपरा ही कर्नाटकातून महाराष्ट्रात आली असे मानले जातात. कर्नाटक राज्यात मोठेमोठे वीरगळ आढळून येतात, त्यातील काही वीरगळ हे शिलालेखांनी युक्त आहेत. महाराष्ट्रात शिलालेख कोरलेले वीरगळ तुलनेने कमी आहेत. कानडी भाषेत कल्लू म्हणजे दगड. वीरकल्लू म्हणजे वीरांचा दगड. त्यावरून महाराष्ट्रात वीरगळ असा शब्द प्रचलित झाला असावा.
महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील गावात आढळ्णारे वीरगळ हा खरंतर आपला ऐतिहासिक ठेवा आहे, पण अती परिचयामुळे एकतर त्याचा शेंदुर फासून देव बनवलेला असतो, किंवा दुसरे टोक म्हणजे पायरीचा, कपडे धुण्याचा दगड म्हणूनही वापर केलेला पाहायला मिळतो. पूरातत्व खात्याने केलेल्या औसा, परांडा इत्यादी किल्ल्याच्या डागडूजीमध्ये वीरगळीचे तुकडे तटबंदीत वापरलेले पाहायला मिळतात.
शिलाहार काळापासून साधारणपणे सतराव्या शतकापर्यंत वीरगळ बनवण्याची प्रथा चालू होती. वीरगळ ही स्मृती शिळा आहे. युध्दात, गोधनाचे रक्षण करताना, एखाद्या पवित्र कार्यासाठी बलिदान करतांना जर एखाद्याला वीर मरण आले, तर त्याच्या स्मृतीप्रीत्यर्थ वीरगळ उभारला जात असे. त्यापासून पुढच्या पिढीलाही आपल्या धर्मासाठी, राजासाठी लढण्याची, बलिदान करण्याची प्रेरणा मिळत असे.
वीरगळ हा आयताकृती दगडावर कोरलेला असतो. या दगडावर १,२,३ किंवा ४ चित्र (शिल्प) चौकटी कोरलेल्या असतात. सर्वात खालच्या चौकटीत ज्या कारणामुळे योध्याला वीर मरण आले, ते शिल्पांकीत केलेले असते. यात वीर युध्द करतांना, गोधनाचे रक्षण करतांना, हिंस्त्र प्राण्याशी लढतांना, शिकार करताना दाखवलेला असतो. दुसऱ्या चौकटीत तो अप्सरांबरोबर दाखवलेला असतो. याचा अर्थ अप्सरा त्याला स्वर्गात घेऊन जात आहेत, तो स्वर्गसुख उपभोगत आहे असा होतो. त्यापुढील तिसर्या चौकटीत ब्राम्हण/ साधू पूजा सांगत आहे आणि वीर एकटा किंवा सपत्नी शंकराच्या पिंडीची पूजा करतांना पाहायला मिळतो. याचा अर्थ त्याने केलेल्या पूण्य कर्मामुळे तो देवाशी एकरुप झालेला आहे. त्याला मोक्ष मिळालेला आहे.
या चौकटीच्यावर पिंड, मंगल कलश आणि त्याच्या एका बाजूला चंद्र आणि दुसर्या बाजूला सूर्य कोरलेला असतो. याचा अर्थ सूर्य आणि चंद्र असे पर्यंत या वीराची किर्ती आसमंतात राहील. पण सत्य परीस्थिती अशी आहे की, वीरगळावर फ़ार कमी प्रमाणात शिलालेख आहेत. त्यामुळे वीरगळ पाहून त्यातील वीर कोण आहे, कुठल्या युध्दात तो कामी आला आणि वीरगळाचा निर्माता कोण आहे हे सांगता येत नाही. अर्थात याला काही अपवाद आहेत. बोरीवलीतील एकसार भागात असलेल्या वीरगळीवर शिलाहार राजा सोमेश्वर आणि यादव राजा महादेव यांच्यात झालेले नौकायुध्द कोरलेले आहे. अशाप्रकारे नौका युध्द कोरलेली महाराष्ट्रातील ही एकमेव वीरगळ आहे. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला-कुडाळ मार्गावर असलेल्या मठ गावात असलेल्या सावंतांच्या वीरगळी आहेत त्यावर शिलालेखही कोरलेले आहेत. या शिलालेखात वीरगळींचा उल्लेख भडखांब म्हणून केलेला आहे.
वीरगळींच्या चित्र चौकटींच्या वरच्या भागात कलशा व्यतिरीक्त इतर अनेक गोष्टी पाहायला मिळतात. वीर कोणत्या धर्माचा हिंदू, जैन बौध्द, कोणत्या पंथाचा शैव, वैष्णव इत्यादी उपपंथाचा असेल, त्याप्रमाणे शिल्पांकन बदलत जाते. वीर वैष्णव पंथी असल्यास विष्णू, गाणपत्य पंथीय असल्यास गणपती, बौध्द असल्यास स्तुप पाहायला मिळतो. वीरगळां सारख्याच काही ठिकाणी साधूशिळा पाहायला मिळतात. त्यात पहिल्या चौकटीत साधू ध्यान करत असलेला किंवा आडवा पडलेला दाखवलेला असतो. त्यावरील चौकटीत तो शिवलिंगाची पूजा करतांना दाखवलेला असतो. बहुतेक वीरगळी आयताकृती दगडाच्या एका बाजूला कोरलेल्या असतात. तशाच काही वीरगळी चारही बाजूला कोरलेल्या पाहायला मिळतात.
चारी बाजूने कोरीवकाम करण्यासाठी नक्कीच जास्त खर्च येत असणार. त्यामुळे वीराच्या हुद्द्याप्रमाणे ऐपती प्रमाणे (वीर किती सधन आणि मातबर होता) त्याचे वंशज खर्च करुन वीरगळ तयार करत असणार. त्यामुळे काही वीरगळ एकाच बाजूला कोरलेल्या तर काही चारही बाजूंनी कोरलेल्या पाहायला मिळतात. वीरगळीसाठी वापरला जाणारा दगड, त्यावरील कलाकुसर या गोष्टीही खर्चिक असल्याने जवळपास उपलब्ध होणारा दगड वापरुन कमीत कमी कलाकुसर केलेल्या वीरगळी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याउलट एकसारच्या वीरगळी राजाने त्याच्या विजया निमित्त उभारल्यामुळे त्यासाठी बाहेरुन आणलेला उत्कृष्ट दगड, त्यावरील सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते.
किल्ले, डोंगर दर्या फ़िरतांना आदिवासी / वनवासी वस्ती, पाड्याजवळ एखाद्या उभ्या लाकडी फ़ळीवर कोरलेले चक्र/फ़ूल त्या खाली कोरलेल्या सुर्य – चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली कोरलेली घोड्यावर बसलेल्या किंवा युध्द करणार्या वीराची प्रतिमा पाहायला मिळते. या असतात आदिवासी वीरांच्या वीरगळी. याशिवाय दगडात कोरलेल्या वीरगळीत घोड्यावर बसलेला योध्दा दाखवलेला असतो. वरच्या बाजूला सूर्य चंद्र कोरलेले असतात.
सतीगळ (Satigal) :
वीरांबरोबर सती जाणार्या स्त्रियांच्या स्मरणार्थ सतीगळ बनवल्या जात. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आढळ्णार्या सतीशिळांमध्ये स्त्रीचा खांद्यापासून हात चित्रीत केलेला असतो. हा हात कोपरात काटकोनात वळलेला असतो. हातात बांगड्या असतात. हाताखाली दोन प्रतिमा कोरलेल्या असतात.
या हाताची रचना आशिर्वाद देणार्या हाताप्रमाणे असते. तसेच सतीगळ देवळाच्या परिसरात उभारल्या जात असत. त्यामुळे सतीगळची शेंदुर लाऊन पूजा केल्याचे बर्याच ठिकाणी पाहायला मिळते. वीरगळी प्रमाणे एक, दोन किंवा तीन शिल्प चौकटीत सतीगळ कोरलेली असते. त्यात खालच्या चौकटीत चितेवर बसलेली स्त्री, चितेच्या बाजूला उभी असलेली स्त्री किंवा नवर्याच डोक मांडीवर ठेऊन चितेवर बसलेली स्त्री, वाघावर , घोड्यावर बसलेली स्त्री कोरलेली असते. दुसर्या चौकटीत नवरा बायको हातात हात घालून उभे राहीलेले दाखवलेले असतात. पहिल्या किंवा दुसर्या चौकटीत उजव्या बाजूला सतीचा कोपरापासूनचा हात दाखवलेला असतो.
तिसर्या चौकटीत नवरा बायको पिंडीची पूजा करतांना दाखवलेले असतात. त्यावर सूर्य चंद्र कोरलेले असतात. वीराबरोबर त्याच्या दोन किंवा तीन पत्नी सती जात असत. त्यांचे प्रतिक म्हणून कोपरात वाकवलेले दोन किंवा तीन हात दाखवलेले असतात. काही वीरगळामध्ये वीराची पत्नी आणि सतीचा हातही दाखवलेला असतो. त्याला वीरसतीगळ असे म्हणतात. ही वीराची आणि सती या दोघांची एकच स्मृतीशिळा असते.
वाघदेव (Vaghdev) :
डोंगरवाट धुंडाळतांना काही लाकडी फ़ळ्यांवर सुर्य – चंद्राच्या प्रतिमा आणि त्याखाली कोरलेली वाघाची प्रतिमा पाहायला मिळते. याला आदिवासी लोक वाघदेव म्हणतात. लाल, पिवळा, केशरी या नैसर्गिक रंगात वाघदेवाची प्रतिमा रंगवलेली पाहायला मिळते. काही ठिकाणी वाघाच्या खाली सापाची प्रतिमाही कोरलेली आढळते. जंगलातील हिंस्त्र श्वापदांपासून आदिवासींचे त्यांच्या गाईगुरांचे रक्षण वाघदेव करतो अशी आदिवासींची श्रध्दा आहे. जंगलाशी नेहमीच संबंध येणार्या आदिवासींना वाघ, बिबटे इत्यादी मांजर वंशीय प्राण्यांकडुन होणार्या प्राणघातक हल्ल्याची भिती मनात ठेउनच जंगलात जावे लागते. या भितीतूनच वाघदेव या कल्पनेचा जन्म झाला असावा. लाकडी फ़ळीवर कोरलेली वाघदेवाची प्रतिमा असलेले काष्ठशिल्प आदिवासी आदिम काळापासून बनवत असावेत. जंगलात सहजपणे उपलब्ध होण्यार्या लाकडावर कोरीवकाम करुन त्याला नैसर्गिक रंगात रंगवून “वाघदेव” तयार केला जातो. त्यानतंरच्या काळात दगडात कोरलेल वाघाच शिल्प हरिशचंद्र गडावर जातांना टोलार खिंडीत वाघाच शिल्प पाहायला मिळत. याशिवाय नाशिक जिल्ह्यातील बागलाण भागात असलेल्या न्हावीगडावर चढताना, ठाणे जिल्ह्यातील अशेरीगडावर वाघदेव पाहायला मिळतात.
लाकडावर कोरले जाणारे हे वाघदेव उन पावसाच्या मार्याने खराब होत. त्यावर उपाय म्हणुन आताच्या आधुनिक काळात वाघदेवाची सिमेंटची बेढभ आणि भडक रंगात रंगवलेली मुर्ती पाहायला मिळते. काही ठिकाणी अशी वाघ देवांची मंदिरेही पाहायला मिळतात. काळाबरोबर होणार्या सिमेंटच्या या आक्रमणामुळे लाकडावर वाघदेव कोरण्याची ही कला आणि पध्दत लुप्त होईल. भारत भर पसरलेल्या जंगलात असलेल्या वाघदेवांची पूजा दरवर्षी वाघबारसीला म्हणजेच अश्विन वद्य व्दादशीला होते.
धेनूगळ (Dhenugal) :
धेनूगळ म्हणजे गाय वासरु दगड हे एक दानपत्र आहे. दान दिलेल्या गावाची, जमिनीची सीमा दाखवण्यासाठी धेनूगळ वापरला जात असे. या आयताकृती उभ्या दगडावर गाय आणि वासरू कोरलेले असते. वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र कोरलेले असतात. गाय हे राजाचे प्रतिक असून वासरू हे प्रजेचे प्रतिक आहे. गाय ज्याप्रमाणे वासराचे पालन करते तसेच राजा प्रजेचे पालन करतो. या गाय वासरू दगडांवर काही ठिकाणी शिलालेखही कोरलेले पाहायला मिळतात.जसे दुंधा किल्ला वरील धेनूगळ जि.नाशिक येथे आहे
गध्देगळ (Gadhegal) :
प्रजेचा प्रतिपाळ करणार्या राजाची आज्ञा प्रजेने मोडली, तर गय केली जाणार नाही हे दर्शविण्यासाठी गध्देगळ कोरले जात असत. गध्देगळ हे दानपत्र होते. शिलाहार राजांच्या काळात चालू झालेली ही गध्देगळावर दानपत्र कोरण्याची प्रथा पुढे यादवांची राजवट ते इस्लामी राजवटी पर्यंत चालू होती. ( साधारणपणे इसवीसन ९०० ते इसवीसन १६००). महाराष्ट्रात आढळणार्या गध्देगळांवरील शिलालेख (दानपत्र) संस्कृत आणि मराठी भाषेत कोरलेले आढळतात. विजापूर येथिल गध्देगळावरील शिलालेख फ़ारसी लिपीत आहे.
गध्देगळ हा दगड आयताकृती असून त्याचे ढोबळमानाने तीन भाग होतात. सर्वात वरच्या बाजूस सूर्य – चंद्र आणि त्यामध्ये कलश कोरलेला असतो. हि चिन्ह दान देणार्या राजाची किर्ती आसमंतात सूर्य – चंद्र असेपर्यंत कायम राहील हे दर्शवणारी असतात. मधल्या भागात दानपत्र व धमकी कोरलेली असते. दानपत्रात जमिन कोणाला दान केली, कधी दान केली, कोणाच्या उपस्थितीत दान केली, कोणत्या राजाच्या कारर्किर्दीत दान केली आणि दान केल्याला जमिनींच्या सीमा यांचा उल्लेख असतो. सर्वात खालच्या बाजूला गाढव किंवा घोडा स्त्रीशी संभोग करतांना दाखवलेले असते. दिलेल्या दानाचा दुरुपयोग केल्यास, नियम मोडल्यास काय शिक्षा होईल हे सांगणारी ही शिल्पांकीत केलेली धमकी / शिवी असते. एखाद्या व्यक्तीनं जर, गध्देगळावर लिहिलेल्या मजकुराचं पालन केलं नाही अथवा त्याला विरोध केला तर त्याच्या घरातील स्त्रीसोबत अशारीतीने बळजबरी केली जाईल असा या शिल्पाचा अर्थ आहे. एखाद्याच्या घरातील महिलेसोबत असा प्रकार झाल्यास त्या व्यक्तीचं समाजातील स्थानही डळमळीत होईल. त्यामुळे घाबरून कोणीही राजाज्ञा मोडणार नाही. अशी यामागील कल्पना असावी. काही गध्देगाळांवर शिलालेख कोरलेले नसतात. केवळ वरची सूर्य – चंद्र पट्टी आणि खालच्या बाजूला गाढव किंवा घोडा स्त्रीशी संभोग करतांना दाखवलेले असते.
डोंबिवलीतील गावदेवी मंदिराजवळ शिलालेख असलेला गध्देगळ पाहायला मिळतो. कल्याण जवळ असलेल्या लोणाड बापगाव ,खराड या गावात, बदलापूर, भांडूप, गोराई इत्यादी ठिकाणी गध्देगाळ सापडलेले आहेत. परांडा किल्ल्यातील हमामखान्यातही एक गध्देगळ ठेवलेला आहे. याशिवाय मंदिर परिसरातही गध्देगाळ पाहायला मिळतात. संगमेश्वर जवळील कर्णेश्वर मंदिर, पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेले पूरचे नारायणेश्वर मंदिर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परुळ्याचे वेतोबा मंदिर इत्यादी अनेक ठिकाणी गध्देगळ आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत १०० च्या अधिक गध्देगळ सापडलेले आहेत.
गावात सापडलेले वीरगळ, मुर्ती देवळाच्या परीसरात आणून ठेवलेल्या असतात. तसेच हे शेतात, बांधावर सापडलेले वीरगळ मंदिरात आणून ठेवलेले आहेत. या दगडांचे ऐतिहासिक महत्व माहिती नसल्यामुळे काही ठिकाणी त्याची पूजा केली जाते . डोंबिवलीतील गावदेवी मंदिरा बाहेर असणार्या गध्देगळावर शनी म्हणून तेलाचा अभिषेक करणार्यांची रांग लागलेली असे, सततच्या तेलाच्या अभिषेकामुळे त्यावरील शिलालेख अस्पष्ट झालेला आहे. हा प्रकार थांबवण्यासाठी शेवटी हा गध्देगळ लोखंडी पिंजर्यामध्ये बंद करुन ठेवावा लागला. भांडूप, गोराई येथील गध्देगळाला शेंदूर फ़ासून त्याची पूजा केली जाते. गध्देगळावर अश्लील शिल्प आहे, या कारणास्तव गध्देगाळ नष्ट केला जातो. सध्या पूरचा गध्देगाळ जमिनीत पुरला आहे, तर परुळ्याचा विहिरीत फ़ेकलेला आहे. अशाप्रकारे अजूनही काही ठिकाणचे गध्देगळ नष्ट झाले असण्याची शक्यता आहे.